मार्था स्टुअर्ट या बाईंचे एक पुस्तक माझ्याकडे पडले आहे. परवा छोट्या मुलांसाठी म्हणून काही करण्याचा घाट घातला आणि या पुस्तकाची आठवण झाली. खरेतर मुले कशाला, हे असे छोटे टार्ट मलाही खूपच आवडतात. आणि बाहेरून आणायचे म्हणजे प्रत्येक टिचभर टार्टला दोन-अडीच नाणी मोजा. म्हणून एकतर मी काचेच्या आडून डोकावीत असणार्या अशा गोड गोष्टींना टाळून पुढे जाते, किंवा अगदीच मोह टळला नाही, तर स्वतः काहीतरी करण्याचा घाट घालते.
मी आधीही स्वयंपाकघरात असे बेकिंगचे प्रयोग केले आहेत, आणि अनेकदा माझ्या सुदैवाने ते यशस्वी झाले आहेत. पण टार्टच्या बाबतीत जेव्हा जेव्हा केले - दोन्ही तिन्ही वेळा - चुकतच होते. कधी कडक तर कधी चक्क चावताही न येणारे असे टार्ट निपजत. एकदोनदा स्वतःच्या कृतींचे अनुभव घेऊन स्वतःची पाककृती तयार करण्याचा नाद सोडून दिला. आणि मार्थाताईंच्या पुस्तकातील लेमन कर्ड घालून केलेल्या टार्टऐवजी स्ट्रॉबेरी प्रिझर्व (जॅमप्रमाणेच) घालून एक टार्टचा प्रकार मध्यंतरी करून पाहिला. आणि तो छान जमला. त्यामुळे मार्थाताईंच्या पुस्तकावर बेतलेली ही एक थोडी बदललेली पाककृती देत आहे. या साहित्यात साधारण दोन डझन तरी छोटे टार्ट होतील.
बाजारात लहान टार्टचे पॅन मिळतात. पण माझ्याकडच्या लहान मफिनच्या नॉनस्टिक वाट्यांच्या पात्रात मी हे टार्ट केले.
टार्टसाठी जिन्नस-
१-१/२ कप मैदा
१/४ च. च. मीठ
थोडेसे जाडसर दूध ( दोन-तीन मोठे चमचे)
६ टे. स्पून लोणी (मीठ न घातलेले बटर) - हे मी पूर्वी कमी घालीत असे, पण तसे करून चव/रूप बिघडे तेव्हा लक्षात आले की लोणी कमी घालून करण्यापेक्षा न केलेले बरे.
१/४ कप पिठीसाखर (मी आमच्याकडे मिळते तशी बारीक दाणेदार साखर घातली तरी विशेष प्रश्न वाटला नाही).
१ अंड्याचा पिवळा बलक ( मार्था दोन अंड्यांचा बलक सांगतात).
कृती:
लोणी फेटून घ्यावे. त्यात अंड्याचा बलक घालून फेटून घ्यावा, आणि मग पिठीसाखर आणि २ च. दूध घालून मिश्रण एकजीव करावे. यानंतर मैदा आणि मीठ एकत्र करून हळूहळू त्यात घालावे. गुठळी होऊ नये, तसेच अगदीच खूप घट्ट वाटले तरच दूध घालावे. साधारण आपल्या शंकरपाळ्यांसारखे पीठ तयार होते. कृती श़ंकरपाळ्यांसारखीच साधारण. म्हणजे हे तयार पीठ एक प्लास्टिकच्या पिशवीत (रॅपमध्ये) हवा जाणार नाही, यापद्धतीने काळजीपूर्वक बांधून फ्रीजमध्ये किमान दोन तास ठेवावे. मी रात्रभर ठेवले. दुसर्या दिवशी पीठ काढून ते काही वेळ तसेच ठेवावे. मळून लाटण्याइतपत सैल झाले (साधारण अर्धाएक तास) की लाट्या करून शंकरपाळ्यांप्रमाणे काहीसे जाडसर (पण खूप जाडही नाही) असे लाटून घ्यावे. प्रत्येक वेळी लाटल्यानंतर दीड-दोन इंचाच्या व्यासाच्या वाटीने त्यातून दोन-तीन छोटे गोल कापून घ्यावे. हे गोल प्रत्येक वाटीत हलक्या हाताने बसवावे. (मार्थाताईंनी हे पॅन परत प्लास्टिकमध्ये बंद करून बेक करण्यापूर्वी १/२ तास फ्रीजमध्ये ठेवायला सांगितले आहे, मी ते घाई असल्याने लगेच बेक केले). अव्हन ३५० डि. ला तापवून घ्यावा. आणि टार्ट १०-१२ मिनिटे बेक करावे. (चुकून टार्ट मऊ आहेत असे वाटून जास्त वेळ ठेवण्याचा मोह झाला, तरी ते १२ मिनिटांपेक्षा अधिक वेळ आत ठेवू नये, कारण टार्ट कडक करायचे नाहीत. ) लगेच वाट्यांमधून बाहेर काढून हवेवरच गार करावे.
आम्ही गार होताक्षणी त्यात स्ट्रॉबेरी प्रिझर्व्ह चमचाभर भरले आणि एकेक स्ट्रॉबेरी शोभेला लावली (मुलांना टार्टच्या वाट्या भरायला दिल्या तर आनंदाने भरतात असा अनुभव आहे). याखेरीज इतरही आंबटगोड वस्तू (लेमन कर्ड इ.) भरता येतात. लगेच खायचे नसल्यास गार झाल्यावर टार्ट हवाबंद डब्यात भरून ठेवावे. एका दिवसाच्या आत ते वापरावे.

आता सगळ्या उपासकर्त्यांचा उपास सुटला असेल, त्यामुळे ही पाककृती मिपावर चालायला हरकत नाही.
आता सगळ्या उपासकर्त्यांचा उपास सुटला असेल, त्यामुळे ही पाककृती मिपावर चालायला हरकत नाही.
वाचने
3888
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाणी सुटलं तोंडाला
तात्यांचा
छान छान
निषेध . .
काय भारी
आहाहा..
हम्म
In reply to आहाहा.. by प्राजु
नाही गं..
In reply to हम्म by चित्रा
आभारी आहे
टार्ट ची छान रेसिपी