बरोबर एक वर्षापूर्वी बारावीनंतर मेडिकलसाठी प्रवेशासंबंधी मी एक मदतधागा काढला होता . त्यातील चर्चा झालेल्या मुद्द्यांचा आणि इतर परिचितांच्या सल्ल्याचा विचार करून आमच्या पाल्याने बारावीनंतर मेडिकल (MBBS) ला जाणे नक्की केले आहे. मेडिकलला जाण्याबाबत सर्व नकारात्मक मुद्दे लक्षात घेऊनही ''रुग्णसेवेची आवड- आणि भारतातच राहायचे आहे '' या मुद्द्यावर निर्णय झाला आहे. तयारी सुरु आहे . इतर परिचित डॉक्टर्स आणि काही मिपाकरांनी छान माहिती आणि सल्ला दिला. त्यासाठी त्यांचे आभार.
तर मेडिकल प्रवेश परीक्षांची तयारी करताना वर्षभरात मिळालेली खालील माहिती संकलित करून सर्वांच्या सोयीसाठी इथे एकत्र देत आहे. अर्थात ही माहिती सध्या लागू असली तरी दरवर्षी त्यात बदल होत असतात त्यामुळे एक दोन वर्ष आधी म्हणजे मेडिकलेच्छूक पाल्य दहावीत असताना ताजी माहिती मिळवावी आणि स्वतःला अपडेटवत रहावे . पाल्याने आपला कल लवकर/ वेळ हातात असताना जाहीर केल्यास निश्चितच फायद्याचं ठरतं.
काही महत्वाच्या संस्थांचे प्रातिनिधिक दुवे (सरकारी आणि खासगी ) इथे चिकटवले आहेत .
http://www.mciindia.org/
https://www.mgims.ac.in/
http://afmc.nic.in/
http://www.aiims.edu/en.html
http://www.kleuniversity.edu.in/
http://jipmer.edu.in/
शिवाय इतरही दुवे थोडे शोधले की सापडतील.
देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांची यादी आणि प्रवेशक्षमता:
बारावीच्या परीक्षेत पन्नास टक्क्याहून अधिक गुण आणि संबंधित प्रवेश परीक्षेचे गुण अशा निकषावर देशात बहुतेक कॉलेजात MBBS ला प्रवेश मिळतात.
संपूर्ण महाराष्ट्राचं एकच आरोग्य विज्ञान विद्यापीठ असल्याने मिळेल तिथे प्राधान्याने सरकारी कॉलेजात कुठेही प्रवेश घेतला तरी चालेल. अर्थात उत्तम गुण असतील तर प्रमुख शहरातली सरकारी महाविद्यालये मिळतील. प्रमुख शहरातली अशासाठी , की नुसते MBBS करायचे दिवस पूर्वीच मागे पडलेत आणि दुसऱ्या वर्षीपासूनच उरलेली तीनचार वर्षे पदव्युत्तर मेडिकल प्रवेश परीक्षेचे क्लासेस लावले जातात. ही सोय दूरच्या सरकारी कॉलेज असलेल्या गावात मिळणार नाही, किंवा तसा पदव्युत्तर प्रवेशेछुक क्राउड जास्त नसल्याने स्पर्धेचे वातावरण मिळणार नाही. पदव्युत्तर साठी एका कॉलेजात एका स्पेशलायझेशनला साधारण दोनतीनच जागा आहेत - एक राखीव एक सर्वसाधारण. राखीव मध्ये रोटेशनने एकेका जातीला चारेक वर्षांनी संधी मिळणार ! म्हणजे हे तर अन्यायाचंच रोटेशन म्हणायचं !
इतर काही निरीक्षणे आणि माहिती अशी:
१. सरकारी नाही मिळालं तर पुढचा पर्याय खासगी मेडिकल कॉलेजचा! यातली काही आरोग्य विज्ञान विद्यापीठात सामील नाहीत आणि आपले अभ्यासक्रम चालवतात. त्यांचा सगळा जोर व्यवस्थापनाच्या जागांमधून पैसे काढण्यावर असतो. तरीही त्यांना ८५% जागा गुणवत्तेनुसार + नेहमीच्या आरक्षणानुसार भराव्या लागतात. त्यामुळे त्यांनी प्रवेश क्षमताच वाढवून गुणवत्ता पात्तळ करून ठेवली आहे. तिथे जावंच लागलं तर त्यापैकी कुठल्या कॉलेजचे रुग्णालय चांगले चालते याची चौकशी/ खात्री करावी. कुणी फार न शिकवता अभ्यास स्वतः करायची तयारी ठेवावी. जरासे बरे कॉलेज महाग असणार हे ओघानेच आले. सध्या तिथे चार ते आठ लाख दरवर्षी खर्च येतो असे समजले.
सरकारी न मिळाल्यास आणि खासगीही जमत नसेल तर काय? मग शेवटी अभिमत विद्यापीठ. महाराष्ट्रात तरी एकही चांगले नाही. सगळी गोलमाल आहेत. पण १९८३ च्या शिक्षणप्रसार लाटेअगोदर इतर राज्यांत स्थापन झालेली काही कॉलेजेस पन्नास वर्षांपूर्वीही होती त्यात जायला हरकत नाही. त्यांचा उद्देश निव्वळ कमावणे हा वाटला नाही.
२. मेडिकलला अतिशय तीव्र स्पर्धा असल्याने सर्व इच्छुक सर्व परीक्षा देतात. सगळ्यांनाच अनिश्चितता वाटते- त्यामुळे अतिहुशार आणि अतिसामान्य अन मधले प्रचंड बहुसंख्य सर्वच परीक्षांना गर्दी करतात. सव्वासात लाखातून एक्कावन्न हजार मुलांना कुठेतरी प्रवेश मिळतो. सरकारी कॉलेजात केवळ अडीच टक्के परीक्षार्थी मंडळी जातात! सरकारी सोडून इतर ठिकाणी परीक्षार्थी पन्नास हजार ते एक लाख इतके कमी होतात. स्पर्धा काहीशी सुसह्य होते. फी दहापट वाढते. म्हणूनच आपल्याला मिळण्याची सर्वाधिक शक्यता आणि सोयीस्कर अशी कॉलेजे निवडावीत.
३. मी शोधताना सुमारे तीस प्रकारच्या प्रवेश परीक्षा देशात उपलब्ध आहेत असे दिसले. कदाचित अजून काही राहून गेल्या असतील. सारख्याच तारखा आल्याने काही परीक्षा देता येत नाहीत. आम्ही आठच निवडल्या आहेत.
४. अखिल भारतीय पातळीवरच्या (AIPMT) प्रवेश परीक्षेतल्या गुणांवर देशभरातल्या कॉलेजात १५% जागा असतात हा एक चुकीचा समज आहे. म्हणजे गेल्या वर्षी माझा तरी होता . केवळ सहासातच राज्ये ही परीक्षा मानतात. उदा. कर्नाटकात तर ही मानतच नाहीत, वर शालेय जीवनात सात वर्षे तरी कर्नाटकात शिकलेले पाहिजे वगैरे अटी आहेत!
या परीक्षेचा एकच फायदा म्हणजे पुण्यातल्या AFMC च्या प्रवेशासाठी ही परीक्षा ग्राह्य धरतात.
५. अनेक परीक्षा महाराष्ट्रात फक्त मुंबईत देता येतात. त्यांची केंद्रे पश्चिम उपनगरांत दूरवर असतात. ती पनवेल-नवी मुंबईत असती तर अवघ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा दुवा मिळाला असता. पण विचार कोण करेल? झक मारत आदल्या दिवशी मुंबईत हॉटेल घेऊन रहा अन द्या परीक्षा ! उदा. अशाच गांधीवादी विचारांचे म्हणवणाऱ्या सरकारी संस्थेचा फॉर्म रु . ५००० ला अन परीक्षा मुंबईत - पार्ल्याला - सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशी आहे . हे झाले एक उदाहरण - बाकी सगळ्यांची काहीतरी गम्मत जम्मत आहेच. या आठ ते दहा परीक्षा देताना साधारण एक लाखाच्या आसपास खर्च होतो.
६. या तीस पैकी कुठल्या परीक्षा द्यायच्या? एखादी परीक्षा निवडताना :
- अकरावी + बारावी दोन्ही आधारित आहे का? की फक्त बारावी?
- चुकलेल्या उत्तराला उणे गुण देतात का?
- किती अन कोणती कॉलेजेस या परीक्षेतल्या गुणांवर प्रवेश देतात?
- किती जागा आहेत ? सध्या लागू असलेले आरक्षण वगळून आपल्यासाठी किती रहातात याचा विचार जरूर करावा.
उदा: पोंडीचेरी किंवा पंजाबमध्ये एखाद्या कॉलेजात जर साताठ जागा आपल्यासाठी उरत असल्या तर सोलापूर किंवा जालन्यातून कांदिवलीला परीक्षेला जाउन फक्त मनस्ताप होईल. त्यापेक्षा ''जरा'' चांगला अभ्यास करून महाराष्ट्रातच एखाद्या बऱ्या खासगी कॉलेजला प्रवेश मिळेल. अर्थात ज्याचे त्याचे विचार वेगळे. आपण नेमके कुठे आहोत हे चाणाक्ष पाल्य ओळखून असतात! तीसमधून आठदहा सी ई टी द्याव्या लागतात पण त्या निवडताना दमछाक होते!
७. पैसे भरलेत म्हणून क्लासला शेवटपर्यंत जाऊ नये - जाण्याचा खराच उपयोग होतो का? हे पाहावे. सगळ्यांना सारखाच वेळ मिळतो आहे- तो कोण कसा वापरतो याचा कस लागतो. हे इतरत्रही लागू होते, पण इथे विशेष करून जाणवतं. एक सरधोपट नियम म्हणून: ''रोज साडेचारशे बहुपर्यायी उत्तरांचे प्रश्न ( MCQ ) सप्टेंबर पासून नियमितपणे सोडवावेत'' असं यशस्वी लोकांकडून सांगितलं जातं.
८. हुकुमी यशाचा काहीही फॉर्म्युला नाही ! त्यामुळे अगदी नाहीच जमलं तर असावी म्हणून JEE देऊन ठेवली आहे. तिथे एक गुण असेल तरीही अभियांत्रिकी कुठं नाही गेलं ! तिथे राज्यात दरसाल साठ हजार जागा मोकळ्याच पडतात ! काय शिक्षणव्यवस्था आहे! वा!
९. इतर दुर्लक्षित देश किंवा रशियाला जाण्याची ज्यांची तयारी आहे त्यांनी या ठिकाणी अधिक माहिती घ्यावी. आपल्यापेक्षा दहाबारा लाख कमीच लागतात ! अर्थात कांही तोटा असल्यास माहीत नाही , जाणारे सर्व लोक तिथल्या कोर्सेस बद्दल चांगलेच बोलतात. गेली साताठ वर्षे , वर्षाला किमान शंभर मराठी मुलेमुली तिकडे जात आहेत असे एका वैद्यकीय प्राध्यापकाने सांगितले. त्यांचा मुलगाही त्यांनी तिकडे पाठवला आहे. हा पर्याय चौकशी शिवाय मुळीच निवडू नये! तिथून डॉक्टर झाल्यावर कुठे काम करता येईल - कुठे नाही हे स्पष्ट समजून घ्यावे. भारत सरकारची मान्यता नसल्याने कुठल्या परीक्षा द्याव्या लागतील? की शिक्षणानंतर परदेशात कामही करता येते? पदव्युत्तर साठी कुठे पात्र ठरतो? त्यासाठी काय खर्च येतो? वगैरे विचारून घ्यावे. फसवले जाण्याची शक्यता असू शकते.
१०. परदेशातील मंडळीना तिथले नागरिकत्व नसल्याने भारतात वैद्यकीय प्रवेश पाहिजे असल्यास व्यवस्थापन कोट्यातून तो मिळतो. पण बारावीला पी सी बी शिवाय इंग्रजी विषय असावाच लागतो. अन्यथा भारतात कुठेही प्रवेश मिळत नाही. तिकडे शिकताना शास्त्र शाखेत राहून इंग्रजी विषय घेता येत नाही त्यामुळे इथे परत येउन निव्वळ इंग्रजीसाठी पुन्हा बारावी करावी लागते! मग तुम्ही इंग्लंडमध्ये बारावी झालात तरीही यातून सूट नाही!
(याच नियमामुळे मी गेल्या वर्षी योग्य वेळीच भारतात परतलो होतो.)
आत्ता किंवा आधी- या प्रक्रियेतून गेलेल्यांनी माहितीत शक्यतो भर घालावी.
पुन्हा धन्यवाद!
(वि. सू. : मेडिकलचा प्रवेश हा विषय त्या कुटुंबांपुरता संवेदनशील होतो. त्यामुळे ही माहिती,आणि हे विचार धागाकर्त्याचे वैयक्तिक असून प्रत्यक्ष निर्णय घेताना स्वतः चौकशी आणि पूर्ण विचार करून आपल्या जबाबदारीवर घ्यावा !)
वाचने
9276
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
छे!
पहिला लेख वाचल्याचे आठवत नाही.
इमर्जन्सीपायी प्रतिसाद अपूर्ण आहे. कृपया बूच मारू नये. मिपाने स्वयंसंपादन दिले आहे असे ऐकतो. परत आलो की प्रतिसाद पूर्ण करीन... पुढे चालू: .. तर, या वरच्या क्वोटवरून असे दिसते, की तुम्ही तुमच्या स्वतःच्या करियरमधे मोठा बदल केवळ मुलाच्या अॅडमिशनसाठी घडवलेला आहे. हे केल्यानंतर, मी वर लिहिलेल्या दुसर्या शक्यतेचा तुम्ही अवलंब करणार आहात काय? शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतून मिळणार्या ज्ञानाच्या दर्जाबाबतही आजकाल प्रश्नचिह्न लागते आहे. अनेक नवी मेडिकल कॉलेजेस, रुग्णालयांच्या व प्राध्यापकसंख्येच्या आभावी मुलांना फारसे शिक्षण देऊ शकत नाहीत. तरीही, बहुसंख्य (बहुतेक सगळ्याच) खासगी वैद्यकीय महाविद्यालये व डीम्ड युनिवर्सिटीज पेक्षा चांगली आहेत. मुख्य सीईटी सोबतच काशीबाई नवले सारख्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळतो, जिथली वार्षिक फी साडेसहा लाख रुपये फक्त आहे. (माझ्या शेवटल्या माहिती नुसार) अगदीच सरकारी नाही मिळाली, तर असोसिएट सीईटी मधून त्यातल्या त्यात चांगली रेप्युटेशन असलेल्या खासगी कॉलेजात मेरिटसीटवर अॅडमिशन घ्यावी. प्रवराची डीम्ड युनिवर्सिटी झाली की नाही अजून ते ठाउक नाही, पण ते एक बरे कॉलेज आहे. तेव्हा, चॉइसेस देताना, सर्वप्रथम मुंबई महापालिकेची कॉलेजेस, त्यानंतर मुंबईतील सरकारी म्हणजेच जेजे, नंतर पुण्याचे बीजे, मग इतर महाराष्ट्र सरकारी. मग मुंबैपुण्यातली खासगी मेरिट सीट्स, नंतर इतर असो.सीईटी मेरीट सीट्स. इतपत चॉइस ठेवा. यात रिझर्वेशने, मुलगी, रेस्ट ऑफ महाराष्ट्र वगैरे भानगडी असतात. पण त्या असोत. इतक्या कालेजांत अॅडमिशन मिळत नसेल अन डाक्टरच व्हायचे असेल, तर मग खोकी हवीत. अन हे खोके प्रकर्ण काय मी रेकमेंड करणार नाही ब्वा.. तसेच, माझ्या मुला/मुलीला ऑल इंडियात मेरिटवर जेमतेम लटकलोय म्हणून बिहारमधेही शिकायला पाठवणार नाही. याचाच अर्थ, मॅक्झिमम महाराष्ट्र सीईटी, असोसिएट सिईटी, व एआयपीएमटी इतक्याच परिक्षा पुरेत. (या अशाच यंदा/या क्षणी असतील याची मायबाप सरकारच्या कृपेने काहीच ग्यारंटी नाही) मेडिकल काउन्सिलच्या साईटवर या प्रकारच्या लोकांना भारतात प्रॅक्टीस करण्यासाठी किती व काय कष्ट करावे लागतात त्याची माहिती आहे. सध्या लिंकदानास वेळ नाही. पण हा प्रकार मी रेकमेंड करत नाही. तात्पर्यः लेख वाचून इतरही मेडिकलेच्छुक लोकांना मदत व्हावी म्हणुनचा लेख आहे असे वाटले, त्यातल्यात्यात लेखकुंना उद्देशून लिहिले आहे. इतरांनी आपल्या मुलास डॉक्टर का करायचे याचा नीट विचार करावा इतके सुचवून सध्यापुरता थांबतो. ता.क. मेडिकल सीईटी मधूनच आयुर्वेदिक, होम्योपथिक, सिद्ध, युनानी इ. प्लस डेंटिस्ट्री, फिजिओथेरपी, स्पीच्/ऑडिओ थेरपी, नर्सिंग इ. उपशाखांनाही प्रवेश मिळतो ना? डॉक्टरच्च्च्च बनवीन म्हणून हट्ट करू नका. डेंटल फिजिओ स्पीच्/ऑडिओथेरपी, सायकॉलॉजी या उत्कृष्ट ब्रांचेस आहेत. मधल्या 'आल्टरनेटिव्ह मेडिसिन' ब्रांचेस कृपया फाट्यावर मारा ही विनंती. कुणी हौशीखातर फाटा घेतलाच, तर ४-५ वर्षांनी आपले व आपल्या पाल्यांचे अनुभव इथे इमानदारीत लिहा, ही नम्र विनंती.नवीन महिती दिल्या बद्धल धन्यवाद
In reply to पहिला लेख वाचल्याचे आठवत नाही. by आनंदी गोपाळ
प्रदीर्घ आणि माहितीपूर्ण
In reply to पहिला लेख वाचल्याचे आठवत नाही. by आनंदी गोपाळ
डाॅ.साहेबांना+१००००!
सीईटीची तयारी.
खूप महत्वाचे मार्गदर्शन
In reply to सीईटीची तयारी. by आनंदी गोपाळ
+१
In reply to खूप महत्वाचे मार्गदर्शन by श्रीरंग_जोशी
+१११
In reply to +१ by रुस्तम
यावर्षी काय होणार?