प्रशस्तपाद ऋषी – भारताचे विज्ञानेश्वर आणि त्यांचा पदार्थधर्मसंग्रह – भारताची पदार्थविज्ञानेश्वरी (Prashastpad Rishi- 2nd century thought leader of Indian Scientific Tradition of Vaisheshika)

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
15 Oct 2017 - 1:30 pm

हा लेख लिहिताना पहिल्याप्रथमच सांगू इच्छितो किंवा प्रांजळपणे कबूली देऊ इच्छितो की हा लेख वैशेषिक सूत्रांची अधिक माहिती असणाऱ्या कुणी तज्ञाने लिहिला असता तर तो अधिक अर्थवाही आणि या विषयाला अधिक न्याय देणारा ठरला असता. मी अशा कोण्या माणसाने लिहिला आहे का याचा सर्वत्र (अंतरजालावर मुख्यत: शिवाय भांदारकर इत्यादि नामवंत संस्था) शोध घेतला. बऱ्याच ठिकाणी प्रशस्तपाद ऋषींबद्दल कौतुकोद्गार आहेत, ते २ ऱ्या शतकात होऊन गेले, त्यांनी ऋषी कणादांनी प्रस्थापित केलेल्या ‘वैशेषिक परंपरा’(ज्याला साहेब अधिक उदार असता तर Indophysics असे नाव देऊन मोकळा झाला असता. पण मग असं केल्यास भारतातील लोकांना रानटी, सापाचा खेळ करणारे वगैरे कुठल्या तोंडाने म्हणता आलं असतं? युरोपियन शास्रज्ञांची निर्विवाद बौद्धिक सत्ता कुठल्या आधारावर तोलली गेली असती?) नावाच्या वैज्ञानिक घराण्यात आपल्या प्रशस्तपादभाष्य किंवा पदार्थधर्मसंग्रह नावाच्या ग्रंथाने एक मैलाचा दगड प्रस्थापित केला. मुळात समजावयाला अतिशय क्लिष्ट असणाऱ्या वैशेषिक सूत्रांवर निव्वळ भाष्यच केले नाही तर स्वत:चा विचार मांडला.

१२ व्या शतकात ज्ञानेश्वरांनी ज्याप्रमाणे गीतेतील दुर्बोध जीवनप्रमेये आपल्या रसाळ भाषेतून जनमानसात प्रवाही केली. त्या पद्धतीनेच ऋषी प्रशस्तपादांनी वैशेशिकातील विज्ञानप्रमेये आपल्या स्वत:च्या मताला व सद्सद्विवेक बुद्धीला प्रामाणिक राहून आणि तरीही सुरुवातीलाच ऋषी कणादांचं गुरुत्व आणि महत्व मान्य करुन प्रतिपादित केली आहेत. अधिक ऐतिहासिक माहिती देण्याचा मोह टाळून त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय किंबहुना भारतीय विज्ञानविश्वाला ललामभूत ठरु शकणाऱ्या त्यांच्या ग्रंथाची म्हणजेच पदार्थधर्मसंग्रह या पुस्तकाची ओळख करुन घेणं हे याठिकाणी क्रमप्राप्त ठरतं.

मुळात इथे सांगू इच्छितो की प्रशस्तपादांच्या आधी व नंतरही वैशेषिक सूत्रांवर अनेक भाष्ये लिहिली गेली. रावणभाष्य आणि भारद्वाजावृत्ती आता मिळतही नाही. ऋषी प्रशस्तपादांनंतरही चंद्र यांनी अंदाजे ६४८ मध्ये दशपदार्थसंग्रह हे भाष्य लिहिले आणि त्याचे केवळ चिनी भाषांतरच अस्तित्वात आहे! त्यानंतर श्रीधर यांची न्यायकंदली (इस ९९१), उदय यांची किरणावली (१०वे शतक), श्रीवत्स यांची(ही) लीलावती (११ वे शतक). शिवादित्य यांची सप्तपदार्थी ही सुद्धा श्रीवत्सांच्याच काळातली असली तरीही त्यांनी न्याय आणि वैशेषिक यांचा संयोग करून ‘न्यायवैशेषिक’ या स्वरूपात भाष्य केले. शंकर मिश्र यांचे वैशेषिकावरील उपस्कर हे भाष्यही अतिशय मोलाचे आहे. वारकरी परंपरेत ज्या प्रमाणे म्हणतात त्याला अनुसरून वैशेषिक परंपरेसाठी

कणादे रचिला पाया ‌| प्रशस्तपाद झालासे कळस |

असे आपण निश्चितपणे म्हणू शकतो. श्रीवत्स यांच्या ११ व्या शतकातील ग्रंथानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. थेट १९ व्या शतकाच्या प्रारंभी काही संस्कृत विद्वानांनी हा विषय पुन्हा मनावर घेतला आणि मूळ वैशेषिक सूत्रांची व प्रशस्तपादाच्या भाष्याची इंग्रजीमध्ये भाषांतरे केली. काशीचे महामहोपाध्याय पंडित गंगानाथ झा यांनी प्रशस्ततपादभाष्याचे इंग्रजी व हिंदी मध्ये भाषांतर केले. साल १९१६. (काशीच्या या पंडितांनी अशा अनेक ग्रंथांची हिंदी व इंग्रजीमध्ये भाषांतरे केली. अनेक ग्रंथ लिहिले. त्यांचे याक्षेत्रातील योगदान मोठे आहे. याच पंडितांच्या नावाने अलाहाबाद मध्ये ‘गंगानाथ झा संशोधन संस्था’ आजही कार्यरत आहे.)

त्या भाषांतरित पुस्तकाचे मुखपृष्ठ हे असे होते.

मुखपृष्ठ

या पुस्तकाची छापील प्रत कुठेही उपलब्ध नाही. पण ह्याची PDF तुम्हाला https://archive.org/details/prashastapadabhashya या दुव्यावर पाहाता येईल. तेथून PDF तुम्हाला download सुद्धा करता येईल. मात्र ह्या पुस्तकाचे हिंदी भाषांतर तुम्हाला खालील दुव्यावर विकतही घेता येऊ शकेल. http://www.exoticindiaart.com/book/details/prashastapada-bhashyam-NZC143/ . त्यानंतर यावरील आधुनिक भाष्य (इस १९७५) डॉ. डोंगरे या शास्त्रज्ञांनी व डॉ. नेने या संस्कृतमधील तसेच वैशेषिक विद्वानांनी संयुक्तपणे केलं. त्यावर आधारित अनेक ग्रंथ व शोधनिबंध लिहिले.

सांगायचा मुद्दा एवढाच की भारतीय वैज्ञानिक परंपरा यावर पुन्हा काही किंतु परंतु निर्माण झाल्यास खुशाल हे पुस्तक बघावे. निदान प्राथमिक व आपल्याला कळणारं भौतिकशास्त्र आपण जरुर ताडून पाहू शकतो. इतकं घडाभर तेल झाल्यावर आता मूळ पुस्तकाची अनुक्रमणिका पाहू. मुद्दामच इंग्रजीमधली अनुक्रमणिका देतोय, म्हणजे कळायला सोपं जाईल.

अनुक्रमणिका

सूज्ञांना या अनुक्रमणिकेचे नीट अवलोकन केल्यावर निश्चितच लक्षात येईल की हा धर्मशास्त्राचा typical ग्रंथ नसून तो पदार्थधर्मशास्त्रावरचा ग्रंथ आहे. पहिल्याच धडयाचा दुसरा मुद्दा Purpose of Science असा आहे. वाचन करायला सुरुवात केल्यावर हळूहळू या वैचारिकतेचा अंदाज येत जाईल. अगदीच गोंधळून जायचं नसेल तर केवळ Text असा लिहिलेला मचकूर वाचत जावा. बाकीचा बराचसा तर्कवाद आणि दिलेली सूत्रे तर्कावर घासून काढलेली आहेत. इच्छुकांनी व त्यातही तर्कवाद्यांनी तसेच rational thinkers किंवा स्वत:ला बुद्धिवादी म्हणवणाऱ्यांनी तर पूर्ण पुस्तकच वाचून काढायला हवे. बरीचशी प्रश्नोत्तरे व ज्याला काथ्याकूट म्हटलं जातं तसा प्रत्येक सूत्राचा सामान्य भाषेत पंचनामा केलेला आहे. कुठेही हे लिहिलेलं आहे ते खरंच माना असा आग्रह नाही (असा आग्रह किंवा सक्ती भारतीय विचारपरंपरेत कधीच नव्हती असं दिसतं. चार्वाकाने वेदाला मानलं नाही तरीही त्याला तुरुंगात टाकलेलं किंवा सुळावर चढवलेलं किंवा मारुन टाकलेलं मी तरी वाचलेलं नाही. ती आपली पद्धत नाही, ती दुसऱ्या कोणाची तरी पद्धत आहे. असो.) थोडक्यात वैचारिक स्वातंत्र्य(freedom of expression) भारतीय परंपरेत होतं. ते युरोपातून आपण आयात केलेलं नाही. तर तेही असो.

दुसरा सांगायचा मुद्दा असा की यातील पृथ्वी (Earth), जल (Water), अग्नि (Fire/Energy), वायू ( Air) या विशेष द्रव्यांचा solid , liquid, energy, gas असा घ्यावा. या शिवाय आकाश(plasma), काल(time), दिक्(space), आत्मा(soul) व मन(mind) या द्रव्यांना महाभूते म्हटलेले असून निर्मितीची प्रक्रीयाही दिलेली आहे. या नऊ गोष्टींना हे तत्वज्ञान ‘द्रव्ये’ असे संबोधते. पदार्थ याचा अर्थ आपण घेतो तसा इंद्रियांना जाणवणारी वस्तू असा नसून ज्या कोणत्याही गोष्टीला आपण नावाने संबोधू शकतो(यात देवही आला..)अशा सर्वांनाच पदार्थ म्हटलेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर चहा हा पदार्थ घेतला(चहा घेतला असा नाही) तर तो जलरुप(Water) आहे, त्याने व्यापलेली जागा अमुक(space) आहे, तो कधी बनला(time) वगैरे. ही सारी द्रव्ये झाली.

वैशेषिकानुसार सुरुवातीलाच पदार्थांच्या व्यक्तिमत्त्वाचे दोन भाग मानले आहेत – एक ज्ञानेंद्रीयांना जाणवणारा(as perceived by sensory organs) आणि दुसरा बुद्धीला जाणवणारा(as understood by the intellect). ज्ञानेंद्रियांना जाणवणाऱ्या भागात द्रव्य(substance), गुण(quality), कर्म(activity) हे येतात. म्हणजे तो पदार्थ कशाचा बनलाय? त्याचे गुण काय? त्याची हालचाल कशी होते? यांची उत्तरे शोधणे.

बुद्धीला पटणाऱ्या म्हणजेच विश्लेषणानंतर कळणाऱ्या भागात सामान्य(set), विशेष(individuality) आणि समवाय(inheritance) हे येतात. म्हणजे तो पदार्थ कुठल्या गटात समाविष्ट होतो? त्याचा सर्वात लहान कण किंवा एकक काय? त्याची उत्पत्ती कशापासून झाली? यांची उत्तरे शोधणे.

ही झाली विश्लेषणाची केवळ पहिली पायरी. यानंतर हे पुस्तक खाली दिलेल्या पदार्थाच्या सर्व अंगांना स्पर्श करते.
पदार्थाचे पैलू

त्यानंतरच्या धड्यांमध्ये या द्रव्यांचे गुणधर्म, त्यांमध्ये असलेली साम्यस्थळे, भेदस्थळे तपशीलाने दिलेली आहेत. नंतरच्या धड्यात त्यांच्यात बलामुळे होणाऱ्या हालचाली(actions) दिलेल्या आहेत. त्यानंतरच्या धड्यांमध्ये सामान्य(sets or classification), विशेष(Individuality किंवा त्या पदार्थाचा मूलाणू) व समवाय(inheritance) यांची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. मुळात वैशेषिक या शब्दातील ‘विशेष’ याचा अर्थच त्या पदार्थाचा सर्वात लहान व विभागला न जाऊ शकणारा भाग असा आहे. बुद्धिवाद्यांनी हे ही अवश्य मुळातून वाचावं.

वरील चहाचंच उदाहरण पुढं न्यायचं झाल्यास, उकळताना त्यात उष्णतेमुळे कोणती हालचाल झाली(action) किंवा ओतताना कशी हालचाल झाली, शब्द हा आकाशाचा(plasma) गुण असल्याने चहा होताना आवाज कसा झाला? शिवाय चहा हा उष्णपेय या पेयांच्या classification मध्ये मोडतो. Iced Tea पेक्षा Hot Tea वेगळा कसा तर तिथे तेज (heat) मुळे स्पर्श (temperature) बदलतो. शिवाय चहाचा लहानात लहान भाग(विशेष किंवा individuality) कसा असतो? त्याचे मोजमाप कसे किती असते? तर ते त्रासरेणू किंवा colloidal particle असते. शिवाय चहा हा दूध, पाणी, चहापत्ती, साखर व गॅस यांच्या एकत्र प्रयोगातून होतो. शिवाय कोण्या माणसाला चहा पिल्याशिवाय जमतच नाही म्हणजेच तिथे त्याचं मन आलं. म्हणजेच चहाच्या उगमाशी (inheritance) वर दिलेले पदार्थ निगडित आहेत. वगैरे गोष्टींचा कूट आपण कपातला चहा थंड होईपर्यंत करु शकतो (युरोपातील शास्त्रज्ञांचे ही असे चहाचे अड्डे असंत असं म्हणतात..चहा किंवा दुसरे काय त्या पदार्थांविषयी या ठिकाणी न बोललेलंच बरं..)

सारांश स्वरूपात बोलायचं तर चहा या पदार्थाचे व्यक्तिमत्व वैशेषिकाच्या भाषेत खालीलप्रमाणे दाखवू शकतो.
पदार्थ: गरम चहा
द्रव्य (substance): जल (liquid)
गुण (qualities):
रूप (color): तपकिरी
रस(taste): गोड
गंध(smell): चहासारखा, थोडा आल्याचा व तुळशीचा वास सुद्धा लागला होता.
स्पर्श(temperature): उष्ण
संख्या (quantity): १ कप
परिमाण (unit of measurement): कप
पृथकत्व(individuality): तुळस घातली होती
संयोग (conjunction): कपात ओतला
विभाग (dis junction): पातेल्यातून बाहेर काढला
गुरुत्व (heaviness or weight): १० ग्रॅम
द्रवत्व (fluidity): पातळ होता. ओतायला सोपा गेला
स्नेह (viscosity): चिकटपणा अजिबात नव्हता
धर्म (merit): उच्च दर्जाचा आहे. तजेला देतो.
अधर्म (demerit): झोप उडवतो. अतिसेवन धोकादायक. भूक मरते.

कर्म (action):
अवक्षेपण: पातेल्यातून कपात ओतला, कपातून बशीत ओतला

सामान्य (classification)
मुख्यगट: पेय
उपगट: उष्णपेय

विशेष (individuality)
कलिलीकण(the colloidal particle of tea)

समवाय (inheritance) साखर, दूध, पाणी, चहापत्ती, उष्णता यांपासून चहा बनतो

हे केवळ एक उदाहरण आहे. या विचारप्रणालीशी माझीही अजून तोंड ओळखच होते आहे. माझ्या आतापर्यंत शिकलेल्या तुलनेने आधुनिक संकल्पनांच्या आधारावरच मी या नव्याने कळलेल्या संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. शिवाय संस्कृतचे अज्ञान (शाळेत टि . म . वि . च्या ५ परीक्षा उत्तीर्ण होऊनही.. ) खूप आड येते. म्हणूनच मग इंग्रजी आणि हिंदी भाषांतराचा टेकू घ्यावा लागला . एवढे असूनही सुरुवातीलाच मला जाणवलेली वैशेषिकाची काही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे:

१. वैशेषिक विज्ञान तथाकथित जडवादी विज्ञान वाटत नाही. कारण यात मन , आत्मा यांचा विचार एक द्रव्य म्हणूनच केला आहे. आधुनिक भौतिक शास्त्र सुरुवातीला निश्चिततावादी (Deterministic approach) होतं. जसजसा पुंजवाद आला, जसं तरंग आणि मग mass -energy relation वगैरे आलं तसं मग संभाव्यतावादाकडे (Probabilistic approach) प्रवास झाला. पण वैशेषिकामध्ये सुरुवातीलाच व या पुस्तकानुसार २ऱ्या शतकात अजड वाद स्विकारला गेलाय. त्याची मुळे कणादांच्या सूत्रांमध्ये असणार. म्हणजे हा काळ आणखी आधी म्हणजे इसवीसन पूर्व काळात गेला. न्यूटन इत्यादींच्या म्हणण्यानुसर सर्व हालचाली या बाह्यबल वगैरेंशी संबंधित मानल्या जात होत्या. पण वैशेषिकात हालचाली मध्ये बाह्यबल हे कारण आहेच पण शिवाय मन आणि आत्मा सुद्धा आलाय.

याचं उदाहरण द्यायचं झालं तर मनुष्याने धनुष्याची दोरी ताणली व बाण लावलाय. वैशेषिकानुसार त्या मनुष्याचं मन त्याच्या ज्या बोटाने दोरी ताणली आहे तिथे आलंय. मन या द्रव्याचा हेतू हा गुणधर्म गणला गेलाय. आपल्या उदाहरणात त्या मनुष्याने बाण लावण्याच्या हेतूने दोरी ताणली आहे . मग पुढची पायरी म्हणजे माणसाचा हेतू बदलला. आता त्याला बाण मारायचा आहे. त्याने म्हणूनच ताणलेली दोरी सोडून दिली. त्यामुळे दोरीतल्या स्थितिस्थापकता गुणामुळे ती ताणलेली होती ती मोकळी झाली. त्यामुळे बाण सुटला.. वैशेषिकातील विचार पद्ध्तीचा हा अजूनेक नमुना झाला.

२. दुसरं म्हणजे वैशेषिकात सुरुवातीलाच हे नऊ वेगवेगळे अस्तित्व असणारी द्रव्ये मानल्यामुळे पुन्हा बघणारा कुठे आहे (observers frame of reference) ही गोष्ट वर पाहिलं तसं या विश्लेषणाचा भागच झाली. याबद्दल अधिकही लिहिता येईल. पण तूर्तास इथेच आवरत घेतो.

तर दोस्तांनो भारतीय संस्कृती ही केवळ आध्यात्मिकच आहे हे अज्ञान आता (तरी) स्वत:च्या मनातून काढून टाकूया. वर दिलेल्या चहाच्या उदाहरणातून वैशेषिकांच्या विचार पद्धतीची ओळख करुन देण्याचा यथाबुद्धी प्रयत्न केला. अधिक ज्ञानी लोकांना त्यात त्रुटी आढळल्यास त्या जरुर दाखवाव्यात. इथे केवळ काहीतरी नवीन माहिती रंजकपणे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न होता. तर आता तरी इतके दिवस विस्मृतीत धूळ खात पडलेल्या या जुन्याच पणत्या तर्कावर घासून पुन्हा लखलखीत करुया व त्यांद्वारे अज्ञानाच्या अंधकाराला मिटवूया. आधुनिक विचारधारेला या प्राचीन कोंदणात बसवूया. त्याज्य काहीच नाही या अज्ञानाच्या अंधकाराशिवाय..

तमसो मा ज्योतिर्गमय ‌|

पदार्थधर्मसंग्रह पुस्तकाचे श्लोक, इंग्रजी भाषांतर व मराठी भावानुवाद व टिपा :
धडा पहिला : ग्रंथारंभ व उद्देश (Padarthdharmsangraha: Salutation and reasons for studying physics)

सर्व लेख एका ठिकाणी पाहण्यासाठी हा ब्लॉग पहा: विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात

प्रतिक्रिया

अमितदादा's picture

15 Oct 2017 - 10:30 pm | अमितदादा

तुम्ही ज्या पद्धतीने प्राचीन भारतीय वैज्ञानिक ग्रंथाचा धांडोळा घेत आहात त्याच नक्कीच कौतुक आहे, लेखामागच तुमचं कष्ट दिसून येत, तुम्ही दिलेली माहिती पूर्णतः नवीन आहे. वरील लेखात उल्लेख केलेलं मन आणि आत्मा याचा पदार्थविज्ञान शी काय संबंध आहे हे कळत नाही. तसेच plasma ला आकाश का म्हंटलय याचा उलघडा होत नाही. असो.

अनिकेत कवठेकर's picture

16 Oct 2017 - 11:53 am | अनिकेत कवठेकर

अमिदादा,
मनाबद्दल एक उदाहरण दिलंय. ही उदाहरणं माझ्या वचनानुसार देत आहे. अधिक अचूकता हळूहळू येईल.प्लास्मा किंवा ईथर अशी आकाश ची वेगवेगळी भाषान्तरे मिळतात. पण आकाश हा space या अर्थी नक्कीच वापरलेला नाही. आकाश मध्ये ज्याला आपण wave म्हणतो त्या असतात अशी साधारण कल्पना येते.

कंजूस's picture

15 Oct 2017 - 10:35 pm | कंजूस

>>इथे केवळ काहीतरी नवीन माहिती रंजकपणे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न होता.>>

हे आवडलं.

अनिकेत कवठेकर's picture

16 Oct 2017 - 12:04 pm | अनिकेत कवठेकर

या बद्दल इतिहास एक उदाहरण आहे. इतिहासात नुसत्याच सन सनावल्याच दिल्या असत्या तो कोणी गोष्टी रूपात मांडला नसता तर तो ही रुक्ष विषयच झाला असता..

लेखन आवडलं. न्याय आणि वैशेषिक ही दोन्ही दर्शने स्वतंत्रपणे आणि जोड-दर्शने म्हणूनही भारतीय तत्त्वज्ञानजगतात स्वतःचे खास स्थान राखून आहेत. सांख्य-योग्य, न्याय-वैशेषिक, पूर्वमीमांसा-उत्तरमीमांसा, जैन, बौद्ध आणि लोकायत ही षड्दर्शने किंवा स्वतंत्रपणे सहा अधिक तीन अशी नवदर्शने मानली जातात. यातल्या प्रत्येक दर्शनाचा ऊहापोह स्वतंत्रपणे कधी करता येईल का हे पाहायला हवे.

या दर्शनांच्या अभ्यासाची साधने मात्र सर्वच दर्शनांची उपलब्ध नाहीत. लोकायतांचा तर एकही ग्रंथ स्वतंत्रपणे उपलब्ध नाही. कदाचित अधिक धांडोळा घेतल्यास कुठेतरी अधिक ग्रंथसामग्री सापडू शकेलही. कौटिल्याचा अर्थशास्त्र हा इतका प्रसिद्ध ग्रंथ; पण गेल्या शतकाच्या सुरुवातीला म्हैसूरच्या शास्त्रींकडे सापडेपर्यंत उपलब्ध नव्हता. असो.

अधिक लिहा. शुभेच्छा.

अनिकेत कवठेकर's picture

16 Oct 2017 - 12:00 pm | अनिकेत कवठेकर

एवढा मोठा पसारा समोर आहे. नुसतं वैशेषिक वरवर कळलं तरीही मोठं यश समजेन.
या वैशेषिकाचा आणि नवीन विज्ञानाचा समन्वय साधला तर काही चांगलं हाती लागेल असं वाटत. निदान मुलांना यांची ओळख झाली तर त्यांना काही नवीन करता/शोधता येईल असा आशावाद आहे.

गामा पैलवान's picture

17 Oct 2017 - 2:56 am | गामा पैलवान

अनिकेत कवठेकर,

अतिशय रंजक, रोचक आणि डोळे उघडणारा लेख आहे. तुमच्या जिद्द आणि चिकाटीला विनम्र अभिवादन. तुमच्यासारखे लोकं मराठीस परत ज्ञानभाषा बनवणार आहेत.

प्रशस्तपाद ऋषींच्या मते पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही द्रव्ये असून त्यांच्या एककास विशेष म्हणतात. यांच्या गुणांचं वर्णन दासबोधात आल्याचं आठवतं.

आ.न.,
-गा.पै.

आ.न.,
-गा.पै.

अनिकेत कवठेकर's picture

18 Oct 2017 - 10:37 pm | अनिकेत कवठेकर

चांगलं निरीक्षण..पण पृथ्वी, अग्नी, जल, वायू ही भूते म्हटली गेली आहेत..बाकीची महाभूते आहेत..शरीर पंचतत्वात विलीन होणं असं म्हटलं जातं ते काय हे या संदर्भात थोडं लक्षात येतंय..अधिक अभ्यास व चर्चा गरजेच्या आहेत..आधुनिक शास्त्रातील प्रतिध्वनींशीही संबंध जोडला पाहिजे..अजून काही हाती गवसू शकते..

अनन्त्_यात्री's picture

17 Oct 2017 - 9:07 am | अनन्त्_यात्री

आधुनिक भौतिक शास्त्र सुरुवातीला जडवादी होतं. जसजसा पुंजवाद (quantum ) आला, जसं तरंग आणि मग mass -energy relation वगैरे आलं तसं मग अजडावादाकडे प्रवास झाला .

आपल्या लेखातील वर दिलेल्या वाक्यात पुढिल सुधारणा सुचवू इच्छितो : आधुनिक भौतिक शास्त्र सुरुवातीला निश्चिततावादी (डिटर्मिनिस्टिक) होतं. जसजसा पुंजवाद आला, जसं तरंग आणि मग mass -energy relation वगैरे आलं तसं मग संभाव्यतावादाकडे (प्रॉबेबिलिस्टिक अ‍ॅप्रोच) प्रवास झाला .

अनिकेत कवठेकर's picture

18 Oct 2017 - 10:32 pm | अनिकेत कवठेकर

आवश्यक सुधारणा केली आहे. इतरही अधिक माहिती व संदर्भ दिले आहेत.

सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वी मी 'समरांगणसूत्रधार ग्रन्थातील यन्त्रविधान आणि विमानविद्या' असा एक लेख लिहिला होता. त्यामध्ये खालील विधान केले होते:

अध्यायाचे पहिले सुमारे ४० श्लोक हे ’बीज’ म्हणजे काय आणि बीजांच्या कमीअधिक प्रभावाने नाना यन्त्रे कशी निर्माण होतात ह्या विवेचनासाठी आहेत. ’क्षितिरापोऽनलोऽनिल:’ म्हणजे पृथ्वी, आप, अग्नि. आणि वायु ह्या चार भूतांची बीजे - त्यांचे अंगभूत गुण - ह्यांच्या कमीअधिक उपयोगाने यन्त्र निर्माण होते. ह्या चारी भूतांना पायाभूत असल्याने ’आकाश’ हेहि पाचवे भूत मानले गेले आहे. ’सूत’ (पारा) हे एक भूत आहे असे जे एक मत आहे ते चुकीचे आहे असे ग्रन्थकर्ता सांगतो कारण ’सूत’ हा प्रकृतीने पार्थिव म्हणजे पृथ्वीभूताचेच रूप आहे. [प्रामाणिकपणे सांगायचे म्हणजे भूते, त्यांची बीजे आणि त्या बीजांच्या संमिश्रणातून निर्माण होणारी यन्त्रे ह्याचा अर्थ मला समजलेला नाही. जालावर जे थोडे पाहायला मिळाले त्यावरून ’भू्त’ म्हणजे भौतिक (Natural Philosophy) आणि ’बीज’ म्हणजे पारलौकिक (Occult) अशा दोघांच्या सहकार्यातून यन्त्र निर्माण होते असे सुचविले आहे असे दिसते. ग्रीक तत्त्वज्ञ ऍनक्झागोरस (ख्रि.पू. ५००-४२८) ह्याने जी ’seeds’ अथवा ’live principles’ वर्णिली आहेत त्याच्याशी प्रस्तुत ग्रन्थातील ’बीजा’चा संबंध दर्शविला आहे. तसेच ’बीज’ ही संकल्पना समरांगणसूत्रधार ह्या ग्रन्थामध्ये प्रथमच पाहायला मिळते असेहि सांगण्यात आले आहे. पहा 'The Concept of Yantra in the Samarangana-sutradhara of Bhoja' by Mira Roy, The Indian Journal of History of Sciences, 19(2): 118-124 (1984)]

ह्या उतार्‍यामध्ये मला न समजलेले असे जे मी वर्णिले आहे त्याचा तुमच्या वैशेषिकदर्शनाच्या अभ्यासाने काही उलगडा होऊ शकेल काय? (येथे स्पष्ट लिहितो की वैशेषिक, सांख्य इत्यादि दर्शनांमधून मला काहीहि कळत नाही. शाळा-कॉलेजात शिकलेले मूलभूत संस्कृत हाच माझा आधार आहे. हे सर्व समजावे म्हणून मी सायणमाधवाचार्यांचा 'सर्वदर्शनसंग्रह' वाचण्याचा प्रयत्न केला पण तो सर्व माझ्या डोक्यावरून गेला.)

अनिकेत कवठेकर's picture

19 Oct 2017 - 12:25 pm | अनिकेत कवठेकर

सर्वात आधी भूते म्हणजे solid, liquid, energy/heat आणि gas या अवस्था होत. बाकी राहिलेली महाभूते आहेत असे वैशेषिक म्हणते.
त्याअर्थी यंत्रामध्ये या चारही अवस्थांमध्ये असणारी द्रव्ये असतात इतकाच अर्थ असावा.
सूत हा याअर्थी द्रव्याचा एक प्रकार आहे.
वैशेषिकात बीज असे काही अजूनतरी वाचलेले नाही.भूत आणि महाभूत मात्र आहेत. तुम्ही म्हणता ते पुस्तक अजून वाचलेले नाही. बीजांचे अंगभूत गुण असे जे म्हणताय ते वैशेषिकात वेगळ्या पद्धतीने म्हटलं गेलंय. पदार्थाचे २४ गुण सांगितले आहेत.The original 17 guṇas (qualities) are, rūpa (colour), rasa (taste), gandha (smell), sparśa (touch), saṁkhyā (number), parimāṇa (size/dimension/quantity), pṛthaktva (individuality), saṁyoga (conjunction/accompaniments), vibhāga (disjunction), paratva (priority), aparatva (posteriority), buddhi (knowledge), sukha (pleasure), duḥkha (pain), icchā (desire), dveṣa (aversion) and prayatna (effort). To these Praśastapāda added gurutva (heaviness), dravatva (fluidity), sneha (viscosity), dharma (merit), adharma (demerit), śabda (sound) and saṁskāra (faculty).

या संस्कृत पुस्तकांमध्ये सूत्र रूपात दिलेलं असतं. थोड्या विवेचनाशिवाय हे कळायला अवघड जाते. नेने सरांना भेटून माहिती मिळू शकेल.

गामा पैलवान's picture

20 Oct 2017 - 8:57 pm | गामा पैलवान

अरविंद कोल्हटकर,

माझ्या मते वैमानिकशास्त्र हे विमानांचे शास्त्र कमी असून धातुशास्त्र अधिक आहे. त्यामुळे आधी धातुशास्त्रात प्रावीण्य मिळवायचा उपयोग केला पाहिजे. पुढे त्यातनं विमानविद्या किमान सायसे फलद्रूप होईल.

या लेखात वैमानिकशास्त्रावर आक्षेप नोंदवले आहेत. त्यातला एक निष्कर्ष (पान क्र. ७) :

Any reader by now would have concluded the obvious that the planes described above are the best poor concoctions, rather than expressions of something real.

चतुरफिरस्त्या (=स्मार्टफोन) वापरणाऱ्या पण तत्संबंधी जाणकार नसलेल्या एखाद्या अभियंत्याला जर फिरस्त्याचं कार्य विचारलं तर तो काय सांगेल? त्याची कथा देखील concoctions म्हणूनंच गणली जाईल ना? एक चौकोनी आकाराची डबी, जी स्थिरचित्रं व चलचित्रं नोंदवू शकते आणि जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या दुसऱ्या व्यक्तीशी क्षणार्धात संपर्क साधून ही चित्रं वितरीत करू शकते. अशी डबी जादूचीच नव्हे काय? लक्षात घ्या वापरकर्ता जाणकार नसला तरी अभियंता आहे. कोणी सर्वसाधारण अज्ञ माणूस नव्हे. तो त्याचं कथन जमेल तितकं उचित करेल ना? पण ते विश्वासार्ह खचितंच नसेल.

म्हणून वैमानिकशास्त्र ग्रंथास त्यातली धातूशास्त्रीय कौशल्ये हस्तगत केल्याखेरीज झटकून टाकू नये, असं मला वाटतं.

आ.न.,
-गा.पै.

दीपक११७७'s picture

20 Oct 2017 - 2:50 pm | दीपक११७७

छान ,अप्रतिम माहिती, ध्येय साध्य झाले आहे!
धन्यवाद