मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एखाद्याची लायकी

सोत्रि · · काथ्याकूट
एखाद्याची लायकी म्हणजे काय? हा प्रश्न मला बर्‍याच दिवसांपासून पडला आहे. ही एखाद्याची लायकी नेमकी कशी सिद्ध होते आणि कोण सिद्ध करतो? म्हणजे मलातरी अजुन कळलेले नाही. खरेतर माझी स्वत:चीच लायकी अजुन सिद्ध झाली नसल्याने दुसर्‍याची लायकी काढायचा प्रश्नच उद्भवत नाही. एकदा पुण्यावरून मुंबैला येताना रात्री खूप उशीरा दादर स्टेशनवर, विरारला जाण्यासाठी, लोकलच्या तिकीट खिडकीवर तिकीट काढायच्या वेळी माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते. तिक़ीट देणारा क्लार्क सुट्या पैशांसाठी हुज्जत घालत होता. बाजूच्या कोपर्‍यात एक एटीम मशीन होते आणि तिथला वॉचमन त्या काउंटरवरच्या क्लार्कशी मी यायच्या आधि गप्पा मारत तिथेच उभा होता. तोही जरा गमजेतच होता. त्याने उगाचच, "वरती त्या पाटीवर सुट्टे पैसे द्यावे असे लिहीले आहे ते सुध्दा वाचता येत नाही लोकांना, दिसतात तर सुशिक्षीत" अशी कमेंट पास केली (हिंदीत). माझ्या अंगाचा तिळपापड झाला. आधिच रात्रीचे 12 वाजत आले होते, प्रवासाने शिणलो होतो. त्यात त्याचा हा अगोचरपणा, माझा तोल गेला आणि मीही त्याला 'अबे XXX औकात मे रेह, समझा ना' वैगरे बोलून गेलो. नंतर कसेबसे तिक़ीट घेतले सुट्ट्या पैशावर पाणी सोडून. पण गाडीत बसल्यावर, थंड हवा लागल्यावर जरा शांत झालो आणि त्या वॉचमनला बोललेलं माझ वाक्य मला आठवून मला पश्चाताप होऊ लागला. त्याची अशी लायकी काढायचा मला खरंच अधिकार होता का? तेव्हापासून काही प्रश्न आजतागायत पडले आहेत. 1. एखाद्याची अशी लायकी काढायचा मला अधिकार आहे का? 2. एखाद्याची अशी लायकी काढताना माझी स्वत:ची लायकी सिद्ध झाली आहे हे कसे सिद्ध होणार? 3. एखाद्याला असेल स्वत:बद्दल पराकोटीचा अभिमान म्हणून मला त्याची लायकी काढायचा अधिकार प्राप्त होतो का? 4. असेल एखाद्याचे तोंड फाटके तर लगेच मलाही जीभ टाळ्याला लावून लगेच त्याची लायकी काढायचा अधिकार प्राप्त होतो का? ह्या प्रश्नांची उत्तरे इथे लायक असणार्‍यांकडून मिळतील अशी आशा आज जागृत झाल्यामुळेच हा काथ्याकूट...

वाचन 25622 प्रतिक्रिया 0