Skip to main content

१९४३ मधल्या बंगालमधील दुष्काळातील लाखो गरिबांच्या मृत्युस चर्चिल जबाबदार आहे का?

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 16/09/2010 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.outlookindia.com/article.aspx?266849 ह्या दुव्यावर एका पुस्तकासंबंधी काही माहिती दिली आहे. सर्व माहिती आंग्ल भाषेत आहे ती मुळातुन वाचलेली बरी राहिल. कृपया सवड मिळेल तेव्हा जरुर वाचा. सदर लेखावर जाणकारांच्या प्रतिक्रिया जाणुन घेण्यास उत्सुक आहे.

वाचने 14450
प्रतिक्रिया 48

प्रतिक्रिया

सदर लेखावर जाणकारांच्या प्रतिक्रिया जाणुन घेण्यास उत्सुक आहे.
+१. चर्चिलचा भारतद्वेष प्रसिद्ध आहेच. पण तरीही या विषयावरील सांगोपांग चर्चा वाचायच्या अपेक्षेत आहे. विशेषतः क्लिंटन, डॉ. डाढे, इंद्रराज वगैरेंच्या प्रतिक्रियांच्या अपेक्षेत.

हेच म्हणतो.. चर्चिलचा भारतद्वेष खूप जास्त होता. त्याची काही मुक्ताफळं सांगायची झाली तर गांधीजींना "नागडा फकीर" म्हणून संबोधणे. "इंग्रज गेल्यावर भारतावर गुंड राज्य करतील वगैरे... जणु इंग्रज "देवदूत" होते !

In reply to by चिगो

चर्चिलचा भारतद्वेष खूप जास्त होता सहमत. त्याच्या साम्राज्यवादी धोरणात 'भारतिय नेते भारत सांभाळायच्या लायकीचे नाहीत' असे मत होते!. भारतिय नेत्यांच्या खाजगी मते/जीवनात आणि सार्वजनिक जीवनात खूप तफावत असते असे त्याचे मत होते. भारताची अनेक शकले होतील(One Hindustan,One Pakistan and hudreds of Princistans!) हा त्याचा गैरसमज मात्र भारतिय नेत्यांनी, विशेष करुन सरदार पटेलांनी दूर केला.

In reply to by चिरोटा

भारतिय नेत्यांच्या खाजगी मते/जीवनात आणि सार्वजनिक जीवनात खूप तफावत असते भारतीय नेते म्हणजे नेहरु असेच मत होते बहुधा त्याचे. त्या काळातील सगळे नेते निस्प्रुह होते, खाजगी जीवनातही आणि सार्वजनिक वागणुकीतही. त्यांची खाजगी जीवने काय माहिती असणारेत त्या टोण्याला.

In reply to by चिगो

"इंग्रज गेल्यावर भारतावर गुंड राज्य करतील वगैरे... हे वास्तव आहे. धन्यवाद चर्चिलसाहेब. तुम्ही खरे भविष्यवेत्ता आहात/होता.

कौल उडाल्याबद्दल अभिनंदन! तुम्ही चर्चिलला पाठिंबा दिला असतात तर नसता उडाला कौल तुमचा! आता तरी शहाणे व्हा. लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. लेख उतरवून घेतला आहे, आज वाचेन.

काहि बोलु शकत नाहि ....पण लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कोण जबाबदार आहे हे आधी नक्की करावे

भारताचे लोक भारतावर राज्य करायला नालायक आहेत ही चर्चिलची वर्णद्वेषमूलक उक्ती खरी आहे की काय असे वाटू लागले आहे. शरद पवार जे हजारो अब्ज रुपये स्विस बॅंकेत जमा करुन आहेत. वेळोवेळी धान्य महाग होणार वगैरे भविष्ये सांगतात. हजारो टन धान्य गोदामात पडून सडून गेले तरी चालेल पण आम्ही ते उपलब्ध करुन देणार नाही. ह्यांचे लुटणे, ह्यांचा भ्रष्टाचार हे केवळ आपले लोक म्हणून जास्त गोड वाटते का? आणि इंग्रजांचा परके म्हणून जस्त बोचतो का? इंग्रजांचे पैसे इंग्लंडात जायचे ह्यांचे आणि असल्या लोकांचे स्विस बँकेत जातात. फार फरक नाही. शिवाय मायावती, कलमाडी, लालू प्रसाद, शिवराज पाटील अशी अनेक नावे घेता येतील ज्यांना बघून खरोखर प्रश्न पडतो की असल्या इंग्रजांना हाकलून असल्या लोकांना राज्य करायला देणे ही प्रगती आहे का? घराणेशाही, हुकुमशाही, वशिलेबाजी, हुजरेगिरी, भ्रष्टाचार, राजकारण ह्या गोष्टींनी लडबडलेले आहे. आणि ह्यातून सुटका व्हायची शक्यता दिसत नाही. आजकाल मुक्त धोरण आले म्हणून काही लोक सधन बनले आहेत. पण बाकीच्यांचे काय? महागाई, कायमची वीज टंचाई, अपुरे रस्ते, अफाट गरीबी, गुन्हेगारी, अतिरेक्यांची कायम टांगती तलवार, भडकलेले काश्मीर हे प्रश्न नित्याचेच बनले आहेत. राज्यकर्ते ते सोडवणार नाहीत. इंग्रज यापेक्षा फार वेगळे होते का?

"......रेल्वे कलकत्याच्या हद्दीत शिरत असतानाच भुकेने मरणप्राय अवस्थेला पोहोचलेल्या पुरुषांची, स्त्रियांची, मुलांची, कच्च्याबच्च्यांची मैलभर दिनवाणी रांग पाहिली...त्यांच्या आशाळभूत नजरा आमच्या बोगीकडे पाहात होत्या... जणू काय आम्ही म्हणजे त्यांची जगण्याची शेवटची आशाच. कलकत्याच्या मैलभर परिघात पाहावे तिकडे पोटाच्या फुगलेल्या लोंबत्या ढेर्‍या आणि काटकीसारखी वाळलेले पाय दाखवत, हात पुढे करीत एनॅमलचे भांडे आमच्यासमोर आपटत, भगभगत्या उन्हात भीक मागत हिंडणारी नागडी पोरे.... देवा, इंग्लंडमध्ये सामान्यातल्या सामान्याने या दुष्काळावर काहीतरी उपाय करणे आवश्यक आहे... शेवटी हिंदुस्थानची जनता ही आपल्या साम्राज्याचाच एक भाग आहे ना..?" ~~ हा 'आँखो देखा हाल' मधुश्री मुखर्जी यांचा नसून त्या काळात कलकत्यात ड्युटीवर आलेल्या 'क्लाईव्ह ब्रॅन्सन' या सैनिकाचा, ज्याने पत्राद्वारे कलकत्यातील भीषण दुष्काळाचे वर्णन लंडनला केले होते...इंग्लंडला परतल्यानंतर तो या संदर्भात नक्कीच अधिकचे डॉक्युमेन्टेशन करू शकला असता, पण तत्पूर्वीच त्याची युध्दभूमीवर बदली झाली आणि तिथेच तो मारला गेला. ब्रॅन्सनसारखे अकाली मरतात आणि दारूचे घोट घेत, सिगारच्या धुराचे लोटच्या लोट सोडत व्हॉइसरॉयचे परिस्थितीवरचे अहवाल कमालीच्या थंडपणे वाचून ते बाजुला सारणारे चर्चिलसारखे नराधम अशा दुष्काळाला आपल्या खिजगिणतीतही घेत नाहीत, ही सर्वात संतापजनक बाब होती. मधुश्री मुखर्जी यांच्या "बंगाल दुष्काळ आणि चर्चिल" या संशोधनाचे आणि त्यातील माहितीची अधिकृतता तपासून घेण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाना दाद देताना हेही लक्षात ठेवणे फार जरूरीचे आहे की, त्या भयावह दुष्काळात (ज्यामध्ये वीस ते पंचवीस लाख लोकांचे बळी गेले होते) केवळ नैसर्गिक परिस्थिती कारणीभूत नसून धान्य वाटप योजनेतील गलथानपणा (इंग्रजीत ज्याला "मिसमॅनेजमेंट" असे संबोधले जाते...) तितकाच कारणीभूत होता. देशातील ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नोबेल विजेते अमर्त्य सेन (जे स्वतः १९४३ मध्ये, वयाच्या ९ व्या वर्षी कलकत्यातच होते, आणि त्या दुष्काळाच्या आठवणी त्यांच्यासोबत आहेत...) यानी या विषयावर सादर केलेल्या शोधनिबंधात (सन १९८१) म्हटले आहे की, "तो दुष्काळ, धान्य कमी पडले म्हणून पडला असे न म्हणता धान्य वाटपातील त्रुटी, भेदाभेद, नीट वर्गीकरण न करणे, एकसुत्रीपणाचा अभाव आदी गोष्टीदेखील तितक्याच कारणीभूत झाल्या हे मान्य करावे लागेल. २५ लाखाचा मृत्युचा आकडा अंगावर शहारे आणणारा तर होताच पण तो तितपत जाऊ देण्यास त्यावेळेस झालेला धान्य वाटपातील अनागोंदी कारभार जास्त जबाबदार आहे." डॉ.सेन यांनी निबंधात दिलेल्या आकडेवारीनुसार त्या साली बंगालमध्ये पुरेसे धान्य उपलब्ध होते....नव्हता ग्रामीण भागातील लोकांकडे तो पुरेसा पैसा..खरेदीसाठी. बेकारीने थैमान घातले होते. जमिनदारांनी रयतेला लुबाडले होते....वेठबिगारी पाचवीला पुजली होतीच... मग नेहमीचा तो जुना इतिहास या देशाचा. नाही काम गावात तर घ्या डोक्यावर गाठोडे, घ्या आत्ताच खपाटीला गेलेली पोटे, वाळलेली बायका-पोरे आणि धरा मग कलकत्याचा रस्ता.....कलकत्ता तर कितीजणांना सामावून घेणार? किती लोकाना कुठे आणि कसले काम देणार? आता शहरातल्या व्यापार्‍यांनी आली या संधी चालून तर भरा गोडावूने आणि दाबून ठेवा सगळा धान्याचा साठा. डॉ.सेन यांनी परत दाखवून दिले आहे की, ज्यावर्षी धान्य दुष्काळ पडला असे म्हटले गेले त्या वर्षीदेखील मागील वर्षाप्रमाणेच पीक मिळाले होते. मग हे धान्य गेले कुठे आणि कलकत्ता माणसांनी भरून वाहु लागला तरी बंगालचा गव्हर्नर आणि मुस्लिम लीगी सरकार तो साठा सक्तीने बाहेर काढून शासनमान्य दरात विक्री का करू शकले नाहीत, हा राजकीय पटलावरचा कोड्याचा डाव. चर्चिल आला ते परिस्थितीच्या या पायरीवर, ज्यावेळी हाहा:कार माजायला सुरूवात झाली होती. पण म्हणून त्याची या जबाबदारीतून मुक्तता होऊ शकत नाही. व्हॉईसरॉय लिनलिथगोच्या "बंगाल दुष्काळासाठी धान्य पाठविणे फार गरजेचे आहे आणि ऑस्ट्रेलियाकडील शिलकेचा भरपूर साठा याकरीता उपयोगात आणता येईल..." या विनंतीला त्याने "पुरेशी जहाजे उपलब्ध नाहीत" असे निष्ठूरपणे सांगून वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. याला कारण एकच म्हणजे तो कमालीचा वंशवादी होता. जरी हिंदुस्थानाला तो "ज्युवेल इन द क्राऊन" म्हणत असला तरी समस्त भारत म्हणजे 'काळ्यांचा देश' असेच त्याचे अखेरपर्यंत मत होते. गांधीना न भेटण्याचे त्याचे कारण वर्णवर्चस्व हेच होते. “I hate Indians. They are a beastly people with a beastly religion.” हे त्याचे मत या गोष्टीला पुष्टी देते की, बंगालमधील त्या भयानक दुष्काळात १ लाख मेले का ३० लाख....त्याच्या नजरेत किंमत शून्य होती. हिटलरला पराभूत करण्यामध्ये त्याच्या युध्द्कौशल्याचे भलतेच कौतुक झाल्यामुळे जगाच्या आणि अनेक भारतीच्यांच्या नजरेत तो एक हीरो झाला होता.....पण जग जेवढे त्याचे कौतुक करायचे ते करू दे, भारतीयांना तो शेवटपर्यंत हलक्या नजरेनेच पाहत होता हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्याच्या नीचपणाचा कळस इथे झाला होता की, ज्यावेळी इथल्या युद्धकालिन सचिवाने 'बंगालला तातडीने धान्याची मदत पाठविणे गरजेचे आहे. मयताचा आकडा वीस लाखाच्यावर गेला असून तो दिवसेदिवस वाढत चालला आहे..." अशा मजकुराची तार पंतप्रधान या नात्याने चर्चिलला केली तिला उत्तर देताना अत्यंत खुनशीपणे चर्चिलने विचारले की, "इतके मेले? मग त्यात गांधीदेखील मेला काय ते कळवावे..." असल्या उलट्या काळजाच्या माणसाचा 'त्याने दुसरे महायुध्द जिंकून दाखविले' म्हणून ज्याना उदोउदो करायचा त्यानी करावा....पण त्याबरोबर हेही लक्षात ठेवावे की, बंगालच्या त्या दुष्काळ काळात त्यावेळच्या व्हॉईसरॉय आणि चक्षुर्वेसत्यम अहवाल पाठविणार्‍या त्यांच्याच देशाच्या अन्य राजनितितज्ज्ञाच्या विनंत्याकडे त्यांने मानवतेच्या भूमिकेतून पाहिले असते तर तो युद्धसम नरसंहार काही तरी पातळीपर्यंत नक्कीच टळला असता. पण नाही...ते होणे नव्हते...जितके मरायचे तितके मेलेच, कारणे अनेक असतील, पण त्या अनेक कारणात एक कारण होतेच होते, अन ते म्हणजे 'विन्स्टन चर्चिल'. इन्द्रा (ता.क. ~~ श्री.बिपिन कार्यकर्ते यांनी आपल्या प्रतिसादात माझ्या नावाचा ज्या कौतुकाने आणि विश्वासाने उल्लेख केला आहे त्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे.)

हो, चर्चिल या दुष्काळाला आणि जीवितहानीला जबाबदार आहे. इंद्रराज यांनी वरील प्रतिसादात काळा बाजार आणि अन्नधान्याची वितरण व्यवस्था यांवर भाष्य केलं आहेच. अजून महत्वाचं कारण म्हणजे जपानी फौजा याच काळात ब्रह्मदेशांत घुसल्या होत्या, अगदी इंफाळ आणि कोहिमातही होत्या. सुभाषबाबूंची आझाद हिंद सेना जपान्यांबरोबर होती, चलेजाव आंदोलन चालू होतं. जपानी फौजंच्या सीमेवर येण्यानं पॅनिक क्रिएट झालं, काळा बाजार फोफावला. गव्हर्नर आणि मुस्लीम लिगला ह्या गोष्टी मॅनेज करता आल्या नाहीत. १९४० पासून चर्चिल आणि ब्रिटीश जनता अन्न-वस्त्र-इंधनाच्या रेशनवर होती पण दुष्काळातही बंगालमधे मात्र रेशन कधीच चालू नाही केलं गेलं . ब्रह्मदेश हा वेळप्रसंगी तांदुळाचा हक्काचा पुरवठक होता ( १९४२ च्या पूरात बंगालमधे तिकडूनच भात आला होता ), पण जपानी तिकडे घुसल्यानं सगळं शिपींग बंद केलं गेलं. पण ३० लाख लोकं मरेपर्यंत नक्कीच चर्चिलनं काहीतरी करायला हवं होतं. तसही शेवटी सैन्याच्या रसदीतला वाटाच सैन्याकरवी नव्या गव्हर्नरनं वाटला.

प्रतिसादांबद्दल धन्यवाद. अजुन माहितीपूर्ण प्रतिसाद येतील असे वाटले होते, हरकत नाही. हेच जर "चर्चिल कित्ती कित्ती छान" असे लिहिले असते तर किती प्रतिसाद आले असते याचा विचार करत आहे. :)

In reply to by अवलिया

याचे मुख्य कारण तुम्ही नुसता दुवा दिलात. तो वाचा आणि तुमचे मत सांगा, असे सांगितले. त्याऐवजी, तुमचा लेख असता, तुमची मते तुम्ही मांडली असतीत तर खूप फरक पडला असता.

पण इतर टुकार धागे मात्र सर्वांवर दिमाखाने मिरवत आहेत. अजुन एक नोबेल पारितोषक विजेते भारतिय अर्थतज्ञ अमर्त्य सेन ह्यानी ह्या दुष्काळावर संशोधन केले होते कि १९७२-७४ च्या दुष्काळावर?

In reply to by वेताळ

श्री.वेताळ.... डॉ.अमर्त्य सेन यांचे याच दुष्काळावर नव्हे तर भारत आणि एकूणच जगातील अनेक विकसनशील तसेच अविकसीत देश यांच्या अन्नधान्य परिस्थितीवर डझनवारी शोधनिबंध प्रसिद्ध आहे. बंगालच्या दुष्काळावर मी वर उल्लेख केलेला निबंधाबाबत खालील दुवा पाहा : http://en.wikipedia.org/wiki/Amartya_Sen#Research इन्द्रा

चर्चिल हा एरवीही युद्धकाळातला नेता म्हणूनच त्याच्या स्वतःच्या देशात पसंत होता. शांततेच्या काळात तिथेही त्याला अयशस्वी व्हावं लागलं होतं. मग ज्या भारतीय रयतेचा तो द्वेष करत होता, त्यांच्या जगण्या मरण्याबद्दल त्याला काही वाटलं नाही हे काही विशेष नाही!

या धाग्यावर चर्चा होणे जरा कठीणच दिसते आहे. कारण याला एकच बाजू आहे. आणि ती सर्वांनाच मान्य आहे. :-) एक मात्र खरे, लोकांनी चर्चीलला युध्द जिंकल्यावर लगेचच खाली खेचले होते.

"मग ज्या भारतीय रयतेचा तो द्वेष करत होता, त्यांच्या जगण्या मरण्याबद्दल त्याला काही वाटलं नाही हे काही विशेष नाही!" ~~ नक्कीच काही वाटत नव्हते, हे मी किंवा या विषयातील जाणकार भाष्यकार म्हणतात असे नाही तर खुद्द चर्चिलने ज्या लिओपाल्ड अ‍ॅमेरी यांची भारतातील त्याचे सेक्रेटरी म्हणून नेमणूक केली होती, त्यांनी वारंवार विनंत्या करूनही बंगालच्या दुष्काळाबाबत ब्रिटीश सरकारने चर्चिलच्या सांगण्यावरून कोणतीही ठोस पावले उचलली नाहेत, म्हणून चर्चिलच्या भारतद्वेषाबद्दल चीड व्यक्त केली होती. चर्चिलचे ते वर्तन म्हणजे “Hitler-like attitude to India" असे होते हे त्यांनी नमूद केले आहे. सुप्रसिद्ध लेखक जॉर्ज ऑर्वेल हे बीबीसीच्या टीमसमवेत त्या काळात भारतात होते, त्यांनी ब्रिटीश सत्ताधार्‍यांची ही गुर्मी पाहिली, आणि अशी नोंदविली आहे....“It is strange,” George Orwell wrote in his diary in August, 1942, “but quite truly the way the British government is now behaving in India upsets me more than a military defeat.” "मोअर दॅन अ मिलिटरी डीफीट..." हे वाक्य खूप काही सांगून जाते. इन्द्रा

चर्चिलला काही लाख लोकांच्या मृत्युस जवाबदार ठरवण्यापुर्वी काही प्रश्नांची उत्तरे शोधणे मला आवश्यक वाटते. १. भारताच्या विविध भागांवर परकीयांनी (इंग्रज, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज)आपापल्या वसाहती तयार केल्या, त्या इथल्या संपत्तीची, लोकांची लूट करण्यासाठी की आपापल्या देशांना प्रथम दर्जाचे नागरिक मिळवून देण्यासाठी? २. १९४३ पुर्वी बंगालात किंवा इतर एखाद्या प्रांतात मोठा दुष्काळ पडला तरीही त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली आणि तीच किंवा सुधारित यंत्रणा हाताशी असूनही चर्चिलने मुद्दाम त्या यंत्रणेचा वापर न करून लोकाना मरु दिले असा काही पुरावा आहे काय? ३. वरती इंद्रराज यांनी म्हटल्याप्रमाणे जर त्यावर्षी धान्योत्पादन इतके वाईट नसूनही साठेबाजीमुळे लोकांना धान्य मिळाले नाही ही गोष्ट खरी असेल तर ते साठेबाजी करणारे व्यापारी कोण होते? त्याना चर्चिलची फूस होती काय? ४. दुसरे महायुद्ध चालू असताना आणि खुद्द इंग्लंडची हालत खस्ता असताना चर्चिलने कोणत्या गोष्टीला प्राथमिकता देणे जास्त तार्किक होते? ५. अगदी मूळापासून विचार केला तर सरकार, प्रशासन या सर्व मानवी कल्पना आहेत आणि वर्षानुवर्षांच्या समाजरचनेतून त्या निर्माण झालेल्या आहेत. सरकारातल्या लोकांनी प्रजेचे रक्षण करावे हे त्यांच्यावर नैतिक बंधन असते, नैसर्गिक नव्हे. संकटात सापडलेल्या लोकांना मदत न करुन चर्चिलनेच नव्हे तर स्थानिक अधिकार्‍यांनी व साठेबाज व्यापार्‍यांनी केवळ नैसर्गिक स्वार्थाचे दर्शन घडवले नाही काय? आधुनिक काळात मात्र दुष्काळात होरपळणार्‍या लोकांना आवश्यक ती सर्व मदत केली जाते असे आपण समजायचे काय? मला काही काही लोकांच्या गुलामी वृत्तीचे फार आश्चर्य वाटते. इतिहास माहिती असूनही ते पटकन परकीयाना 'आपले' राज्यकर्ते मानू लागतात आणि आपल्या कल्याणाची किंवा दुर्गतीची जवाबदारी त्यांच्यावर टाकून मोकळे होतात.

In reply to by नगरीनिरंजन

हा दुष्काळ मानव निर्मित असल्याची नोंद आहे. ब्रिटिश सरकारने जपान्यांच्या आक्रमणाच्या धास्तीने बंगालमध्ये अन्नधान्य शिल्लक राहू न देण्याचा चंग बांधला होता (जपानी तिथे पोचतील या भीतीने). इतर प्रांतात उपलब्ध असलेले गहू तांदूळ ब्रिटिश सरकार मिळेल त्या किमतीला विकत घेत होते आणि दोस्त राष्ट्रांच्या सैन्याला पुरवीत होते. एवढेच नव्हे तर नोव्हेंबर १९४३ पर्यंत दुष्काळ असल्याचं सरकारने अधिकृतपणे मान्य सुद्धा केलं नव्हतं.

In reply to by पैसा

म्हणजे सैन्याला अन्नपुरवठा करण्यासाठी ब्रिटीश सरकारने लोकांच्या तोंडचा घास हिरावून घेतला असं जरी असलं तरी त्यात वर्णद्वेष आणि भारतीयांबद्दलची चीड यापेक्षा नाईलाजाचाच भाग जास्त असावा असं वाटत नाही का? खुद्द युरोपात आणि पूर्व आशियात कित्येक लोकांची जर्मन आणि जपानी सैन्याने क्रूर कत्तल केली. ती जशी वर्णविद्वेषातून झाली तसा प्रकार इथे नक्कीच नव्हता. आणि नाकातोंडात पाणी जाऊ लागल्यावर ज्याप्रमाणे माकडिण आपल्याच पिलाच्या डोक्यावर पाय देते तसंच ब्रिटीशांनी केलं, यात चूक काय? भारतीय तर त्यांचे गुलामच होते, पोटचे गोळे नाही.

In reply to by नगरीनिरंजन

पण त्याचवेळी ग्रीसमध्ये पडलेल्या दुष्काळात ब्रिटिश सरकारने सर्व मदत केली होती. बंगालमधल्या परिस्थितीला स्थानिक साठेबाजांनी हातभार लावला हेही खरंच आहे. पण चर्चिल (पर्यायाने ब्रिटिश सरकार) यांची इच्छा असती तर किमान ३० लाख लोकांपैकी निदान काहींचा बळी गेला नसता.

In reply to by पैसा

हे मात्र मान्य केलं पाहिजे. ग्रीक लोकांना चर्चिलने झुकते माप दिले. अर्थात याचा अर्थ असा होत नाही की भारतीयांसाठी असलेली मदत त्याने तिकडे वळवली. असो, शेवटी लाजेकाजेस्तव का होईना त्याने अमेरिकेकडे भारतीयांच्या मदतीसाठी मागणी केलीच ना. अमेरिकेने मात्र नकार दिला. शेवटी ब्रिटीश सरकारने एक लाख टन धान्य आयात केल्यावरच दुष्काळ संपला ना? त्यापुर्वीच्या राज्यकर्त्यांपेक्षा जास्त उद्दामपणा आणि निष्काळजीपणा चर्चिलने दाखवला असे मला वाटत नाही. त्यामुळे तो तेवढाच दोषी आहे जेवढे त्या आधीच्या दुष्काळाच्या वेळचे राज्यकर्ते होते. विशेषतः १८७५ ते १९०२ या काळात विविध दुष्काळांमध्ये जवळ जवळ ७०-८० लाख लोक मरण पावले मग त्याला जबाबदार कोण?

In reply to by नगरीनिरंजन

त्यापुर्वीच्या राज्यकर्त्यांपेक्षा जास्त उद्दामपणा आणि निष्काळजीपणा चर्चिलने दाखवला असे मला वाटत नाही. त्यामुळे तो तेवढाच दोषी आहे जेवढे त्या आधीच्या दुष्काळाच्या वेळचे राज्यकर्ते होते. हो मग आधीच पण हरामखोरच होते. चर्चिल बद्दल बोलतो आहोत कारण त्याचे उगाच गोडवे गायले जातात जे आपण गायची काहीच गरज नाही आहे. दाउदचे गोडवे पाकिस्तान्यांनी गावे ना. आपण गाण्यात काय अर्थ आहे? आज काश्मीरमधले कित्येक दहशतवादी पाकिस्तान्यांसाठी आणि फुटीरतावाद्यांसाठी स्वातंत्र्यसैनिक आहेत. आपणही त्यांना तसेच संबोधावे काय? चर्चिल हीरो होता इंग्लंडचा. त्यांनी डोक्यावर घ्यावे त्याला. आम्ही चोर दरवडेखोरच म्हणणार.

In reply to by मृत्युन्जय

>>चर्चिल हीरो होता इंग्लंडचा. त्यांनी डोक्यावर घ्यावे त्याला. आम्ही चोर दरवडेखोरच म्हणणार. अर्थातच. चर्चिल काय किंवा आणखी कोणा परकीय राज्यकर्त्याला काय, हिरो वगैरे समजण्याचा प्रश्न तर येत नाहीच पण असली काही जबाबदारी त्यांच्या माथ्यावर टाकून आपल्या पारतंत्र्यातली लाचारी झाकायचीही गरज नाही आणि ते सुसंस्कृत असूनही आकसाने असं वागले हा गैरसमज पोसायचीही गरज नाही. ते स्वर्थासाठी लूट करायला आले आणि लुटून गेले.

In reply to by नगरीनिरंजन

अर्थातच. चर्चिल काय किंवा आणखी कोणा परकीय राज्यकर्त्याला काय, हिरो वगैरे समजण्याचा प्रश्न तर येत नाहीच पण असली काही जबाबदारी त्यांच्या माथ्यावर टाकून आपल्या पारतंत्र्यातली लाचारी झाकायचीही गरज नाही +१ . एकदम मान्य, आणि ते सुसंस्कृत असूनही आकसाने असं वागले हा गैरसमज पोसायचीही गरज नाही. ते सुसंस्कृत होते हाच मुळात गैरसमज. ते स्वर्थासाठी लूट करायला आले आणि लुटून गेले. +२ :) हा धागा मला वाटते हेच अधोरेखीत करण्याचा आहे की चर्चिल हिटलर पेक्षा फार वेगळा नव्हता. इंग्रजांना युद्ध करुन भारत जिंकुन घेतला त्यामुळे त्यांच्याकडे भारतीयांवर अत्याचार करण्याचा परवाना होता असे जर असेल तर मग प्रश्नच मिटला. हिटलरनेही पोलंड जिंकुन घेतला होता त्यामुळे त्यालाही पोलिश नागरिकांवर अत्याचार करण्याचा परवानाच नव्हता काय? आपण असाच उदार दृष्टीकोन ठेवुन इतिहास बघुयात मग. हिटलर महान, स्टॅलिन महान आणि चर्चिल तर महानांत महान.

ह्या चर्चेच्या दरम्यान मिळाली. पण काही प्रश्न आहेत: * ४३ साली पडलेला हा दुष्काळ इतका गंभीर होता की त्याने सुमारे २५ लाख लोकांचा बळी गेला. इतक्या प्रचंड संख्येने आपल्या बांधवांचे बळी जात असतांना देशातील इतर जनता त्याविषयी उदासिन का होती? आता (अलिकडे) पाच पंचवीसच काय शेकडो/ हजारो बांधव कुठल्या दुर्घटनेत मेले तरीही आपण त्याकडे बर्‍यापैकी दुर्लक्ष करून पुढे जात रहातो, तेव्हाही तसेच होते की काय? ह्या मानाने चिनी जनतेचे कौतुक वाटते. जपान्यांच्या ऑक्युपेशननंतर त्यांनी केलेल्या तथाकथित अत्याचाराच्या कहाण्या तेथे अजूनही सांगितल्या जातात, 'नांजिंगच्या बलात्कारा'विषयी तेथेच नव्हे तर जगातील सर्वच चिन्यांच्या मनात प्रचंड चीड आहे. * त्या मुद्द्यावरून काँग्रेसने काय केले? * मुस्लिम लीग तेव्हा स्थानिक सरकार चालवत होती, तर ह्यावरून तेथील लोकांत त्यांच्याविषयी चीड निर्माण झाली का? (म्हणजे पुढील निवडणूकांच्या निकालांतून तसे दिसून आले का?) नगरीनिरंजन ह्यांचे मुद्दे मलाही बरेचसे रास्त वाटले. जेते तुमच्या समाजाचा उद्धार करण्यास येत नाहीत, ते त्यांचा स्वतःचा फायदा करून घेण्यास येतात. हा दुष्काळ (निसर्ग + मानव निर्मीत) झाला तेव्हा स्थानिक प्रशासनाने धान्याच्या वितरणाचे नक्की काय प्रयत्न केले किंवा केले नाहीत ह्याविषयी काही कळत नाहीत. ते अपुरे ठरले असे म्हटले जाते. धान्याची टंचाई देशात नव्हती तर फक्त बंगालमधेच होती (नाहीतर त्याला केवळ 'बंगालचा दुष्काळ' असे संबोधले गेले नसते) असे मानण्यात चूक नसावी. तर मग देशाच्या इतर भागांतून धान्य तिथे नेण्याची जबाबदारी दूरस्थ इंग्लिश सरकारची की स्थानिक (म्हणजे बंगाल व हिंदुस्थानातील केंद्र) सरकारांची? ह्या युद्धाच्या वेळी इंग्लंड स्वतः अत्यंत घनघोर युद्धात गुंतले होते, आणि हिंदूस्थान एक अ‍ॅसेट न रहाता आता लाएबिलीटी होऊ लागले होते. त्यामुळे चर्चिल व त्याच्या तेथील सल्लागारांना इथे फारसे लक्ष द्यावेसे वाटले नसावे?

In reply to by प्रदीप

* इतर भारतीय जनता काय करत होती, याचा विचार करण्याबरोबरच हे लक्षात घेतलं पाहिजे, की त्या काळात आताच्यासारखी दळणवळणाची साधने नव्हती. एखादा नातेवाईक मेला तरी २/३ महिन्यानी ती बातमी कळत असे. *तेव्हाची राज्य सरकारे म्हणजे शोभेची बाहुली होती. केंद्र सरकार म्हणजे लिनलिथगो. तो पत्र आणि तारा पाठवण्यापलिकडे आणखी काही करू शकत नव्हता. * भारतात इतरत्रही अन्नधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध नव्हते. लहान असताना रेशनचा सडका "मिलो" म्हणजे अमेरिकन तांबडा जोंधळा खाल्ल्याच्या आठवणी मी माझ्या आईकडून ऐकल्या आहेत.
हिंदूस्थान एक अ‍ॅसेट न रहाता आता लाएबिलीटी होऊ लागले होते.
हे आपले वाक्यच सगळी परिस्थिती सांगून जाते. "भारतात आलेले सगळे लुटण्यासाठी आले होते, आणि लुटून गेले " हेही ऐतिहासिक सत्य आहे. प्रश्न एवढाच आहे, की चर्चिलच्या हाती अमर्याद सत्ता होती (युद्धामुळे). आणि ३० लाख लोकांच्या जीवन किंवा मरणातली रेषा तो आखू शकत होता, ते त्याने केलं नाही. जर हिटलर "नरसंहाराचा" दोषी असेल, तर चर्चिलही तेवढाच दोषी आहे, फक्त डायरेक्ट नाही, इनडायरेक्टली!

In reply to by पैसा

त्यावेळी आजच्या तुलनेत अगदीच वाईट होते, कबूल. पण काँग्रेसप्रणित चळवळीतील, तसेच अगदी टोकाचे उदाहरण द्यायचे झाले तर भूमिगत कार्यकर्त्यांचे आपापसातील दळणवळण नीट होतेच ना? देशभर चळवळी होत होत्या त्यात नेत्यांतर्फे सुसूत्रिकरण होतेच. देशाच्या एका प्रांतात २५ लाख लोक मृत्यू पावत आहेत आणि त्याची खबरच दुसर्‍या, अगदी नजिकच्या प्रांतातही नसावी, हे थोडे पटण्यास अवघड जाते. खरे तर ह्या दुर्दैवी घटनेमुळे निर्माण झालेल्या क्षोभामुळे सत्ताधार्‍यांना राज्यशकट चालवणे कठीण व्हावयास पाहिजे होते. चळवळीच्या पुढार्‍यांचे त्याकडे लक्ष असावे? ह्याविषयी काहीच ऐकिवात नाही. ह्याविषयी तत्कालिन इतिहासाच्या जाणकारांनी प्रकाश टाकावा. नक्की काय होते? * २५ लाख मृत्यू हा आकडाच मुळात अत्यंत अतिशयोक्त आहे? * तसे नव्हे पण ** तत्कालिन काँग्रेसचे नेते ह्याचा फायदा उठवण्यास कमी पडले ** त्यांनी तसा प्रयत्न केला पण भारतीय जनता तेव्हाही उदासिनच होती? ** इतर काही?

चर्चेत एक कळाले. चर्चील असो वा दुसरा कूनी ह्युमन लाईफ इज निगोशिएबल.

In reply to by विनायक प्रभू

"ह्युमन लाईफ इज निगोशिएबल...." दॅट्स द मेजर पॉईन्ट....अँड व्हाय ओन्ली ह्युमनबींग्ज ? हिंदू संस्कृती इतकी लिबरल आहे की आपण राम आणि कृष्णाच्या वर्तनाचे [त्यांच्याबद्दल मनी आदर असूनही] डीसेक्शन करतोच ना? हिटलरसारखा एक सेनानी पराभूत झाला म्हणून त्याच्या चरित्राची चिरफाड करताना करवत, तर चर्चिल विजयी झाला म्हणून कानस वापरायची हा तर इतिहासकारांचा पेटंट बिझिनेस असतो. म्हणतात ना जयाला मालक पन्नास, पराजयाची पत्रास कोण राखणार? इन्द्रा

श्री.प्रदीप.... एक गोष्ट लक्षात घ्या की, "बंगाल दुष्काळ" ही सर्वसाधारण व्याख्येतील 'नैसर्गिक' आपत्ती नव्हती तर 'नरेची केला किती हीन हा नर...' या पट्टीत बसणारी 'मॅन मेड' घटना होती (बर्‍याच अंशी म्हणू या, हवे तर). कुठली कॉन्ग्रेसप्रणित चळवळ तुम्ही अपेक्षिता बंगाल (आताच्या बांगला देशासह) मध्ये?. एकतर स्वातंत्र्य पूर्व काळापासून ते आजमितीपर्यंत 'कॉंग्रेस' नावाचा राष्ट्रीय पक्ष बंगालमध्ये कधीच मजबूत नव्हता. इतकेच काय त्या दुष्काळाच्या वर्षात तिथे मुस्लिम लीगचे सरकार होते. शिवाय सुभाषबाबू हे त्यावेळी देशाच्या गळ्यातील ताईत होते तर त्यांना बंगालमध्ये किती डोक्यावर घेतले गेले असेल याची कल्पना करा. त्यांच्या लोकप्रियतेची चीड लीग आणि बंगाल सुभ्याच्या गव्हर्नरच्या डोक्यात होतीच, पण खुद्द महात्मादेखील नेताजीच्या फार प्रेमात होते असे चित्र अजिबात नव्हते....(हे थोडेसे अवांतर होत आहे, त्यामुळे या नात्यावर इथे चर्चा नको.) शिवाय सत्ताधार्‍यांना त्या काळात 'जपान' ने युध्दात मारलेली डोळ्यात भरणारी मुसंडी चिंतेत टाकत होती. बर्मापर्यंत आलेले जपानी सैन्य सुभाषबाबूंच्या नेतृत्वाखाली बंगालकडे केव्हाही कूच करणार असे अहवाल लीग आणि गव्हर्नराकडे येतच होते. बंगालवर सूडासाठी जी राजनिती (त्यामुळे) ब्रिटीशांनी वापरली ती A "scorched earth" policy नावाने (कु) प्रसिद्ध आहे. [यावरही स्वतंत्रपणे केव्हातरी लिहिणे आवश्यक आहे.] कसले भूमिगत कार्यकर्त्यांचे आपापसातील दळणवळण, प्रदीप जी? अहो ते कार्यकर्ते म्हणजे आजच्यासारख्या एसी कारमधून नेत्यासमवेत हिंडणारे कार्यकर्त होते का की सदैव त्यांच्या हातात एक तर खिशात दुसरा मोबाईल असायला? खुद्द त्या भूमिगत कार्यकर्त्यानाच दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत, फिर 'नंगा क्या धोएगा और क्या निछोडेगा'? आता 'फॅक्ट्स अँड फिगर्स' >> देशाच्या एका प्रांतात २५ लाख लोक मृत्यू पावत आहेत आणि त्याची खबरच दुसर्‍या, अगदी नजिकच्या प्रांतातही नसावी, हे थोडे पटण्यास अवघड जाते. ~~ नाही, अशी स्थिती बिलकुल नव्हती. [इथे एक बाब लक्षात घ्या....दुष्काळात जे काही २०-३० लाख मरण पावले, ते 'भूक' या रोगाने....अन्नधान्य नव्हते म्हणून नव्हे. कित्येकांचा असा समज आहे की त्या वर्षात बंगालमध्ये अन्नधान्याची पैदासच झाली नाही. असे कधीच झाले नव्हते. ४०/४१ साली जितके उत्पादन धरतीने दिले, सरासरी तितकेच ४३ ला देखील मिळालेच होते. झाला गोंधळ तो युध्दाकडे ब्रिटीशांचे लक्ष गुंतले (तेही साहजिकच होते...) असल्याने इकडे वाटप व्यवस्थेमध्ये जी 'मिसमॅनेजमेंट' [हा शब्द माझा नसून डॉ.अमर्त्य सेन यांचा आहे] उसळली तिचा व्हायरस नफेखोरांनी उचलला....तसे झाले नसते तर नवलच. हजारो टन धान्य गोडावून्समध्ये कुलुपबंद होते....आणि वाढत्या बेकारी, जमीनदारांच्या वर्चस्वाला कंटाळलेले आणि खेड्यातून पोटासाठी कलकत्ता/हावरा येथे आलेल्या लाखो पायीपायी चालत आलेल्या कंगालांकडे [कलकत्याला पोहोचण्यापूर्वीच रस्त्यातच कित्येक लाख उपासमारीमुळे मरून पडले होते] ते धान्य 'विकत' घेऊन खायाला पै देखील नव्हती. बंगाली भोजनात भाताचे प्रमाण खूप असते. एकूण गरजेच्या १५% भात हा बर्मातून बंगाल्यांना मिळत होता. ती आयात युद्धामुळे थांबली, दुसरीकडून सागरी मार्गाने आणावी म्हटले तर [....आता इथे या टप्प्यावर चर्चिल चित्रात आले] तर लंडनहून वॉर सेक्रेटरींचा हुकूम आला की, बंगालच्या उपसागरातील सर्व नावीक दल, बोटी, मालवाहतुक जहाजे भाताने भरून तो भात इजिप्तमध्ये तैनात असलेल्या सैन्यासाठी तातडीने रवाना कराव्या. जपान कोणत्याही क्षणी त्या दलावर हल्ला करण्याची शक्यता होतीच. सैन्याधिकारांनी त्यांच्या ताब्यात असलेलेच आरमार नव्हे तर बंगाली लोकांच्या साध्या साध्या होड्याही या भात वाहतुकीसाठी जप्त केल्या. साहजिकच दुसर्‍या बाजूला साठेबाजांना जादा पैसा कमावण्याची ती एक पर्वणीच वाटली. कारण अशिक्षित बंगाल्यामध्ये 'आता धान्याचा एक कणही शिल्लक राहणार नाही' अशी भीती पसरली. ज्यांना शक्य होते ते 'एलिट पब्लिक' या मानवनिर्मित दुष्काळाच्या झळापासून दूरच होते, किड्यामुंगीसारखे मेले ते फक्त गोरगरीब, त्यातही बंगालमधून कलकत्यात 'मायग्रेट' झालेले देहाती. 'चर्चिल आणि भारत' या विषयावर वर बराच काथ्याकुट झालेला आहेच त्यामुळे द्विरूक्ती टाळतो, पण एक मुद्दा मांडणे आवश्यक आहे, म्हणजे येथील त्याचे सचिव लीओपाल्ड अ‍ॅमेरी यांनी 'धान्य बंगालमध्ये तातडीने पाठविणे किती आवश्यक आहे..' हे सचित्र वर्णन त्याला केले, त्यावेळीदेखील बंदरात धान्याने पूर्ण भरलेली जहाजे त्याने जाणीवपूर्वक सिलोनकडे वळविण्यास सांगितले, कारण त्याच्या दृष्टीने तेथील रबर मळ्यात काम करणार्‍या मजूरांना धान्य देणे आवश्यक आहे असे त्याचे म्हणणे होते. ग्रीसमध्येही त्याच सुमारास दुष्काळ पडला होता, तिथेही इथलीच जहाजे धान्य भरून जात होती....पण "नो फॉर बेंगॉल..." ['दुष्काळात गांधी मेला काय?" अशी निर्लज्ज तार त्याने अ‍ॅमेरीला केली होती.] अर्थात पुढे वेव्हेलसारख्या उदारमतवाद्यांनी लंडनमध्ये संसदेचे मन वळविले आणि दहा लाख टनाचा धान्यसाठा बंगालसाठी [स्वस्त दरात] खुला करण्यात आला व हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आली. संसदीय लोकशाही पद्धतीचे गुणगान गाताना डॉ.अमर्त्य सेन म्हणतात, इतिहासाने बर्‍याच वेळा हे दाखवून दिले आहे की, योग्यरितीने लोकशाही तत्वाने राज्यकारभार चालला तर दुष्काळाची समस्या बर्‍याच प्रमाणात आटोक्यात येऊ शकते, म्हणून तर १९४७ नंतर 'बंगाल सदृश्य' दुष्काळ भारताने अद्यापि पाहिलेला नाही. [त्या सालानंतरचा संदर्भीय आकडेवारीचा विदा इथे मी देऊ शकतो...पण प्रतिसाद अकारण मोठा होईल.] आता श्री.प्रदीप यांनी व्यक्त केलेल्या मृताच्या आकडेवारी संबंधी थोडेसे >>> युद्धसमाप्तीनंतर या 'मानवरचित' दुष्काळासंदर्भात ब्रिटीश सरकारने जी चौकशी समिती नेमली तीने आपला अहवाल सरकारला सादर केला होता. ऑफिशियल कमिटीनेच आपल्या रिपोर्टमध्ये मयताचा आकडा '१५ लाख' नमूद केला आहे.... {त्यांचा शब्द आहे : about 1.5 million Indians}. डॉ.अमर्त्य सेननी आपल्या संशोधन निबंधात हा आकडा २० ते २५ लाख असावा असे मत व्यक्त केले आहे. डॉ.सेन यांच्यासारखा जगन्मान्य अर्थतज्ज्ञ जर असा आकडा देत असेल तर त्याला विरोध कोण करणार? त्यामुळे हे तर निश्चितच मानावे लागेल की खरा आकडा जास्तही असेल....(अर्थात आता या आकडेवारीबर डोके फिरवून घेण्यात काही अर्थ नाही....१५ काय, २० काय, ३० काय....आपण बधीर झालो आहोत.) शेवटी श्री.प्रदीप विचारतात >> "भारतीय जनता तेव्हाही उदासिनच होती?" यातील 'तेव्हाही' हा फटका झणझणीत आहे...कारण त्यात "आत्ताही" हे कटू सत्य दडलेले आहे. रामायण महाभारताच्या काळात तरी काय वेगळे चित्र होते? असो....मला वाटते श्री.प्रदीप यांचे थोडेफार शंकानिरसन झाले असेल. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

इंद्रा ह्यांनी माझ्या शंकांना उत्तरे द्यायचा प्रयत्न केला, त्याबद्दल आवर्जून धन्यवाद. पण भावना बाजूस ठेऊन आपण पुन्हा माझ्या प्रश्नांकडे पाहूया. इंद्रांच्या म्हण्ण्यानुसार मृतांचा आकडा दप्तरी असलेल्या कागदपत्रांनुसार १५ लाख आहे, अमर्त्य सेन ह्यांच्या अंदाजानुसार तो २०~ २५ लाख असावा. म्हणजे माझ्या प्रश्नाचे उत्तर ह्या आकड्याता अतिशयोक्ति नाही, कमीतकमी १५ लाख लोक बंगालातील ह्या दुष्काळात मेले. इंद्रांनी पुन्हा एकदा हा दुष्काळ नैसर्गिक आपत्ति नसून मानवी (इथे तत्कालिन सरकारे-- केंद्रीय -- जे ब्रिटीश जेत्यांचे होते-- व स्थानिक-- जे मुस्लिम लीगचे होते--ह्यांनी मुद्दाम निर्माण केलेली) होती हे ठासून सांगितले आहे. त्याविषयी मी कुठलीही शंका उपस्थित केली नव्हती व आताही करीत नाही. पण आता असे पहा: १. सरकारांच्या अत्यंत बेजबाबदार वागणूकीमुळे बंगाल प्रांतात मोठ्ठ्या प्रमाणात दुष्काळ पडतो. त्यात वर्षा-दीड वर्षात (कमीत कमी) १५ लाख माणसे मरतात. २. ह्या वेळी काँग्रेस ह्या भारतीय व जनतेचा भरघोस पाठिंबा असलेल्या, पक्षाचे देशभरातील, ब्रिटीश सरकाराच्या विरूद्ध आंदोलन अगदी भरात आलेले आहे. त्याचवेळी त्या सरकारच्या निष्काळजीपणामुळेच नव्हे, तर इंद्रांनी अगदी अधोरेखित केल्याप्रमाणे ज्याच्या विरूद्ध आंदोलन सुरू आहे, त्या सरकारच्या अक्षम्य बेफिकीरीमुळे, देशाच्या एका प्रांतात १५ लाख मृत्यू होतात. मी तरी-- आणि सुरूवातीसच लिहील्याप्रमाणे, माझी ह्या विषयातील गति फार नव्हे-- ह्या देशव्यापी आंदोलनासाठी ह्या मानवनिर्मीत दुष्काळाचा मुद्दा कुठे आंदोलनाच्या नेत्यांनी पुढे उचलून घेतल्याचे वाचलेले नाही. बंगालमाधील चळवळीबद्दला मी बोलत नाही, ह्या देशव्यापी चळवळीविषयी बोलतोय. (एक अलिकडचे उदाहरण द्यायचे झाले तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील गोळीबाराच्या घटनेचे देता येईल. त्या एका घटनेने जो जनप्रक्षोभ उसळला, त्यामुळे चळवळीच्या नेतृत्वाचे काम बरेच 'सोपे' झाले). ४. दळणवळण तेव्हा आताच्या सारखे नव्हते, हे अगदी मान्य. इंद्रांना मी हे इथे सांगू इच्छितो की मी स्वतःही मोबाईलच्या जमान्यात जन्माला आलेलो नाही. वाईट दळणवळण काय असते ते मी प्रत्यक्ष अनुभवलेले आहे. तरीही अगदी ४३ च्या जमान्यातही इतक्या मोठ्ठ्या प्रमाणातील दुर्घटनेची बातमी देशात पसरू नये, हे मान्य करणे कठीण जाते. सरकारने ह्याविषयीच्या बातम्या अगदी मुद्दाम सेन्सॉर केल्या असतील तरी इतक्या मोठ्ठ्या प्रमाणातील माहिती देशभरात पसरू नये, हे चमत्कारिक वाटते. अशावेळी तर उलटसुलट व अतिरंजित बातम्याच जास्त पसरू शकतात. ५. मुस्लिम लीगने बेजबादारीमुळे म्हणा अथवा निष्क्रीयतेमुळे म्हणा, मानवनिर्मीत दुष्काळास हातभारच लावला, मग त्यांच्या तत्कालिन बंगाल प्रांतातील पॉप्युलॅरिटीत काय फरक पडला होता? तसा तो त्यापुढील काळात कसा दिसून आला, ह्याविषयीही कुणी ठोस माहिती द्यावी.
शेवटी श्री.प्रदीप विचारतात >> "भारतीय जनता तेव्हाही उदासिनच होती?" यातील 'तेव्हाही' हा फटका झणझणीत आहे...कारण त्यात "आत्ताही" हे कटू सत्य दडलेले आहे. रामायण महाभारताच्या काळात तरी काय वेगळे चित्र होते?
ह्या बाबतीत माझी तुलना पौराणीक काळांतील, अथवा भारतातील ह्याहीपूर्वीच्या इतिहासाशी नसून, इतर देशांच्या नागरिकांत मानवी जीवनाविषयी-- विशेषतः स्वतःच्या देशबांधवांच्या जीविताविषयी-- जी एक तीव्र जाणीव दिसून येते तिच्याशी आहे. आता ४३ च्या ह्या दुष्काळातील मृत्यूंविषयी, मला अजून नीट माहिती नसल्याने मी नक्की काही म्हटलेले नाही, शक्यताच दर्शवली आहे. आताचे विचाराल तर मी हे पुन्हा म्हणेन की आपण ह्याविषयी संपूर्ण उदासिन आहोत, निबर झालेलो आहोत. इतर देशांत तसे होतांना दिसत नाही.

In reply to by अवलिया

हल्लीच इंग्रज राजवट चांगली होती असे काहीसे वाचले
माझे काही इंग्रज मित्र आहेत UK ला. पाहीजे तर कॉल करुन बोलावुन घेतो. (येन्याचा, जान्याचा , राहन्याचा, खान्या-पिन्याचा खर्च मी करतो, पण त्यांनि आल्यावर कुठे कुठे राज्य करायचे ते तुम्हीच ठरवा)

In reply to by शिल्पा ब

नाही पण हा प्रश्न आपल्याला का पडला, हे समजेल का ? बायदवे, माझे UK, America, Thailand, France, China, Germany, Italy, Japan, Egypt, Africa, आनी Pakistan सुद्धा, इथे सर्व ठिकानी मित्र आहेत.

In reply to by नरेशकुमार

माझे UK, America, Thailand, France, China, Germany, Italy, Japan, Egypt, Africa, आनी Pakistan सुद्धा, इथे सर्व ठिकानी मित्र आहेत
अरे वा हेवाच करायला हवा तुमचा.बाय द वे, ऑस्ट्रेलियात कोणी नाही का?

अरे मित्रांनो, फार घाई करताय तुम्ही लोक. इतिहासातील वादग्रस्त विषय/पुरलेली मढी ही कालानुक्रमाने नकोत का उकरायला? म्हणजे असं, की नुकताच आपण सर्वांनी 'शिवाजी-दादोजी' प्रकरणावर घमासान वाद घातला. त्यानंतर एकदम १९४३ सालात उडी मारण्यात काय अर्थ आहे? मधल्या काळाचा कुणी विचार करणार आहे की नाही? किती तरी विषय अद्याप परस्परांची डोकी फोडण्यासाठी बाकी आहेत ना? १) छत्रपती संभाजीराजे मुत्सद्दी होते की उतावीळ? २) मराठी दौलत पेशव्यांनी वाढवली की घालवली? ३) पानिपतच्या पराभवाला नक्की कोण जबाबदार? ४) इंग्रज लुटारु होते, की भारत सुधारक? ५) १८५७ ची लढाई स्वातंत्र्ययुद्ध होते, की शिपायांचे बंड? ६) राणी लक्ष्मीबाई केवळ 'मेरी झासी नही दूंगी' असे म्हटली असताना ती राष्ट्रीय वीर कशी ठरते? ही यादी खूपच विस्तारता येईल. त्याखेरीज जातीय व सामाजिक वादांची यादी वेगळीच आहे. मला मान्य आहे, की हे विषय खूपच महत्त्वाचे असतात. कारण त्यामुळे अंगात आवेश संचारतो, भांडून भूक लागते, वेळ मजेत जातो, जुने हिशेब चुकते करता येतात, लाठी-काठी/तलवार अशा जुन्या साहसी क्रीडाप्रकारांना उत्तेजन मिळते. एकंदरच समाजाची प्रगती होते. पण हे विषय क्रमाने यावेत. उलटेसुलटे आल्यास वाचणार्‍यांचा गोंधळ होऊ शकतो.

In reply to by योगप्रभू

सनावळ्यांवर उत्तम प्रभुत्व आहे हो तुमचे. शाळेत इतिहासात सनावळ्यांनी असे छळले की ज्याचे नाव ते..