आणखी एक कला

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
7 Apr 2009 - 5:15 am

आणखी एक कला
***
हरवायची कला नाही कठिण शिकायला.
इतक्या वस्तू बनल्या आहेत घेऊनच आस
हरवायची - ती आपत्ती नको वाटायला.
*
रोज काही हरवू द्या - होऊ दे गडबड शोधायला -
हरवा छल्ला चावीचा, जाऊदे वाया एक तास.
हरवायची कला नाही कठिण शिकायला.
*
सरावाने भराभरा, भारंभार लागा हरवायला
नावांस, ठिकाणांस, सफर करायच्या त्या स्वप्नांस
हरवू देत. ती आपत्ती नको वाटायला.
*
हरवले आईचे घड्याळ, लागता हा हा म्हणायला
गेले जुने घर, अन् त्यापूर्वीचे, जिव्हाळ्याचे खास...
हरवायची कला नाही कठिण शिकायला.
*
दोन शहरे सांडली माझी, माझा लागला जायला
देश, कित्येक नद्या, भूखंड, अर्धा पृथ्वीचा व्यास
चुकचुकते आहे - पण आपत्ती नको वाटायला.
*
हरवला आहेस तूही (बोलायला गमत्या, वागायला
प्रेमळ) - खोटे नाही सांगत - स्पष्टच सांगावयास -
हरवायची कला नाहीच कठिण शिकायला.
वाटेल आपत्ती. (ठेव लिहून -) पण नको वाटायला.
***
- (मूळ इंग्रजी कविता) एलिझाबेथ बिशप -

(माझ्या एका मित्राचे खूप काही हरवले आहे, ही कविता वाचताना मला त्याची खूप आठवण आली. या कवितेचे भाषांतर करताना त्याच्या दु:खाची किंचित का होईना, सह-अनुभूती मला होत आहे.)

कविताभाषांतर

प्रतिक्रिया

सुवर्णमयी's picture

7 Apr 2009 - 6:46 am | सुवर्णमयी

भाव कायम ठेवणारे; मूळ कवितेच्या बरेच जवळ जाईल असेच भाषांतर झाले आहे.
बिशप ही माझी आवडती रचनाकार आहे. तिच्या 'इन द वेटिंग रूम' आणि ' at the फिश हाऊसेस चे भावानुवाद जरूर करावे अशी तुम्हाला विनंती आहे.
सोनाली

क्रान्ति's picture

7 Apr 2009 - 8:00 am | क्रान्ति

सरस भाषांतर. खूप आवडले.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

भडकमकर मास्तर's picture

7 Apr 2009 - 9:43 am | भडकमकर मास्तर

कवितेचा भावार्थ छान आहे.
पण अशा ओळी..
वाटेल आपत्ती. (ठेव लिहून -) पण नको वाटायला.

वाचायला जाचक होताहेत...
धनंजयशेठ, तुम्ही किंवा इतर सिद्धहस्त कवींनी याच कवितेचा थोडा मोकळाढाकळा स्वैर अनुवाद केला तर अजून मजा येईल असे वाटते.

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सँडी's picture

7 Apr 2009 - 1:20 pm | सँडी

हो! भावार्थ खुपच छान, आपण आपले शब्दालंकार (स्वैर अनुवाद) वापरुन त्याला सौंदर्य प्राप्त करुन द्यावे ही अपेक्षा.

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

प्राजु's picture

7 Apr 2009 - 8:48 pm | प्राजु

ऍज इज न करता थोडा मोकळा म्हणजेच स्वैर अनुवाद करावा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

जागु's picture

7 Apr 2009 - 1:14 pm | जागु

सुंदर भावार्थ.

उमेश कोठीकर's picture

7 Apr 2009 - 1:26 pm | उमेश कोठीकर

भावना कायम राहिली आहे. शब्दरचना पण छान.

लिखाळ's picture

7 Apr 2009 - 5:20 pm | लिखाळ

कविता आणि अनुवाद आवडला. छान आहे.

अनुवाद वाचून काही सुचले ते सांगावेसे वाटले.
हरवले आईचे घड्याळ, लागता हा हा म्हणायला
गेले जुने घर, अन् मग त्यापूर्वीचे, जिव्हाळ्याचे...
हरवायची कला नाही कठिण शिकायला.
या मध्ये 'आजीचे घड्याळ' असे म्हटले असते तर मराठी जनांना बालपणीचा रम्य काळ हरवला हे न सांगताच जाणवले असते.
'लागता हा हा म्हणायला' या ठिकाणी 'हा हा म्हणता' बरे वाटेल. कारण आपण असाच शब्द प्रयोग करतो.

दोन शहरे सांडली माझी, माझा लागला जायला
येथे सांडली पेक्षा पुसली गेली (इतिहासाच्या ओघात किंवा स्मृतीपटलावरुन) असे म्हटल्यास कसे वाटेल?

शेवटचे कडवे अर्थपूर्ण आहे. पण शेवटची ओळ थोडी वाचायला कष्ट देणारी.

एका सुंदर कवितेची ओळख करुन दिल्या बद्दल आभार.
-- लिखाळ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Apr 2009 - 5:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हरवलेल्या गोष्टीची नंतर सवय होऊन जाते हे खरं आहे !
हरवलेले शोधणे, आणि हरवते ते संकट नसते, अशा काही एक अर्थाची संवेदना पोहचली.

अजून येऊ दे !

-दिलीप बिरुटे

संदीप चित्रे's picture

7 Apr 2009 - 8:26 pm | संदीप चित्रे

धन्यवाद धनंजय.
>> हरवले आईचे घड्याळ, लागता हा हा म्हणायला
गेले जुने घर, अन् मग त्यापूर्वीचे, जिव्हाळ्याचे...
हरवायची कला नाही कठिण शिकायला.

या ओळीतर खूपच आवडल्या.

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

धनंजय's picture

8 Apr 2009 - 12:56 am | धनंजय

इथे भावानुवाद करायचा माझा हेतू नव्हता हे बर्‍याच लोकांना जाणवले, ते योग्यच आहे.

कवितेसारख्या रचनाबद्ध माध्यमात कवी दोन प्रकारे संवाद साधत असतो - शब्दांच्या कोशातल्या अर्थाने, आणि शब्दाच्या रचनेने.

भावानुवाद म्हणजे "ती कल्पना [म्हणजे तीच कथा, तेच कथानक, तोच नैतिक बोध, वगैरे] मला सुचली असती तर मी कशा प्रकारे शब्दबद्ध केली असती?" असा विचार करून लिहिणे. यात मुळातल्या कवीने निवडलेली रचनेची आकृती दुय्यम मानली जाते. अशा प्रकारचा अनुवाद मी केलेला नाही, हे पुष्कळांना जाणवले.

काहींना वाटले, की हा अनुवाद शब्दशः केलेला आहे. पण सोनालींना समजले आहे, की अर्थ शब्दशः घेतलेला नाही - फारतर "मूळ कवितेला बरेच जवळ जाईल असे" भाषांतर आहे. उदाहरणार्थ : "losing farther, losing faster" च्या ठिकाणी "भराभरा, भारंभार लागा हरवायला" मध्ये अर्थ गोळाबेरीजच साधला आहे.

या भाषांतरात मूळ कवीने निवडलेली कवितेची आकृती आणि "साधारण तोच अर्थ/तोच भाव" पकडायचा प्रयत्न केला आहे. जमेल तितके शब्दालंकार, पुनरुक्ती, वगैरे, भाषांतरातही ठेवले आहेत. उदाहरणार्थ : "losing farther, losing faster" च्या ठिकाणी "भराभरा, भारंभार लागा हरवायला" मध्ये अनुप्रास तसेच ठेवले आहेत.

यात थोडा प्रयत्न कमी पडला, ते चाणाक्ष वाचकांना समजलेच आहे. प्रत्येक कडव्यातल्या दुसर्‍या ओळींचे एकमेकाशी यमक मुळात आहे. भाषांतरात ते फार कठिण म्हणून सोडून दिले आहे.

लिखाळ यांना खटकलेल्या/सुचवलेल्या दोन-तीन गोष्टी :
१. आईचे घड्याळ : आजीचे घड्याळ चालले असते का? माझ्या मते नाही. हा पर्याय माझ्या मनात आला पण क्षणभरच. आणि कारणही मराठी वाचकाला ठाऊक असलेली आजीच्या घड्याळाची कल्पना. त्या कवितेत आजीकडे घड्याळ ही वस्तूच नसते, पण तिला वेळेचे भान उत्तम असते. या कवितेत वस्तू हरवते, आणि त्या वस्तूबरोबर ठसठसणार्‍या आठवणी. आजीच्या घड्याळाची स्मृती येथे वेगळे आणि मूळ कवितेच्या ओघातून बाहेर पडणारे कथानक आणते. मला सुचलेला दुसरा पर्याय म्हणजे "आईचा बिलवर [किंवा असाच कुठला दागिना]". अशा बदलाने "घ-ड्या-ळ" या कठोर व्यंजनांऐवजी मुळातल्या "वॉच्" सारखी मृदुव्यंजने आली असती. पण घड्याळासारखी कालमापक वस्तू सांकेतिकही आहे, म्हणून तीच ठेवली.

२. दोन शहरे सांडली
इथे "दोन शहरे हरवली" असे असायला हवे होते. "हरवणे" शब्दाची पुनरुक्ती (लूझ, लॉस, लॉस्ट) हे कवितेचे वैशिष्ट्य आहे. "सांडली" असा पर्यायी शब्द घालायचा माझा मोह ठीक नव्हता.

३. लागता हा हा म्हणायला
येथे वापरलेले यमक अतिशय कमजोर आहे. मान्य. (पण अर्थातच "हा हा म्हणता" चालणार नाही. विचारपूर्वक वेगळेच, आणि पटणारे यमक योजावे लागेल.)

४. शेवटची ओळ - इथे मात्र लिखाळ आणि मास्तरांशी पंगा घ्यावा लागेल. ती ओळ वाचायला त्रास होतो, या उघड तथ्याबाबत वाद नाही. पण नेमका तसाच त्रास व्हावा, अशी कवयित्रीची योजना होती, असे माझे मत आहे, म्हणून. मुळातल्या शेवटच्या दोन इंग्रजी ओळी अशा -
the art of losing's not too hard to master
though it may look like (Write it!) like disaster.

येथे मी कितीतरी वेळा प्रयत्न करून बघितला. उशीत कापसाबरोबर धोंडा घातल्यासारखे "(Write it!)" हे कंसातले वाक्य आहे. कितीही प्रयत्न केला तरी शब्दांचा ओघ विस्कळित करते म्हणजे करतेच. ओघवते असे "though it may look like disaster" हे वाक्य अत्यंत निष्ठुरपणे तोडून कंसातले वाक्य घुसवले आहे. तरीच like ...(!)... like मध्ये तोच शब्द दुसर्‍यांदा म्हणायला लागला आहे. ते ओघवते वाक्य सहज तसेच ठेवता आले असते, त्यामुळे ही घुसवलेली "लिही!"-आज्ञा कवयित्रीने मुद्दामून, ओघाला ठेच देणारा खडक म्हणून, योजली आहे. याबद्दल मला खात्री वाटते. हे रचनावैशिष्ट्य मी प्रयत्नपूर्वक भाषांतरात आणलेले आहे - चुकून नव्हे.

या कवितेचा भावानुवाद, वाटल्यास पूर्ण रूपांतरही कोणी करावे, सहमत आहे.

दोन वेगवेगळ्या हेतूंबद्दल असा दृष्टांत द्यावासा वाटतो.

आमच्या गोव्याचे बांगड्याचे तिरफळे घालून केलेले हुमण मोठे स्वादिष्ट असते. अमेरिकेतल्या कोण्या मित्राला त्याची चव द्यायची इच्छा असल्यास मी दोन मार्ग अवलंबू शकतो.
१. बांगडा महत्त्वाचा. तिरफळे, खोबरे, मिरच्या हे सगळे केवळ रसपोषणासाठीची उपांगे. असल्यास बरी, पण अमेरिकेत तिरफळे कुठे मिळतात? अमेरिकेतील खवय्यांसाठी अनोळखीच. त्याऐवजी कांदा-टोमॅटो-कोथिंबिरीच्या रश्श्यात बांगडा शिजवतो. माझा मित्र मिटक्या मारत खातो. पौष्टिक बांगडाही पोटात जातो. हा झाला भावानुवाद.
२. हुमाणाचे वैशिष्ट्य महत्त्वाचे. माझ्याकडे फ्रोझन खोबरे आहे, थोडीशीच तिरफळे आहेत, मिरच्या मेक्सिकन आहेत. तशातही मी हुमाण करतो. गोव्यातल्या ताज्या हुमाणाची चव तर नाहीच. शिवाय टोमॅटोच्या रश्श्यासारखे नेहमीचे नसले म्हणून अमेरिकन मित्र लगेच मिटक्या मारून खाणारही नाही. हा झाला छायानुवाद.

पहिल्या प्रकारात मुख्य अर्थ-जिन्नस त्या परदेशाच्या मसाल्याबरोबर दिला, आणि खूप मजा आली - गोव्यात येईल त्याच्या तोडीची. (पण हुमाण दिले का?)
दुसर्‍या प्रकारात हुमाण दिले (पण गोव्यातल्याची लज्जत आली नाही, अमेरिकेतल्या उत्तम पदार्थाचीही लज्जत आली नाही.) तरी मला वाटते, माझ्या मित्रांना हुमाणाची चव चाखायला देण्यात काही मूल्य आहे.

विसोबा खेचर's picture

8 Apr 2009 - 7:51 am | विसोबा खेचर

सुरेख..!

आपला,
(जिनियस धन्याशेठचा फ्यॅन) तात्या.

विसुनाना's picture

8 Apr 2009 - 2:01 pm | विसुनाना

प्रतिक्रिया देत आहे.

कडव्यांना तोडणार्‍या *** नको आहेत. कवितचा ओघ त्यामुळे तुटतो आणि रसहानी होते.

हरवला आहेस तूही (बोलायला गमत्या, वागायला
प्रेमळ) - खोटे नाही सांगत - स्पष्टच सांगावयास -
हरवायची कला नाहीच कठिण शिकायला.
वाटेल आपत्ती. (ठेव लिहून -) पण नको वाटायला.

या कडव्यात कंसातल्या मजकुराचे भाषांतर कसे योग्य आहे?
---Even losing you (the joking voice, a gesture I love)
याचे भाषांतर -
---तुला हरवणे (हा विनोदी आवाज, एक लीला मला रुचणारी)-
असे असावे असे मला वाटते. ( jester / gesture ?)
इथे कवियत्रीला ही विधाने करताना आपला रडका आवाज लपवून मुद्दाम खोट्या विनोदी आवाजात बोलण्याची लीला करावी लागत आहे असे तर दर्शवायचे नसेल? कारण पुढच्या (write it!) कंसात ती त्याला उद्देशून बोलत आहे.
आणि तसे तर पूर्ण कविताच छद्मविनोदी आणि खरी कारुण्यरसातील आहे हे वे.सां. न. ल.
कृपया खुलासा व्हावा.

धनंजय's picture

8 Apr 2009 - 9:48 pm | धनंजय

या कवितेने विचार करायला स्फूर्ती मिळते, हे छान.

खरडवहीत दिलेल्या भाषांतरानुसार
Even losing you (the joking voice, a gesture //
I love)...
इथे ओळ तोडण्याचे महत्त्व तुम्हाला पटले आहे. त्यामुळे त्याबद्दल येथे नाही.

gesture चे त्यातल्यात्यात सामान्य दोन अर्थ म्हणजे
१. (शारिरिक) हावभाव - ज्याला उर्दूत "हरकत" म्हणतात; किंवा
२. संकेत देणारी छोटीशी कृती
उदा १. द स्लाइट जेस्चर ऑफ डॅबिंग हिज फेस रिवील्ड हिज डिस्कम्फर्ट
उदा २. सेंडिंग थँक्यू नोट्स टु एव्हरी एम्प्लोयी वॉज अ नोबल जेस्चर.

"लीला" मध्ये दुसरेच काही सांगितले जाते आहे, असे मला वाटते.

"write it!" कोणाला उद्देशून आहे, ते संदिग्ध आहे. स्वगत आहे का? हरवल्यामुळे आता येथे नसलेल्या "तू"ला उद्देशून (अलंकारिक) आहे का? पण तसे असले, तरी त्या अलंकाराचा लेकी-बोले-सुने-लागे अर्थ असा की कवयित्री स्वतःलाच तो अयशस्वी उपदेश करत आहे.

लिहिलेली कविता हे दृक्श्राव्य माध्यम आहे, तुमचे म्हणणे पटते. माझ्या मते प्रत्येक कडव्याच्या पुढे एका श्वासाभराचा विराम आहे. पण तो "*" ने दाखवणे जरा अतीच झाले, हे तुमचे मत पटण्यासारखे आहे. नेहमीसारखी सफेत ओळही तेच काम करते.

स्वाती दिनेश's picture

8 Apr 2009 - 11:31 pm | स्वाती दिनेश

धनंजय, कवितेचे भाषांतर आवडले.
नंतरच्या स्पष्टीकरणामुळे जास्त चांगले समजले.
स्वाती

बेसनलाडू's picture

9 Apr 2009 - 12:18 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू