Skip to main content

मालपुआ - रबडी

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 14/06/2012 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्य झटपट मालपुआसाठी: १ वाटी गव्हाचे पीठ १ वाटी दूध १/२ वाटी साखर ३/४ वाटी पाणी १ टेस्पून भरडसर वाटलेली बडीशेप पावडर चिमूटभर मीठ १ टीस्पून इनो फ्रुट सॉल्ट तळण्यासाठी तूप (हो हो तुपचं , तेलात तळले तर मजा नाही पाकृला ;) ) साहित्य सर्व्हिंग व सजावटीसाठी : तयार रबडी (रबडीची पाकृ नंतर कधीतरी देईन) बदाम-पिस्त्याचे काप केशराच्या काड्या चिमूटभर वेलची पावडर . पाकृ: एका भांड्यात साखर व पाणी एकत्र करून उकळी काढा. साखरेचा एकतारी पाक करून घ्यावा. (साधारणपणे गुलाबजामाच्या पाकाप्रमाणे) पाक तयार झाला की वेगळ्या बाऊलमध्ये काढा. दुसर्‍या भांड्यात गव्हाचे पीठ, बडीशेप पावडर, मीठ एकत्र करुन घ्या. त्यात थोडे थोडे करून दुध घाला व मिश्रण चांगले मिक्स करा. एकही गुठळी होता कामा नये. मिश्रण साधारणपणे जिलबीच्या मिश्रणाइतपत घट्ट असावे. ( फार पातळ नको) फ्राईंग पॅनमध्ये तुप मंद आचेवर गरम करावे. मिश्रणात एनो फ्रुट सॉल्ट घालावे व हलकेच फेसावे. . त्यात चमच्याने छोटे छोटे मालपुए घालावे. छान फुगतील व जाळीदार होतील. एका बाजूने सोनेरी रंगावर तळले गेले की उलटवून दुसरी बाजू तळावी. तळलेला मालपुआ झार्‍याने काढून, दाबून त्यातले तूप काढून टाकावे. लगेच कोमट पाकात घालून २-३ मिनिटे मुरु द्यावे. असे सर्व करून घ्यावे. निथळून सर्व्हिंग प्लेटमध्ये काढावे. त्यावर तयार रबडी घालावी. बदाम-पिस्त्याचे काप पेरावे. केशर व वेलचीपूड भरभुरावी व सर्व्ह करावे. . नोटः ह्या मिश्रणाचे साधारण १०-१२ मालपुए होतात. आपण मालपुआ रबडीबरोबर सर्व्ह करत आहोत म्हणून साखरेचा पाक कमी गोड केला आहे (रबडी ही चवीला गोड असते म्हणून). जर तुम्हाला रबडीसोबत सर्व्ह करायचे नसेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण वाढवू शकता. मालपुआ पाकात घालून मुरु द्यावा व सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून त्यावर पिस्त्याचे काप व केशर घाला. . पाकृ सौजन्य: ही पाककृती मी ईटीव्ही मराठीवर मेजवानी ह्या कार्यक्रमात पाहिली होती. त्यात मुळ पाकृत, मिश्रणात भरडसर काळीमिरी पावडर व अख्ख्या बडीशेपचा वापर केला होता. मी काळीमिरी पावडर घातली नाही व बडीशेपची भरड पावडर घातली आहे. आणी हो ह्यात कुठलेच चिजाळलेले अंडे घातले नाहीये, ते घालून कसे लागेल माहीत नाही , त्यावर कुठलेच वैदिक संस्कार केलेले नाही , जसे बनविले तसे दिले आहे ;) कृ ह घे हे वे सां न :)

वाचने 23049
प्रतिक्रिया 57

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणेच कौतुक वाटले. मालपुवे हे पाकातल्या पुर्‍यांसारखे लागतात असे मला वाटते. एकदाच खाल्ले होते त्यावरून. पापुला घाट घालावा लागतो त्यामानाने झटपट मालपुव्यांची कृती बरी वाटली. रबडीची पाकृ येईपर्यंत मालपुवे बनवून ठेवते व वाट पहात बसते. ;) ही पाकृ पारंपारीक असल्याचे नमूद केल्याबद्दल धन्यवाद. :)

In reply to by रेवती

छे हो वाट कशाला पाहताय द्या ते मालपुवे पाठ्वुन इकडं, उगा किती दिवस ठेवणार ते.

कालच आठवण काढ्ली याची. आज बघते तर पाकृ हजर. तुझ सादरीकरण आणि पाककौशल्य तर अप्रतिम.

मार डाला ! मार डाला ! पुढच गाणं तुम्हीच गुणगुणा... ;) आयटम भारी हाय... :) बाकी रबडीच म्हणाला तर... आहाहा क्या केहेने ! इंदुरात जातो तवा लयं चापतो बघा. :) पण हल्ली त्याचीही चव च्यामारी बदलली आहे,पुर्वी सारखी मिळत नाय... च्यामायला !

पहिल्या(च) फोटूमुळे,,,सद्ध्या मेलो आहे... प्रतिक्रीया पुढील पा.कृ.च्यावेळी देण्यात येइल... क्षमस्व!

वरील साहित्यातलं 'इनो' तेवढं घेतलं आहे. तुम्ही दुसरं आणा. क्षमस्व. . . . . . एवढंच सांगायचं होतं. :)

गोड पदार्थाने जळजळ होते हे प्रथमच समजले. आमच्याकडुन साष्टांग नमस्काराचा स्वीकार करावा. :)

सानिका तुझा नवरा खरच नशिबवान आहे .. एकदा तरि त्या स्वप्निलचा फोटो ..तुझ्या गोडाधोडाच्या डिश शेजारी टाक कि .....;) बाकि मालपूवे बनवन्याची सोपी ..ईवन तुझ्या बर्‍याच सोप्प्या पद्धतीने माझ्यासारख्यान्ची बरीच काम सोप्पी होउन जातायत ..त्यामुळे विषेश आभार :)

बघूनच अंगावर मुठभर मांस चढले. ज ब रा ट पाककृती आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

बघूनच अंगावर मुठभर मांस चढले. >> सेम पिंच. माझापण हाच प्रॉब्लेम आहे. :( करुन खाल्लं तर काय??

अहाहा! मालपुआ. मला फार आवडतो. एक विचारु? गुळाचा असतो ना? बाकि फोटो पाककृय्ती अन कमेंट भाऽऽरी!

In reply to by स्पंदना

मालपुआ गुळाचा असतो का ह्याबद्दल माहित नाही गं अपर्णा ताई मी तरी साखरेच्या पाकातला ऐकला, पाहीला आहे :) गुळाचा असेल तर खूपचं छान ..तुला कधी पाकृ मिळाली तर मला सांग , मला नक्की ट्राय करायला आवडेल :) धन्यवाद प्रतिसादाबद्दल :)

१ वाटी गव्हाचे पीठ १ वाटी दूध १/२ वाटी साखर ३/४ वाटी पाणी १ टेस्पून भरडसर वाटलेली बडीशेप पावडर चिमूटभर मीठ १ टीस्पून इनो फ्रुट सॉल्ट
हे साहित्य पाहुन करावेसे वाटले... पण ...
तयार रबडी (रबडीची पाकृ नंतर कधीतरी देईन)
हे पाहुन बेत रद्द करण्यात आला आहे... फक्त फोटो पाहुन खलास झालो आहे. _/\_

आवडता पदार्थ आणि तोंडाला पाणी सुटणारे फोटो! रमझान मधे भेंडीबाजारात जाऊन खास चवीचे मिळतात, पण त्यांत अंडे असते.

In reply to by कवितानागेश

ए माउ तसं नाहि गं. :( म्हणजे लवकर खराब होनारा प्रकार नाहि ना?? असं विचारायच होतं :-|

In reply to by जेनी...

मालपुआ जर नुसता पाकातला असेल तर फ्रिजमध्ये २ दिवस सहज टिकतो, पण जर का त्यावर रबडी घातलेली असेल तर मात्र लगेच संपवावा रॅदर वर माऊताई म्हणते तसा लगेच संपतो :)

इनो आधीच घालून दिल्याबद्दल धन्यवाद! फोटो फारच आवडल्यामुळे खायला मन होणार नाही!

अहाहा..... दिल खुश हो गया :) सुंदर प्रेझेंटेशन .... (रबडी मापपुआ हा प्रकार पुण्यात २-३ ठिकाणी खाल्ला होता.. अगदिच अवडला नव्हता... पण इंदोरला सराफा मधे खाल्ला तेव्हा जाम प्रेमात पडलो ह्या पदार्थाच्या... :) ... तु बनवलेला रबडी मालपुआ हि असाच चविष्ट असेल ह्यात शंकाच नाहि :) ) हे फोटोज इंदोरच्या सराफा मधल्या रबडी मालपुआ चे :)

एकापेक्षा एक वजन वाढवणारे शाकाहारी पदार्थ येथे देउन अनेकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेत आहेत हे. असो. बाकी नेहमीप्रमाणेच. XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX आणी हो ह्यात कुठलेच चिजाळलेले अंडे घातले नाहीये, ते घालून कसे लागेल माहीत नाही , त्यावर कुठलेच वैदिक संस्कार केलेले नाही , जसे बनविले तसे दिले आहे Wink कृ ह घे हे वे सां न Smile ह्या वाक्यासाठी __/\__

आज या पद्धतीने मालपुवे व फोटून तू दाखवलीस तशी दिसेल अश्या पद्धतीने रबडी असे करून बघितले. खूप छान झाले. मालपुवे पहिल्यांदाच केले. तू अगदी गोल गोल केलेस तसे जमले नाहीत, जरा लंबगोल प्रकारचे झाले. पुढील वेळी प्रगती होतीये पाहुयात. ;)

In reply to by रेवती

हा धागा परत वरती का आणला? तुम्हाला अद्याप आमचे दू:ख समजत नाही का? असो, "ने मजसी ने परत इंदूरला" असे गाणे म्हणत दिवस काढायला लागणार. (आता फेब्रुवारीत पुणे की इंदूर अशा भ्रमात पडलेला) मुवि.

आजच करुन पाहण्यात आले. मी इनो वापरलं नाही, कारण मिळालं ते फ्लेवर्ड होतं मग वगळलं. आणखी एक बदल म्हणजे साधारण एक टेबलस्पून मैदा वापरला. पाकातून काढल्यानंतरः

तुम्हाला अद्याप आमचे दू:ख समजत नाही का?
असे मु वी म्हणतात ते खरे आहे कारण मलाही हा इतका शुद्ध अत्याचार सहन होत नाहीये ... आपल्यावर कायदेशीर कारवाई का करणेत येऊ नये .... फोटो हे सज्जड पुरावा म्हणून वापरण्यात येतील ... त्रिवार निषेध ...

रेवती धन्यवाद गं बनवून बघीतलेस आणि कळवल्याबद्दल :) सध्या मी भारतवारीत बिझी आहे म्हणून मिपावर येणं फारसे जमत नाही. सूड तू केलेला बदल आवडला आहे , मी सुद्धा पुढल्या वेळेस असे ट्राय करून बघेन, फोटो भारी आलाय :)