Skip to main content

कॉकटेल लाउंज : जिंजर बग (Ginger Bug)

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 28/08/2026 09:50 या दिवशी प्रकाशित केले.

आज विकांत, पण कॉकटेल लाउंज मधे हे आजचे कॉकटेल नाही, तर पुढच्या अनेक ड्रिंक रेसिपींना जीवंतपणा देणारी एक भन्नाट गोष्ट, जिंजर बग!

 

पार्श्वभूमी:

 माझ्या हेल्थ रेजिममुळे अलीकडेच खाण्यापिण्यातल्या अनेक नव्या गोष्टी आणि जुन्या गोष्टी नव्याने कळायला लागल्या आहेत. साखर बंद, मैदा बंद, प्रोसेस्ड पदार्थांना शक्य तितका रामराम ठोकणं हे सगळं सुरू आहेच. त्याच्या जोडीला प्रोबायोटिक पेयं प्यायल्यास गट हेल्थ ला फायदेशीर असतं असा शोध लागला. त्याबरोबरच, प्रोबायोटिक पेयांसाठी ‘लॅक्टो फर्मेंटेशन’ ही प्रोसेस आहे असं कानावर पडलं. आधी नाव ऐकून काहीतरी डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधासारखं वाटलं; पण थोडा शोध घेतल्यावर कळलं की आपल्या लोणच्यांपासून ते कांजीपर्यंत अनेक पदार्थांत हा प्रकार आपल्याकडे फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. अगदी माझ्या आवडीची कोरियन किमचीही ह्या ‘लॅक्टो फर्मेंटेशन’चाच परिपाक आहे.

 

त्याच शोधमोहीमेत जिंजर बग भेटला. आलं, साखर आणि पाणी ह्या तिघांची संगत करून तयार होणारा हा छोटा लॅक्टीक ॲसिड तयार करणाऱ्या जीवाणूंचा कारखाना! ह्यापासून घरच्या घरी नैसर्गिक फसफस असलेली जिंजर एल सारखी इतर भन्नाट होममेड कार्बोनेटेड सोडा असलेली पेयं तयार करता येतात, हे कळल्यावर अत्यंत आनंद होऊन त्यावर प्रयोग करायची संधी मिळाली. मग काय, किचन काउंटरवर एक काचेची बरणी दाखल झाली आणि तिच्यातला हा जिंजर बग रोज खाऊन-पिऊन फुगायला लागला. 🙂

आलं म्हणजे आपल्या घरातला सर्वगुणसंपन्न कलाकार. चहा असो, काढा असो, आमटी असो की मटणाचा रस्सा; आल्याने आपली छाप सोडायचीच. पण हेच आलं थोडी साखर आणि पाणी ह्यांच्या संगतीने एका काचेच्या बरणीत ठेवले, तर ते चक्क नैसर्गिकरीत्या फसफसणारे पेय (Naturally Carbonated Soda) बनविण्याची तयारी करते! आल्याच्या सालीत आणि आल्यामध्ये असलेले 'नैसर्गिक वाइल्ड यीस्ट' साखरेचं रूपांतर लॅक्टीक ॲसिड आणि अल्कोहोल मधे करते. मात्र नैसर्गिक फर्मेंटेशनमुळे अल्कोहोल अगदी नगण्य प्रमाणात तयार होत असते, हे ध्यानात ठेवावे. ह्या साखरेचं रूपांतर होताना होणाऱ्या रासायनिक प्रोसेस मधे कार्बन डायऑक्साईड (CO2) तयार होतो जो नैसर्गिक फसफस (Natural Carbonation) तयार करतो.

 
तर, चला तयार करूयात हा छोटासा ‘जिंजर बग’!

साहित्य:

प्रकारनैसर्गिक फर्मेंटेड जिंजर स्टार्टर
ताजे आलं (सालीसकट, स्वच्छ धुतलेले)२ टेबलस्पून, बारीक कापलेले/किसलेले
साखर२ टेबलस्पून
पिण्याचे/फिल्टर केलेले पाणी (नॉन-क्लोरिनेटेड)५०० मिली
काचेची बरणी
रबरबँड
स्वच्छ कापड किंवा कॉफी फिल्टर 

 

Description 3
पाणी

 

कृती:

सर्वप्रथम स्वच्छ काचेच्या बरणीत कापलेले/किसलेले आलं आणि साखर घाला. त्यावर पाणी ओतून स्वच्छ चमच्याने ढवळून घ्या. 

आता बरणीला घट्ट झाकण लावू नका. त्याऐवजी स्वच्छ कापड किंवा कॉफी फिल्टर ठेवून रबरबँडने बांधून घ्या. हवेचा थोडा खेळ राहिला पाहिजे; पण धूळ-माश्या वगैरे नकोत. 

ही बरणी स्वयंपाकघरातल्या थेट सूर्यप्रकाश नसलेल्या जागी ठेवा.

पुढचे ५ ते ७ दिवस रोज त्यात १ टेबलस्पून किसलेले आलं आणि १ टेबलस्पून साखर घालून ढवळा. 

बरणीत छोटे बुडबुडे दिसू लागले, किंचित आंबट-आल्याचा वास येऊ लागला, की समजा जिंजर बग तयार होऊन कामाला लागला आहे!

वातावरण खूप उष्ण असेल तर हा प्रकार ३-४ दिवसांतही तयार होऊ शकतो. आणि थंडीत जरा सबुरी ठेवावी लागते; जिंजर बगही आपल्या मूडप्रमाणे चालणारा प्राणी आहे. 🙂

बाटलीत फसफस तयार होत असल्याने ती रोज एकदा हलकेच उघडून वायू बाहेर जाऊ द्यावा. नाहीतर आपले मॉकटेल तयार होण्याऐवजी स्वयंपाकघरात छोटेखानी फटाकेबाजीचा कार्यक्रम होऊ शकतो! एकदा हा जिंजर बग तयार झाला की त्यातून थोडा भाग वापरून उरलेल्या भागाला पुन्हा आलं-साखर खाऊ घालत राहायचे. म्हणजे घरातला हा छोटा बारटेंडर सतत कामाला तयार!

 

महत्त्वाची सूचना:

काचेच्या बरणीच्या तोंडाशी बुरशी दिसली, मिश्रण जर हिरवट / काळसर दिसत असेल किंवा मिश्रणाला कुबट/कुजका वास येऊ लागला तर मिश्रण वापरू नये, ती बॅच फेकून देऊन नवीन बॅच तयार करायला घ्या.
 
कॉकटेल लाउंजमधे पुढे ह्याच जिंजर बगपासून वेगवेगळ्या आणि मस्त मस्त कार्बोनेटेड सोडा ड्रिंक्स बघूयात, तोपर्यंत त्यांची एक झलक बघूया 🙂

 

 


वाचने 135
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

वल्ली,

जिंजर-बग हे ॲक्चुअली फर्मेंटेशनचं विरजण आहे. फळांच्या रसांना फर्मेंट करून नैसर्गिक कार्बोनेटेड करण्यासाठी वापरायच यीस्ट कल्चर. पुढच्या सगळ्या रेसिपींसाठी लागणारा हा बेस आहे. 

 

जिंजर-बग कॉकटेल्स मधे वापरता येईल पण त्याने काही गंमत येणार नाही कारण त्याचं काम आहे नैसर्गिक फसफस आणणं.   

 

- (फसफसणारा) सोकाजी


In reply to by सोत्रि

धन्स ह्या माहितीबद्दल.

पुढच्या रेसिपींच्या प्रतिक्षेत.


डिश बाय डेव्हिड (Dish by David) नावाचे एक यूट्यूब चॅनल आहे. ते गडी फरसबी ते अंडी फर्मेंट करतो. सोबतीला क्वास (फर्मेंटेड ब्रेड सोडा) ते टेपाचे (मॅक्सिकन फर्मेंटेड अननसाचा सोडा/ड्रिंक) सगळे तयार करतो. किमची/ सारक्रौत इत्यादींच्या रेसिपी पण भारी देतो तो. त्याने एक पूर्ण सिरीज केली आहे प्रोबायोटिक ड्रिंक्सची जिंजर बग वापरून


हे काहीतरी नवीनच प्रकरण दिसतेय. करून बघायला हवे.

शंका १:

बाटलीत फसफस तयार होत असल्याने ती रोज एकदा हलकेच उघडून वायू बाहेर जाऊ द्यावा.

बाटलीला झाकण न लावता ती कपड्याने बंद करायची आहे. मग हे वेगळे पुन्हा का करायचे ?

शंका २:

बरणी न घेता काचेची बाटली घेतली तर चालते का? की वायुविजनात काही फरक पडतो?

 

- (शंकेखोर खटाटोपी) कांदा लिंबू 


In reply to by कांदा लिंबू

>> बाटलीला झाकण न लावता ती कपड्याने बंद करायची आहे. मग हे वेगळे पुन्हा का करायचे ?

जर फसफस खुपच वाढली तरच हे करायचे आहे. 

 

>> बरणी न घेता काचेची बाटली घेतली तर चालते का? की वायुविजनात काही फरक पडतो?

हो, बाटलीच तोंड अरुंद असतं त्यामुळे वायुविजनात फरक पडतो. पण जर फर्मेंटेशन लॉक वापरलं तर बाटली चालू शकेल.

 

- (खटाटोपी वाटाड्या) सोकाजी