Skip to main content

स्त्री : रुढी परंपरा ..मनुस्मृती आणि आपली भूमिका !

लेखक इन्द्र्राज पवार यांनी गुरुवार, 22/04/2010 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
".....हे विधी, या परंपरा, रूढी, श्रद्धा यांनी तर रानटी माणसाला सुसंस्कृत बनवलं. या जोखड नसून, यांच्यात सांकेतीक अर्थ आहेत. भावनिक पातळीवर साधलेला संवाद आहे मनामनांचा"..... आपल्यातील काही परंपरांचे काळाच्या ओघात अर्थ आणि औचित्य या दोन्ही अंगांनी नव्याने परिशीलन होणे गरजचे आहे. विशेषत: आताच्या माहितीच्या प्रचंड विस्फोटापुढे असे प्रश्न वा विचार एकमेकासमोर विचारार्थ ठेवणे काहीच वावगे नसून किंबहुना या आदान प्रदानामुळे का होईना विविध विचारांचे लोक एकत्र येऊन यातून सुवर्णमध्य काढू शकल्यास अंतिमत: समाजाच्या स्वास्थ्यासाठी तो एक स्वागतार्ह बदल होईल अशी माझ्याप्रमाणे कित्येकांची भावना आहे. त्या अनुषंगाने दोनेक दिवसापूर्वी इथे दिलेल्या "पिंड विधी आणि कावळा" या धाग्याला जो प्रतिसाद मिळाला तो पाहून हे तर निश्चितच झाले कि सदस्यांचा कल हा बराचसा वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारून नव्याने अशा परंपरकडे पाहिले पाहिजे असाच आहे. अर्थात काहींचे म्हणणे असेही दिसले की, "हे विधी, या परंपरा, रूढी, श्रद्धा यांनी तर रानटी माणसाला सुसंस्कृत बनवलं. या जोखड नसून, यांच्यात सांकेतीक अर्थ आहेत. भावनिक पातळीवर साधलेला संवाद आहे मनामनांचा." या मतावर खरे तर त्या ठिकाणी माझे उत्तर दिले गेले पाहिजे, पण ज्यावेळी उत्तर लिहायला मी संगणकासमोर बसलो, त्यावेळी असे जाणवले की याच विषयावर एक नवा धागा होऊ शकतो, ज्याचे वाचन सर्वजण करतील आणि नव्याने हा विषय पुढे चालू राहील. मुळात "रानटी आणि सुसंस्कृत" या दोन संकल्पना या मानवाने स्व:ताच्या सोयीने करून घेतलेली मोरपिसे आहेत. आपण आता ज्या ऐहिक सुखात, सुविधात, सुव्यवस्थेत आहोत त्याच्या तुलनेने या पृथ्वीवरील मूळ पुरुष नसल्याने आपण ते राहणीमान "रानटी" म्हणतो. सुसंस्कृत माणूस ज्यावेळी जनावरासारखे वागतो (विशेषत: कौटुंबिक पातळीवर...) त्यावेळी त्याचा अवतार हा कोणत्या युगातील हा प्रश्न आजुबाजुन्च्यावर नक्कीच पडतो. आता न चुकता सत्यनारायणाची पूजा घालून साधू वाण्याला होडीत बसवून दुनियेत फिरवायचे आणि पुण्य मिळवायचे ही रूढी सांभाळायची आणि दुस-या दिवशीच कार्यालयात जाऊन टेबलखालून हातमिळवणी करून नको असलेले व्यवहार कलमात बसवायचे, व वरिष्ठांच्या सह्या झाल्यावर तोच कालचाच शिरा प्रसाद म्हणून समोरच्याला द्यायचा (ही घटना मी प्रत्यक्ष बघितली आहे, आणि त्या सो-कॉल्ड साहेबाकडून त्याच्या सत्यनारायणाचा तो शिळा प्रसाद त्या व्यापा-याने खाल्लादेखील....). रानटी अवस्थेत असे प्रकार होते कि नाही याचे संशोधन मानववंशशास्त्रीय अभ्यासक करू शकतील, मात्र सुसंस्कृतपणाने माणसाला माणुसकी विसरायला लावली हे कटू वाटले तरी सत्य आहे हे नाकारता येणार नाही. बंगला, कार, सीसी, पाल्यांचे इंग्रजी माध्यम शाळेतील प्रवेश, एनआरआय दर्जा मिळविण्यासाठी चाललेली धडपड ! या आणि कितीतरी तत्सम बाबी हल्ली सुसंस्कृतच्या व्याख्येत बसविण्याचा यत्न चालू असतो. अशावेळी त्रयस्थ नजरेने पाहिले असता प्रगत आणि सुसंस्कृत ही विशेषणे लाऊन घेताना आपल्या परंपरा, रूढी, श्रद्धा यांचा विसर पडतो तिकडेही लक्ष दिले जाते का? "विधी, या परंपरा, रूढी, श्रद्धा यांनी तर रानटी माणसाला सुसंस्कृत बनवलं. या जोखड नसून, यांच्यात सांकेतीक अर्थ आहे" हे मत आपल्या एका सदस्य भगिनीचे असल्याने मी इथे त्यांना विचारू इच्छितो की "स्त्री" वर याच परंपरा/रूढी/श्रद्धा यांनी खरोखरी जोखड नावाची जी काही कठोर बंधने घातली होती तिचा स्वीकार आजच्या युगात आपणास मान्य होईल का? त्याही सुसंस्कृत आणि सांकेतिक अर्थाच्याच होत्या ना? एक काळ असा होता की आम्ही (आमचे पूर्वज म्हणा हवे तर....) "मनुस्मृती" ला डोक्यावर घेऊन नाचत होतो व त्याचप्रमाणे समाज रचना करून घेतली व त्याची अत्यंत कठोर पद्धतीने (रानटी म्हणा हवे तर...) अंमलबजावणीही करीत होतो. २० व्या शतकातही मनुस्मृतीची व्यवस्था या देशात पुन्हा यावी, म्हणून एक जबरदस्त मोहीम चालू होती, ती अशावेळी की महिलांनी देशाच्या आणि एकूणच समाजाच्या वृद्धीसाठी आपले बहुमोल असे योगदान देणे चालू केले होते. आणि एका विशिष्ट भूमिकेचा आग्रह धरणा-या गटाला "स्त्री" ही आता डोईजड होईल अशी भीती वाटू लागली होती (आजही... आत्ता, संसदेत महिला आरक्षणावरून जे वादळ चालू आहे त्याची जातकुळी हीच आहे.) मनुस्मृतीत भृगु आचारधर्म सांगतो तो असा की, "विवाहविधी हाच स्त्रियांचा उपनयानाख्या संस्कार मन्वादिकानी मानलेला आहे. केवळ पतीची सेवा हेच त्यांचे गुरुकुल व गृहकृत्ये हाच एकमेव जन्म उद्देश होय ." यावरून या सुसंस्कृत माणसाने स्त्रीला किती गौण स्थान दिले आहे याची जाणीव होते. आता या मुद्द्यावर मी जर मनुस्मृतीचा हा आचार धर्म मानु नका असे सांगितले तर "हे जोखड नसून यात सांकेतिक अर्थ आहे" असे म्हणता येईल का? काळाच्या कसोटीवर आपण स्त्रीचे समाजातील प्रमुख स्थान तसेच बरोबरीचे मान्य करू नये का? मनुस्मृतीच्या तिस-या अध्यायात "ब्राह्मण स्त्रीने स्वजातीतच विवाह करावा" असे म्हटले आहे. इतरत्र केल्यास ते हिणकस असल्याचे सूचित केले आहे. म्हणजे इ. स. २०१० मध्ये एखाद्या ब्राह्मण मुलीने असा एखादा प्रेमविवाह केल्यास तिने सुसंस्कृत परंपरेचा संकेत मोडला असे मानने ठीक होईल काय? सातव्या अध्यायात तर असे म्हटले आहे की राजाने ब्राह्मणांना दान द्यावे व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे "कर" आकारू नयेत. आता चालू युगात ही परंपरा कितपत योग्य मानावी? अध्ययन आणि अध्यापन तर ब्राह्मण जातीनेच करावे, क्षत्रिय व वैश्य यांनी करू नये, तर शूद्रांचा या बाबतीत उल्लेख देखील केलेला नाही. ही कोणत्या प्रकारची परंपरा? हे एक प्रकारचे काही वर्गांवर असह्य असे जोखड नव्हे का? स्त्रीच्या बाबतीत तर अशा प्रकारच्या आज्ञा आहेत की त्या वाचल्यानंतर, त्या मांडणीचा विचार केल्यावर, 'त्या काळात ते ठीक होते' अशा प्रकारचे समर्थन आजची एक ब्राह्मण स्त्री देखील करण्यास धजावणार नाही. १. वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत ब्रह्मचर्य पाळून विद्येची उपासना करावी, हे एकवेळ ठीक मानू या, पण हा अधिकार सर्व जातीच्या स्त्रियांना नाकारलेला होता. २. मुलीचे लग्न वयाच्या ८ व्या (आठव्या) वर्षी झाले पाहिजे (म्हणजे तिचा "पाय" घसरणार नाही....); तर वराचे वय त्यावेळी १८ असायला हरकत नाही. २४ वर्षाच्या युवकाला १२ वर्षाची मुलगी करावी. ३. पुत्राला पुत्र झाल्यानंतर आजोबा आजीनी वानप्रस्थास निघून जावे. ४. सगळ्यात अविश्वसनीय आणि भयावह तरतूद अशी आहे की, नवरा वेडा , व्यसनी, वा नपुंसक असला तरी स्त्रीला घटस्फोट घेण्याचा अधिकार नव्हता. पती मेल्यानंतर दुसरा विवाह करण्याला तिला मुभा नव्हती. सतीच्या चालीबाबत लिहायचे म्हणजे आणखीन एक नवा धागा करावा लागेल. आता सध्याच्या या युगात जर कुणी म्हटले की "मनुस्मृती" प्रमाणे आचरण करणे गरजेचे आहे, तर आजची युवती पेटून उठेल की नाही? ज्या काळात या परंपरा मागे पडल्या त्यावेळी देखील याच्या योग्यते बाबत बराचसा उहापोह झाला असणारच, विरोधही स्वाभाविकपणे ! तरीही काळाच्या ओघात यातील जोखड स्त्रीने टाकून दिलेच ना? मग ते कोणत्याही समाज सुधारकच्या प्रयत्नाने असो, वा सरकार दरबारी योग्य ते मांडणे झाल्यानंतर अंमलात आले असेल, तो मुद्दा महत्वाचा नाही. महत्वाचे आहे ते हे की, विज्ञान युगाच्या कसोटीवर परंपरेच्या पुस्तिकेतील त्याज्य वाटणारी प्रकरणे समाज धुरंधारणी लोकांनी योग्य त्या कारणासाठी टाकून फेकून दिली आणि त्यामुळेच या देशातील "स्त्री" ही ख-या अर्थाने मोकळा श्वास घेण्यास समर्थ झाली आहे. त्याच अनुषंगाने धर्मातील ज्या अतार्किक तसेच फोलपणा सिद्ध झालेल्या बाबींना "राम राम" म्हणणे म्हणजे परंपरेचा -हास केला असे मानने चुकीचे होईल. कृपया मत प्रदर्शन करावे.... धन्यवाद !!

वाचने 42407
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

In reply to by स्वाती राजेश

प्रयत्न केला .... पण बहुधा काही तांत्रिक बिघाडामुळे तु नलीका उघडली जात नाही. तरीदेखील नंतर प्रयत्न करीन. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

मृगनयनी जीं चे असे म्हणणे दिसले की मूळ लेखात मी मनुस्मृतीचा उल्लेख करताना ब-याच वेळा ब्राह्मणाना त्यात ओढले आहे. एखाद्या विषयावर काही लिखाण वा मत मांडावे लागले व त्यासाठी इतिहासाचे दाखले द्यावे लागले किंवा काही विशेष नोंदी घ्याव्या लागल्या तर ती बाब अपरिहार्य मानली पाहिजे, भले मग ती पुराव्याने सिद्ध करा किंवा त्या बाबतीत समाजात असलेला विश्वास मानाने असो. एखादा "पवार" किंवा "पाटील" असे काही लिहितो त्यावेळी त्याच्या नजरेसमोर एकच विशिष्ट आणि पारंपारिक हेतू असतो असे मानने केवळ चुकीचे नसून त्याच्या या बाबतीतील त्याने केलेल्या अभ्यासावर अन्याय करणारे असते. उथळपणाने जर अशा नाजूक/भावनिक विषयावर एखाद्याने लेखन केले असेल तर वाचणा-याला त्यातील फोलपणा चटकन जाणवतोदेखील. येथे काही गंभीर विषयावर प्रतिबिम्बित झालेल्या एक दोन ओळींच्या सैलसर टिपण्या पाहिल्या तर ही बाब प्रकर्षाने जाणवते की या सुंदर संस्थाळाचा वापर काही लोक केवळ "To Kill the free time" अशा समजुतीनेच करतात. (हे माझे अत्यंत वैयक्तिक निरीक्षण/मत आहे, तक्रार नव्हे हे कृपया ध्यानात घ्यावे .... !) अर्थात अशा नोंदीना दुर्लक्षीत करणे एवढेच आपल्या हातात असते. असो. मुद्दा असा कि, "ब्राह्मणाना त्यात ओढले आहे".... याला कायदेशीर आधार आहे. १८५६ साली ब्रिटीशांनी एक कायदा केला होता, तो "Hindu Widow's Remarriage Act" या नावाने अमलात आणला गेला. मनुस्मृतीप्रमाणे हिंदू स्त्रीचे लग्न फक्त एकदाच होते. पती निधना नंतर तिने पुन्हा लग्न करू नये, असे बंधन स्मृतीत आहे. तीवर त्यावेळच्या ब-याच समाज सुधारकांनी आवाज उठविला व आपल्या उदारमतवादी धोरणानुसार ब्रिटीशांनी तो कायदा केला व विधवा स्त्रीस (तिची इच्छा असल्यास...) पुनर्विवाहाचा हक्क प्रदान केला. अर्थात सनातन्यांना हे मान्य होणे शक्यच नव्हते, आणि १८५७ च्या उठावाची जी काही कारणे होती ती मध्ये "स्मृती कायद्यात ढवळाढवळ" हे देखील एक प्रमुख कारण होते. उठाव अयशस्वी झाल्यानंतर १८५८ च्या राणीच्या जाहीरनाम्यात "हिंदू कायद्यात" रीतसर आणि सुसंगत मांडणी करण्याचा प्रयत्न त्या वेळच्या काही कायदेपंडितांनी केला; त्यातील प्रमुख म्हणजे सर दिनशा मुल्ला व सर जे. डी. मेन. या दोघांचे या विषयावरील "Hindu Law and Usage" हे आजही कायदे शिक्षण घेणा-यांच्या अभ्यास क्रमात (संदर्भ म्हणून) समाविष्ट आहेत. येथे सर मेन यांनी काय निरीक्षण केले आहे ते वाचणे रोचक आहे. त्यांनी नोंदले कि, "Manusmriti's law does not as a whole represent a set of rules ever actually administered in Hindustan. It is, in great part, an ideal picture of that, which, in the view of the BRAHMINS, ought to be the law." यावर काय भाष्य करायचे? जर कायदे पंडीतानीच असे नोंदविले आहे की, "ब्राह्मण म्हणेल तोच आदर्श कायदा अशी स्थिती होती..." तर मग आमच्यासारख्या बोळातल्या ब्रॅडमनची काय कथा ? असे असले तरी आपण सर्वांचे (श्रीमती मृग नयनी , श्री. नितीन थत्ते , अदिती, श्री. जयंत कुलकर्णी, श्री. शैलेन्द्र इत्यादींचे) या निमित्ताने एका अभ्यासपूर्ण चर्चेबद्दल मन:पूर्वक आभार ! प्लीज कंटीन्यु ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

यावर काय भाष्य करायचे? जर कायदे पंडीतानीच असे नोंदविले आहे की, "ब्राह्मण म्हणेल तोच आदर्श कायदा अशी स्थिती होती..." तर मग आमच्यासारख्या बोळातल्या ब्रॅडमनची काय कथा ?
पवार साहेब आहो तेव्हाचा काळ वेगळा होता.चाली, रीती, परंपरा सर्व काही वेगळच होत. चालु काळाशी तुम्ही या गोष्टीची तुलना करु नका. किती काळ आपण याच गोष्टीला कवटाळुन बसणार आहोत?? मनुस्म्रुती मी अजुन वाचला नाही.त्यामुळे त्यात नक्की काय लिहिल आहे याचा अंदाज मला नाही. परंतु त्या ग्रंथात जे काही लिहिल असेल ते सर्व त्याच काळाशी निगडीत असेल. त्यात जे काही कथन केले असेल ते सर्वच ग्राह्य कसे मानुन चालेल? काळाप्रमाणे समाजही बदललो आणि समाज व्यवस्था सुद्धा.

काय खमंग चर्चा चालली आहे. मला वाटते, १) कुठलाहि काळ त्याच्या मागच्या काळापेक्षा पुढारलेला होता आणि पुढच्या काळापेक्षा मागासलेला होता २) सर्वकाळी लोक जुने कायदे आवश्यकतेनुसार बदलत होते, नवीन निर्माण करत होते. (कायद्याचा सोईनुसार अर्थ लावणे म्हणजे कायदा बदलणेच होय) ३) सर्वकाळी समाजात कायदा नि:पक्षपाती होता. कायद्याचा वापर करणारे विवेकी आहेत कि अविवेकी, लोक वत्सल आहेत कि स्वार्थी, यावर कायद्याची उपयोगीता ठरत आली आहे. ४) आजच्या वैज्ञानीक प्रगतीचा आणि मानवाच्या विवेकाधिष्टीत विचारसरणीचा अर्थाअर्थी काही संबंध नाहि. ज्ञान हे गरजेतुन, चिकित्सक दृष्टीकोनातुन तयार होते. "कार्यकारण भाव सम़जावुन घ्यायची ईच्छा असणे आणि त्यावरुन परीक्षा करणे" याला वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणतात. हा दृष्टीकोन आज सो कॉल्ड २१ व्या शतकात, वैज्ञानिक युगात जास्त आहे हे म्हणणे भाभडेपणाचे ठरेल. ५) कुठल्याहि शक्तीचा माणसच्या "माणुसकी"शी संबंध नाहि. (रामायण इतिहास मानला तर) वाल्या कोळि कुठलिही अतींद्रिय शक्ती नसताना एक सहृदय कवी-महर्शी बनला तर रावण एक ब्राह्मण असुनही शक्तीच्या उन्मत्तपणातुन खलनायक बनला. ६) पुढे चालताना मागे वळुन का बघावे ? तर आपण कठुन आलो, सोबत काय आणलय, त्याचा पुढच्या प्रवसाला त्याचा काय उपयोग आहे, आपली दिशा कुठली हे ठरवुन पुढे चालत जायचे आहे. हा पुढला प्रवास नसेल तर मागे वळुन बघण्यात काहि अर्थ नाहि. आणि हा प्रवास असेल तर मागच्या प्रवासाचं भान आवश्यक आहे... नाहि तर चुक हमखास होणारच होणार. ७) वेदांमधे मंत्रशक्तीचे प्रयोग खरच आहेत कि उगाच गप्पा आहेत, योगशास्त्र मनुष्याला खरच अतींद्रिय शक्ती देतात कि नाहि हा विषय वेगळा. मी वैयक्तीकरित्या या शक्ती असाव्या असं मानतो. मध्यंतरी "एका योग्याचे आत्मचरित्र" हे स्वामी योगानंदाचं चरित्र वाचण्यात आलं. त्यात योगीक चमत्काराच्या बर्‍याच गोष्टी आहेत. शिवाय ज्ञानेश्वर माउली, समर्थ रामदासस्वामी, विवेकानंद इ. मंडळींच्या योगीक चमत्काराच्या गोष्टी ऐकुन आहे. कबीर, मीराबाई यांच्या भक्ती कथा ऐकुन आहे. आता हे सर्वच्या सर्व खोटं आहे, हे लोकं वा त्यांच्या गोष्टी सांगणारे मानसीकरित्या 'डिफेक्टीव' होते, बंडलबाज होते, हे मला तरी पटत नाहि. पण पुन्हा, या योगशक्तींचा समाजात माणुसकी वाढवायला काहि उपयोग उपयोग नाहि. या सर्वांनीही योगशक्तीचा प्रचार न करता प्रेमाचाच संदेश दिला आहे. ८) समाजीक उतरंड टाळता येणे शक्य नाहि. या उतरंडीत वरच्या पातळीला खालच्या पातळीबद्दल किती कणव, प्रेम, आपुलकी आणि त्यांच्या उत्थानाचि तळ्मळ आहे यावर सामजीक स्वास्थ्य अवलंबुन आहे. वैज्ञानिक प्रगती, योगशक्ती, रुढी, परंपरा, या सर्व गोष्टी माणसाचि नियत कशी आहे यावरुन चांगला वा वाईट परिणाम करत असतात. ९) माणसाचि नियत सुधारण्याच्या बाबतीत (किमान आजचं) विज्ञान काहिच करु शकत नाहि. हुश्श्श्..... विषयाला धरुन आणि सोडुन बरच लिहीणं झालं. वाचक मायबाप योग्य सल्ले देतिलच :) (पुढे बघुन चालणारा) अर्धवटराव -रेडि टु थिंक

In reply to by अर्धवटराव

"....विषयाला धरुन आणि सोडुन बरच लिहीणं झालं...." नाही, व्यक्तिशः एक वाचक या नात्याने तर मी असे म्हणेन की, आपण मांडलेले सर्वच मुद्दे स्वतंत्र धाग्याचे विषय आहेत. विशेषतः "सामाजीक उतरंड टाळता येणे शक्य नाहि." हे प्रकटन तर जळजळीत निखा-याइतके सत्य आहे ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

उदा. रोज सकाळी सूर्य उगवताना त्यास अर्घ्य देऊन १२ वेळा श्रद्धापूर्वक सूर्यमंत्र म्हटला असता... डोळ्यांचे आरोग्य उत्तम रहाते. तसेच चष्मा असणार्‍यांचा नंबर, हा उपाय नियमित केला असता झपाट्याने कमी होतो. बरं झालं सांगितलं ! मी आता रोज सकाळी सुर्य उग्वताना त्यास २४ वेळा "अर्ध्य" का ? पुर्ण श्रध्दापुर्वक सुर्यमंत्र म्हणेल !