अॅलियम अर्सिनम, रॅमसन्स ,वाइल्ड गार्लिक,ब्रॉड लिव्ड गार्लिक अशा अनेक नावाने प्रसिध्द असलेल्या बेअरलाउखच्या जुड्या आठवडी बाजारात साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून दिसायला लागतात. ह्या पानांचे करतात तरी काय? असे आमच्या त्सेंटा आजीला विचारले असता तिने सांगितले याची पेस्टो करतात. ही पाने फक्त मार्च,एप्रिल मध्येच मिळतात म्हणून त्याची पेस्टो वर्षभर टिकेल अशी करुन ठेवता येते. हिरव्या रंगाची ही पेस्टो न्यूडल्स, पास्ता,सलाड, सूप इ. मध्ये वापरतात. ही पाने रानात भरपूर उगवतात पण अजून एक दोन प्रकारची पाने अगदी अशीच दिसतात आणि फसायला होतं, ही दुसरी पानं विषारी असतात त्यामुळे रानातून बेअरलाउख आणण्याचा अतिउत्साह न दाखवता आठवडी बाजारातूनच जुड्या घेण्याची सूचनाही केली.
पेस्टो करण्याच्या अनेक पध्दतींपैकी ही एक-
१जुडी वाइल्ड गार्लिक,
८-१० बदामबिया/काजूबिया
१ आक्रोड फोडून
१०-१२ पाइननट्स, २ चमचे सूर्यफूलाच्या बिया, २ चमचे भोपळ्याच्या बिया- (जर ह्या बिया उपलब्ध नसतील तर बदाम/काजू वाढवणे.)
१ वाटी किसलेले पार्मेसान चीज. (जर पार्मेसान उपलब्ध नसेल तर ग्राना पदानो चीज )
६-७ मिरी, १/२ चमचा मीठ, १ चमचा लिंबूरस ( एका फोडीचा रस) ,
साधारण १/२ वाटी सनफ्लॉवर ऑइल
१/२ वाटी ऑलिव्ह ऑइल
वाइल्ड गार्लिकची पाने धुवून एका फडक्यावर घालणे. पानातले पाणी टिपून घेणे.
बदाम, आक्रोड, पाइन नट्स, सुर्यफूल, भोपळा इ. बिया कोरड्याच हलक्या भाजून घेणे.
पाने मिक्सर मधून भरड वाटणे, त्यात ह्या रोस्टेड बिया घालणे आणि परत वाटणे.
मीठ, मिरपूड, चीज ,अर्धे तेल घालणे आणि वाटणे,चटणी सारखे व्हायला हवे.
आता हे मिश्रण वाडग्यात काढून घेणे, उरलेले तेल घालून कालवणे. लिंबाचा रस घालणे.
घट्ट झाकणाच्या बाटलीत भरणे. पेस्टो भरुन झाली कि वरुन परत तेल घालणे.
हवे तेव्हा पेस्टो काढून घेतली की परत तेल घालून ठेवणे म्हणजे पेस्टो टिकते.(आपण लोणचं टिकायला कसे जरा जास्त तेलाची फोडणी वरुन ओततो तसे.)
ही पेस्टो वापरुन अनेक प्रकारच्या रेसिप्या बनवता येतात, त्यातीलच हा एक पास्ता-
२ वाट्या पास्ता(पेन्नं किवा फुसिली), अर्धी वाटी जाडसर किसलेले गाजर, अर्धी वाटी मटारदाणे, २ चमचे बेअरलाउख पेस्टो,
२चमचे ऑलिव्ह ऑइल,१ ते १.५ कप दूध, २चमचे मैदा,चवीनुसार मीठ व मिरपूड, हवी असल्यास एखादी हिरवी मिरची आणि पेरभर आल्याचा तुकडा
पास्ता शिजवून घ्या आणि चाळणीवर टाकून निथळत ठेवा.
ऑलिव्ह ऑइल वर गाजर आणि मटार परतून घ्या.हवी असेल तर एक हिरवी मिरची बारीक चिरुन घाला,आले किसून घाला. मीठ व मिरपूड घाला आणि चमचाभर पेस्टो घाला.
दूधात मैदा विरघळवून घ्या, गुठळ्या होऊ देऊ नका. त्यात चमचाभर पेस्टो घालून चांगले ढवळून एकजीव करा.
आता हे मिश्रण परतलेल्या भाज्यांवर ओता व ढवळा. शिजत आले की त्यात पास्ता घाला व एक वाफ काढा.
बेअरलाउख पास्ता तयार आहे. खाताना हवे असल्यास पास्त्यावरही पेस्टो घेता येईल.




वाचने
12942
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबराट !
परा......
In reply to जबराट ! by परिकथेतील राजकुमार
मस्त पण शेवटचा फोटो अपूर्ण वाटला
धन्यवाद एका वेगळ्या प्रकाराची
मस्तच गो स्वाती ताय.
चवीची कल्पना करतोय. कशी असेल
पास्ता माझ्या आवडिचा ..
अगदी नाविन्यपूर्ण
मस्त!
छान, वाइल्ड गार्लिक पेस्टो
छान
ग्गंग्गंग्गंग्गं!
सुरेख
हो
In reply to सुरेख by सुनील
मला पास्ता एव्हढा आवडत
मस्तंच
ओल्या लसणीचे दिवस आलेत.
हाय स्वाती ताई,