दाही दिशांस जेंव्हा...

लेखनविषय:
काव्यरस
दाही दिशांस जेंव्हा,अंधार दाटला होता भरपूर,काजव्यांचा आधार वाटला होता! पृथ्वी कधीतरी तर थांबेल वाटले होते माझ्यासवे दिशांनी संसार थाटला होता! ही कंपने अशी का गाण्यात सुरमयी आली? हुंकार वेदनांचा कंठात दाटला होता! अमृत म्हणून प्यालो एकेक दवाचा बिंदू मग्रूर पावसाचा मग ऊर फाटला होता! लाटेवरुन एका नुकताच स्वार झालो अन् एका क्षणात अवघा दर्याच आटला होता! मिळवून दाद गेले,सत्कार जाहले त्यांचे माझाच शेर ज्यांनी तूर्तास लाटला होता! मज मायना जरा हा,उशिराच उमगला होता पत्रामधून माझा पत्ताच काटला होता! —सत्यजित

त्या सुऱ्याची चालही लयदार आहे!

लेखनविषय:
काव्यरस
साचला का एवढा अंधार आहे? काजव्यांचा तेवढा आधार आहे! जागल्या होत्या मशाली काल येथे आज इथला सूर्यही बेजार आहे! एकही ठिणगी कशी येथे पडेना? कोण इथला आंधळा सरदार आहे? फुंकतो आहे कधीचा सूर्य मीही श्वास माझाही जरा उबदार आहे! सारखा हिंदोळतो हा प्राण माझा त्या सुऱ्याची चालही लयदार अाहे! —सत्यजित

रिक्त प्याल्याच्या तळाशी...

लेखनविषय:
काव्यरस
ओततो पेल्यात जेंव्हा,दुःख मी फेसाळते विरघळाया लागतो मी,वेदना साकाळते! ओल राहू दे जराशी आतवर कोठेतरी कोरडी पडली जखम की,खोलवर भेगाळते! तू नको येऊ पुन्हा बागेमधे भेटायला पाहिल्यावरती तुला हर पाकळी ओशाळते! तू निघुन गेलीस तेंव्हा फक्त इतके वाटले चंद्र नसताना नभाशी..रात्रही डागाळते! केवढी असते तुफानी,आठवांची सर तुझ्या वाट चुकल्या गल्बताला,हर दिशा धुंडाळते! नीट बघ,दिसतो तुला का?रिक्त हा पेला तुझा रिक्त प्याल्याच्या तळाशी,पोकळी आभाळते! —सत्यजित

फुलपाखरु मनाचे हळुवार होत आहे!

लेखनविषय:
काव्यरस
मग्रूर काजव्यांचा संचार होत आहे पणती जपून ठेवा अंधार होत आहे! वाटेत सावल्यांचे थांबे नकोत मजला माझ्याच सावलीचा मज भार होत आहे! झाली नवीन ओळख,माझी मला अशी की ऐन्यासमोर चिमणी बेजार होत आहे! सुरवंट वेदनेचा कोषांत वाढताना फुलपाखरु मनाचे हळुवार होत आहे! हे कोणत्या ऋतूचे नादावलेत पैंजण? एकेक पाकळीचा गुलजार होत आहे! —सत्यजित

एक बेवारस प्रेत - माझा बाप

लेखनविषय:
काव्यरस
भर रस्त्यावर कुत्री तुटून पडली होती. एका बेवारस प्रेतावर कुत्री भुंकत होती. गुरगुरत होती त्यांच्यातली त्यांच्यात रस्ता निर्मनुष्य नव्हताचं पण ते कुत्री हाकलून लावावीत असं कुणालाचं वाटतं नव्हतं. एका ही माणसाला पुरून टाकण्यापेक्षा प्रेत जाळून टाकण्यापेक्षा अशी खाऊ दयावीत कुत्र्यांना असं वाटत असेल सर्वांना पण पुन्हा कुत्र्यांचं राज्य येईल असं वाटलं नव्हतं कुणाला. मी तरी काय करू ?

'नाते' म्हणून आहे!

लेखनविषय:
काव्यरस
तुटली सतार पण मी गाते म्हणून आहे या मैफलीत मीही,'नाते' म्हणून आहे! निर्व्याज सोबतीच्या भेटी गहाळ झाल्या नाते अता खरेतर 'खाते' म्हणून आहे! जेवण,चुडा नि साड्या,देतोच ना मला तो खात्यात नाव त्याचे,'दाते' म्हणून आहे! गजरा गुलाब अत्तर,निर्गंध होत गेले शृंगारही अताशा,'न्हाते' म्हणून आहे! स्मरते नि छिन्न करते,एकेक गीत त्याचे या काळजात फिरते पाते म्हणून आहे! या लेखणीस कितिदा,तोडून पाहते पण माझ्यासवेच तीही,'जाते' म्हणून आहे! —सत्यजित

तो खुला बाजार होता!

लेखनविषय:
चोरटा व्यापार कसला?तो खुला बाजार होता वासना अन् भूक यांचा..रोजचा व्यवहार होता! चार फांद्या वाकलेल्या दोन खिडक्या झाकलेल्या सांधले काही कवडसे..फाकला अंधार होता! मनचले भुंगे उगाचच,फूल गोंजारुन बघती पाकळ्या चुरगाळलेल्या..स्पर्श थंडा-गार होता! देह विझलेले जगाची वासना जाळीत होते चालला रस्त्याकडेने भोंगळा यल्गार होता! हासताना जिंदगीची राख ती उधळीत होती... हो,तिच्या देहात नक्की शायरी अंगार होता! —सत्यजित

पेटुनी आरक्त संध्या...

लेखनविषय:
पेटुनी आरक्त संध्या,मातला अंगार आहे... केवडा वा रातराणी..मोगराही फार आहे! मोकळे बाजार-रस्ते,शांत आहे शहर सारे... वाटते आहे उद्याचा,वादळाचा वार आहे! काजव्यांच्या चार ओळी,सारख्या फिरतात येथे... सांग त्यांना..पेटलो तर,सूर्य माझे सार आहे! एक तुकडा चांदण्याचा,बांधला होता उराशी... त्याच तुकड्याने नभीचा,चंद्र मी टिपणार आहे! मी कधी कुठल्या ऋतूची,काळजी केलीच नाही... आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे! सोबती कोणी न माझा,ना कुणाचा सोबती मी... मी निघालो त्या क्षणाला,काफिला निघणार आहे! —सत्यजित

तू नभीचा चंद्रमा हो...

लेखनविषय:
लांबती हे श्वास हल्ली..सोबती घेवून जा... तू मला भेटायला ये..एकदा येवून जा! शेवटी आयुष्यही असते प्रवासासारखे... तू तुझ्या गावात थांबा तेवढा ठेवून जा! तो तसा आला नि गेला..वादळाच्या सारखा... पण मला सांगून गेला..दीप हो,तेवून जा! वाहते आहे अनावर,तू मला प्राशून घे... या नदीला सागराची वा दिशा देवून जा! सूर्य विझता रातही चालून येते नेमकी... तू नभीचा चंद्रमा हो..चांदणे लेवून जा! —सत्यजित

रंग

लेखनविषय:
काव्यरस
अंतरीचे कान्हा तू जरा समजून घे. उधळून जीवास मी रंग माझे शोषून घे. मी चिंब रंगी तुझ्या बासरी दिल छेडते. रंगबावरी मी राधा सुराच्या रंगी न्हाते. परशुराम सोंडगे,पाटोदा 9673400928
Subscribe to gazal