Skip to main content

स्वातंत्र्याची दुसरी लढाई

लेखक विकास यांनी बुधवार, 06/04/2011 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. बहुगुणी यांचा, "उन्मन क्षण " वर चर्चा चालू असतानाच लक्षात आले की आज पाच एप्रिल उजाडलेले आहे... आज भारतात एका अर्थी इतिहास घडत आहे. ह्या प्रसंगांच्या होऊ शकणार्‍या दृश्य परीणामांवर त्याची खोली ठरेल इतकेच. पंतप्रधान मनमोहनसिंग, संपुआच्या आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्या श्रीमती सोनिया गांधी आदींशी संपर्क करून देखील लोकपाल विधेयक पुढे जात नसल्याने आणि भ्रष्टाचाराच्या एकापाठोपाठ एक घटना बाहेर येत असल्याने, वैतागून श्री. अण्णा हजार्‍यांनी आमरण ऊपोषण चालू केले आहे. राळेगणसिद्धी या हजार्‍यांच्या गावामधील गावकर्‍यांनी गुढीला काळे कापड लावून अण्णांना पाठींबा आणि भ्रष्टाचाराचा निषेध केला. या आंदोलनाला देशातील अनेक सेवाभावी संस्था, अगदी भिन्न विचारांच्या संस्था आणि व्यक्ती पाठींबा देत आहेत. त्यात किरण बेदी पण आहेत, स्वामी अग्नीवेशही आहेत, बाबा रामदेव आणि श्री श्री रविशंकरही आहेत. भारतभर आणि जगात इतरत्रही भारतीय या उपोषणाला पाठींबा देत आहेत आणि लोकपाल विधेयकाची मागणी करत आहेत. अधिक माहिती येथे पहा. अण्णांच्याच भाषेत, या स्वातंत्र्याच्या दुसर्‍या लढाईस शुभेच्छा! http://indiaagainstcorruption.org/

वाचने 38569
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

उच्चपदस्थ न्यायव्यवस्थेतले लोक लोकपाल कायद्याच्या कक्षेतून बाहेर ठेवावे असे मत अण्णांनी व्यक्त केले आहे. लोकांच्या प्रतिनिधींवर लोकपालाचा चाप हवा पण लोकांचे प्रतिनिधी नसलेल्यांवर कसलाच चाप नको असे चित्र दिसते आहे. (स्वयंघोषित) शाहाण्यांच्या (उदार भासणार्‍या) हूकूमशाहीकडे वाटचाल कन्फर्म होत आहे. (अवांतर: मूळ घटना बनवणारे सगळे वकील होते त्यामुळे त्यांनी घटनेत न्यायव्यवस्थेला कोणाशीच अकाउंटेबल ठेवले नाही असे मत एकदा वाचले होते. या लोकपाल बिलात सुद्धा असेच काहीतरी होणार असे दिसते).