काळ:
उत्क्रांतीचा सिद्धांत मानला तर पुरोगामीत्व माणसाचा नैसर्गिक गुणधर्म असायला हवा. जसा जसा काळ पुढे लोटेल तसे तसे उत्क्रांतीच्या वरदानांनी मानवाचे जीवन एका आदर्श स्थितीकडे आपोआप लोटले जाईल. परंतु उत्क्रांतीच्या परिणामांनी होणारा एखादा छोटासाही बदल दॄश्य स्वरुपात प्रगट होण्यासाठी लागणारा काळ हा मोजक्या पिढ्यांच्या माळेच्या जीवनकाळाच्या तुलनेत हजारो पट असतो. त्याकरिता काय पुरोगामी आहे आणि काय प्रतिगामी आहे हे ठरवताना उत्क्रांतीजन्य बाबींना बाजूला ठेवले पाहिजे अन्यथा ते निसर्गावर केलेले भाष्य असेल. उदाहरणार्थ, आपले पूर्वज रानटी होते हे टीकात्मक सुराने नाही म्हटले पाहिजे. पुरोगामीत्वाच्या चर्चेचा कालखंड कसा असावा? त्यात उत्क्रांतीच्या भूतकाळातील रुपांवर मागासलेपणाचा आरोप होता कामा नये आणि उत्क्रांतीच्या भविष्यातील थेट पुढच्या टप्प्यातील वर्तनाचीच डायरेक्ट अवास्तव अपेक्षा होता कामा नये.
विस्तार:
साधारणतः सर्व मनुष्य उत्क्रांतीच्या एकाच मैलाच्या दगडावर येऊन थांबले आहेत हे एक मोठे गृहितक आहे. तरीही सर्व माणसांकडून पुरोगामीत्व दर्शक वर्तनाच्या समान अपेक्षा करणे जगात स्वीकार्य मानले जाते. पुरोगामीत्व झेपायची प्राकृतिक ऐपतच मानवसमूहांनुसार वेगळी असू शकते याची थोडीशी जाणीव मनात ठेवलेली बरी.
संदर्भ:
निसर्ग आपल्याला आपसुक पुढे घेऊन जात असताना अधिकचा पुरोगामीपणा कशासाठी? दुर्दैवाने लोक स्वतःचे पुरोगामीत्व किती आहे हे इतरांचे पुरोगामीत्व मोजून सांगतात. तो मागास विचारांचा म्हणून मी पुढारलेल्या विचारांचा असा काहीसा लोकांचा पावित्रा असतो. तसे पाहता पुरोगामीत्वाचे आंतरपीढीय (inter-generational) आणि आंतरव्यक्तीय असे दोन प्रकार होतात. ते मिसळले तर चर्चेत संभ्रम निर्माण होतो.
संकल्पना:
निसर्गाने उत्क्रांतीचा वेग शून्य केला तरी, मानवाची स्वतःची अशी काही भविष्यगामी, सुखी, समृद्ध किंवा आदर्श जीवनाची कल्पना आजच आणि आजच्या मर्यादांना मनात धरून आहे. ही कल्पना कोणी केली आहे? ही कल्पना समाजधुरीणांनी आणि तत्त्ववेत्यांनी केली आहे. तुम्ही आम्ही तिला केवळ हातभार लावला आहे. या कल्पनेपासून दूर जाणे ते प्रतिगामीत्व आणि तिच्याकडे सरकणे ते पुरोगामीत्व. ही संकल्पना कुठे एकत्र लिखित संकलित झालेली नाही कि तिच्यावर देशांच्या घटनांप्रमाणे शिक्कामोर्तब झालेले नाही. या आदर्श संकल्पनेचा आणि तिच्याकडे नेणार्या दिशेचा शोध जो तो आपल्या परीने घेत आहे. परंतु कोण कुठे जात आहे असे प्रत्येकास विचारले असता तो म्हणतो कि 'मी या संकल्पनेकडे जात आहे आणि पहा, बरेच लोक तर विपरित दिशांनी भरकटलेले आहेत.'
चालक (Drivers):
आपण कुठे चाललो आहोत, आपले वर्तन पुरोगामीत्व आहे कि प्रतिगामीत्व , हे कसे सिद्ध होते? कसे कळते? तर या गमनाचे अनेक चालक आहेत. कोणत्याही क्षणी समाजात मागे ओढणारे, मागे ओढले जाणारे, स्थिर, पुढे ओढले जाणारे, पुढे ओढणारे असे गमकांचे पाच प्रकार आढळतील. यात प्रत्येकच मी 'स्थिर वा पुढचा' असे म्हणेल. इतरत्र जाणारे अन्य या चर्चेच्या दृष्टीने महत्त्वाचे नाहीत. समाजातले जास्तीत जास्त लोक 'स्थिर' किंवा त्याच्या जवळच्या प्रकारात मोडतात आणि ते टोकाच्या ओढणारांचे युद्ध पाहतात किंवा काहीतरी बुळबुळीत पक्ष घेतात. पुढे जाणारांचेच बळ नेहमी जास्त असते हा भाबडा समज नको. निसर्ग तटस्थ असतो तेव्हा मानवसमाज सर्व दिशांना हिंदोळके खात असतो.
प्रवर्तके:
इथे कोणता व्यक्ति कोणत्या प्रकृतीचा बनणार हे कसे ठरते? माणसाची विचार करायची एक पद्धत आहे. तो अगोदर सगळा विचार करून मग जीवन जगायला चालू करत नाही. जीवनाप्रारंभी मला कमी गोष्टी माहीत होत्या म्हणून मला प्रत्येक गोष्टीत 'फार' किंवा 'फार वेळ' विचार करावा लागला असे स्मरत नाही. मोठ्या ढगाच्या आडून इवलासा चंद्र हळूहळू बाहेर येतो, तसे माणसाचे स्वतःचे असे विचार उशीरा आणि कमी विषयांवर बनतात. अन्यथा सारा संदर्भ बाकी समाजाचाच असतो. भावना आणि जाणिवा यांचे अनंत प्रकार, किती लोक भेटले, त्यांनी काय काय सांगीतले, कशा सुरात सांगीतले, काय घटना घडल्या, त्यांचे काय काय परिणाम काय झाले, काय पाहिले, काय ऐकले, काय वाचले, काय ठसवले गेले, काय स्वार्थाचे होते, इ. सर्व सूक्ष्मानंतांनी कर्षणाकर्षणाची कितीतरी बले बनतात. शेवटी हा प्रकार इतका जास्त होतो कि माणूस आपण कसे आहोत इतकेच लक्षात ठेवतो, आपण तसे का आहोत याची फार सखोल उत्तरे देऊ शकत नाही. जी उत्तरे माहीत आहेत तीच सखोल आहेत या भ्रमात राहतो.
माणसाचे स्वमत आणि वास्तव:
मनुष्य स्वतःकडे काही विशिष्ट चांगल्या किंवा वाईट मूल्यांची टोपली आहे असे समजतो. परंतु प्रत्येक वेळी त्यातली दोन काढून पैकी एकच निवडायला सांगीतले (elimination by option) तर शेवटी एकच मूल्य त्याच्याकडे शिल्लक राहते, तोच त्याचा सारांश. The resultant vector of all value led forces. हा सार कधी त्याला वरच्या आदर्श संकल्पनेकडे नेतो तर कधी विरुद्ध! वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे वागणे! वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे वागणे! त्यामुळे व्यक्ति पुरोगामी कि प्रतिगामी असा काळा पांढरा करता येत नाही. परंतु स्वतःच्या दिशितावस्थेबद्दल त्याचे फार अढळ मत असते. पाठी एकमेकांकडे करून 'स्थिर' लोकांना आपल्याकडे ओढण्यापेक्षा वास्तवात टोकाच्या लोकांचा डोळ्यास डोळे भिडवून युद्ध करण्याचाच पावित्रा जास्त असतो. या युद्धाचे मानसिक सुख सर्वांना आदर्श संकल्पनेकडे नेण्यापेक्षा जास्त मिळत असावे का?
आदर्श संकल्पनेची अव्यवहार्यता:
स्वातंत्र, समता हे आदर्श स्थितीचे पहिले निकष आहेत. आदर आणि प्रेम हे त्यानंतरचे दोन आहेत. वरची आदर्श संकल्पना मांडतानाची मूळ समस्या ही आहे कि या चार संकल्पना आणि त्यांचे सर्व उपप्रकार सर्वत्र आणि सर्वांना लावले तर ते infeasible बनतात. उदाहरणार्थ समता ही कल्पना घेऊ. वास्तविक पाहता २६ जानेवारी १९५२ पासून भारतात सर्वांना दिलेली समता, तिचा काहीच अर्थ नाही. प्रारंभीच्या क्षणालाच इतकी विषमता होती कि नंतर कितीही समता राखली तर हवी तशी स्थिती येत नाही. चला, मानून चलू कि आपल्या सगळ्या प्रयत्नांना यश येऊन समता येणार आहे. संपत्तीची समता घ्या. संपत्ती दरडोई समान असावी कि संपत्ती उत्पन्न करण्याच्या क्षमतेच्या प्रमाणात असावी? बरे, ते कसे मोजणार ? आणि समजा काही ठरलेच तर, प्रत्येकदा जेव्हा अधिकची संपत्ती निर्माण होते, जूनी नष्ट होते, depreciate होते, इ, इ , तेव्हा मोजणार कोण आणि कसे? वितरण कसे करणार? त्याची नियमावली बनवायला गेलो तर लक्षात येईल कि हे सगळे अव्यवहार्य आहे. समता सर्व गोष्टींना आणि पूर्णतः लावणे महाकठीण, अशक्य!
यापुढे जाऊन स्वातंत्र्य आणि समतेचा किस पाडायला गेलो तर त्या परस्परविरोधी संकल्पना निघतात. तसेच प्रेम आणि आदराचेही. तेही सूक्ष्मात नेले तर परपस्परविरोधीच! मी आपल्याला प्रेमाने एकेरी संबोधले तर मी आपल्याला आदर दिला नाही असे आपल्याला वाटणे हे याचे उदाहरण म्हणून सांगता येईल.
व्यवहार्य पुरोगामीत्वाच्या सीमारेषा:
ही अव्यवहार्यता टाळायची असेल तर 'पुरोगत स्थितीच्या' किमान या चार मानकांना व्यवहार्य सीमा घालून देणे गरजेचे आहे. म्हणजे किती समानता पाळायची, किती स्वातंत्र्य द्यायचे हे ठरवायचे, इ. अर्थात ही सीमा प्रत्येकाने ठरवली तर वेगवेगळी निघेल आणि संघर्ष होईल. म्हणून ही सीमा अधिकृत आणि सक्षम अश्या संस्थेने बनवली पाहिजे. ती कालामानाप्रमाणे बदलली पाहिजे.
सद्यस्थिती:
आज ज्ञानाच्या प्रत्येक शाखेचा वेगळा असा विस्तार आहे. प्रत्येक शाखेची प्रगती वेगळ्या प्रमाणात झाली आहे आणि वेगळया गतीने होत आहे. ज्ञानाच्या प्रत्येक शाखेचा माणसाच्या जीवनात खूप सहभाग आहे आणि माणसाला जे नवे निर्णय घ्यायचे आहेत त्यातला प्रत्येकात कितीतरी शाखांचा समावेश होतो. घर घ्यायचे असेल इंजिनिअरींग, बँकिंग, इ इ कितीतरी गोष्टींचे ज्ञान लागेल. त्यात काय काय करावे व काय काय करू नये यांची 'एकत्र' सामाजिक किंवा सरकारी पोझिशन कुठेच मिळणार नाही. पण एखाद्या माणसाने त्याच्या सामान्य ज्ञानाने सगळ्या गोष्टी केल्या तर २५ लोक तू हे का नाही केले आणि अजून २५ लोक तू हेच का केले म्हणून त्याला दोन्हीकडून धूणार. पैसे त्याचे, घर त्याचे, ० माणसांची मदत, ५० माणसांचा मार! ५००० वर्षांपासून जर civil engineering चालू आहे तर एका जन्मात एका घरासाठी मी किती तर्क चालवावा? किती विवेक लावावा? किती ज्ञान घ्यावे? किती जवळच्या नाजूक नात्यांशी भांडावे? ही सद्यस्थिती आहे. स्वार्थामुळे वाईट वागणारे बरेच लोक प्रतिगामीत्वाला बळावा देत असावेत, पण त्यांना द्यायच्या तीव्रतेचा मार सर्वांना मिळणे चूक आहे. त्यामुळे पुरोगामीत्वाबद्दल भय उत्पन्न होते. जे सहजाचरण आहे ते एक ओझे बनून जाते. काय, कसे करायचे करायचे ते सांगणार नाही पण चूकलास तर मार खाशील म्हणणारा गुरू कोणालाही नको असतो ना?
नाविन्य आणि परंपरांची भूमिका:
नाविन्य आणि पुरोगामीत्वाची गल्लत हे ही आजच्या काळाचे एक लक्षण आहे. हाय फाय मोबाईल घेऊन चालणारी, जीन्स घालणारी स्त्री भयंकर प्रतिगामी व्यक्ति असू शकते. तंत्रज्ञानाची नवी उत्पादने, त्यांचे नवे उपयोग आणि पुरोगामिता यांचा संबंध नाही. पुरोगामिता म्हणजे वरील संकल्पनेला ओळखण्याची आणि तिच्याकडे स्वतःला आणि इतरांना नेण्याची पात्रता. आणि या नेण्याचा अर्थ फरफटणे असा नसणे! परंपरागत मानवी मूल्यांचा त्याग हे ही पुरोगामीत्वाचे दुसरे लक्षण मानले जाते हे अजून एक दुर्दैव. काही पारंपारिक मूल्ये, असू शकते कि, त्या पुरोगत स्थितीशी अगोदरच एकदिक्त झालेली आहेत. शिवाय परंपरा अंध पण तरीही उपद्रवरहित असेल तरीही इतर मोठ्या समस्यांपेक्षा तिच्यावर खूप जास्त फोकस केला जातो.
विज्ञानाची दडपशाही:
विज्ञान पुराव्याने सगळे बोलते म्हणून वै़ज्ञानिक दृष्टीकोन असावा, ते मानावे असा एक आजकालचा युक्तिवाद आहे. विज्ञानाने मानवी मूल्यांशी निगडीत एकही विधान केलेले नाही, एकही शोध लावलेला नाही तरीही विज्ञानाचे नियम जबरदस्तीने मूल्यांना लावून वागण्याची वि़ज्ञानांधता बळावली आहे. काय नैसर्गिक आहे आणि काय 'विज्ञानाने शक्य असणार आहे' याचा विचार करायला लावून वि़ज्ञानाने माणसाला जास्त भ्रमित केले आहे. विज्ञान कळायला क्लिष्ट असूनही आणि माणसाची सगळ्या ज्ञानशाखांना समान विश्वासार्ह मानण्याची मूलभूत प्रवृत्ती असूनही विज्ञानाला जास्त मानावे अशी अपेक्षा केली जाते. शिवाय केवळ वि़ज्ञानाला १००% मानून जो रसभंग होतो तो एक महान मेगाक्लायमॅक्स असतो.
कायदा:
सध्याला महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाला आहे. ज्या ठार अंधश्रद्धा आहेत त्याच तिथे लिहिल्या आहेत. (तत्सम गुन्ह्यांना, जे निव्वळ अंधश्रद्धा नाहीत, सवते कायदे आहेत म्हणून या कायद्यातील गुन्ह्यांत अंध भाग नक्की काय आहे ते नीट कळते.) पण या कायद्याचा मसूदा केवळ ताटातलं मीठ आहे. इतर पक्वान्ने कधी मिळणार? ती कोण देणार? कधी देणार?
पुरोगामीत्वाचे मार्गदर्शक नियम, प्राधान्यानुसार :
माणसाच्या वर्तनाचे सगळेच कायदे, नियम, इ पक्के तर जीवन रटाळ होईल अशी भिती साहजिक आहे. पण हा युक्तिवाद एकाच नियमाने हरभर्याच्या पीठाचे मिश्रण बनवले तर सारे भजे नेहमी 'त्याच' आकाराचे बनतील असा आहे. मानवी मूल्यांचे, वर्तनांचे वैविध्य अफाट आहे, छोट्याश्या दिशादर्शनाने ते कमी होणार नाही. वैविध्याच्या नावाखाली प्रतिगामीतेला पाठबळ दिले जाते.
१. तत्त्व म्हणून स्वतःला पुरोगामी बनवणे थांबवावे.
२. पुरोगाम्यांचे अगोदरच मार्गदर्शन घ्यावे. नंतर त्यांना टीकेस मज्जाव करावा.
३. स्वतःची वैचारिक, प्रापंचिक मर्यादा स्वीकारावी.
४. आपले पुरोगामी असणे हे तज्ञांकडून तपासून घ्यावे.
५. विज्ञानाने पुराव्याने दिलेल्या कोणत्याही सत्यास खोटे मानू नये.
६. परंपरा निष्कारण सोडू नयेत.
७. सामाजिक नावीन्य , झेपले तर, पूर्णत: अंगिकारावे
८. स्वतःच्या आणि इतरांच्या प्रेम, आदर, स्वातंत्र्य आणि समता यांना बाधा आणतील असली सगळी मूल्ये त्यागावी.
९. स्वतःचे, पटलेले वेगळे विचार मांडावेत.
१०. व्यवहार्य असेल तर अशा विचारांनी काम करावे.
११. आर्थिक, मानसिक, शारीरिक, इ , इ स्पष्ट नुकसान करणार्या सगळया परंपरा पर्यायी नाविन्य उपलब्ध असेल तर त्यागाव्यात.
अर्थात ही यादी आणि प्राधान्य अचूक देण्याची एक सामान्य माणूस म्हणून माझी पात्रता नाही हे वेगळे सांगायची गरज नसावी.
वाचने
3394
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे
स्पष्टीकरणे
In reply to समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे by पैसा
स्पष्टपणे विचारमंथन करणारा लेख. बेहद्द आवडला!
बेहद्द
In reply to स्पष्टपणे विचारमंथन करणारा लेख. बेहद्द आवडला! by नरेंद्र गोळे
व्यवहार्य पुरोगामीत्वाच्या सीमारेषा
Inclusive Progressiveness
In reply to व्यवहार्य पुरोगामीत्वाच्या सीमारेषा by अर्धवटराव
नाहि पटलं.
In reply to Inclusive Progressiveness by arunjoshi123
आपल्या वैचारिक मतांतराचा मला
In reply to नाहि पटलं. by अर्धवटराव
सद्गतीत झालो आहे
In reply to व्यवहार्य पुरोगामीत्वाच्या सीमारेषा by अर्धवटराव
का?
गिरीजाजी,
In reply to का? by प्रसाद गोडबोले
ठेच
In reply to गिरीजाजी, by arunjoshi123
गिरीजाजी,
In reply to ठेच by प्रसाद गोडबोले
सहमत
In reply to का? by प्रसाद गोडबोले