Skip to main content

राशीमेलन

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 28/02/2013 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयावर पूर्वी कोणी लिहिले आहे की याची मला कल्पना नाही. हा विषय थोड्या खेळकर अंगाने मांडण्याची इच्छा आहे. एकूण राशी १२ - मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ, मीन एकूण ग्रह १२ - चंद्र, रवि, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लूटो (राहू व केतू हे ग्रह नसून छेदबिंदू आहेत किंवा प्लूटोला ग्रह मानले जात नाही या वादात मला पडायचे नाही) स्वतःच्या पत्रिकेत चंद्र ज्या राशीत असतो ती आपली जन्मरास समजली जाते व पत्रिकेतल्या पहिल्या स्थानात जी रास असते ती आपली लग्नरास असते. प्रत्येक माणसाच्या स्वभावावर बहुतेक जन्मराशीचा व काही प्रमाणात लग्नराशीचा प्रभाव असतो. राशीचा प्रभाव म्हणजे त्या राशीचा जो राशीस्वामी आहे त्या ग्रहाचा प्रभाव. प्रत्येक ग्रहाचे शत्रू व मित्र ठरलेले असतात. प्रत्येक ग्रहाच्या आवडत्या व नावडत्या राशी, उच्च व नीच राशी, मित्र राशी, स्वगृह राशी इ. ठरलेल्या असतात. त्यानुसार प्रत्येकाच्या स्वभावात त्या त्या ग्रहांची वैशिष्ट्ये दिसून येतात. चंद्र - चंद्र हा आल्हाददायक, शीतल असतो. परंतु त्याचा आकार रोज बदलताना दिसतो. चंद्र राशीस्वामी असलेली कर्क राशीची माणसे चंद्राप्रमाणेच शांत, देवभोळी व थोडीशी चंचल्/द्विधा मनस्थिती असलेली असतात. ही माणसे बुद्धीपेक्षा भावनेने निर्णय घेतात. 'गलिबल' किंवा सहज फसविता येईल अशी ही माणसे असतात. रवि - रवि राशीस्वामी असलेली सिंह राशीची माणसे काहीशी रागीट, स्पष्टवक्ती, सत्याची चाड असलेली असतात. मंगळ - हा ग्रह आक्रमक, बेधडक, काहीसा अविचारी समजला जातो. मेष व वृश्चिक राशींचा स्वामी मंगळ आहे. साहजिकच या राशी मंगळाप्रमाणेच असतात. पण वॄश्चिक रास ही आक्रमकतेपेक्षा डूख धरून सूड उगविणे, धारदार बोलणे यासाठी जास्त ओळखली जाते. बुध - बुध राशीस्वामी असलेल्या राशी २, मिथुन व कन्या. माणसाची वाणीवर बुधाची सत्ता आहे. मिथुन राशीची माणसे बुधाप्रमाणेच वादविवाद व चर्चेत अत्यंत पटाईत असतात. यांचा मुख्य दोष म्हणजे यांचे धारदार बोलणे. हे अतिशय जिव्हारी लागेल असे बोलून जातात. कन्या राशीची माणसे बोलण्यात शार्प असतात, पण मनातून भित्री असतात. गुरू - गुरू म्हणजे विद्वत्ता, ज्ञान व अध्यात्म. धनू व मीन राशींचा राशीस्वामी गुरू असतो. गुरूची आध्यात्मिकता मीन राशीत प्रकर्षाने दिसते. मीन राशीची माणसे अतिशय देवभोळी व आध्यात्मिक असतात. मनापासून देवपूजा करणे, जपजाप्य, पोथ्या वाचणे इ. गोष्टी या व्यक्ती मनापासून करतात. या व्यक्ती सरळमार्गी पण घाबरट असतात. धनू राशीची माणसे सत्यप्रिय असतात, पण मीन राशीइतकी देवभोळी नसतात. त्यांच्यात काहीशी आक्रमकता असते. शुक्र - हा रसिकतेचा ग्रह आहे. वृषभ व तूळ राशींचा हा स्वामी आहे. या दोन्ही राशींच्या व्यक्ती अतिशय रसिक व जीवनाचा आस्वाद घेणार्‍या असतात. अनेक कलाकारांची तूळ रास आढळते. भगवान श्रीकृष्णाची वृषभ रास होती. शनी - शनी म्हणजे कर्तव्यकठोरता, कष्ट, भावनांचा अभाव किंवा हृदयापेक्षा बुद्धीने निर्णय घेणे. मकर व कुंभ राशींच्या व्यक्ती शनीच्या अंमलाखाली येतात. कुंभ ही बुद्धीप्रामाण्यवादी, शास्त्रज्ञ, गणिती अशांची रास आहे. मकर ही अत्यंत कष्टाळू लोकांची रास आहे. या राशींची माणसे कधीही भावनेच्या भरात वाहवत जात नाहीत. मकर राशीची माणसे अतिशय ठाम निर्णय घेणारी असतात, पण कुंभ राशीच्या व्यक्ती काहीशा द्विधा मनस्थितीत असतात. याची अजून एक वर्गवारी करता येईल. मीन, कर्क, कन्या - निर्णयक्षमतेचा व नेतृत्वाचा अभाव वृषभ, तूळ, कुंभ, सिंह, धनू - संतुलित निर्णय घेण्याची क्षमता मेष, मिथुन, वृश्चिक, मकर - नेतृत्वगुण व बेधडक निर्णय घेण्याची क्षमता या पार्श्वभूमीवर कोणत्या दोन राशींच्या व्यक्तींनी एकमेकांशी लग्न करावे किंवा करू नये याचा अंदाज घेता येतो. आक्रमक किंवा बेधडक राशींच्या व्यक्तींनी कधीही समान गुण असलेल्या राशींच्या व्यक्तींशी लग्न करू नये. नाहीतर त्या दोघात कायमच संघर्ष सुरू असतो. तसेच सौम्य राशींनी आपापसात लग्न करू नये कारण कठीण प्रसंगी दोघेही गडबडून जातात. दोघातला एकजण बिनधास्त, धाडसी व दुसरा सौम्य असल्यास दोघांचे चांगले जमते. मेष राशीच्या व्यक्तींनी मेष, मिथुन, सिंह, वृश्चिक, मकर व कुंभ राशींच्या व्यक्तीशी लग्न करणे टाळावे. नाहीतर घरात बर्‍याचवेळा तलवारींचा खणखणाट व ठिणग्या उडताना दिसतील. मेष राशींच्या आक्रमक व्यक्तींनी विशेषत: कर्क, तूळ, मीन इ. सौम्य व आध्यात्मिक राशींचा जोडीदार निवडावा कारण या राशींचे पुरूष बरेचसे शांत असल्याने त्यांना मेष राशीची खमकी बायको मिळाल्यास त्यांच्या प्रपंचाची नौका भरकटत नाही कारण सुकाणू मेष जोडीदाराच्या हातात असते. वृषभ रास ही काहीशी बेधडक पण स्वभावाने अतिशय रसिक असते. जीवनातल्या अनेक गोष्टींचा आनंद घ्यायला यांना आवडते. नवीन ठिकाणे पाहणे, प्रवास, कला, शृंगार इ. यांच्या जिव्हाळ्याचे विषय असतात. यांना सर्वोत्कृष्ट जोडीदार असतो तो तूळ राशीचा. दोन्ही राशी शुक्राच्या आधिपत्याखाली असल्याने जीवनाचा मनमुराद आनंद लुटतात. यांनी मकर, सिंह या त्यांच्या तुलनेत काही प्रमाणात अरसिक असलेल्या राशींशी विवाह टाळावा. मिथुन - ही अतिशय धारदार बोलणारी रास असल्याने यांच्या अरे ला कारे ने उत्तर देणारा जोडीदार असेल तर रोज भांडणे होतील. हे टाळण्यासाठी यांनी सौम्य स्वभावाचा म्हणजे कर्क, तूळ, मीन इ. राशींचा जोडीदार निवडावा. कर्क - हे अतिशय भोळे, गलिबल, सरळमार्गी या प्रकारचे असतात. यांना मेष, धनू, सिंह, वृश्चिक अशा खमक्या राशीचा जोडीदार हवा. यांनी तूळ, मीन अशा सरळमार्गी व आध्यात्मिक राशीच्या जोडीदाराशी लग्न करू नये. कारण दोघेही जोडीदार शांत व भोळे असल्याने संकटात डगमगून जातात. सिंह - हे सरळमार्गी, संतापी, सत्यप्रिय, स्पष्टवक्ते असतात. लबाड्या, छक्केपंजे, फसवणूक यांना जमत नाही. यांनी मेष, वृश्चिक, मकर व कुंभ राशींशी विवाह टाळावा. कन्या - ही गरीब स्वभावाची रास आहे. कायम संशयी स्वभाव हे यांचे वैशिष्ट्य. यांनी कर्क, मीन, तूळ इ. राशींचा जोडीदार निवडू नये. तूळ - ही रास बरीचशी वृषभेप्रमाणेच असते. पण वृषभ ही जास्त बेधडक व कमी आध्यात्मिक असते. यांचे कोणत्याही राशीशी उत्तम जमते. वृश्चिक - आक्रमक व डूख धरून सूड उगविणारी रास. हे अतिशय दीर्घोद्योगीही असतात. यांनी मेष, सिंह, मकर व मेष या आक्रमक राशींच्या व्यक्तींशी विवाह टाळावा. धनू - सत्वगुणी पण काहीशी आक्रमक व समतोल माणसे या राशीत आढळतात. यांनी कोणत्याही राशीही लग्न केले तरी चालेल, पण मेष, वृश्चिक, मकर व कुंभ राशींशी यांचे खटके उडतील. मकर - दीर्घोद्योगी व कष्टाळू लोकांची रास. यांच्यात भावनेला फारसे महत्त्व नसते. काहीशी अरसिक, कर्तव्यकठोर माणसे या राशीत आढळतात. यांनी मेष, वृश्चिक, सिंह व कुंभ राशीशी विवाह टाळावा. कुंभ - बरीचशी मकरेप्रमाणे पण बुद्धिमान लोकांची रास. हे भावनाप्रधान असतात पण नेहमी निर्णय बुद्धीनेच घेतात. या राशीची माणसे अतिशय अहंकारी व तुसडी असतात. स्वतःला जरा जास्त शहाणे समजणार्‍या माणसांची ही रास आणि हा अहंकार बुद्धिमत्तेतून आलेला असतो. यांनी कोणाशीही लग्न केले तरी कायम स्वत:चाच वरचष्मा गाजवायचा प्रयत्न करतात. यांनी सुद्धा यांनी मेष, वृश्चिक, सिंह व कुंभ राशीशी विवाह टाळावा. नाहीतर घरात रोज भांडणे होतील. मीन - अतिशय सौम्य, देवभोळ्या व आध्यात्मिक लोकांची रास. यांच्यात अजिबात आक्रमतता नसते. हे जगाला घाबरूनच असतात. यांना एखाद्या आक्रमक राशीचा खमका जोडीदार पाहिजे. यांनी मीन व कर्क राशींचा जोडीदार कधीही निवडू नये. इतर कोणत्याही राशीचा चालेल. हे अतिशय आनंदाने आपल्या जोडीदाराचा वरचष्मा सहन करतात व स्वखुषीने आपल्या जोडीदाराच्या मुठीत राहतात.

वाचने 59993
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

हे जल राशीचे (कर्क, वृश्चिक, मीन) लोक कमालीचे भावनाप्रधान असतात बुवा. कंटाळा येतो त्यांच्या रुसव्याफुगव्याचा. ते वायु रासवाले (मिथुन, तूळ, कुंभ) मस्त ..... एका कानाने ऐकतात, दुसर्‍याने सोडून देतात, काय रुसणं नाय न फुगणं नाय. आपल्याला वायु रास फार आवडते.

In reply to by शुचि

वायु रासवाले (मिथुन, तूळ, कुंभ) मस्त ..... एका कानाने ऐकतात, दुसर्‍याने सोडून देतात, काय रुसणं नाय न फुगणं नाय.
धन्यवाद धन्यवाद. माझ्या तूळ राशीचं लैच कौतीक चाललय बाबा. ते पण चक्क साडेसातीत सुध्दा. मज्जाय :)

In reply to by शुचि

>>आपल्याला वायु रास फार आवडते. यांची आणखी एक खासियत ऐकली होती. वायुतत्त्वाच्या राशीची माणसं बातम्या पण वार्‍यासारख्या पसरवतात. त्यामुळे एखादी बातमी आपल्याला पसरवायची तर आहे, पण ती आपल्या तोंडून सांगायची नाहीये अशी बातमी या तत्त्वाच्या राशीवाल्या मंडळींना सांगावी. वर 'कुणाला सांगू नकोस बरं का !!' असं ही सांगावं. काही दिवसात ती बातमी बर्‍यापैकी पसरलेली असते. या गोष्टीचा एक दोनदा अनुभवही घेतलेला आहे!! मजा येते. ;)

In reply to by शुचि

कर्क व मीन राशीत बरेच साम्य आहे. पण काही फरक देखील आहेत. दोन्ही राशी सौम्य, धार्मिक, भिडस्त, दुसर्‍याला चाकोरीबाहेर जाऊन मदत करणार्‍या, फारसे नेतृत्वगुण़ नसलेल्या अशा असतात. पण कर्क रास मीनेच्या तुलनेत खूप भोळी असते. या राशीचे लोक दुसर्‍यांवर डोळे झाकून विश्वास ठेवतात व सहज फसविले जातात. याउलट मीन राशीचे लोक समजूनउमजून फसवून घेतात. समोरचा माणूस आपल्याशी खोटे बोलत आहे किंवा फसवित आहे हे मीनवाल्यांच्या यांच्या सहज लक्षात येते, पण तरीसुद्धा समोराच्या माणसाची कीव येऊन हे त्याच्या म्हणण्याप्रमाणे करतात. एखादी व्यक्ती उधार दिलेले पैसे अजिबात मिळण्याची शक्यता नाही हे यांच्या लक्षात येउनसुद्धा हे त्या व्यक्तिला आर्थिक मदत करतात. हीच व्यक्ती कर्क राशीकडे उधार मागते तेव्हा ही व्यक्ती खरंच गरजू आहे व ती व्यक्ती नक्की आपले पैसे परत करेल या विश्वासावर कर्क व्यक्ती डोळे झाकून त्या व्यक्तीला मदत करतात.

कोणाला कषाचं न बोडकीला केसाचं =))

हे लोक वर्तमान पत्रात राशीभविष्य छापतात्,ते भविष्य त्याच राशीच्या लाखो करोडो लोकांना लागु कसे काय पडते, उदा,कुंभ आज तुम्हाला अचानक धनलाभाचा योग आहे,मग सगळ्या कुंभ राशीवाल्यांना लॉटरी लागेल काय्?उत्तर हवे आहे धाग्याकर्त्याकडुन

In reply to by श्री गावसेना प्रमुख

मी काही काळ वर्तमानपत्रात काम केले आहे. विश्वास ठेवा दैनिक आणि साप्ताहिक भविष्य हे बदलून बदलून च्ापले जातात. म्हणजे आज जे मेष ला आहे ते उद्या कुंभ मध्ये छापले जाते. दैनिकमधले भविष्या वाचून जो माणूस आपला दिवस सुरू करतो तो सगळ्यात महमूर्ख इसम

आपण ब्वॉ "ईथून तिथून मिथून"