शिवमहिम्न स्तोत्राचा मराठी समश्लोकी अनुवाद
पुष्पदंत विरचित शिवमहिम्न स्तोत्राचा मराठी समश्लोकी अनुवाद
(१ ते २९ श्लोक शिखरिणी वृत्तात आहेत)
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१८११०७
१
महिम्नः पारं ते परमविदुषो यद्यसदृशी
स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः
अथाऽवाच्यः सर्वः स्वमतिपरिणामावधि गृणन
ममाप्येष स्तोत्रे हर निरपवादः परिकरः
.
तुझा ज्ञात्यांनाही गवसत नसे पार म्हणता
स्तुती ब्रम्हादींची उचित न ठरे ज्ञान नसता
मला वाटे गावे अवगत जसे स्तोत्र तव ते
शिवा स्वीकारावे हृदगतच माझे सरस हे
२
अतीतः पंथानं तव च महिमा वाङ्मनसयोः
अतद्व्यावृत्त्या यं चकितमभिधत्ते श्रुतिरपि
स कस्य स्तोतव्यः कतिविधगुणः कस्य विषयः
पदे त्वर्वाचीने पतति न मनः कस्य न वचः
.
मनाने वाचेने कथुन महिमा सरत न तुझा
श्रुती नाही, नाही, वर्णन असे करत असते
परी साकाराचे किति गुण कथू लोक म्हणती
मनाला वाचेला न कळत परी चित्र रचती
३
मधुस्फीता वाचः परमममृतं निर्मितवतः
तव ब्रह्मन किंवागपि सुरगुरोर्विस्मयपदम
मम त्वेतांवाणींगुणकथनपुण्येन भवतः
पुनामीत्यर्थेऽस्मिन पुरमथन बुद्धिर्व्यवसिता
.
कशी वाणी केली अमृतमय तू निर्मित अशी
तुला ब्रम्हा किंवा सुरगुरुस्तुती स्तिमित न करी
नसो आश्चर्याचे, तरि करत मी वर्णन तुझे
शिवा माझी बुद्धी गुणकथन पुण्यात रमते
४
तवैश्वर्यं यत्तज्जगदुदयरक्षाप्रलयकृत
त्रयीवस्तु व्यस्तं तिस्रुषु गुणभिन्नासु तनुषु
अभव्यानामस्मिन वरद रमणीयामरमणीं
विहन्तुंव्याक्रोशींविदधत इहैके जडधियः
.
जगाची उत्पत्ती, स्थिति, विलय देवा घडवसी
तुझे हे ऐश्वर्य, सत-रज-तमा दे परिणती
मनोहारी भासे वरद तव हे रूप बरवे
न रूपा जाणूनी, जड जन पहा क्षोभ करती
५
किमीहः किंकायः स खलु किमुपायस्त्रिभुवनं
किमाधारो धाता सृजति किमुपादान इति च
अतर्क्यैश्वर्ये त्वय्यनवसर दुःस्थो हतधियः
कुतर्कोऽयं कांश्चित मुखरयति मोहाय जगतः
.
निराकाराने हे जगत सगळे काय घडले
तया आधाराला सृजन कसले साधन ठरे
तुझे हे ऐश्वर्य न कळत असे लोक सगळे
कुतर्कांनी होती मुखर, करण्या मोहित मते
६
अजन्मानो लोकाः किमवयववन्तोऽपि जगतां
अधिष्ठातारं किंभवविधिरनादृत्य भवति
अनीशो वा कुर्याद भुवनजनने कः परिकरो
यतो मन्दास्त्वांप्रत्यमरवर संशेरत इमे
.
न का ईशावीणा जग घडवणे संभव असे
न का आधाराची गरजच तया भासत असे
कुतर्काने ऐशा कलुषितच ज्यांचे मन अती
तुझ्या लीलांनाही बघुन न असे मान्य म्हणती
७
त्रयी साङ्ख्यं योगः पशुपतिमतं वैष्णवमिति
प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदः पथ्यमिति च
रुचीनांवैचित्र्यादृजुकुटिल नानापथजुषां
नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव
.
असो सांख्यांचेही, शिवमत व विष्णूप्रिय जरी
अशा मंतव्यांना हितकर असे मार्ग मिळती
रुची वैविध्याने अवघड, सुधे पंथ धरती
परी सार्यांनाही, तव वरच वाटे परिणती
.
८
.
महोक्षः खट्वाङ्गं परशुरजिनं भस्म फणिनः
कपालं चेतीयत्तव वरद तन्त्रोपकरणम
सुरास्तांतामृद्धिंदधति तु भवद्भूप्रणिहितां
न हि स्वात्मारामं विषयमृगतृष्णा भ्रमयति
.
कपाली, संपत्ती, परशु, जिन, सर्पादी, भस्मे
तुझ्या संसाराचा रथ फिरत त्यांचेसह असे
सुरांना लाभे श्री, लव उचलिता तूच भुवई
कळे ज्याला त्याला, विषय सगळे ना भ्रमवती
.
९
.
ध्रुवं कश्चित सर्वं सकलमपरस्त्वध्रुवमिदं
परो ध्रौव्याऽध्रौव्ये जगति गदति व्यस्तविषये
समस्तेऽप्येतस्मिन पुरमथन तैर्विस्मित इव
स्तुवन जिह्रेमि त्वांन खलु ननु धृष्टा मुखरता
.
जगा काही नाशी, म्हणत अविनाशी जग कुणी
असा विचारांचा असत सगळा गोंधळ जगी
तरीही पाहोनी जग स्तिमित लीलेत तुझिया
स्तुती वाचेने ही, उगंच नच वाचाळपण हे
.
१०
.
तवैश्वर्यं यत्नाद यदुपरि विरिञ्चिर्हरिरधः
परिच्छेतुंयातावनिलमनलस्कन्धवपुषः
ततो भक्तिश्रद्धा-भरगुरु-गृणद्भ्यांगिरिश यत
स्वयं तस्थे ताभ्यांतव किमनुवृत्तिर्न फलति
.
तुला ब्रम्हाविष्णू हुडकत वरी आणिक तळी
तिथे नाही नाही म्हणत मग झाले चकितही
तुझ्या ऐश्वर्याने स्तिमित करती कौतुक तुझे
शिवा भक्तीश्रद्धा धरुन मिळसी निश्चितपणे
.
११
.
अयत्नादासाद्य त्रिभुवनमवैरव्यतिकरं
दशास्यो यद्बाहूनभृत-रणकण्डू-परवशान
शिरःपद्मश्रेणी-रचितचरणाम्भोरुह-बलेः
स्थिरायास्त्वद्भक्तेस्त्रिपुरहर विस्फूर्जितमिदम
.
तया लंकेशाचे स्फुरण सरल्यावीण सहजी
जरा ना झुंझूनी पदरि पडले त्रिभुवन तया
शिरोपद्मांची जो चरणी रचुनि रास, भजतो
तयाला दुस्साध्य शिव न जगती ठेवत स्थिती
.
१२
.
अमुष्य त्वत्सेवा-समधिगतसारं भुजवनं
बलात कैलासेऽपि त्वदधिवसतौ विक्रमयतः
अलभ्यापातालेऽप्यलसचलितांगुष्ठशिरसि
प्रतिष्ठा त्वय्यासीद ध्रुवमुपचितो मुह्यति खलः
.
अशा लंकेशाने न स्मरत कृपा धीर करुनी
बळाने कैलासा हलवुन तुला नेऊ म्हटले
तवा पाताळाचे तळि सहज त्याला दडपले
तिथेही मोहाने तववरकृपे, तो न बधला
.
१३
.
यदृद्धिंसुत्राम्णो वरद परमोच्चैरपि सतीं
अधश्चक्रे बाणः परिजनविधेयत्रिभुवनः
न तच्चित्रं तस्मिन वरिवसितरि त्वच्चरणयोः
न कस्याप्युन्नत्यै भवति शिरसस्त्वय्यवनतिः
.
तुझ्या आशीर्वादे अधिपति असा बाण सजला
तिन्ही लोकी त्याने जय मिळवुनी राज्य रचले
तुझ्या ठायी श्रद्धा असुन मनु पूजा तव करे
तया नाही नाही अवनति मुळी ठाउक असे
.
१४
.
अकाण्ड-ब्रह्माण्ड-क्षयचकित-देवासुरकृपा
विधेयस्याऽऽसीद यस्त्रिनयन विषं संहृतवतः
स कल्माषः कण्ठे तव न कुरुते न श्रियमहो
विकारोऽपि श्लाघ्यो भुवनभयभङ्गव्यसनिनः
.
जवा ब्रम्हांडाचा क्षय समिप देवासुर जगा
त्रिनेत्राने विश्वा अभय दिधले प्राशुन विषा
तये नीळ्या कंठा मिरवत असे शंकर सदा
जगाला तो वाटे खरच जगदुद्धार करता
.
१५
.
असिद्धार्था नैव क्वचिदपि सदेवासुरनरे
निवर्तन्ते नित्यं जगति जयिनो यस्य विशिखाः
स पश्यन्नीश त्वामितरसुरसाधारणमभूत
स्मरः स्मर्तव्यात्मा न हि वशिषु पथ्यः परिभवः
.
जयाला पाहोनी तुज वगळता देव सगळे
असो वा दैत्यादी मनुज अवघे विद्ध असती
अशा कंदर्पाला दहन करुनी सिद्ध करसी
कधीही श्रेष्ठांना दुखवुन नसे श्रेय जगती
.
१६
.
मही पादाघाताद व्रजति सहसा संशयपदं
पदं विष्णोर्भ्राम्यद भुज-परिघ-रुग्ण-ग्रह- गणम
मुहुर्द्यौर्दौस्थ्यं यात्यनिभृत-जटा-ताडित-तटा
जगद्रक्षायै त्वं नटसि ननु वामैव विभुता
.
तुझ्या पादाघाते थरथरत पृथ्वी थिरकता
तुझ्या बाहून्यासे डळमळत तारे गगनिचे
जटांच्या पाशांनी पिडित तट स्वर्गास थटती
जगा रक्षिण्या तांडव करसि, डावेच तरि ते
.
१७
.
वियद्व्यापी तारा-गण-गुणित-फेनोद्गम-रुचिः
प्रवाहो वारांयः पृषतलघुदृष्टः शिरसि ते
जगद्द्वीपाकारं जलधिवलयं तेन कृतमिति
अनेनैवोन्नेयं धृतमहिम दिव्यं तव वपुः
.
जगाला द्वीपाचे रुप मिळत धारेतच जिच्या
पुर्या आकाशाला उजळत जिचे फेस उठती
अशा गंगेलाही अवतरत माथ्यावर तुझ्या
मिळे बिंदू जागा, बघुन तव देवा मिति कळे
.
१८
.
रथः क्षोणी यन्ता शतधृतिरगेन्द्रो धनुरथो
रथाङ्गे चन्द्रार्कौ रथ-चरण-पाणिः शर इति
दिधक्षोस्ते कोऽयं त्रिपुरतृणमाडम्बर विधिः
विधेयैः क्रीडन्त्यो न खलु परतन्त्राः प्रभुधियः
.
धरेला चंद्रार्का करुन विधि चाके निघतसे
धनुष्या मेरूच्या हरिस शर योजे, शिव वधे
असा काही मोठा त्रिपुर नव्हता थोर वधण्या
तरी शंभोचीही उमजत नसे काय किमया
.
१९
.
हरिस्ते साहस्रं कमल बलिमाधाय पदयोः
यदेकोने तस्मिन निजमुदहरन्नेत्रकमलम
गतो भक्त्युद्रेकः परिणतिमसौ चक्रवपुषः
त्रयाणांरक्षायै त्रिपुरहर जागर्ति जगताम
.
हरी देई डोळा कमलसहस्रा पूर्ण करण्या
तुवा भक्तीने त्या गहिवरुनी चक्र, वर दिले
भक्तिसामर्थ्याला स्मरुन दिधले अस्त्र तव ते
जगा रक्षायाला त्रिपुरहर वृत्तीच धजते
.
२०
.
क्रतौ सुप्ते जाग्रत त्वमसि फलयोगे क्रतुमतां
क्व कर्म प्रध्वस्तं फलति पुरुषाराधनमृते
अतस्त्वांसम्प्रेक्ष्य क्रतुषु फलदान-प्रतिभुवं
श्रुतौ श्रद्धांबध्वा दृढपरिकरः कर्मसु जनः
.
परीत्यागाला बा सहज फळ लाभो म्हणुन तू
सदा जागूनीया सुरस फल देसी म्हणुनही
तुझ्या विश्वासाने सुजन करण्या कर्म धजती
श्रुत श्रद्धेने ते बद्ध करण्या कार्य असती
.
२१
.
क्रियादक्षो दक्षः क्रतुपतिरधीशस्तनुभृतां
ऋषीणामार्त्विज्यं शरणद सदस्याः सुर-गणाः
क्रतुभ्रंशस्त्वत्तः क्रतुफल-विधान-व्यसनिनः
ध्रुवं कर्तुंश्रद्धा विधुरमभिचाराय हि मखाः
.
जरी होता दक्ष यजनकरता तज्ञ अगदी
ऋषींच्या साह्याने सुरगणसहाय्ये यजत तो
तरी विध्वंसूनी यजन सगळे सिद्ध करसी
विनाश्रद्धा, कर्त्या, यजनहि मुळी साधत नसे
.
२२
.
प्रजानाथं नाथ प्रसभमभिकं स्वांदुहितरं
गतं रोहिद भूतांरिरमयिषुमृष्यस्य वपुषा
धनुष्पाणेर्यातं दिवमपि सपत्राकृतममुं
त्रसन्तं तेऽद्यापि त्यजति न मृगव्याधरभसः
.
प्रजेचाही स्वामी भुलुन पद मोहात पडला
मुलीच्याही मागे फिरत वनी व्याधास दिसला
शिवा वेधूनी त्या भयचकित केले तूच जगती
स्थिती ती आकाशी मिरवत मृग होऊन विधी
.
२३
स्वलावण्याशंसा धृतधनुषमह्नाय तृणवत
पुरः प्लुष्टं दृष्ट्वा पुरमथन पुष्पायुधमपि
यदि स्त्रैणं देवी यमनिरत-देहार्ध-घटनात
अवैति त्वामद्धा बत वरद मुग्धा युवतयः
.
स्वसौंदर्यगर्वे मदन सजला युद्ध करण्या
तया पाहूनी त्वा त्वरित वधिले भस्म उरण्या
उमेला मोहूनी शिव वसवि अंगात अरध्या
असे नाही, त्याचेवरचि युवती मुग्ध असती
.
२४
.
श्मशानेष्वाक्रीडा स्मरहर पिशाचाः सहचराः
चिता-भस्मालेपः स्रगपि नृकरोटी-परिकरः
अमङ्गल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं
तथापि स्मर्तॄणांवरद परमं मङ्गलमसि
.
स्मशानीची क्रीडा, स्मरहर पिशाच्चे सहचरे
चिताभस्मालेपासहित नरमुंडे तव गळा
अशूभाची शीले तव असत नावात सगळ्या
तरीही मानाने शुभकर असा तूच अससी
.
२५
.
मनः प्रत्यक चित्ते सविधमविधायात्त-मरुतः
प्रहृष्यद्रोमाणः प्रमद-सलिलोत्सङ्गति-दृशः
यदालोक्याह्लादं ह्रद इव निमज्यामृतमये
दधत्यन्तस्तत्त्वं किमपि यमिनस्तत किल भवान
.
जरी प्राणायामे विधिवत तुझा ध्यास धरुनी
यशाच्या आनंदे स्फुरित अश्रु गाळीत जगी
तुला पाहोनीही अनुभवत सौख्यामृतमयी
अशा सर्वांचे ईप्सितच शिवा काय नससी
.
२६
.
त्वमर्कस्त्वं सोमस्त्वमसि पवनस्त्वं हुतवहः
त्वमापस्त्वं व्योम त्वमु धरणिरात्मा त्वमिति च
परिच्छिन्नामेवं त्वयि परिणता बिभ्रति गिरं
न विद्मस्तत्तत्त्वं वयमिह तु यत् त्वं न भवसि
.
शिवा सूर्य, चंद्र, पवन, अनली, तूच अससी
जले तू, आकाशी, अवनिभरही, तूच गमसी
असे छोटे मोठे, विवरण तुझे, नांदत इथे
जिथे तू नाही ते, स्थळ नच अम्हा ज्ञात असते
.
२७
.
त्रयींतिस्रो वृत्तीस्त्रिभुवनमथो त्रीनपि सुरान
अकाराद्यैर्वर्णैस्त्रिभिरभिदधत तीर्णविकृति
तुरीयं ते धाम ध्वनिभिरवरुन्धानमणुभिः
समस्त-व्यस्तं त्वांशरणद गृणात्योमिति पदम
.
तिन्ही वेदं, वृत्ती, भुवनत्रय, ते देव तिनही
तया योगे होई अ उ म च ध्वनी स्थानक तुझे
तया ओंकारी हे शब्द तिनहि वास करती
समस्तांचे व्यस्त तवशरणची लोक गणती
.
२८
.
भवः शर्वो रुद्रः पशुपतिरथोग्रः सहमहान
तथा भीमेशानाविति यदभिधानाष्टकमिदम
अमुष्मिन प्रत्येकं प्रविचरति देव श्रुतिरपि
प्रियायास्मैधाम्ने प्रणिहित-नमस्योऽस्मि भवते
.
तुझी देवा नावे, भव, शर्व, अतीऊग्र, असती
महादेवा, भीमा, पशुपति, असे लोक म्हणती
रुद्रा ईशाना वा म्हणुन सर्व वेदांत वससी
अशा शंभो माझे नमन चरणी सादर असे
.
२९
.
नमो नेदिष्ठाय प्रियदव दविष्ठाय च नमः
नमः क्षोदिष्ठाय स्मरहर महिष्ठाय च नमः
नमो वर्षिष्ठाय त्रिनयन यविष्ठाय च नमः
नमः सर्वस्मै ते तदिदमतिसर्वाय च नमः
.
नमू या प्रीयाला विजनवनप्रीयास नमु या
नमू या सूक्ष्माला स्मरहर शिवा खास नमु या
नमू या वृद्धाला त्रिनयन युवा त्यास नमु या
नमू या ज्ञात्याला सकललयकर्त्यास नमु या
.
३०
.
बहुल-रजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः
प्रबल-तमसे तत संहारे हराय नमो नमः
जन-सुखकृते सत्त्वोद्रिक्तौ मृडाय नमो नमः
प्रमहसि पदे निस्त्रैगुण्ये शिवाय नमो नमः
(हरिणीः १७- न स म र स लगा, यतीः ६,४,७)
.
जग रज वृत्ते साकारीसी, प्रजापति तू भवा
तम गुण कृते संहारीसी, तुला म्हणती हरा
सत्व गुण रुपे सांभाळाया, विश्वा अससी मृडा
त्रय गुण निर्गुणी वंदू या, तुला नमु या शिवा
(हरिणीः १७- न स म र स लगा, यतीः ६,४,७)
.
३१
.
कृश-परिणति-चेतः क्लेशवश्यं क्व चेदं
क्व च तव गुण-सीमोल्लङ्घिनी शश्वदृद्धिः
इति चकितममन्दीकृत्य मांभक्तिराधाद
वरद चरणयोस्ते वाक्य-पुष्पोपहारम
(मालिनीः १५- न न म य य, ८,७)
.
जडतर मन माझे, पार शोधी गुणांचा
कुठवर शिव सीमा, ठाव घे मी भवाचा
परि चकित मनाला थांग नाही कळाला
वरद चरणि वाहू वाक्यपुष्पे तयाला
(मालिनीः १५- न न म य य, ८,७)
.
३२
.
असित-गिरि-समं स्यात कज्जलं सिन्धु-पात्रे
सुर-तरुवर-शाखा लेखनी पत्रमुर्वी
लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं
तदपि तव गुणानामीश पारं न याति
(मालिनी)
.
करुन दउत सिंधू, मेरुच्या तुल्य शाई
करुन सुरतरूची लेखणी, पत्र भू ही
सरस्वति लिहि स्तोत्रे, सारखी सर्वकाळ
स्तवन तरि न शंभो संपते, तू अकाल
(मालिनी)
.
३३
.
असुर-सुर-मुनीन्द्रैरर्चितस्येन्दु-मौलेः
ग्रथित-गुणमहिम्नो निर्गुणस्येश्वरस्य
सकल-गण-वरिष्ठः पुष्पदन्ताभिधानः
रुचिरमलघुवृत्तैः स्तोत्रमेतच्चकार
(मालिनी)
.
सुर असुर मुनींनी अर्चिला चंद्रमौली
लिहित गुण महीमा निर्गुणी विश्वव्यापी
निरुपण गणमुख्ये पुष्पदन्ते रचीले
सुरस कथन केले र्हस्व आवर्तनांते
(मालिनी)
.
३४
.
अहरहरनवद्यं धूर्जटेः स्तोत्रमेतत
पठति परमभक्त्या शुद्ध-चित्तः पुमान यः
स भवति शिवलोके रुद्रतुल्यस्तथाऽत्र
प्रचुरतर-धनायुः पुत्रवान कीर्तिमांश्च
(मालिनी)
.
स्मरत स्तवनरूपे जो जटाशंकराला
स्वच्छ मन करुनी जो भजे शंभु त्याला
समजति शिवलोकी रुद्रतुल्य, इथेही
सधन, सपुत, दीर्घायू सुकीर्तीत होई
(मालिनी)
.
३५
.
महेशान्नापरो देवो महिम्नो नापरा स्तुतिः
अघोरान्नापरो मन्त्रो नास्ति तत्त्वं गुरोः परम
(अनुष्टुप्)
.
महेशापरी देव, महिम्नापरी नसे स्तुती
शिवासम नसे मंत्र, नचतत्त्व गुरूपरी
(अनुष्टुप्)
.
३६
.
दीक्षा दानं तपस्तीर्थं ज्ञानं यागादिकाः क्रियाः
महिम्नस्तव पाठस्य कलांनार्हन्ति षोडशीम् (अनुष्टुप्)
.
दीक्षा, दान, तप, तीर्थ, ज्ञान, याग करूनही
महिम्नपाठे जे लाभे, ते न सोळा कळी मिळे (अनुष्टुप्)
.
३७
.
कुसुमदशन-नामा सर्व-गन्धर्व-राजः
शशिधरवर-मौलेर्देवदेवस्य दासः
स खलु निज-महिम्नो भ्रष्ट एवास्य रोषात
स्तवनमिदमकार्षीद दिव्य-दिव्यं महिम्नः
(मालिनी)
.
पुष्पदंत गंधर्वांचा राज राजेंद्र साचा
चंद्र शिखरि धरी त्या, दास तो ईश्वराचा
गतमहिम्न जहाला, ईश्वरी कोप होता
दिव्य स्तवन शिवाचे तोच निर्मून गेला
(मालिनी)
.
३८
.
सुरगुरुमभिपूज्य स्वर्ग-मोक्षैक-हेतुं
पठति यदि मनुष्यः प्राञ्जलिर्नान्य-चेताः
व्रजति शिव-समीपं किन्नरैः स्तूयमानः
स्तवनमिदममोघं पुष्पदन्तप्रणीतम
(मालिनी)
.
सुरगुरूमुनिपूज्य स्वर्ग मोक्षास मार्ग
पठण करि स्वभावे हात जोडून रोज
कुसुमदशन स्तोत्र किन्नरां गानयोग्य
वसत शिवसमीपे, तो सदा दीर्घकाळ
(मालिनी)
.
३९
.
आसमाप्तमिदं स्तोत्रं पुण्यं गन्धर्व-भाषितम
अनौपम्यं मनोहारि शिवमीश्वरवर्णनम्
(अनुष्टुप्)
.
समाप्त होतसे स्तोत्र गंधर्वरचित ते हे
अनुपम मनोहारी पवित्र ईश वर्णन
(अनुष्टुप्)
.
४०
.
इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्कर-पादयोः
अर्पिता तेन देवेशः प्रीयतांमे सदाशिवः
(अनुष्टुप्)
.
असो ही वाङ्मयी पूजा शंकराचरणी रुजू
आवडो तुज देवेशा, प्रसन्न तू होई मला
(अनुष्टुप्)
.
४१
.
तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर
यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः
(अनुष्टुप्)
.
तुझे तत्त्व न जाणे मी, कसा तू असशी शिवा
जसा तू असशी देवा, तशा तुज मी वंदितो
(अनुष्टुप्)
.
४२
.
एककालं द्विकालं वा त्रिकालं यः पठेन्नरः
सर्वपाप-विनिर्मुक्तः शिव लोके महीयते
(अनुष्टुप्)
.
एकवार द्विवारं वा, त्रिवार म्हणता नर
सर्वपाप हरूनीया, शिवलोकी सुखे वसे
(अनुष्टुप्)
.
४३
.
श्री पुष्पदन्त-मुख-पङ्कज-निर्गतेन
स्तोत्रेण किल्बिष-हरेण हर-प्रियेण
कण्ठस्थितेन पठितेन समाहितेन
सुप्रीणितो भवति भूतपतिर्महेशः
(वसंततिलका)
.
श्री पुष्पदन्तरचिता स्तुति ही शिवाची
पापा हरेल, शिवप्रीय, स्तुति शंकराची
जो जो स्मरे, मनन, गान करेल भावे
होई प्रसन्न शिवशंकर त्या, स्वभावे
(वसंततिलका)
.
४४
.
॥ इति श्री पुष्पदन्त विरचितं शिवमहिम्नःस्तोत्रं समाप्तम् ॥
.
॥ पुष्पदंत विरचित शिवमहिम्न स्तोत्र समाप्त ॥
शिवमहिम्न स्तोत्राचा मराठी समश्लोकी अनुवाद
अभिनंदन श्री. गोळेसर
_/\_
वा! सुरेख!
प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद
बोल बम , बोल बम ,बोल बम , हर हर महादेव, बोल बम , बोल बम ,बोल बम