मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आधुनिक राष्ट्रवाद, हिंदू आणि मुसलमान

अप्पा जोगळेकर · · काथ्याकूट
भूतकाळात घडलेल्या घटनांमुळे ज्या समस्या निर्माण झालेल्या असतात त्यांची उत्तरे शोधताना वर्तमानकालीन वस्तुस्थितीचे संदर्भ लक्षात घ्यावे लागतात. राष्ट्रीय ऐक्याच्या दॄष्टीने, हिंदू आणि मुसलमानांचे परंपरागत वैर केवळ याच दृष्टीने हाताळाले जाऊ शकते. कोणी यावर असा आक्षेप घेऊ शकेल की हिंदुस्थानात हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, पारशी, बौद्ध, जैन्,शीख अशा अनेक धर्मांचे लोक राहात असताना, पुन्हा त्यांच्यातही चौदा भाषा आणि शेकडो पोटभाषा, जाती, पोटजाती यांच्या आधारे भेदाभेद असताना आणि त्यामुळेच की काय, विविध प्रकारचे धर्मवाद, जातीयवाद्,प्रांतवाद आणि भाषावाद उफाळून वर आलेले असताना, एका हिंदू-मुसलमान वादासच अवास्तव महत्त्व का द्यावयाचे ? यावर आमचे उत्तर इतकेच आहे कि या सगळ्याच वादंच ऊहापोह एकेकटा आणि स्वतंत्रपणे केला गेला पाहिजे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून अत्यंत जटिल आणि मूलभूत समस्येच्या स्वरूपात भारतीय राष्त्रासमोर उभा असलेला जो हिंदू- मुसलमान यांच्यातील परंपरागत संघर्ष, त्याचीच काय ती चर्चा वर्तमानकालीन परिस्थितीच्या संदर्भात आपण करणार आहोत. असल्या चर्चा आणि वादविवाद यांनी राष्ट्रांची भवितव्ये घडत नसतात हे आम्ही जाणून आहोत. परंतु अशा चर्चा कोणचे काही बिघडवित नसतात हेही लक्षात ठेवले पाहिजे. सर्वसाधारणपणे सगळ्या कट्टर हिंदुत्ववाद्यांचे म्हणणे असे असते कि हिंदू हे ह्या देशातले मूळ रहिवासी आहेत, येथे हजारो वर्षांपासून राहात आहेत, विविध प्रकारच्या प्रथा, परंपरा आणि संस्कृती असलेल्या इथल्या रहिवाशांना जोडणारा समान धागा हिंदुत्व हाच काय तो आहे. परकीय आक्रमणांचा सामना करताना हिंदुस्थानातील लोकांमध्ये राष्ट्रीय वृत्ती निर्माण करन्याचे महत्कार्य हिंदुत्वानेच केले आहे. म्हणून अखंड हिंदुराष्ट्र हा अखिल हिंदुजातीचा जन्मसिद्ध अधिकार आहे. हा दावा निखालस खोटा आहे असे आम्ही म्हणू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. जेंव्हा जेंव्हा आपण 'भारत हे एक पाच हजार वर्षांचे सातत्य आहे असे म्हणतो' तेंव्हा भारताचा इतिहास हा प्रामुख्याने हिंदूंचा इतिहास आहे हे ऐतिहासिक सत्य नाकारता येत नाही आणि 'पाच हजार वर्षांचे सातत्य' हा शब्दप्रयोग प्राचीन हिंदू परंपरा, प्रथा आणि इतिहास या संदर्भातच वापरला गेला आहे हे देखील नाकारता येत नाही . पूर्वीच्या काळी एक सरकार, एक संविधान, एक तिरंगा झेंडा, एक संसद अशा गोष्टींचे अस्तित्व नव्हते. फुटकळ फुटकळ राजे आपापल्या वकूबाप्रमाणे ठराविक प्रदेशावर राज्य करीत असत. अशा परिस्थितीत परकीय आक्रमणांचा सामना करण्यासाठी, इथल्या जनतेत राष्ट्रीय वृत्ती निर्माण करण्यासाठी इथल्या राजांनी हिंदुत्वाचाच आधार घेतला यात नवल नाही. म्लेंच्छ शकांशी लढणारा राजा विक्रमादित्य असो किंवा हिंदवी स्वराज्यासाठी लढणारा शिवाजी असो, आसाममधले आहोम राजे असोत की चितोडचा महाराणा प्रताप असो; हे सगळे राष्ट्रपुरुष लढले ते हिंदुधर्मासाठीच. हिंदू हा शब्द त्याला जोडल्या गेलेल्या इतिहास आणि परंपरा, धर्म आणि तत्त्वज्ञान, संस्कृती आणि प्रथा या संदर्भांमुळे खोलवर दडलेल्या प्रेरणांना आवाहन करणार्‍या राष्ट्रीय धर्माचे प्रतीक बनला होता. आज जागोजाग दिसणार्‍या कडव्या हिंदुत्ववादाचा उगम असा खोल इतिहासात आहे. पण हा हिंदुत्ववाद म्हणजे आधुनिक राष्ट्रवाद नव्हे. पुरातन संदर्भांच्या आधारे कोणत्याही आधुनिक राष्ट्राची उभारणी करणे शक्य आहे काय, व्यवहार्य आहे काय याचा विचार आपण प्रथम केला पाहिजे. मुस्लिम धर्मांधतेचा पाडाव करण्याच्या इर्ष्येतून निर्माण झालेल्या हिंदुराष्ट्राच्या भूमिकेस पारशी, बौद्ध, शीख, ख्रिश्चन, जैन धर्मीय पाठिंबा देतील काय? हिंदू धर्मातले शतकानुशतके अन्याय सहन केलेले हरिजन आणि नवबौद्ध तरी या भूमिकेस पाठिंबा देतील काय ? मुसलमान धर्मांध आहेत म्हणून आपण अब्दुल कलामाना नाकारू शकत नाही. आमिर खान. इरफान पठाण, हुसेन दलवाई, अझीझ प्रेमजींना नाकारू शकत नाही. आपण नाकारले पाहिजे त्यांना जे संविधानाऐवजी शरियतला प्रमाण मानतात. आपण नाकारले पाहिजे त्यांना की जे समान नागरी कयद्याला विरोध करतात. आपण नाकारले पाहिजे त्यांना कि जे वंदे मातरमला विरोध करतात आणि त्यांनाही की जे स्वतंत्र हिंदुराष्ट्राची मागणी करतात. प्रश्ण विचारण्याचे हत्यार हे लोकशाहीतले सर्वांत प्रभावी हत्यार आहे. आहे ना खुमखुमी मग उचला ते. जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा का जाळतात ? भिवंडीत पोलिसांच्या अमानुष हत्या क होतात? मालेगावात स्फोट का होतात ? साध्वी प्रज्ञासिंग, अफझल गुरू सारखे अतिरेकी वर्षानुवर्षे सरकारी पाहुणचार झोडत जिवंत कसे राहतात? आम्हाला उत्तरे मिळाली पाहिजेत. अशा प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करण्याचे धैर्य आपण दाखवले पाहिजे. तसे धार्मिक, सामाजिक आणि राजकीय प्रवाह निर्माण केले पाहिजेत. तसे करण्याचे उत्तरदायित्व त्यांचे आहे की जे स्वतःला बुद्धिजीवी म्हणवतात, त्यांचे आहे की जे स्वतःला विचारवंत म्हणवतात आणि त्यांचेही आहे की जे स्वतःला राज्यकर्ते म्हणवतात. अप्पा जोगळेकर, डोंबिवली (आमचे लिखाण गंभीर आहे. वृत्ती नव्हे.)

वाचन 5592 प्रतिक्रिया 0