राष्ट्रपती - इंग्रजी संज्ञांचे भारतियीकरण
राष्ट्रपिता या संबोधनामुळे अंमळ हळवेपण आल्याचे कांही ठिकाणी दिसून आले. या निमित्ताने राष्ट्रपती या संबोधनाबद्दल ज्ञानात भर पडावी असे वाटतेय. मूळ शब्द शोधण्यासाठी इंग्रजीचा आधार घ्यावा लागत असल्याने तसे केले. त्या शब्दास अध्यक्ष असे म्हणत असावेत अशी एक शंका मनात येऊन गेली. जर प्रेसिडेण्ट = ....पती हे बरोबर असेल तर घराघरातून अध्यक्षमहाराज, जेवायला चला असा हाकारा ऐकू यायला काहीच हरकत नाही. इकडून तिकडून पेक्षा आमचे अध्यक्ष आज दुचाकीवरून मार्गस्थ झाले हे म्हणायला आणि ऐकायलाही सुटसुटीत वाटते. असो.
मुद्दा असा, प्रेसिडेण्ट म्हणजे पती असे भाषांतर कुणी केले असावे ? सरकार दरबारी त्यास मान्यता कशी मिळाली यावर चर्चा व्हावी हा प्रस्ताव ठेवला आहे. आपल्याकडे अस्तित्वात नसलेल्या बाबींना इंग्रजी प्रतिशब्द नसताना अनेक इंग्रजी शब्दांचे अट्टाहासाने केलेले भाषांतर आजही कालसुसंगत ठरावे का ? चेंडू हा शब्द अस्तित्वात असल्याने त्या शब्दाच्या वापराबाबत शंका नाही पण क्रिकेट हा खेळच परकीय असताना विकेट या संपूर्ण नव्या प्रकारासाठी यष्टी सारखे शब्द योजणे, रूजवणे हा अट्टाहास देखील योग्यच आहे का ?
( या विषयावर आधीच चर्चा झालेली असल्यास ती शोधण्याचा प्रयत्न केला. पण तसे न आढळल्याने प्रस्ताव ठेविला ऐसे )
वाचन
4688
प्रतिक्रिया
21