Skip to main content

मूर्तीपूजा

लेखक राही यांनी रविवार, 22/12/2013 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
सगुणोपासकांच्या श्रद्धा आणि भक्तीप्रती पूर्ण आदर आहे. कुठेही निंदानालस्ती अथवा टिंगलटवाळी करण्याचा हेतू नाही असे सांगून आता एका प्रश्नाकडे वळावेसे वाटते. कृपया विचार व्हावा, युद्ध नको (अशी अपेक्षा). देवाला सगुणरूपात मानल्याने हिंदूंत मूर्तिपूजा रूढ झाली आणि ती हिंदुधर्माचे व्यवच्छेदक लक्षण बनली. या बरोबर देवळे, पुजारी, दैनिक सोहळे, उपचार, प्रसाद, हार, फळे ,फुले, नैवेद्य, दागिने-मुकुट-माळा-कंठ्या, गर्दी, फसवणूक, लुबाडणूक, अस्वच्छता, अराजक आदींची एक मोठी व्यवस्था/अव्यवथा उभी राहिली आणि आता ती इतकी दृढमूल झालेली आहे की त्याशिवायचा हिंदुधर्म कल्पिताच येत नाही. 'योग-याग-विधी, येणे नोहे सिद्धी, वायाच उपाधी, दंभ धर्म II' हे आणि अशी अनेक संतवचने आहेत. आधुनिक काळात 'ओ माय गॉड' सारखे चित्रपट येतात जातात, देव मूर्तीत नाही म्हणून सांगतात पण ते तात्पुरतेच. या विरुद्ध बोलायचे म्हणजे रूढीभंजनाचा, पाखंडीपणाचा आरोप पत्करायचा, कदाचित 'हिंदुद्वेष्टे'पणाही स्वीकारायचा. तोही स्वीकारायला हरकत नाही पण उगीच कटुता आणि तेढ वाढते, जे उद्दिष्ट नाही. बरे मूर्तिपूजा नाही तर हिंदू असण्याचे अन्य लक्षण कोणते? खरोखर हे विषय जटिल आहेत. यावर चर्चा करताना हेतूंच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेतली जाणे अपरिहार्य आहे. आणि एकदा का तुमची इंटेग्रिटी क्वेश्चन होऊ लागली, तुमची कळकळ समोरच्याला समजेनाशी झाली की आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडून वातावरण तप्त होणार, रणकंदनही माजणार. आज महाराष्ट्रातल्या काही चळवळी मूर्तीपूजेला दुसरा काही सशक्त पर्याय देण्याच्या प्रयत्नात आहेत पण आधी म्हटले तसे त्यांना विरोधही प्रचंड आहे. पण हळूहळू (अगदी हळूहळूच) हे बदलेल, काही शतकांनी का होईना, स्पिरिचुअलिटीच्या (रिलिजन नव्हे) खर्‍या रूपाचे लोकांना आकलन होईल अशी आशा राखणे हेच माझ्यासारख्यांच्या हातात आहे. (सध्याचे हिंदू लोक मूर्ख आहेत आणि पुढे कधीतरी ते शहाणे होतील असे म्हणणे नाही, तसा अर्थ कृपया कोणी काढू नये.)

वाचने 33162
प्रतिक्रिया 118

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

इतरत्र, विशेषतः ग्रीक आणि रोमन संस्कृतींमध्ये देखील शिल्प आणि स्थापत्य विकसित होत होतेच. ग्रीक कलेचा प्रभाव अफ्घानिस्तान-ताजिकिस्तान भागात पडून इण्डोग्रीक अथवा गांधार कलेचा जन्म झाला हे सर्वश्रुत आहे. अर्थात पहिल्या सहस्रकात आपल्याकडे भूषणावह अशा फार मोठ्या शिल्पवैभवाचे निर्माण झाले हे खरेच.

In reply to by राही

पूजनासाठी घडवलेल्या मूर्ती व केवळ सौन्दर्यनिर्मितीसाठी घडवलेल्या मूर्ती यात निश्चितच फरक असतो. आपापल्या सौन्दर्यदृष्टीचे अन आदर्शाचे आरोपण या मूर्तीवर केले गेले. त्या त्या भागातल्या पूजकांनी ते भाव त्या मूर्तीवर पाहिले. केवळ याच कारणासाठी गांधार कलेतील बुध्दमूर्ती या अपोलोसारख्या सुंदर पण निर्जीव भासतात, त्याउलट इथल्याच मूर्तीकारांनी साकारलेली मथुरा शैलीतील बुध्दमूर्ती सजीव व भावपूर्ण भासते. मूर्तीपूजेसारख्या विषयावर मला काहीच ज्ञान नाही पण मूर्ती हि कलावस्तू म्हणून पाहता हे जाणवले.

In reply to by अभ्या..

अत्यंत सुरेख निरिक्षण. शिल्पकलेचा विषय कोणताही असू शकतो आणि देव या प्रेरणेनं सुंदर शिल्प तयार झालेली आहेत हे खरं आहे, पण त्याचा अर्थ शिल्पकलेला विषय मिळाला इतकाच आहे. देव ही कल्पना आहे या गोष्टीला त्यानं बाधा येत नाही.

In reply to by प्रचेतस

>>> पण मूर्तीपूजेमुळेच भारत कलाक्षेत्रात संपन्न झाला. अप्रतिम अशी शिल्पे निर्मिली गेली. ऐहोळे, पट्टदकल, वेरूळ, बेलूर हळेबीडू, कोणार्क, खजुराओ सारखी अप्रतिम मंदिरे बांधली/कोरली गेली. +१११११११११... मूर्तीपूजेमुळे सगुणभक्तीचे अत्यंत उच्च स्वरूप निर्माण झाले. त्यातून भक्तिभावाने ओथंबलेल्या रचना, काव्य व साहित्य निर्माण झाले. त्याचवेळी मूर्तीपूजेचा तिरस्कार केल्याने काही धर्मात मूर्तीपूजकांविषयी तिरस्काराचे व विध्वंसाचे वातावरण निर्माण झाले.

In reply to by श्रीगुरुजी

मूर्तीपूजेचा तिरस्कार अज्ञानी (किंवा धर्मांध) लोक करतात. एखादी गोष्ट व्यर्थ आहे हे कळल्यावर सूज्ञ तिचा तिरस्कार करत नाही (इतरेजनांचा तसा गैरसमज असतो); तो फक्त मूर्तीपूजा स्वच्छंदाप्रत (किंवा मुक्तीप्रत) नेऊ शकत नाही इतकंच सांगण्याचा प्रयत्न करतो.

In reply to by प्रचेतस

अनेकानेक उत्तमोत्तम शिल्पांचा,मंदिरांचा खजिना भग्न आणि दुर्लक्षित अवस्थेत इतस्ततः पडलेला पाहून असे वाटते की या वास्तूंत एखाद्या देवाच्या मूर्तीची स्थापना करावी ज्या योगे भोळीभाबडी जनता तिकडे आकर्षित होऊन राबता वाढेल आणि व्यवस्थित देखभाल होईल. पण लगेचच असेही वाटते की हीच भोळीभाबडी जनता दुरुस्तीच्या, देखभालीच्या नावाखाली वर्गण्या/खंडण्या/देणग्या उकळेल, वेगवेगळे फ्लेक्स लावून मसल फ्लेक्स होतील आणि शेवटी भगभगीत ऑइल पेंट, जुन्या फरश्या-शिलाखंड उचकटून टाकून त्या जागी संगमरवर किंवा साध्या गुळगुळीत टाइल्स्स, सगळीकडून लोंबणार्‍या विजेच्या तारा हेच सर्व तिथे डौलात विराजमान होईल.

In reply to by राही

पूर्णपणे सहमत. पण अजून तरी अशा गोष्टी सुप्रसिद्ध अशा जुन्या मंदिरांबाबतच घडतात. उदा. कोल्हापूरची महालक्ष्मी, पंढरपूरचा विठोबा. अर्थात हल्ली काही जुन्या मंदिरांना ऑइलपेन्टने रंगवण्याचे फ्याड आलेय. तर त्याहीपेक्षा अप्रतिम असलेली जुनी मंदिरे मात्र भग्नावस्थेत पडून राहून जीर्णोद्धाराची वाट बघत असतात. काही वेळा वाटते की ती आहेत तशीच राहू द्यावीत. निदान त्यांचा बाजार होण्यापासून तरी वाचतोय.

@धन्या, हरिपाठ माझाही आवडता आहे. प्रतिसाद आवडला. त्या संदर्भात अधिक काही पुढे कधी तरी‌. अवतार, अर्धवटराव, स्नेहांकिता या व इतर बहुतेकांचे प्रतिसाद आवडले. अगदी श्री. म्हैस यांचाही. राजेश घासकडवी यांनी चर्चेत नेमकेपणा आणला. वल्ली, बॅटमन यांनी नेहमीप्रमाणे अचूक माहितीची भर घातली. प्रकाश घाटपांडे यांनी एक वेगळाच मुद्दा मांडला. सं. क्षी. यांनी 'भरकटलेल्या' चर्चेला मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला. (शेवटी ती भरकटलीच ती वेगळी गोष्ट. ) या सर्वांचे आभार. श्री. प्यारे-१ यांच्यामुळे तर ही चर्चा सुरू झाली. त्यांचे प्रतिसाद वाचनीय असतात; येथेही होते. चर्चेत भाग घेतलेल्या इतर सर्वांचेही आभार.

In reply to by राही

प्रयत्न केला. (शेवटी ती भरकटलीच ती वेगळी गोष्ट.)
ज्या लेखवरनं ही चर्चा सुरु झाली तिथे तुम्ही :
अख्खी गीता स्थितधी: होण्यासाठी उपाय सांगते
असा सुरेख प्रतिसाद दिला होता म्हणून लेखाबद्दल वेगळ्या अपेक्षा होत्या. अर्थात काही विद्वान (ज्यांचे विषयाचे प्रगाढ ज्ञान त्यांच्या प्रत्येक प्रतिसातून दिसते), निव्वळ व्यक्तिगत प्रतिसाद धोरणात बसवून चर्चा कशी भरकटेल याची खबरदारी घेतात. त्यांना इतरांनी यावेळी फाट्यावर मारल्यांने चर्चेचा विषयाशी संबंध राहिला. तुम्हाला "स्थितधी:" म्हणजे काय (याचा अनुभव नसला तरी) कल्पना असावी अशी अपेक्षा आहे. त्यासाठी धारणारहित चित्त ही सर्वात प्रार्थमिक आणि अत्यंत अनिवार्य गोष्ट आहे. देव ही विचारांबरोबर भावविश्वही व्यापून टाकणारी अत्यंत चुकीची धारणा आहे. कोणताही शब्द (उदाहरणार्थ : आत्मभान) केवळ माहिती आहे म्हणून वापरणं आणि ती निराधार स्थिती आहे त्यासाठी कोणतंही आलंबन नसायला हवं हे समजणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

कोणताही शब्द (उदाहरणार्थ : आत्मभान) केवळ माहिती आहे म्हणून वापरणं आणि ती निराधार स्थिती आहे त्यासाठी कोणतंही आलंबन नसायला हवं हे समजणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.
मानसशास्त्रामध्ये आत्मभान (सेल्फ अवेअरनेस) चा अर्थ मला काय वाटत आहे (व्हॉट आय अ‍ॅम फीलींग), मी काय विचार करत आहे (व्हॉट आय अ‍ॅम थिंकींग) आणि मी काय कृती करत आहे (व्हॉट आय अ‍ॅम डूईंग) याची नेमकी जाणिव असणे. तुम्हाला अध्यात्माच्या अनुषंगाने "आत्मभान" या संकल्पनेत काय अभिप्रेत आहे?

प्रतिसाद वाचूनही कळले नसेल तर हा विषय तुमच्या आवाक्याबाहेरचा आहे असं मला वाटतं.
आम्ही अडाणीच आहोत , तुम्हाला जेवढे समजलेय तेवढे आम्हाला सोप्या शब्दात सांगा म्हणेज झाले

In reply to by स्पा

तुमची विनम्रता, जिज्ञासा पाहून आम्ही संतोष पावलो आहोत. तुमच्यासारख्या सरळ आणि साफ मनाच्या शिष्याच्या शोधात आम्हीही होतो. अनाकलानामुळे झालेल्या समाजाच्या धार्मिक विभाजनाप्रती जनजागृती करण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करतो. त्यामुळे आम्हाला जेवढे समजलेय तेवढे तुम्हाला सोप्या शब्दात नक्की सांगू.

In reply to by धन्या

देव या कल्पनेनं समाजाचं धार्मिक विभाजन झालंय ही उघड गोष्ट जर तुम्हाला पटली असेल तर तुमच्या या प्रश्नाला :
तुम्हाला अध्यात्माच्या अनुषंगाने "आत्मभान" या संकल्पनेत काय अभिप्रेत आहे?
उत्तर देण्यात अर्थ आहे. सगुणोपासना "स्थितधी:" अवस्थेप्रत" नेऊ शकेल अशीच जर तुमची धारणा असेल (जी आतार्यंतच्या सर्व प्रतिसादात दिसून येते) तर याविषयावर चर्चा करण्यात अर्थ नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

धृतराष्ट्र महाराज,
सगुणोपासना "स्थितधी:" अवस्थेप्रत" नेऊ शकेल अशीच जर तुमची धारणा असेल (जी आतार्यंतच्या सर्व प्रतिसादात दिसून येते) तर याविषयावर चर्चा करण्यात अर्थ नाही.
असे असेल तर सगुणोपासनावाले अहद ज्ञानेश्वर तहद तुकाराम-रामदास यांपैकी स्थितधी: कोण नव्हते ते सांगा, म्हणजे आमच्यासारख्या अज्ञ बालकांना मार्गदर्शन होईल.

In reply to by बॅटमॅन

त्यांनी 'मागेच' उपरोल्लेखित सगळ्यांना अडगळीत टाकलंय. सरांचे जुने लेख वाच रे बॅटमॅन! मला वाटतं रुणूझुणू सेरिज आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

उत्तर देण्यात अर्थ आहे.
चर्चा करण्यात अर्थ नाही.
सारं काही तुम्हीच ठरवणार. त्यापेक्षा राहू दया. मला मानसशास्त्रानूसार "आत्मभान" शब्दाचा अर्थ कळला आहे तेव्हढा पुरेसा आहे.

In reply to by धन्या

@मला मानसशास्त्रानूसार "आत्मभान" शब्दाचा अर्थ कळला आहे तेव्हढा पुरेसा आहे.>>> धनाजी आपण शिंपल पाव शांपल खाणारी/पचणारी माणसं. आपण हे असले निव्वळ तोंडानी खाता येतात एव्हढ्याच कारणास्तव "पदार्थ" म्हणविल्या जाणार्‍या कःपदार्थांन्ना तोंडीच का लावावं? :) सोडून दे ना यारं!

मुळात हिंदु असण्यासाठी आस्तिक असायचीच गरज नाही. अर्थात पूजनाचीच गरज नाही. एखादी व्यक्ती नास्तिक असूनही हिंदू असू शकते. नास्तिकांनी आचरायचे नियमही स्पष्ट आहेत. तेव्हा मूर्तीपूजा = हिंदू हे अपूर्ण वाटते. बाकी हिंदू हा सर्वसाधारणपणे घेतला जातो त्या अर्थाने धर्म नसून एका उपखंडात तयार झालेली जीवनपद्धती आहे, हे श्री वाजपेयी यांचे मत मला चिंत्य व योग्य वाटते.

त्यासाठी धारणारहित चित्त ही सर्वात प्रार्थमिक आणि अत्यंत अनिवार्य गोष्ट आहे. देव ही विचारांबरोबर भावविश्वही व्यापून टाकणारी अत्यंत चुकीची धारणा आहे.
धारणारहित चित्त .......ह्याचा अर्थ सांगाल का? आजपर्यंत कुणी असा काही ऐकलय का? :-)
अर्थात काही विद्वान (ज्यांचे विषयाचे प्रगाढ ज्ञान त्यांच्या प्रत्येक प्रतिसातून दिसते), निव्वळ व्यक्तिगत प्रतिसाद धोरणात बसवून चर्चा कशी भरकटेल याची खबरदारी घेतात.
किती ती jealousy …. ENO घ्या हवं तर
असे असेल तर सगुणोपासनावाले अहद ज्ञानेश्वर तहद तुकाराम-रामदास यांपैकी स्थितधी: कोण नव्हते ते सांगा, म्हणजे आमच्यासारख्या अज्ञ बालकांना मार्गदर्शन होईल.
चल म्हणजे आपण अज्ञ आहोत हे तरी तुम्ही accept केलत. हे हि नसे थोडके

हि चर्चा वाचत असताना इरावती कर्वे यांच्या "युगांत" ची आठवण झाली. पुस्तकातील शेवटच्या लेखाचा समारोप करताना बाईंनी असे लिहिले आहे "हे सर्व लिहित असताना एका मित्राने एक विचार मांडला. वेद, उपनिषदे, महाभारत अशी सुरुवात झाल्यावर आपल्या सबंध समाजाने पलटी का खाल्ली? इतक्या कणखरपणे आयुष्याचा विचार केल्यावर भक्तीमार्गाचा स्वप्नाळूपणा व विभूतीपूजा त्याने कशी पत्करली? गोमांसासुध्दा सर्व तर्‍हेने मांस खाणारे शेवटी गाईचे शेणखाउन व मूत पिउन, एका चार पायाच्या जनावराला आपली माता कशी समजु लागले?" हा फक्त एक उतारा वाचुन अनेकांचा बाईंविषयी गैरसमज होण्याचा संभव आहे. पण युगांत संपूर्ण वाचल्यावर त्यांना काय म्हणायचे होते ते नक्की समजते.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आपली अधोगती का आणि कशी झाली, कधीपासून झाली, मुळात ती झाली हे तरी खरे का असे अनेक प्रश्न चर्चिले जातात आणि त्यांची अनेकानेक उत्तरे अनेकांनी आपापल्या परीने शोधली आहेत. गोमांसभक्षण सार्वत्रिक होते हे इरावतीबाईंचे मत त्यांनी 'युगान्त' शिवाय अन्य पुस्तकांतूनही मांडले आहे. दुर्गाबाईंनीही मांडले आहे. या विषयी मिसळपाववरील एका चर्चेत बरीच अवतरणे, उद्धृते दिली गेली होती. कोणाला दुवा मिळाल्यास द्यावा. मुद्दा भक्तिमार्ग अनुसरण्याचा किंवा गोमातेला पूज्य मानण्याचाच केवळ नाही, तर सर्वंकषपणे विवेकहीन होण्याचा आहे. पण त्यावर पुढे कधी तरी.

In reply to by राही

उदाहरणे अनेक देता येतील. मुख्य मुद्दा इतकाच की गाय हा खाद्यपशू होता, यद्यपि "गाय" किंवा "म्हैस" जास्त खाल्ली जात नसे कारण शेवटी ती पिलांना जन्म देते. बैल अन रेडे मात्र दाबून खाल्ले जात असत. कारण तेव्हा शेतीवर फोकस तितकासा नव्हताच. "होऊ दे गोमांसाचा खर्च, खिल्लार आहे घरचं" अशी स्थिती होती. पुढे पुढे शेतीचा प्रसार झाल्यावर साहजिकच हा फोकस निमाला. अन (भौतेक) जैन-बौद्धांची काँपीटिशन कमी करायला म्हणून ब्राह्मण व्हेज झाले इ.इ. यात आधीच्या पेक्षा जास्त इल्लॉजिकल असे काही नाही. अगदी वैदिक काळात निर्गुण का असेना, उपासना होतीच. प्राणी मारून त्यांचे हवि आकाशातील देवांना अर्पण करणे हीदेखील सगुणोपासनेइतकीच मोठी अंधश्रद्धा म्हणावी लागेल. नंतर त्यातली हिंसकता कमी झाली. पण एका बाबतीत सहमत आहे. वेदकाळापासून ब्राह्मणकाळात कर्मकांडाचे प्रस्थ वाढले त्यावर रिअ‍ॅक्शन म्हणून उपनिषदे तयार झाली. त्याच्या पुढे मात्र तितके फंडामेंटल काम झालेले दिसत नाही. जे काही आहे त्याचे या ना त्या प्रकारे विवरण करणे इतकाच उद्योग नंतरच्या लोकांनी केलेला दिसतो. जी षड्दर्शने आहेत त्यांच्या कन्सॉलिडेशननंतरच्या काळाबद्दलही असेच म्हणता येईल. बराच काळ ती व्हायटॅलिटी गमावली-विशेषतः गुप्त काळानंतर. अगदी शंकराचार्य इ. असले तरीही. पुढे संतांनाही स्वतःचे काही करण्याइतका अवसरच मिळाला नाही असे दिसते. हा समाजस्थितीचाच परिपाक म्हणावा लागेल.

In reply to by बॅटमॅन

म्हणूनच जुन्या रूढी पुन्हा पुन्हा तपासून पहायला हव्यात. 'आत्म'परीक्षण व्हायला हवे. बौद्ध-जैनांनी एक झटका दिला तेव्हा आम्ही खडबडून जागे झालो आणि नंतर झोपी गेलो आहोत ते आजपर्यंत. अधूनमधून प्रबोधनाच्या चळवळी झाल्या पण त्यांना मर्यादितच यश मिळाले. पारमार्थिक सोडून द्या, ऐहिक दृष्टीने पहाताही दुसरे सहस्रक अंधारयुग होते. परकीयांच्या आक्रमणांना आम्ही तोंड देऊ शकलो नाही. आधी पाडाव आणि मग त्यामुळे (संस्कृतीचा) र्‍हास या कारणमीमांसेपेक्षा आधी र्‍हास आणि मग त्यामुळे पाडाव हेच मला अधिक पटते. आधी डीक्लाइन आणि नंतर फॉल. आमच्याकडे नवनिर्माण झाले नाही, पुनरुज्जीवन झाले नाही, इतरत्र मात्र ते झाले; याला चक्रनेमिक्रमच म्हणावे कायं? की जो शिखरावर जाईल तो खाली येईलच वगैरे? या बाबतीत मला तेव्हाचे आम्ही आणि भारतातले आजचे पारसी यांची स्थिती (संख्या सोडता) सारखी वाटते. पारश्यांना आपला वंश, धर्म लयाला जाईल किंवा संकर होईल याची इतकी भीती वाटली की त्यांनी आपले धर्मनियम अधिकाधिक कडक केले. त्यांनी स्वतःला आक्रसून टाकले. आणि त्यांची संस्कृती अधिकाधिक आकसत गेली. म्हणून (भोळ्या-भाबड्या जनतेकरिता) वैचारिक प्रबोधनाची एक जोमदार चळवळ पुन्हा सुरू व्हायला हवी.

In reply to by संजय क्षीरसागर

दुसर्‍यांसाठी थांबायची गरज नाही. चळवळ प्रत्येकाने आपल्यापुरती सुरू केली तरी चालेल... थेंबांचा ओहोळ, ओहोळाची नदी आणि नद्यांचा सागर बनेल. जगात किंवा कोणत्याही एका जागी सर्वकाळ कधिही केव्हाही १००% सुजाण लोक नव्हते, नाहीत, नसतील... तशा प्रकारचा विचार आचरणात आणणार्‍या लोकांची संख्या लक्षणिय (क्रिटीकल मास) झाली तरी खूप आहे ! थोडक्यात प्रत्येकाने आपल्यातला "चांगला मानव" शोधला तरी पुरेसे आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हा मुद्दा योग्य आहे पण मूर्तीपूजेच्या संदर्भात उपयोगी नाही कारण प्रत्येक भक्ताला आपण चांगुलपणाच करतोयं असं वाटतं. माझा हा प्रतिसाद पाहा:
कारण देव ही कल्पनाच भक्त निर्माण करते. तुमचा देव काढून टाकला तर भक्त उरत नाही. एक भ्रम दुसर्‍या भ्रमाला जन्म देतो. देव या भ्रामक कल्पनेची `आपण भक्त आहोत' ही आपसूक होणारी परिणिती आहे. आणि भक्तांच्या व्यक्तिगत कल्पनांनी सबंध एकसंध मानवता विभाजित झाली आहे. मुस्लिम, हिंदू, क्रिस्टशिअन, ज्यू, ..... आणि कायकाय. त्यात पुन्हा वाढीव मूर्खपणा म्हणजे प्रत्येक धर्मात उपधर्म आणि त्यांच्यात पुन्हा तेढ! मग अशा धार्मांधतेतून एखादा हिटलर ज्यूंना निर्वंश करण्यासाठी संपूर्ण जगाला महायुद्धाच्या खाईत लोटतो आणि त्याचे तितकेच मूर्ख समर्थक बलिदानाला तयार होऊन लक्षावधी निरपधारांचं आयुष्य बरबाद करतात. हिटलरसाठी लढणार्‍यांना देखिल तो आपलं हितंच करतोय असं वाटत असतं! त्यांना हिटलरच्या निर्बुद्धतेविषयी जरा सुद्धा शंका वाटत नाही. आणि इतका घनघोर कलह होऊन देखिल मानवता शहाणी होत नाही. तेच वैर पुन्हापुन्हा उफाळून येतं आणि कारण काय? तर देवाधिष्ठित धर्म! अर्थात प्रत्येक जण हिटलर होऊ शकत नाही. तो त्या काल्पनिक तारणहार देवाची वाट पाहातो. आणि त्याच्या अजाणतेपणाला अंत नसतो कारण असा देव कुठेही नसतो आणि कधीही येणार नसतो. पण सगळे धर्मगुरु, धर्मग्रंथ आणि कर्मकांडं त्याला दिलासा देत राहातात की देव आहे, भाव दृढ कर. असा दृढ भाव फक्त चुकीची धारणा सघन करत नेतो. अत्यंत अपवादात्मक स्थितीत एखाद्याला मात्र देव नक्की भेटतो! त्या वेळी तो पुरता भ्रमिष्ट झालेला असतो, त्याचा भ्रम साकार होऊन त्यानं देवाचं रुप घेतलेलं असतं! इतरांना या गोष्टीचा प्रचंड काँप्लेक्स येतो त्यांना वाटतं आपण कमनशिबी या जन्मात देवाची भेट घडायची नव्हती. आणि ते मूर्ख त्यांच्या पुढच्या पिढीला सांगत राहातात, देव आहे, तुम्ही भाव दृढ करा. आम्हाला भेटला नाही पण एक दिवस तुम्हाला तो नक्की भेटेल!
जे काही करता येतं ते आत्ता, इथे तुमच्या समोर असेल त्याच्याशीच घडवता येतं. नाही तर क्रिटीकल मास केवळ कल्पनेत राहातो. इथल्या विद्वजनांच्या धारणा (आणि विषयाशी असंबद्ध दिव्य वैयक्तिक प्रतिसाद) पाहिल्यावर कार्याची व्याप्ती लक्षात येईल.

In reply to by संजय क्षीरसागर

हा मुद्दा योग्य आहे पण मूर्तीपूजेच्या संदर्भात उपयोगी नाही कारण प्रत्येक भक्ताला आपण चांगुलपणाच करतोयं असं वाटतं. असहमत. मुर्तीपुजेचा चांगूलपणाशी काय संबंध??? मूर्तीपूजा करणे अथवा न करणे हा केवळ एक बाह्योपचार आहे. ते करण्याने कोणी चांगुलपणा करत नाही अथवा न केल्याने चांगुलपणा करतो अथवा ज्ञानी बनतो असे नाही. माणुसकी असणे किंवा नसणे जास्त महत्वाचे. निसर्ग विविधतेने भरलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीत एकवाक्यता आणण्यात शक्ती व्यर्थच जाईल कारण निसर्गातील विविधता अनादी आणि अनंत आहे (होती, आहे आणि पुढेही राहीलच)... यांत मानवी विचारांची विविधताही सामील आहे. तेव्हा जगातल्या सगळ्या मानवांचा वैचारीक रोबो बनविण्याची स्वप्ने बघण्यामध्ये (जे आजपर्यंत कोणालाच जमलेले नाही आणि मनुष्याची नैसर्गीक घडण पहाता भविष्यातही जमणार नाही !) शक्ती खर्च करण्याऐवजी, ज्या गोष्टींचा इतरांना उपद्रव होत नाही अश्या गोष्टींबद्दल सहिष्णू राहणे (अ‍ॅग्री टू डिसॅग्री अँड कोहॅबिट विथ मुचुअल रिस्पेक्ट) म्हणजे मानवता. या जगात एकच साध्य साधायला मानवतेच्या दृष्टिकोनातून चांगले असे एकापेक्षा जास्त पर्याय असू शकतात. त्यापैकी आपल्याला भावेल तो पर्याय वापरण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे हे उमजले नाही की अतिरेक सुरू होतो. मुख्य आश्चर्य असे की एकेरी तत्वज्ञानामुळे जगात किती अतिरेकीपणा चालला आहे हे दिसत असूनही मानव आपला अतिरेकी आग्रह सोडायला तयार नसतो हे वारंवार दिसते ! आता हा काय चांगूलपणा झाला काय?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तसं नाही. मूर्ती आणि देवाचा संबंध आहे!
निसर्ग विविधतेने भरलेला आहे ...तेव्हा जगातल्या सगळ्या मानवांचा वैचारीक रोबो बनविण्याची स्वप्ने बघण्यामध्ये (जे आजपर्यंत कोणालाच जमलेले नाही आणि मनुष्याची नैसर्गीक घडण पहाता भविष्यातही जमणार नाही !) शक्ती खर्च करण्याऐवजी...,
सर्वांना एकसारखं बनवण्याबद्दल मी काहीही म्हटलेलं नाही. माझा मुद्दा एकच आहे की मूर्तीपूजा देवाधिष्ठीत आहे आणि मुळात धर्म-भिन्नता देव या (अनेकविध) संकल्पनेवर आधारित आहे. जगातली युद्धं आणि कलह मोठ्याप्रमाणावर धर्मावर बेतलेला आहे त्यामुळे देव, मूर्तीपूजा आणि तत्सम कर्मकांडं वैयक्तिक असावीत.
ज्या गोष्टींचा इतरांना उपद्रव होत नाही अश्या गोष्टींबद्दल सहिष्णू राहणे (अ‍ॅग्री टू डिसॅग्री अँड कोहॅबिट विथ मुचुअल रिस्पेक्ट) म्हणजे मानवता.
चर्चाविषय धर्म आहे आणि त्यानं किती उच्छाद मांडला आहे याची तुम्हाला कल्पना आहेच. किंबहुना जगाचं विभाजनंच धर्मप्रेरित आहे आणि या गोष्टीचा उपद्रव व्यापक आहे.
या जगात एकच साध्य साधायला मानवतेच्या दृष्टिकोनातून चांगले असे एकापेक्षा जास्त पर्याय असू शकतात. त्यापैकी आपल्याला भावेल तो पर्याय वापरण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे हे उमजले नाही की अतिरेक सुरू होतो.
जर सगळी मानवता एकसंध व्हावी (जी निसर्गितः आहेच) असं ध्येय असेल तर जग निधर्मी व्हायला तुमच्या मते काय पर्याय आहेत? आणि
मुख्य आश्चर्य असे की एकेरी तत्वज्ञानामुळे जगात किती अतिरेकीपणा चालला आहे हे दिसत असूनही मानव आपला अतिरेकी आग्रह सोडायला तयार नसतो हे वारंवार दिसते ! आता हा काय चांगूलपणा झाला काय?
हे "एकेरी तत्वज्ञान" कोणतं?

In reply to by संजय क्षीरसागर

माझा प्रतिसाद परत एकदा वाचावा आणि मी स्पष्ट लिहीलेलाच अर्थच त्यातून काढावा... मी क्लिष्ट लिहीण्याचा किंवा काहिही गर्भितार्थ लिहिण्याचा आजिबात प्रयत्न केलेला नाही. तेव्हा लिहीले आहे तेच वाचावे, इतर अर्थ शोधू नयेत... मग मी नक्की काय म्हणतो ते कळेल.

In reply to by राही

विषय बराच गुंतागुंतीचा आणि बहुपदरी आहे. सर्वप्रथम एक लक्षात ठेवायला हवे कि आज ज्याला हिंदु धर्म म्हणतात त्याला इतर प्रचलीत धर्मांचे मोजमाप लावता येत नाहि. कारण त्याअर्थाने तो धर्मच नाहि. कर्मकांड, औपनिषीदीक ज्ञानमार्ग, भक्ती वगैरेची सरमिसळ हिंदुधर्मात नेहमीच होती. एकावेळी एखाददोन घटकांचे प्राबल्य असेल एव्हढच. आणि ते तत्कालीन प्राप्त परिस्थितीला अनुसरुनच असणार. धनसंपत्ती व भूमी याकरता प्रचंड लढाया लढणे भारतात नेहमीचे होते. त्याकरता आवष्यक तो व्यवहारीपणा, क्रौर्य, बुद्धीमत्ता, विजिगिषु वृत्तीची कमतरता कधिच नव्हती. तेच साहित्य, कला, व्यापार संदर्भात देखील. भारतात व्यापाराकरता म्हणुन समुद्र सफारी घडल्या, पण राज्य विस्ताराकरता नाहि. हे एक कारण असावं कि ज्यामुळे युरोपात एका वेगळ्याच प्रकारची मानसीकता तयार झाली आणि भारतात त्याचा अभाव राहिला. भारताबाहेर साधारणतः धर्मपालनाचे फल ऐहिक परिमाणांवर बेतले असावेत. भारतात त्याला ऐहिक परिमाणं तर होतीच, पण त्याशिवाय जन्ममृत्युपासुन सुटका हे जे एक परिमाण होतं त्यामुळे ऐहिक सुखांबद्दल काहिशी उदासीनता समाजात पसरली आणि कृतीशीलता हरवली. हि फार डेंजरस सिच्युएशन असते. मनाला ऐहिक सुख पाहिजे तर आहे, पण कुठेतरी त्याबद्दल अनावष्यक धरसोड वृत्ती देखील आहे. ते सुख प्राप्त करायला प्रयत्न करतो म्हटलं तर सो कॉल्ड बंधनात गुरफटायची भिती. मग काय, ते सुख विनासायास प्राप्त व्हावं हा दुटप्पीपणा. विवेकाचा तोल सुटायला अगदी आयडीयल सिच्युएशन. आज देखील असा तोल सुटलेले लाखो लोकं सभोताली दिसतील. भोळ्याभाबड्या जनतेला जागं करणं फार सोपं. दोन-चार गाडगेबाबा हे काम सहज निपटवतील. प्रॉब्लेम आहे तो डोळे मिटुन दुध पिणार्‍या मांजरांचा. असो.

In reply to by अर्धवटराव

भोळ्याभाबड्या जनतेला जागं करणं फार सोपं. दोन-चार गाडगेबाबा हे काम सहज निपटवतील. प्रॉब्लेम आहे तो डोळे मिटुन दुध पिणार्‍या मांजरांचा.
ईच्छाशक्ती असेल तर एक सामान्यातला सामान्य माणूसही काय करु शकतो याचं उदाहरण म्हणजे गाडगेबाबा. देव मंदीरातील दगडाच्या मूर्तींमध्ये नाही हे आपल्या किर्तनांमधून सांगणारे गाडगेबाबा हे ही ओळखून होते की आपल्या सांगण्याचा सार्‍यांवर परीणाम होईलच असं नाही. म्हणून त्यांनी अनेक तिर्थक्षेत्रांच्या ठीकाणी धर्मशाळा बांधल्या. कुठे ते महान संत जे लोकांच्या अंतरंगाचा ठाव घेऊन त्यानूसार आपल्या कृतीमध्येबदल करुन लोकांचे भलेच पाहत. आणि कुठे आजचे स्वयंघोषित धर्माने विभागलेली मानवसमूह सांधायला निघालेले "स्व" गवसलेले ज्ञानी पुरुष जे त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या अटी मान्य असतील, त्यांची मते मान्य असतील तरच देतात. असो. डोळे मिटून दूध पिणार्‍या मांजरांची उपमा आवडली. गाडगेबाबांनी अथक प्रयत्न करुनही मांढरदेवीच्या यात्रेतील प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा बंद पडली नाही.

समाजसुधारणा चळवळ सुरु करायची साधनं कुठं मिळतील? ठोक बाजारात मिळतील का? केशराच्या काड्यांचा /सोन्याचा तराजू नि लाकडाच्या वखारीतला तराजू, वे ब्रिज एकत्र मिळतील का? भोळ्याभाबड्या (म्हणजे कुणाच्या कुणास ठाऊक) नि तीव्रतर साधनामार्गावर साधना करणार्‍याच्या गरजांचा समन्वय असू शकतो का? मुळात हा 'मास' चा विषय आहे का? असेल तर गीता खोटी ठरते का? 'मनुष्याणां सहस्त्रेषु...' हे सत्य असताना मुळातच सर्वांगीण विवेकाचा विचार भोळसटपणा ठरतो का? आत्मज्ञान नि आत्मभान ही सगळ्यांची गरज मुळातच नाही. एखादाच विवेकानंद असतो, बरेच देव आनंद असण्याची शक्यता आहे (यमकासाठीच फक्त नावं घेतलीयेत) बौद्ध भिक्खूंच्या प्रचारानं, अनाठायी अहिंसेनं आधी निष्क्रीय झालेल्या समाजावर नंतर खैबर खिंडीतनं आक्रमणं होऊन लाचार बनला, १००० हून अधिक वर्षं गुलामीत पिचला नि त्याला वर काढण्याचा प्रयत्न थोड्या नि थोट्या प्रमाणात सातत्यानं झाला. मात्र जो झाला त्यामुळंच तो समाज टिकला तरी. आपण म्हणता तसं र्‍हास सातत्यानं होत राहीला मात्र त्यात अर्धवटराव म्हणतात तसं 'डाय्लेमा' सातत्यानं होताच. समाज सुधारणा करायचीच असेल तर त्यासाठी नेमक्या दिशेनं प्रयत्न होऊन 'आधी पर्याय उपलब्ध करुन देऊन' नंतर 'हळूहळू' ट्रान्झिशन व्हायला हवं. त्यासाठी लोक शिक्षण हवं, समाज प्रबोधन हवं, सर्वसमावेशक दृष्टीकोन नि त्याबद्दलचा योग्य पटेलसा खुलासा देखील हवा. नि तो भावनांचा ओलावा असलेला हवा कारण शुष्क, कोरड्या स्पष्टीकरणानं हे साध्य होण्यापेक्षा दुरावा निर्माण करणारं होतं. 'जिस भगवान को हम पूजते आ रहे थे वो भगवान है ही नही' म्हणताना नवीन फांदी देखील हाती (ती फांदी म्हणजे तुमचं स्वतःचंच मनगट आहे हे समजणं सगळ्यांना शक्य नसतं) न सापडल्यानं बुडण्याचीच शक्यता जास्त.

In reply to by प्यारे१

आत्मज्ञान नि आत्मभान ही सगळ्यांची गरज मुळातच नाही.
असहमत. माझ्या माहितीप्रमाणे "आत्मज्ञान" या शब्दाचा अर्थ "कोहं" या प्रश्नाला अध्यात्मामाच्या क्षेत्रामध्ये दिले जाणारं उत्तर. जे काही लोक "चिदानंद रुपो शिवोहम" किंवा "साचार चर पर पुर्ण शिवोहम" किंवा अशाच स्वरुपाचं दुसरं काही उत्तर देतात. या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही किंवा मिळूनही कळलं नाही तरी माणसाच्या दैनंदीन जीवनात फार काही अडत नाही. "आत्मभान" ही पुर्णपणे वेगळी संज्ञा आहे. आत्मभान म्हणजे काय हे मी वर एका प्रतिसादात लिहिलं आहे.
मानसशास्त्रामध्ये आत्मभान (सेल्फ अवेअरनेस) चा अर्थ मला काय वाटत आहे (व्हॉट आय अ‍ॅम फीलींग), मी काय विचार करत आहे (व्हॉट आय अ‍ॅम थिंकींग) आणि मी काय कृती करत आहे (व्हॉट आय अ‍ॅम डूईंग) याची नेमकी जाणिव असणे.
प्रत्येक माणसाला कमी अधिक प्रमाणात आत्मभान असतेच. आत्मभान किंवा स्वतःची ओळख जितकी चांगली तितके त्या माणासाचं वागणं समतोल, विचार संयत आणि एकंदरीत जीवन सुखी असते. अजिबात आत्मभान नसलेल्या व्यक्तीला वेडा म्हणतात.

In reply to by धन्या

आत्म भान व आत्म ज्ञान यांची गरज आजकाल जरूरीची आहे की नाही माहिती नाही. पण 'आत्म गान' आलेच पाहिजे. म्हण्जे जग तुमच्या काही काळ तरी भजनी लागते. नंतर तुरूंगात रवानगी होते हा भाग वेगळा !

In reply to by चौकटराजा

पण 'आत्म गान' आलेच पाहिजे.
आत्मगान करणारा शेवटच्या श्वासापर्यंत "मी शहाणा" या नशेत राहीला तर ते त्याच्या दृष्टीने चांगलं असतं. भले मग त्याची तुरुंगात वगैरे रवानगी झाली तरी त्याचा कोडगेपणा कायम राहतो. आयुष्याने जर का त्या माणसाला जर का आयुष्याची उलथापालथ करणारा धक्का दिला आणि ही "मी शहाणा" ची धूंदी उतरली तर अशा व्यक्तीची ती अवस्था होते जी दहा वीस वर्ष एखादया व्यसनात काढून नंतर त्या व्यसनातून सुटल्यानंतर होते. धूंदीत वाया घालवलेली वर्षे, गमावलेल्या गोष्टी अक्षरशः अंगावर येतात.

In reply to by धन्या

असहमतीबद्दल आदर. आत्मभान हा आध्यात्मिक प्रकारानेच मांडलेला शब्द होता. आपली मानसशास्त्रीय व्याख्या बरोबरच असावी. मात्र इथे देखील अप्लाय होतेच्च. >>>मला काय वाटत आहे (व्हॉट आय अ‍ॅम फीलींग), मी काय विचार करत आहे (व्हॉट आय अ‍ॅम थिंकींग) आणि मी काय कृती करत आहे (व्हॉट आय अ‍ॅम डूईंग) याची नेमकी जाणिव असणे. 'नेमकी जाणीव' मध्येच घोळ असतो म्हणूनच ते लिहीलंय. म्हणूनच वय वाढलं तरी लहानांसारखं करणारे बरेच जण दिसतात. काय वाटत आहे, मी काय विचार करत आहे नि मी काय कृती करत आहे ह्यात बर्‍याचदा सुसूत्रता नसते. हा तो फरक स्वतःचा स्वत: तपासून पाहिला तर लक्षात येतं. सुसूत्रता नसली तरी बर्‍याचदा चालून जातं कारण गरज नसते. वर तेच म्हटलंय.

इ.ए. , प्रतिसाद आवडला. थोडीशी भर. १)संक्षींच्या 'चांगुलपणा' शब्दाबाबत (कदाचित) असे म्हणता येईल की (त्यांना असे म्हणायचे असावे की) आपण मूर्तीपूजा करतोय हे एक चांगले काम करतोय, सत्कार्य करतोय असे जनतेला वाटत असावे. २)बहुविधता, बहुपेडीपणा जपता जपता एकात्मतेचा अंतःप्रवाह क्षीण होणार नाही हे देखील पाहिले पाहिजे. युनिटी आणि डाय्वर्सिटी यातली कोणतीही एक कल्पना शिरजोर ठरू लागली तर ते हानिकारक ठरेल. ३)अन्यमतांचा आदर करावा हे खरेच. आदरासहित आणि कुणाहीबद्दल तुच्छ भाव न बाळगता मतभिन्नताही व्यक्त व्हावी/होऊ द्यावी इतकेच. 'विचारकलहाला का भिता' असा प्रश्न आगरकरांनी विचारून ठेवला आहे.

अर्धवटरावभाऊ, आपलाही प्रतिसाद आवडला, त्यातही थोडीशी भर. १)युरोपीय लोकही सुरुवातीला व्यापारासाठीच बाहेर पडले. त्या जोडीला साहसी शोधक वृत्तीसुद्धा होती. त्यातून पुढे राज्यविस्तार झाला. २)'भोळ्या भाबडया जनतेला जागे करणे फार सोपे. दोनचार गाडगेबाबा हे सहज निपटतील' हे खरे. पण दोनचार गाडगेबाबा असे सहज निर्माण होतील/होतात का? असा महात्मा दोन-तीन शतकांतून एखादाच जन्माला येतो. या संतांचे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी भोळ्या भाबड्या जनतेने (म्हणजे आपणच की!) स्वतःच गाडगेबाबा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, स्वतःचा विवेक जागवला पाहिजे. कुणी महात्मा अवतरेल आणि झाडू घेऊन सर्व जग स्वच्छ करेल ही अपेक्षा भोळेभाबडेपणाने आपण मानतो. मानवाच्या बुद्धीमुळे आणि विवेकामुळे येणारी जबाबदारी आपण झटकतो.