Skip to main content

अग्नी ५

लेखक विसुनाना यांनी गुरुवार, 19/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या इतिहासात महत्त्वाचे ठरावे असे एक पाऊल डी.आर.डी.ओ.च्या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी टाकले आहे. आज सकाळी ८ वाजून ०७ मिनिटांनी भारताचे अग्नी -५ हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले गेले. जवळजवळ तीस मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर या क्षेपणास्त्राची ही पहिली चाचणी पूर्णपणे यशस्वी झाल्याचे या अभियानाचे निदेशक श्री. अविनाश चंदर यांनी जाहीर केले. डी. आर. डी. ओ. चे महानिदेशक श्री. व्ही. के. सारस्वत हेही या यशाबद्दल अत्यंत आनंदी होते. या प्रक्षेपणास्त्राबद्दल जास्त माहिती इतरत्र उपलब्ध आहेच. थोडक्यात सांगायचे तर आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या व्याख्येत पूर्णपणे बसत नसले तरी आंतरखंडीय क्षेपणास्त्राला लागणार्‍या सर्व तंत्रज्ञानाचा समावेश असलेले हे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. त्यामुळे भारताचा दबदबा जगाच्या पूर्व गोलार्धात तरी कायम झाला आहे. शिवाय अशी क्षमता असलेले भारत हे जगातले केवळ सहावे राष्ट्र बनले आहे. या प्रक्षेपणाची चलच्चित्रे येथे पाहता येतील/ उतरवून घेता येतील : http://drdo.gov.in/whatsnew/AGNI%20A5-01.wmv http://drdo.gov.in/whatsnew/AGNI%20A5-02.wmv या कार्यक्रमात डीआरडीओचे सुमारे ८०० शास्त्रज्ञ आणि भारतातील २०० वेगवेगळ्या कंपन्या सहभागी आहेत. भारताच्या संरक्षणाची जबाबदारी यशस्वीपणे उचलणार्‍या सर्व संबंधितांचे अभिनंदन आणि आभार. यापुढेही त्यांच्या यशाची कमान चढती राहो ही शुभेच्छा.

वाचने 5297
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

उत्तम उत्तम बातमी, आणि इथं दिल्याबद्दल अतिशय धन्यवाद. सहभागी असलेल्या सर्वांचेच मनापासुन अभिनंदन.

विसुनाना साहेब,अतिशय महत्वाची बातमी. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावी अशी बातमी. अग्नी -५ हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित जबाबदारी यशस्वीपणे उचलणार्‍या सर्व शास्त्रज्ञ आणि इतर संबंधितांचे अभिनंदन आणि आभार. तसेच नेहमी च मी भारतीय असल्याचा अभिमान माझ्या मनात असतोच पण आज ह्या बातमीमुळे तो अजुन प्रखर झाला. वंदे मातरम.

खूप आनंद वाटला ही बातमी वाचून. या क्षेपणास्त्र चाचणीत योगदान दिलेल्या सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि अग्नी ६,७,८ आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

अत्यंत अभिमानास्पद यश. सर्व संबंधितांचे हार्दीक अभिनंदन. श्री. विसुनाना, धन्यवाद.

आज सकाळीच टिव्हीवर ही बातमी पाहीली. आनंद झाला. पत्रकार शास्त्रज्ञांची आणि अधिकार्‍यांची मुलाखत घेत होते. आणि एका पत्रकाराने आपला गाढवपणा संपुर्ण देशा समोर उघडा केलाच. (आदत का मारा बेचारा.) एक शास्त्रज्ञ ज्याने या क्षेपणास्त्रावर काम केलय तो मुळचा पाकव्याप्त काश्मिर मधला आहे.(खर तर पत्रकाराने ही माहिती देण्याची ती जागा/वेळ नव्हती.) पण त्या पुढेही जाउन पुन्हा आपला बिनडोक पणा दाखवण्याची त्याला खुमखुमी आलीच. त्या शात्रज्ञाच्या मूळ ठिकाणाचा पुन्हा उल्लेक करुन आज तुम्हाला कस वाटतय? (म्हणजे जणू काही पाकिस्तानबरोबर युद्ध पेटलय आणि आपण त्यांच्यावर कुरघोडी केली आहे. तेव्हा तुम्हाला काय वाटतय. असा एकंदर आवेश होता प्रश्न विचारताना.) असा प्रश्न केला. अर्थात त्या शात्रज्ञाच डोक त्या प्रत्रकारा सारखं सडक नव्हत. त्याने त्या पत्रकाराला अपेक्षित उत्तराची बोळवण करत छान उत्तर दिलं. हॅट्स ऑफ टु अग्नी टिम.

पण ही पहिलीच चाचणी आहे. यानंतर बऱ्याच चाचण्या बाकी असतील. कालची चाचणी खराब हवामानामुळे आज घेण्यात आली. आता खराब हवामानातही चाचणी यशस्वीरीत्या पार पडो हीच इच्छा. (आणि सर्व चाचण्या यशस्वी झाल्या तरीही हे क्षेपणास्त्र वापरण्याची गरज कधीच न पडो ही शुभेच्छा)

भारतासारखे देश संपूर्ण जगाला विनाशाच्या खाईकडे नेण्याची तयारी करत आहेत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

सहमत! या अस्‍त्रांचा (आंतरखंडीय, मध्‍यम पल्ल्याचा हल्ला करणारी.. च्यायला काय स्वप्नं आहेत.. घरात घुसलेले शत्रू मारायची मारामार आणि म्हणे आंतरखंडीय हल्ला करणारी शस्‍त्रे ) कधी वापरच करायचा नाहीय तर कशाला उगाच देखावे करतायत.. पण असोच. मोदीसारखा एखादा खमक्या पुढेमागे देश चालवायला बसला तर त्याची सोय होईल ;-)

In reply to by परिकथेतील राजकुमार

परिकथेतील राज्कुमरा जरा जागा हो रे ब्बाबा.. झोपेत तरि तुम्हाला अशि परि चि स्वप्ने कशि बर्रे पद्ता बरे? आजुबाजुला जे जग अहे त्यचे वास्तव कय आहे ते बघ अनि मग काय ते प्रतिसाद लिहा

In reply to by कौतिक राव

परिकथेतील राज्कुमरा जरा जागा हो रे ब्बाबा.. झोपेत तरि तुम्हाला अशि परि चि स्वप्ने कशि बर्रे पद्ता बरे? आजुबाजुला जे जग अहे त्यचे वास्तव कय आहे ते बघ अनि मग काय ते प्रतिसाद लिहा
कौतिकराव ढाले पाटलांकडून आजूबाजूच्या जगाचे वास्तव काय आहे ते जाणून घ्यायला आवडेल. कृपया सविस्तर समजवा.

मस्तच... फारच प्रगती केलीये आपण , पण साला साधी साधी कामे होत नाहीत आपल्याकडे वेगाने( उदा. ठाणे टेसनातला पुल , मुंबई -डोंबिवली पर्यायी मार्ग.) .

In reply to by कुंदन

"मुंबई -डोंबिवली पर्यायी मार्ग." आमच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला परत एकदा या जागतिक व्यासपीठावर वाचा फोडल्याबद्दल अभिनंदन

अधिक रक्षित झाल्यासारखे वाटले.

एक मेजर माईलस्टोन (महत्वाचा पल्ला) गाठला. सर्व संबंधित शास्त्रज्ञांचे आणि देशाचे अभिनंदन!

शिर्षक वाचून मला वाटलं उपहासानं लिहिलं असेल. मुंबईतल्या पंचतारांकीत हॉटेल्स पासून अगदी संसदे पर्यंतचे हल्ले पहाता भारताला संरक्षणासाठी मिसाईल आणि अणुबाँबची गरज पडेल का? हा प्रश्न निर्माण झालाय. अंतर्गत सुरक्षाच इतकी ढिसाळ आहे की बाहेरून कुणाला लढाई करण्याची गरजच नाहिये. इथं खुद्दं आपल्याच संरक्षण खात्याचे दारूगोळा भरलेली ट्रक नाहिशी होतायेत, बंदुकी, बॉम्बही होत असतीलच. (परवाच खुद्द कृपाशंकरच्या घरात बेकादेशीर जिवंत ११० काडतुसं सापडली म्हणे!). एखादा कट्टर नक्षलवादी सोडाच, या व्यवस्थेला कंटाळून असंतोषानी खदखदलेला तरूण आज केंद्रिय मंत्र्याला झापड मारतोय उद्या संसदेवरच बाँबही फेकेल! हा पैसा पायाभुत सुविधा उभारण्यासाठी वापरता आला नसता का? उदाहरण म्हणून, अगदी या दोन दिवसात मुंबईत (सिग्नल केबल्सला लागलेल्या आगीमुळे) लोकं लोकल मध्ये (आणि बाहेर इंजिनावरसुद्धा) वाट्टेल तिथं उभं राहून प्रवास करत आहेत. (आज दोन जणं मेले). दारं बंद होणार्‍या, सुरक्षित गाड्या का येत नाहीत आपल्याकडे? साध्या कॉमनवेल्थ गेम्सचा घोटाळा शेकडो कोटी झाला. इथं तर मग गोपनियतेच्या पडद्याआडून हजारो कोटींचा घोटाळा होत असेल, आणि कधी उजेडातही येणार नाही.

In reply to by दादा कोंडके

भारतात दहशतवादी हल्ले अगदी आतपर्यंत होत आहेत हे मान्य. अपारंपरिक युद्धात आपण आपला बचाव करण्यात कमी पडतोय. पण म्हणून काय पारंपारिक युद्धाची सज्जता ठेवायचीच नाही कि काय? अंतर्गत सुरक्षा ढिसाळ आहे म्हणून सीमेवरही ढिसाळपणा दाखवायचा का? उलट आपण हे जे क्षेपणास्त्र तयार केले आहे त्याची जरब चीनने दिलेल्या प्रतिक्रियेवरून लगेच लक्षात आली. भारताला स्वहितासाठी दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियात स्वतःची एक जागा तयार करावीच लागेल. त्यासाठी सामरिकदृष्ट्या वरचढ असलेल्या चीनचा अडथळा आहे. चीन हा काही भारतासारखा इतर देशांची, त्यांच्या स्वायत्ततेची कदर करणारा देश नाही. त्यामुळे अग्नी-५ गरजेचेच आहे. या एका क्षेपणास्त्रामुळे भारत जरी चीनपेक्षा बलाढ्य होणार नसला तरी चीनला थोडासा धाक नक्कीच बसेल. या सर्व प्रकारासाठी जेवढा पैसा खर्च होतो त्यापेक्षा कितीतरी जास्त पैसा पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या नावाखाली खर्च होतो. पण पायाभूत सुविधा काही चांगल्या दर्जाच्या तयार होत नाहीत. (काही वेळा तयारच होत नाहीत) त्याचा दोष भ्रष्टाचाराचा. उगाच संरक्षण प्रकल्पांना नावे कशासाठी? मुंबईत रेल्वे प्रकरण एक अपघात होता. असे काही अपघात टाळता येत नाहीत. आज जी दुर्घटना झाली ती मात्र टाळता आली असती. मात्र त्याची जबाबदारी त्या अपघात झालेल्या व्यक्तींची होती. रेल्वे डब्यापासून सिग्नलचे खांब बऱ्यापैकी दूर असतात. मात्र गर्दीमुळे माणसे एवढ्या बाहेर लटकत होती कि तो अपघात झाला. अशी गर्दी नेहमी होत नाही. आणि दार बंद होणाऱ्या गाड्या मुंबईमध्ये (रेल्वेच्या डब्यांना) आणण्याची कल्पनाच करायला नको. तुम्ही गर्दीच्या वेळी कधी मुंबई लोकल ट्रेन बघितल्या नसतील. त्या बघितल्यावर बंद होणाऱ्या दारांची कल्पना किती खुळचट आहे ते तुम्हालाच कळेल.

In reply to by अपूर्व कात्रे

या सर्व प्रकारासाठी जेवढा पैसा खर्च होतो त्यापेक्षा कितीतरी जास्त पैसा पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या नावाखाली खर्च होतो. पण पायाभूत सुविधा काही चांगल्या दर्जाच्या तयार होत नाहीत. (काही वेळा तयारच होत नाहीत) त्याचा दोष भ्रष्टाचाराचा. उगाच संरक्षण प्रकल्पांना नावे कशासाठी?
भ्रष्टाचार आहेच पण इथं प्रश्न प्रायोरिटीजचा आहे. संरक्षण प्रकल्पच नाहीत इतरची इस्त्रोचे वगैरेही. भारतासारख्या दरिद्री देशाला चांद्रयान पाठवायला परवडतं पण शेतकर्‍यांचा माल थेट बाजारात आणि जलद उपलब्ध करण्याच्या यंत्रणेसाठी पैसा नाही. कुठूनही सुरवात देखील होत नाही यासाठी! ह्या वर्षीही गोदामाअभावी हजारो टन धान्याची नासाडी होणारच आहे. जो पर्यंत इथल्या लोकांना पोटभर जेवायला मिळणार नाही, पाणी मिळणार नाही, किमान शिक्षण मिळणार नाही, सुरक्षीत सार्वजनीक वहातूक व्यवस्था मिळणार नाही, वैद्यकीय सेवा मिळणार नाही (यादी बरीच मोठ्ठी आहे) तो पर्यंत असली चैन आपल्याला परवडणार नाही.
तुम्ही गर्दीच्या वेळी कधी मुंबई लोकल ट्रेन बघितल्या नसतील. त्या बघितल्यावर बंद होणाऱ्या दारांची कल्पना किती खुळचट आहे ते तुम्हालाच कळेल.
याचा खूप जवळून अनुभव घेतला आहे. चीन मध्ये अशीच गर्दी असते आणि तीथं दारं बंद होणार्‍या गाड्याच धावतात.
मुंबईत रेल्वे प्रकरण एक अपघात होता. असे काही अपघात टाळता येत नाहीत. आज जी दुर्घटना झाली ती मात्र टाळता आली असती. मात्र त्याची जबाबदारी त्या अपघात झालेल्या व्यक्तींची होती.
हे अजिबात पटलं नाही. आपल्याकडे (प्रचंड लोकसंख्या असल्यामूळे) एकूणच मानवी जिवनाला किंमत नाही. बाहेरच्या देशात गेल्यावर ( माझ्या कामाचा सेफ्टी सिस्टीम्सशी संबंध असल्यामूळे कदाचित) तीथल्या वाहतूक यंत्रणा मी बघत असतो. प्रत्येक शक्यता ध्यानात घेउन यंत्रणा उभारलेली असते. प्रत्येक यंत्रणेला "बॅक अप" असतो, महत्वाच्या यंत्रणेला "रिडंडंट प्रॉक्सी" असते, फेल सेफ मोड असतो. जेष्ठ नागरीक किंवा अपंग लोक तर सोडाच पण अगदी आंधळ्या लोकांसाठी ऑडीयो सिग्नल्स आणि प्लॅटफोर्मवर आणि जिन्यांवर चर खणलेली असते. काही शहरात तर अक्षरशः व्हीलचेअरवर बसून माणूस आक्खं शहर हिंडू शकतो. आपण आपल्याकडं गृहीत धरतो, 'इथं आहे हे असं आहे'. लोकल-बस म्हणजे गर्दी असणारच, उघड्या दारांत लोंबकळून प्रवास करावा लागणारच. जीवाची पर्वा न करता रस्ता ओलांडावा लागणारच. आणि ह्यातून अपघात (खरतर हा अपघात नव्हेच) झालाच तर जबाबदारी लोकांवर ढकलून मोकळे होतो. करोडो लोकांच्या अगदी प्राथमिक गरजाही पूर्ण होत नसताना, इतरही एव्हड्या समस्या आ-वासून उभ्या असताना अग्नी-बिग्नीचा फुकाचा अभिमान कोणाला दाखवणार आहोत? ह्या बातमीचं भारतात रहाणार्‍या वरच्या स्तरातल्या किंवा हिरव्या देशातल्यां ना कौतूक असेल पण माझ्या मते धार्मिक अस्मितेचं राजकारण करून लोकांचं ध्यान दुसरीकडे वळवणारे आणि खर्‍या समस्यांना प्राथमिकता न देता असल्या प्रकल्पांवर पैसा उडवणारे बिलंदर राजकारणी एकच.

मगाशी इथल्या नॅशनल पब्लीक रेडीओवर ऐकल्याप्रमाणे आता बेजिंग या क्षेपणास्त्राच्या पल्ल्यात आले आहे. ("जगात उत्तर कोरीयाच्या क्षेपणास्त्र चाचणीबद्दल गाजावाजा चलू असताना, भारताने अग्नि-५ ची चाचणी मुकाट्यान अर्थात गाजावाजा न करता उरकून घेतली", असे काहीसे त्या बातमीत म्हणले होते.) असो. सर्व संबंधितांचे अभिनंदन.

In reply to by विकास

आता बेजिंग या क्षेपणास्त्राच्या पल्ल्यात आले आहे. म्हणूनच तर एक महत्वाचा माईलस्टोन गाठला असं वर म्हंटलं! जगात उत्तर कोरीयाच्या क्षेपणास्त्र चाचणीबद्दल गाजावाजा चलू असताना, भारताने अग्नि-५ ची चाचणी मुकाट्यान अर्थात गाजावाजा न करता उरकून घेतली खीक! ;)

चीन ने भार्तावर हल्ला केला तर त्या पसुन बछाव कर्ण्या साठी एक अन्टी मिसाईल बनवा म्हणा आता...

In reply to by कौतिक राव

शत्रूराष्ट्राने भारतावर डागलेल्या क्षेपणास्त्राला हवेतल्या हवेत निकामी करण्याची प्रणाली भारताने याआधीच विकसित केली आहे. त्यासाठी खालील दुवा बघा. http://en.wikipedia.org/wiki/Indian_Ballistic_Missile_Defense_Program http://indiatoday.intoday.in/story/DRDO+readies+shield+against+Chinese+…

चीन ने भार्तावर हल्ला केला तर त्या पसुन बछाव कर्ण्या साठी एक अन्टी मिसाईल बनवा म्हणा आता...

प्रख्यात डावे विचारवंत श्री. प्रफुल्ल बिडवाईंना या अग्नीपरीक्षेमुळे त्रास झाला आहे: “It is ridiculous,” said Praful Bidwai, a researcher and columnist associated with the Coalition of Nuclear Disarmament and Peace. “We are getting into a useless arms race at the expense of fulfilling the need of poor people.” :(

In reply to by विकास

प्रख्यात डावे विचारवंत श्री. प्रफुल्ल बिडवाईंना या अग्नीपरीक्षेमुळे त्रास झाला आहे
अहो विकासराव, "डावे विचारवंत" यातच आले की सगळे.

अभिनंदन !!! अमोल केळकर