Skip to main content

बाप्पाचा नैवेद्यः मणगणं

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 31/08/2017 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
माझं माहेर म्हणजे " नारळाचं खाणार त्याला देव देणार " वालं. त्यामुळे सगळ्या पदार्थात नारळ असतोच. तर गणपतीसाठी अशीच नारळात आकंठ बुडालेली रेसिपी. मणगणं साहित्य- १) चणा डाळ एक वाटी २) साबुदाणा पाव वाटी ३) शेंगदाणे अर्धी वाटी ४) काजू तुकडा अर्धी वाटी ५) बदाम अर्धी वाटी ६) बेदाणे अर्धी वाटी ( वरील सर्व सुमारे तीन तास भिजत ठेवणे.) ७) एक मोठा अख्खा खवलेला नारळ ८) गूळ दोन वाट्या ( चवीप्रमाणे कमी जास्त ) ९) तूप एक चमचा १०) लवंग ४-५ ११) वेलची पूड अर्धा चमचा १२) केशर . 1 . कृती. १) चणा डाळ, साबुदाणा , शेंगदाणा , काजू, बदाम, बेदाणे धुवून सुमारे तीन तास पाण्यात वेगवेगळे भिजत ठेवावेत. २) शेंगदाणे, बदाम सोलून त्याचे काप करावे. (शेंगदाण्याचे दोन तुकडे करायला भारी पेशन्स लागतो. तो नसेल तर शेंगदाणे नाही घेतले तरी चालेल. आई, आज्जी, शेंगदाणे घालायच्या कारण बाकी सुका मेवा परवडत नसावा त्यामुळे ती आठवणीतली चव यावी म्हणून मी शेंगदाणे घालते.) ३) नारळ खवून, मिक्सर मधून थोडे पाणी घालून, पहिला जाड रस काढावा. परत त्या खोबऱ्यात थोडे पाणी घालून दुसरा थोडा पातळ रस काढावा. ४) भिजलेली डाळ, साबुदाणा , शेंगदाणे, बदाम आणि काजू यामध्ये नारळाचा पातळ रस घालून कुकरमध्ये शिजायला ठेवावे. (वेगळे पाणी घालू नये.) शिजताना डाळ उतू जाते म्हणून भांड मोठे आणि उभे घ्यावे. आणि रस जास्त घालू नये. साबुदाणे असल्यामुळे डाळ छान एकजीव होते. ५) एक जाड बुडाचे भांडे गॅस वर ठेऊन ( गॅस पेटवून:)) त्यात चमचाभर तूप घालावे. ते गरम झाले की लवंगा घालाव्या. त्यात लगेच शिजवली डाळ, काजू बदाम वगैरे ओतावे. त्यात गूळ, मनुका वेलची केशर घालून जरा उकळी काढावी . नारळाचा पातळ रस उरला असेल तर तोही घालावा, ( गुळाचे प्रमाण ज्याच्या त्याच्या चवीनुसार कमी जास्त.) ६) छान शिजल्यावर गॅस बंद करावा आणि नंतर त्यात नारळाचा जाड रस घालावा. झाले मणगणं तयार. गार किंवा गरम दोन्ही छान लागते. . 1

वाचने 17749
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

यावर्षी गोव्यात नसल्याने आयते हादडायला कोणी देणार नाहीये. चला उठा अस्मादिकांनो, मणगणं हवं असेल तर स्वतःचे हात पाय हलवा! फोटो मस्त आलेत! तांब्याच्या भांड्यात किटी वेळ ठेवता येईल पण? पाककृतीमधील "गॅस पेटवा" ही अतिशय महत्त्वाची सूचना दिल्याबद्दल धन्यवाद! सर्व हौशा गवशा नवशा स्वयंपाक्यांसाठी अत्यंत मननीय आहे! =))

छान पाककृती.माहेरच्या इमारतीतील एक गोवेकर काकू गणपतीला या खिरीचा नैवेद्य दाखवतात,त्यात ओल्या खोबऱ्याचे पातळ काप असतात,(चिवड्यात जसे सुक्या खोबऱ्याचे असतात तसे) अतिशय चविष्ट लागते ही खीर.

नारळ शब्द ऐकून बरं वाटलं, आमच्याकडे ओलं खोबरं म्हणतच नाहीत , नारळचं म्हणतात! मला इथे लिहिताना आठवणीने लिहावं लागतं!

फोटोतच इतके चविष्ट दिसते आहे तर प्रत्यक्ष काय असेल? नारळ आणि गूळ हे काँबो भयंकर आवडीचे आहे. स्वाती

वा. कधीच खाल्ला नाहीये हा प्रकार. आता करायलाच हव. फोटो मस्त आलाय

नारळाचं खाणार त्याला देव देणार
+११११

सुरेख पाकृ ! नारळ गूळ बाप.पांना भारी प्रिय. आणि म्हणून सर्वांना ! हरभरा डाळीला काही substitute ?

छान, एकदाच मुळगाव (गोवा) मध्ये प्रसादाला म्हणून खाल्लेला आठवतंय.....आता घरी करून बघेन....

मस्त पाकृ गॅस पेटवायच्या सूचनेबद्दल धन्यवाद _/\_ - दिलीतशीरेसिपीकरुनबघ्णारमहासंघाकडून पुस्प्गु्च

नारळाचे दूध + गुळ हे अत्यंत प्रिय प्रकरण असल्याने या शनिवारी हि पाकृ करण्यात येईल.

मणगणं.. भारी भक्कम नाव पण दिसतेय छान! नारळाचे दूध आणि गुळ ह्या अलौकिक संगमाने पदार्थ उत्तम होणार याची खात्रीच असते.

मस्त! या वर्षी बरेच वेगवेगळे पारंपरिक पदार्थ पहायला मिळत आहेत..

कधीही खाल्ला नाहिये हा प्रकार. मस्त दिसत आहे एकदम.