कटरले
नमस्कार लोक्स,
मागच्या आठवड्यातील माझ्या रेसिपी तुम्हाला आवडल्याचा तुम्ही अभिप्राय दिलात, त्यामुळे मला खूप आनंद झाला. (आणि परत एक पाकृ ईथे टाकावी असे वाटले.)
कटरले ही तशी डोंगरात उगवणारी भाजी आहे आणि माझ्या आवडीची सुद्धा.
पण पुण्यात मला ही भाजी क्वचित दिसली, या वर्षीही ईथे पुण्यात शोधली पण नाही मिळाली. म्हणुन आईकडून जळगावहून ट्रॅवल मार्फत मागवुन घेतली.
तर मंड्ळी या जेवायला.
साहित्य-
कटरले- ½ किलो,
हरबर्याची डाळ- भिजवुन ½ वाटी,
लसूण चटणी- 3 चमचे,
हळद- ½ टे. स्पुन,
जिरे- ½ टे. स्पुन,
मोहरी- ½ टे. स्पुन,
तेल- आपल्या डायटनुसार(पण या भाजीला तेल जरा जास्तच लागते)
कृती-
कटरले आधी 1 तास तरी पाण्यात घालून ठेवायचे, कारण यातल्या बारीक काट्यामध्ये माती असते ती सगळी निघायला मदत होते.
आता कटरले बारीक चिरून घ्यावेत, जर आत मध्ये लाल निघाले तर टते टाकून द्यावे, त्याची चव थोडी कडसर लागते.
थोड्या जास्त तेलाची फोडणी करून त्यात जिरं, मोहरी टाकावी.
मोहरी तडतडली की त्यात हळद, लसूण चटणी टाकावी.
कटरले टाकून 5 मिनिट एक वाफ येऊ द्यावी.
आता त्यात भिजवलेली हरबरा डाळ टाकावी.
भाजीच्या कढईवर बसेल अश्या मापाचे झाकण ताट किवा ताटली वापरावी आणि त्यात पाणी घालावे. म्हणजे त्या ताट किवा ताटलीतील पाण्याच्या वाफेवर भाजी छान शिजेल.
भाजी शिजायला 20-25 मिनिटे लागतात.
भाजी शिजत आल्यावर त्यात मीठ टाकावे. झाली भाजी तयार.

वाचन
12074
प्रतिक्रिया
0