Skip to main content

[कविता' २०२०] - चष्मा

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 08/05/2020 या दिवशी प्रकाशित केले.

चष्मा




बिना चष्म्याचं वाचू नये, फार त्रास होतो डोळ्यांना. खरं आहे हे वैद्यकशास्त्रानुसार!  एकदा नंबर आला डोळ्यांना ,की चष्मा अटळ आहे.  चाळिशी आली, की नजर त्रास देते म्हणतात! मलाही झाला, आणि एका ठराविक नंबरचा चष्मा आला. सुरवातीला फार बरं वाटलं, डोळे सुखावले.. म्हटलं, "किती छान आणि स्पष्ट दिसायला लागलंय!" पण नन्तर कळलं, एकंदर चष्म्याशिवाय काही वाचताच येत नाहीये.. धर्मवादाचा चष्मा,निधर्मवादाचा चष्मा, साम्यवादाचा ,समाजवादाचा,राष्ट्रवादाचा,सेक्युलारीझमचा, आणि मानवतावादाचाही चष्माच!!! हे चष्मे लावल्याशिवाय आपण काहिही वाचलं, तर अंधुक दिसण्यापेक्षाही स्पष्ट आणि पर्यायानी खरं दिसायची शक्यता अधिक! सामाजिक दृष्ट्या उणे होण्याची शक्यता यातच अधिक आहे.  हे उणेपण आपल्याला एकतर देवासारखं फक्त पूजनीय करून ठेवेल, नाहीतर दानवांसारखं कायमच्या तिरस्काराचं धनी!  मग म्हटलं चष्मा असुदेच ज्या त्या पंथातला,त्या त्या भक्तगणांशी जोडलेला ठेवणारा! म्हणजे सगळ्यांसाठीच आपण आदरणीय म्हणजे अर्थातच अनुकरणीय नसलेले.... असे विचारवंत होऊन जाऊ! मग चष्म्याप्रमाणे आपलाही दर्जा कायम..,आणि डोकंही कसं एकदम शांत! फारतर नंबर वाढत जाईल त्या त्या पंथांच्या दृष्टिनुसार, तसा चष्माही बदलत जाऊ.  म्हणजे मग मधून मधून मानवतावादाचं क्लिनर मारलं, की काचा पुसणं एव्हढं एकच काम शिल्लक राहील!  कुण्णाची नजर नाही लागणार मग आपल्याला!  धन्यवाद या चष्म्यांचे! आज मला एक निराळीच दृष्टी देऊन गेले ते!  धन्यवाद ! मन:पूर्वक धन्यवाद!! शतशः धन्यवाद!!!


वाचने 7124
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

धर्मवादाचा चष्मा,निधर्मवादाचा चष्मा, साम्यवादाचा ,समाजवादाचा,राष्ट्रवादाचा,सेक्युलारीझमचा, आणि मानवतावादाचाही चष्माच!!! हे चष्मे लावल्याशिवाय आपण काहिही वाचलं, तर अंधुक दिसण्यापेक्षाही स्पष्ट आणि पर्यायानी खरं दिसायची शक्यता अधिक! विचार मनापासुन आवडले.. कविता वाटली नाही म्हणून इतर कवितेंचा मान ठेवून +1 दिले नाही. पण विचारांशी एकदम सहमत

+1

काव्य कसे म्हणावे? सं - दी - प

In reply to by स्वलिखित

मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.


लेखन आवडले. पद्य नसल्याने स्पर्धेच्या दृष्टीने +१ द्यावं की नाही, विचार करतोय. बाकी चष्मा (कसलाही) लावायची वेळ येणं, दुर्दैवीच!

+१ ही आमच्या परममित्रांची कविता दिसतेय

आवडली. छंदमुक्त कविता आहे. लिहिण्याचा फॉरमॅट वेगळा ठेवायला हवा होता. उदा. धर्मवादाचा चष्मा निधर्मवादाचा चष्मा, साम्यवादाचा , समाजवादाचा, राष्ट्रवादाचा, सेक्युलारीझमचा, आणि.. . . मानवतावादाचाही चष्माच!!! ते दोन दोन कडवे केल्यामुळे वाचकांनी यमके शोधली आणि दिसली नाहीत म्हणुन खट्टु झाले असे झाले असावे.