थांब ना..

Primary tabs

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
6 Aug 2009 - 9:16 am

गर्द आहे वाट माझी तू जरासा थांब ना
दाटले रे मूक भय हे, सोबतीला थांब ना

साचली गर्दी दुकानांची चहू बाजूस या
सापडे एखाद घरटे, पाहूनी तू थांब ना

एवढाही वेळ नाही सांग का रे तुजकडे ?
घेउनी आयुष्य माझे, आज थोडा थांब ना

सांजवेळा होत आली, वाकल्या या सावल्या
भास्कराची साथ निवली, मात्र तू रे थांब ना

पाहिले सारेच व्यापारी जगी हे राहिले
सापडे "माणूस" जेथे, त्या ठिकाणी थांब ना

गंजल्या खाणा खुणा, या भूतकाळाच्या जरी
कोपरा सांगेल सारी, ती कहाणी थांब ना

- प्राजु

कविता

प्रतिक्रिया

दशानन's picture

6 Aug 2009 - 9:27 am | दशानन

गंजल्या खाणा खुणा, या भूतकाळाच्या जरी
कोपरा सांगेल सारी, ती कहाणी थांब ना

सुंदर !!!

छान लिहली आहे कविता.. प्राजु ... आवडली !

बहुगुणी's picture

6 Aug 2009 - 9:33 am | बहुगुणी

'एवढाही वेळ नाही सांग का रे तुजकडे ?
घेउनी आयुष्य माझे, आज थोडा थांब ना
' ...हे फारच छान.

पद्मश्री चित्रे's picture

6 Aug 2009 - 9:46 am | पद्मश्री चित्रे

>>एवढाही वेळ नाही सांग का रे तुजकडे ?
घेउनी आयुष्य माझे, आज थोडा थांब ना

छान आहे कविता. या ओळी विशेष आवडल्या.....

विसोबा खेचर's picture

6 Aug 2009 - 9:51 am | विसोबा खेचर

ए प्राजू,

गझल ठीकच वाटली हो.

तात्या.

Dhananjay Borgaonkar's picture

6 Aug 2009 - 11:26 am | Dhananjay Borgaonkar

सांजवेळा होत आली, वाकल्या या सावल्या
भास्कराची साथ निवली, मात्र तू रे थांब ना

प्राजु ताई..एक नंबर ओळी आहेत..

पण व्यापारी आणी दुकानांचा संदर्भ नाही समजला...

पॅपिलॉन's picture

6 Aug 2009 - 11:33 am | पॅपिलॉन

कल्पना आणि त्याची मांडणी आवडली

वरती विसोबा खेचर म्हणतात त्याप्रमाणे ही गझल मात्र नाही. गझलेच्या व्याकरणाचे नियम फार कडक असतात, ते इथे पाळलेले नाहीत.

फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

प्राजु's picture

6 Aug 2009 - 9:25 pm | प्राजु

:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ज्ञानेश...'s picture

6 Aug 2009 - 11:33 am | ज्ञानेश...

"गंजल्या खाणा खुणा या भूतकाळाच्या जरी,
कोपरा सांगेल सारी ती कहाणी.. थांब ना !"

हे आवडले.

आपण वर 'गझल' म्हटले आहे म्हणून लिहितो, सदर रचनेत काफिया (यमक) कुठेच नाही. ('थांब ना' ही रदीफ आहे). त्यामुळे तांत्रीकदृष्ट्या ही रचना गझल नाही.

"Great Power Comes With Great Responsibilities"

प्रअका१२३'s picture

6 Aug 2009 - 6:27 pm | प्रअका१२३

कविता एकदमच मस्त आहे, लयबद्धही आणि अर्थवाहीही.

गजल नाही... तांत्रिक भानगडींमुळे. पण त्यापेक्षा कमीही नाही.

मीनल's picture

6 Aug 2009 - 7:20 pm | मीनल

गझल आहे की नाही या बद्दल मी लिहू शकत नाही. तेवढा माझा अभ्यास नाही.
पण गर्दी,व्यापारी, दुकाने हे शब्द निश्चितच खटकले.

या कवितेतील प्रसंगाचे सेटींग `संध्याकाळी रस्ता` हे असावे
(the setting- time and place or the physical world described in the poem)
दुसर म्हणजे
मला वाटत की एक प्रेयसी निघून जाणा-या प्रियकराला सांगते आहे की ---थांब ना
हे काव्य कुणाला उद्देशून आहे असे तुम्हाला वाटतय?ती कुणाला थांबायला सांगते आहे?

मीनल.

मनाशी चाललेला संवाद आहे.
पण गर्दी,व्यापारी, दुकाने हे शब्द निश्चितच खटकले.

साधा सोपा अर्थ आहे.. सगळीकडे फक्त दुकाने आहेत जिथे फक्त व्यापार होतो, पण घरटे.. जिथे केवळ प्रेम माया असते ते दिसले तर (रे! मना) तू थांब..

यात खटकण्यासारखं काही आहे असं नाही वाटत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मीनल's picture

6 Aug 2009 - 9:48 pm | मीनल

मनाचा रेफरेन्स मला संपूर्ण कवितेत लागला नाही.
तू सांगितल्यावर ते कळल्रे.
पण हाच संवाद प्रियकराशी होऊ शकतो... जसे मला वाटले.

साधा सोपा अर्थ आहे..
माझ्या बुध्दीला तो ही कळला नाही.माझी कमतरता!दुसर काय?

बाकी कवितेतील शब्दांत `गर्दी,व्यापारी, दुकाने`मला खटकले.
पुन्हा माझी कमतरताच असेल!
मीनल.

अश्विनीका's picture

7 Aug 2009 - 2:21 am | अश्विनीका

मीनल शी सहमत.
मला ही मनाचा रेफरन्स लागला नाही.

एवढाही वेळ नाही सांग का रे तुजकडे ?
घेउनी आयुष्य माझे, आज थोडा थांब ना

ह्या ओळीत तर मनाशी संवाद चालू आहे असे अजिबात वाटले नाही
- अश्विनी