"द्वार"

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
19 Jun 2009 - 1:31 pm

"दादा, अरे हा विषय एवढा विचित्र आहे ना, की वाटते कोण विश्वास ठेवेल आमच्यावर? आणि त्यातुन पुन्हा नीलला काही त्रास, धोका निर्माण होणार नाही ना? ज्या कुणाशी या विषयावर बोलायचे तो कितपत विश्वासार्ह आहे, हे कळायला हवे ना !"

"आनंदा, हे बघ तूझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही हे मला माहितीय आणि पटतय देखील.
असो तो तूझा वैयक्तिक प्रश्न आहे. पण एकदा भेटायला काय हरकत आहे? फार फार तर असे करु, आपण तिघेही म्हणजे तू, मी आणि वहिनी एकदा आण्णांना भेटु या. छान गप्पा मारु या, हा विषय काढायलाच नको. त्यानंतर तूम्ही ठरवा या विषयावर आण्णांशी बोलायचे का नाही ते, काय? पटतय का? "

"ठिक आहे दादा, तू म्हणतोच आहेस तर भेटू या आपण त्यांना, पण त्यांच्याशी या विषयावर बोलायचे का नाही ते मात्र मी त्यांना भेटल्यावरच ठरवेन. बाय द वे, त्यांचं नाव काय म्हणालास आणि काय करतात ते?"

"आनंदा , आण्णांचे नाव काय आहे ते मलाही माहीत नाही, पण बरेच जण त्यांना कल्याणस्वामी म्हणुन ओळखतात, पण मी त्यांना आण्णाच म्हणतो. ठिक आहे मग आज दुपारीच जावु आपण त्यांच्याकडे. ते काय करतात म्हणशील तर मला एवढेच माहित आहे किं ते रामदासी संप्रदायातील आहेत, त्यांचा सज्जनगडावरील समर्थ रामदासांच्या भक्तपरंपरेशी संबंध आहे. आपल्यासारखे अनेक अडले-नडले त्यांच्याकडे जातात आणि ते त्यांना कसलीही अपेक्षा न ठेवता जमेल तशी मदतही करतात. मी कधी खोलात गेलो नाही, तशी गरजही पडली नाही. शक्यतो दुपारी ४ ते संध्याकाळी १० पर्यंत ते मठातच असतात. मी त्याच्याशी बोलतो थोड्या वेळाने आणि वेळ घेवुन ठेवतो दुपारचा. ठिक ?
मग साडे तीनच्या दरम्यान मी तुम्हाला घ्यायला येइन. माझ्या गाडीनेच जावु आपण."

"दादा तुम्ही दोघेच जा, इथे नील पाशी कोणीतरी हवे ना? मी थांबेन घरी." पहिल्यांदाच नीला वहिनींनी संभाषणात भाग घेतला.

दादा निघून गेले. आनंदराव आणि नीलावहिनी शांतपणे एकमेकाकडे पाहात बसुन होते. एकदम वहिनींच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. तसे आनंदरावांनी पुढे होवुन त्यांना जवळ घेतले.

"अगं वेडे, रडतेस काय? इतकी वर्ष प्रत्येक गोष्टीला धीराने सामोरे गेलोच ना आपण ! आताही जावु." आनंदराव वहिनींचे अश्रू पुसत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करु लागले.

"आपल्या नीलला काही होणार तर नाही ना हो?" नीला वहिनी मुसमुसत म्हणाल्या. रडता रडता गेल्या बावीस वर्षाचा काळ भराभरा त्यांच्या डोळ्यासमोरुन सरकुन गेला. त्यातही शेवटचे सहा महिने प्रकर्षाने...............!

आनंदराव रायबागकर, वय वर्षे ५४, तसे सद्ध्याच्या नव्याने निर्माण झालेल्या उच्च मध्यमवर्गीय श्रेणीत मोडणारे. एका नामांकित बॆंकेत ब्रांच मॆनेजर म्हणुन कार्यरत होते. निवृत्ती जवळ आलेली पण स्वत:च बँकेत असल्याने त्यांनी आपला पैसा व्यवस्थितपणे गुंतवला होता. त्यावर ते तिघे आरामात जगु शकत होते. हो, तिघे म्हणजे ते स्वत:, त्यांच्या पत्नी नीला आणि एकुलता एक मुलगा नील. नीला वहिनी त्यांच्यापेक्षा फारतर दोन वर्षांनी लहान असतील. प्रेमविवाह होता त्यांचा. सर्व सुखे हात जोडुन उभी होती दारात.

पण म्हणतात ना परमेश्वर एका हाताने देतो आणि दुसर्‍या हाताने काढून घेतो. आनंदरावांच्या सुखी कुटूंबालादेखील कुणाची तरी दृष्ट लागली होती. नील साधारण वर्षाचा असतानाच त्याला एकदा साधा थंडीताप आल्याचे निमीत्त झाले आणि त्यानंतर तो जो अंथरुणाला खिळला तो उठलाच नाही. त्यातूनही दुर्दैवाची परिसीमा म्हणजे त्याच्या सर्व शरीरातली चेतनाच गेली होती.

गंमत म्हणजे ह्रुदय चालू होतं, मेंदूही कार्यरत होता पण शरिराचा मात्र कुठलाही अवयव ....................

नाही म्हणायला त्याचे सदैव भिरभिरणारे डोळे आणि फक्त कोपरापासुन हलणारा उजवा हात ....

हे दोनच अवयव काही प्रमाणात सजीव होते. आपण बोललेले त्याला नीट समजायचे पण बोलता येत नसल्याने त्याचे सर्व व्यवहार डोळे आणि त्याचा कोपर्‍यापर्यंत हलणारा हात यांच्याच साह्याने चालायचे. गेली बावीस वर्षे तो असाच अंथरुणाला खिळून होता. नीलावहिनींनी सगळं सोडुन स्वत:ला त्याच्या देखभालीत गुंतवुन घेतले होते. सुरुवातीला आता नील कधीच उठू शकणार नाही हे सत्य पचवणे खुप कठीण गेले दोघांनाही. पण हळु हळु सवय होवून गेली. तो आपल्या प्राक्तनाचाच एक भाग आहे असे समजुन त्यांनी ते कटूसत्य मनापासुन स्विकारले होते. येइल तो दिवस ढकलणे एवढेच काम.

पण नीलाताईंना अजूनही आशा होती की नील बरा होइल. शेवटी आशेवरच तर जगतो माणुस!

त्यामुळे रोज त्याला मॉलीश करणे, त्याची औषधे देणे, अगदी त्याला आंघोळ घालण्यापासुन त्याचे सर्व विधी उरकण्यापर्यंत सर्व काही त्या प्रेमाने, आस्थेने करायच्या. सुदैवाने म्हणा, दुर्दैवाने म्हणा नीलचा मेंदू सुस्थितीत होता. त्यामुळेच आईला होणारा त्रास त्याला कळायचा, ते त्याच्या डोळ्यात बरोबर वाचता यायचे नीलावहिनींना. अलिकडे एक नविनच भावना आढळुन आली होती त्यांना त्याच्या डोळ्यात. जेव्हा जेव्हा त्या त्याला आंघोळ घालायच्या, त्याचे कपडे बदलायच्या तेव्हा त्याच्या डोळ्यात उभी राहणारी असहायता, लज्जा त्यांना जाणवली होती. त्याला ते फार संकोचल्यासारखे होत असावे. पण त्यांचा नाईलाज होता................ त्याचाही !

लहानपणी नीलावहिनी त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या परीच्या...चेटकिणीच्या, जादुगाराच्या, देवांच्या ....राक्षसांच्या ! खरेतर नीलावहिनींनी त्याला इतरही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करुन पाहीला होता. पण त्याला परीच्या ..., जादुगारांच्या गोष्टी फार आवडायच्या. कदाचित आपण औषधांनी कधीच बरे होवु शकणार नाही हे त्याच्याही लक्षात आले होते, त्यामुळे कदाचित जादु या प्रकाराबद्दल त्याच्या मनात एक प्रकारचे अनामिक आकर्षण निर्माण झाले असावे.

अलिकडे, अलिकडे एक वेगळाच चाळा लागला होता त्याला. मागे कुणीतरी असेच भेटायला म्हणुन आले होते, त्यांचा छोटा मुलगा त्याचे एक छोटेसे भिंग नीलच्या बिछान्यापाशी आलेल्या खिडकीत विसरून गेला होता. ते नेमकं नीलला दिसलं आणि त्याने खुणा करून नीलावहिनींकडुन ते मागुन घेतलं. आणि मग खिडकीतुन पडणार्‍या कवडशांशी त्या भिंगाच्या साह्याने खेळण्याचा त्याला चाळाच लागला. खिडकीतुन येणारे प्रकाशाचे कवडसे आणि ते भिंग हा जणु काही त्याच्या जिवनाचा अविभाज्य घटक बनला होता. कल्पना करा एक तरुण मुलगा , गेली २० पेक्षा जास्त वर्षे बिछान्याला खिळुन असलेला, ज्याला फ़क्त एकच हात तोही कोपरापर्यंतच हलवता येतो, त्याच्यासाठी कुठलीही छोटीशी गोष्टही खुप अनमोल होती. आनंदाची गोष्ट म्हणजे हे भिंग सापडल्यापासुन, हळुहळु नील त्याचा उजवा हात कोपरापासुन थोडा थोडा वर उचलु लागला होता. त्यामुळे कवडशांचा पाठलाग करणे काही काळ का होईना जमायला लागले होते त्याला. आजकाल त्याचे सदैव तेच चालु असायचे त्या भिंगाने येणारा सुर्यप्रकाश कुठेतरी परावर्तित करायचा आणि त्यातुन भिंतीवर, जमीनीवर निर्माण होणार्‍या आकृत्या न्याहाळत बसायचे.

एके दिवशी असेच आनंदराव आणि नीलावहीनी नीलच्या खोलीत गप्पा मारत बसले होते. नीलचे नेहेमीप्रमाणे त्याच्या भिंगाबरोबर सावल्यांचा खेळ खेळणे चालु होते. नीलावहिनी त्याच्या शेजारीच, त्याच्या उशाशी बसल्या होत्या. आनंदराव भिंतीपाशी असलेल्या आरामखुर्चीवर बसुन कुठलेतरी पुस्तक वाचत होते. नीलाताई मायेने नीलच्या केसातुन हात फ़िरवत होत्या. त्याच्या केसातुन हात फिरवता फिरवता आनंदरावांशी गप्पा मारणे चालु होते. एकदम .........

नीलावहिनींना काहीतरी विचित्र जाणिव झाली. म्हणजे त्या नीलच्या केसातुन हात फिरवत होत्या. एक क्षणभर हाताला काहीच लागले नाही तसे त्यांचे एकदम नीलकडे लक्ष गेले.......

नील गादीवर नव्हता !

"अहो ..... आपला नील !" नीलावहिनी घाबरुन ओरडतच उठल्या.

"अगं काय झालं, ओरडतेस कशाला?" आनंदरावांनी चिडुन विचारले, त्याच्या वाचनात व्यत्यय आला होता. एकतर आधीच नीलावहिनी मध्ये मध्ये बोलुन त्यांना डिस्टर्ब करत होत्या, त्यात हे ओरडणे....

"अहो, आपला नील...." बोलता बोलता नीलावहिनींचे पुन्हा गादीकडे लक्ष गेले.

नील तिथेच होता.

"अहो, क्षणभरासाठी आपला नील चक्क गायब झाला होता हो. मी माझ्या डोळ्यांनी पाहीलं." नीलावहिनी रडवेल्या झाल्या.

"काहीतरी बोलु नकोस नीला, अगं तो कुठे जाणार आहे. तिथेच तर आहे ना तो. त्याला त्याचा हात सोडुन कुठलाही अवयव हलवता येत नाही, एवढ्या कमी वेळात तो कुठे आणि कसा जावुन येवु शकेल? हे बघ तुला झोप आलीय बहुदा, रात्रभर त्याच्या काळजीत जागत बसतेस आणि त्यामुळे मग दिवसा अशी डोळ्यांसमोर अंधारी येते. जा तु जावुन झोप जा थोडावेळ !" आनंदरावांनी पुन्हा पुस्तकात डोळे खुपसले.

"हो तसेच झाले असेल, काय गं बाई वेडी मी. उगाचच घाबरले! तुम्ही लक्ष द्यालना थोड्यावेळ नीलकडे. मी खरंच जावुन पडते थोडावेळ?

"जा तू, जावुन आराम कर, मग बरे वाटेल, मी आहे त्याच्यापाशी !" आनंदरावांनी पुस्तकातुन डोके न काढताच उत्तर दिले.

तशा नीलावहिनी उठून आपल्या बेडरुमकडे निघाल्या. दारातुन बाहेर पडताना जर त्यांनी मागे वळुन पाहिले असते तर त्यांना धक्काच बसला असता.

नील व्यवस्थित मान वळवुन त्यांच्याकडे बघत होता. तेवढ्यात कशासाठी तरी आनंदरावांनी डोके वर काढले पुस्तकातुन. पण ती चाहुल लागताच नील पुन्हा पहिल्या स्थितीत आला होता. आनंदरावांनी पुन्हा पुस्तकात डोके घातले.

"तो नक्की भासच होता? नीलची मान हलल्यासारखी वाटली थोडी! छे छे..कसे शक्य आहे ते! मला पण नीलासारखंच व्हायला लागलं बहुतेक." स्वत:शीच हसत आनंदरावांनी मनातले विचार झटकुन टाकले.

दिवाणावर पडल्या पडल्या नीलावहिनींच्या मनात विचारांचे काहुर माजले होते,

"काय झालय आपल्याला ? आजकाल काहीही भास होतात. नाही, मला तंदुरुस्त राहायलाच हवं. नीलकडे कोन बघेल नाहीतर. आणि आपल्या नंतर .................?"

तो विचार नीलावहिनींना प्रचंड अस्वस्थ करुन गेला. "जावुदे, पुढचे पुढे ... , संध्याकाळी नीलच्या पलंगावरचे बेडशीट बदलायला हवे. किती घाण झालय सकाळपासुन. ते मिकी माउसचं घालते आज. ते खुप आवडतं नीलला. खुश असतो तो ते बेडशीट घातलं की.....!

बेडशीटचा विचार आला आणि नीलावहिनी चमकल्या, ज्या क्षणात नील गायब झाल्याचा भास आपल्याला झाला. ते डोळ्यासमोर आलेल्या अंधारीमुळे, थकव्यामुळे झाले असे मानले तर मग त्या क्षणात काहीच दिसायला नको होते आपल्याला. पण बाकी सर्व दिसत होते......, खोली, आरामखुर्चीवर बसलेले नीलचे बाबा, नीलचा पलंग ... अहं रिकामा पलंग ! "अहो....", नीलावहिनी उठणारच होत्या परत. तेवढ्यात त्यांच्या मनात विचार आला की त्यांचा विश्वास बसणार नाही या गोष्टीवर आणि आपला नील तर इथेच आणि सुखरूप आहे ना! या विचाराने त्यांनी पुन्हा माघार घेतली आणि आराम करण्याचा प्रयत्न करु लागल्या.

त्यानंतर असेच काही दिवस गेले. एकदा मध्यरात्रीच त्यांना जाग आली. तहान लागली होती त्यांना. त्या अर्धवट झोपेतच उठल्या आणि स्वयंपाकघराकडे गेल्या. पाणी पिले आणि येताना सहज नीलच्या खोलीकडे नजर टाकली. तशाच अर्धवट झोपेत त्या पुन्हा बेडरुमकडे आल्या आणि पलंगावर आडव्या झाल्या. एकदम त्यांना काहीतरी आठवले आणि त्या ताडकन उठुन बसल्या. येताना त्यांनी नीलच्या खोलीकडे नजर टाकली तेव्हा नीलची चादर खाली जमीनीवर पडली होती, तेवढेच त्यांना आठवत होते.

नील पलंगावर होता ................. ? आत्ता त्यांना लख्ख आठवले, नीलचा पलंग रिकामा होता.

त्या घाबरुन तशाच नीलच्या खोलीकडे धावल्या. जाता जाताच त्यांनी आनंदरावांना हाक मारली..... "अहो उठा, नील .....!"

तोपर्यंत त्या नीलच्या खोलीत पोहोचल्या होत्या. आणि जे काही पाहिलं तो त्यांना प्रचंड धक्काच होता.

पलंगावर नील व्यवस्थीत चादर वगैरे पांघरुन झोपलेला होता.

"काय झालं गं ओरडायला तुला ! आजकाल तुझे भास वाढलेत हा!" आनंदराव जाम वैतागले होते झोपमोड झाल्याने.

"अहो, उद्या डॉक्टर साठ्यांना बोलावुन घ्या बर पुन्हा एकदा. नीलला पुन्हा एकदा तपासुन घ्यायला हवे !" नीलावहिनी तोंडातल्या तोंडात बडबडल्या.

"बरं, बरं... बोलावतो, आता झोप तू! चल...........!"

ते दोघेही परत बेडरुमकडे गेले आणि नीलने चादरीतुन डोके बाहेर काढले. त्याच्या ओठांवर विचित्र, भितीदायक हा शब्द जास्त योग्य ठरेल .... असे हास्य होते !

"नाही आनंदराव, माफ करा पण तुमचा मुलगा कधीच बरा होवु शकणार नाही. मला फार वाईट वाटतेय तुमची निराशा करताना पण उगाचच खोटी आशा दाखवणे मला पसंत नाही. तुमच्या इच्छेप्रमाणे आपण सर्व टेस्ट करुन पाहील्या. त्याच्या शरीरातील पेशींची वाढच होत नाहीये, खरेतर हा प्रकारच विचित्र आहे आनंदराव. त्याच्या शरीरातील पेशी अक्षरश: मृतावस्थेत आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे हृदयाला होणारा रक्तपुरवठा थांबलेला आहे, तरीही तो व्यवस्थित श्वास घेतोय. दुसया शब्दात सांगायचे तर त्याचे जगणे हा वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने एक चमत्कारच आहे." डॉ. साठेंना स्वत:च्याच शब्दांवर विश्वास बसत नव्हता."तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही त्याला इथे काही दिवसांकरीता अ‍ॅडमिट करा आपण काही टेस्ट करून बघु अजुन........."

"नाही, मला त्याला इथे अ‍ॅडमिट करायचे नाही आहे! तो घरीच बरा आहे. आम्ही दोघे नवरा बायको योग्य ती काळजी घेवु त्याची" नीलावहिनी जवळजवळ ओरडल्याच. नंतर राहुन राहुन त्यांनाच आपल्या त्या ओरडण्याचं आश्चर्य आणि लाज दोन्ही वाटत राहीली, "डॉक्टरांनी खरेतर काहीच चुकीची मागणी केली नव्हती मग आपण एवढ्या का चिडलो?"

दोघेही नीलला घेवुन घरी परतले. नीलला त्याच्या पलंगावर झोपवुन आनंदरावांनी पेपर हातात घेतला. आज सकाळपासुन नीलच्या चेकींगच्या गोंधळात पेपरच वाचणे झाले नव्हते. मुखपृष्ठावरच ठळक मथळा होता.

"शहरातील विमानगरामध्ये काल रात्री एका १८ वर्षीय तरुणीचे शव आढळुन आले. डॉक्टरांच्या निदानानुसार कुणीतरी तिच्या शरीरातले सर्व रक्त काढुन घेतलेले आहे. विशेष म्हणजे तिच्या शरीरावर कुठेही जखम नाही, अगदी खरचटल्याचेही निशाण मिळाले नाही.. पोलीस तपास चालु आहे......!"

"अहो, काल अमावस्या होती. माझ्यावर विश्वास ठेवा काल थोड्या वेळाकरता का होईना पण नील त्याच्या जागेवर नव्हता!" नीलीवहिनींचे डोळे पाण्याने डबडबले होते.

"तुझं आपलं काहीतरीच असतं! अगं हलता देखील येत नाही त्या लेकराला, तो कुठे जाणार आहे ?"

पण त्यानंतर शहरात येणार्‍या प्रत्येक अमावस्येला अशाच प्रकारे एक एक मृत्यु होवु लागले.विशेष म्हणजे हे सगळे मृत्यू एकाच प्रकारे होत होते. पोलीस चक्रावुन गेले होते. शरीरावर कसली जखम नाही, साधा ओरखडाही नाही, कुठेही टोचल्याचे निशाण नाही पण शरीरातील रक्त मात्र ....... एक थेंबही शिल्लक नसे. सर्व मृत्यू स्त्रीयांचेच होत होत आणि हे सारे मृत्यू अमावस्येच्या रात्रीच होत होते हे विशेष.

नीलवर नजर ठेवुन असणार्‍या नीलाताईंनी एकदोन वेळा पुन्हा तोच अनुभव घेतला, यावेळेस मात्र एकदा आनंदरावांनीही हे अनुभवले. मोजुन एक ते दिड मिनीटाकरता नील गायब होत असे. पण दिड मिनीटापेक्षा जास्त वेळ कधीच लागला नाही त्याला. तो गायब होवुन पुन्हा दिसायला लागल्यानंतर मात्र त्याच्या चेहर्‍यावर एक वेगळेच समाधान दिसे. आता मात्र नीलावहिनींना भीती वाटु लागली होती. हा जातो कुठे? त्याच वेळात होणार्‍या त्या मृत्यूंशी त्याचा काही ........कारण नेमका त्या मृत्युच्या रात्रीच एक दिड मिनीटाकरता का होईना पण नील गायब होत होता.

"छे, असं कसं शक्य आहे? अवघ्या दिड मिनीटात एखाद्याच्या शरीरातले सर्व रक्त शोषून घेणे कसे शक्य आहे? आणि नील असे घृणास्पद कृत्य का करेल? " आनंदरावांनी हा विचार मनातून झटकुन टाकला. पण त्याचवेळी त्यांनी आपले एक जिवलग मित्र सुभाष देशपांडे यांच्याजवळ आपले मन मोकळे केले. त्यावेळी वर उल्लेखित चर्चा झाली होती. आणि शेवटी मनात नसतानाही नीलसाठी म्हणुन आणि सुभाषदादांच्या सल्ल्याचा मान ठेवायचा म्हणुन त्यांनी त्या तथाकथीत आण्णांची भेट घ्यायची ठरवले होते. पण त्याचवेळी त्यानी मनाशी ठाम निर्णय घेतला होता की काही झाले तरी, ते आण्णा कितीही चांगले वाटले तरी नीलची ही समस्या त्यांच्याशी बोलायची नाही. कारण त्यातुन थेट नीलवरच या मृत्यूचा वहिम घेतला जाण्याची शक्यता होती.

आनंदराव स्वत:शीच हसले, स्वत:च्या वेडेपणावर! नीलची एकंदरीत अवस्था बघितल्यावर आणि डॉ. साठ्यांसारख्या नामांकित डॉक्टरचे त्याच्याबद्दलचे निदान ऐकल्यावर कोण नीलवर असा काही आरोप करण्यास धजावले असते?

पण तरीही त्यांनी आपला निर्णय ठाम केला.

दुपारी साडेतीन वाजताच सुभाषदादा त्यांच्या १८५७ सालातील फियाटसह दारात हजर झाले. ती गाडी बघितल्यावर तशा अवस्थेतही आनंदरावांना हसु आले.

"दादा, आपण चार वाजेपर्यंत पोचु ना तुझ्या आण्णांकडे? नाही तशी काय घाई नाही, उद्याच्या दुपारपर्यंत पोहोचलो तरी काही हरकत नाही."

"चल बस, तुला आण्णांशी भेट घालुन संध्याकाळी साडेसहा-सातच्या आत वनपिस घरी आणुन नाही सोडला तर गाडी विकून टाकीन मी!"

अशा पैजा या आधीही खुप वेळा लागल्या होत्या, पण अजुनतरी गाडी दादांकडेच होती.

आण्णांची मठी शहरापासुन थोडी एका बाजुलाच होती, तिथे पोचायला साधारण अर्धा पाउण तासतरी लागणार होता. गाडीत आनंदराव जवळजवळ गप्पच होते. नीलचा विचार काही केल्या मनातुन जात नव्हता. दादांनी दोन तीन वेळा त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा मुड नाही हे लक्षात आल्यावर दादा मुकपणे गाडी चालवत राहीले. थोड्या वेळाने , कुठेतरी गाडी थांबली तसे आनंदरावांनी बाहेर बघितले. तेथे समोर तरी काहीच नव्हते, नुसती झाडेच दिसत होती. दादांनी गाडी थांबवली आणि आनंदरावांना सांगितले की तु पुढे जावुन हॉलमध्ये बस बिनधास्त मी गाडी पार्क करुन आलोच. तसे आनंदराव गाडीतुन खाली उतरले. समोरच एक छोटेसे बोगनवेलीच्या रोपट्यांचे कुंपण होते, तिथुनच एका ठिकाणी आत जायला जागा होती. आनंदराव खरे तर फाटक शोधत होते पण फाटकाच्या जागी त्यांना फक्त मोकळी जागा दिसली आत जाण्यासाठी.

"या काका, आत या ! " आतुन आवाज आला तसे आनंदरावांनी आत पाउल टाकले. तिथे एक पस्तीशीचा तरुण फ़ुलांच्या ताटव्यात वाढलेले तण खुरप्याने काढत होता. त्याने प्रसन्नपणे हात जोडुन आनंदरावांना नमस्कार केला.

"अं, मी ... म्हणजे आम्ही... म्हणजे मी आणि दादा..सुभाषदादा आम्ही आण्णांना भेटायला आलो होतो." आनंदराव थोडेसे गडबडलेच होते.

तसा तो तरुण प्रसन्न हसला, " अहो, काका .... तुम्ही आत तर या आधी ! बसा हॉलमध्ये निवांत, थोडेसे सरबत घ्या, आण्णा येतीलच इतक्यात."

आनंदराव आत जाता जाता आजुबाजुचा परिसर निरखत होते. केवढे प्रसन्न होते तिथले वातावरण. छोटीशी बागच होती म्हणा नाती. वेगवेगळ्या फुलांची झाडे होती... चाफा, पळस, जाई-जुईच्या वेली, पारिजात, मोगरा, गुलाबाच्या वेगवेगळ्या जाती यांच्याबरोबरच काही फळझाडे ही होती.

आणि मधोमध ती सुरेख कुटी होती. क्षणभर आनंदरावांना वाटले आपण चुकून पुराणकाळातल्या एखाद्या ऋषी मुनींच्या आश्रमात तर नाही आलो ना? छोटीशीच पण सुरेख अशी ती कुटी होती, फारतर चार पाच छोट्या छोट्या खोल्या असाव्यात आत. त्यांनी हॉलमध्ये प्रवेश केला. खाली छान शेणाने सारवलेली जमीन होती, भिंतीवर सर्वत्र स्वच्छ पांढरा चुना लावण्यात आला होता. त्यावर भगव्या रंगात "जय जय रघुवीर समर्थ " हा मंत्र लिहीण्यात आला होता. समोरच श्री समर्थ रामदासस्वामी तसेच प्रभु रामचंद्रांची तसवीर होती. विचारांच्या तंद्रीतच तिथेच अंथरलेल्या एका चटईवर आनंदराव टेकले. एकदम मनावरचा सगळा ताण नाहीसा झाल्यासारखे हलके हलके वाटत होते. आपली सगळी दु:खे, सगळे तणाव विसरल्यासारखे झाले त्यांना. आपोआपच एक उत्सुकता वाटायला लागली, कसे असतील हे आण्णा? कसे बोलतील आपल्याशी?........ कुणीतरी त्यांना सरबत आणुन दिले. ते सरबत घेतले आणि त्यांना अचानक खुप मोकळे मोकळे, हलके हलके वाटायला लागले.

"कसलं सरबत आहे रे हे?" त्यांनी त्या सेवकाला विचारले.

"काय की दादा, आण्णांनीच शिकवलंय, कसलीतरी बुटी आणुन दिली होती त्यांनी. ती थोडी उगाळुन पाण्यात मिसळली आणि त्यात थोडी साखर घातली की झाले सरबत तय्यार. चांगलं झालय ना, दादा?

"अरे चांगलं म्हणजे काय, मस्तच झालय. आण्णांना विचारलं पाहीजे कुठली बुटी आहे ते?"

"ह्या.... मी देतो की तुम्हाला ती बुटी, माझ्याकडे पुष्कळ देवुन ठेवल्या आहेत आण्णांनी."

तोपर्यंत दादा त्या मघाच्याच तरुणाच्या खांद्यावर हात ठेवुन जोरजोरात हसत आत आले. त्या तरुणाने बहुतेक काहीतरी विनोद सांगितला असावा, दोघेही अगदी खळखळुन हसत होते.

"नमस्कार काका, कसं वाटलं सरबत, आवडलं?" त्याने हसुन आनंदरावांना विचारले. आणि तिथेच समोरच्या भिंतीपाशी तो चक्क जमीनीवरच वज्रासनात बसला.

"छान, खुपच छान वाटलं. एकदम सगळे ताण विसरलो बघा क्षणभर !" आनंदराव अगदी मनापासुन बोलले.

"काळजी करु नका, आता इथे आलाच आहात ना, मग तुमचे सगळे ताण तणाव कायमचे नष्ट होवुन जातील." केवढ्या आश्वासकपणे बोलत होता तो तरुण.

"आण्णा..कधी येणार आहेत? नाही म्हणजे मी येवुन पंधरा मिनीटे झाली आता म्हणुन ......! तशी काही घाई नाहीये...."

तसा तो तरुण खळखळुन हसला , थोडासा पुढे सरकला आणि आनंदरावांना म्हणाला,"माफ करा काका, तुम्हाला थोडं अंधारात ठेवलं. तुमची उत्सुकता, अधीरता समजु शकतो मी. पण बघाना या थोड्या वेळाच्या विश्रांतीमुळे तुम्ही किती ताजेतवाने आणि प्रसन्न वाटताय आता."

"असो, मीच आण्णा, काही जण मला कल्याणस्वामीपण म्हणतात. पण तुमच्या सुभाषदादांसारखे जवळचे लोक मला आण्णाच म्हणतात. तुम्ही काहीही म्हटले तरी चालेल. किंवा तुम्हाला हि दोन्ही नावे जर ऑड वाटत असतील तर तुम्ही मला माझ्या मुळनावाने हाक मारा, चालेल?"

"माझं नाव आहे............... सन्मित्र, सन्मित्र भार्गव ! तुम्ही मला नुसते सन्मित्र म्हणुन किंवा मित्र म्हणुन संबोधलेत तरी चालेल.

"त्यांच्या चेहर्‍यावरील पवित्र आणि सात्विक भावांमुळे एकप्रकारचे तेज आण्णांच्या चेहर्‍यावर आले होते, आनंदराव शांतपणे आश्वस्त मनाने आण्णांकडे पाहतच राहीले.

क्रमश:

कथा

प्रतिक्रिया

अनिरुध्द's picture

19 Jun 2009 - 1:54 pm | अनिरुध्द

हा क्रमशः किती जीव खातो. येऊद्यात पुढचा भाग लवकर.

विंजिनेर's picture

19 Jun 2009 - 2:01 pm | विंजिनेर

मस्त आहे..
मागील पानावरून पुढे असले तरी भाषा अधिक ओघवती झाली आहे आणि प्रसंग निर्मितीत सुधारणा आहे लक्षणीय.. तुमचे लिखाणातले कष्ट जाणवता आहेत.
अजून एक उगवत्या मिपालेखकाचे अभिनंदन...

(आगंतूक समीक्षक)विंजिरायण धारप..

घाशीराम कोतवाल १.२'s picture

19 Jun 2009 - 5:24 pm | घाशीराम कोतवाल १.२

आले बाबा सन्मित्र भागवत परत ह्या कथेत!!!
आता किति क्रमश आणतो आहेस विशाल

**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

19 Jun 2009 - 5:15 pm | घाशीराम कोतवाल १.२

आले बाबा सन्मित्र भागवत परत ह्या कथेत!!!
आता किति क्रमश आणतो आहेस विशाल

**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

रेवती's picture

19 Jun 2009 - 10:23 pm | रेवती

पुढच्या भागाची वाट पहात आहे.

रेवती

विशाल कुलकर्णी's picture

22 Jun 2009 - 9:22 am | विशाल कुलकर्णी

धन्यवाद.

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

आमचं नवीन पाडकाम : चकवा : http://www.misalpav.com/node/8223

विसोबा खेचर's picture

22 Jun 2009 - 11:07 am | विसोबा खेचर

विशालराव,

उत्तम..!

येऊ द्या अजूनही..

तात्या.

मायबोली किंवा मनोगता वर.
पण फारच छान

पोलिसकाका_जयहिन्द's picture

23 Jun 2009 - 3:24 am | पोलिसकाका_जयहिन्द

पुढचा भाग लवकर येऊ द्या.

"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."

My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/

समिधा's picture

23 Jun 2009 - 4:48 am | समिधा

खुपच छान लिहीला आहे हा भाग.
पुढचा भाग कधी.. :T

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

विशाल कुलकर्णी's picture

23 Jun 2009 - 12:39 pm | विशाल कुलकर्णी

लवकरच

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

आमचं नवीन पाडकाम : चकवा : http://www.misalpav.com/node/8223