Skip to main content

कालपासून उद्याची चिंता

Published on शुक्रवार, 04/02/2011
परवाच मला माझा एक 'कालपासून उद्याच्या चिंतेत असलेला' मित्र भेटला. म्हटलं, "मित्रा कसा आहेस? काय चाल्लंय?" वास्तविक काही प्रश्न हे फक्त विचारायचे म्हणून विचारलेले असतात हे वास्तवात रहाणार्‍या माणसाला समजतात. पण त्याने ते प्रश्न फारच मनावर घेतले आणि कोणीतरी सहज का होइना पण आपल्या वर्तमानाबद्दल विचारतय हे बघून तो म्हणाला, "मागच्या पानावरून पुढे सुरू आहे. कालही उद्याची चिंता करत होतो, आजही तेच. सगळी सुखं जरी पैशाने विकत घेता येत नसली तरी अशा सर्व सुखांपर्यंत पोहोचण्याची माध्यमं मात्र खर्चिक असतातच. त्यामुळे आई-वडिल, बायको आणि मुलं या तीन पिढ्यांची वर्तमानं ही मी काल केलेल्या उद्याच्या नियोजनावर अवलंबून असतात. त्यामुळे कालच्या लेजरमधली कॅरीड फॉरवर्ड चिंता आजच्या रकान्यात ब्रॉट फॉरवर्ड करून लिहीणे चालू आहे." त्याची ही विचारमाला खंडीत करावी म्हणून म्हटलं, "अरे पण शेवटी त्यांना सुखी बघून तुही सुखी होणारच की. आणि त्यांच्या सुखाच्या प्रत्येक तुझा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग..." मला मधेच तोडत तो म्हणाला, "सहभाग? असतोच ना रे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत मी असतो, पण ऑफिसमधे. या सर्वांच्या आनंदातला माझा सहभाग हा माझा कन्टिन्युअस डिस्टन्स कोर्स आहे. उद्याची चिंता असावीच रे, पण आजचं काय? आपल्या आयुष्यातील घटनांमधला सहभाग असा प्लॅन कसा बरं करता येईल? शेवटी काय तर सध्या जगत असलेल्या क्षणातलं तान्ह्या बाळाचं झोपेतलं हसू, बायकोचं गर्द प्रेम, बाबांचं पेपरमधे छापून आलेलं पत्र आणि आईचे छोट्याबरोबरचे चिमखडे बोल हे कोणत्यातरी चॅनलच्या सिरीअल सारखं रिपीट टेलिकास्ट नसतं. जे होतं ते आजच. टेक इट ऑर लिव्ह इट. रोजच्या गडबडीत हे सगळं आपण नोटीसच करत नाही आणि असलं सगळं नोटीस केलंच तर स्पॉन्टेनियसली एन्जॉय करायचं आणि परत जैसे थे!" मी म्हणालो, "चल जातो रे, एफडीचे रेट वाढलेत. बँक बंद व्ह्यायच्या आत जातो." तो हसला असावा बहूदा, मी मान खाली घालून केव्हाच निमूट चालायलाही लागलो होतो. सुकोबा म्हणतातः उद्यासाठी जीव किती| लावशी टांगणी|| जग आजचा हा क्षण| आजच्याच अंगणी|| बोला जय हारी विट्ठाल!!! भारी समर्थ

याद्या 1647
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

पांघरसी जरी असला कपडा येसी उघडा जासी उघडा कपड्यांसाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे! या ओळी आठवल्या. छान लिहिलंय भासमर्थ साहेब.