Skip to main content

मंत्रसामर्थ्य

लेखक यनावाला यांनी शनिवार, 14/11/2015 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एका कार्यक्रमात एक उच्चशिक्षित अध्यात्मवादी म्हणाले, "ॐ या शब्दात प्रचंड शक्ती आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे.” या विधानात काही तथ्य आहे काय ? ॐ ऊर्जेचा प्रत्यय कधी,कोणाला, कोठे, कसा आला ? या प्रचंड ऊर्जेचे अस्तित्व विज्ञानाने कोणत्या पद्धतीने सिद्ध केले? भर सभेत असली विधाने करायला अध्यात्मवादी कसे धजावतात? अर्थात सभेतील अनेक गलिबलांना (भोळसटांना) ती महान सत्ये वाटतात . ते स्वबुद्धीने विचार न करता माना डोलावतात,"वा! काय विद्वत्ता आहे!" असे म्हणतात , हे खरे. आरोह-अवरोहांसह नाका-तोंडातून शास्त्रशुद्ध सानुनासिक (गेंगाणा) स्वर काढून ॐ-गुंजन करणारे एक्स्पर्टस् आजसुद्धा देशात आहेत.मग आपण अणुभट्टी का उभारतो? ॐ- उच्चारणातील प्रचंड ऊर्जेने टर्बाइने फिरवून विद्युत् निर्मिती का करत नाही? असे करणे शक्य नसेल तर ॐ मध्ये प्रचंड शक्ती असते असे म्हणतात ते कोणत्या अर्थाने? "कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा " अशी ऊर्जेची व्याख्या आहे. ऊर्जा आणि शक्ती हे शब्द समानार्थी आहेत. हां! अखंड अकरा तास बद्धमूलासन घालून ॐ-जप करणार्‍या व्यक्तीला वाटू शकेल की, " ..आता माझी कुंडलिनी जागृत होत आहे...तिने अर्धे वेटोळे सोडले...दीड उलगडले...साडे तीन वेटोळी संपली...बघा! आता तिने फणा उभारला...सुषुम्णा मार्गाने कुंडलिनी वर वर चालली आहे...ती पाहा...आता ती चंद्र तळ्यातले सतरावीचे अमृतस्तन्य प्राशन करीत आहे...घट्..घट्..घुट्..संपले....आता ती ब्रह्मरंध्र भेदित आहे....फट्.. फट् ..फाट्... फोडले....माझी कुंडलिनी चिदाकाशात विलीन झाली...मी देहातीत झालो... जीवन्मुक्त झालो.. ब्रह्मरूप झालो...आनंद...आनंद...सच्चिदानंद...ब्रह्मानंद!" हे सगळे व्यक्तिगत भ्रम आहेत. त्यांत वैज्ञानिक सत्याचा लवलेश नाही. ** भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. त्यावेळी या प्रचंड ओम् ऊर्जेच्या योगाने कोणी कधी प्रतिकार केल्याची एक तरी ऐतिहासिक नोंद आहे का? मूर्तिभंजकांनी सोरटीच्या सोमनाथाची शकले पाडली. तेव्हा ते अविवेकी कृत्य या ॐ-शक्तीच्या आधारे कोणीच कसे रोखले नाही? अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली (१३ वे शतक) तेव्हा चांगदेवांसारखे अनेक सिद्धयोगी दूर नव्हते. त्यातील कोणी ॐ-ऊर्जातज्ज्ञ रामदेवरायाच्या सहाय्याला का गेला नाही? देवगिरीचे दौलताबद का होऊं दिले?. **थोरले माधवराव पेशवे कर्तृत्ववान होते. दुर्दैवाने तरुणपणी त्यांना क्षय रोगाने ग्रासले. अनेक आयुर्वेदाचाचार्यांच्या उपचारांनी गुण आला नाही. अंतिम समयीं मृत्युंजयमंत्रपठणासाठी वेदशास्त्रसंपन्न अशा शेकडो ब्रह्मणांना नियुक्त केले. पण हा महामंत्रजागर निष्फळ ठरला. पेशव्यांचा अकाली मृत्यू टळला नाही. **" माझा प्रवास"या पुस्तकात विष्णुभट गोडसे यांनी पुढील वर्णन लिहिले आहे:--(हे गोडसे १८५७ साली उत्तर हिंदुस्थानात प्रवासाला गेले होते.) "शत्रूचा नि:पात होऊन राज्य सुरक्षित राहावे म्हणून झाशीच्या राणीने अनेक अनुष्ठाने केली, मंत्रजप केले. अथर्वशीर्षाची सहस्र आवर्तने झाली. पेशव्यांकडून त्वरित मदत यावी म्हणून शंभर ब्राह्मण विशेष मंत्रजपास बसविले. पण गोरे लोक शहरात शिरून नरसंहार करू लागले. देवाघरचा न्याय मोठा चमत्कारिक. निरपराध लोकांना केवढी मोठी शिक्षा! झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप मोठे. सर्व मंत्रजप व्यर्थ ठरले. भटांस मात्र सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा मिळाली."--- ब्राह्मणांचे शास्त्रोक्त मंत्रजप व्यर्थ गेले याचे कारण झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप असे गोडसे भटजी म्हणतात.पण हा कार्य-कारण भाव चुकीचा आहे. मंत्रांत काही सामर्थ्य नसते. म्हणून मंत्रजप व्यर्थ गेले. सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा या गोष्टींचा लाभ घेणार्‍यांत विष्णुभट हेही एक होते. अग्निपुराणात मंत्रसामर्थ्याचा अगाध गौरव आहे. त्यातील संग्रामविजय मंत्र:-
:--"ॐ-र्‍हीं चामुण्डे।स्मशानवासिनी किलि किलि हुम् फट्।ॐ-मारय।ॐ-दण्डेन ताडय।ॐ-त्रिशुलेन छेदय।ॐ-चामुण्डे।किलि किलि हुम् फट् स्वाहा।"
लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा मंत्र:-
:---"ॐ श्रीं र्‍हीं र्‍हीं क्लीं क्लीं ऐं कमलवासिन्यै नम:।"
असले हे मंत्र खरे मानणारे लोक पूर्वी होते. आज एकविसाव्या शतकातही आहेत! कुठल्याही मंत्रामध्ये कसलेही दैवी सामर्थ्य नसते. मंत्राने काही साध्य होत नाही.चमत्कार घडू शकत नाही. पूर्वी कधीही घडलेला नाही. भविष्यात कधी होण्याचा संभव नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे. वरील ऐतिहासिक सत्य घटनांवरून याला पुष्टी मिळते. मंत्रात सामर्थ्य असते ही अज्ञानमूलक, खुळचट कल्पना आहे. मंत्रसामर्थ्याने चमत्कार घडतात ते केवळ पुराणे,परीकथा,बालसाहित्य यांतील काल्पनिक गोष्टींत .हे सर्व तथाकथित शक्तिशाली मंत्र आणि "ओले मंतर फू: मंतर कोले मंतर छू: मंतर" तसेच "आबरा का डाबरा" मंतर यांत मूलत: काही भेद नाही.सर्व सारखेच. निरुपयोगी. असे माझे मत आहे. अध्यात्मप्रेमी व्यक्ती गायत्री मंत्राचे अफाट गुणगान करतात. "हा मंत्र संपूर्ण विश्वाचा मूलाधार आहे. (म्हणजे काय ?) या मंत्राचे गायन केले की त्याचे ध्वनी-प्रतिध्वनी अनंत अवकाशात दुमदुमतात. जगभर गायत्री मंत्राचा जप केल्यास पृथ्वी भोवतीचे सर्व वातावरण प्रदूषणमुक्त, शुद्ध आणि पवित्र होईल." असले काही ऐकले की आध्यात्मिक श्रद्धावंत हुरळतो. मग सी.डी.लावून
"ॐ भूर्भुवस्व:। तत्सवितुर्वरेण्यम्।भर्गो देवस्य धीमहि।धियो यो न: प्रचोदयात्।"
हा मंत्र ऐकत बसतो. खिडकी उघडी. डास आत येतात.पायांना चावतात.एवढ्या विश्वप्रभावी मंत्राचा डासांवर काहीच परिणाम होत नाही. पायावर चापट्या मारतो. डास मरत नाही. डासाच्या चाव्याने वैतागतो.मंत्राच्या त्याच त्या ओळींचे दळण ऐकून कंटाळतो."आता राहूं दे. नंतर बघू" असे म्हणून मंत्र बंद करतो. दिवा लावून डास शोधायला लागतो. असा आहे या मंत्राचा प्रभाव! कुठल्याही मंत्रात कसलीही ऊर्जा नसते. असले मंत्र म्हणू नये असे नाही. सकाळी स्नान करून,शुचिर्भूत होऊन, मंत्र म्हटल्याने पवित्र झाल्यासारखे वाटत असेल, मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल, तर तेही नसे थोडके. म्हणून मंत्रजप अवश्य करावा.पण त्याचा उपयोग तेवढाच हे वास्तव जाणावे. .......................................................................................

वाचने 142547
प्रतिक्रिया 233

प्रतिक्रिया

In reply to by संदीप डांगे

१- -कुंडलिनी जागृती ही कुठलाही जपाच्या फार फार प्रचंड नंतरची स्टेप आहे. कुणीही असे आसन घालून ओम ओम जपत कुंडलिनि जागृत करू शकत नाही. २-वर उल्लेखित मंत्राचे एक शास्त्र आहे. पद्धत आहे. ३-पुर्वसूरींनी ध्वनिंवर संशोधन करून हे शब्द सिद्ध केले आहेत. ४-त्याचे डॉक्युमेंटेशन आणि कुणाही सोम्यागोम्याला ते सहज वापरायला मिळत नाहीत, वरील विधान क्र.१ मध्ये जे मांडलेल आहे त्या संदर्भात तसेच जो विधान क्रं २ आणि विधान क्रं ३ मध्ये जो दावा आहे या संदर्भात कोणी व्यक्ती विचारणा करेल की कुंडलिनी म्हणजे मुळात नेमकं काय ? ती जागी करतात म्हणजे नेमकं काय करतात ? ती जागी करण्याची रीत कोणती ? हे सिद्ध करता येऊ शकते का ? त्याचा परीणाम मोजता सिद्ध करता येतो का ? विधान क्रं २ व ३ संदर्भात --- कुठले संशोधन करुन ? त्यात नेमके कुठले प्रयोग करुन ? कुठले निष्कर्ष क्र.१,२,३ इ. त्यातुन काढलेले आहेत. त्या निष्कर्षांचा जसा वैज्ञानिक प्रयोगांच्या निर्ष्कर्षांचा जगात कोणालाही त्या रीतीने गेल्यावर पडताळा घेता येत असतो. तसा त्यातुन काढलेल्या निष्कर्षांचा पडताळा घेता येऊ शकतो का ? या सर्व प्रश्नांची ज्रर एखादा वैज्ञानिक असेल व त्याला त्याच्या एका प्रयोगा निष्कर्षांसंदर्भात असे विचारले तर तो उपस्थित प्रश्नांवर कुठलाही आक्षेप न घेता उलट चिकीत्सेचे स्वागत करुन सहजतेने उत्तर देत असतो. हे वैज्ञानिक जगात नित्य रोज सहज घडत असते. एखादा वैज्ञानिक मूळात नविन शोध लावल्यावर स्वतःहुन ते इतर वैज्ञानिकांसमोर सादर करुन त्यावरील आक्षेपांना उत्सुकतेने सामोरा जात असतो त्यात त्यांना भय लज्जा काहीही नसते कारण त्यांनी ते स्वत" सिद्ध करुन बघितलेले असते व त्यांच्यात तो आत्मविश्वास असतो त्यांच्यात खुलेपणा असतो. प्रश्न विचारणारा हा तुच्छ नसतो उलट तो एक प्रकारे वैज्ञानिक सत्य एस्टॅब्लीश होण्यास पुरक अशी मदतच करत असतो. विज्ञानात क्रीटीसीझम हा कनस्ट्र्क्टीव्ह मानला जातो. मात्र हेच सर्व एक आध्यात्मिक कसे टाळतो त्यावर काय भुमिका घेतो तर या वरील सर्व चिकीत्सेच्या अत्यंत सामान्य प्रश्नांना अध्यात्मिक उत्तर कसे असते. ते असे असते या टाइपचे ४-त्याचे डॉक्युमेंटेशन आणि कुणाही सोम्यागोम्याला ते सहज वापरायला मिळत नाहीत, या अगोदर श्री, संदीप डांगे चे कमोदीनी धाग्यावर एक विधान होते लॉजिक फक्त मेंदूत असतं, (प्रत्यक्षात ते सत्य असेलच असे नसत) त्या लॉजिकला सपोर्ट करतं मन. आणी मनाला सपोर्ट लागतो चार इतर लोकांचा. मग तो आस्तिक असो वा नास्तिक. सगळे फॅनफॉलोईंगच्या भानगडीत अहंकाराचे षड्डू ठोकित असतात. आपण त्याला आस्तिक-नास्तिक वाद म्हणतो या अनुसार तर्क अमान्य आणि वाद चिकीत्सा अहंकार आहेत. यानंतर अजुन एक स्टेप असते आम्ही काय बाबा आम्ही अशेच इ. अभिनिवेष या सर्व चिकीत्सेला सामोरे जाणे टाळण्याचे बहाणे आहेत. कारण आपले दावे त्यासमोर टीकणार नाहीत ही भीती हे खरे कारण. ही जी अध्यात्मिकांची वैज्ञानिक चिकीत्सेला सामोरे जाण्याची भीती हीच फार बोलकी आहे. अंनिस च्या प्रयोगांना सामोरं जायला त्यांच्या पारीतोषीका ला आजपर्यंत कुठलाही चमत्कारी आजपर्यंत मिळवु शकलेला नाही हे एक याचेच उदाहरण आहे. एका अक्षय कुमारच्या चित्रपटात हात बांधलेला अक्षय हा खलनायका समोर उभा असतो त्याला तो म्हणतो जे वेगळ्या संदर्भात आहे मात्र माझ्या वरील म्हणण्याचा आशय अधिक उत्तमपणे व्यक्त करते त्यात तो म्हणतो ये जो डर है ये जो डर है तुम्हारे अंदर ये अच्छा है जरुरी है. ही जी भीती आहे आध्यात्मिकांना चिकीत्सेची तीच त्यांना त्यामधील फोलपणाची टोचणी करुन देत असते. त्यांना माहीत असते की आपली सर्व विधाने दावे चिकीत्सेच्या प्रयोगांच्या उलटतपासणी च्या आघाताने कोलमडुन पडतील. आणि म्हणुन ते चिकीत्सेला सामोरे जात नाहीत त्याऐवजी प्रश्न उपस्थित करणाराच नीच अयोग्य तुच्छा इ. इ. अ‍ॅड होमेनीम. वैज्ञानिक द्रुष्टीकोणाचा एक सुपरीणाम असा की प्रत्येक बाबाला प्रवचनात ये सायन्स ने भी माना है ही पुरवणी सतत जोडावी लागते. त्यांचा श्रोताही या पुरवणी शिवाय त्यांचे म्हणणे ऐकत नाही. हा एक प्रकारचा विज्ञानाचा मोठा विजय आहे. ही भीती नकारात्मक नाही हा एक चांगला विधायक वचक विज्ञानाने अशा प्रकारच्या वल्गनांवर (ज्या कधीही सिद्ध क रता येत नाहीत ) बसवलेला आहे.
यावर कुणीतरी (बहुधा डॉक्टर खरेंनीच) अनुभव सांगितला आहे. की आयुष्यभर वैज्ञानिक विचारसरणी ठेवणारेही अंतिम समयी अनाकलनीय कारणाने देव ह्या संकल्पनेस शरण जातात
डॉ. खरेंनी अशी माणस असतात ( कमी आहे असे त्यांचे म्हणणे आहे इतकेच ) असे ही म्हटलेले आहे. त्यासाठी त्यांनी बर्ट्रांड रसेल आयुष्यभर वैज्ञानिक विचारसरणी ठेवणारा याचे उज्वल उदाहरण ही दिलेले आहे. डॉ. खरेंचा संदीपजींनी कदाचित मिस केलेला प्रतिसादातला भाग असा तुम्ही म्हणता तसे विवेकी आणि कणखर लोक मीही पहिले आहेत किंवा पाहतो परंतु असे लोक १०० पैकी फारतर १ असतात बाकी ९९ नाहीत. आपला मृत्यू समीप आला असतानाही आपला बुद्धी प्रामाण्यवाद स्पष्टपणे व्यक्त करणारा बर्ट्रांड रसेल सारखा माणूस विरळाच. त्याच्याच पुढच्या प्रतिसादात संदीपजींनी कदाचित मिस केलेला गुलाम यांचा प्रतिसाद ज्यात नास्तिक भगतसिंग चे मृत्युला धैर्याने नास्तिकता अबाधिक कायम ठेउन सामोर जाण्याचे उदाहरण व लिंक श्री गुलाम यांनी दिलेली आहे. ती लिंक अशी http://www.shahidbhagatsingh.org/index.asp?link=atheist

In reply to by मारवा

वरील विधान क्र.१ मध्ये जे मांडलेल आहे त्या संदर्भात तसेच जो विधान क्रं २ आणि विधान क्रं ३ मध्ये जो दावा आहे या संदर्भात कोणी व्यक्ती विचारणा करेल की कुंडलिनी म्हणजे मुळात नेमकं काय ? ती जागी करतात म्हणजे नेमकं काय करतात ? ती जागी करण्याची रीत कोणती ? हे सिद्ध करता येऊ शकते का ? त्याचा परीणाम मोजता सिद्ध करता येतो का? १. दहा वेगवेगळ्या वयाच्या, वंशाच्या, देशाच्या दहा लोकांना एकच लवंगी मिर्ची खायला दिली तर कोणास किती तिखट लागली याचे वैज्ञानिक पद्धतीने मोजमाप करता येते का? २. एकाच वर्गात एकच शिक्षक एकाच पद्धतीने ३० मुलांना शिकवतो, पण प्रत्येकाला परिक्षेत मार्क्स वेगवेगळे पडतात ते का? त्या मार्क्सवरून मुलांचे मूल्यमापन योग्य वैज्ञानिक पद्धतीने होते हे सिद्ध करता येते का? या प्रश्नाचे उत्तर देऊ शकलात तर काय सिद्ध करता येते व परिणाम मोजता येते ते सांगेन. विधान क्रं २ व ३ संदर्भात --- कुठले संशोधन करुन ? त्यात नेमके कुठले प्रयोग करुन ? कुठले निष्कर्ष क्र.१,२,३ इ. त्यातुन काढलेले आहेत. त्या निष्कर्षांचा जसा वैज्ञानिक प्रयोगांच्या निर्ष्कर्षांचा जगात कोणालाही त्या रीतीने गेल्यावर पडताळा घेता येत असतो. तसा त्यातुन काढलेल्या निष्कर्षांचा पडताळा घेता येऊ शकतो का ? बहुतेक पाककला-शास्त्रचा उल्लेख आपण गाळलेला दिसतोय. एका छापील पाककृतीबरहुकूम दहा लोकांनी पदार्थ तयार केला तर तो सेम टू सेम येत नाही, असे का? एकच ठिकाणी दहा चित्रकारांनी एकच वस्तूचे पेंटींग केले तर सेम टू सेम येत नाही असे का? संशोधन, प्रयोग वैगेरे मोठे शब्द वापरले की प्रतिवाद करणार्‍याला कोंडीत पकडल्याचे समाधान मिळू शकते पण त्याने सिद्ध काहीच होत नाही. मनुष्यजातीच्या प्रत्येक बाबतीत अनादिकालापासून संशोधन, प्रयोग झालेले आहेत. तुम्ही ज्या वैज्ञानिक पद्धतीचा आग्रह करत आहात ते तसेच असले पाहिजे असा आग्रह का? जगातली प्रत्येक घटना विज्ञानाच्या कसोटीत बसतेच असे काही आहे का? असो. तर तुमचा प्रश्न: कुंडलिनी जागृती वा मंत्रसाधना हे कुठल्या संशोधनाचे वा प्रयोगाचे फलित आहे? असे काही प्रयोग आहेत का ज्या योगे कुणीही ते अनुभव घेऊ शकतो? त्याचे उत्तरः योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने मार्गक्रमण केल्यास याचा अनुभव कोणासही घेता येतो. निव्वळ शाब्दिक चर्चेत हे आम्हाला सिद्ध करून दाखवा म्हटल्याने काही होत नसते. ताप आलेल्या माणसाला पॅरासिटामॉल घ्यावीच लागते. तीचे केमिकल फॉर्मुल्यांचे विस्तृत वर्णन करुन, प्रयोग परिणामांचे पेपर डॉक्टरांच्या परिषदेत सादर केले म्हणून आपोआप ताप उतरत नाही. तुम्ही पॅरासिटामॉल घ्या, ते कशी काम करते, का काम करते ह्याच्याशी पेशंटला काय कर्तव्य? डॉक्टरने एखादे औषध दिले तर ते आपण मुकाट्याने घेता की त्याच्याशी शाब्दिक वाद घालत बसता? औषध घेतल्यावरच तुम्हाला अनुभव येईल की शाब्दिक चर्चेतुन? पुढे असे आहे की हे गुरू तुमच्याकडून एक पैसाही घेत नाहीत, हे अगदी फुकट ज्ञान आहे. मग तुम्हाला नक्की आक्षेप कशावर आहे? असे असते की 'एखादा गुरू दहा लाख रुपये घेऊन कुंडलिनी जागृत करून देतो' वैगेरे तर समजले असते. ही पुर्णपणे वैयक्तिक लाभासाठीची वैयक्तिक साधना असतांना, कुणावरही कसलीही बळजबरी नसतांना इतका आकांडतांडव कशासाठी? या सर्व प्रश्नांची ज्रर एखादा वैज्ञानिक असेल व त्याला त्याच्या एका प्रयोगा निष्कर्षांसंदर्भात असे विचारले तर तो उपस्थित प्रश्नांवर कुठलाही आक्षेप न घेता उलट चिकीत्सेचे स्वागत करुन सहजतेने उत्तर देत असतो. हे वैज्ञानिक जगात नित्य रोज सहज घडत असते. एखादा वैज्ञानिक मूळात नविन शोध लावल्यावर स्वतःहुन ते इतर वैज्ञानिकांसमोर सादर करुन त्यावरील आक्षेपांना उत्सुकतेने सामोरा जात असतो त्यात त्यांना भय लज्जा काहीही नसते कारण त्यांनी ते स्वत" सिद्ध करुन बघितलेले असते व त्यांच्यात तो आत्मविश्वास असतो त्यांच्यात खुलेपणा असतो. प्रश्न विचारणारा हा तुच्छ नसतो उलट तो एक प्रकारे वैज्ञानिक सत्य एस्टॅब्लीश होण्यास पुरक अशी मदतच करत असतो. विज्ञानात क्रीटीसीझम हा कनस्ट्र्क्टीव्ह मानला जातो. माझ्या प्रतिसादाच्या संदर्भात हा उतारा कितपत योग्य आहे हे कळत नाही. एखाद्या वैज्ञानिकाने काही संशोधन केले तर ते तपासण्याचे नियमही असतात की नाही? उदा. झाडांच्या वाढीसाठी एखादे औषध कुणी शोधून काढले तर इतर वैज्ञानिक ते त्यांच्या झाडांनाच घालून बघतील, माणसांना वा गुरांना घालून बघणार नाहीत. यासंदर्भात संशोधकाने केलेल्या दाव्याचे खंडन वा समर्थन झाडांना ते औषध घालून प्रयोग करूनच बघता येईल की फक्त शाब्दिक चर्चेतून ते औषध सिद्ध होते? अध्यात्मात क्रिटीसिझम नाही असे आपणास का वाटले कुणास ठावूक. अहो, क्रिटीसिझम हा मानवी जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या प्रगतीचा आधारस्तंभ आहे. त्यास अध्यात्म कसे अपवाद असणार? तर्क अमान्य आणि वाद चिकीत्सा अहंकार आहेत. वाद चिकित्सा ह्या अहंकार केव्हा होतात? झाडांच्या वाढीसाठीचे औषध माणसांना उपयोगाचे नाही त्यामुळे ते फोल आहे असे सिद्ध करू पाहणार्‍यांबद्दल आपण काय भूमिका घ्याल? या सर्व चिकीत्सेला सामोरे जाणे टाळण्याचे बहाणे आहेत. कारण आपले दावे त्यासमोर टीकणार नाहीत ही भीती हे खरे कारण. ही जी अध्यात्मिकांची वैज्ञानिक चिकीत्सेला सामोरे जाण्याची भीती हीच फार बोलकी आहे. अंनिस च्या प्रयोगांना सामोरं जायला त्यांच्या पारीतोषीका ला आजपर्यंत कुठलाही चमत्कारी आजपर्यंत मिळवु शकलेला नाही हे एक याचेच उदाहरण आहे. एका अक्षय कुमारच्या चित्रपटात हात बांधलेला अक्षय हा खलनायका समोर उभा असतो त्याला तो म्हणतो जे वेगळ्या संदर्भात आहे मात्र माझ्या वरील म्हणण्याचा आशय अधिक उत्तमपणे व्यक्त करते त्यात तो म्हणतो ये जो डर है ये जो डर है तुम्हारे अंदर ये अच्छा है जरुरी है. वैज्ञानिक म्हणवणार्‍यांनी आध्यात्मिक साधनेच्या प्रयोगाला समोरे जाणे टाळण्याचे काय कारण असावे तुमच्या मते? फार काही बोलणार नाही. जास्त काही हुंहाछु करायची गरज नाही. फक्त दहा दिवस विपश्यना शिबीर करा. तिथले गुरुजी जसे सांगतील तसेच्या तसे फॉलो करा. कारण ती एक शास्त्रीय पद्धत आहे. ती तशीच फॉलो केली तरच तसे परिणाम येतात. दहा दिवसाचे अनुभव मग आम्हाला इथे येऊन सांगा. आहे का तयारी? आता म्हणून नका की आम्हाला लॅब टेस्ट करायच्यात म्हणून. परत ते झाडांचे औषध माणसाला वापरण्याचा अवैज्ञानिक प्रयोग करू नये. पॅरासिटामॉल घ्या, ताप उतरतो की नाही बघा. पण तुम्ही म्हणाल आम्ही तिचे घटकपदार्थ लॅबमधे चेक करून सांगतो ताप उतरतो की नाही तर कसे चालेल? बोला आहे का तयारी वैज्ञानिक चिकित्सेची? डर कोणात आहे खरोखर ते नंतर बघता येईल... ही जी भीती आहे आध्यात्मिकांना चिकीत्सेची तीच त्यांना त्यामधील फोलपणाची टोचणी करुन देत असते. त्यांना माहीत असते की आपली सर्व विधाने दावे चिकीत्सेच्या प्रयोगांच्या उलटतपासणी च्या आघाताने कोलमडुन पडतील. आणि म्हणुन ते चिकीत्सेला सामोरे जात नाहीत त्याऐवजी प्रश्न उपस्थित करणाराच नीच अयोग्य तुच्छा इ. इ. अ‍ॅड होमेनीम. वैज्ञानिक द्रुष्टीकोणाचा एक सुपरीणाम असा की प्रत्येक बाबाला प्रवचनात ये सायन्स ने भी माना है ही पुरवणी सतत जोडावी लागते. त्यांचा श्रोताही या पुरवणी शिवाय त्यांचे म्हणणे ऐकत नाही. हा एक प्रकारचा विज्ञानाचा मोठा विजय आहे. ही भीती नकारात्मक नाही हा एक चांगला विधायक वचक विज्ञानाने अशा प्रकारच्या वल्गनांवर (ज्या कधीही सिद्ध क रता येत नाहीत ) बसवलेला आहे. पैसे खाऊ भोंदुंचे प्रवचन ऐकून अध्यात्माबद्दल काहीच्याकाही मते बनवणार्‍यांना मी कधीच महत्त्व देत नाही. विज्ञानाने सिद्ध केले म्हणजे नक्की काय केले असे त्यास उलट विचारले की बोलती बंद होते. भोंदुं, बोगस, अकार्यक्षम डॉक्टरांच्या नादी लागून अनेकांनी जीव गमावला आहे. म्हणून आधुनिक वैद्यक शास्त्र खोटे ठरले का? तुमच्यावर उपचार करणारा भरमसाठ पैसे घेऊनही तुमच्या बरे होण्याची कधीच काही गॅरंटी घेत नाही तिथे असे प्रश्न, चिकित्सा का विचारल्या जात नाहीत. आणि फुकट साधनेच्या बाबतीतच का विचारले जातात? विधायक वचक का असावा? विज्ञान इतके श्रेष्ठ आहे तर सर्व जगच वैज्ञानिक पद्धतीनेच चालणारे, मानणारे असले पाहिजे की नाही? असे भोंदूबाबा प्रचलित असतात यात विज्ञानाचे अपयश नाही दिसत का? डॉ. खरेंनी अशी माणस असतात ( कमी आहे असे त्यांचे म्हणणे आहे इतकेच ) असे ही म्हटलेले आहे. त्यासाठी त्यांनी बर्ट्रांड रसेल आयुष्यभर वैज्ञानिक विचारसरणी ठेवणारा याचे उज्वल उदाहरण ही दिलेले आहे. डॉ. खरेंचा संदीपजींनी कदाचित मिस केलेला प्रतिसादातला भाग असा तुम्ही म्हणता तसे विवेकी आणि कणखर लोक मीही पहिले आहेत किंवा पाहतो परंतु असे लोक १०० पैकी फारतर १ असतात बाकी ९९ नाहीत. आपला मृत्यू समीप आला असतानाही आपला बुद्धी प्रामाण्यवाद स्पष्टपणे व्यक्त करणारा बर्ट्रांड रसेल सारखा माणूस विरळाच. त्याच्याच पुढच्या प्रतिसादात संदीपजींनी कदाचित मिस केलेला गुलाम यांचा प्रतिसाद ज्यात नास्तिक भगतसिंग चे मृत्युला धैर्याने नास्तिकता अबाधिक कायम ठेउन सामोर जाण्याचे उदाहरण व लिंक श्री गुलाम यांनी दिलेली आहे. अपवादाने नियम सिद्ध करण्याचा बालिश प्रयत्न यापेक्षा ह्यास अजून काय म्हणावे? जगात सर्व प्रकारचे लोक असतात. अंतराळ वैज्ञानिक असलेले इस्रोचे लोक जगातली सर्वात स्वस्त अंतराळ मोहिम बनवतात पण बालाजीचा आशिर्वाद त्या मोहिमेसाठी घ्यायला जातात. असे अनाकलनीय घडामोडी घडतच असतात. त्याचा हवाला देऊन सगळे सायंटीस्ट देवभोळेच असतात बघा असा मूर्ख दावा मी तरी करणार नाही. तुम्ही का केला हे तुमचे तुम्हाला माहित. बर्ट्रांड रसेलचं उदाहरण देऊन नेमकं काय सिद्ध करत आहात हे मला कळले नाही. तुम्हीही तुमच्या मान्यतेला एखादा प्रसिद्ध व्यक्ति फॉलो करतो असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहात. तर्काला लोकमान्यता लाभल्याशिवाय आपणास त्यामधे आत्मविश्वास येत नाही हेच मी कमोदिनी च्या धाग्यावर सांगितले ते आपण सिद्ध केले याबद्दल धन्यवाद! देवाला शरण जाणे हे एखादा करत नाही त्याने नक्की काय सिद्ध होते? मीही देव मानत नाही, की कुठल्याही अज्ञात शक्तीत विश्वास ठेवत नाही. माझे जीवन कुणा दुसर्‍याच्या इच्छेनुसार चालले हे मला मान्यच नाही. जन्मापासून ते आतापर्यंतही अगणित संकटांतून जात असता मी कधी देवा माझ्यासोबतच असे का केले असे कधीच बोललो नाही. जीवनात येणार्‍या सर्व चांगल्या वाईट गोष्टींना साक्षीभावाने बघतो. दु:खाची मजा घेतो, सुखाचीही मजा घेतो. माझे जीवन निसर्गचक्राचा एक भाग आहे इतके मला कळले आहे. अध्यात्म यापेक्षा वेगळे काही नसते. असे जगल्याने खरे अध्यात्मिक मृत्यूला कधी घाबरत नाहीत. अध्यात्माचा विरोध करून पोकळ विज्ञानवादीही मृत्यूला घाबरत नसतील अशी अपेक्षा आहे. भोंदु अध्यात्मिक स्वतःही टरकतात, इतरांनाही भीती दाखवून स्वतःचा गल्ला भरतात. अशांपासून वैज्ञानिक असो वा श्रद्धावंत, सर्वांनीच दूर राहणेच श्रेष्ठ.

आठवडा होत आला, अजून २००ही नाहीत म्हणजे मंत्रांमध्ये फार काही सामर्थ्य नसावे, नाही का?

In reply to by घाटावरचे भट

एक्च धुणे किती वेळा धुणार आणि घाटही तोच आहे फक्त दरवर्षी काही धोबी बदलतात इतकेच !!!! धोबीघाट टाळणारा पण (टाळकुट्या नसलेला) नाखुस चिंधी

पुर्णपणे सहमत। मंत्रात कोणतीही शक्ति नाही खरी शक्ति मनात असते। मनात दृढ़ संकल्प असला तर चमत्कार घडतो। मंत्र वगैरे वातावरण तयार करुन भोळ्या लोकांना भिती दाखवुन लुबाडणे हाच काहि लोकांचा धंदा होता।

२०० झाले रे! जेपीला बोलावा!

यनावाला, मारवा व इतर, माझ्या प्रतिसादावर तुमच्या उत्तराची वाट बघत आहे...

In reply to by संदीप डांगे

बघितलाच नाही काळजीपुर्वक वाचला त्यानंतरच तुम्हाला वरील प्रतिसाद दिला. तुमचा साधकांशी अंतरंग संवाद झाल्यावर निवांत बोलु या. बाकी माझ्याशी तुम्ही अजुन चर्चेला सुरुवात केलेली नाही.

In reply to by मारवा

काळजीपूर्वक वाचूनही, तुमच्या बहुधा लक्षात आले नसेल पण तो प्रतिसाद तुमच्याच प्रतिसादावर उपप्रतिसाद आहे. तुमच्याच विधानांवर प्रतिवाद केला आहे. आणि तुम्ही म्हणताय माझ्याशी अजून चर्चेला सुरुवात केलेली नाही? असं कसं? तुमचा साधकांशी अंतरंग संवाद झाल्यावर निवांत बोलु या. ह्याचा काय अर्थ?

In reply to by संदीप डांगे

जाऊ देत हो संदीप भाऊ, मीच बरोबर, मीच शहाणा असल्या माणसाशी वाद करुन काय होणार आहे? जिथे मुद्द्याचा विषय येईल तिथं कलटी मारायची आणि मग दुसरीकडं जाऊन काहितरी फालतू उकरुन काढायचं असल्या माणसांशी काय वाद घालायचा? काहीच मिळणार नाही उत्तर.

In reply to by मांत्रिक

ह्यॅ, आपण वाद घालतच नाही बॉ. पण मीच शहाणा आहे असे म्हणणाराने आपले शहाणपण वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करावे... बास.

मूर्त आणि अमूर्त याची सरमिसळ होते आहे. मंत्रपठणाने निर्माण होणाऱ्या अमूर्त शक्तींनी एखाद्या मूर्त गोष्टीवर परिणाम व्हावा हि अपेक्षा करणे पण प्रस्थापित विज्ञानाच्या विरुद्ध आहे. जर का फक्त आपल्याला दिसतं किंवा स्पर्श करता येतं तेच सत्य तर मानसिक शक्ती हि पण अस्तित्वात नसावी का? मंत्र उच्चारांनी तुमची मानसिक शक्ती वाढते असं मानतात आणि बऱ्याच लोकांना त्याचे अनुभव पण आहेत. पण जर का यालाच प्रतिवाद असेल तर मानसिक शक्ती नावाचा प्रकार तरी अस्तित्वात आहे का? आपल्याला मन असते हे विज्ञानाने सिद्ध झाले आहे का? जर नसेल तर मग आपल्याला मन आहे हे कोणी कसे म्हणू शकते? इथे बरेच उच्चशिक्षित डॉक्टर आहेत, पूर्ण शरीरात मन कुठे असतं हे कोणी दाखवू शकेल का? हीच गोष्ट भावना आणि विचारांना पण लागू होते. या ब्रम्हांडात आपल्याला माहीत नाहीत अश्या गोष्टींची संख्या माहीत असलेल्या गोष्टींच्या संख्येपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. त्यातही सर्वांनाच सगळं सारख्या प्रमाणात माहीत असतं किंवा कळतं असं नाही. प्रत्येकाची आकलनशक्ती वेगळी, अनुभव वेगळा आणि प्रचीती वेगळी. शिक्षणाने आणि उच्चशिक्षणाने ज्ञान वाढते, बघण्याचा नवीन दृष्टीकोन मिळतो पण म्हणून तुमच्या पेक्षा वेगळे विचार असणाऱ्यांना मूर्ख का ठरवता? भोंदुगिरी आणि खरोखरच्या अंधश्रद्धेला विरोध आहेच. पण म्हणून आत्ताच्या विज्ञानाच्या पुस्तकात आपल्याचपैकी कोणीतरी लिहून ठेवलेलं १००% सत्य का मानता? या पुढेही असे शोध लागतील ज्यामुळे प्रस्थापित मान्यतांना धक्का बसू शकतो… याची पण उदाहरणे आहेत. प्रत्येकाने आपले विचार खुले ठेवावेत आणि जो पर्यंत समाजाला आणि वैयक्तिक त्रास होत नाही तोपर्यंत सर्वांच्या श्रद्धा, विश्वास या गोष्टी स्वीकाराव्यात. अवांतर: बरेच लोक्स telekinesis वर पण विश्वास ठेवतात… http://www.wikihow.com/Develop-Telekinesis

In reply to by ट्रेड मार्क

अहो कुणाला सांगताय? स्वमतांध दांभिकांनी स्वतःचे डोळे झाकून घेतलेत. त्यांना फार तर लाल रंग देऊ शकतो आपण. बस्स! यापेक्षा जास्त प्रतिसाद त्यांना द्यावेत हे त्यांना झेपणारच नाही. कारण त्यातून आपलाच नेट पॅक खर्च होतोय!!!

Our ancient texts should not be disregarded, Isro chief Kiran Kumar says http://timesofindia.indiatimes.com/home/science/Our-ancient-texts-shoul… "The Vedic and ancient Greek writings constitute the core of ancient wisdom ... the Upanishads, the Bhagavad Gita, the Brahman Sutra, the Srimad Bhagavatam and the Mahabharata constitute the primary source of ancient wisdom," Kumar said. ओ चना जोर गरम वाला - जरा आधी या इस्त्रो चीफ चे प्रबोधन करा बघू . मग इकडे या ..

इथे फारच गहन - गंभीर चर्चा सुरु आहे . इथे प्रतिक्रिया देण्याएवढी माझी बौद्धिक योग्यता आहे कि नाही माहीत नाही तरीही धीर करून ही पोस्ट वाचून मनात आलेले विचार जमतील तसे मांडते - या पोस्टचे लेखक शुद्ध विज्ञानवादी आणि कट्टर नास्तिक आहेत हे तर साफ दिसून येत आहे . त्यांचा देव-दैव-नियती यांवर मुळीच विश्वास नसून आपल्या कर्तृत्वावर प्रगाढ विश्वास आहे , संविधानात ज्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पुरस्कार केला आहे तो त्यांना शिरसावंद्य आहे . पण आपल्या विज्ञानवादी दृष्टीकोनाच्या अभिमानात पुढील गोष्ट लेखकाच्या निरीक्षणातून निसटली असावी असं मला वाटतं , ती मी त्यांच्या निर्देशास आणू इच्छिते - ( देवाच्या अस्तित्वाविषयीच्या खरेखोटेपणाचा मुद्दा थोडावेळ जरा बाजूला ठेवा ) देव / मानवाव्यतिरिक्त श्रेष्ठ अशा एखाद्या दैवी शक्तीचं अस्तित्व मानणं ही मानवाची आदिम गरज आहे . ज्यावेळी पाऊस - वादळ - वणवा - वीजा अशा नैसर्गिक घटना आदिमानवाला अपरिचित होत्या , शिकार करा किंवा शिकार व्हा अशा जंगलच्या कायद्यात उद्याचा दिवस पाहायला आपण असू कि नसू याची खात्री नव्हती , काही ओबडधोबड शस्त्रं आणि मनगटातलं बळ याशिवाय कोणतही संरक्षण उपलब्ध नव्हतं त्या काळात माणसाने निसर्गातल्या विविध गोष्टींची ( वृक्ष , ठराविक प्राणी , पर्वत , समुद्र ) दैवत मानून अर्चना करायला सुरुवात केली . काही दगडा-धोंड्यांमध्ये देव कल्पून त्यांच्यावर आपल्या संरक्षणाची जबाबदारी सोपवून मानव निर्धास्त झाला … याचा अर्थ बेफिकीर झाला नाही …. हिंस्त्र पशूची शिकार करताना आपला दगडातला देव रक्षण करेल म्हणून त्याच्या हालचाली निष्काळजी - हलगर्जी झाल्या नाहीत तर आपल्या देवाचा आशीर्वाद पाठीमागे आहे तेव्हा ही शिकार यशस्वी होणारच असा आत्मविश्वास त्याच्यात येऊ लागला . एखाद्वर्षी पाऊस पडला नाही / वणवा लागला / अन्य नैसर्गिक आपत्ती आल्या तर देव आहे , तो आज ना उद्या सगळं नीट करेल या विश्वासाने माणसाला परिस्थिती सुधारत चिकाटीने जगत राहण्याचं बळ दिलं . कालौघात दगड - धोंड्यांना मनुष्याकृती आकार दिले गेले , मनुष्याच्या वस्त्र - अलंकारांमध्ये त्यांचं चित्रण / वर्णन केलं जाऊ लागलं , दैवतांना मानवी भावना जडवल्या गेल्या , पूजेने - यज्ञयागांनी त्यांना प्रसन्न केलं जाऊ लागलं , नवसांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला . तुम्हाला असं वाटतं का की एका ठाम श्रद्धेने हे सगळं करणाऱ्या एकाही मनुष्याला त्याचं वांछित फळ ( मग ते काहीही असो संपत्ती - समृद्धी - एखाद्या अडचणीतून मुक्ती ) मिळालं नसेल ? तसं असतं तर ही विविध दैवतांच्या अर्चनेची रूढी इतकी हजारो वर्षं चालत असती का ? माणसाच्या मनाची शक्ती अपार आहे . आला मंतर कोला मंतर छू या मंत्राने लहान मुलाचा बाऊ काही काळासाठी का होईना पण पळून जातो , उत्कृष्ट संमोहनतज्ञाने भयंकर वेदना होत असलेल्या रुग्णाला संमोहित करून तुम्हाला आता मुळीच वेदना होणार नाहीत अशी सूचना दिली तर त्याच्या वेदना कमी होतात , सतत स्वयंसूचना दिल्याने शरीराअंतर्गत आजार बरे होण्यास मनाच्या शक्तीची खूप मदत होते . या प्रचंड मानसिक शक्तीचा बाह्य परीस्थितीवर काहीच परिणाम होणार नाही असं कसं शक्य आहे ? सध्या जगभर गाजत असलेल्या द सिक्रेट या पुस्तकमालिकेत हाच विचार अतिविस्ताराने मांडला आहे . जर तुम्ही एखादी गोष्ट मनापासून मागीतलीत / एखादी गोष्ट घडावी अशी मनापासून तीव्र इच्छा व्यक्त केलीत आणि ती गोष्ट प्राप्त होणारच असा दृढ विश्वास ठेवलात तर ती गोष्ट तुम्हाला प्राप्त होतेच ! जगातल्या करोडो लोकांना याचा अनुभव आलेला आहे . हेच टेक्निक प्राचीन काळापासून लोक देव या शक्तीला केंद्रस्थानी मानून वापरत आहेत . सदैव एक रक्षणकर्ता पाठीशी असण्याची आदिमानवाची गरज या विज्ञानयुगातल्या मानवालाही आहे , ती संपलेली नाही . विज्ञानाने मनुष्यजीवन कितीतरीपटीने सुलभ , सुखकर , आरामदायी केले आहे यात वादच नाही पण तरीही मानवाने देवाची , अध्यात्माची साथ पूर्णपणे सोडलेली नाही यातून विज्ञानाची अपूर्णता दिसून येते . अडाणी लोकच नाही तरी विज्ञानाने निर्माण केलेल्या सर्व सुखसोयी ज्यांच्या पायाशी लोळण घेत आहेत असे श्रीमंत सुशिक्षित लोकही परमेश्वराच्या पायाशी नतमस्तक आहेत . आयुष्यात एखादं संकट आलं तर सामान्य माणसाला आईन्स्टाईन किंवा एडिसनचा एखादा जटील ग्रंथ किंवा आपल्या संविधानाची कॉपी वाचून धीर येत नाही तर एखादा धर्मग्रंथ , ( तुम्ही ज्या मंत्रांची खिल्ली उडवली आहे त्या मंत्रांसारखाच ) एखादा मंत्र किंवा साधा श्रीराम श्रीराम नावाचा जप त्याला दिलासा देतो , त्याचा डळमळीत झालेला विश्वास बळकट करतो आणि मग देव किंवा त्याची मानसिक शक्ती परस्पर ते संकट दूर करतात किंवा त्याच्यापुढे त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सुलभ होतो … हे तुम्हाला समजेल अशाच पद्धतीने घडेल असं नाही , त्या व्यक्तीला एखादी दुसरी व्यक्ती मदत करू शकते , तिच्यासमोरची परिस्थिती बदलू शकते किंवा त्या व्यक्तीलाच त्या संकटावर मात करण्याचा मार्ग सुचू शकतो . देवाच्या अस्तित्वाच्या खरेखोटेपणा बद्दल एका महान " वैज्ञानिकाचं " मत हे आहे - https://myscientificways.wordpress.com/tag/a-p-j-abdul-kalam/

अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली (१३ वे शतक) तेव्हा चांगदेवांसारखे अनेक सिद्धयोगी दूर नव्हते. त्यातील कोणी ॐ-ऊर्जातज्ज्ञ रामदेवरायाच्या सहाय्याला का गेला नाही? देवगिरीचे दौलताबद का होऊं दिले?.
फितूरी पुढे मंत्राचे काय चालणार.

जबरदस्त लिहिलंय