Skip to main content

आपण पुस्तके का विकत घेतो?

लेखक चित्रा यांनी बुधवार, 02/11/2011 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच २०११ ची दिवाळी साजरी झाली. आपल्याकडे दिवाळीशी जोडलेला जसा लाडू, चकल्या, चिवडा असा फराळ असतो तसाच दुसरा एक फराळ निदान आपल्या महाराष्ट्रात पाहिलेला आहे तो म्हणजे दिवाळी अंक. दिवाळीनिमित्ताने अनेक वृत्तपत्रे, नियतकालिके, आणि मासिके आपापले विशेषांक काढत असतात असे दिसते. माझ्या घराच्या सदस्यांची संख्या मोठी असल्याने प्रत्येकाच्या आवडीची घरी वृत्तपत्रे येत, उदा. अनेक वर्षे आमच्या घरी सकाळ, नवशक्ती, महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता तसेच टाईम्स ऑफ इंडिया ही रोजची पाच वर्तमानपत्रे येत असे आठवते. त्यानंतर त्यात इंडियन एक्स्प्रेसची भर पडली. याखेरीज स्त्री, किर्लोस्कर आणि मनोहर ही मासिके येत आणि प्रत्येकाचे वेगळे दिवाळी अंक निघत. त्यानंतर एकत्र असा त्यांचा किस्त्रीम नावाचा दिवाळी अंक येऊ लागला. यापैकी जवळजवळ प्रत्येक मराठी वर्तमानपत्राचे दिवाळी अंक निघत. तसेच मौज, अक्षर, दिपावली, अबकडई, मिळून सार्‍याजणी इत्यादी काही खास अंकही दिवाळीत हमखास घेतले जात. दिवाळीत चिवडा खात-खात दिवाळी अंकांचा फडशाही पाडण्यासाठी माझ्याकडे एकेकाळी वेळ होता, कसली घाई नव्हती, डेडलाईन्स नव्हत्या. तेव्हाची निर्भर आनंदाची दिवाळी आणि वाचनाचे सुख केवळ अवर्णनीय होते असेच आता म्हणावे लागते आहे. आता विचार केला तर घरातील लोक जास्त होते म्हणून हे अंक आमच्याकडे घेतले जात असे म्हणावे तर ते चुकीचे ठरेल. यापेक्षा घरातील लोकांना अंक विकत घेणे, ते आपल्या मालकीचे असणे यात काही आनंद होत होता, मोठेपणा वाटत होता असे वाटते. अर्थात ते अंक नंतर कदाचित रद्दीतही जात होते, तर त्यातील काही अंक हे अजूनही मला घरी गेले की सापडतात! असे काही अंक कधी सापडले की काळ आपल्यासाठी तेवढ्यापुरता थबकला आहे असे वाटते. हे झाले दिवाळी अंकांचे. असेच मी दादरला, व्ही.टीला आणि पुण्याला सगळीकडे पुस्तके शोधत असे. आमच्या गावाची लायब्ररी फार नवीन पुस्तके ठेवत होती, असे नाही. त्यामुळे जुन्या पुस्तकांसाठी लायब्ररीत जायचे, आणि नवीन पुस्तके विकत घ्यायची असे मी माझ्या हातात जेव्हापासून पैसे आले तेव्हापासून करत असे, असे आठवते. अनेकदा मला कपड्यांसाठी दिलेले पैसे मी पुस्तकांवर घालवले होते असे आठवते. त्यावरून वडिलांचा कधीतरी नाराजीचा सूरही ऐकला आहे, पण तेही मनावर घेण्याइतकी मी शहाणी कधीच नव्हते! :) हे मुद्दाम सांगण्याचे कारण एवढेच, की नुकतेच दिवाळी अंक विकत घेण्याबद्दलच्या एका चर्चेतून आणि माझ्या स्टीव जॉब्जवरील पुस्तक विकत घेण्याबद्दल एका मित्राशी झालेल्या चर्चेमधून असे जाणवले की लोक माझ्यासारखा विचार करत नाहीत एवढेच नाही, तर अगदी वेगळा विचार करतात. तेव्हा ही चर्चा किंवा अनुभवकथन मुख्यत्वे खालील सर्व किंवा कोणत्याही मुद्द्यांवरून व्हावी असे वाटते - १. मी वर म्हटले आहे तसे तुमच्याकडे पुस्तके आणि दिवाळी अंक वाचण्यासाठी विकत घेण्याचे प्रमाण काय होते? काही कारणाने घेता नसले तरी ते विकत घेऊन संग्रही ठेवावे अशी इच्छा होती का? २. सध्याचे दिवाळी अंक हे न घेण्याचे कारण त्यातील बेसुमार जाहिराती आहेत असे वाटते का? किंबहुना दिवाळी अंकांचा दर्जा तुम्हाला आठवतो तेव्हापेक्षा घसरला आहे असे तुमचे निरीक्षण आहे का? ३. पुस्तके लायब्ररीतून घ्यावी, आधी वाचावी आणि मग संग्रही ठेवण्यायोग्य वाटली तरच विकत घ्यावी असा तुम्ही विचार करता का? पुस्तक परिक्षणांचा पुस्तके न वाचता थेट विकत घेण्यावर परिणाम होतो का? ४. पुस्तके किंवा दिवाळी अंक विकत घेण्याचे तुमचे आजचे किंवा तेव्हाचे साधारण बजेट पगाराच्या किती टक्के असे/आहे? काय असावे असे तुम्हाला वाटते? (तुमचे मत आणि इतरांचे मत यात फरक नक्कीच असणार). ५. आपण पुस्तके संग्रही ठेवतो तेव्हा नक्की का ठेवतो? नक्की कसली आकांक्षा, इच्छा आपल्या मनात असते? इच्छा कितीही असली तरी जागा, किंवा पैसा अशा गोष्टी मनात येतात का? ६. यापुढील काळामध्ये इ-बुक्समुळे प्रत्यक्ष जगातील जागेचा (घनफळ, क्षेत्रफळ) संबंध कमी आल्याने आपण पुस्तके अधिक प्रमाणावर घेऊ असे वाटते का? (पैसे साधारण सारखेच किंवा थोडे कमी लागतील असे गृहित धरून). ७. जुन्या पुस्तकांचे, दिवाळी अंकांचे तुम्ही काय करता?

वाचने 7961
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

>>>पुस्तके लायब्ररीतून घ्यावी, आधी वाचावी आणि मग संग्रही ठेवण्यायोग्य वाटली तरच विकत घ्यावी ह्या मुद्द्याशी सहमत

भारतात पुस्तके वेगवेगळ्या कारणांनी घेतली जातात. १.माझ्यासारखे दरिद्रि आर्थिक परिस्थितीत असलेले किंवा दरिद्रि स्थितीतून आलेले काही अतिकंजूष लोक सहसा पुस्तके वाचतात, पण खरेदी करत नाहित. खरेदी केलीच, तर नंतर विकण्यासाठी घेतात. २.काही लोक पुस्तकाचा निषेध करण्यासाठी पुस्तके घेतात! मुख्यतः जाळपोळ, दंगेधोपे वगैरे पूर्णवेळ किंवा अर्धवेळ व्यवसाय असणारे ह्यात येतात. ३.माझ्या माहितीतील काही मारवाडी मित्र सवलतीच्या दरात मिळणारे सरकारी साहित्य दुकानात उत्कृष्ट रद्दी म्हणून विकण्यासाठी, पुड्या बांधण्यासाठी सब्सिडाइज्ड पुस्तके घेतात. ४.माझ्या हापिसातल्या काही उच्चभ्रू , हाइ किलास व health(कि figure?) conscience देखण्या आंट्या पुस्तक डोक्यावर ठेवून चालण्याचा कुठलासा व्यायामप्रकार की catwalk असतो म्हणे, त्यासाठी पुस्तके घेतात. ५.माझे काही जालपरिचित तावातावाने वाद घालत चुकीचे संदर्भ खड्या छातीने देण्यासाठी पुस्तके घेतात. ६.दोन पेग घेतल्यावर नॉस्टॅल्गिक होणारे काही प्राणी दरवर्षी शालेय पुस्तके घेतात, एखाद पेग नंतर हळवे होत त्या पुस्तकाकडे पाहून आसवे गाळतात. . . . . अर्रर्र... बॉस आलाय. मूळ विचच्रलेल्या प्रश्नांबद्द्ल नंतर लिहितो. सध्या इतकेच गोड मानून घ्या.

ह्म्म्म चांगला विषय... या वेळी मी चाळलेले दिवाळी अंक. चित्रगुप्त यांच्या धाग्यावर मी लेडी विथ लँप या चित्रा विषयी विचारणा केली होती,ते चित्र हळदणकर यांचे असल्याचे कळले...तेच चित्र एका दिवाळी अंकावर पाहुन मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला,शिवाय त्यावरचा एक लेख वाचायला देखील मिळाला...

पुस्तके विकत घेण्याचे फायदे - १) आपल्या सवडीने आणि इच्छेने वाचन करता येते. २) पुस्तक चांगले असल्यास अनेक वेळा वाचता येते ... तसेच दुसर्‍या कोणाला ते वाचायला सांगुन त्याची मते आजमवता येतात . (अर्थात ज्याला द्यायचे तो ते पुस्तक परत करील याची खात्री असेल तरच ..) जी पुस्तके विकत घेण्यासारखी नसतात ती लायब्ररीतून आणून वाचणे बरे वाटते तेच मासिकांबाबत सुद्धा .. कारण त्यांना संग्रहात ठेवण्याइतकी त्यांची योग्यता नसते .. त्याचे निकष म्हणजे लेखक/लेखिका कोण आहेत , तसेच विषय. आशय इ. पुस्तकाचा दर्जा काय आहे या वरून मी त्याच्यासाठी किती किंमत देऊ शकेन हे मी ठरवते आणि त्या किंमतीत असलेली पुस्तके मी विकत घेते . पुस्तके विकत घेण्याचे बजेट असे नाही .. काही वेळा पुस्तक परिक्षणाचा (चांगल्या अथवा वाईट), परिणाम पुस्तक खरेदीवर होतो. पुस्तके सहसा कधी विकत नाही ... काही दिवाळी अंक सुद्धा ठेवले आहेत .. अर्थात ते फारसे वाचले जात नाहीत . पण दिवाळी अंक विकत घ्यावेसे वाटत नाही ... जाहिराती खूप असतात हे खरे -( पण त्याचे काही नाही ...जाहिरातीच्या मधे मधे आपण टि.व्ही सिरियल्स नाही का बघत ? ).. पण काही निवडक अंक सोडले तर ते तितकेसे वाचनीय वाटत नाहीत.

वाळवीसारखी पुस्तकं खाते म्हटलं तरी चालेल! अगदी रद्दीतला कपटासुद्धा एक नजर फिरवून मगच कचर्‍यात जायचा. माझ्या घरात पूर्वीपासूनच सगळेच पट्टीचे वाचणारे. १९७५ च्या आसपास सुद्धा आमच्याकडे रीडर्स डायजेस्ट, नवनीत, अपूर्व अशी मासिकं अगदी खेड्यात रहात असतानाही येत असत. शिवाय म.टा., चिल्ड्रेन्स वर्ल्ड, चांदोबा, किशोर इ. होतेच. गावात आणि शाळेत बर्‍यापैकी लायब्ररी होती, शिवाय आईवडील दोघेही चांगली पुस्तकं नेहमी विकत आणत असत. बरेच दिवाळी अंक तेव्हा विकत घेतले जात. मौज. अक्षर, दीपावली, श्री दीपलक्ष्मी ही सहज आठवणारी नावं. मग त्यात आवाज वगैरेंची भर पडली. ह़ळूहळू दिवाळी अंक विकत घ्यायचं प्रमाण कमी होत गेलं, याचं कारण म्हणजे चढ्या किंमती आणि अंकांची लायब्ररीतली उपलब्धता. शिवाय बरेचदा दिवाळी अंकातलं साहित्य जपून ठेवावं असं वाटेनासं झालं हेही एक कारण. पण पुस्तकं विकत घ्यायचा पायंडा आम्ही चालूच ठेवला. मराठी पुस्तकं दुकानातून विकत घ्यायला खरंच परवडत नाहीत. १०० पानी पुस्तकाला १५०/- रुपये मोजायला जिवावर येतं. त्यामुळे मॅजेस्टिकचं प्रदर्शन जेव्हा गावात येतं तेव्हा बर्‍यापैकी डिस्काउंट असल्यामुळे निदान १५००/- ते २०००/- ची खरेदी होतेच. शिवाय अधूनमधून फ्लिपकार्टवरूनही बरीच पुस्तकं मी मागवते. सहसा नवी पुस्तकं मी आधी सेंट्रल लायब्ररीतून वाचते. गोव्यात सरकारी सेंट्रल लायब्ररीची उत्तम सोय आहे. तिथे वाचकाना कोणतेही शुल्क पडत नाही. नवी जुनी पुस्तके, दिवाळी अंक, सगळं तिथे वाचायला मिळतंच. त्यातून एखादं पुस्तक फारच आवडलं तर मग विकत घ्यायचं. मॅजेस्टिकच्या प्रदर्शनात सहसा जुनी क्लासिक्स विकत घेण्याकडे माझा कल असतो, त्यांच्या किंमतीकडे तेव्हा पाहिलं जात नाही. जेव्हा पुस्तकं ठेवायला कपाटं अपुरी पडू लागतात, तेव्हा पुस्तकांची परत आवश्यक आणि जास्तीची अशी वर्गवारी करून असे अंक आणि पुस्तकं आणखी एका लहान लायब्ररीला देऊन टाकते. आतापर्यंत निदान ३ पोती भरून पुस्तकं मी दान केली आहेत. शिवाय लोकानी वाचायला नेऊन परत न केलेल्या पुस्तकांची यात गणती नाही! माझ्या खरेदीचा मोठा भाग पुस्तकं हाच असतो, सोन्याचे दागिने सोसाने विकत घेतलेले कधी आठवतच नाहीत. आहेत तेही लॉकर्समधे पडून असतात, त्यापेक्षा पुस्तकांवर खर्च केला तर तो सार्थकी लागला असं वाटतं!

पुर्वी (पक्षी: लहानपणी) पुस्तके वाचताना त्यात फारसा चॉईस वगैरे नसायचा. जे समोर येईल, झेपेल ते सर्व काही वाचायला आवडायचे / आजही आवडते. आता मात्र पुस्तके कटाक्षाने विकतच घेत असतो, लायब्ररी वगैरेच्या भानगडीत पडत नाही. विकत घेतल्याचा फायदा असा की पुस्तकाची मालकी आपली होती व आपण हवे तेव्हा हवे ते वाचू शकतो. एखादे पुस्तक आवडले आणि एखाद्यावेळी ते पुन्हा वाचण्याची इच्छा झाल्यास ते लगेच हवे असते, ते लायब्ररीतुन आणणे किंवा इतर मार्गाने जमवण्यापेक्षा ते आपल्या संग्रहात असणे हे कधीही चांगले असे वाटते. पुस्तक वाचताना ते चांगल्या कंडिशनमध्ये असावेच असाही माझा आग्रह असतो आणि तो बर्‍याचदा लायब्ररीच्या पुस्तकातुन पुर्ण होत नाही. पुस्तकाची कंडिशन ही बर्‍याच वेळा मला ते वाचावे की नको ह्या निर्णयप्रक्रियेत महत्वाची ठरते. पुस्तकावर केलेल्या खाणाखुणा, दुमडलेली पाने, गायब असलेली पाने इत्यादी गोष्टी रसभंग करतात म्हणुन स्वतःच्या मालकीची पुस्तके बाळगतो व स्वतःला हवी तशी ती ठेवतो. पुस्तके विकत घेताना लेखक आणि पुस्तकाचा विषय ही बाब नेहमीच महत्वाची ठरते, पण तरीही एखाद्या आवडत्या लेखकाचे एखाद्या नावडत्या विषयावरील पुस्तक घेईनच असे नाही, ह्याच अनुषंगाने एखाद्या आवडत्या विषयावर असलेले एखाद्या अगदीच अपरिचीत लेखकाचे पुस्तक घेताना संकोच वाटत नाही. विनोदी, वैचारीक, साय-फाय, ऑफ्-बीट पुस्तके जास्त आवडीने विकत घेतो. आत्मचरित्र किंवा किंवा तत्सम पुस्तकांचा अजिबात वाटेला जात नाही. यशस्वी व्हा, व्यक्तिमत्व विकास, हे कसे करावे व ते कसे करू नये आदी पुस्तकांकडे ढुंकुनही पहात नाही. काव्यसंग्रह हा आपला प्रांत नोहे ही समज अगदी लवकर आली. जुनी पुस्तके अजुनही संग्रहात आहेत, व्यवस्थित आहेत. अगदीच एखादा खात्रीचा माणुस असेल तर वाचायला देतो, मात्र आपली पुस्तके दुसर्‍याला वाचायला देणे ही इन जनरल न आवडणारी बाब आहे. वार्षिक बजेट अगदी फिक्स नसले तरी साधारणता ३-४ महिन्यात अंदाजे २००० रुपये पुस्तकांच्या खरेदीत जातात. पण पहिल्यापेक्षा आजकाल जरा पुस्तकांवरचा खर्च कमी होत चालला आहे ह्याची कल्पना आहे, कारण माहित नाही, कदाचित नवे आवर्जुन वाचण्याजोगे जास्त सापडत नाही हे कारण असावे. दिवाळी अंक गेल्या कित्येक वर्षात विकत घेतले नाहीत, आधी साधारणता ३-४ अंक घेत असायचो. मात्र सध्या अंकांचा सुमार दर्जा, बड्या लेखकांचे नुस्त्या नाववर खपणारे फालतु लेख, बेसुमार जाहिराती, अंकाची एकंदर खराव क्वालिटी इत्यांदींमुळे दिवाळी अंक घेऊ आणि वाचूही वाटत नाही. आजकाल आंतरजालीय दिवाळी अंक आवर्जुन वाचतो आणि दुसर्‍यांना त्याबद्दल कळवत असतो. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

आधी माझे बाबा आवर्जून दिवाळी अंक आणायचे, पण आता दिवाळी अंक हे जाहिरातींसाठी काढले जातात... मग ते बंद केलं.

In reply to by छोटा डॉन

जे मला लिहायचं होतं अगदी तेच योग्य शब्दात डॉनरावांनी लिहलयं. :) आत्तापर्यंत कमीत कमी ३-४ ग्रंथालये आणी वाचनालये लावली आणी तेवढ्याच वेगाने बंदही केलीत. जे पुस्तकं मला वाचायला हवं असायचं नेमकं तेच पुस्तकं एकतर स्टॉकमध्ये नसायचं अथवा दुसर्‍या वाचकाने नेलेलं असायचं, त्यामुळे वैतागून तो नाद सोडला आणी सरळ आवडणारी सगळी पुस्तकं विकतच आणायला लागलो. बाकी दिवाळी अंक आता पहिल्यासारखे राहिले नाहीयेत हे ही खरेच, पण आताच्या दिवाळीला रामदास काकांनी रेकमेंड केल्यामुळे प्रहारचा दिवाळी अंक आवर्जुन विकत घेतला.

आपण पुस्तके का विकत घेतो?
चोरी करणे पाप असते म्हणून. पापभिरु परा

In reply to by परिकथेतील राजकुमार

आपण पुस्तके का विकत घेतो? चोरी करणे पाप असते म्हणून. एक सत्य घटना: एक प्रथितयश साहीत्यिक एका सामाजीक कामात गुंतलेल्या दांपत्याच्या घरी आला. छोट्याशा (आमंत्रणानेच) कार्यक्रमा आधी यजमानाच्या अभ्यासिकेतील ग्रंथसंग्रहालयात हे साहित्यिक महाशय चष्म्यातून डोळे बारीक करून पुस्तके निरखत असताना यजमानीणबाईंनी ते पाहीले, आणि पतीबद्दलच्या कौतुकाने म्हणाल्या, "यांना विविध विषयांवरच्या वाचनाची आणि ग्रंथसंग्रह करण्याची भारी आवड आहे." त्यावर हे साहित्यिक महाशय उद्गरले, "मला त्याचे काही पडलेले नाही, मागच्या वेळेस त्याला भेटलो होतो, तेंव्हा त्याने माझ्याकडून एक पुस्तक वाचण्यापुरते घेतले होते, ते परत घेता येईल का म्हणून शोधत होतो!" ;)

मी स्वत: पुस्तकं वाचतो ते अनुभव घेण्यासाठी अन्‌ त्यातून शिकण्यासाठी. कित्येक गोष्टींचा अनुभव आपण स्वत: घेऊ शकत नाही. पुस्तकं ते अनुभव समजून घेण्यास मदत करतात. वैचारिक दृष्टीकोन त्यातून वृद्धिंगत होतो. अर्थात्‌ वाचनाचा उपयोग काही चांगलं अमलात आणण्यात व्हायला हवा. जे वाचलंय त्यातलं चांगलं अमलात आणता येणं सहज शक्य असतांना देखील तसं होत नसेल तर आणिक वाचण्याची गरज नसून कृतीची गरज आहे असं वाटतं. राघव

कव्हर घालण्याचा आनंद मिळवण्यासाठी. (हॅ हॅ हॅ. जुन्या पुस्तकांना पुन्हा पुन्हा कव्हरं घालून तो आनंद मिळत नाही. ;) )

आता थोडा गडबडीत असल्याने पटकन रिप्लाय देतो आहे, सविस्तर रिप्लाय नंतर देतो.. पुस्तके हे माझ्या साठी अ‍ॅसेट आहेत, त्यामुळे विकत घेवुन मस्त स्वताचीच एक छोटी लायब्ररी केली आहे मी. दिवाळी अंक जास्त वाचत नाही मात्र. लायब्ररीतुन पुस्तके घेवुन वाचने कधीच रुचत नाही. वापरलेली .. फाटकी अश्या पुस्तकातुन माझे मन प्रसन्न होत नाहि. हा मोठेपणा नाही.. पण पुस्तकातील विश्वात जाताना, स्वच्छ मस्त पुस्तक मनास खुप छान तजेला देते. मी महिन्याला सरासरी ५०० रुपयाची बुक्स घेतो.. माझ्या २००६ च्या पगाराची ती ५ % किंमत आहे. पुढे पुस्तकांसाठी ५०० च किमत ठेवुन इतर ५ % तील रक्कम ट्रेकिंग .. इतर छंद साठी वापरतो. आजकाल मुंबईतील धकाधकीत आणि भाच्याच्या गडबडीत पुस्तके जरा कमी वाचतो आहे. इ बुक्स मी कधीच वाचत नाही.. काळाप्रमाणे प्रत्येक गोष्ट का बदलली पाहिजे हे मला कोडे पदते मग अश्या प्रश्नाने. पुस्तक वाचन हि जर आवड असेल तर पैसा ही गोष्ट दुय्यम होते.

In reply to by गणेशा

माझ्या २००६ च्या पगाराची ती ५ % किंमत आहे.
लग्नाळु माणसाने झायरात कशी करावी याचे वुत्तम उदाहरण दिले आहे गणेशा यांनी.... मी सुडक्या, इंट्या, स्पावड्या व त्यासम इतर तरुण मंडळींना अशा झायराती करण्याच आवाहन करतो...

In reply to by वपाडाव

आधीच बिच्चारा मी.. त्यात हा वपाडाव बर्याचदा रिप्लाय देवुन त्रास देतो, ... प्रश्न क्रमांक ४ मध्ये विचारलेल्या प्रश्नाला साधे सरळ उत्तर दिले होते.. प॑ण काय करणार. .. अवांतर : रिप्लाय मधुन जाहिरात करता येत असल्याने, उद्या दिवाळी अंकासारखेच चित्रा यांनी रिप्लाय वाचणेच बंद केले तर ? हा प्रश्न उगाच डोकावुन गेला.

In reply to by दादा कोंडके

दादा, तुम्ही लोकांच्या चड्डीचे नाडे कधीपासुन ओढाया लागले.... बाकी, चौका मस्तच....

In reply to by वपाडाव

वप्या, कुठल्या जगात आहेस? २००६ साली क्ष व्यक्ती दरमहा रु ५०० ची पुस्तके...माफ करा बुक्स ;-)... घेत होती. हि रक्कम तिच्या मासिक पगाराच्या ५% होती. याचा अर्थ तेव्हा तिचा पगार साधारण रु १०००० होता. आता २००६ साली १०००० पगार असणे ही २०११ सालच्या मुलींसाठी जाहिरात आहे असे तुला वाटत असेल तर एकच सांगतो.... बाजारात उभा राहा. मुलींच्या अपेक्षा कळतील आणि आपण (तू, मी, सगळे) किती तुच्छ प्राणी आहोत याचा अंदाज येईल. त्यातून स्वतःच्या मालकीचे घर नसेल तर मग दुधात साखर. इथे कुणाला दुखावण्याचा हेतू नाही, पुढील निराशा टाळावी म्हणून आत्ताच सांगतो आहे. माझे मत चुकीचे असेल तर मिपावरील जाणकार प्रकाश टाकतीलच. तो टाकण्यासाठी पाहिजे तर वेगळा धागा काढूया......

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

२००६ ला १०,००० म्हणजे आता २०११ ला ९०,००० आरामात समजावा. बाकी मुलींच्या मनातले जाणने हे साक्षात ब्रम्हदेवालाही शक्य नसल्याने त्याबाबत काही भाष्य करत नाही.

In reply to by किसन शिंदे

हे मेलं आपलं दुसरंच काहीतरी.... अबे, तुझं उरकलं लग्न म्हणुन का मिरच्या लागतात तुला... का तु कदी असली झायरात केली नाही म्हणुन.... पब्लिक करतंय ना झायरात अन आम्ही पब्लिकला काड्या....

उशी म्हणून वापरायला. माहिती आपोआप डोसक्यात जाते. वाचायचे कष्ट घ्यावे लागत नाहीत.

पुस्तकांसाठी अशी ठराविक रक्कम कधीच काढुन ठेवलेली आठवत नाही. पण तीन-चार महिन्यात हजार रुपयां पर्यंतची पुस्तके घेत होतो. आता बरच वाचन संगणकावर होत असल्यामुळे विज बील आणि आंतरजालाचा खर्च ह्यातच धरावा का? :)

लहानपणी घराशेजारी नगरवाचनालय होते . त्यामुळे वाचनाची आवड लागली. कपडे खादाडी पिक्चर वगैरेपेक्षा पुस्तके विकत घ्यायचो.अधाशासारखा वाचत सुटायचो. ती सवय अजूनही आहे. सुदैवाने जेथे जेथे गेलो तेथे भरपुर पुस्तके वाचायला मिळाली. मुद्दाम दुकानात जावून घेत नाही पण एखादे प्रदर्शन वगैरे असेल तर मात्र मराठी पुस्तके आवर्जून घेतो.. क्रॉसवर्ड मध्ये जाणे हा एक सुखद अनुभव असतो. तेथे पुस्तके चाळता येतात. बजेट प्रमाणे विकत घेता येतात. पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघाची लायब्ररी सापडली आणि तेथे अक्षरश: अलीबाबाचा खजीना सापडला. पुस्तक वाचल्याशिवाय एकही दिवस जात नाही. इंग्रजी पुस्तकंसाठी बजेट चे प्रॉब्लेम असायचे त्या वेळेस फर्ग्यूसन रोडवरच्या पॉप्यूलर बूक चा शोध लागला. पायरेटेड पुस्तकांनी बजेट चा प्रश्न सोडवला. आता एखादे पुस्तक संग्राह्य वाटले तर ते मुद्दम जावून विकत घेतो. पुस्तक पुन्हा वाचण्याचा आनंद काही औरच असतो

In reply to by विजुभाऊ

पायरेटेड पुस्तकांनी बजेट चा प्रश्न सोडवला.
तुम्ही हे इथं कबूल करून भ्रष्टाचारा विरुद्ध काहीही बोलण्याचा हक्क गमावला आहे! ;)

पूस्तके रद्दीत टाकायला फार आवडतात, अर्थात म्हणूनच विकतही घेतो. लायब्ररी तेव्हांच परवडते/आवडते जेंव्हा दिवसाला एक पूस्तक वाचून होते, जर पृश्ठ संख्या ६५०+ असेल तर अजून एक दीवस जातो, म्हणजेच थोडक्यात, तूम्ही रीसेशन अथवा इतर कोणत्याही कारणाने बेकार आहात व काय करावे हे सूचत नाहीये तेव्हां वेळ घालवायला आख्खि लायब्ररी वाचून काढणे हा एकमेव स्वस्त, मस्त व प्रचंड एंगेजिंग पर्याय उरतो, तेव्हांच अमलात येतो, अर्थातच लवकरच तूम्हाला लाब्ररी वाले टाळू लागतात हा मूद्दा वेगळा. विकतही घेऊन बरीच पूस्तके संग्रही ठेवतो कारण मला मग लोकांवर इंप्रेशन मारता येते की ही माझी अभिरूची कशी हूच्च आहे, मी कसा व्यासंगी कीडा आहे , हे वाचलयं ते वाचलय हे लोकांना दिसावे म्हणून मी पूस्तके विकत घेतो व अत्यंत सूरेख रीतीने घासून , पूसून साफ ठेवतो. लोकं माझं फार कौतूकही करतात, व मला फार आनंद होतो जेव्हां ते माझ्याकडे पूस्तक वाचायला उधार मागतात. इबूक व ऑडीओबूक हा माझा एकदम आवडता प्रकार, पिसी, टॅब ते फोन पर्यंत पूस्तक कूठेही कसेही फिरवता येते सोयी प्रमाणेवाचता येते. (हॅरी पॉटर ऑडीओबूक तर कायमच ऐकत असतो सॉलीड मज्या येते) कोणाला दीले तर तूटायची फूटायची , परत मिळ्ण्याची कोणतीही कटकट करावी लागत नाही. सॅमसंग गॅलक्सी टॅबवरती इ-बूक्स वाचत बसणे म्हणजे सूखच. असो, मूख्य गोश्ट इतकीच आहे की, काय वाचलय यापेक्शा काय समजून , आत्मसात करून वा एंजोय करून घेतलय हेच महत्वाचं आहे, यापलीकडे पूस्तकांचा काही खरा उपयोग आहे काय ?

माझ्याकडुन नियमितपणे पुस्तके घेतलि जातात ती वाचण्यासाठी आणि संग्रही ठेवण्यासाठी. अजुन एक कारण ज्यावेळेस मि खुप संख्येने पुस्तके विकत घेतो, जेंव्हा मला कार्यालयीन कामासाठी देश सोडावा लागतो तेंव्हा. बाहेरचे अत्यंत निरस्/एकाकि जिवन पुस्तकांमुळेच थोडेसे सुसह्य होते.

लेखाचा विषय छानच! क्र. एक. दिवाळी अंक वाचण्यासाठी विकत घेण्याचे प्रमाण काय होते? काही कारणाने घेता नसले तरी ते विकत घेऊन संग्रही ठेवावे अशी इच्छा होती का? एखादा दिवाळी अंक लायब्ररीतून (आईबाबांना हवा असलेला) घरी येत असे. विकत घेण्याचे बजेट त्यावेळी नसावे पण ती अपूर्ण इच्छा ते आता आम्हाला पोष्टाने अंक पाठवून पूर्ण करत असावेत. क्र. दोन. सध्याचे दिवाळी अंक हे न घेण्याचे कारण त्यातील बेसुमार जाहिराती आहेत असे वाटते का? किंबहुना दिवाळी अंकांचा दर्जा तुम्हाला आठवतो तेव्हापेक्षा घसरला आहे असे तुमचे निरीक्षण आहे का? दर्जा घसरला नाही असे वाटते. त्यावेळी माझ्या आठवणीप्रमाणे ज्या विषयातले लेख येत असत त्यापेक्षा कितीतरी वेगवेगळे विषय (अधिक पूर्वीचेही) आता हाताळले जात आहेत (मत प्रत्येक दिवाळी अंकाप्रमाणे थोडेफार बदलते.) क्र. तीन.पुस्तके लायब्ररीतून घ्यावी, आधी वाचावी आणि मग संग्रही ठेवण्यायोग्य वाटली तरच विकत घ्यावी असा तुम्ही विचार करता का? पुस्तक परिक्षणांचा पुस्तके न वाचता थेट विकत घेण्यावर परिणाम होतो का? दोन्हीचे उत्तर हो. क्र. चार. पुस्तके किंवा दिवाळी अंक विकत घेण्याचे तुमचे आजचे किंवा तेव्हाचे साधारण बजेट असे ठरवलेले नाही. आवडते पुस्तक सहसा घेतलेच जाते. भारतवारीत मुलाची, नवर्‍याची आणि मला आवडलेली (हो, हो त्यात पाकृचीही असतात) पुस्तके मिळून साधारणपणे ३ ते ४ हजार रूपये अधिक गाण्याच्या सिड्यांचे थोडेफार असा खर्च असतो. शिवाय इथली लायब्ररी चालू असतेच. त्यासाठी खर्च नाही. क्र. पाच. पुस्तके संग्रही ठेवतो तेव्हा नक्की का ठेवतो? आवडत्या गोष्टी घरात का ठेवल्या जातात याचे उत्तर पुस्त्कांनाही लागू होते. सुदैवाने तीच पुस्तके अजूनतरी पुन्हा वाचली जातात आणि घरातली जागा चांगल्या गोष्टींनी अडल्याचे वाईट वाटत नाही. कधितरी एखादे पुस्तक फारच महाग असल्याचे वाटते हे नाकबूल करत नाही. क्र. सहा. यापुढील काळामध्ये इ-बुक्समुळे प्रत्यक्ष जगातील जागेचा अजून तरी तसे वाटत नाही. म्हणजे जागा अडणारच. किंडल की काय आहे त्यावर पुस्तके वाचणे आवडत नाही. क्र. सात. जुन्या पुस्तकांचे, दिवाळी अंकांचे तुम्ही काय करता? चांगला लेख स्क्यान करून ठेवतो बाकीचे सगळे रद्दी.

In reply to by रेवती

इथली लायब्ररी चालू असतेच. त्यासाठी खर्च नाही थोडी सुधारणा. पुस्तक, मासिक परत करायला एक दिवस उशीर म्हणजे १० सेंट दंड/दिवस. डिव्ह्डीला उशीर म्हणजे १ डॉलर दंड्/दिवस. एखाद्या विकांताला लायब्ररीत जाणे जमले नाही तर पुढच्या विकांतापर्यंत जाणे सहसा जमत नाही. त्याचा खर्च धरायला हवा.;) बॉस्टनहून येताना चुकून दोन रिडर्स डायजेस्टचे अंक आणि लायब्ररीची छापील पिशवी माझ्याबरोबर शिकागोला आली. त्यांनी पैसे भरा आणि ठेवून घ्या म्हटले. पण तसं करणं बरोबर वाटलं नाही. $५ लायब्ररीला त्यांना देण्यापेक्षा मी $५ देवून पोस्टानं पाठवून दिलं सगळं.

पुस्तके शक्यतो विकत घेत नाही. लायब्ररीच बरी वाटते आनि परवडतेही. जी चारदोन पुस्तके चुकुन विकत घेतली तीही कोणीतरी घेउन गेले परत न करण्यासाठी. मी मात्र वाचायला आणलेली पुस्तके नेहमीच परत केली आहेत. आता सांगा कोण-कोण आपल्या संग्रही असलेली पुस्तके मला वाचायला देणार आहे ते?

In reply to by विलासराव

पुस्तके शक्यतो विकत घेत नाही. लायब्ररीच बरी वाटते आनि परवडतेही. जी चारदोन पुस्तके चुकुन विकत घेतली तीही कोणीतरी घेउन गेले परत न करण्यासाठी.

मला पुस्तके विकत घेऊन वाचायला आवडते. त्यातलं जास्तं आवडलेलं पुस्तक दुसर्‍याला / मित्राला (त्याच्यात काहीतरी वाचन आवड निर्माण व्हावी ह्या हेतूने) वाचायला द्यायलाही आवडतं. अवांतर : कधी कधी वाचायला दिलेली पुस्तकं परंत येतात. कधी कधी नाही. त्याला काही इलाज नाही. वैतागून पुस्तकं परत मागायचं धारीष्ट्य होत नाही. माणसं निष्काळजी असतात. दुसर्‍याच्या संग्रहातलं पुस्तक आहे, आपण वेळेत परत देत नाही ह्याची त्यांना खंत नसते. त्याचे महत्व "पुस्तकंच तर आहेत, कधीही परत करता येतील" एवढेच असते

अगदी लहानपणी दिवाळी अंक हे लायब्ररीतूनच आणले जायचे. ठाण्यात बेडेकर हॉस्पिटलमधे डॉ. बेडकरांच्याच मुलीची लायब्ररी होती (अजून असल्यास कल्पना नाही.) तिथे आईची वर्षाचीच मासिके आणि पुस्तकांसाठीची मेंबरशीप होती. दिवाळीची वर्गणी जास्त असायची. कधी मी, कधी माझी बहीण शेजारील आमच्या मित्र-मैत्रीणी समवेत पहील्या दिवशी लायब्ररी उघडायच्या आधी जाऊन उभे रहात असू. म्हणजे हवी ती चांगली मासिके मिळतील या आशेने. मग आम्ही आणि आमचे सख्खे शेजारी आलटून पालटून ते अंक वाचून काढत असू... जानेवारी-फेब्रुवारीत या लायब्ररीत जुने झालेले दिवाळी अंक स्वस्तात विकायला काढायचे. मग त्यातील आवडलेले आणि पूर्ण न वाचलेले अंक कधी कधी घेतल्याचे आठवते... पण नेहमी नाही. पण वेळेवर आणि हवे ते अंक निवांत वाचनासाठी मिळणे ही घरच्या सगळ्यांनाच कटकट होऊ लागली. म्हणून कालांतराने किस्त्रीम, मौज, अक्षर वगैरे सारखे अंक विकतच घेऊन आम्ही वाचू लागलो. आणि उरलेल्या मासिकांसाठी लायब्ररी! त्यासाठी पण कधी कधी गोखले रोडवरील किसन बुकस्टॉल्स मधे आधीच नोंदणी करून ठेवत असू. मग त्याच्याकडे येणार त्या दिवशी सकाळी जायचे आणि अंक घेऊन येयचे. कधी कधी ते वेळेवर आले नाहीत की वैतागून परत यायचे. नंतर दिवाळी अंक अनेक ठिकाणी मिळू लागले आणि सोयिस्कर झाले. पुस्तके जरी ग्रंथालयातून (बेडेकर आणि ठाणे नगर वाचनालय) घेऊन वाचली असली तरी अनेक पुस्तके विकतच घेऊन वाचलेली आहेत. अगदी लहानपणापासून पुस्तके विकत घेतली गेली. काहींची पारायणे झाली तर काही, "एकदा हे पुस्तक सगळे वाचून संपवायचे आहे" असे म्हणत राहीलेले देखील आहे. ;)दादरच्या मॅजेस्टीक बुकस्टॉल्सचा मेंबर होतो आणि नंतर आजही घरचे ठाण्याच्या मॅजेस्टीकचे मेंबर आहेत. पण गंमत अशी, त्यांची मेंबरशीप इतर ठिकाणच्या मॅजेस्टीक मधे चालत नाही. कधीतरी आपण २१व्या शतकात जाऊ अशी आशा आहे. इंग्रजी पुस्तके अमेरीकेत आल्यावरच विकत घेऊ लागलो... कधी कधी उशीरा पुस्तके दिल्याने होणार्‍या लायब्ररीच्या दंडातून अधिक पुस्तके येऊ शकतात हे स्वानुभावाने कळले आणि त्यावरच भर देऊ लागलो. ;) आजही पुणे-मुंबईत गेल्यावर पुस्तकांसाठी खास दौरा असतो. नवीन - कुणाकडून समजलेली, तर कधी कधी माहीतगार दुकानदाराने सांगितलेली, तर कधी अगदी "गट फिलींगने" घेतलेली. आता आमच्या दोघांबरोबर मुलगी देखील पुस्तके घेण्यात आणि वाचण्यात उत्साह दाखवत असते, अमेरीकेत आणि भारतात देखील. इ-बुक्स, मुलीमुळे जास्त विकत घेतली आहेत. मी गुगल बुक्सवरून मिळणारी मोफत पुस्तके डाउनलोड करून घेतली आहेत. पण हार्ड कॉपि पुस्तक आवडते, पण सॉफ्ट कव्हरचे. तरी देखील मोह झाल्याने प्रकाशीत झाल्या झाल्या घेतले असे लेटेस्ट हार्ड कव्हर पुस्तक म्हणजे - स्टीव्ह जॉब्ज ची ऑफिशिअल ऑटोबायोग्राफी.

पुस्तके आणि दिवाळी अंक वाचण्यासाठी विकत घेण्याचे प्रमाण काय होते? आणि इतर बर्‍याच मुद्द्यांविषयी एकत्र लिहीतो आहे: माझ्या घरी पुस्तके विकत घेतली जात नव्हती. लहानपणापासून लायब्रीचा वापर करत होतो. घरातील वाचणार्‍या सर्व सदस्यांचे लायब्रीत वेगळे खाते होते. उन्हाळ्याच्या सुटीत लायब्रीच्या रिडींग रुम मध्ये जाऊन वाचायचो.अमुक एका लायब्रीतली वाचनीय पुस्तकं संपली की मग दुसरी लायब्री. कॉलेजला गेल्यावर कॉलेजच्या लायब्रीखेरीज ब्रिटीश कॉन्सील-युसीस- दादर मराठी- धुरु मराठी - ठाणे मराठी- डोंबिवली नगर परीषद-रीडर्स कॉर्नर वगैरे लायब्र्यांची पुस्तकं आणून वाचायचो.दिवाळी अंकांपैकी किर्लोस्कर -दिपावली- धनुर्धारी हे अंक वडील विकत घ्यायचे त्यामुळे वाचायचो. बाकीचे सरव अंक सर्क्युलेटींग लायब्रीतून आणून वाचायचो. १९९९ ते २००६ एकही मराठी अंक वाचला नाही.पुस्तके विकत घ्यायची हौस जुनी पुस्तके घेऊनच पूर्ण करावी लागली. एक नविन पुस्तकाच्या किमतीत कमीतकमी पाच जुनी पुस्तके मिळायची हे एकच महत्वाचे कारण .त्यामुळे चर्चेत असलेली पुस्तके नेहेमी दिडदोन वर्षानंतर वाचयला मिळायची.असे करत करत तीन चारशे पुस्तके जमली. कधीतरी निराशेच्या गर्तेत सगळी रद्दीत फेकून दिली.सहा महीन्याने ताळ्यावर आलो तेव्हा पुनश्च हरी ओम करत संग्रह करायला सुरुवात केली. जुने घर विकले (अत्यंत नाईलाजानी) तेव्हा घर पुस्तकासकट विकले. चार पाच हजार जास्त मिळाले.सध्याच्या घरात पुस्तकांना जागा नाही म्हणून एक गॅरेज विकत घेतले आहे त्यात पुस्तकं ठेवतो.सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत हे पुरेपुर समजल्याने सत्पात्री वाचक मित्र घरी आला तर पुस्तकं देऊन पण टाकतो. सध्याचे दिवाळी अंक हे न घेण्याचे कारण त्यातील बेसुमार जाहिराती आहेत असे वाटते का? किंबहुना दिवाळी अंकांचा दर्जा तुम्हाला आठवतो तेव्हापेक्षा घसरला आहे असे तुमचे निरीक्षण आहे का? सध्याचे दिवाळी अंक आणि त्यांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत आहे हे भेडसावणारे सत्य आहे. त्याची कारणे अनेक आहेत .मुख्य कारण असे की जाहीरातदार पैसे पुरेसे आणि वेळेवर देत नाहीत. जाहीरात दरपत्रकावर जे रुपये लिहीले असतात त्याच्या जेमतेम २५ % पैसे जाहीरातदार देतात. अपवाद फक्त दैनीकांच्या दिवाळी अंकांचा आहे. त्यांच्याकडे जाहीरात विभाग वर्षभर काम करत असतो आणि जाहीरातदाराला वर्षभर त्यांच्या सोबत काम करायचे असते त्यामुळे खातेपोते एक करत का होईना त्यांना जाहीराती मिळतात. फक्त दिवाळी अंक प्रकाशित करणार्‍यांना जाहीराती आणणे कर्मकठीण काम आहे. बर्‍याच अंकात प्रकाशक -संपादक -मालक एकच असल्याने कामाचा बोजा वाढतो. पैसे नाही मिळाले की अंकाचा दर्जा घसरतो. दर्जा घसरला की वाचक विक्री कमी होते. विक्री कमी झाली जाहीरातदार आणखी कमी होतात. हे दुष्ट चक्र आहे. त्यामुळे इच्छा असूनही चांगले अंक येत नाहीत.गेल्या वर्षी एका मासीकाचा नियमीत अंक आला नाही. (बहुतेक किर्लोस्करचा) पुढच्या अंकात संपादकांनी जे निवेदन दिले ते पुरेसे बोलके होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जाहीराती न मिळाल्याने खिशातील पैसे टाकून अंक चालवणे आता जमत नाही. ही शोकांतीका नियमीत प्रकाशित होणार्‍या मासीकांची आहे तर वर्षातून एकदाच येणार्‍या दिवाळी अंकाचे काय होत असेल याची कल्पना येईल. (मुद्दा अंकांच्या आर्थीक गणिताचा नाही हे कबूल आहे पण ) दर्जा घसरण्याचे हे महत्वाचे कारण आहे.त्यामुळे वाचक संख्या घटत जाते आहे.

औरंगाबाद सोडून इंदुरला येत होतो तेव्हा मला हा प्रश्न पडला होता.. कशाला घेतली एवढी पुस्तकं? उत्तर मिळालेलं नाहीय...अपेक्षितही नाहीय. कधीतरी मध्येच वाचन बंद पडलं.. पुन्हा सुरु झालं. चांगलं पुस्तक दिसलं की घ्यावं वाटतंच.

१. मी वर म्हटले आहे तसे तुमच्याकडे पुस्तके आणि दिवाळी अंक वाचण्यासाठी विकत घेण्याचे प्रमाण काय होते? काही कारणाने घेता नसले तरी ते विकत घेऊन संग्रही ठेवावे अशी इच्छा होती का? लहानपणी आई-वडील दर वर्षी २-३ अंक विकत घेत असत. त्यांनीच प्रथा थांबवली, पण का कोणास ठाऊक. २. कारण..जाहिराती... (मत नाही) ३. पुस्तके लायब्ररीतून घ्यावी, आधी वाचावी आणि मग संग्रही ठेवण्यायोग्य वाटली तरच विकत घ्यावी असा तुम्ही विचार करता का? पुस्तक परिक्षणांचा पुस्तके न वाचता थेट विकत घेण्यावर परिणाम होतो का? नाही. लायब्ररीतून पुस्तके क्वचित घेतो. दोन महिन्यातून एक (छापील) पुस्तक पुस्तक-क्लबमध्ये वाचण्याकरिता विकत घेतो. (म्हणजे ते पुस्तक सुचवणार्‍या मित्राचे "परीक्षण"च असते म्हणा ना.) ४. बजेटची टक्केवारी... (मत नाही.) मात्र आमच्या गावचे - आजकाल टुकार झालेले पूर्वीचे दमदार - वर्तमानपत्र विकत घेतो. छापील वर्तमानपत्रे नाहिशी होऊ नयेत अशी आशा आहे. ५. आपण पुस्तके संग्रही ठेवतो तेव्हा नक्की का ठेवतो? नक्की कसली आकांक्षा, इच्छा आपल्या मनात असते? इच्छा कितीही असली तरी जागा, किंवा पैसा अशा गोष्टी मनात येतात का? संदर्भपुस्तके संग्रही असल्याचे आवडते. बाकी एक-दोनदा वाचण्यायोग्य पुस्तके संग्रही ठेवायचा माझा काही हेतू नाही. लायब्ररी/रिसायकलची अळंटळं केल्यामुळे ही पुस्तके संग्रहात धूळ खात राहातात. दहाएक वर्षांनी ती घराबाहेर काढतो. ६. यापुढील काळामध्ये इ-बुक्समुळे प्रत्यक्ष जगातील जागेचा (घनफळ, क्षेत्रफळ) संबंध कमी आल्याने आपण पुस्तके अधिक प्रमाणावर घेऊ असे वाटते का? (पैसे साधारण सारखेच किंवा थोडे कमी लागतील असे गृहित धरून). आजवर फक्त मोफत ई-पुस्तकेच वाचलेली आहेत. पण पुढे विकतही घेईन. एकाच पुस्तकासाठी कागदी छपाई आणि ई-फाईल असे दोन्ही पर्याय उपलब्ध असल्यास आज कागदी पुस्तक विकत घेईन, पण पाचएक वर्षांनी ई-पुस्तक विकत घेईन. ७. जुन्या पुस्तकांचे, दिवाळी अंकांचे तुम्ही काय करता? बर्च दिवस धूळ खात पडतात. मग लायब्ररीत/रिसायकलिंगला नेतो. (संदर्भग्रंथ आणि काही थोडे अभिजात ललितवाङ्मय मात्र संग्रहात दशकानुदशके टिकून राहाते.)

सर्वांना चर्चेत भाग घेऊन आपले अनुभव कथन केल्याबद्दल आणि चर्चा पुढे चालवल्याबद्दल धन्यवाद. पैसा, छोटा डॉन, गणेशा यांचे प्रतिसाद आवडले. रामदास यांचा प्रतिसाद विचार करायला लावतो - विशेषतः जाहिरातींबद्दलचे त्यांनी म्हटले आहे ते. अशा खूपजणांनी सुरेख प्रतिसाद दिले आहेत. - इतके चांगले काही मला लिहीता यायचे नाही :) पण माझी उत्तरेही देते. २. सध्याचे दिवाळी अंक हे न घेण्याचे कारण त्यातील बेसुमार जाहिराती आहेत असे वाटते का? किंबहुना दिवाळी अंकांचा दर्जा तुम्हाला आठवतो तेव्हापेक्षा घसरला आहे असे तुमचे निरीक्षण आहे का? माझ्या मते जाहिराती दहापंधरा वर्षांपूर्वीही होत्याच. त्याचे प्रमाण अजून घसरणे शक्य नाही. एकतर अंक काढणार्‍यांना जाहिरातदारांकडे जावे लागते याचे कारण वाचकांकडून पुरेशा पैशाच्या आवकीची खात्री नसावी हे आहे. एखाद्या कार्यक्रमाच्या स्मरणिकेसारखी दिवाळी अंकांची स्थिती होऊ नये असे असले तर वाचकांची ते विकत घेण्याची इच्छा वाढली पाहिजे असे वाटते. ३. पुस्तके लायब्ररीतून घ्यावी, आधी वाचावी आणि मग संग्रही ठेवण्यायोग्य वाटली तरच विकत घ्यावी असा तुम्ही विचार करता का? पुस्तक परिक्षणांचा पुस्तके न वाचता थेट विकत घेण्यावर परिणाम होतो का? काही खूपच महाग पुस्तकांचे मी असे करते, पण सर्वच पुस्तकांबाबतीत मी असे करते असे नाही. अनेकदा लेखकांची नावे, कधी परिक्षणे पाहून मला पुस्तके विकत घ्यावीशी वाटतात आणि न वाचता मी ती घेतेही. यामुळे कधीतरी पैसे वाया गेल्याचा पस्तावा झाला असेल, पण तो फारसा नाही. ४. पुस्तके किंवा दिवाळी अंक विकत घेण्याचे तुमचे आजचे किंवा तेव्हाचे साधारण बजेट पगाराच्या किती टक्के असे/आहे? काय असावे असे तुम्हाला वाटते? (तुमचे मत आणि इतरांचे मत यात फरक नक्कीच असणार). टक्केवारी महत्त्वाची आहे असे माझे मत नाही, पण गणेशा यांचे कौतुक वाटले की त्यांनी पगाराच्या पाच टक्के रक्कम पुस्तके विकत घेण्यासाठी ठेवली. अर्थात मला वाटते पगार वाढतो त्याच प्रमाणात टक्केवारी वाढते किंवा वाढायला हवी असे नसावे! एकेकाळी जेव्हा पैसे मिळण्याची फारच वानवा होती, तेव्हा सगळ्यात वाईट वाटे ते पुस्तके घेता न आल्याचे. रोजचे वर्तमानपत्र पैशाचा विचार न करता घेता न आल्याचे. आता अर्थात पगाराच्या पाच टक्के नाही, पण बरीच पुस्तके (इंग्रजी/मराठी) विकत घेत असतो. ५. आपण पुस्तके संग्रही ठेवतो तेव्हा नक्की का ठेवतो? नक्की कसली आकांक्षा, इच्छा आपल्या मनात असते? इच्छा कितीही असली तरी जागा, किंवा पैसा अशा गोष्टी मनात येतात का? माझाच अनुभव वर लिहीला आहे. पुस्तके संग्रही ठेवल्याने मला सुख मिळते, कधीही संदर्भ काढून वाचता येतात, एवढे एकच कारण मला पुस्तके खरेदी करण्यास पुरेसे असते :) छोटा डॉन यांनी पुस्तके हाताळण्यावरून जे लिहीले आहे तेही माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. जागेचा प्रश्न पूर्वी एकेकाळी होता. घरात रहायलाच जागा नसे. अनेकदा घरे बदलली गेली. ही हलवाहलव करताना काही पुस्तके बॅगेत घालून ठेवली, ती अजून बाहेर यायची आहेत. पण काही संदर्भ आणि पुस्तके हवी असतात त्यासाठी जागा ठेवणे महत्त्वाचे असते असे वाटते. ६. यापुढील काळामध्ये इ-बुक्समुळे प्रत्यक्ष जगातील जागेचा (घनफळ, क्षेत्रफळ) संबंध कमी आल्याने आपण पुस्तके अधिक प्रमाणावर घेऊ असे वाटते का? (पैसे साधारण सारखेच किंवा थोडे कमी लागतील असे गृहित धरून). इ-बुक्स मला अजूनही विशेष रुचत नाहीत, वाचता येत नाहीत. आमची मुलगी मात्र सहज वाचते. पण गूगलवर असलेली जुनी फ्रीइ-बुक्स मी वाचलेली आहेत आणि त्यांचा उपयोग मला जाणवतो. पण जेव्हा वीज जाते तेव्हा हाती लागते ते असेच कागदी लेखन. तरी इ-बुक्सच्या सुविधेमुळे, जागेच्या बचतीमुळे कदाचित अशी पुस्तके विकत घेण्याकडे माझा यापुढे कल वाढू शकेल असे कधीतरी वाटते. ७. जुन्या पुस्तकांचे, दिवाळी अंकांचे तुम्ही काय करता? दिवाळी अंक बरेच देऊन टाकते, काही खास इतर दिवाळी अंक आणि पुस्तके मला देववत नाहीत. ती घरात कुठेतरी राहतात. मध्येच कधीतरी हाती लागली की परत उजळणी होते.

१. तुमच्याकडे पुस्तके आणि दिवाळी अंक वाचण्यासाठी विकत घेण्याचे प्रमाण काय होते? काही कारणाने घेता नसले तरी ते विकत घेऊन संग्रही ठेवावे अशी इच्छा होती का? पूर्वी दिवाळी अंक विकत घेण्याचं प्रमाण कमी होतं. आर्थिक कारण हे मुख्य कारण होतं. संग्रही ठेवण्याची इच्छा होतीच. काही वर्षं जुने दिवाळी अंक असे. त्यांतले काही अंक अजून संग्रही आहेत. २. सध्याचे दिवाळी अंक हे न घेण्याचे कारण त्यातील बेसुमार जाहिराती आहेत असे वाटते का? किंबहुना दिवाळी अंकांचा दर्जा तुम्हाला आठवतो तेव्हापेक्षा घसरला आहे असे तुमचे निरीक्षण आहे का? काही दिवाळी अंक नियमाने घेतो. यंदाही घेतले. अंक घेतले नि वाईट निघाले तर वाचून मग मनातल्या मनात शिव्या घालतो. चांगले वाटले तर मित्रांना कळवतो. दिवाळी अंकांचा दर्जा घसरला आहे हे निश्चित. केवळ बेसुमार जाहिराती आहेत हे मला अंक न घेण्याचे पुरेसे कारण वाटत नाही. मजकूर चांगला असेल तर त्या जाहिरातींचा काही त्रास नाही. ३. पुस्तके लायब्ररीतून घ्यावी, आधी वाचावी आणि मग संग्रही ठेवण्यायोग्य वाटली तरच विकत घ्यावी असा तुम्ही विचार करता का? केवळ विकत घेतानाची चाळण म्हणून ग्रंथालयातून पुस्तक घ्यावं असा विचार कधी केला नव्हता. सगळी पुस्तकं विकत घ्यायला परवडत नाहीत. अनेक पुस्तकं बाजारात विकत घ्यायलाही उपलब्ध नसतात. असलेली विकत घ्यायला आपल्याकडे पैसे असतातच असं नाही. संदर्भाला लागणारी पुस्तकंही ग्रंथालयातच मिळतात. म्हणून ग्रंथालय लावलं. अर्थात ग्रंथालयात वाचलं आणि मग पुस्तक संग्रही ठेवायला मिळवण्यासाठी धडपडलो असं बऱ्याच वेळा झालं आहे. पण ते असं पूर्वनियोजित वगैरे नव्हतं. पुस्तक परिक्षणांचा पुस्तके न वाचता थेट विकत घेण्यावर परिणाम होतो का? काही वेळा होतो. पण नेहमीच नाही. ४. पुस्तके किंवा दिवाळी अंक विकत घेण्याचे तुमचे आजचे किंवा तेव्हाचे साधारण बजेट पगाराच्या किती टक्के असे/आहे? काय असावे असे तुम्हाला वाटते? (तुमचे मत आणि इतरांचे मत यात फरक नक्कीच असणार). असं ठरीव काही नाही. फारसे पैसे नव्हते तेव्हाही पुस्तकं घेतच होतो. फक्त ती जुनी असायची. मी रद्दीश्वराचा निस्सीम उपासक आहे. ज्या काळात खिशात पैसे नसायचे पण वाचायला वेळ आणि उत्साह भरपूर होता तेव्हा रद्दीवाल्यांनीच मला वाचतं ठेवलं आहे. रद्दीतून चांगली नवी कोरी पुस्तकंही मला मिळाली आहेत. तीही खूप स्वस्तात. केळकरांच्या टिळकचरित्राचे तीनही खंड मला रद्दीत मिळाले. सत्तांतर ह्या गोविंद तळवलकरांच्या पुस्तकाचे भाग टप्प्याटप्प्याने मिळाले. माझे रद्दीवाले मला उधारीवरही पुस्तकं द्यायचे. पैसे खिशात खुळखुळायला लागल्यावर नवी पुस्तकं घेणं परवडू लागलं. पण रद्दी चिवडत बसायला द्यावा लागणारा वेळ मिळेनासा झाला. त्यामुळे जुनी पुस्तकं शोधणं कमी झालं. दर महिन्याला पुस्तकं घेतो. ठरीव अंदाजपत्रक नाही. खूप पैसे खर्च झाले असं वाटत नाही तोवर पुस्तकं घेतो. ५. आपण पुस्तके संग्रही ठेवतो तेव्हा नक्की का ठेवतो? नक्की कसली आकांक्षा, इच्छा आपल्या मनात असते? इच्छा कितीही असली तरी जागा, किंवा पैसा अशा गोष्टी मनात येतात का? जागा, पैसा अशा गोष्टींचा विचार मनात येतो. तो अटळ आहे. पण व्यसनाला औषध नसतं. जागेशी आणि पैशाशी जुळवत जितकी पुस्तकं संग्रही ठेवता येतील तितकी ठेवतो. संग्रहातली सगळी पुस्तकं काही आपण नियमित वाचत नसतो. ती बऱ्याच वेळा पडून असतात. मग मी इतकी पुस्तकं संग्रही का ठेवतो ग्रंथालयांतून का वाचत नाही? ह्याला माझं उत्तर आहे की आपण पुरणाचं भांडं काही रोज वापरत नाही. गरज लागलीच तर ते शेजाऱ्यांकडून आणून वापरता येतं. पण तरीही आपण आपलं भांडं घेतोच. माझ्या संग्रहातल्या पुस्तकांचंही तसंच आहे. मला हवं तेव्हा ते मला उपलब्ध व्हावं ही भावना त्यामागे आहे. ते पुस्तक म्हणजे एखादा संदर्भग्रंथच पाहिजे असं नाही. ते कोणतंही असेल. पण मला ते आठवतं तेव्हा काढून वाचायला मिळणं ही गोष्टं फार सुखाची असते. अनेक पुस्तकं घेऊन ठेवलेली असतात. घेतल्याघेतल्या वाचतोच असं नाही. पण कधीतरी आवश्यकता भासते आणि ते पुस्तक आठवतं तेव्हा ते माझ्या हाती उपलब्ध असतं. रा. भा. पाटणकरांनी लिहिलेलं 'कांटची सौदर्यमीमांसा' हे पुस्तक मी १३वीत असताना केवळ स्वस्त (बहुधा १३ रुपयांना) होतं म्हणून (आणि दादरच्या विष्णुभवनातल्या मॅजिस्टिकच्या दुकानात एकुलती प्रत मला दिसली म्हणून) विकत घेतलं होतं. ते वाचायचा प्रयत्न केला. पण जमलं नव्हतं. वाचण्याइतकी अक्कलही फुटली नव्हती. ते तसंच पडून होतं. एमएच्या अभ्यासक्रमात सौदर्यशास्त्र ह्या विषयासाठी ते पुस्तक नेमलं होतं. तेव्हा वर्गात केवळ अस्मिदिकांच्याच संग्रहात ते पुस्तक होतं. ते सुखाचं वाटलं होतं. ६. यापुढील काळामध्ये इ-बुक्समुळे प्रत्यक्ष जगातील जागेचा (घनफळ, क्षेत्रफळ) संबंध कमी आल्याने आपण पुस्तके अधिक प्रमाणावर घेऊ असे वाटते का? (पैसे साधारण सारखेच किंवा थोडे कमी लागतील असे गृहित धरून). पुस्तकांचं रूप बदलेल. पण पुस्तकं घेत राहीन असं नक्कीच वाटतं. ७. जुन्या पुस्तकांचे, दिवाळी अंकांचे तुम्ही काय करता? हा एक दुखरा भाग आहे. जुन्या पुस्तकांपैकी नकोचा शिक्का मारून पुस्तकं बाजूला काढणं हे फार कष्टाचं काम असतं. ते आजवर २-३ वेळा तरी केलं आहे. जुनी म्हणून काढून टाकलेली काही पुस्तकं परत नव्याने विकतही आणली आहेत. अशी पुस्तकं साधारणपणे ग्रंथालयांना देतो. किंवा आवडीने संग्रह करणारे असतील त्यांना देतो. काही वेळा निरुपाय म्हणून रद्दीतही विकली आहेत. दिवाळी अंक हा खूप त्रास देणारा प्रकार आहे. संबंध अंकात १-२ लेख चांगले आहेत म्हणून तो सबंध अंकच संग्रही ठेवला आहे. असं बऱ्याचदा घडतं. असे अंकही संग्रही आहेत. निरुपाय झालाच तर वर सांगितलेल्या पुस्तकांच्या वाटांपैकी एका वाटेने ते अंक जातात. आजवर मराठीत प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकांचं खरं तर एक मोठ्ठं संग्रहालय होण्याची आवश्यकता आहे. कुणी असं करत असल्याचं ऐकिवात होतं. पण पाठपुरावा करणं जमलं नाही. मित्रांसोबत आपणच हे काम व्हावं म्हणून प्रयत्न करायचं असंही एकदा ठरवलं होतं. तेही करू शकलो नाही.

In reply to by सुशान्त

धन्यवाद. >>ह्याला माझं उत्तर आहे की आपण पुरणाचं भांडं काही रोज वापरत नाही. गरज लागलीच तर ते >>शेजाऱ्यांकडून आणून वापरता येतं. पण तरीही आपण आपलं भांडं घेतोच. वा वा वा! सुशान्त यांनी अजून लिहीते व्हायला हवे असे वाटते.

१. मी वर म्हटले आहे तसे तुमच्याकडे पुस्तके आणि दिवाळी अंक वाचण्यासाठी विकत घेण्याचे प्रमाण काय होते? काही कारणाने घेता नसले तरी ते विकत घेऊन संग्रही ठेवावे अशी इच्छा होती का? दर दिवाळीला माझे वडील दोन तरी दिवाळी अंक आणायचे. अरे दिवाळीला फराळाबरोबर मोठमोठ्या लेखकांचे लेखन वाचले पाहिजे असे म्हणायचे. आजही आम्ही न चुकता दिवाळी अंक विकत घेतो. फरक असा होत चालला आहे की, विकत घेण्याअगोदर महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आलेले दिवाळी अंक चाळल्यानंतर कोणता अंक संग्रही असला पाहिजे याची निवड होते. २. सध्याचे दिवाळी अंक हे न घेण्याचे कारण त्यातील बेसुमार जाहिराती आहेत असे वाटते का ? जाहीराती खूप असतात म्हणून दिवाळी अंक घ्यायचा नाही, हे कारण आमच्याकडे नसते. आपल्याला आवडणारे लेखन आहे ना मग इतर प्रश्न गौण. किंबहुना दिवाळी अंकांचा दर्जा तुम्हाला आठवतो तेव्हापेक्षा घसरला आहे असे तुमचे निरीक्षण आहे का? दिवाळी अंकाचा दर्जा घसरला आहे का त्याबद्द्ल इतके अधिकारवाणीने बोलता येणार नाही. पण दिवाळी अंकात खूप बदल होत आहेत इतके मात्र निश्चित. ३. पुस्तके लायब्ररीतून घ्यावी, आधी वाचावी आणि मग संग्रही ठेवण्यायोग्य वाटली तरच विकत घ्यावी असा तुम्ही विचार करता का? हम्म, असे बर्‍याचदा होते हे खरे आहे. पुस्तक परिक्षणांचा पुस्तके न वाचता थेट विकत घेण्यावर परिणाम होतो का? परिक्षणांचा पुस्तके विकत घेण्यावर फारसा परिणाम होत नाही. ४. पुस्तके किंवा दिवाळी अंक विकत घेण्याचे तुमचे आजचे किंवा तेव्हाचे साधारण बजेट पगाराच्या किती टक्के असे/आहे? काय असावे असे तुम्हाला वाटते? (तुमचे मत आणि इतरांचे मत यात फरक नक्कीच असणार). आता प्रमाण वाढले आहे. पण प्रत्येक महिन्याला पुस्तक घेईनच असे काही नसते. पुस्तकाच्या दुकानावर ठरवून गेल्यावर आपल्याला कोणते पुस्तक आवडू शकते त्याचं काही सांगू शकत नाही. आपल्या आवडत्या पुस्तकाच्या दुकानावर गेल्यावर 'हे बघू ते बघू' असे करता करता कधी कधी दोन हजारापर्यंतही पुस्तके घेतली आहेत. ५. आपण पुस्तके संग्रही ठेवतो तेव्हा नक्की का ठेवतो? नक्की कसली आकांक्षा, इच्छा आपल्या मनात असते? इच्छा कितीही असली तरी जागा, किंवा पैसा अशा गोष्टी मनात येतात का? कधीही पुस्तके उघडून वाचता येतात हा पुस्तक घेण्याचा पहिला फायदा असतो. वाचलेले कधी काही कोणाला सांगायचे असते. कधी काही संदर्भ लेखनासाठी पुस्तके हवी असतात. पैसा आणि जागा असा प्रश्न कधी मनात येत नाही. वाईट एकाच गोष्टीचे वाटते. कोणी पुस्तक नेले आणि परत आणले नाही की, पुस्तक घेणेच नको. असा विचार माझ्या मनात येतो इतकेच. ६. यापुढील काळामध्ये इ-बुक्समुळे प्रत्यक्ष जगातील जागेचा (घनफळ, क्षेत्रफळ) संबंध कमी आल्याने आपण पुस्तके अधिक प्रमाणावर घेऊ असे वाटते का? (पैसे साधारण सारखेच किंवा थोडे कमी लागतील असे गृहित धरून). आत्ताच काही सांगता येणार नाही. ७. जुन्या पुस्तकांचे, दिवाळी अंकांचे तुम्ही काय करता ? वेळ खूप असला की पुस्तके क्रमवार लावण्याचा प्रयत्न करणे. पुन्हा ती इकडे तिकडे ती हलवलीच जातात. अशा वेळी काही दिवाळी अंक राखून ठेवली तरी काही सारखी मधे मधे येतात असे वाटल्यावर काही दिवसांनी दुर्दैवाने ती रद्दीतच जातात. प्रतिसाद लिहिण्यासाठी पहिला लंबर माझाच होता. पण नंतर लिहू असा विचार केल्यामुळे पार शेवटचाच लंबर लागला. :) -दिलीप बिरुटे