Skip to main content

भारतीय प्रसिद्धी माध्यमांचा अप्रामाणिकपणा... आणि विश्वासार्हता

लेखक विकास यांनी शुक्रवार, 11/01/2013 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्ली मधील अत्यंत दुर्दैवी घटनेचे भारतातल्याच काय पण जगभरच्या प्रमुख माध्यमांनी प्रसारण केले आणि बहुतांशी ते योग्यच पद्धतीने केले. पण जस जसे मूळ बातमीचा जोर ओसरू लागला तस तसे भारतीय माध्यमांना राजकीय-सामाजीक नेत्यांमुळे खाद्य मिळू लागले. यात कोणत्या पक्षाची व्यक्ती काय म्हणाली या बद्दल बरेच लिहीता येईल. मात्र माध्यमांचा वादग्रस्त सहभाग हा त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालक मोहनजी भागवत यांना ज्या पद्धतीने गोवले त्यावरून झाला आहे... आता सर्वप्रथम, सर्वांना संघाचे कार्य, ध्येय-उद्दीष्ट, मान्य असायला हवे वगैरे म्हणणे नाही हे स्पष्ट करतो. येथे मुद्दा संघ आणि सरसंघाचालकांपेक्षा माध्यमे ही कुठल्या स्तरापर्यंत जाऊ शकतात या संदर्भात आहे. तर झाले असे. सर्वप्रथम, सिल्चर आसाम मधे एका निमंत्रितांच्या सभेत दिल्ली प्रकरणावरून कोणीतरी, "इंडीया मधे स्त्रीयांवरील वाढत्या अत्याचारावरून" प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना सरसंघचालक म्हणाले की, हे "इंडीया मधे होते भारतात नाही..." भारत - इंडीया या दोन शब्दातून जे वेगवेगळे अ‍ॅटीट्यूड सांगायची पद्धत ही विशेष करून शेतकरी संघटनेच्या सुरवातीच्या काळात शरद जोशींनी नावरुपाला आणली होती. त्या संदर्भानेच त्यांचा मुख्य मुद्दा हा अ‍ॅटीट्यूड आणि अर्थातच सांस्कृतिक होता. त्यावर आणि त्याच्या विरोधात अनेकांनी मतप्रदर्शन केले. अर्थात प्रत्येकाची मते वेगळी असू शकतता, विश्लेषण वेगळे असू शकते त्यामुळे ते स्वातंत्र्य जबाबदारीने वापरल्यास काहीच आश्चर्यकारक नव्हते. पण मला वाटते त्यातून हवी तितकी प्रसिद्धी देता आली नसावी... त्यातून पुढचे अतिशय अप्रामाणिक प्रकरण घडले. प्रसंग होता स्वामी परमानंदांच्या योग विद्यापिठाचे इंदूर येथे उद्घाटन. तेथे मोहनजी हे भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीतील फरक सांगत होते. तो सांगत असताना, त्यांनी मनुष्य कसा स्वार्थी होत गेला आणि theory of social contract कशी अस्तित्वात आली ज्यात लग्न देखील एक काँट्रॅक्ट समजले गेले, पतीने खाण्यापिण्याची (बाहेरील काम - पैसे) व्यवस्था करायची आणि पत्नीने घरातले सांभाळायचे. आणि मग हे काँट्रॅक्ट पती अथवा पत्नीने पुर्ण केले नाही तर द्या त्यांना सोडून... पण भारतीय पद्धतीत असे नसते, असे म्हणत त्यांनी मग भारतीय तत्वज्ञान आणि त्याचा व्यावहारीक उपयोग या संदर्भात उहापोह केला. आता वरील परीच्छेदातले मुद्दे कोणाला मान्य होतील कोणाला होणार नाहीत. तो मुद्दा नाही. त्यावर तात्विक चर्चा झाली तरी त्यात अयोग्य काहीच नाही... पण लग्न हे काँट्रॅक्ट धरणे आणि त्यात पती-पत्नीने काय करणे हे (कॉट्रॅक्च्युअली) ठरवणे ही पाश्चत्या पद्धत आहे असे भागवतजींचे स्पष्ट म्हणणे होते आणि तसे ते म्हणले होते. पण माध्यमांनी काय करावे? त्या मुद्यावर तात्विक वाद न घालता, "Women should be just housewives and men the earning members, says RSS chief " असले सवंग मथळे देत बातम्या दिल्या त्यावर चर्चा आणि ट्विटरवरील टिवटिव केली... पुर्वीच्या जमान्यात हे खपून गेले असते. पण आता युट्यूबर वर ते भाषण उपलब्ध आहे आणि तसेच सोशल मेडीयामुळे त्यावर आवाज उठवता येऊ शकतो आणि तेच झाले. संघाच्या अधिकार्‍यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींच्या त्यांची चूक लक्षात आणून दिली... त्यावर मग ट्विटरवर खालील प्रमाणे माफी मागितली गेली: Sagarika Ghose says sorry Chetan Bhagat apology Pierre Fitter of India Today Pierre Fitter of India Today मात्र एक गंमत अशी आहे की हे सर्व ट्विटरवरच झाले... या माध्यमांनी अथवा त्यांच्या संकेतस्थळांनी काहीच बदल केले नाहीत. या संदर्भात खालील संवाद वाचनीय आहे: Media misleads ज्या माणसाने ही खोटी बातमी तयार केली, त्याला म्हणे नोकरीवरून काढून टाकण्यात आले पण याच खोट्या आणि चुकीच्या बातम्यांचा संदर्भ घेत मराठी आणि मला खात्री आहे इतर भाषिक वृत्तपत्रांनी देखील टिकास्त्र सोडले आहे. ही केवळ एकच प्रकाशात आलेली घटना आहे. अशा अनेक, अनेकांबाबत असू शकतात. प्रसिद्धी माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ समजले जाते कारण त्यांचे तसे कर्तव्य असते आणि अनेक ठिकाणि (भारतात आणि इतरत्र) तसे त्यांचे कार्य देखील आहे. पाश्चात्य देशात अशी चुक झाली असती तर माध्यमांनी जाहीर माफी मागितली असती आणि दुरुस्ती केली असती. पण तसे ना धड भारतात होत आहे ना धड इंडीयात... अशा या अप्रामाणिक माध्यमांनी केलेल्या कुठल्याही सामाजिक विषयावरील तात्विक विश्लेषणावर विश्वास कसा ठेवावा?

वाचने 51309
प्रतिक्रिया 160

प्रतिक्रिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>> पुरोगामी सदस्य येथे बरेच वावरतात असे कळले सहमत नसाल तर इंटरनेट हिंदु म्हणुन हीणवलेले चालते आणि जंत झाल्यासारखे विचार प्रसवणार्‍यांना विचारजंत म्हणलं तर बर नाही. ;-) एक तर चर्चाप्रस्तावाशी संबधीत मते द्यायची नाहित आणि बर्‍याचवेळा इतरांनी समजावलं तरी वागळेसारख किंवा घोष बाईंसारख आपलाच हेका चालु ठेवायचा मग इथे चालत नाही म्हणुन मग तिथे धागा काढायचा की झाले पुरोगामी. >> हो. पण कोणा एका विषयासंदर्भात 'हो' म्हणत नाही. सर्वसामान्य कोणत्याही विषयांवर माध्यमांचा अप्रामाणिकपणा दिसतो. तुम्ही संदिग्ध "हो" म्हणलात असुदे पण हो तरि म्हणलात पण स्वतःला संस्कारी पुरोगामी म्हणणार्यांकडुन तेव्हढा "हो" पण धाग्यावर आला नाही, आल्या त्या फक्त वांझोट्या प्रतिक्रिया. असो... संघ दक्ष पोरींकडे लक्ष असे एकेकाळि मजेत हिणवणारा इंटरनेट हिंदु (चेतन)

एकंदर चर्चा विषयाला सोडून असलेली अवांतर चर्चा वाचून मौज वाटली. पूर्वग्रहपिडीत सहेतुक केलेले विनाकारण गरळ्बरळ अपेक्षित होते ती अपेक्षा पूर्ण झाली. मनोरंजन मस्त झाले. अधून मधून असे धागे आणि चर्चा झाल्या बरे वाटते. सध्या मिडीयाकडे आम्ही मनोरंजन म्हणूनच पहातो.

तुमच्या चहा-पोह्यांचे पैसे किती झाले ते एकदा सांगा हो ! हे चहा- पोहे तुमच्या प्रतिसादात पूर्वीही डोकावले आहेत .. एकदाचे ते पैसे देऊन टाकू.. शक्य झाल्यास त्या अपराधाबद्दल स्वयंसेवकांना क्षमा करा. ( वास्तविक भारतातील माणसे आपल्याकडे आलेल्या आतिथींचे खाणे-पिणें असे जाहीररित्या काढत नाहीत कदाचित "इंडियातील" काढत असावेत आणि विक्षिप्त च म्हंट्ल्यावर सारे काही माफच !) आणि तुमची जी सकाळी सकाळी झोपमोड होऊन वेळ वाया गेला त्याबद्दल जाहीर माफी ! पण एक गोष्ट लक्षात येत नाही .. आपल्या तिर्थरुपांना आणि मातोश्रींना ही मंड्ळी वारंवार त्रास देतात हे या झाशीच्या राणीला ( सोरी , आमच्या भारतातील उपमा आहे ! ) पहिल्याच वेळी का लक्षात आले नाही ??? आले असेल तर पहिल्याच वेळी प्रतिवाद का केला नाही? प्रतिवाद केल्यावरही ती पुनःपुन्हा आले असतील तर पोलिसात तक्रार का केली नाही ? - (विक्षप्त नसलेला )विटेकर

सरसंघचालक श्री. मोहन भागवत जी वाक्ये बोललेच नाहीत ती वाक्ये ते बोलले आहेत असा कांगावा करून त्यांना विनाकारण झोडपून काढणार्‍या हेमंत देसाईंना धमक्यांचे फोन आले आहेत यावर कोण विश्वास ठेवणार आहे? त्यांनी मागच्या रविवार सकाळमध्ये सरसंघचालकांना झोडपून काढणारा लेख लिहिताना आपली संघद्वेषी मळमळ व्यक्त केली होती. त्याच्या लगेच दुसर्‍या दिवशी सोमवारी एका व्यक्तीने (नाव विसरलो) हेमंत देसाईंचे दावे पूर्णपणे खोडून काढणारा एक सविस्तर लेख लिहिला होता. त्या लेखाला उत्तर देण्याऐवजी, 'मला धमक्यांचे फोन आले', असा कांगावा देसाईंनी सुरू केलेला दिसतोय. तसे फोन खरंच आले असतील, तर देसाई पोलिसांकडे जायच्या ऐवजी प्रसिद्धीमाध्यमांकडे का गेले? असे फोन आले त्याला पुरावा काय? त्यांच्या लेखाचे पितळ उघडे पाडल्यावर ते का गप्प आहेत आणि त्या लेखाचा प्रतिवाद करण्याऐवजी 'मला धमक्या येत आहेत' असा सवंग कांगावा का करत आहेत?

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी आपण लिंक पुन्हा वाचली तर आपल्या लक्षात येईल की हेमंत देसाई यानी पोलिसांकडे तक्रार नोदवलि आहे. आणि सरसंघ संचालकांवर झालेली टीका कशी अयोग्य आणि चुकीची आहे हे दाखवून देण्यापेक्षा धमक्या देणे हे चुक नाही आहे का? संघाच्या लोकाणी धमक्या दिल्या असतील तर आपली भूमिका त्याचा निषेध करण्याचीच असेल ही अपेक्षा.

In reply to by पिंपातला उंदीर

"आणि सरसंघ संचालकांवर झालेली टीका कशी अयोग्य आणि चुकीची आहे हे दाखवून देण्यापेक्षा धमक्या देणे हे चुक नाही आहे का? संघाच्या लोकाणी धमक्या दिल्या असतील तर आपली भूमिका त्याचा निषेध करण्याचीच असेल ही अपेक्षा." सरसंघ संचालकांवर झालेली टीका कशी अयोग्य आणि चुकीची आहे हे अनेकांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. माध्यमातील काही जणांनी त्याबद्दल माफीही मागितली आहे. पण हेमंत देसाईंनी अजून स्वतःची चूक कबूल केलेली नाही. उलट "मला धमक्या आल्या" असा उलटाच कांगावा ते करत आहेत. कशावरून हेमंत देसाईंना धमक्या मिळाल्या? आणि आल्या असतील तर कशावरून त्या धमक्या संघाच्या लोकांनी दिल्या? ज्या व्यक्तीने सरसंघचालकांबद्दल खोटंनाटं लिहिलेलं आहे ती व्यक्ती आपला खोटेपणा उघडकीला आल्यावर त्याबद्दल जराही दिलगिरी व्यक्त न करता उलट "मला धमक्या आल्या" असे सांगते, अशा व्यक्तीवर कसा विश्वास ठेवायचा? संघाच्या लोकांनी धमक्या दिल्या असतील तर माझी भूमिका त्याचा निषेध करण्याचीच असेल. यापूर्वी गेली अनेक वर्षे संघावर अनेकांनी टीका केलेली आहे. त्यामुळे हेमंत देसाईंनी असे लेख लिहिणे यात काहीच नवीन नाही. पण संघ बहुतेकवेळा आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर देत नाही व आजवर संघाच्या लोकांनी धमक्या दिल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे हेमंत देसाई जे सांगतात त्यावर मुळीच विश्वास बसत नाही. हेमंत देसाईंचा लेख ज्या खोट्या वाक्यांवर आधारित होता तितकाच खोटेपणा त्यांच्या धमक्यांच्या दाव्यात असणार हे नक्की.

In reply to by श्रीगुरुजी

यापूर्वी गेली अनेक वर्षे संघावर अनेकांनी टीका केलेली आहे. त्यामुळे हेमंत देसाईंनी असे लेख लिहिणे यात काहीच नवीन नाही. पण संघ बहुतेकवेळा आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर देत नाही
सदर चर्चेस 149 प्रतिसाद आले आहेत. सर्वच प्रतिसाद हे संघावर टीका करणारे आहेत व संघाने प्रत्यक्ष किंवा संघप्रेमींच्या माध्यमातून त्याला उत्तर दिलेले नाही असे समजायचे काय? बाय द वे गृहमंत्री शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावर काही तासातच प्रत्युत्तर देऊन संघाने माफीची मागणी केली आहे. त्यामुळे संघ प्रत्युत्तर देत नाही किंवा थोडक्यात संघ स्थितप्रज्ञ आहे हा आपला दावा चुकीचा आहे. http://www.indianexpress.com/news/shinde-sees-terror-in-bjp-rss-camps-s…

In reply to by आजानुकर्ण

इथे स्वयंसेवक आहेत,आणी त्यांनी संघाच्यावतीन स्पष्टीकरण द्याव असे तुम्हाला म्हणायचे आहे काय

In reply to by श्रीगुरुजी

सकाळ मध्ये त्या लेखावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्यात. सकाळ मध्ये छापून आलेली प्रतिक्रिया डॉ.श्रीरंग गोडबोले यान्ची होती. तो मूळ लेख देतो आहे. खोटं न लिहिण्याचं काय घ्याल ? 'सकाळ' सारख्या वृत्तपत्रांतून आणि दूरदर्शनच्या अनेक वृत्तवाहिन्यांवर हेमंत देसाई 'तज्ञ' म्हणून नेमाने रतीब घालत असतात. त्यामुळे असेल कदाचित पण आपण सर्वज्ञ आहोत असा त्यांचा भ्रम झालेला दिसतो. 'इन्स्टण्ट पांडित्या'च्या या जमान्यात माहितीची शहानिशा करून घेण्याची त्यांना गरज वाटत नसावी. अन्यथा 'न बोलायचं काय घ्याल?' या आपल्या लेखात त्यांनी सरसंघचालक श्री.मोहनजी भागवत यांच्याविषयी मुक्ताफळे उधळली नसती. अकबरुद्दीन ओवैसी, गोपाल कांडा, अनीस उर-रहमान यांच्या पंक्तीत त्यांनी सरसंघचालकांना बसवून ठेवले आहे. मजकुराची लांबी -रुंदी आणि त्यांतील विखार लक्षात घेता सरसंघचालक हेच त्यांचे मुख्य लक्ष्य आहेत हे सहज लक्षात येते. लेखासोबत सगळ्यांचे सोडून सरसंघचालकांचेच छायाचित्र शीर्षभागी देण्यामागे 'सकाळ' ची भूमिकाही संदेहास्पद आहे असे खेदाने म्हणावे लागते. देसाईंचा लेख हा 'सकाळ'च्या परंपरेला काळीमा फासणारा आहे. सरसंघचालकांच्या दोन विधानांवर प्रसारमाध्यमांनी धुरळा उठवला त्यानंतर सरसंघचालकांच्या विधानांचा विपर्यास करण्यात आल्याचे आणि त्याबाबतची वस्तुस्थिती मांडणारे निवेदन संघाकडून प्रसिद्ध करण्यात आले. सरसंघचालकांचे मूळ भाषण कोणत्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे याची माहितीही देण्यात आली. सरसंघचालकांबाबत धादांत खोटा प्रचार करणार्या. प्रसारमाध्यमांनी या खुलाश्याला प्रसिद्धी दिली नाही. त्यामुळे हा दुष्प्रचार जाणीवपूर्वक करण्यात येतोय असा निष्कर्ष काढणे क्रमप्राप्त आहे. सरसंघचालकांचे भाषण कुठे उपलब्ध आहे या आशयाचे पत्र 'सकाळ' ने प्रसिद्ध केले. असे असताना हा खोटेपणा उगाळत बसण्यात देसाई आणि 'सकाळ' यांना काय स्वारस्य आहे? वारंवार खोटे बोलत राहिले की ते खरे वाटू लागते या गोबेल्सच्या तंत्रावर देसाईंचा दांडगा विश्वास असावा. त्यांनी सुतावरून नव्हे तर सुतावाचून 'सेक्युलर' स्वर्ग गाठला आहे. हे करत असताना त्यांनी जबाबदार पत्रकारितेच्या संकेतांचा भंग केला आहेच पण सरसंघचालकांबाबत अपशब्द वापरून हीन पातळीही गाठली आहे. "बलात्कार 'इंडिया'त होतात, 'भारता'त नव्हे" हे सरसंघचालकांचे विधान घेऊन स्त्रियांवरील अत्याचार सर्वाधिक प्रमाणात ग्रामीण नव्हे तर शहरी भागांत होतात असा त्याचा सोयीस्कर अर्थ देसाईंनी घेतला आहे. पण सरसंघचालक नेमके काय म्हणाले? सिल्चर (आसाम) येथे प्रबुद्ध नागरिकांशी झालेल्या वार्तालाप कार्यक्रमात सरसंघचालकांना महिलांवरील अत्याचाराबाबत प्रश्न विचारण्यात आला. 'इंडिया' मध्ये जे घडतंय ते धोकादायक आणि अश्लाघ्य आहे असे सरसंघचालक म्हणाले. परंतु, हे सर्व 'इंडिया'त होतंय, 'भारता'त नव्हे अशी त्यांनी पुस्ती जोडली. तथापि शहरी-ग्रामीण असा भेद त्यांच्या मनात नव्हता हे त्यांच्या नंतरच्या वाक्यांवरून पुरेसे स्पष्ट होते. जेथे भारताशी नाते तुटले आहे तेथे हे घडते असे ते म्हणाले. आपण मानवता विसरलो, संस्कार विसरलो. या गोष्टी पुस्तकांतून नव्हे तर परंपरेतून येतात, कुटुंबातील शिकवणुकीतून येतात हे त्यांनी स्पष्ट केले. परंतु, सरसंघचालक न बोललेले वाक्य बेधडक त्यांचे म्हणून खपवण्याचा उपद्व्याप करून देसाई यांनी कहर केला आहे. नवरा-बायको यांच्या संबंधांबाबत सरसंघचालकांनी केलेले वक्तव्ये पूर्णपणे खोट्या प्रकारे प्रस्तुत करण्यात आली. इंदोर येथे परमानंद योग थेरपी इस्पितळाच्या उद्घाटन समारंभात सरसंघचालक बोलत होते. साहजिकच त्यांचे भाषण अध्यात्मिक विचार मांडणारे होते. त्यांच्या भाषणाच्या संबंधित भागाचा सारांश पुढील प्रमाणे– “गेल्या ३०० वर्षात मनुष्य आपल्याच अहंकारात गुरफटून विचार करू लागला आहे. जे मी म्हणतो तेच सत्य. त्याचा अहंकार एवढा वाढला आहे की, परमेश्वर असेल तर त्याला माझ्या टेस्ट ट्यूब मध्ये सिद्ध करून दाखवावे लागेल, असे म्हणू लागला. अशात, तो विचार करू लागला की हे विश्व काय आहे? आत्मा परमात्मा या बेकार गोष्टी आहेत. सर्व काही जडाचा खेळ आहे… या सृष्टीत कोणाचा कोणाशी संबंध नाही. लाखो वर्षांपासून चालणारे हे जग संबंधांवर नाही तर स्वार्थावर चालते आहे. तो एक सौदा आहे. पत्नीशी पतीचा सौदा झाला आहे .तुम्ही त्याला (आपल्या येथे) विवाह संस्कार म्हणत असाल, परंतु तो (पाश्चात्यांसाठी) सौदा आहे. तू माझे घर सांभाळ, मला सुख दे, मी तुझ्या पोटापाण्याची व्यवस्था करतो आणि तुला सुरक्षित ठेवतो. जोपर्यंत पत्नी ठीक आहे तोपर्यंत पती करार रूपाने तिला ठेवतो. जर तिने करार पूर्ण केला नाही तर तिला सोडून देतो. काही कारणाने जर पतीने करार पूर्ण केला नाही तर त्याला सोडा व दुसरा करार शोधणारा शोधा". हा सगळा पाश्चात्य दृष्टीकोन सरसंघचालक मांडत होते आणि त्याचा फोलपणा सांगत होते. परंतु, ज्या विचाराचा ते धिक्कार करत होते ते विचार त्यांचेच आहेत असा खोटा प्रचार सुरू झाला. त्यानंतर ते काय बोलले त्याचे प्रसारमाध्यमांना सोयरसुतक नव्हतेच! त्यांच्या भाषणातील पुढील भाग असा, " या बाबतीत भारतीय विचार काय म्हणतात. ते म्हणतात, जग हे संबंधांवर आधारित आहे. वेगवेगळे दिसत असले तरी सगळे एक आहेत. असे म्हणा की एकच अनेक रुपात प्रकट झाला आहे. त्या दृष्टीने सगळे एकमेकांपासून वेगळे आहेत. विश्वात कुठेही घडणारी अर्थहीन घटनाही साऱ्या विश्वाच्या व्यापारावर काही ना काही परिणाम करत असते. चांगल्या गोष्टी घडल्या तर चांगले परिणाम होतील. अन्यथा नाही. कोणाचा विनाश होत असेल तर तो तुमचाही विनाश आहे. तुम्ही त्याच्याशी जोडलेले आहात. तुम्ही मनुष्य आहात कोणी सृष्टीच्या बाहेरील नाही. " अध्यात्माधारित भारतीय विचार जोडणारा आहे हे त्यांचे प्रतिपादनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. 'इलेक्ट्रोनिक मीडिया' मुळे काही राजकारणी मंडळींना चळ लागला आहे असे देसाई म्हणतात. ते काहीही असले तरी ‘मिडीया’ ला आलेल्या अवास्तव महत्त्वामुळे देसाई यांच्यासारख्या पत्रपंडितांना मात्र सुगीचे दिवस आले आहेत हे निश्चित. 'सकाळ' ने हा खुलासा छापावा ही विनंती. आमच्या भावना दुखावल्या म्हणून नव्हे तर खोटा मजकूर प्रसृत केला म्हणून. डॉ. श्रीरंग अरविंद गोडबोले

In reply to by विटेकर

डॉ. गोडबोलेंचा लेख एकदम उत्तम. टु द पॉइंट आणि मुद्देसूद.इथे दिल्याबद्दल धन्यवाद. सकाळची जी काय परंपरा होती ती परुळेकरांबरोबरच संपली. :( संघाल आंधळेपणे दोष देणे हा अजेंडा असणार्‍यांना संघाचं चांगलं काम कधी दिसत नाही का? त्याबद्दल अशांपैकी कोणी चांगलं बोलत नाही? मूल्यमापन करायचं आहे तर ते वस्तुनिष्ठपणे करावं, नुसतीच गरळ ओकण्यात काय साध्य होतं?

In reply to by विटेकर

गोडबोले यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे की "
जेथे भारताशी नाते तुटले आहे तेथे हे घडते असे ते म्हणाले.
" मात्र विकास यांनी प्रतिसादात दिलेल्या दुव्यात मोहन भागवत यांचे संपूर्ण भाषण आहे (दुवा) तेथे खालील वाक्य लिहिले आहे.
इंडिया में जो यह घट रहा है, बढ़ रहा है वह बहुत खतरनाक और अश्लाघ्य है। लेकिन ये भारत में नहीं है। यह इंडिया में है। जहां इंडिया नहीं है, केवल भारत है वहां ये बातें नही होती, आज भी। जिसने भारत से नाता तोड़ा उसका यह हुआ
ज्या घटनेसंदर्भात भागवत यांनी प्रतिक्रिया दिली त्याला भागवत यांचा कार्यकारणभाव कसा लावावा हे मला समलजलेले नाही. भागवत यांना बलात्कारित पीडित तरुणीबद्दल अनुकंपा आहे असे गृहित धरुन वरील वाक्य वाचले तर "जिसने भारतसे नाता तोडा उसका यह हुआ हे" मधून त्या तरुणीने भारतसे - किंवा भारतीय संस्कारांपासून आपले नाते तोडले होते असे ध्वनित होते. आजपर्यंत पेपरात वाचलेल्या बातम्यांनुसार त्या मुलीचे वर्तन कोणत्याही प्रकारे उच्छृंखल होते असे वाचनात आलेले नाही. त्यामुळे या वाक्याचा अर्थ लागत नाही. जर भागवत यांना बलात्कार करणाऱ्यांबबाबत हे वाक्य म्हणायचे होते तर त्यां गुन्हेगारांचे अजूनतरी काहीही वाईट झालेले नाही. त्या सर्वांमधील अधिक क्रूर असलेला अल्पवयीन मुलगा लहान वयामुळे वेगळ्या कोर्टात थातुरमातुर शिक्षा होऊन तीन चार वर्षात परत समाजात परत येईल असे दिसते आहे. भागवत यांच्या भाषणातील अधिक मोठा भोंगळपणा म्हणजे त्यांना अपेक्षित असलेली भारत आणि इंडिया यांची व्याख्या त्यांनी कुठेही सांगितलेली नाही (किंवा माझ्या वाचनात आलेली नाही). त्यामुळे जो-तो आपल्या मगदुराप्रमाणे अर्थ लावण्यास स्वतंत्र आहे. त्यामुळे अमुकतमुकच व्याख्या बरोबर व इतर व्याख्या चुकीच्या या मुद्द्यावर सर्वचजण योग्य आहेत व ते तसे भांडू शकतात.

श्रद्धास्थानाबद्दल वाट्टेल ते खोटेनाटे लिहावे हे लोकांनी खपवून घ्यावे ? त्यांना धमकी देण्याएवजी त्यांचा काय शनवार वाड्यावर सत्कार करावा अशी अपेक्षा होती का ?एवढे होऊनही यांनी अजून जाहीर माफि मागोतली नाही ! आणि तुम्हाला यांचा पुळ्का ? अन्य एखाद्या समाजाबद्द्ल जर ते असले काही बरळले असते तर तुम्हाला वैकुठावर टापशी बांधून डोळे पुसत जावे लागले असते !! धमकी देणे गैरच आहे पण लातोंके भूत बातोंसे नही मानते ! It is unwise to be wise with unwise people !

In reply to by विटेकर

भारतात निदान आजतरी सभ्य भाषेत हवे ते बोलता येते असे वाटते. किंबहुना अशा वागण्यावर एका माजी पंतप्रधानांनी शिस्तीच्या कारणास्तव काही वर्षे बंधने घातली असता 'आणीबाणी'च्या नावाने अनेकांनी शिमगा केला होता असे वाचल्याचे आठवते. हेमंत देसाई यांचे ते मत आहे. त्यांचे मत चुकीचे असू शकते किंवा बरोबर असू शकते पण त्यांना स्वतःचे मत असण्याचा हक्क आहे. अन्य समाजः अन्य समाजाबद्दल सामना या वृत्तपत्रातून दररोजच बरळलेले वाचायला मिळते. केवळ त्या कारणास्तव सामनाचे आजपर्यंतचे कोणत्याही पदाधिकाऱ्यांसाठी कोणीही वैकुंठावर टापशी पुसत गेलेले नाही.

धाग्याचे प्रतिसाद पाहीले. राजेश घासकडवी आणि विक्षिप्त्_अदिती यांचे प्रतिसाद नेहमीप्रमाणेच त्यांच्या बुद्धीचे तेज दाखवणारे आहेत. पण एक प्रश्न आहेच अदिती यांना भारतीय संस्कृतीचा इतका तिटकारा का !

In reply to by आशु जोग

अदिती यांना भारतीय संस्कृतीचा इतका तिटकारा का
अहो असा तिटकारा दाखविला नाही तर आपल्या बुध्दीचे तेज सिध्द कसे करता येईल?

In reply to by आशु जोग

भारतीय संस्कृती म्हणजे येक्षॅक्टली काय हे जरा स्पष्ट केल्यास केवळ आत्मपरिक्षण म्हणून मला असा तीटकारा आहे किंवा कसे हे ठरवण्यास मदत होइल असे वाटते.

In reply to by आशु जोग

आशू जोग, मूळ प्रश्नाचे उत्तर दिल्यास जास्त बरे, बाकी टीका वैयक्तीक म्हणून दुर्लक्षीत करतो आहे. अर्थात अशा वैयक्तीक टीकेवर उत्तर देवून वाद पुढे चालवण्याइतका वेळ नाही म्हणून..