मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गवार फाँड्यु.... एक कधीच न केलेली पा.क्रु.....

मुक्त विहारि · · पाककृती
आज पर्यंत मिपाच्या आयुष्यात बर्‍याच पा.क्रु. आल्या. काही भाव खात अधून मधून येत राहिल्या, तर काही अतुल बेदाडे सारख्या एक-दोन डाव खेळून बाद झाल्या.पण त्या कुणीतरी करून बघीतल्या होत्या हे निश्चित.ही आजची पा.क्रु. मात्र फार अनवट आहे. कधी-कधी मिपावर बिना फोटोच्या पा.क्रु. पण येत असतात.त्यातलीच हे एक वेगळी पा.क्रु. मध्यंतरी मी घरी गेलो असतांना बायकोने खास "गवारीची भाजी" केली होती.मस्त गावरान गवार आणि त्यांत लसूण चटणी आणि भरपूर दाण्याचा कूट, अन जोडीला नुकतेच केलेले आंब्याचे लोणचे असेल, तर आम्हाला आमरस पण लागत नाही.(खरे तर त्या दिवशी आमचे "बियरचे" प्रमाण जरा जास्तच झाले असेल, असा मिपाकरांचा समज होणे, साहजिकच आहे आणि तो खरा पण आहे.) जेवायला बसलो, आणि सहज, अगं मुले कुठे आहेत? असे विचारले.बायकोला विचारतांना आम्ही सहजच विचारतो. तिला आदर देणे, तिच्या होकाराला हो म्हणणे आणि तिचा नकार स्वीकारणे ह्या त्रिसुत्रीवर आमचा संसार सुरु आहे. तिने सांगीतले, ती आत्ताच कोलंबी भजी आणि सातारी पद्धतीचा कोंबडी रस्सा खावून, मटण आणायला गेली आहेत.आज रात्री जरा मटण-कलिया करून बघायचा आहे. आयला, हे बरे आहे. आम्हाला गवारीची भाजी आणि ह्या मुलांना मात्र मटण-मासे आणि चिकन? आयला कलीयुग-कलीयूग म्हणतात ते हेच का? असो, इतक्या लवकर हार मानायचा आमचा स्वभाव नाही. मग लगेच बायकोला विचारले, अगं इतक्या सगळ्या पदार्थांना गोड पदार्थाची पण जोड हवीच,मग गोड काही केले आहेस की नाही? अहो आहे की, हे बघा चितळ्यांचे श्रीखंड (आमच्या डोंबोलीत हे पण मिळते), हा मालवणी खाजा (आमच्या डोंबोलीत हे पण मिळते), हा बेळगावी कुंदा (आमच्या डोंबोलीत हे पण मिळते) आणि वाटलेच तर हा माहीमचा हलवा (आमच्या डोंबोलीत हे पण मिळते) पण आहे. अगं ते ठीक आहे पण तू कधी "फाँड्यु" ट्राय केले आहेस का? (मिपा बंद असतांना, मी नक्की कुठल्या साईटवर जातो, हे सुज्ञ वाचकांच्या लक्षांत आलेच असेल. ती नाही म्हणाली. मग मी तिला गूगल उघडून दिले आणि फाँड्युचे फोटो दाखवले.तिला पण हा प्रकार आवडला.रात्री जेवण झाल्यावर फाँड्यु करायचे ठरले. मी फाँड्युत घालायला म्हणुन भेंडी, कारली, फरसबी, घेवडा आणि गवार इ. पदार्थ घेवून आलो. रात्री फाँड्यु करायला बसलो. मी भाज्या घेवून बसलो आणि एक गवार फाँड्युत टाकून खाल्ली.आणि मुलांना सांगीतले की तुम्ही पण खा.त्यांनी पण खिशातून एक-एक पदार्थ घेवून आणि तो फाँड्युत टाकून खायला सुरुवात केली.रात्री मला जरा कमीच दिसते.काय कारण आहे, ते कळत नाही.पण मुले फाँड्यु एंजॉय करत होती. बाजुलाच आमची कुत्री पण बसली होती.तिने पण एक-दोन वेळा माझ्या हातचे फाँड्यु खावून बघीतले.शेवटी ती पण मुलांच्या मागे-मागे गेली. असो, तर अशा प्रकारे मी भाज्या घालून फाँड्युचा आस्वाद घेतला.तुम्ही पण नक्की घ्या. इति फाँड्यु पुराणं समाप्तं. ता.क. १. फाँड्युची लिंक https://www.google.com.sa/search?q=chocolate+fondue&tbm=isch&tbo=u&source=univ&sa=X&ei=CUDJU4KBEouO7Qb0sYDYDQ&ved=0CBsQsAQ&biw=1366&bih=643 २. मी ही काल्पनिक पा.क्रु. लिहीली आहे.आपापल्या जबाबदारीवर ही पा.क्रु. करून बघणे. ३. लेखांत २/४ इंग्रजी शब्द आल्यामुळे वाचकांनी नाराज होवू नये.आजकाल आपल्या मराठी मायबोलीत इंग्रजी शब्द खपायला काहीच हरकत नसावी. उरलेली ता.क. नंतर टाकल्या जातीलच.

वाचन 8813 प्रतिक्रिया 0