Skip to main content

संस्कार

लेखक मराठे यांनी शुक्रवार, 24/08/2012 या दिवशी प्रकाशित केले.
परवा घडलेल्या एका प्रसंगानं डोक्यात ठाण मांडून ठेवलंय. त्यानंतर दररोज तो प्रसंग डोळ्यापुढे येऊन काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय म्हणून तुमच्यासमोर मांडतोय. बिल्डिंगमधून मी, माझा ८ वर्षाचा मुलगा आणि त्याची आजी असे बाहेर पडत होतो. मुलगा नेहमीप्रमाणे धावत सर्वात पुढे होता. बाहेर आल्या आल्या त्याला वर्तमान पत्रातून येणारी पत्रकं असतात तसला एक कागद (इथल्याच कुठल्यातरी बिजनेसच्या जाहिरातीचा) पडलेला दिसला. त्याने तो उचलला. मी पुढचा मागचा विचार न करता त्याच्या अंगावर ओरडलो "जमिनीवरचा कचरा कशा उचलतोस?" त्याची आज्जीपण त्याला समजावत म्हणाली "अरे असं जमिनीवर पडलेले कागद तू कशाला उचलतोस? तू टाकला नाहीस ना कागद, ज्याने टाकला तो उचलेल".. तो मला सांगायचा प्रयत्न करत होता की तो कागद उचलून जिथे पोस्ट बॉक्सेस असतात त्याच्याच खाली असली पत्रकं ठेवण्यासाठी जागा केलेली असते, तिथे तो टाकून देणार होता. पण वेळ निघून गेलेली होती. माझ्या ओरडण्यामुळे त्याने कागद खाली टाकून दिला आणि आम्ही पुढे गेलो. तसा अगदी साधाच प्रसंग. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात येणारा. पण बर्‍याचदा आपण त्याचा फार विचार करत नाही. नंतर पुन्हा जेव्हा ह्या प्रसंगाचा विचार डोक्यात आला तेव्हा मला वाटलं, की माझं चुकलंच. खरं तर तो जे करत होता ते बरोबर होतं. मी उगाच त्याने रस्त्यातला कचरा उचलू नये म्हणून त्याला ओरडलो. त्याने स्वतः कचरा करू नये हे जितकं खरं आहेत तितकंच जर जिथे काही चूक असेल तर त्या बाबतीत काहीतरी करून ती चूक सुधारणंही तितकंच जरूरी आहे. पण मला वाटतं आपल्या सगळ्यांवरच हे संस्कार होतात 'तू चूक करू नकोस .. पण जर दुसर्‍याने चूक केली असेल तर ती सुधारायला तूच एक उरला आहेस का?' आपणही नकळत हेच संस्कार आपल्या पुढच्या पिढीवर करतोय ? अशाने पुढची पिढीपण नाकर्तीच होणार! थोड्या व्यापक प्रमाणावर बघितलं तर समाजात सगळीकडेच चुका करणारे लोक असतात, नेत्यांपासून चपराशापर्यंत. पण त्या चुकांबद्धल काहीही न करता बहुतांशी लोक आपण बरं आणी आपला संसार बरा ह्याच मनोवृत्तीची का असतात? चूक करणारा चूक सुधारेल असा विचार केला तर त्या चूका कधीच सुधारल्या जाणार नाहीत. इथे 'चूक' हा शब्द मी 'जे जे काही बरोबर नाही' या अर्थी वापरतोय.. म्हणजे भ्रष्टाचारापासून आपल्याहून दुबळ्या लोकांना त्रास देणे किंवा अगदी सिग्नल तोडून जाण्यापर्यंत सगळंच! जे आपल्या अवती भवती नेहमी घडत असतात पण आपण त्याविषयी काहीच करत नाही. आणि हेच आपण आपल्या पुढच्या पिढीला तर शिकवत नाही का? (मला शब्दांत नीट मांडता आलेलं नाही हे मला समजतंय.. मिपाकर सांभाळून घेतील अशी खात्री आहे)

वाचने 4005
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

In reply to by नितिन थत्ते

लेख आवडला. वा! मी शेंगा खाल्या नाहीत हे उदाहरण प्रत्येक ठिकाणी लागू होतेच असे नाही. एकंदर वेगळा दृष्टीकोन असावा हे तत्व अधोरेखीत होते आहेच.

In reply to by सहज

मी शेंगा खाल्या नाहीत म्हणून छडी खाणार नाही हे ठीक आहे. टरफलं उचलायला हरकत नसावी.

बरोबर, आपणच असा विचार करून आपल्या मुलांना प्रोत्साहित करायला पाहिजे (म्हणजे अगदी झाडू हातात घेऊन सगळा परिसर सारखा स्वच्छ नव्हे, पण इथे म्हणल्याप्रमाणे जे सहज शक्य आहे ते, आणि तसेच इतर बाबतीतले... जसे की डावीकडे वळण्यासाठी सिग्नल असेल आणि लाल असेल तर थांबून रहाणे इ. आपले बघून एक-दोघा लोकांनी जरी हातभार लावला तरी चांगल्या गोष्टी वाढत जातील..)

In reply to by मी_आहे_ना

'सत्कर्मी रति वाढो' यासाठी स्वतः प्रयत्न करणे आणि मुलांना प्रोत्साहन देणे यानेच चांगल्या गोष्टी वाढत जातील.

पण वेळ निघून गेलेली होती.
चुकीची दुरुस्ती करायला कधीच वेळ निघून गेलेली नसते. जब जागो, वही सवेरा. मी सुद्धा नक्कीच मुलाला नक्कीच ओरडले असते पण त्याने आपण काय करतोय हे सांगितल्यावर त्याला लगेच सॉरी म्हणून कागद योग्य जागी ठेवून मगच पुढे गेले असते. आपल्या हातून कळत नकळत बरेचदा वेगवेगळ्या कारणांनी असं काही घडतं पण चूक लक्षात आल्यावर कबूल करण्यात काही कमीपणा नाही!

माझी लेक शाळेत सार्वजनिक स्वच्छतेबद्दल शिकुन आली. नंतर काही दिवसांनी शाळेतुन घरी येताना रस्त्यावर एक कागद पडलेला दिसला. घाईघाईने उचलुन घरी घेउन यायच्या तयारीत ! शेवटी तो कागद बाहेरच्या कचराकुंडीत टाकला अन " आपण केला तरच कचरा होतो म्हणुन लिटरींग करु नये" वगैरे सांगितलं. तरी " लिटरींग इज नॉट गुड फॉर द कम्युनिटी सो वी हॅव टु क्लीन" वगैरे चालुच. नशीब इथे भारतासारखी परीस्थिती नाही, नैतर पाठीला एक झाडु बांधुनच मला फिरावं लागलं असतं.

In reply to by शिल्पा ब

>>>>नशीब इथे भारतासारखी परीस्थिती नाही, नैतर पाठीला एक झाडु बांधुनच मला फिरावं लागलं असतं. अज्ञानात सुख असतं असं म्हणतात. असो.

नशीब इथे भारतासारखी परीस्थिती नाही, नैतर पाठीला एक झाडु बांधुनच मला फिरावं लागलं असतं.
पाठीला झाडु बांधून फिरणार्‍या भारतातील लोकांचे ऐतिहासिक उल्लेख आठवले. गहिवरलो. (दु:खी) गोपाळ

लेखन आवडले. मनापासून केलेले वाटले. एक प्रश्न पडला आहे.
नंतर पुन्हा जेव्हा ह्या प्रसंगाचा विचार डोक्यात आला तेव्हा मला वाटलं, की माझं चुकलंच. खरं तर तो जे करत होता ते बरोबर होतं. मी उगाच त्याने रस्त्यातला कचरा उचलू नये म्हणून त्याला ओरडलो
ते तुम्ही त्याला सांगितलेत का ? तुम्ही आपल्या कृतीवर विचार केलात आणि तुम्हाला चूक जाणवली ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यापुढे जाऊन ती चूक तुम्ही इथे कबुल केलीत. हे ही उत्तम केलेत. पुढची पायरी म्हणजे ती चूक त्याच्याजवळ कबुल करणे. ते प्रत्येकाला जमेलच असे नाही. केवळ कबुलीसाठी कबुली असे नाही, तर तुम्ही ओरडलात हे तुमच्या मुलाच्या लक्षात असेल, आणि पुढील वेळेस तो कचरा उचलणार नाही. तसे होऊ नये म्हणून :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

@विमे, मी त्याच रात्री त्याच्याशी बोललो. "तू करत होतास ते बरोबर होतं, पण पुढच्या वेळेला फक्त आधी मला विचार." असं त्याला समजावलं.