मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आयुष्याचा 'अर्धा' प्याला..

डॉ.श्रीराम दिवटे · · काथ्याकूट
आयुष्याचा प्याला अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा? हे मानण्या न मानण्यावर असतं. माझ्या दोन मैत्रिणींची लग्ने एकाच दिवशी एकाच मांडवात झाली. दोघींनाही प्रत्येकी पंधरा हजार प्रतिमाह कमावणारे नवरे लाभले होते. नव्याचे नऊ दिवस संपल्यावर संसाराची गणिते चुकू लागली, प्रपंचाची गाडी आर्थिक रूळावरून वेळोवेळी घसरू लागली. महागाईच्या वणवा झोडपायला नवऱ्‍याचा पगार अपुरा पडू लागल्यावर दोघीँनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला... येथवर सर्व काही ठीक चाललं होतं, अगदी समसमान होतं. परंतु एकीचा पगार जास्तीत जास्त पाच हजारापर्यँतच पोचणारा, तर दुसरीला पंधरा हजारांची नोकरी. शिवाय पदोन्नतीची शक्यता. हा फरकच दोघींच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला... एक दिसामाजी कोमेजू लागली तर दुसरी फुलारू लागली. एक चिडचिडी, तणावग्रस्त बनली तर दुसरी जीवनाचा हरेक आनंद द्विगुणीत करीत गेली. एक चिंतातूर, अतृप्त अन् मनोविकार ग्रस्त झाली तर दुसरी सुखी, समाधानी अन् निश्चिंत होती. हा फरक आर्थिक स्तरामुळे झाला असावा अन् जास्त पगारावाली सुखी असेल असा अंदाज केला असेल तर तो पूर्ण चुकीचा आहे... आपल्याला जास्त पगार आहे, तेव्हा जरा छानछोकीत राहिलं तर बिघडलं कुठे? मंडईतला भाजीपाला घेण्यापेक्षा मॉलमधून खरेदी केला तर बिघडलं कुठे? क्लासवन जीवनशैली अंगिकारणं आता आपल्या आवाक्यात आलं असतांना हात का म्हणून आखडता घ्यायचा? असा विचार आचरणात आणून मोठ्या पगाराची मैत्रीण जरा मोकळी ढाकळी जगू लागली. काही दिवस मौज मजेत गेल्यावर तो उच्च वर्गाचा आव आणणं म्हणजे एक नशाच बनली. त्यामुळे तशा बेगडी जगण्याच्या हव्यासापोटी तिचा पगारही तोकडा पडू लागला. मग ओव्हर टाईम, बॉसची मर्जी राखणं, प्रमोशनसाठी, पगारवाढीसाठी आवाक्याबाहेरची कामं स्विकारावी लागली. इन्क्रीमेंट झाली तरी तो आकडा कमीच भासू लागला. इतका खर्च तिला आवश्यक नव्हे गरजेचाच वाटत होता. त्यामुळेच जास्त व्यय करण्यासाठी जास्त कमावणं, त्याच त्या चिंतेत वावरणं, रात्र रात्र झोप न येणं अशा दुष्टचक्रात ती सापडली, वहावत गेली. त्याचसोबत तिचं सुख समाधानही वाहून गेलं... याउलट कमी पेमेंटवाली मैत्रीण जरा विचार करूनच वागू लागली. आपल्या तुटपुंजा वेतनातही संसाराचा रथ कशा प्रकारे हाकता येईल याचे बजेट ती प्रतिमाह आखायची. किराणा, भाजीपाला गरजेपुरता अन् त्यातल्या त्यात परवडेल अशा किमतीचा, तोही चांगल्याच प्रतीचा घेत असे. दोन स्टॉप जाण्यासाठी विनाकारण रिक्षा करणे, बाहेरचं निकृष्ट दर्जाचं जेवण भरमसाट पैसे देऊन पोटात सारणे, जरूरी नसतांना फँशनेबल कपड्यांची खरेदी करणे इ. गोष्टी कटाक्षाने टाळून तिने आपला खर्च आटोक्यात ठेवला होता. वीजबचत, जरूर तितकेच अन्न तयार करणे, उष्टे उरणार नाही, पर्यायाने वाया जाणार नाही यावर तिचा कटाक्ष होता. मुळात जे आहे त्यातच समाधान मानणे, कुटुंबात मिळून-मिसळून आनंदात वेळ घालवणे अशा साध्या सोप्या गोष्टी आचरणात आणून ती आपल्या कमी वेतनाचा आकडा कुठल्या कुठे विसरून जायची. तिनं अमूक वस्तू घेतली मग आपणही घ्यावी अशा स्पर्धेचा विचारही मनात येत नसल्याने तिला सुखाची झोप लागत होती. समाधानी वृत्ती अंगवळणी पडल्याने तिचं आयुष्य खूपच यशस्वी ठरलं होतं... पहिलीच्या मते आयुष्याचा प्याला अर्धा रिकामा असून तो काठोकाठ भरण्याच्या मागे ती धावत होती. तर दुसरीच्या मनात प्याला अर्धा भरलाय ना, रिकामा तर नाही ना? मग कसली काळजी? असा निश्चिंत दृष्टीकोन कायम असायचा... सर्वच गोष्टी पैशात मोजाव्यात का?

वाचने 2751 वाचनखूण प्रतिक्रिया 11

In reply to by डॉ.श्रीराम दिवटे

धमाल मुलगा 18/05/2010 - 20:27
लेख छान! सद्यपरिस्थितीमध्ये नक्की काय घडते आणि काय करायला हवे ह्याचे अत्यंत साधेसुधे पण दुर्लक्षीत गणित मांडलंय. पण मी ओढला गेलो ते तुमच्या ह्या प्रतिसादामुळे. खरंच, खुपदा हे वाक्य ऐकलंय. विशेषतः परदेशी मार्केटिंग कंपन्यांकडुन... पण खरंच अंथरुण मोठं होत जातं का? दुर्दैवानं आपले पायही लांब होत जातात. मला वाटतं, हल्ली 'अंथरुण पाहुन पाय पसरावे' हे अमेरिकेची आर्थिक घडी विस्कटल्यानंतर फी घेऊन आर्थिक सल्लागार तिथे शिकवायला लागले. ह्या संदर्भातील एक घटना: माझ्या एका नातेवाईकाच्या हापिसात "How to be Rich" की "How to grow your balance" असं काहीसं व्याख्यान ठेवलं होतं. हे आमचे नातेवाईक गेले बिचारे चार पै आणखी गाठीला लावता येतील म्हणून.. कसलं काय? तुमच्या आमच्या आज्या-पणज्यापासुन जे सांगतात, "उधळमाध्ळ करु नका, किमान रक्कम शिल्लक टाका, त्या रकमेला हात लाऊ नका..." वगैरे वगैरे ऐकवलं आणि पुढच्या कन्सल्टिंगसाठीच्या (सशुल्क) सेमिनारची जाहिरातही केली.. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तिथले भारतीय लोक सोडुन सगळे ह्या गोष्टीने भारले गेले होते म्हणॅ..ताबडतोब त्यांनी पुढच्या सेमिनारसाठी पैसे भरुन टाकले. =)) तात्पर्य काय? दुसर्‍याची बायको सुंदर दिसत असली म्हणुन आपलीही बायको तशी व्हावी अशी बळजबरी करु नये. कधी काय अंगलट येईल सांगता येत नाही. :)

In reply to by डॉ.श्रीराम दिवटे

sagarparadkar 19/05/2010 - 18:14
>> - किँवा अंथरुण पाहून पाय पसरण्यापेक्षा अंथरुणाची लांबी वाढविण्यासाठीही प्रयत्न करावेत.? हे एकदम पटलं ... अंगभूत क्षमतांचा अधिकाधिक विकास करत जाणे, सतत काहितरी नवीन शिकत राहणे, कोणत्या कौशल्यांना कामाच्या जागी अधिक मागणी आहे ते हेरून त्याप्रमाणे ती ती कौशल्ये स्वतःमधे विकसित करत जाणे, अशा काहि उपायांमुळे अंथरुणाची लांबी वाढवता येते असे मला वाटते. किमानपक्षी आपल्याला पुरून थोडेसे जास्त उरेल एव्ह्ढे लांब अंथरूण असायलाच हवे ... वरील सर्व प्रयत्न करत असताना एक निखळ मनःशांती लाभतेच, शिवाय कार्यव्यग्र रहिल्यामुळे निराशा, दुसर्याशी तुलना करायला वेळच मिळत नाही

तुमचे मत अगदी योग्य आहे. आपल्या एकत्र कुटुंब पद्धतीमुळे काटकसरीचे अनेक मार्ग पिढ्यानुपिढ्या चालत आले होते. परंतु दुर्दैवाने आजकाल मोठं कुटुंब किँवा खटल्याचं घर केवळ वाचावयास मिळतं. अशावेळी हेच ज्ञान त्रिकोणी कुटुंबाला खूप नवं अन् संशोधित केल्यासारखं वाटतं व ते जुनेच सोने नव्या पँकीँगने सजवून प्लँटीनमच्या भावात खपतं..

अरुंधती 18/05/2010 - 21:50
समाधान हे ''मानण्यात'' असतं.... काहीजण अल्पसंतुष्ट असतात, काहींना कितीही द्या, कितीही उपभोगा - ते अपुरेच पडते! माझ्या मते ही आपापली मनोवृत्ती आहे. माझ्या ओळखीत अनेक मित्र-मैत्रिणी आहेत, ज्यांना भरपूर पगार आहे आणि त्याबरोबर येणार्‍या वाढीव जबाबदार्‍या, व्यक्तिगत जीवनासाठी अपुरा वेळ हेही आहे. पण तरीही ते प्रगती न थांबविता वेगवेगळ्या मार्गांनी सुख शोधत राहतात. कोणी बाहेरगावी फिरायला जाते, कोणी करमणुकीच्या कार्यक्रमांना जरूर हजेरी लावते, कोणी मनसोक्त खादडते, कोणी भरपूर मैदानी खेळ खेळते, कोणी ध्यान करते, कोणी पार्ट्या करते.... त्यातील काहींना आपल्याला कशात आनंद मिळतो हे कळालंय, आणि ते लोक आपला आनंद आसुसून मिळवत राहतात. त्यातील काहीजण समाधानी आहेत, काही नाहीत. कारण वृत्ती. आणि पैसे कमी मिळणारे दोस्तही सतत आर्थिक विवंचनेत असताना मी पाहिलंय. हप्त्यांवर वस्तू विकत घेतात. हप्ते, घरखर्च, औषधे, अतिरिक्त खर्च झाले की हाताशी काहीही पैसा उरत नाही म्हणून चिडचिड करणारे. स्वस्त गोष्टी विकत घ्यायला लागतात म्हणून नाराज असणारे. तडजोड करावी लागते म्हणून नाखूष असलेले. पुन्हा कारण, वृत्ती. आणि असाच कमी पगार असला तरी समजुतीने, काटकसरीने राहणारी समाधानी जोडपीही पाहिली आहेत मी. पुन्हा तेच कारण, आपली वृत्ती. ती आपली आपण ठरवायची! असमाधान हे आजूबाजूच्या गोष्टींमध्ये नसते तर मनामध्ये असते. मनाला प्रसन्न ठेवले, निरामय ठेवले, पूर्वग्रहमुक्त ठेवले तर सर्वच असंतोष संपुष्टात येईल. अरुंधती http://iravatik.blogspot.com/

In reply to by अरुंधती

अगदी उत्तम प्रतिसाद! आणि हे समाधान मानणारे लोकं श्रीमंत, गरीब, मध्यमवर्गीय सगळ्याच स्तरांमधे आढळतील. (समाधानी) अदिती

स्पंदना 18/05/2010 - 22:06
अतिशय महत्वाचा विषय तुम्ही चर्चे साठी काढला आहे. सगळी कडे जगात( हल्लि अमेरिका म्हणजे जग असा एक गैर समज आहे)बहुतेक लोक त्यान्ची पुर्वीची सन्स्क्रुती टिकवुन ठेवण्याचा अट्टाहास करताना मी पहाते. फक्त आपल्यालाच पुर्वजान्च सार मोडित काढावस वाटत. पण सार या टक्क्या टोणप्यान्ना पुरुन उरेल , रोजच आपल जगण सुलभ होइल अश्यासाठी दिलेली त्यन्ची शिकवण आज ही तेव्हढाच अर्थ आणि उप्युक्तता वाहताना दिसते. आज काल अगदी घसा फोडुन सान्गीतल जात, निदान दोन भाज्या खा. कोन्डा आरोग्यदायक! घरच अन्न पोषक. अरे आम्ही हेच तर जगतो. आत्ताच कुठ हे बाहेर खाल्ल् नाही तर करमत नही आणी अय्या तुला कोणत्या हॉटेल मध्ये काय मिळत माहित नाही? ची फॅशन आली आहे. माझ्या नवर्याच्या ऑफिसातल्या काही चायनिज पोरी मला तु रोज घरी बनवते? अस अगदी खोदुन खोदुन विचारत होत्या. मी हो म्हन्टल्या वर इन्डीयन बायको होण फार मुश्किल अशी टीप्पणी मिळाली. आपण जे काही आपल्या आई वडीलन पर्यन्त शिकलो ते आपणच भन्गार मध्ये काढायला निघालो आहोत. फार पैसा आहे म्हणुन तो उड वुन मजा करण्या ऐवजी थोड व्यवस्थी त राहील तर पुढच्या पिढीला आपण आपल्याला मिळालेल्या सन्स्कारातली काही तरी पुन्जी आपण सुपुर्द करु शकु. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

नक्कीच. व्यक्तिची वृत्ती अथवा स्वभावानुसारच काटकसर करायची की डामडौल मिरवायचा हे निश्चित ठरलेले असते. त्यामुळे विरोधाभासाची उदाहरणे पदोपदी आढळतील.

पुरणपोळी 19/05/2010 - 18:02
कुठल्याहि गोष्टिचा अतिरेक वाईट..योग्य, साध्य आणि निकोप (मनातून आलेली, तुलनेतुन नाही) मह्त्वाकांक्षा असणे आणि त्याद्वारे आपला आणि कुटुंबाचा उत्कर्श करुन घेणे, हा माझा व्यक्तिगत सुवर्णमध्य आहे.