Skip to main content

खरच रुचिकाला न्याय मिळाला ?

लेखक भाग्येश यांनी गुरुवार, 27/05/2010 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
रुचिका गिऱ्होत्रा प्रकरण हे सर्वश्रुत आणि सर्वज्ञात आहे. रुचिका गिऱ्होत्राचा विनयभंग करून नंतर तिला आत्महत्येला प्रवृत्त करणारे हरयाणाचे माजी पोलीस महासंचालक एस. पी. एस. राठोड याला दिड वर्षाची शिक्षा झाली परंतु या प्रकरणात त्याला फक्‍त विनयभंग केल्या प्रकरणीच शिक्षा झाली आहे. तिला आत्महत्येला प्रवृत्त करण्या प्रकरणात एस. पी. एस. राठोडला शिक्षा होणे गरजेचे आहे, असे मला वाटते. खटल्याचा सारांश : हे प्रकरण घडलं तेव्हा रुचिका होती १४ वर्षांची आणि आराधना १३. दोघी शेजारणी आणि मैत्रिणी. रुचिकाला आई नसल्याने आराधनाची आई, मधू यांचा तिच्यावर खास जीव. दोघी मैत्रिणी टेनिस खेळायच्या. तासन्तास टीव्हीवर स्टेफी ग्राफ आणि मोनिका सेलेसचे सामने बघत हरवून जायच्या. तेव्हा हरयाणा लॉन टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष होते एसपीएस राठोड. रुचिकाचा खेळ बघून भारावल्याचे दाखवत त्यांनी तिला ऑफिसात बोलावलं. दोघी तिथे गेल्या तेव्हा आराधनाला त्यांनी कोचला बोलवायचं निमित्त करून बाहेर पाठवलं. ती बाहेर जाताच राठोड यांनी अश्लील चाळे सुरू केले. त्यांचे हे निर्लज्ज वागणे चालू असतानाच आराधना परतली. रुचिका सुटली खरी, पण दोन्ही मुली प्रचंड घाबरल्या. घाबरून त्या शांत बसल्या पण बेमुर्वत राठोड यांनी रुचिकाला पुन्हा भेटायला बोलावलं. आता मात्र दोघींनी घरी सांगायचं ठरवलं. सार्मथ्यवान अधिकाऱ्याशी गाठ आहे याची मनोमन जाणीव ठेवत दोन्ही कुटुंबांनी तक्रार केली आणि एक लढाई सुरू झाली. त्यानंतर सुरू झालं ते रुचिकाचं छळपर्व. घरी गुंड यायचे, दमदाटी, अचकट शिव्या, शेरे, पाठलाग, धमक्या, रात्री घरावर येणारे दगड...यामुळे काही फरक पडेना म्हटल्यावर रुचिकाच्या भावाला गाड्या चोरल्याच्या गुन्ह्यांमध्ये गोवलं गेलं. त्याला असह्य मारहाण.. हे कमी म्हणून रुचिकाचं वर्तन धड नाही म्हणून तिला शाळेनं काढून टाकलं. या दिवसांत आराधनाने तिला खूप आधार दिला. जमेल तेवढी ती रुचिकाच्या सोबत असायची. आराधनाची परीक्षा असल्यानं चार दिवस ती रुचिकाला भेटू शकली नाही आणि नेमकं त्याच काळात रुचिकानं स्वत:ला संपवलं. आपण रुचिकाला वाचवू शकलो नाही, या अपराधी जाणिवेनं आराधनाचा न्यायाची लढाई लढण्याचा निर्धार आणखी पक्का झाला. राठोड याच्या छळाला कंटाळून रुचिकाच्या कुटुंबाने शेवटी पंचकुला सोडलं. मग ही लढाई आराधना आणि तिच्या पालकांच्या खांद्यावर आली. राठोडच्या गुंडांनी या कुटुंबाकडे मोर्चा वळवला. दमबाजी, धमक्यांचे फोन सुरू झाले. स्वच्छ रेकॉर्ड असलेल्या आनंद प्रकाश यांच्यावर भ्रष्टाचाराचे डझनभर आरोप लावले गेले. त्यांची बदली झाली. आराधना घराबाहेर पडली की फोन सुरू व्हायचे, तुमच्या मुलीचं अपहरण झालंय...ती पळून गेलीय. शाळा-कॉलेजात गेलेली मुलगी परतणार का हा रोजचा घोर. मात्र, दिवसागणिक आराधनाचा लढण्याचा निश्चय दुणावला. आराधना पुढे कुरुक्षेत्रला गेली. एमबीए झाली. तिथंही गुंड यायचे. केस मागे घे, म्हणून दम द्यायचे. आराधनाचे वडील या प्रकरणात तब्बल साडेचारशे वेळा वेगवेगळ्या कोर्टांत उभे राहिले. वर्षांमागून वर्षं गेली. राठोड प्रमोशन मिळवून खांद्यावरचे स्टार्स वाढवत गेला . मेडल्स मिळाली. तो महासंचालक म्हणून निवृत्तही झाला. दरम्यान आराधनानं अमन गुप्ता या आयटी इंजिनीअरशी ऑस्ट्रेलियात संसार थाटला. २००३ मध्ये सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्या प्रकरणाची एकमेव प्रत्यक्ष साक्षीदार असलेली आराधना त्यावेळी भारतात येऊन गेली. अमनही आराधनाला साथ देतोय. लग्नापूवीर् आपली पत्नी यात असल्याचं अवघडलेपण त्याला होतं. पण त्यांच्या मुलीचा, आश्रयाचा जन्म झाला आणि चित्रच पालटलं. 'मी आमच्या आश्रयाला कुशीत घेतलं आणि रुचिकाच्या वडिलांच्या वेदना मला लख्ख जाणवल्या. त्याच क्षणी मी आराधनाला पूर्ण साथ देण्याचं ठरवलं.. अमन सांगतो. तोही दोन मुलांसह सध्या भारतात आले. इथेही आराधना शांत नव्हती. ही केस पुन्हा उघडावी म्हणून तिनं सह्या आणि इंटरनेटवर मोहीम सुरू केली. गरज पडली तर ही केस वरच्या कोर्टात लढवायची तिची तयारी होती. अखेर १९ वर्षांच्या प्रदीर्घ लढाई नंतर रुचिका ला थोड्या का प्रमाणात न्याय मिळाला, आणि एस. पी. एस. राठोड याला दिड वर्षाची शिक्षा झाली . पण खरच रुचिकाला न्याय मिळाला ? नाही अजुन तरी नाहीच!! या विषयावर मला येथील सुज्ञ मिपाकरांची मते जाणून घ्यायची आहेत त्या साठीच हा धागा... रुचिका खटल्याच्या अधिक माहिती साठी या लिंक चा वापर करा. http://en.wikipedia.org/wiki/Ruchika_Girhotra_Case -भाग्येश यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ || समेत्य च व्यपेयातां तद्वत् भूतसमागमः ||

वाचने 5771
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

जे झाले ते खरच वाईट झाला पण हि वेळ इतर कोणावर येऊ नये हिच प्रार्थना. भारतीय न्याय व्यवस्था भिकारचोट (अपशब्द बद्दल क्षमस्व, पण मला ह्याहून दुसरा योग्य शब्द सुचत नाही) आहे. वकिली हा पेश फक्त कायद्यातील पळवाटा शोधून, आपल्या पक्षाला निर्दोष साबित करणे ह्या साठीच आहे. कायदा चा उपयोग फक्त काळ्याचे तोंड गोरे करण्यासाठीच होतो. खरच गुन्हेगारांना सोडून हे अनेकदा सर्व सामान्यांनाच त्रास देतात. म्हणून तर म्हणतात कि शाहण्यानी कोर्टाची पायरी चढू नये. आमच्या इतेह सुद्धा एक साधी केस गेली ७ वर्ष पेंडिंग आहे. काय म्हणावे ह्या न्याय व्यवस्थेला. खूप उशिराने न्याय देणे हा सुद्धा एक प्रकारे अन्यायाच आहे माणूस मेल्यावर औषध / पाणी पाजून काय फायदा ? बोलावे तितके थोडेच आहे. अवांतर : जेव्हा द्रोपदी चे वस्त्र हरण होत होते तेव्हा कृष्णाने तत्काळ वस्त्र पुरविले, आजची न्यायव्यवस्था तेव्हा असती तर ............!

In reply to by Manoj Katwe

फक्त न्याय नाही, सर्वच व्यवस्था गंडलेल्या आहेत. यावर काहीही उपाय नाही.

नाही म्हटल तरी हा अप्रतक्ष्यपणे केलेला खुनच झाला आणि त्याला २ वर्षे सजा(६ महीने + १ वर्ष ६ महीने)???? आणि त्या ****ने तिच्या घरच्यांना ही खुप त्रास दीला त्याचे काय!! निर्णय चुकीचा नसला तरी अपुरा आहे!! strong>************************************************* मिसळपाव ते मिसळपावच!!दुसर सर्व गोड्या आमटीबरोबर पाव खाण्यासारखं........त्ये दुसरे के बारे मे हम कायबोली!

दिल्लीपासून गल्लीपर्यंत असे अनेक कायदा खुंटीला टांगून ठेवलेले पावरफुल लोक आहेत आणि कसलीही शिक्षा न होता उजळ माथ्याने वावरत आहेत. अशांना कायद्याने शिक्षा होणे अशक्य आहे. अशा वेळेस शिवसेना, मनसे अशा पक्षांनी पुढे येणे गरजेचे आहे. ती खरी जनसेवा होईल. आयाबहिणींकडे वाकड्या नजरेने पहाणार्‍याचे डोळे हातावर काढून देणारे (निदान तशा गर्जना करणारे) कोणी पुढे येतील का ? हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

In reply to by तिमा

अशा वेळेस शिवसेना, मनसे अशा पक्षांनी पुढे येणे गरजेचे आहे किणी प्रकरण, enron... विसरलात? सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते भ्रष्ट आहेत, त्यांच्यापासून कोणीही कुठलीच अपेक्षा ठेवू नका.

वरती काटवे साहेबांनी ज्या शिव्या दिल्या आहेत ना त्यात माझ्या आणि चार शिव्या मिसळा. अश्या वेळी बारबॅरिक शिक्षा असाव्यात अस वाटत, ++++सोलुन काढणारे फटके, किंवा भर चौकात आसुडान लोळवुन चामडी काढावी . शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

पूर्ण माहिती नाहीये, पण जे लिहिलं आहे ते तसेच असेल तर मात्र राठोडला अजून शिक्षा व्हावी असं वाटतंय. पण मला खरं कौतुक आराधनाचं वाटतंय. मैत्रिणीसाठी इतकी वर्षं झगडणे, ते सुद्धा पूर्ण सिस्टिमविरूद्ध. तिला भारतातील सर्वोच्च पुरस्कार द्यायला पाहिजे. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अंगावर काटा आला रुचिका आणि आराधना आणि त्यांच्या कुटुंबियांना जे काही सहन करावं लागलं ते वाचून! रुचिकाला न्याय मिळाला नाहीच, किमान मैत्रिणीसाठी झगडणार्‍या आराधनाला थोडंफार समाधान मिळू देत. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अंगावर काटा आला रुचिका आणि आराधना आणि त्यांच्या कुटुंबियांना जे काही सहन करावं लागलं ते वाचून! दुर्दैवाने असेच म्हणावे लागते आहे.. स्वाती

In reply to by बिपिन कार्यकर्ते

>>>राठोडला अजून शिक्षा व्हावी असं वाटतंय. अहो, त्या राठोडचा चेहरा पाहा. कसा निगरगट्ट वाटतो. कायम तुरुंगात खितपत पडायला हवा अशी काही तरी शिक्षा द्यायला हवी. आपल्या पदाचा गैरवापर करुन शोषण करणा-यांना कायद्याने मोठी शिक्षा दिली पाहिजे. म्हणजे, असा प्रयत्न पुन्हा कोणी करणार नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हया सर्व प्रकरणामधे महिला संघटनांचा आवाज काही फार ऐकू आला नाही ... मानव अधिकार वाले पण गप्पच बसले आहेत कि काय असे वाटते ... उद्याला हेच सर्व लोक तुरुन्गात त्या राठोडचा छळ होतो म्हणून गळा काढायला तयार होतील कि नाही ते बघा ... तिस्ता सेटल्वाड, शीला रमाणी, मेधा पाटकर यांनी आवाज उठवायला काय हरकत होती? की आंतर्राष्ट्रीय पुरस्कार मिळाले कि ही प्रकरणे छोटी वाटायला लागतात? खरे तर ह्या आराधनाच्या पाठीशी उभे राहून ह्या सर्वांना आपली विश्वासार्हता सिद्ध करता आली असती, पण ती तर अगदीच एकाकी लढा देतेय. त्या राठोडच्या पाठीशी कोणती राजकीय धेंडे आहेत त्यांना पण भर चौकात रक्त निघेपर्यंत बडवले पाहिजे. राठोड्च्या पत्नीबद्दल मात्र खरोखरच आश्चर्य वाटते, आणि संतापही येतो.

In reply to by sagarparadkar

तिस्ता सेटल्वाड, शीला रमाणी, मेधा पाटकर यांनी आवाज उठवायला काय हरकत होती? की आंतर्राष्ट्रीय पुरस्कार मिळाले कि ही प्रकरणे छोटी वाटायला लागतात? हे लोकं फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकांनी ओळखावे यासाठीच आंदोलनं वगैरे करतात...तिस्ता सेटल्वाड हि बाई तर मुसलमान दहशतवाद्यांचा कौल घ्यायलाही मागे पुढे बघायची नाही....रुचिकाला न्याय मिळाला नाहीच... राठोड्च्या पत्नीबद्दल मात्र खरोखरच आश्चर्य वाटते त्यात आश्चर्य काय ते...तिला जरी माहिती असले कि आपला नवरा काय लायकीचा आहे तरी "भारतीय नारी" म्हणून त्याच्या मागेच उभी राहणार....आठवा ते मोलकरणीवरील अत्याचाराचे प्रकरण.... कौतुक वाटते ते अराधानाचे आणि तिच्या नवर्याचेसुद्धा...अशा लढ्यात बायकोला त्याने एकटीला सोडले नाही हे तिचे भागच...नाहीतर घरीसुद्धा एक वेगळीच लढाई सुरु झाली असती.... रुचीकासारख्या केसेस अजूनही घडताहेत...फक्त उजेडात येत नाहीत इतकेच...आणि अशा प्रकारच्या न्यायालयीन निकालांनी कदाचित येणारही नाहीत... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

त्यात आश्चर्य काय ते...तिला जरी माहिती असले कि आपला नवरा काय लायकीचा आहे तरी "भारतीय नारी" म्हणून त्याच्या मागेच उभी राहणार....आठवा ते मोलकरणीवरील अत्याचाराचे प्रकरण.... राठौड नी त्याच्या मोलकरणीवर काय अत्याचार केले त्याबद्दल एकादा लिहाच. कारण आम्हाला त्या प्रकरणाबद्दल काही माहिती नाही. हा माणुस भलताच आंबटशौकिन आहे कि . वेताळ

In reply to by वेताळ

माझा रोख शायनी अहुजा याने त्याच्या मोलकरणीवर बलात्कार केल्यावर अहुजाच्या बायकोने मोलकरणीवरच असभ्य असल्याचा ठपका ठेवला त्यावर होता....पण ह्या राठोडचेदेखील असे अजून प्रकरण असण्याची शक्यता नाकारता येत नाही... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिका नि अदितीशी सहमत.. आराधनाचे खरंच कौतुक आहे.. नि भारतातल्या न्यायपद्धतीविषयी तर बोलायलाच नको.. अरूणा शानभागला या अवस्थेत पोचवणार्‍या सोहनलालला फक्त तिच्या गळ्यातील चेन चोरल्याबद्दल शिक्षा झाली!!! :( नैना साहनी प्रकरण, नि अशीच इतर कितीतरी प्रकरणं भिजत पडली नि न्यायाला विलंब म्हणजे न्याय न मिळाल्यासारखे तर आहेच.. त्यात फक्त दिल्लीच्या बारमध्ये एका मॉडेलचा(आताच नेमकं नांव आठवत नाहीए) खून केलेल्यांना शिक्षा झाली ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी गोष्ट!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by मस्त कलंदर

ती मॉडेल जेसिका लाल.. रूचिकाला न्याय पूर्णतः मिळाला असे खरंच वाटत नाहीये.. विनयभंग, आत्महत्येस प्रवृत्त करणे(म्हणजे खूनच की!) , इतका छळ तीचा,कुटूंबाचा, तिच्या मैत्रिणीचा.. या सगळ्यावर इतकी छोटी शिक्षा ? आपल्य देशात या सगळ्या केसेस कधी होतात व शिक्षा कितीतरी वर्षांनी तीही झाली तरच.. नाहीतर चालू आहे आपले केस लढवणे! :(

दारुण आणि विदारक चित्र. भयानक वाटलं वाचून. कायदे कडक होणं फार गरजेचं आणि निकडीचं आहे. कायद्याची भीती वाटली पाहीजे. इथे तर कुंपणच शेत खातय. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

कडक कायदे, धाक इतकेच नव्हे तर निदान अश्या प्रकरणात तरी कारवाई लवकर व्हायला हवी.

In reply to by शुचि

कायदे कडक होणं फार गरजेचं आणि निकडीचं आहे असलेले कायदेसुद्धा पुरेसे आहेत, जर नीट वापरले तर्..पण तुम्ही म्हणता तसे "इथे तर कुंपणच शेत खातय" मग कडक असले काय आणि मऊ असले काय X(

माझ तर प्रांजळ मत आहे. सौदी सारख्या शिक्षा, मग जरी त्या क्रुर-अमानवी वाटल्या तरी तश्याच आसाव्यात. भर चौकात नसल्या तरी चालतील पण आश्याच कठोर शिक्षा द्याव्यात. अश्या नराधमांना ठार करुन नये. कुजत खिजपत आयुष्य कंठायची शिक्षा असावी.

In reply to by गणपा

सौदी सारख्या शिक्षा, मग जरी त्या क्रुर-अमानवी वाटल्या तरी तश्याच आसाव्यात. भर चौकात नसल्या तरी चालतील पण आश्याच कठोर शिक्षा द्याव्यात.
आणि या शिक्षांची अंमलबजावणी करणार कोण म्हणे? हे असेच लोक ना? असूड शेवटी कोणाच्या हातात आहे? म्हणजे या लोकांना काहीही होणार नाही आणि यांच्या तावडीत सापडलेल्या निरपराधांना मात्र सौदीछाप शिक्षा होणार. सध्याच्या परिस्थितीत रुचिकाला, तिचा नातेवाइकांना, तिला साथ देणार्‍या मैत्रिणीला आणि तिच्या कुटुंबाला फक्त छळले गेले. सौदीछाप पद्धतीत कायदेशीररीत्या विनाचौकशी किंवा तोंडदेखल्या चौकशीसहित चौकात मुंडकी उडवून संपवले जाणार नाही, किंवा किमानपक्षी खोट्यानाट्या आरोपांखाली हातपाय तोडले जाणार नाहीत कशावरून? वर करणारे करूनसवरून नामानिराळे! आताच्या परिस्थितीत निदान खटला उभा तरी राहतोय! आताची परिस्थिती फार चांगली आहे असे म्हणायचे नाही. त्यात मुळापासून सुधारणा ही व्हायलाच पाहिजे. त्याबद्दल वाद नाही. पण तसे करताना रोगापेक्षा इलाज भयानकच नव्हे, तर रोगालाच पोसणारा, असे व्हायला नको, इतकेच. सौदीछाप शिक्षा सुरू झाल्या, तर त्याची पहिली अंमलबजावणी कोणत्याही खर्‍याखोट्या क्षुल्लक कारणासाठी तुमच्याआमच्यावर होईल, 'अधिकृत गुन्हेगारां'वर त्याने काहीही फरक पडणार नाही, याची खात्री बाळगावी. - पंडित गागाभट्ट.

In reply to by पंगा

गाग्या तु पैठनचा का? कारन मि आत्ताच पैठनला जाउन आलो !तेथे गागाभट्ट चउक पायला !तेथे १०८ येळा डणानेश्वरावर थुकलय ! ते बि १०८ वेळा आंघुळ करुन आल !आता आपन बि कुठ कुठ थुंकुन घान करनार ? एक शेती ऊपयोगि मानुस न मिळाल्यामिळे शेती करीत नसलेला शेतकरी........

In reply to by गणपा

अफझल गुरुला देखिल कुजवत ठेवले आहे तरी काही मानवतावादी लोक त्याला फाशी द्या,फाशी द्या नारा देत आहे.बिचारा अफझल त्याने कोर्टाला लवकरात लवकर फाशी द्या म्हणुन आर्जव केले आहे. वेताळ

ही बातमी माहिती होती. प्रस्तुत धाग्यानिमित्त निघालेल्या त्याबद्द्दलच्या आठवणी एकाच वेळी दु:खद , विषण्ण करणार्‍या आणि भारतीय व्यवस्थेबद्दलची प्रश्नचिन्हे नव्याने उभी करणार्‍या आहेत. प्रस्तुत प्रसंगामधे भारतीय न्यायव्यवस्थेच्या एकंदर स्थितीवर प्रकाश पडतो. सडलेली , अपुरी , वेळखाऊ , बाबुगिरीने , अकार्यक्षमतेने बुजबुजलेली व्यवस्था. ११० कोटींच्या आसपास लोकसंख्या असणार्‍या देशातल्या खटल्यांची संख्या , त्यांचे वर्षांचे आकडे हे सगळे निराशाजनक आहे. खटले चालतात, तारखा पडतात, दावे-प्रतिदावे चालतात , सर्व काही होते. फक्त न्याय मिळत नाही. रुचिका सारख्या केसेस प्रकाशात तरी आल्या. बर्‍याच वेळेस गुन्हा नोंदवला जात नाही. गेला तरी कृती होत नाही. झाली तर रडतखडत खटला दाखल होणार. वर्षानुवर्षे चालणार. या दरम्यान सत्तेमधे भागीदारी असणारे दबाव आणणार. कधीतरी निकाल लागणार. त्यावर अपील आहेच. पुन्हा तोच खेळ वर्षानुवर्षे. ज्युडिशियल रिफॉर्म्स ना खुद्द न्यायसंस्थेतूनच विरोध आहे. अलिकडेच निवृत्त झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांबद्दलच पहा. हे पद भूषवणारी पहिली दलित व्यक्ती. परंतु , "माहितीच्या अधिकारानुसार" जजेसनी आपल्या मालमत्तेची यच्चयावत माहिती द्यावी या गोष्टीला त्यांनी कसून विरोध केला. शेवटी हायकोर्टाच्या अनेका जजेस नी उठाव केल्यामुळे याची अंमलबजावणी व्हायला सुरवात झाली. कुठून होणार ज्युडिशियल रिफॉर्म ?

In reply to by मुक्तसुनीत

इथे न्यायव्यवस्थेपेक्षाही त्यातील खाच-खळगे माहित असलेल्या वरीष्ठ पोलिसांकडून प्रत्यक्ष कायद्याचाच अक्षम्य गैरफायदा घेतला गेला. अर्थात - पोलिसांकडून हे बर्‍याच वेळा घडते, पण असे प्रकार उघड होत नाही कारन त्यांना असलेले कायद्याचे पाठबळ आणि कायदा कसा वाकवता येतो ह्याचे सखोल ज्ञान. साधा हवालदारही त्याला असलेल्या मर्यादित अधिकारांचा अमर्यादित दुरुपयोग करतो, किंबहुना लाखो रुपये देऊन पोलिसातील नोकरी ह्याचसाठी मिळवली जाते. पोलिसी अत्याचाराच्या कित्येक कहाण्या लोकांसमोर आल्या तर कायदा आणी सुव्यवस्थेवरचा विश्वासच उडून जाईल. कित्येक नक्षलवाद्यांचा जन्म ह्या अशा अत्याचारांमुळे झाल्याचा सांगितले जाते. रुचिकाला साथ देणार्‍या तिच्या मैत्रिनीचे खरच कौतुक वाटते. राठोडला तिच्या मृत्युबद्द्ल दोषी ठरवून जास्तीत जास्त कडक शिक्षा द्यावी असे वाटते. त्याच्या दहशतीमुळे रुचिकाच्या पुर्ण कुटुंबाचीच वाताहत झाली.

मनाचा दाह होतो या असल्या भिकारचोट आयपीएस अधिकार्‍यांचा मुजोरपणा पाहून. सध्या 'राजा शिवछत्रपती' वाचत आहे. त्यात राजांनी अशा गुन्ह्याला सरळ हात-पाय कलम करण्याची शिक्षा फर्मावल्याचा उल्लेख आहे. गुन्हेगारांवर वचक,धाक बसवणे महत्त्वाचे असताना आपली शासन व्यवस्था, न्यायव्यवस्था मात्र प्रकरण कुजवण्यात का रस घेते कळत नाही. हे लोक वाचत नाही का असलं काही? आपलं रक्त उसळतं तसं त्यांचं का नाही उसळत? इतिहासातून काही बोध घ्यावासा वाटत नाही का या नालायकांना? X(

किती भोळेपणा ? १-२रीतल्या मुलालासुद्धा याचे उत्तर माहिती आहे.

भारताची न्यायव्यवस्था सर्वोत्तम आहे. इथे अडले नडलेल्ययांची कामे होतात आणि सर्व सामान्यांना न्याय मिळतो. आणि राहिला प्रश्न लवकर, उशिरा कामे होण्याचा, तर, जगात असे तत्काळ काहीच मिळत नसते. -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

भारताची न्यायव्यवस्था सर्वोत्तम आहे. इथे अडले नडलेल्ययांची कामे होतात आणि सर्व सामान्यांना न्याय मिळतो =)) =)) =)) =)) =)) :( जगात असे तत्काळ काहीच मिळत नसते पैशाने सुख्/सर्व गोष्टी विकत घेता येत नाहीत यासरखाच १ गैरसमज. फक्त खरेदी कुठे करायची ते माहिती पाहिजे...

रुचिकाबद्दलचा लेख कय आणि शिल्पा यान्चा लोकप्रभातल्या लेखावरची प्रतिक्रिया काय, आपल्याकडे वाईट अवस्था आहे हे खर. तरुणानी राजकारणात प्रवेश केला तर हे प्रश्न काही प्रमाणात कमी होतिल अस वाटत. 'काही प्रमाणात' अस मुद्दाम लिहिलय कारण राजाश्रयाने आलेले, अशिक्षित आणि भ्रश्ट तरुणही खुप आहेत आपल्याकडे.

इथे काळ्यावर पांढरे करुन त्या सुक्काळीच्याला काही फरक पडणार नाही ना फरक पडणार आम्हाला !! कशाला वांझोटे धागे काढुन लोकांच्या भावना चाळवता आहात? ह्यांना मोकाट सोडण्यासाठी कुठेतरी आपणच कारणीभूत आहोत.. त्याचा विचार कुठेच होताना दिसत नाही. याची खंत जास्त आहे.. दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||