नववर्षाच स्वागत !कडुलिंब!! स्पंदना · Mon, 04/04/2011 - 13:46 · पाककृती From नुकतेच आजच्या शुभ दिना बद्दल लिहिलेले शुभेच्छा पर दोन लेख वाचले. एका ठिकाणी प्रतिसादात कडुनिंबाचा उल्लेख वाचला अन जरा बर वाटल मंडळी. तर कडुनिंब! सुरु होणाऱ्या दाहक उन्हाळ्याचे दुष्परिणाम हारक! औषधी ! आजच्या दिवशी याच सेवन करुन आपण याच औषधी महात्म्यच जणु अधोरेखित करतो दरवर्षी. विसरल्या पासरल्यां साठी, अन नवनवीन गोष्टींच्या प्रभावात न शिकलेल्यांसाठी ही कडुनिम्ब बनवायची सोपी अन परंपरागत पद्धती. साहित्य:- अर्थात कडुनिंबाची कोवळी पाने. आमच्या गावी बाळ लिंबाऱ्याची खातात, यालाच गोडा लिंब पण म्हणतात. पण येथे मी जर असल काही मागितल बाजारात तर माणस झिट येवुन पडायची. त्यामुळे मी आपला मिळाला तो त्यातल्या त्यात बरा कडुलिंब गपचुप आणला. तिथेच तो माणुस कडुलिंबाचा फुलोरा ही विकत होता, म्हणुन घरी शेंडे मिसळताना त्यात फ़ुलेही मिसळलेली असल्याची आठवण येउन मी तो ही विकत घेतला. तर कडुलिंबाची साधारण कोवळी पाने एक अर्धी वाटी, वा पन्नासभर. मोजुन चार काळेमिरे. अर्धा चमचा जिरे. चिमुटभर (चवी साठी नव्हे, चिमुटभर म्हणजे चिमुटभरच) मिठ. चिमुटभर हिंग. थोडासा गुळ. एक दोन चमचे भिजवलेली हरभर्याची डाळ.(भिजाणे) कच्ची कैरी. साधारण एक चमचा भर किसुन. From कृती:-मिरे अगदी हळुवार ठेचुन घ्या. अगदी हलक्या हाताने जास्त बारीक न करता साधारण चुरा करुन घ्या. जीरे ही असेच हलके ठेचुन घ्या. अगदी याच हलक्या हाताने भिजवलेली हरभर्याची डाळ सुद्धा ठेचुन घ्या. कडुलिंबाची पाने हाताने बारीक बारीक तोडत त्यात गुळ, मिठ, हिंग, मिरे अन जीरे अन भिजाणे मिसळत जा. वरुन किसलेला कैरीचा किस मिसळा. From आता हा तयार झालेला लिंब पहिला देवाला, गुढीला दाखवा, अन मग घरातल्या मोठ्यांना नमस्कार करुन अन लहानांना आशिर्वाद देत साऱ्यांना वाटा. स्वत: ही खायला विसरु नका बर! नुतन वर्ष आपणा सर्वांना सुख समृद्धीचे अन आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! __/\__ अपर्णा वाचन 4908 प्रतिक्रिया 9