Skip to main content

श्रध्दा की अंधश्रध्दा ?

लेखक गॅरी शोमन यांनी सोमवार, 16/11/2015 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाचा अपघात होणे ही सर्वसाधारण घटना आहे. अपघात झाल्यानंतर मेडिकल ट्रिटमेंट त्वरीत घेणे ही मेडिकल सायन्सवर असलेली श्रध्दा आहे. पण एक शुल्लक जखम तीन महिने सततच्या बँडेज, अ‍ॅटीबायोटिक्स च्या गोळ्या आणि इंजेक्शने घेऊन बरी न होणे. सतत त्यात पु होणे. त्यामुळे जांघेत गाठ येणे आणि दररोजचे काम करणे अशक्य होणे याला डॉक्टरी कक्षेच्या बाहेर काहीतरी आहे असे मानणे यात कोणती अंधश्रध्दा आहे ? हे सर्व मी वयाच्या २३ वर्षी भोगल आहे. माझी साडेसाती चालु होती. ५ मे १९८८ ला मित्राबरोबर सकाळी स्कुटरवर मागे बसुन जात असताना डेक्कन जिमखाना - पुणे येथे एका पी एम टी ने मला छोटासा धक्का दिला. डाव्या पायाचा घोटा हा मागच्या सिटवर बसल्यामुळे जास्त बाहेर आला होता इथेच एक जखम झाली. लगेचच समोरच्या प्रयाग हॉस्पीटल मधे त्यावर प्रथमोपचार झाले. टाके घातले गेले. जखम बांधली जाऊन मी घरी गेलो. पुढे तीन महिने ही जखम भरुन आली नाही. तीन सर्जन बदलले. पाच अ‍ॅन्टीबायोटिक्स ची प्रिस्क्रीपशन्स झाली. एका सर्जन साहेबांच्या सांगण्यावरुन डायबेटिस आहे किंवा कसे हे ही तपासले. तेव्हा मी २३ वर्षांचा होतो आज मितीला मी ५२ वर्षांचा आहे आणि अद्याप मला डायबेटिस नाही. तीन महिने मी फार चिंतेत होतो. मी ही सगळी ट्रीटमेंट सरकारी दवाखान्यात न करता खाजगी दवाखान्यात करत होतो. सदर डॉक्टर्स फारच अनुभवी आहेत याबाबत आजही मला शंका नाही. त्यांनी पराकाष्ठा केली, औषधे बदलली, बँडेजच्या पध्दती बदलुन खास बँडेज लावली. माझ्या दृष्टीने त्यांनी कुचराई केली नाही तरी अपघातातली साधारण १ इंच लांबीची थोडिशी खोल जखम तीन महिन्यात बरी होऊ नये यावर काय म्हणावे ? बर जखम बरी होत नाही हे ठिक आहे पण त्यात वेदना, पु आणि जांघेला गाठ येऊन चालण्याला त्रास आणि इन्फेकशनमुळे ताप हे तीन महिने चालु होते. कसा तरी मी कंपनीत जात होतो. एक दिवस माझा धीर सुटला आणि मी श्रीगजानन महाराज शेगाव यांची प्रार्थना केली. चक्क त्यांना नवस बोललो की महाराज या दुखण्यातुन सोडवा मी आपल्या दर्शनाला शेगावला येईन. कंपनीत मी कंपनीतल्या डॉक्टरसाहेबांकडे गेलो आणि त्यांना ही व्यथा सांगीतली. या तीन महिन्यात मी २ वेळा बँडेज बदलण्यासाठी कंपनीच्या डिस्पेंन्सरीत गेलो होतो पण कधी डॉक्टरांना भेटावे अशी बुध्दी झाली नाही. हे डॉक्टर साहेब सिनीयर होतो. बी जे मेडीकलला ते शिकवायचे. त्यांनी मला पस कल्चर करण्याचा सल्ला देऊन काही जुजबी औषधे दिली. मला पस कल्चरचा रिपोर्ट मात्र आणुन दाखव मग औषधे बदलुन देईन असा सल्ला दिला. खर तर मी इतका त्रासलो होतो की या डॉक्टर साहेबांनी मला कोहळा टांगायला सांगीतला असता. उतारा टाकायला सांगीतला असता किंवा कोंबडा कापायला सांगीतला असता तरी मी तितक्याच श्रध्देने ते केले असते. पस कल्चर चा रिपोर्ट मी त्यांना दाखविला. त्यांनी त्यातली मेख मला वाचुन दाखवली. ते म्हणाले या जखमेत जे जंतु आहेत ते फक्त दोनच अ‍ॅन्टीबायोटीक्स ला दाद देत आहेत. बाकीची सात प्रकारची अ‍ॅन्टॉबायोटीक्स इथे कुचकामी आहेत. मग त्यांनी त्या दोन पैकी एका अ‍ॅन्टीबायोटिक्सचा गोळ्यांचा तीन दिवसांचा कोर्स मला सांगीतला आणि जी जखम तीन महिने बरी झाली नाही ती तीन दिवसात बरी झाली. याला काय म्हणावे ? श्री गजानन महाराजांच्या लीलेवर आधारीत श्री गजाननविजय ग्रंथात याचा उल्लेख आहे की व्याधी तीन प्रकारच्या असतात. आधीभौतीक ज्या औषधाने बर्‍या होतात. आधीदैवीक ज्या नवसाने बर्‍या होतात आणि आधीअध्यात्मिक ज्या कधीच बर्‍या न होता मृत्युला कारणीभुत होतात. आज शास्त्र पुढे गेले आहे म्हणुन आपण औषध उपचार टाळत नाही. शरीर आणि मन याची रचना इतकी काँप्लेक्स आहे की डॉक्टर शेवटी मानवच आहेत. त्यावेळेला त्यांची एकाग्रता किती साथ देते यावर काही व्याधींवर अचुक आणि प्रयोग न करता औषधे लागु पडतात. मी असे समजलो की मला त्या सिनीयर डॉक्टर साहेबांना भेटायची बुध्दी श्री गजानन महाराजांनी दिली. त्यांना सुध्दा पस कल्चर करावे हा सल्ला देण्याची बुध्दी महाराजांनी दिली असावी. अन्यथा अनेक वर्षे प्रॅक्टिस करणार्‍या नामांकित डॉक्टर्स ना हे का सुचु नये ? मी त्या दिवसापासुन महाराजांचा भक्त झालो हे सांगणेच नको. माझ्यामते ते मला अडचणीतुन मार्ग दाखवतात ही माझी श्रध्दा आहे. याचा अर्थ मी साधा ताप आला म्हणजे औषध न घेता ग्रंथाचे पारायण करतो असे नाही. पण जेव्हा प्रचलीत शास्त्र हात टेकते अश्या अनेक वेळी ह्याचा अनुभव घेऊन माझी श्रध्दा दृढ झाली आहे. शेंगाव संस्थान आज ५० पेक्षा जास्त सेवाकार्ये चालवत आहे ज्यात मोफत औषध उपचार, अन्नछत्र आणि आदीवासी लोकांना सहाय यासारखे उपक्रम चालवतात. इथे सेवा करण्याकरता संपुर्ण विदर्भातली तरुणाई वेटींग लिस्ट वर प्रतिक्षा करते. मी एकदा दर्शनाच्या रांगेत उभा असताना एका लहान मुलाला वांती झाली. समोर उभे असलेले सेवक काही क्षणात ती जागा कुणाच्याही सुपरव्हिजन शिवाय साफ करुन गेले. त्यानंतरच्या क्षणाला इथे असे काही झाले होते याचा मागमुस राहिला नाही. हे अनेक वर्षे असेच सुरु आहे. शेंगाव च्या संस्थानमधे पैश्याचा घोळ झाल्याचे ऐकीवात नाही. बाजारात १२ रुपये बिसलरी च्या पाण्याचे मुल्य असताना शेंगाव संस्थानमध्ये पाणी ८ रुपये म्हणजे खरेदीच्या किंमतीत विकायचे हे तत्वज्ञान फक्त महाराजांच्या अतिव श्रध्देपोटीच येते. अनेक मिपाकर असे असतील की त्यांना अश्या प्रसंगातुन जावे लागले नसेल किंवा परमेश्वर कृपेने जावे लागणार नाही. तुम्ही नास्तीक असाल तर माझ्या मते पुण्यवान आहात. पण अडचणीत एकदाही परमेश्वराची आठवण झाली नाही अश्यांनी परमेश्वरच नाही म्हणुन का आकांत करावा ? तुमच्या आकांत करण्याने श्रध्दा संपणार आहे की फुसक्या कायद्यांनी तुम्ही श्रध्दांना बांध घालु शकणार आहात ? अनिस चे कार्य बुवाबाजीच्या विरोधात आहे ते नक्कीच चांगले आहे. पण उठ सुट तोंड सुख घेणे किती योग्य आहे याचा विचार त्यांचे आजी आणि माजी कार्यकर्ते घेतील असे वाटते. एक चांगली चळवळ श्रध्दा झोडपलीत तर नक्कीच संपुन जाईल. चळवळी लोकाश्रयाने चालतात. कोर्टात उभे रहा तुम्हाला ईश्वरसाक्ष शपथ घ्यावी लागते. का बर ? सत्य शोधायला सरकार आहे ना ? ब्रेन मॅपींग सुध्दा आज कायद्याला पुरावा म्हणुन मान्य असताना ती साक्ष ब्रेन मॅपींग करुन खरी किंवा खोटी ठरवाना ? ईश्वराला कशाला मधे आणता ? धर्म ही अफुची गोळी आहे असे म्हणताना मात्र कोर्टात ईश्वराला मधे घेता. हीच धर्मभावना ह्या कल्याणकारी राज्यात अन्नदान करुन अनेकांना अन्न देण्यास भाग पाडते. वास्तविक कल्याणकारी राज्यात ज्यांना संभाळायला कोणी नाही अश्या गरीब - पिडीतांना किमान अन्न द्यायला सरकारी अन्नछत्रे असायला हवीत. मोफत योग्य तो औषधौपचार मोफत हवा. अश्या वेळी योजना कागदावर रहातात आणि धर्मभावनेने प्रेरीत होऊन मग ते कोणत्याही धर्माचे असोत पिडीतांची सेवा करतात. सर्वशक्तीमान सरकार पेक्षा कायदा आणि त्यातील प्रोव्हीजन पेक्षा कोणीतरी मोठा किमान या देशात तर आहे ना ? श्रध्दा हि शक्ती आहे जी सरकारच्या पुढे जाऊन काम करते. परमेश्वराला न मानणारे कार्यकर्ते सुध्दा पिडीताची सेवा व्हायला पाहिजे ही श्रध्दा ठेवतात म्हणुन जे काम कायद्याने होत नाही त्याही पेक्षा उत्तम श्रध्देने होते. पटवुन घ्या असा आग्रह नाही. विचार करा अशी साद ही नाही. पण दुसर्‍याच्या धर्म भावनांना वा श्रध्देला हीन आणि पुरोगामी म्हणुन ठोकरण्या आधी फक्त क्षणभर विचार करा हे योग्य आहे का ?

वाचने 19460
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

सहमत आहेच. श्रद्धाळू लोकांना प्राक्तन हे उत्तर दिले तर ते पटते. पण अश्रद्ध लोकांना अनियमित दुर्दैव हे उत्तर पटले तरी मानवत नाही. अधिक माहिती सुबोध जावडेकरांच्या मेंदुच्या मनात पुस्तकातील अंधश्रद्धा आणि मेंदुविज्ञान या प्रकरणात आहे.

In reply to by ट्रेड मार्क

जग परस्परावलम्बी घटकान्च्य्या क्रिया प्रतिक्रिया नी चालते आहे.त्याला कोणी नियंता नाही असे मानणारे त्याना आपण नास्तिक म्हणू या.साहजिकच "तो" प्रसन्न होण्याचा प्रश्नच नाही.पण असा माणूस तर्कावर चालताना उत्तर सापडे पर्यन्त debit चे corresponding credit नियति ,देव वा दैव याना देत असतोच.

In reply to by संदीप डांगे

देव बीव, जपजाप, मंत्रतंत्र न मानणारी लोकं संकटात असतांना काय करतात? मी स्वतः नास्तिक आहे. पण अंशतः आस्तिकही आहे. (असे मला वाटते). संकट म्हणजे काय? तर, अशी धोकादायक परिस्थिती ज्यावर आपले कांही नियंत्रण नाही, उपाय नाही अशी. हा प्रत्येकाचा वेगवेगळा आणि वैयक्तिक विचार असतो. कांही जणं संकट निवारण्याचे अजिबात प्रयत्न करणार नाहीत (लगेच देवाचा धावा वगैरे करतील) तर कांही जणं परिस्थितीशी चिवट झुंज देत हर प्रयत्न करतील. त्यांच्याजवळ दुर्दम्य आशावाद आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे मानसिक बळ असते. ९० टक्के परिस्थितीत ते त्यांच्या प्रयत्नांनीच संकटावर मात करतात. पण अगदी १० टक्के परिस्थितीत त्यांना देवाकडे मदतीसाठी पाहावे लागते. पण अशा वेळीही त्यांचे स्वतःचे प्रयत्न चालूच असतात. 'असेल माझा हरी तर.....' अशी वृत्ती नसते. मला वाटते मी ह्या वर्गवारीत येतो. निसर्गाच्या तांडवात (पूर वगैरे) आपल्या वृद्ध आई-वडीलांचे प्राण वाचवायची आपल्यावर जबाबदारी असते आणि हाती कांही साधन नसताना आपण एखाद्या ठिकाणी अडकतो तेंव्हा देवाला साकडे घालणे हा अशा प्रयत्नातील एक मार्ग असतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

सहमत आहे. पण संकटाशी झुंजतांना आस्तिक-नास्तिक लोक दोघेही प्रयत्नांची पराकाष्ठा करतांना पाहिली आहेत. सरसकट देवावर सोडून देणारे फारच कमी असावेत. 'असेल माझा हरी तर देइल खाटल्यावरी' छाप असे फारसे कुणी आढळत नाहीत. अगदी अंगारे-धुपारे, बुवाबाजी करणारेही हाही 'प्रयत्न करून' पाहू म्हणून दैवी उपायाच्या नावाखाली नकळत प्रारब्धच (जे कधीच कोणी बदलू शकत नाही असे पुन्हा आस्तिकच मानतात) बदलण्याचा प्रयत्न करतात. माझ्या निरिक्षणानुसार बहुसंख्य लोक प्रयत्नवादीच असतात. पण मनासारखे झाले नाही तर देवाचा हवाला देतात. त्यांना कदाचित हार मान्य नसेल, किंवा देवाच्या नावाखाली आपल्या कमतरता झाकण्याचाही प्रयत्न असेल, किंवा खरंच जिथे प्रयत्न परिणाम देत नाहीत तिथे मग हात टेकतात. नास्तिकांचेही प्रयत्न परिणाम देत नसतीलच ना... तेव्हा नास्तिक काय म्हणून गप्प बसतात याचंही कुतूहल आहेच. माझ्याबाबतीत, गोष्टी मनासारख्या झाल्या नाहित तर थोडी तणतण होते पण 'दैवी हस्तक्षेपामुळे आपल्यास यश येत नाही' हा विचार आजवर कधी मनाला शिवला नाही. काही संकटं तर स्वनिर्मित असतात, काही कर्मधर्मसंयोगाने (नशिबाने) येतात. आपल्या आपणच सर्व निस्तरायचे असते ही भावना असल्याने चमत्कार व दैवी मदतीची वाट बघणे हा प्रकार नाही. पण काही चांगले, उत्तम घडले तर देवाचे आभार मानायला तोंडातून नकळत धन्यवाद निघतात. ह्यालाच विपश्यनेत 'मैत्री साधना' म्हणतात असे नंतर कळले.

In reply to by संदीप डांगे

पण संकटाशी झुंजतांना आस्तिक-नास्तिक लोक दोघेही प्रयत्नांची पराकाष्ठा करतांना पाहिली आहेत. सरसकट देवावर सोडून देणारे फारच कमी असावेत. 'असेल माझा हरी तर देइल खाटल्यावरी' छाप असे फारसे कुणी आढळत नाहीत. यनावाला आणि मारवा यांना हीच गोष्ट तर समजत नाहीये. पुन्हा पुन्हा तेच तेच दळण चालू आहे. मारवासाहेब तर गिगाबायटी प्रतिसाद देत सुटलेत. वैताग आला आता याचा.

श्रद्धा व अंधश्रद्धा यात फरक नाहीच. शरीरातील रेझिस्टंसमुळे व औषधातील बदलामुळे फरक पडला, तर त्याचे श्रेय कोणत्या तरी महाराजांना देणे हे योग्य नाही. बाकी पाणी स्वस्तात मिळणे हा तर आपला हक्कच, ते काही कोठल्या मठाचे काम नाही. पण बाहेरची बजबजपुरी पाहिली की आपल्याला त्यांचे कार्य मोठे वाटते. श्रद्धा व अंधश्रद्धा यात फरक नाहीच. एखाद्याच्या म्हणजे कुटुंबातील वडलांच्या किंवा आईच्या श्रद्धेमुळे मुलांनाही तसेच वळण लागते. संस्कारांच्या नावाखाली हे सारे चालते. उपासतापास, व्रते, परीक्षेआधी देवाला नवस वगैरे हे प्रकार तसे हार्मलेस वाटले तरी माणूस कळतनकळत या गोष्टींच्या आहारी जातो. त्यावरची उपाययोजनादेखील कुटुंबाच्या हिताचीच नसेल असे नाही. शिवाय नसलेल्या देवावर श्रद्धा ठेवणे म्हणजे केवळ आपली बुद्धी गहाण ठेवण्यासारखेच असते. सुरूवातीला मनाला आधार म्हणून चांगला वाटणारा (शिवाय त्यातून वाईट तरी काही होणार नाही ना अशी धारणा असलेला) हा प्रकार आपल्या बुद्धीलाच केव्हा गुलाम बनवतो हेही कळत नाही. अशा देवभोळ्यांच्याच भावनांचा आधार घेऊन अाज गुंडप्रव्ृत्तीच्या राजकारण्यांनी धर्म रस्त्यावर आणलेला आहे आणि आता आपल्यालाच त्याचा उपद्रव सुरू झालेला असूनही त्यावरचा काही उपाय दिसत नाही. यामधून होणारे कौटुंबिक व सामाजिक पातळीवर होणारे दुष्परिणाम आपल्याला डोळे असूनही दिसत नाहीत, हे दुर्दैव.

होमियोपैथी च्या बर्याच साधक बाधक चर्चा या आधीच्या प्रतिक्रिया तून झाल्या आहेत. त्या बद्दलचे मी अनेक चिकित्सक पणानं घेतलेले अनुभव सांगू शकतो. 1)गैंगलीआॉन (अचूक उच्चार डॉक्टरनी पहावा) माझ्या ८ वर्षाच्या मुलाला मनगटावर बाहेरच्या बाजूस १ से मी ची गाठ झाली होती, अनेक अैलो.डॉक्ट.नी छोटं ऑपरेशन सुचवलं होतं,होमियोपैथी नं ,लक्षात ठेवा साबु.गोळ्यानं ते कायमचं बरं झालं २)दुसर्या लहान मुलाला सतत डोळ्याखाली फोड उठायचे अैलो.डॉक्ट. ते फोडायचे, ते पुनः पुन व्हायचे साबु.गोळ्यानं ते कायमचं बरं झालं ३)माझ्या स्वताच्या बाबतीत अनेक अनुभव आहेत,युरिन इन्फे जे अैलोपैथिने हायर अैंटीबायोटीक्सने बरे व्हायचे नांव घेइना होमियोपैथी ने ४ दिवसात बरे झाले,इथं हे सांगण महत्वाचं आहे कि आमच्या होमियोपैथंनं पहिलं माझ्या अैलो गोळ्या बंद केल्या असे अनेक अनुभव मी सांगू शकतो होमियोपैथी जे बाजारी करण झालेलं आहे त्याच्या विरोधातच आमचा होमियोपैथ असतो, खोटे दावे उदाहरणार्थ मानेवरचं ९इंचाचं आवाळू घालवतो इत्यादि खोटं आहे तो म्हणतो, आणि अशा भंपक दाव्यामुळं होमियोपैथी बदनाम झाली आहे असं तो मानतो तान्हया बाळापासून ८० वर्षाच्या आजोबापर्यंत त्यांचे पेशंट असतात,आपला नंबर यायला कमीतकमी दोन तांस लागतात, एव्हडी गर्दी असते, ही अतिशयोक्ति नव्हे, (आय स्वेअर) कांहीं नामवंत अैलोपैथ त्यांच्या स्वताच्या ट्रीटमेंट साठी त्यांच्या कडं आलेलं मी पाहिलेले आहेत, एकाच प्रिमायसेस मध्ये आमच्या होमियोपैथचा व त्याच्या भावाचा एम बी बी एस दवाखाना होता (ते भाऊ आता हयात नाहीत) भावांचा दवाखाना बिलकुल चालायचा नाही, हे सगळं सविस्तर सांगण्यात माझा वैयक्तिक स्वार्थ कांही नाही कुठल्याचं पैथीतलं मला कांही च कळत नाही, यात श्रध्दा अंध श्रध्देचा कांही भाग नाही , लहान कळत्या न कळत्या मुलाना जेव्हां इथं हमखास गुण येतो तेव्हां अंध श्रध्देचा प्रश्न कुठे येतो इति लेखनसीमा

In reply to by दिवाकर कुलकर्णी

क्रुपया वर उल्लेख केलेल्या होमीओपथी डॉक्टरचा पत्त्ता व फोन नं. मिळु शकेल का? अनेक गरजु माहीतीत आहेत.