मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[शतशब्दकथा स्पर्धा] येक रुपाया! (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध)

चांदणे संदीप · · स्पर्धा
पूर्वार्ध - येक रुपाया! नुस्ता गुंधूळ वर्गात. बाई कायतरी लिहीत व्हत्या, तेवढ्यात शिपाय आला नोटीस घिवून. सगळ्यान्ला वाटल उद्या सुट्टी! बाईंनी वाचल, "सर्वांना कळविणेत येते की, पंधरा ऑगस्टनिमित्त शाळेत चित्रकला स्पर्धा आहे. भाग घ्यायचाय त्यांनी वर्गशिक्षकांकडे फी जमा करणे. नोटीस दिनांक १/८/१९९२." शाळा सुटल्यावर तीन ढांगात घरी! तायला म्हन्लो, "ताये मला येक रुपाया दी, शाळत चित्रकला पर्धा हाय." धुनं वाळू घालीत म्हन्ली, "त्यान्ला न्हाय काम आन तुला नाय धंदा!" धा रोज तायच्या म्हाग लाग्लो. रडलोबी. एक दिवस शाळला जाताना तायनी रुपाया दिला. पुना तीनच ढांगा! हाजरी झाल्याझाल्या बाईन्ला म्हन्लो, "बाई, फी!" बाई म्हन्ल्या, "संदीप, मुलांची यादी कालच जिल्हा परिषदेला दिली." म्हाग फिरल्यावर बस्करपट्टीबी दिसाना!
=========== येक रुपाया! - उत्तरार्ध =========== गावातन प्रभातफेरी झाली, झेंडा फडकला, बिस्कीटपुडा मिळ्ळा, झाल पंधरा ऑगस्ट! पर्धेला नाव दिल्याली थांबली शाळेत, बाकी घरला! व्हरांड्याच्या खिडकीतन आमच्याच वर्गात बसल्याली पोर दिसली. शिपाय बस्ल्याला खुडचीत, कुणालाबी खवळत नव्हता. ढेऱ्याचा सच्या सतराबाऱ्या कायतरी काडायचा पुना खुडायचा! मला य म्हन्ला आत. गेलो, त्याज्यापशी बस्लो, म्हन्ला, "संदीप्या चितार काडून दी की लका, तुला रूपाया दिईन." गावातलच तळ, त्याज्यात बदक, व्हडी नावाडी, शेतं, झाडं आन माळाच्या रस्त्यावर दपतार घितल्याली पोर काडली. रंग दिला. बाई याया लागल्यावर सच्या म्हन्ला, "ब्रूस दी, तू जा." त्यादिशी शिपायानी फळा धुऊन रन्गखडूनी चांगल्या आक्शरात लेहल, "सचिन ढेरे - जिपप्रा शाळा तुर्केवाडी, जिल्हा परिषद चित्रकला स्पर्धेत तिसरा. हार्दिक अभिनंदन!"

वाचने 18033 वाचनखूण प्रतिक्रिया 49

संदीप डांगे Mon, 08/24/2015 - 11:41
खूप आवडली. यावर एक छान शॉर्टफिल्म होऊ शकते. इसमे वो बात है संदिप्या!

अभ्या.. Mon, 08/24/2015 - 14:04
हाय भाऊ जबरा दम कथेत. लैच परफेक्ट जमलीय. मला बी लैच एक्स्पिरेन्स असल्या बक्शीसाचा. पैशापायी नाइ अडलो कधी पण फालतू माणसांमुळे आप्ल्या कलाकृतीवर दुसर्‍याचे नाव बगायची लै सवय मला. ;) +१ लै हक्काने घ्या.

चिगो Mon, 08/24/2015 - 14:23
मस्तच.. हा अनुभव आहे की सहजच लेखकाचं आणि कथानायकाचं नाव जुळंतय?

मी-सौरभ Mon, 08/24/2015 - 18:38
आमच्या एका ऐकीव अनुभावात ; पुढच्या मुलाचा पूर्ण पेपर कॉपी करनारा पास आनी ज्याचा कॉपी केला तो नापास असा किस्सा आहे. तो आठवला.

चांदणे संदीप Mon, 08/24/2015 - 19:52
सर्वांचे खूप आभार… @ संदीप डांगे, अभ्या, मी सौरभ, समीरसूर, gogglya, अन्या दातार, चिगो, प्यारे१ यांना विशेष धन्यवाद! मिपाकरांच्या प्रतिसादाने अंगावर मूठ्भर मांस चढल्यासारखे वाटत आहे. वजन कमी करायच्या चिंतेत असलेला Sandy

मनीषा गुरुवार, 08/27/2015 - 16:51
अप्रतीम कथा ! आपल्या एखाद्या चांगल्या कामाचे श्रेय जेव्हा दूसरे लोक लाटतात ---- त्याचा फार त्रास होतो.