Skip to main content

अचारी चिकन

लेखक शोनू यांनी रविवार, 08/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
न्यू जर्सीतल्या एडिसन मधे शालिमार नावाचं एक रेस्टॉरंट आहे. तिथे ही डिश पहिल्यांदा खाल्ली होती आणि Love at first bite प्रकार झाला. त्यानंतर कधिही एडिसन ला जाणं झालं की अचारी चिकन आवर्जून खात असू, किंवा घरी घेऊन येत असू. मित्र मैत्रिणी जरी जायचे झाले तरी 2 order of achari chicken आणायची standing order असे सगळ्यांना. पाकिटातले मसाले वापरून घरी करून पाहिलं दोन चार वेळा पण त्याला शालिमार सारखी चव कधी आली नाही. सुलेखा वर ही कृती मिळाली अन मी लगेच करून पाहिलं. शालिमार मधल्या चिकन मधे लसणीच्या पाकळ्या पण असतात. त्या मात्र मी विसरले. ७००- ८०० ग्रॅम चिकनचे तुकडे - ३ कांदे बारीक चिरून ३ टोमॅटो बारीक चिरून लसणाची पेस्ट १ मोठा चमचा आल्याची पेस्ट १ मोठा चमचा घट्ट दही ३ मोठे चमचे कलौंजी १ चहाचा चमचा मेथीदाणे १/२ च. चमचा जिरं १ च चमचा बडिशेप १ च चमचा भाजलेल्या जिर्‍याची पूड १ च चमचा तिखट चवीप्रमाणे हळद १/२ च चमचा २-३ हिर्व्या मिरच्या ( किंवा चवी प्रमाणे ) १ लिंबाचा रस मीठ मिरच्यांना एक चीर देउन त्यात थोडा लिंबाचा रस व मीठ मिसळुन एका वाटीत ठेवा. कलौंजि, जिरं बडिशेप, मेथी चे दाणे कोरडे मंद आचे वर परतुन त्याची भरड पूड करून घ्या. एका जाड बुडाच्या कढईत किंवा पातेल्यात ४-५ मोठे चमचे तेल गरम करून त्यात्य कांदे लालसर तपकिरी होईपर्यंत परतून घ्या. वरच्या भरड पूडी पैकी अर्धी कांद्यावर घालून १-२ मिनिटे परता. मग आलं-लसणाची पेस्ट व हळद घालून परता. मग चिकन चे तुकडे घालून नीट परतून घ्या. चिकन सगळी कडून ब्राउन झाले की गॅस मोठा करुन दही घाला व चिकन परतून घ्या. दह्यातले पाणी सुकले की तिखट, जिर्‍याची पूड अन टोमॅटो घालून परतून घ्या. ४-५ मिनिटे परतत रहा. मग गॅस थोडा लहान करुन १/२ कप पाणी व मीठ घालून झाकून १५-२० मिनिटे चिकन शिजू द्या. मग हिरव्या मिरच्या व उरलेला लिंबाचा रस घालून परत ५ मिनिटे शिजू द्या. गरम गरम अचारी चिकन तयार. पाहिजे असल्यास थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालावी व गरम गरमच सर्व्ह करावे. नान किंवा तंदुरी रोटीबरोबर मस्त. पोळीबरोबर पण छानच लागतो हा प्रकार. फारसा रस्सा नसतो.

वाचने 4547
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

आचारी चिकण बद्दल कालच एका पुस्तकात वाचले आहे.आज तुम्ही त्याबद्दल माहिती दिली.एकदा करुन बघायला हवे.फोटो असतील तर टाका.पाकृ बद्दल धन्यवाद. वेताळ

In reply to by वेताळ

बाकी पाकृ आवडली . अवांतर : कलौंजि म्हणजे काय ते सांगितल्यास बरे होईल ;-) सही /- आगरी बोली - आगरी बाना.

हा चिकन अचारी नावाचा भयानक प्रकार आम्ही पण एकदा एडिसनलाच खाल्ला होता. अहो चक्क लोणच्याच्या फोडी होत्या त्यात! आता बोला...