Skip to main content

तंदूर पापलेट

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 17/04/2011 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः २ मध्यम किंवा छोटी पापलेटं २ टेस्पून घट्ट दही १ टेस्पून आले+लसुण+पुदिना पेस्ट १ टेस्पून तंदुर मसाला १/२ टीस्पून गरम मसाला १/४ टीस्पून काळीमिरीपूड मीठ चवीनुसार खायचा लाल रंग ( आवडत असल्यास) . पाकृ: पापलेटाचे शेपूट, डोके, खवले काढून टाकावे, त्यावर सुरीने चिरा पाडाव्यात व माश्यांना लिंबाचा रस, हळद व थोडे मीठ लावून ठेवावे. दह्यात काळीमिरीपूड सोडून सगळे जिन्नस घालून नीट एकजीव करावे. . हा तयार मसाला पापलेटांना नीट सगळीकढून चोळावा. बेकिंग ट्रे वर तेलाचा हात फिरवून त्यावर पापलेट ठेवावे व वरुन काळीमिरीपूड, तेल किंवा बटर लावून प्री-हिट ओव्हनमध्ये १८० डिग्री वर १०-१२ मिनिटे भाजावे. . तयार तंदुर पापलेटवर किंचित गरम-मसाला भुरभुरावा व सॅलॅड सोबत खायला द्यावे. .

वाचने 18423
प्रतिक्रिया 44

प्रतिक्रिया

ओ तुम्ही जा पाहू इथनं अशी प्रतिक्रिया देणार होतो पण म्हटलं असू दे त्रास झाला तरी सहन करू :)

वा :) मासाहारी पाकृ :) अवांतर : ही पाकृ अंडे घालुन कशी करता येईल ? :) - टापलेट

In reply to by टारझन

ही पाकृ अंडे घालुन कशी करता येईल ? पापलेटच्या ऐवजी अंडे घालून! ही पाकृ बटाटे घालुन कशी करता येईल ? पापलेटच्या ऐवजी बटाटे घालून! बाकी पदार्थ दिसतोय मस्त हेवेसांनल! एक प्रश्न - फक्त एकाच बाजूने भाजायचे की १०-१२ मिनिटांनतर पलटायचे?

In reply to by सुनील

मासे १०-१२ मिनिटे भाजून घ्यायचे पलटायची गरज नाही कारण मासे पटकन शिजतात. हवे असल्यास बांबु स्क्युअर्स लावून ग्रील ही करू शकता :)

आधीच तंदूर आमचा आवडीचा प्रकार त्यात मासे हा दुसरा आवडीचा प्रकार आणि आज त्यांचा अत्यंत सुंदर संगमाच्या या खाद्यप्रकाराला काय म्हणू? खल्लास ... एकदम खल्लास.

In reply to by नीलकांत

आधीच तंदूर आमचा आवडीचा प्रकार अहो मालक, पण या पाककॄतीत तंदूर कुठे वापरला आहे? दिसला मासा, धावले लगेच!!!! :) (वरील रेसेपीचा स्नॅपशॉट घेतला गेलेला आहे!!!!)

मस्त फोटो आणि पाकृ. आज आमच्याकडे कोलंबी आणि बांगुर्डे. :) पुढच्या रविवारी असे पापलेट बनवते आता.

In reply to by यशोधरा

>>पुढच्या रविवारी असे पापलेट बनवते आता. :) कुठे? मी येऊ का ( आयतं खायला)? नाही म्हणजे मी येतोच.. :) बाकी पाकृ आणि फोटु एक्दम झकास.. यशो ताईंनी बनविले की ते कसे झाले होते ते इथे अपडेट करेन. :)

मस्त दिसत आहेत, चवदार असणार यात शंका नाही. तंदूरी पापलेट मी स्क्यूअर लावून करतो आणि डोकी उडवत नाही.

गोव्यात मी कलंगुटला एक अफलातून प्रकार खाल्लाय. पापलेटच्या पोटात मस्त कोळंबी आणि खोबर्‍याचा ओला मसाला भरला होता. वरुन तंदूर पापलेट आणि फोडल्यावर आत सुरेख मसाला कोळंबी. पुन्हा मसाला आतून-बाहेरुन दोन्हीकडून असल्याने पापलेटची टेस्ट तर काय सांगू? सानिका, फोटो सुंदर आलाय. कांद्याच्या रिंग्ज एकदम खुलून दिसताहेत, पण सजावटीत पापलेट नुसतेच डिशमध्ये ठेवण्याऐवजी त्याखाली कापलेल्या कोबी किंवा पालकच्या झिरमिळ्या असत्या तर आणखी मजा आली असती.

फोटो, पाकृ दोन्ही आवडले!!

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>सदर पाकृ मासा न घालता कशी करावी ? ही पाकृ मासा न घालता केल्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल होतो, १४ दिवस उपाशी राहण्याची शिक्षा ठोठावण्यात येते. त्यामुळे असा प्रकार करु नये. :)

व्वा, काय छान आलाय फोटो. एकदम मस्त. हे असे पापलेट डॉलरच्या देशात कुठे मिळतात? मत्स्यप्रेमि निता

In reply to by निकिता_निल

डॉलरच्या देशात तर माहीत नाही पण राणीच्या (पाऊंड) च्या देशात मात्र फ्रोझन मिळतात, काही ठिकाणी ताजी मासळी ही मिळते :)

In reply to by निकिता_निल

हो आमचे काही पंचतारांकीत बाल्लावाचार्य मित्र लंडन मध्ये पहाटे च्या ताज्या मासळी बाजारात काही तास प्रवास करून जायचे . आमचा मात्र खाण्याशी संबंध असायचा ही पाककृती नक्की ट्राय करेन

गेल्या शनिवारी पापलेट आणावयास गेलो. मोठा पापलेट २००० (दोन हजार अक्षरी मात्र) रु. किलो. सुरमई १००० (एक हजार अक्षरी मात्र).. हे सर्व मॉलमधल्या नॉनव्हेज स्टोअरमधे की जिथे बाहेरच्यापेक्षा कमी दरात मासे मिळतात असा दावा केला जातो. ६०० रु. किलोचा रावस घेऊन त्यास पापलेट समजण्यात आले गेले. त्याच्या आधी २ आठवडे बराच स्वस्त होता म्हणायचे. मोठा पापलेट १००० आणि छोटा पापलेट ६५०. पाकृ झकास खमंग खुसखुशीत.. भाव उतरले की नक्की करणार. ;) अर्थात ओव्हन नाही. त्यामुळे तो एक प्रश्नच आहे.. कार्कुंडा मध्यमवर्गीय (गवि)

In reply to by गवि

गवि, तुम्ही राहता तरी कुठे? २००० रुपये किलो? ८०० - ९०० वगैरे पाहिलंय. लहानवालं - ६२० वगैरे. पुन्हा प्रतिसाद वाचला. मॉलमध्ये.. ह्म्म.. मग बरोबर. असू शकेल.

In reply to by यशोधरा

मॉलमधे आणि बाहेर तसा काही भावात फार फरक नसतो. उलट मॉलवाले लेस दॅन एम आर पी असे लिहीतात. फरक एवढाच : बाहेर रस्त्यातल्या माम्यांकडून घेतले की हा मासा केवढ्याला ऐवजी या माश्या केवढ्याला असे विचारण्याची वेळ येते. बर्फाची नीट सोय नसल्याने टोपलीत मासळीचा चिखल झालेला असतो. कुत्री मांजरे तोंडे घालत असतात..एकूण गलिच्छ वाटते. म्हणून मॉलातील मत्स्यविभागात जरा स्वच्छ वातावरणात खरेदी बरी वाटते. तिथे बाहेरच्यापेक्षा इतकेही काही महाग नसते. कारण एकच आठवडा आधी एका साध्या मासळीच्या दुकानात जाऊन मी सुरमईची चौकशी केली होती आणि तिथेही जवळपास त्या दिवशीच्या मॉलमधल्या भावाइतकेच भाव होते. असो. कोणाला मुम्बई ठाण्यात स्वस्त मिळाले असल्यास कळवणे. किंवा तशी दुकाने कळवणे.

In reply to by गवि

मुंबईतले ठाऊक नाही फारसे, एक माहीम/ शिवडीचा बाजार सोडला तर, पण तिथेही माम्या जो बाजार घेऊन बसतात तो स्व्च्छच असतो. तुम्ही म्हणता तितके वाईट पाहिलेले नाहीये. मॉलमध्ये लेस दॅन एमआरपी म्हणून शेंड्याही लावतात. इथे पुण्यात तारूचे दुकान मासेखाऊंमध्ये प्रसिद्ध आहे, तसेच कॅंप मंडईमध्येही चांगली मासळी मिळते., स्वच्छ, ताजी आणि इतकी महागही नसते.

In reply to by यशोधरा

छ्या त्या चकचकीत मॉल मध्ये जाउन घासा घीस न करता बाजार घेण्यात काय मज्जा? बाजार घ्यावा तर कसा मस्त पैकी मावशी बरोबर वाद घालत... सौदा नाय पटला म्हणुन पुढे जाताच मावशीने परत 'प्रेमळ'हाक मारुन बोलावल्यावर "अजुन एक टाक गो" असा हट्ट धरत..... करायचा तो खरा बाजार हाट. मासे वजनावर घ्यायचे हेच मुळी मला पटत नाही. मासा घ्यावा तर तो नगावर वा वाट्यावर.

फोटो जबरा आले आहेत. चखण्यासाठी असाच पापलेट असावा. :) -दिलीप बिरुटे

तंदुर पापलेट एकदम झक्कास... त्याच्या पोटात कोलंबी मसाला घालुन तंदुर केल्यास आनंद द्विगुणीत होईल. (माशांना दही लावावे हे काही पटले नाही. मी दही न लावताच करेन)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तरच बनेल. नाही तर सरळ वखारीतून कांडी कोळसा आणा, हार्ड्वेअर मधून जाडसर लोखंडी जाळी आणा [ २ जाळ्या ]. एकावर एक अश्या २ जाळ्या वीट / दगड वापरुन ठेवा. खालच्या जाळीवर कोळसे पसरवा आणी पेटवा. चान्गले पेटले की वरच्या जाळीवर पापलेट / चिकन ई. तन्दूर बनवा. नेहेमी करणार असाल तर घडीचा स्टेनलेस स्टील चा तन्दूर ही मिळतो. घडी घातली की ल्यापटॉप पेक्षाही पातळ घडी बनते.

In reply to by gogglya

तुम्ही असा तन्दूर / बार्बेक्यु स्टँड वापरला आहे का? ऑनलाईन उपलब्ध आहे का? लिंक द्या प्लीज असेल तर.