महाभारतातील व्यक्तिचित्रे-५ अर्जुन
महाधनुर्धर अर्जुन
महाभारतातील सर्वश्रेष्ठ धर्नुर्धर कोण ? भीष्मच. पण त्यांनी स्वत:च दुर्योधनाला सांगितल्याप्रमाणे " बाबा रे, मला हरविणारे या त्रिभुवनात कोणी नाही, पण आज मी वृद्ध झालो आहे व तरुण अर्जुनाकडे सर्व दिव्यास्त्रे आहेत. तेव्हा त्याच्या तोडीचा आज तरी कोणी दिसत नाही." हा एकच दाखला अर्जुनाचे अद्वितीय स्थान सिद्ध करतो. हे स्थान त्याने अपार मेहनत, एकाग्रता, गुरुनिष्ठा, इत्यादी गुणांनी मिळवले आहे लहानपणापासून धनुर्धारी व्हावयाचा ध्यास त्याने घेतला व गुरूकडून विद्या मिळवावयाची ठरवल्यावर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. अगदी पहिल्यांदी द्रोणांनी एकशे पाच जणांना गोळा करून विचारले " मी तुम्हाला विद्या दिल्यावर माझे एक काम आहे ते तुम्ही करणार का ?" एकट्या अर्जुनाने " हो " म्हटले. द्रोण सर्वांना पाणी आणावयास सांगतात पण सर्वांना लहान तोंडाचे कमंडलू व फक्त अश्वत्थाम्याला मोठ्या तोंडाचा. हे ध्यानात आल्यावर आपला कमंडलू वारुणास्त्राने भरून अर्जुन, द्रोण आपल्या मुलाला शिकवतात ते शिकू लागला. नदीत जलविहाराकरत्ता गेले असतांना मगरीने द्रोणांचा पाय पकडला. स्वत:ची सुटका करावयास सम्रर्थ असूनही द्रॊण " सोडवा, सोडवा " असे ओरडू लागले. इतर मुले गोंधळून इकडेतिकडे पळू लागली. फक्त अर्जुनाने बाण सोडून मगरीला मारले. रात्री अंधारात सरावाने घास तोंडातच जातो हे पाहून अर्जुन रात्रीचा अंधारात सराव करू लागला. हे सर्व पाहून व त्याची गुरुनिष्ठा पाहून द्रोणांचा तो लाडका शिष्य झाला व त्यांनी स्वत:च्या मुलाप्रमाणेच त्याला सर्व अस्त्रे दिली. भास पक्षाची गोष्ट सर्वांना माहित आहेच.
आज मला अर्जुनाच्या संग्रामांमधील कौशल्याबद्दल थोडक्यात सांगावयाचे आहे. द्रौपदी स्वयंवर, गोग्रहण, अठरा दिवसांचे युद्ध सगळ्यांना माहित असते.पण स्वर्गात इन्द्र व इतर देवतांकडून दिव्यास्त्रे मिळवल्यावर इंद्राच्या सांगण्यावरून त्याने निवातकवच व देवांनाही अजिंक्य असलेले पौलोम-कालकंज दैत्यांचा वध करून देवांना गुरुदक्षिणा दिली. हे सर्व विजय त्याने स्वत:चे धैर्य व आत्मविश्वास यांच्या जोरावर मिळवले. तो नेहमीच अपराजित राहिला का ? एका लढाईची माहिती पुढे आपण बघणार आहोतच पण आयुष्यातील शेवटची लढाई तो फार लज्जास्पद रीतीने हरला. सर्व यादव यादवीत एकमेकांशी लढून मेले, कृष्ण गेला, द्वारका बुडाली व मागे राहिल्या यादव स्त्रीया व लहान मुले. स्त्रीयांना घेऊन आणावयास अर्जुन गेला. असंख्य स्त्रीयांना घेऊन एकटा अर्जुन चालला आहे असे पाहून अभीर गुंडांनी त्याच्यावर हल्ला चढवला व ते स्त्रीयांना पळवून नेऊ लागले. ध्यानात घ्या, सैनिक नव्हेत, हातात लाठ्याकाठ्या असलेले गुंड ! रागावून त्यांच्यावर प्रतिहल्ला करावयास अर्जुनाने गांडिव धनुष्यास प्रत्यंचा चढवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला कळले की त्याच्या दंडातील ताकदच नाहिशी झाली आहे. महाप्रयासाने त्याने प्रत्यंचा चढवली खरी पण त्याला एकही अस्त्र आठवेना. त्याने नुसते बाण सोडून गुंडांना मारावयास सुरवात केली आणि आश्चर्य म्हणजे अक्षय भात्यातले बाणच संपले ! हताश अर्जुनाने आपल्या डोळ्यांनी ही पळवापळवी पाहिली व जमल्या तेव्हड्या स्त्रियांना घेऊन तो परतला. ही त्याची शेवटची लढाई.
गुणविशेष
नर ऋषीचा अवतार मानलेल्या अर्जुनावे वर्णन महाभारतात असे केले आहे :" ... अभिजात शोभा, शील, रूप, व्रत, दम, बल, वीर्य, प्रतिभा इत्यादिकांनी युक्त असलेला, ज्याच्या शरीरावर विद्या, ऐश्वर्य यांचे तेज झळकते, अतिशय शूर, क्षमाशील, अंत:करणाला मत्सराचा स्पर्शही नसलेला, बुद्धिमत्तेचे सर्व गुण असलेला, अहंकार नसलेला, आपल्याविषयी व आपल्या श्रेष्ठतेविषयी काहीही न बोलणारा, सर्वांना प्रिय वाटणारा..." आपण यांतील काहींची माहिती घेऊ.
इंद्रप्रस्थात असतांना एके रात्री एका ब्राह्मणाच्या गायी चोर चोरून नेऊ लागले. त्याच्या आरड्याओरड्याने अर्जुन जागा झाला व शस्त्रे आणावयास शस्त्रागारात गेला. त्याने तेथे धर्म व द्रौपदीला एकांतात पाहिले. शस्त्रे घेऊन त्याने चोरांना मारून ब्राह्मणाच्या गायी परत दिल्या. पांडवांत असे ठरले होते की एकाने दुसरा भाऊ व द्रौपदी यांना एकांतात पाहिले तर पहिल्यने बारा वर्षे वनवासात ( इंद्रप्रस्थाबाहेर) जावयाचे. युधिष्ठिराचा विरोध असतांनाही अर्जुनाने धर्माशी कपट करावयाचे नाकारले व तो बाहेर पडला. फ़िरतफ़िरत तो गंगेत स्नानाला गेला असतांना त्याच्यावर भाळून उलूपी नावाच्या नागकन्येने त्याला चक्क पळवून पाताळात नेले. तेथे तिच्या आर्त विनवणीवरून त्याने तिच्याशी विवाह केला व एक रात्र तेथे राहून सकाळी परत गंगाकाठी आला. नंतर तो मणिपूर राज्यात गेला असता तेथील राजकन्या चित्रांगदा त्याच्या दृष्टीस पडला. त्याचे मन तिच्यावर बसले व राजाकडे त्याने तिची मागणी केली. राजाने सांगितले की हिचा पहिला पुत्र वंशवृद्ध्यर्थ मला देणार असशील तर मला मान्य आहे. ते कबूल करून चित्रांगदेशी विवाह करून अर्जुन तेथे तीन वर्षे राहिला. तेथे बभ्रुवाहनाचा जन्म झाला. मुलाला व बायकोला तेथे ठेवून तो परत बाहेर पडला. नंतर प्रभासक्षेत्री त्याची व कृष्णाची गाठ पडली व दोघे द्वारकेला गेले. तेथे सुभद्रेच्या प्रेमात पडला.मग कृष्णाच्या संमतीने सुभद्राहरण करून त्याने सुभद्रेशी विवाह केला.
चतुराई
बारा वर्षे झाल्यावर आता इंद्रप्रस्थात परतावयाचे होते. आणि एक मोठा प्रश्न अर्जुनासमोर उभा राहिला. सुभद्रा व द्रौपदी यांची गाठ कशी घालून द्यावयाची ? मोठ्या चतुराईने सुभद्रेला गोपीवेष घालून त्याने द्रौपदीकडे पाठविली. अतिशय नम्रतेने तिने द्रौपदीला नमस्कार करून सांगितले, " माझे नाव भद्रा, मी आपली दासी आहे ". प्रसन्न झालेल्या द्रौपदीने उठून कृष्णभगिनीला आलिंगन दिले. दोघींचे प्रेम जुळलेले पाहून सर्वच आनंदित झाले. कुंतीचे नकुल-सहदेव यांवर प्रेम होते तसेच द्रौपदीचे अभिमन्युवर होते व " पांडवांना लढाई नको असेल तर अभिमन्युला पुढे करून माझे पाच पुत्र कौरवाशी लढतील, आईच्या अपमानाचा बदला ते घेतील " असे तिने आत्मविश्वासाने पांडवांना ठणकाविले !
शील
अर्जुनाने द्रौपदीशिवाय आणखी तीन विवाह केले म्हणून " हलकट, कामी इंद्राचा मुलगा " (तो दुसरे काय करणार) अशी टीका एका प्रतिसादात केली गेली. पण पुढील दोन उदाहरणांवरून उलटेच दृष्य समोर येते.
अर्जुन अस्त्रे संपादन करण्यासाठी स्वर्गात गेला असता एके दिवशी इंद्राच्या दरबारात अप्सरांचा नाच चालू होता. त्या वेळी अर्जुन उर्वशीकडे अनिमिष दृष्टीने पहात आहे असे इंद्राला दिसले. त्याचे मन उर्वशीवर गेले आहे अशा समजुतीने इंद्राने तिला रात्री अर्जुनाकडे जावयास सांगितले. तीलाही तेच पाहिजे होते. रात्री मोठा शृंगार करून ती अर्जुनाच्या महालात गेली. गोंधळलेल्या अर्जुनाने तिचे स्वागत करून " मी आपली काय सेवा करू ?" असा प्रश्न विचारला. त्यावर तिने येण्याचा उद्देश सांगितला. डोळे मिटून, कानावर हात ठेवून अर्जुन म्हणाला " छे,छे. ही पुरुरव्याची पत्नी, म्हणजे कुरुवंशाची जननी , असे मनात आल्याने, लहान मुलाने आईकडे पहावे, तसे मी तुमच्याकडे पहात होतो. पृथ्वीवर कुंती किंवा माद्री, स्वर्गात शची, तसे किंवा त्याहूनही जास्त मला आपण आईसारख्या अहात." उर्वशीने त्याला सांगण्याचा प्रयत्न केला की " पृथ्वीवरील नाती इथे लागू नाहीत. कुरुवंशातील तुझ्या पूर्वजांनी आमचा उपभोग घेतला आहे." पण अर्जुन काहीच ऐकावयास तयार नाही हे पाहिल्यावर संतापून तिने अर्जुनाला "तू षंढ होशील" असा शाप दिला. अर्जुनाने सकाळी इंद्राला सर्व प्रकार सांगितल्यावर त्याने तो शाप एका वर्षापुरता मर्यादित केला व " याचा उपयोग तुला अज्ञातवासात होईल" असे सांगितले.
दुसरा प्रसंग आहे विराटाला पांडवांची ओळख पटल्यानंतरचा. आपण पांडवांना दासासारखे वागवले व अर्जुनाने आपले राज्य वाचविले याबद्दल उतराई व्हावे म्हणून तो म्हणाला " आमच्या कुलाचा व कुरु कुलाचा विवाहसंबंध जुळून येवो. मी माझी मुलगी उत्तरा अर्जुनाला देतो." एक तरूण, सुंदर राजकन्या पदरात पडत असतांना अर्जुनाने उत्तर काय दिले बघा : तो म्हणतो " राजा, विवाहसंबंध जुळून यावेत हे उत्तमच. पण मी उत्तरेला पत्नी म्हणून स्विकारत नाही. ती माझी स्नुषा म्हणून मी तिला स्विकारतो. माझा मुलगा, कृष्णाचा भाचा, अभिमन्यु हा तुझ्या मुलीला योग्य वर आहे. तो तरुण, सुस्वरूप, थोर योद्धा आहे." विराटाने "असे का ?"
विचारल्यावर अर्जुन म्हणाला " राजा, तुझी मुलगी एक वर्ष माझ्याकडे शिक्षण घेत होती. आम्ही एकत्र अंत:पुरापासून सर्वत्र वावरत होतो. आता आमचे लग्न झाले तर लोक शंका घेतील. शिष्या म्हणजे मुलगी व मी स्नुषा व मुलीत फरक धरत नाही. उत्तरा माझी स्नुषाच होईल ". राजाने अनेक स्त्रीयांशी लग्ने करणे हा त्या काळी रिवाज होता. त्यावरून शील ठरत नाही. उर्वशीसारखी अप्सरा वा तरुण राजकन्या नाकारण्यात खरी परिक्षा आहे.
दूरदर्शीपणा
सर्वश्रेष्ठ धनुर्धर असूनही अर्जुनाच्या ठिकाणी विलक्षण दूरदर्शीपणा होता. पहिला नमुना तो व दुर्योधन कृष्णाकडे मदत मागावयास गेले तेव्हाचा. कृष्णाने मी लढणार नाही व दुसर्या बाजूला दहा हजार यादव लढवय्ये असा प्रस्ताव दिला. अर्जुनाने लगेच कृष्णाची निवड केली. दुर्योधन आनंदाने योद्धे घेऊन गेल्यावर कृष्णाने कारण विचारल्यावर अर्जुन म्हणाला, " मी सगळ्यांना जिंकू शकतो पण तू जेथे असशील तेथेच यश व कीर्ती जाणार, मला त्यांची इच्छा आहे." अर्जुनाची निवड किती अचुक होती हे युद्धातील कृष्णाच्या कामगिरीवरून लक्षात येते. दुसरा आहे अर्जुन अश्वमेध यज्ञानिमित्त अश्वाबरोबर हिंडत असतानाचा. त्याने तेथून युधिष्ठिराला निरोप पाठवला की अग्रपूजेच्या वेळी तंटा उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी. राजसूय यज्ञाच्या वेळी शिशुपालवध झाला होता. तसे काही घडू नये म्हणून ही काळजी. गंमत म्हणजे हा निरोप कृष्णाबरोबर पाठवलेला आहे !
अपार करुणा व मानवतावाद
एवढ्या युद्धांत लाखो माणसे मारावी लागली तरीही अर्जुनाचे हृदय करुणेने भरलेले होते. रात्री शिबीरात
पांडवपुत्रांची, पांचालांची हत्या करून अश्वत्थामा पळून गेला. द्रौपदीच्या आक्रोशाने भी्म त्याला मारावयास निघाला. अश्वत्थाम्याकडील ब्रह्मशिरस अस्त्रामुळे भीमाचा निभाव लागणार नाही हे माहीत असल्याने त्याच्यामागून कृष्ण-अर्जुन निघाले. अश्वत्थामा त्यांना बघून घाबरला व त्यने "पांडवांच्या नाशाकरिता : म्हणून अस्त्राचा प्रयोग केला. प्रतिकारार्थ अर्जुनाने त्याच अस्त्राचा प्रयोग केला पण प्रथम " अश्वत्थाम्याचे कल्याण असो " असे म्हणून "फक्त अस्त्र निवारणार्थ " अस्त्र टाकले. गुरुपुत्राबद्दलचे प्रेम व सर्वसंहारक विनाश नको म्हणून ही काळजी. नंतर नारद व व्यास यांच्या सांगण्यावरून त्याने अस्त्र मागेही घेतले. अश्वमेध यज्ञाच्या वेळी त्याने जास्तीतजास्त सामोपचाराने घेतले. त्याच्या इतर गुणांबद्दल लिहण्यासारखे बरेच आहे पण बभ्रुवाहनाची गोष्ट सांगून थांबूया.
अश्व मणिपूरच्या राज्यात आल्यावर बभ्रुवाहन नजराणा घेऊन वडिलांना भेटावयास आला. अर्जुनाला ते पसंत
पडले नाही. तो बभ्रुवाहनाला म्हणाला " मी घरगुती कामासाठी आलो नाही, क्षत्रीय राजा असा वागत नाही .क्षात्रधर्माप्रमाणे वाग." बभ्रुवाहन खट्टु झाला. नागकन्या उलूपीला हे सहन झाले नाही. जमीन फाडून ती वर आली व बभ्रुवाहनाला म्हणाली " बाळा, मी तुझी आई आहे. माझे ऐक. तुझ्या पित्याला क्षात्रधर्माची आवड आहे ना, मग लढ त्याच्याशी. तेणे करूनच तो तुझ्यावर संतुष्ट होईल." मातेचे उत्तेजन मिळाल्यावर महातेजस्वी बभ्रुवाहनाने लढाई करावयचे ठरविले व नंतर झालेल्या घनघोर युद्धात दोघांनी एकमेकांना पाडले. दोघे पडलेले पाहून चित्रांगदा उलूपीला म्हणाली " तू मुलाकडून पतीला मारवलेस व तरीही शोक करत नाहीस हे कसे ?.पुत्र मेल्याचा मला फर शोक नाही पण त्याने पतीचे असे आतिथ्य केले हे अतिशोककारक आहे ". इतक्यात निचेष्ट पडलेला बभ्रुवाहन जागा झाला व उलूपीला म्हणाला "मी पित्याचा वध केला याचे प्रायश्चित्त म्हणून मी आजच येथे प्राण देणार." उलूपी म्हणाली , " मुला, शोक सोड. तूच काय, जगातील कोणालाही हा जिष्णु अजिंक्य आहे. मी माझ्या मोहिनी मायेचा प्रयोग केला होता. ""अधर्माने भीष्मांना मारले याचे निरशन केल्याशिवाय पार्थाचा जीव गेला असता तर त्याला नरकात पडावे लागेल असे वसूंनी व गंगेने ठरविले होते. त्या पासून सुटका मिळावी म्हणून माझ्या पित्याने त्यांची प्रार्थना केली. तेव्हा ते म्हणाले, मणिपूरच्या तरुण राजाने याला जमीनीवर पाडले म्हणजे तो पापमुक्त होईल. आता हा मृतसंजीवनी मणि घे व तुझ्या पित्यच्या हृदयावर ठेव. म्हणजे पार्थ जिवंत झाल्याचे तुझ्या दृष्टीस पाडेल.
आणखी काही पात्रांची ओळख करून द्यावी अशी काही मित्रांनी विनंती केली आहे पण मी पडलो मुळचा कथेकरी बुवा. गोष्टी सांगावयाची आवड. लेख किती लिहणार हो ? श्री. अपर्णा अक्षय यांनी अचुकपणे सांगितल्याप्रमाणे "परिक्षेतील उत्तरपत्रिका " कशास लिहावयाच्या ? पण एक चांगली गोष्ट म्हणजे श्री मृत्युंजय
यांनी पुढील लेख लिहण्याचा मानस व्यक्त केला आहे. तेव्हा धर्म, दुर्योधन, भीम (व श्रीकृष्णही!) त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनातून वाचावयास मिळतीलच. हां, पण एक नक्की, कुणाला महाभारतातील गोष्टी ऐकावयाच्या असतील (उदा. जयद्रथ) तर सांगा, मला आवडेल.
शरद
याद्या
12768
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
धन्यवाद शरद'जी! बरीच नवीन
आभीर
In reply to धन्यवाद शरद'जी! बरीच नवीन by मृगनयनी
सर्वश्रेष्ठ
एक बाळबोध शंका...
>>या महाभारत कथांचं आजच्या
In reply to एक बाळबोध शंका... by धन्या
हा कसला प्रश्न आहे? त्या
In reply to >>या महाभारत कथांचं आजच्या by बॅटमॅन
>>किती छान उत्तर दिलंत माझ्या
In reply to हा कसला प्रश्न आहे? त्या by धन्या
>>>> रिनिभाकाघासं (रिकामटेकडे
In reply to हा कसला प्रश्न आहे? त्या by धन्या
आजच्या काळातलं प्रयोजन !!
In reply to एक बाळबोध शंका... by धन्या
वाह... असेच लेखन येउंदे...
सुंदर अभ्यासपूर्ण
एकाग्रता म्हणजे अर्जुन...
अतिशय सुंदर लेख. खूप आवडला.
लेख आवडला... पण... !!
सही!
In reply to लेख आवडला... पण... !! by अर्धवटराव
या वेळी नुसत पॉइंट तु पॉइंट न होता, छान झालय.
यात अजुन त्याला गांडिव कस
In reply to या वेळी नुसत पॉइंट तु पॉइंट न होता, छान झालय. by स्पंदना
लेख आवडला...
वाचनीय
हा ही भाग उत्तम जमला आहे.
मस्त लेख...
आशा करतो
अर्जुनाची फार छान ओळख करुन दिली आहे