Skip to main content

हायवे - दोषपूर्ण पण तरीही वेगळा

लेखक चलत मुसाफिर यांनी सोमवार, 24/02/2014 या दिवशी प्रकाशित केले.
Highway व्यावसायिक हिंदी चित्रपट म्हटल्यावर साधारणपणे जे चित्र डोळ्यापुढे येते, त्याहून बराच वेगळा असा 'हायवे' एक स्मरणीय अनुभव देऊन जातो. ज्यांनी तो पाहिला आहे, त्यांना कथा माहिती असेल. ज्यांनी पाहिलेला नाही, त्यांचा रसभंग होईल. त्यामुळे कथा सविस्तर न सांगता, चित्रपट पाहून जे वाटले त्याबद्दल थोडक्यात बोलतो. १. सर्वप्रथम अभिनय. रणदीप हूडा आणि आलिया भट्ट या दोघांचा अभिनय अतिशय भावणारा. काही ठिकाणी आलिया थोडी अननुभवी जरूर वाटते. अनेक वेळा चित्रपटातील रस कमी झालेला असतानाही केवळ हे दोघे पडद्यावर आहेत म्हणून मी पुढे पाहत राहू शकलो. या दोघाच्या मूळ व्यक्तिरेखाही अत्यंत विचारपूर्वक आणि तपशीलवार लिहिल्या आहेत. २. अप्रतिम छायाचित्रण. भारतातील अनेक अप्रसिद्ध जागा दिसतात, त्याही कथानकाला अनुसरून. खासकरून काश्मीरमधील आरू वॅली. ३. सामाजिक संदर्भांचा विचार केला (खासकरून उत्तर भारतीय), तर चित्रपटाची मूळ कल्पना मात्र पचायला (आणि स्वीकारायला) जरा कठीणच आहे. मुख्य पात्रांचे काही निर्णय व विचार तर्कसंगत नाहीत आणि त्यामुळे अनेकदा चित्रपटाचा परिणाम कमी होतो. ४. दिग्दर्शकाने ही कथा सांगण्यासाठी जाणीवपूर्वक एका सरळ, रेषीय शैलीची निवड केली आहे. (प्रामुख्याने केवळ दोन पात्रांवर केन्द्रित कथन, पार्श्वसंगीताचा कमी वापर, विरळ संवाद, सलग घटनांचा अभाव, कॅमेरा शक्यतो स्तब्ध ठेवणे इ.). प्रयोग म्हणून ठीक असले, तरी, चित्रपट पाहताना ते बरेचदा कंटाळवाणे होते. तर्कसंगतीच्या अभावामुळे अधिकच. ५. चित्रपटाची सुरुवात अतिशय प्रभावी, थरारक आणि भीतीदायक आहे. पण काही वेळानंतर तिथे निर्माण होणारे मुद्दे पूर्णपणे बाजूला राहतात आणि आपण एक वेगळाच चित्रपट बघतो आहोत की काय असे वाटू लागते. शेवटही अचानक झाल्यासारखा वाटतो. --- इथे (आणि मराठीत) पहिल्यांदाच लिहितो आहे. चू. भू. द्या. घ्या.

वाचने 8808
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

चित्रपट बघण्यात येईल........ रणदीप हुडा आणि इम्तियाज अली साठी...........

चित्रपटाची सुरुवात अतिशय प्रभावी, थरारक आणि भीतीदायक आहे. पण काही वेळानंतर तिथे निर्माण होणारे मुद्दे पूर्णपणे बाजूला राहतात आणि आपण एक वेगळाच चित्रपट बघतो आहोत की काय असे वाटू लागते. शेवटही अचानक झाल्यासारखा वाटतो.
सहमत. आलिया भट्टचा अभिनय तितका प्रभावी वाटला नाही , रणदीप हुडा मात्र महाबीर शोभतो. इम्तियाज अलीच्या ह्या सिनेमाकडून बर्‍याच अपेक्षा होत्या त्यामानाने सिनेमा ठिकचं वाटला.

आपल्या लेखामुळे काय अपेक्षा धरावी याचा अंदाज आल्याने आता टिवीवरच बघेन. तसही रेहमानला घेउन पार्श्वसंगीताचा कमी वापर वगैरे प्रकाराचा चित्रपट काढायचा नाद करणे हेच मुळात बेसिकमधेच गल्लत असल्याचे लक्षण आहे :)

स्टॉकहोम सिंड्रोम चा नमुना असावा असे चित्रपट परिक्षण वाचून वाटते.

रहमान काका सुद्धा भलतेच इन्स्पायर वगैरे होतायत आता परदेशी गाण्यांपासून... माही वे ची इंट्रो - फोर्ट मायनर-व्हेअर'ड यू गो आणि वन रिपब्लिक-इफ आय लूज मायसेल्फ टुनाईट चं मिश्रण आहे असो. तरी गाणी प्रभावी असतील वाटतं.

पहिल्यावहिल्या लेखनप्रयत्नाला प्रतिसाद देऊन उत्साह वाढवल्याबद्दल सर्वांना धन्यवाद..! पुढेही लिहिण्याचा मनसुबा आहे. लोभ असू द्यावा...

रस्ता हा या सिनेमााच्या कथेचा केंद्र बिंदू वाटला. नायिकेच्या मनस्वी वागण्यात व निरागसतेतील भाव दशा नायकात रुपांतर होणारा दुष्ट. क्रूरतेसमोर निर्भयता व निर्मलता कशी प्रभावी ठरते याचे हळुवार चित्रण भावते.

In reply to by शशिकांत ओक

spoilers ahead "रस्ता हा... केंद्र बिंदू.." उघड आहे. ------------ "क्रूरतेसमोर निर्भयता व निर्मलता कशी प्रभावी ठरते याचे हळुवार चित्रण.." अजिबात नाही. हा परंपरागत पुरुषी विचार झाला. मी असं म्हणेन की एका स्त्रीसाठी स्वातंत्र्य आणि कारावास या संकल्पना पुरुषांपेक्षा पूर्ण वेगळ्या असू शकतात, हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला गेला आहे. "निर्णय घेण्याचा अधिकार" हे कोणत्याही स्त्रीचे सर्वात मोठे स्वप्न असते असे म्हणायला हरकत नाही. 'हायवे'बद्दल बोलायचे, तर असे अनेक प्रसंग आहेत, जिथे या मुद्द्याला अधोरेखित करण्यात आले आहे. उदा. १. तिला पळून जाण्याची संधी देण्यात येते. पण जेव्हा तिला समजते की त्या थंड, निर्जन वाळवंटात ती कुठेही जाऊ शकत नाही, तेव्हा ती परत येते आणि आपल्या कोठडीचे दार बंद करून घेते. २. तिचे अपहरणकर्त्या ट्रकचालकाबद्दल मत काहीसे बदलत चालले असताना आणि तिला या नव्या स्वातंत्र्याची गोडी लागत असतानाच एकदा पोलीस ट्रक अडवतात. तेव्हाही ती लपून बसते आणि सुटका करून घ्यायची संधी आपणहून सोडून देते. ३. ट्रकचालक तिला घरी जायला सांगतो, तेव्हा ती नकार देते आणि तिच्या स्वप्नातल्या "पर्वतशिखरावरील घरा"कडे जायला निघते. नाइलाजाने(?) तो तिची सोबत करतो. ---------- दुसरा मुद्दा म्हणजे, आपण ढोबळमानाने जे "चांगले" आणी "वाईट" असे समाजघटकांचे दोन भाग करतो, ते किती खोटे आणि उथळ असतात हेही दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ट्रकड्रायव्हर हा सुरुवातीला अतिशय हिंस्त्र आणि (मध्यमवर्गीय) रूढार्थाने कसलाच विधिनिषेध नसलेला (तो त्या मुलीला कोठ्यावर विकायलादेखील तयार असतो) असा वाटतो. पण जशी कथा पुढे जाते, तसे त्याच्या व्यक्तिमत्वाचे कंगोरे दिसू लागतात. बरे-वाईट या कल्पना (वेगळ्या अर्थाने) त्याच्यासाठी असतात आणि तो त्यांना धरून चालतो हे दिसते (त्याचा साथीदार तिच्याशी लगट करतो, तेव्हा तो त्याला बदडतो, आणि तिला नीट पदर घ्यायला दरडावून सांगतो). दुसरीकडे, तिच्या "सभ्य" कुटुंबातल्या एका पशुसम काकाने तिच्या लहानपणी तिचे लैंगिक शोषण केल्याचे "गुपित" ती आपल्या नव्या "मित्रा"ला सांगते. (हेही एक नवे स्वातंत्र्यच, कारण आजतागायत ती हे कोणापाशीही बोलू शकलेली नसते.) --------- अर्थात हे सर्व वाचताना जेवढे भावपूर्ण, उत्कट इ. वाटते (वाटत असावे असा माझा अंदाज!), तितके ते पडद्यावर भिडत नाही हे मात्र खरे आहे.