अनवट किल्ले २९: राजदेहेर उर्फ ढेरी ( Rajdeher, Dheri )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
16 Mar 2018 - 11:10 am

जळगाव जिल्हा हा काही डोंगरी किल्ल्यांसाठी प्रसिध्द नाही. पण या जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवर अजिंठा रांग धावते. या रांगेच्या दक्षिणेला औरंगाबाद जिल्हा आहे. या रांगेत अंतुर, लोंझा, सुतोंडा, जंजाळा, वेताळवाडी असे डोंगरी गड आहेत. पुढे यांची माहिती आपण घेणारच आहोत. पण आज एक छोट्याशा पण निसर्गसंपन्न अश्या डोंगरी किल्ल्याची सैर करायची आहे. चाळीसगाव तालुक्यात चाळीसगावच्या आग्नेयेला असलेला राजदेहेर हा गड आपली वाट पहातोय. चला तर मग.
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमटोकाशी अजिंठा-सातमाळा या अतिशय महत्वाच्या आणि अनेक दुर्गम गड असणार्‍या रांगेची सुरवात होते. नाशिक जिल्ह्यात माणिकपुंज या छोट्या टेकडीवजा गडाजवळ सातमाळा रांग संपते आणि अजिंठा रांग सुरु होते. या रांगेतील पहिला मानकरी म्हणजे हा "राजधेर उर्फ ढेरी". वास्तविक सातमाळा रांगेत राजदेहेर, कोळदेहेर आणि ईंद्राई असे त्रिकुट आहे. बरेच दुर्गभटके त्याला भेट देतात.
पण त्याच बलंदड राजदेहेरेशी नामसाधर्म्य असणारा हा राजदेहेर तुलनेने उपेक्षित आहे. दोनडोंगरांच्या मधे असलेल्या घळीतून किल्ल्याचा प्रवेश ठेऊन स्थापत्यकाराने किल्ल्यावर चालून येणारा शत्रू दोनही डोंगरावरुन मार्‍याच्या टप्प्यात राहिल अशी केलेली योजना, पायथ्याचे प्राचीन पण आता जीर्णोध्दार केलेले मंदिर, आश्रम, गडावरचे खांब टाके, कोरीव टाक्यांची मालिका, कातळकोरीव मार्ग अश्या, या पूरातन किल्ल्यावर आजही पहाण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.
फारश्या परिचित नसलेल्या या गडावर जायला तीन मार्ग आहेत.
१ ) चाळीसगाव- नांदगाव रस्त्यावर रोहिणी नावाचे गाव आहे. या गावात उतरुन सहा कि.मी.ची पायपीट करुन राजदेहेर गाठता येतो. चाळीसगाववरुन सकाळी ८.००, १२.०० व दुपारी ३.०० अश्या बसेस थेट पायथ्याच्या राजदेहेरवाडी या गावापर्यंत आहेत.
२ ) चाळीसगाव किंवा नांदगावमधून न्यायडोंगरी नावाचे गाव गाठून तिथून चालत राजदेहेरला जाता येते. न्यायडोंगरी व रोहिणी हि छोटी रेल्वेस्थानके आहेत. अर्थात इथे फक्त पॅसेंजर थांबतात. वेळेत असेल तर रेल्वेने जाणेही शक्य आहे.
३ ) औरंगाबाद -बोलठाण-जातेगाव मार्गे एक रस्ता न्यायडोंगरीला जातो. या रस्त्यावरुन आत पिनाकेश्वर महादेव मंदिरापासून एक डोंगरवाट थेट राजदेहेरकडे उतरते. पेडका किल्ला पाहून राजदेहेर बघायचा असल्यास आणि अजिंठा रांगेचे सौंदर्य पायगाडीवर स्वार होउन पहाण्यास खास दुर्गभटक्यांसाठी हि वाट आहे.
आम्ही मात्र मालेगाववरुन नांदगाव गाठले. मात्र चाळीसगावसाठी लवकर बस नव्हती, तसेच खाजगी वाहनेही या मार्गावर नव्हती. अखेरीस बस आली आणि वाटेत माणिकपुंज हा छोटा गड मगे टाकून नस्तनपुरची गढी गाडीतूनच पाहिली. नस्तनपुरला शनिमंदिर आहे. मात्र शनिशिंगणापुर इतके ते प्रसिध्द नाही. न्यायडोंगरी गावात बस पोहचली तेव्हा काहीतरी तंटाबखेडा झाल्याने गर्दी उसळली होती. गावात अश्या प्रसंगी बरेच रिकामटेकडे प्रेक्षक म्हणून हजर असतातच. बहुतेक न्यायडोंगरीतच काहीतरी अन्याय झाला असावा. अखेरीस रोहिणीला उतरलो. मात्र गडापर्यंत जायला तब्बल सहा कि.मी.चा डांबरी रस्ता तुडवायचा होता. बस अजून तासभर तरी येणार नव्ह्ती. नाईलाजाने आम्ही चालायला सुरवात केली.
Rajdeher1
राजदेहेरवाडी गावाच्या मागच्या बाजुला अजिंठा रांगेचे डोंगर दिसत होते.
Rajdeher2
जवळपास दिड तास चालून एकदाच्या पायथ्याच्या गंगानंदगिरी महाराजांच्या आश्रमात पोहचलो. इथे पुर्वी महादेवाचे प्राचीन मंदिर होते. मात्र ते उध्वस्त झाल्याने नव्याने बांधून काढले आहे.
Rajdeher3
इथे थोडी विश्रांती घेउन आम्ही निघालो.
Rajdeher4
एक मातीचा कच्चा रस्ता गडाकडे निघाला त्याची सोबत घेउन आम्ही निघालो. पार्श्वभुमीवर एखाद्या सुळक्यासारखा राजदेहेर दिसत होता.
Rajdeher5
वाटेत एक ओढा आडवा आला. त्याला ओलांडताना उडी मारताना माझा अंदाज चुकला आणि बुट पाण्याने ओले करुन घेतले. पावसाळी ट्रेकमधे अशा गमती जमती होतच असतात.
Rajdeher7
यानंतर एक आश्रम आला. बाबांचे नाव समजु शकले नाही. पण ते मौनात होते. खाणाखुणाद्वारेच सगळा संवाद चाललेला. आश्रमात एक शिवमंदिर होते.
Rajdeher6
एका बाजुला पादुका होत्या. आम्ही दर्शन घेउन गडाकडे निघालो.
Rajdeher8
मगाचा ओढा पुन्हा आडवा आला. यावेळी तो दगडावरुन नीट ओलांडला. पुढे एक गुराखी मामा भेटले. रामराम करुन रस्ता विचारला, तो त्यांनी डाव्या रस्त्याने न जाण्याचा सल्ला दिला. अजूनही पावसाळा न सरल्याने त्या वाटेवर असलेला रॉकपॅच ओला होता, त्यामुळे तिकडून जाउ नका असा खर तर योग्य सल्लाच त्या मामांनी दिला होता. मात्र पुन्हा हा किल्ला बघायला येण्याची शक्यता शुन्य असल्याने आम्ही हिच वाट निवडली.
Rajdeher9
( राजदेहेर नकाशा आंतरजालावरुन साभार )
Rajdeher10
राजदेहेर परिसराचा आंतरजालावरुन घेतलेला नकाशा.

शक्यतो एखादा किल्ला उपलब्ध असलेल्या सगळ्या वाटांनी पहाण्याचा माझा कटाक्ष असतो. इथे राजदेहेरेला पुर्वेकडून एक व पश्चिमेकडून एक अशा दोन वाटा आहेत. दोन्ही वाटा पहाण्याचे ठरले. नकाशात दाखविलेल्या काळ्या बाणाने दाखविलेल्या वाटेने आम्ही चढलो आणि पिवळ्या बाणाने दाखविलेल्या वाटेने खाली उतरलो.
Rajdeher11
या रस्त्याने जाताना एका ठिकाणी उजवीकडे वाट फुटली होती. हिच ती दुसरी वाट.
Rajdeher12
डाव्या हाताला भव्य कातळकडा दिसत होता आणि त्यावर चरणारी गुरे दिसत होती. पुढे एक माकडाची टोळी शांतपणे या कड्यावरुन जाताना दिसली.
Rajdeher13
वाट हळूहळू पण दमदारपणे वर चढत होती. खाली ओढ्याच्या पाण्याचा आवाज येत होता. मात्र ऑगस्टच्या उन्हाने हाश्शहुश्श्स सुरु झाले.
Rajdeher14
ईतकावेळ दक्षिणेकडे चढणारी वाट ३६० अंशात वळून गडाच्या दिशेने चढली होती.याच डोंगराच्या माथ्यावर पिनाकेश्वर महादेव मंदिर आहे.
Rajdeher15
या वाटेवर मला एक गुंजांचे झाड दिसले. वास्तविक पुर्ण लाल रंगाची बी मी गुंज म्हणून गणपतीपुळ्याला पाहिली होती आणि हि काळी-लाल रंगाची बी सुध्दा गुंज म्हणून ओळखली जाते. नक्की कोणती गुंज हे मलातरी माहिती नाही. सापडतील तेवढ्या गुंजा गोळा करुन सॅकमधे एका पिशवीत ठेवल्या. असेच झाड मला पालघर जिल्ह्यातील कोहोजच्या पायथ्याशी दिसले होते. पण एकुणच आपल्याला वनस्पतीचे ज्ञान गुंजभरही नाही हे कळाले.
Rajdeher16
आता हा समोरचा कडा चढला कि आम्ही माथ्यावर पोहचणार होतो.
Rajdeher17
अर्थात त्यासाठी वाटेत एक रॉकपॅच चढायचा होता.
Rajdeher18
एरवी हा पॅच तुलनेने सोपा आहे. मात्र सरत्या पावसाच्या माराने तो काहीसा शेवाळला होता आणि थोडा धोकादायकही झाला होता. आत्ता कुठे त्या मामांचे बोलणे आम्हाला पटले. पण आता खुप उशीर झाला होता. पुन्हा उतरुन दुसर्‍या मार्गे चढणे म्हणजे बराच वेळ वाया गेला असता.
Rajdeher19
अखेरीस हिय्या करुन मी वर चढलो आणि कुठे पकडी आहेत ते समजावून घेतले. पुन्हा खाली उतरुन सोबत्यांना धीर दिला आणि आधार देत वर चढवले.
Rajdeher20
हुश्श ! अखेरीस पोहचलो. मागे आम्ही किती वाट चढुन वर आलो तो परिसर दिसत होता.
Rajdeher21
माथ्याच्या दिशेने निघालो, तो गडपणाच्या काही खुणा दिसु लागल्या. तटबंदी तुटक होती, पण बर्‍या अवस्थेत होती.
Rajdeher22
पाण्याची कातळकोरीव टाकी दिसली, पण पाणी अर्थातच खराब आहे.
Rajdeher23
एक वळण घेतले आणि समोर अथांग वनराजी पसरलेली अजिंठा रांग दिसली. लांबवर एक धबधबा पुर्ण बहरात पडत होता.गडाच्या पायथ्याच्या महादेव मंदिरापासून निघाल्यावर तासाभरातच गडमाथ्यावर पोहचलो देखील.
Rajdeher24

Rajdeher25

Rajdeher26
जवळच व्यालमुख असलेले दोन भग्न स्तंभ पडलेले दिसतात.
Rajdeher27
प्रवेशद्वाराच्या थोड्या वरच्या अंगाला दगडात खोदलेले रिकामे लेणं आहे.
Rajdeher28
माथ्यावर अनेक शिल्प आणि ईतर कोरीवकाम असलेले दगड आहेत.
Rajdeher29
त्रिकोणी आकाराचा माथा उत्तरेकडे झेपावला होता.
Rajdeher30

Rajdeher31
या शिवाय गडावर काही कोरीव गुंफाही दिसतात.
Rajdeher32
येथून पुढे गेल्यावर एक गुहा व ४ खांबी टाक आहे.गडावर असलेले हे खांब टाके किल्ल्याचे प्राचीनत्व अधोरेखीत करत होते.
Rajdeher33
एकंदरीतच या गडावर पाण्याची आणि अन्नधान्य साठवण्याची पुरेशी व्यवस्था केलेली दिसते.
Rajdeher34
त्याच्या बाजूस एक गुहा व पाण्याच टाक आहे.
Rajdeher35

Rajdeher36
गडावर गुहा असली तरी मुक्कामाच्या दृष्टीने सोयीची नाही. तसाही हा किल्ला पहाणे अर्ध्या दिवसात शक्य होते. पण तरीही मुक्कामाची वेळ आल्यास पायथ्याशी असलेल्या गंगानंदगिरी महाराजांच्या आश्रमात होउ शकेल. गडावर पाण्याची बरीच टाकी असली तरी पाणी पिण्यायोग्य नाही. सहाजिकच ईथे जायचे म्हणजे ऑगस्ट ते फेब्रुवारी या काळातच गेलेले चांगले.
Rajdeher37

Rajdeher38
गडाच्या माचीवर साचपाण्याचा तलाव असून त्याच्या बाजूलाच नंदी व पिंड उघड्यावर पडलेले आहेत. तलावावरुन पुढे गेल्यावर दगडात खोदलेल्या पादूका पहायला मिळतात.
Rajdeher39
मस्त भर्राट वार्‍याने सगळ्या चालण्याचा आणि चढण्याचा शीण हलका केला. टोकाशी निघालो आणि निवांत आसमंत पहात बसलो. गडमाथा जवळपास ४४१० फुट उंचावर आहे.एकंदरीतच खानदेशाच्या फार मोठ्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी हि उत्तम जागा हे निसंशय.स्वच्छ हवेत लांब वायव्येला गाळणा टेकड्या दिसतात. मात्र हवा ढगाळ असल्याने त्या दिसल्या नाहीत.
प्राचीन अवशेष वागवणार्‍या या गडाच्या ईतिहासात डोकावल्यास राजदेहेर हा किल्ला गवळीकालीन किंवा यादव पूर्वकालीन असावा. इ.स. १००० ते १२१६ पर्यंत निकुंभांची या भागावर सत्ता होती. पाटणे या राजधानी जवळच हा किल्ला असल्यामुळे लष्करीदृष्ट्या महत्वाचा असावा. इ.स. १२१६ - १७ च्या सुमारास यादवांनी हा किल्ला ताब्यात घेतला. यादवानंतर अल्लाऊद्दीन खिलजीकडे व त्यानंतर फारुकींकडे हा किल्ला होता. इ.स. १६०१ मध्ये खानदेश सुभा मुघलांकडे गेला त्यावेळी भडगावच्या रामजीपंतांनी अशिरगडच्या वेढ्यात चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांना जहागिरी देण्यात आली, त्यात राजदेहेर किल्ल्याचा समावेश होता.शिवकालीन पत्रात या किल्ल्याचा उल्लेख नाही, पण १०९ कलमी बखरीत शिवाजीमहाराजांच्या किल्ल्यांच्या यादीत या किल्ल्याचा समावेश केला आहे. कदाचित १६७० च्या दरम्यान हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. पुढे १७५२ च्या भालकीच्या तहात निजामाकडून हा भाग पेशव्यांनी घेतला. इ.स. १७६२ मध्ये माधवराव पेशव्यांनी राजदेहेर किल्ला विठ्ठल शिवदेव विंचुरकर यांच्याकडे सोपवून १० हजार रुपयांचा सरंजाम किल्ल्याला मंजूर केला. हि सनद देताना अशी अट ठेवली होती कि शिबंदीचा खर्च शक्य तितका कमी ठेवावा किमान मागील खर्चापेक्षा वाढु नये. या दहा हजार रुपयातच गडाची डागडु़जी करावी. यासाठी वेगळा खर्च दिला जाणार नाही. पुढे १६६४ मधे पेशव्यांनी खानदेशचा सरसुभेदार नारो कृष्ण याला पत्र पाठवून, " राजदेहेर किल्ला कोणत्या अवस्थेत आहे तसेच त्यावर कोणत्या वस्तु आहेत याची यादी पुण्याहून पाहणी करण्यासाठी आलेल्या कारकुनास देण्यास सांगितले होते.
इ.स. १७६४ मध्ये चाळीसगावचे जहागिरदार जगजीवनराम व माधवराव या पवार बंधूंनी बंड केल्यावर दुसर्‍या बाजीरावाने विठ्ठलराव विंचूरकर यांना चाळीसगावावर पाठविले. त्यांनी पवारांचे बंड मोडून राजदेहेर ताब्यात घेतला.
ईंग्रजांनी हा गड कसा ताब्यात घेतला याची हकिगत अतिशय रोचक आहे. लेफ्टंनट कर्नल मॅकडॉवेल हा औरंगाबादमार्गे एप्रिल १८१८ मधे चांदवड येथे आला व १० एप्रिल १८१८ ला चांदवडचा किल्ला त्याने घेतला. पण या भागातील बाकीचे गड ब्रिटीशांच्या ताब्यात देण्यासाठी मराठे तयार नव्हते. मॅकडॉवेल या किल्ल्याच्या पायथ्याशी आला व मुकाट्याने गड ताब्यात देण्याचा निरोप त्याने किल्लेदाराला, निकम देशमुखांना पाठवला. पण हा निरोप किल्लेदार व आतल्या अरबी सैनिकांनी हा निरोप धुडकावून लावला व आतून गोळीबार व जेजल्याचा मारा सुरु केला. नाईलाजाने ईंग्रजांना लढाईची तयारी करावी लागली. ठिकठिकाणी मोर्चे बसवून ११ एप्रिलला ईंग्रजानी तोफा डागायला सुरवात केली. १२ एप्रिलला ते आणखी पुढे सरकले. किल्ल्यावरच्या सैनिकांनी पुढे येउन ब्रिटीशांवर मारा सुरु केला, पण फारसा उपयोग झाला नाही. म्हणून मराठ्यांनी ब्रिटीशांकडे निरोप पाठवला कि ते जर सैनिकांचे थकलेले पगार देणार असतील तर किल्ला त्यांच्या हवाली केला जाईल. मात्र ब्रिटीशांनी हि अट नाकारली, फक्त सैनिकांचे वैयक्तिक धन घेउन जाण्यास परवानगी दिली. व आतील सैनिकांना निर्णय घेण्यास दोन तासाचा अवधी दिला. याचा काही उपयोग झाला नाही. म्हणून ईंग्रजांनी शेजारच्या टेकडीवर तोफा चढवून किल्ल्यावर मारा करायचे ठरले. यापुर्वी हा प्रयोग बर्‍याच ठिकाणी यशस्वी झाला होता. मात्र टेकडीवर तोफ नेणे अवघड होते. यासाठी तोफेचे सुट्टे भाग करुन टेकडीवर नेले व तिथे जोडून रात्री नउ वाजता तोफ मार्‍याला सज्ज झाली. सर्व तयारी झाल्यानंतर तोफगोळ्यांचा मारा सुरु झाला. एक तोफगोळा दारुकोठारावर पडला आणि ज्याच्या जीवावर गड लढवायचा तेच नष्ट झाले. सहाजिकच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेउन सैनिक निघून गेले. दुसर्‍या दिवशी म्हणजे बहुधा १५ एप्रिल १८१८ला जेव्हा ब्रिटीशांच्या ताब्यात गड आला तेव्हा जिवंत ४० माणसे, पाच मृत व्यक्ती, १२ तोफगोळे आणि खजिना हातात पडला.
Rajdeher40
हा वीरश्रीपुर्ण ईतिहास आठवला. समोर एक तळे दिसत होते. त्याला श्रावणबाळाचे तळे म्हणतात. पुर्वी राजदेहेर गावाभोवती तटबंदी होती आणि हे तळे मोठे होते. आता मात्र हे तळे खुपच आटून गेले आहे असे म्हणतात.
Rajdeher41
मुख्य गड पाहून शेजारच्या टेकडीवर गेलो. तिथून गडाचे संपुर्ण दर्शन होत होते. तिथे एक लेणे कोरले होते. ईंग्रजांनी शेवटच्या युध्दात ईथूनच मारा केला. पाच वाजता शेवेटची बस होती. घड्याळाचा काटा चारवर स्थिरावला होता. ईच्छा नसली तरी उतरणे भाग होते. सुरवातीला उतरण्याची वाट सापडली नाही. पण थोडी शोधाशोध केल्यावर मळलेली वाट बरोबर सापडली. काहीशा खड्या असलेल्या वाटेवरून तुफान वेगाने खाली उतरलो. आणि महादेव मंदिरात शांतपणे डोळे मिटून पडलो. पंधरा मिनीटातच एस.टी.चा परिचित खडखडाट आणि ईंजिनाची गुरगुर एकु येउ लागली आणि एक अस्सल खानदेशी ट्रेक संपल्याची कल्पना येउन आम्ही कपडे झटकत स्टॉपकडे पळालो.

( टिपः- काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार)

तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भग्रंथः-
१) जळगाव जिल्हा गॅझेटियर
२ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
३ ) उपेक्षित दुर्गांचा ईतिहास- प्रा.डॉ. जी.बी. शहा.
४ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
५ ) http://yash-gaikwad.blogspot.in हि वेबसाईट

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

16 Mar 2018 - 1:43 pm | जयंत कुलकर्णी

मस्तच !

नकाशा ट्रेक्षितिजचा आहे का?

दुर्गविहारी's picture

16 Mar 2018 - 8:20 pm | दुर्गविहारी

मलाही गुगलवर शोधताना सापडला. पण ट्रेकक्षितीजचाच असावा. खुप अचुक वाटला, त्यामुळे नवीन तयार न करता हाच वापरला.

तेजस आठवले's picture

16 Mar 2018 - 8:29 pm | तेजस आठवले

गुंजेच्या झाडांचा आणि पाला, बिया यांचा फोटो टाकता आला तर उत्तम. माझ्या माहितीत ठाण्याच्या जेल वरून कळव्याला जाणाऱ्या रस्त्याला पूर्वी एक गुंजेचे झाड होते.
बाकी ट्रेक सोप्पा वाटतोय. पु.ले.शु.

दुर्गविहारी's picture

17 Mar 2018 - 11:10 am | दुर्गविहारी

मुळात फोटोत दाखविलेल्या बियांनाच गुंज म्हणतात का, या विषयी माझ्या मनात गोंधळ आहे. आणि या झाडाचा पुर्ण फोटो मी काढला नाही. त्यामुळे अधिक सांगता येणार नाही. एखादी तज्ञ व्यक्तीच सांगु शकेल.
बाकी प्रतिसादाबध्दल धन्यवाद.

तेजस आठवले's picture

20 Mar 2018 - 2:31 pm | तेजस आठवले

ह्या गुंजाच आहेत. मला ऑफिस मधून फोटो दिसला नव्हता.आता घरून बघितला. पूर्वी ह्याच्या वजनाला सोने मोजण्याचे परिमाण म्हणत असत. गुंजभर सोने.

किल्लेदार's picture

22 Mar 2018 - 12:59 am | किल्लेदार

गुंजभर सोन्याचा तर संबंध नाही पण गुंजभर पाला मात्र फार गोड लागतो. लहानपणी याचा वेल मी घरात लावला होता. लेडी-बग सारख्या लहान लहान बिया जमवताना आणि कोवळा पाला खाताना मजा यायची. आजही बरेच पानवाले याचा सुकलेला पाला मसाला पानात घालतात.

बाकी लेख मस्त.

कपिलमुनी's picture

16 Mar 2018 - 9:22 pm | कपिलमुनी

गवळीकालीन म्हणजे नक्की कोणता काळ ?

खानदेश परिसरात हे गवळी राजघराणे राज्य करीत होते. भामेर, लळींग, चाळीसगाव जवळचा कणेरागड हा यांच्या अखत्यारीतील प्रदेश. कणेरागड सोडून बाकीच्या किल्ल्यांविषयी या मालिकेत मी आधी लिहीले आहेच.
खानदेशाच्या ईतिहासाविषयक अधिक माहिती या दुव्यात सापडेल.
Khandesh History

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Mar 2018 - 11:49 am | ज्ञानोबाचे पैजार

हा ही किल्ला आवडला.
पैजारबुवा,

प्रचेतस's picture

18 Mar 2018 - 9:49 am | प्रचेतस

मस्त सफर.
किल्ला निःसंशय प्राचीन दिसतोय, अवशेषही पुष्कळ आहेत.

निशाचर's picture

20 Mar 2018 - 5:05 am | निशाचर

मस्त भटकंती

वरील पुस्तकात डॉ अजीत जोशींनी शिवाजी महाराजांच्या परत येण्याच्या धामधुमीत ते तिथे आले असावेत असे सुचवले आहे. मनोहर गड म्हणजे तोच राजदेहेर चा किल्ला असावा असे त्यांनी शोध करून म्हटले आहे...
ते आपल्या वाचनात आले असेल तर त्यावर लिहिले जावे.

आपण उल्लेख केलेले पुस्तक मी वाचलेले नाही. पण तरीही वरील माहिती चुकीची वाटते. एकतर हा संपुर्ण प्रदेश तात्कालीन खडकी ( म्हणजे सध्याचे औरंगाबाद/ संभाजीनगर ) या परगण्यात येत होते. हा परिसर मोगलांच्या ताब्यात होत्या. महाराज आग्र्याहून सुटका करुन नेमके कोणत्यामार्गे परतले हे अजुनही गुढच आहे.
तुम्ही जो मनोहरगडाचा उल्लेख केलेला आहे, तो सावंतवाडीजवळचा मनोहर-मनसंतोषगड असण्याची शक्यता आहे. आग्र्यावरुन सुटका झाल्यानंतर महाराज ११ एप्रिल ते १२ मे १६६७ या दरम्यान रांगणा किल्ल्याचा वेढा ( व्यंकोजी राजे भोसले या वेढ्यात होते ) उठविण्यात गुंतले होते. पुढे १३ मे १६६७ ते १५ जुन १६६७ या काळात ते मनोहरगडावर राहिले होते.
रजदेहेर उर्फ ढेरी किल्ला कधीही स्वराज्यात नसल्याने शिवाजी महाराज राजदेहेरवर रहाण्याचा प्रश्नच येत नाही.

शशिकांत ओक's picture

22 Mar 2018 - 10:58 am | शशिकांत ओक

माझ्याकडून अनवधानाने रादजदेहेर असे लिहिले गेले ते कौल देहेर असे आहे . नजरचुकीबद्दल क्षमस्व....
तरीही कौलदेहेर म्हणजेच मनोहर गड हा दावा लेखक डॉ अजीत जोशींचा राहतोच... आग्र्याहून सुटका या मी केलेल्या पुस्तक परिचयात यावर सविस्तर भाष्य करता येणे शक्य नव्हते ... पुस्तक विकत घेऊन ते संदर्भ म्हणून वाचणे पटकन जमणार नसल्याने त्या ऐवजी काही पुस्तकातील खालीलमजकूर सादर करत आहे....
एकंदरीत विषयवस्तूला बाधक ते कसे आहे किंवा नाही यावर नंतर विचार करता येऊ शकतो....

184 पान

पान 185

दुर्गविहारी's picture

22 Mar 2018 - 1:58 pm | दुर्गविहारी

सर्वप्रथम आपण पुस्तकाचा पानचा स्क्रिनशॉट दिल्याबध्दल आभार. आता पुस्तक वाचायची उत्सुकता वाढली. पण पुस्तकातील मजकुराशी मी फारसा सहमत नाही. एकतर आग्र्याहून सुटका प्रकरण १६६५ मधे घडले आणि उपलब्ध माहितीनुसार कोळदेहेर १६७० च्या आसपास स्वराज्यात आला. मोगल कागदपत्रात याचा उल्लेख कौलेर असा येतो. शेजारच्या इंद्राईवरच्या शिलालेखात देखील याचा उल्लेख "कोलेर" असा येतो. मुळात शिवाजी महाराजांनी गडाची जी नावे बदलली, त्याचे कुठे ना कुठे उल्लेख आहेत, उदा-तोरण्याचा प्रचंडगड, हडसरचा पर्वतगड, चावंडचा प्रसन्नगड. मग कोळदेहेरेचा असा उल्लेख असलेला संदर्भ लेखक दाखवू शकतील काय?
दुसरा मुध्दा शिवाजी महाराज कोळदेहेरवर राहिले होते कि नाही हा मुद्दा.
यासाठी कोळदेहेरचे फोटो टाकतो. मी अद्याप कोळदेहेरे पाहीलेला नाही, त्याचे फोटो आंतरजालावरुन घेतलेले आहेत.
Koldeher1

Koldeher2

फोटो पाहिल्यास लक्षात येईल कि गडावर फार जागा नाही, शिवाय चढण्यास अत्यंत कठीण आहे. अश्या ठिकाणी शत्रु मागावर असताना मोठ्या सैन्याशिवाय रहाणे अशक्य वाटते, ते सुध्दा शेजारी राजदेहेर, ईंद्राईसारखे तुलनेने बलदंड किल्ले असताना.
तेव्हा वरील दाव्यात निदान मला तरी फारसे तथ्य वाटत नाही.

शशिकांत ओक's picture

22 Mar 2018 - 11:33 pm | शशिकांत ओक

मी पुस्तकाचा लेखक नाही. शिवाय पुस्तकाचा विषय सध्याच्या मान्य संकल्पनेला छेद देतो. म्हणून आपण ते पुस्तक संपूर्ण वाचून आपले मत बनवावे. ही विनंती. शिवाय डॉ जोशींशी फोनवर संपर्क साधून अन्य माहिती मिळवता येईल... आपल्याला मो क्र हवा असेल तर सांगा.

पुस्तक तर वाचायलाच हवे. जमल्यास पुस्तकाची सविस्तर माहिती आणि डॉ. जोशी साहेबांचा संपर्क क्रमांक दिल्यास त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणे होउ शकेल आणि त्यांनी केलेल संशोधन आणि या घटनेकडे बघायचा त्यांचा दृष्टीकोण समजून येईल. मुख्य म्हणजे माझ्या विचार करण्याच्या दिशेत काही उणीव आहे का हे ही समजेल. तरी आपण डॉ. जोशींचा संपर्क क्रमांक द्यावा हि विनंती.

आधीच्या भागांच्या लिंक्स...
भाग 1
डॉ अजित जोशींचा मो क्रमांक - 9922431609

कांचन किल्ला चांदवड पासून पश्चिमेस १०-१२ किलोमीटर वर आहे ( धोडप लिल्ल्याच्या पूर्वेस ५-६ किमी ). वडाळीभोई ( आग्रा रोडवरील) वरून धोडप किल्ल्याकडे जाणारा रस्ता धोडांबे गाव आधी पूर्वेस वळून कांचन बारीतून जातो. ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सपाटीवर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी हाती तलवार घेऊन लढाई केल्याचा उल्लेख इतिहासात आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी मात्र हा किल्ला वणी -दिंडोरी जवळ असल्याचे राजा शिवछत्रपती मध्ये लिहिलेय.. प्रत्यक्षात वणी जवळचे रन तळे इथून २०-२५ किमी पश्चिमेस आहे ( तिथे ही लढाई झाली होती पण टी दुसरी)..
मला वाटते कि प्रत्यक्ष किल्ले/ठिकाणे न फिरता एका जागी बसून इतिहास / ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिला कि अश्या चुका होत असाव्यात. ..ह्या अशा चुका पुण्यापासून दूरवरच्या किल्ल्यांच्या बाबतीत सर्रास आढळतात..

शशिकांत ओक's picture

22 Mar 2018 - 11:27 pm | शशिकांत ओक

फॅनच्या वार्‍या खाली बसून मोडी लिपीतील पुडकी सोडून 'असा अर्थ होतो का तसा?' यावर वितंडवाद करणार्‍यांपेक्षा दुर्गविहारींचे विचार व आकलन प्रचंड आहे... धन्यवाद.

स्पार्टाकस's picture

22 Mar 2018 - 7:29 pm | स्पार्टाकस

राजे, ही मालिका अशीच सुरु राहू देत!

नेहमीपेक्षा काहीशा आडवाटेला असलेल्या दुर्लक्षित किल्ल्यांविषयी वाचून खूप आनंद झाला. उत्तर महाराष्ट्रातले गाळणा-कंक्राळा-डेरमाळ-पिसोळ या किल्ल्यांबद्दलही लिहा अशी विनंती.