बोली आणि भाषा

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
1 Oct 2017 - 5:52 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

बोली या आदिम भाषा आहेत. संपूर्ण भारतभर आज पंधराशे बोली भाषांचे अवशेष सापडतात. म्हणजे या पेक्षा कितीतरी अधिक बोलीभाषा पूर्वी अस्तित्वात असाव्यात. परंतु त्यांच्यात होणारा दैनंदिन मौखिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे काळाच्या ओघात त्या मरण पावल्या. मृत्यू पावलेल्या भाषा फक्‍त मौखिक स्वरूपात परंपरेने अस्तित्वात होत्या. माणसाच्या अडाणीपणामुळे त्या लिहिल्या जात नव्हत्या. त्या लिहिल्या जात नव्हत्या म्हणून त्यांना लिपी नाही. या भाषा नामशेष झाल्यामुळे त्या कशा स्वरूपाच्या होत्या, हे आज कोणालाही सांगता येत नाही. कारण या भाषांचे दस्ताऐवजीकरण (Documentation) झालेले नाही. आज अस्तित्वात असलेल्या बोली या सुद्धा यापुढे आपण जागरूक राहिलो नाहीत तर कालांतराने नामशेष होणार आहेत. तसे होऊ द्यायचे नसेल तर आज आपल्याला माहीत असलेल्या बोलींचे (त्यांच्यासाठी कोणतीही लिपी उपलब्ध नसली तरी) माहीत असलेल्या लिपीत आपण लिहून ठेवल्या पाहिजेत. मग या बोली कोणत्याही असोत. झाडी बोली असो, मालवणी असो की कोकणी असो. या भाषा ज्या भाषेच्या घटकबोली ठरतात, त्या उपलब्ध लिपीत त्या लिहून ठेवल्या पाहिजेत. आता उल्लेख केलेल्या भाषा देवनागरी लिपीत आपण शब्दबद्ध करून ठेवल्या पाहिजेत. म्हणजे काळाच्या ओघात त्यांच्यातील दैनंदिन व्यवहार ठप्प झाला तरी तिचे स्वरूप अशा दस्तऐवजीकरणातून भाषाभ्यासकांना उपलब्ध होऊ शकेल. अशा दस्तऐवजीकरणाचे काम ‘ढोल’ आणि भाषा लोकसर्वेक्षण या प्रकल्पातून होत आहे.
बोलली जाणारी बोली आणि लिखाण, ज्ञान व व्यवहार यांसाठी वापरली जाणारी ती भाषा असे आपण भाषांचे वर्गीकरण करणे चुकीचे आहे. कारण प्रमाणभाषा ह्या कृत्रिम व अपुर्‍या ठरतात तर बोली याच मूळ उत्स्फूर्त भाषा ठरतात. सर्व घटक बोली गटांना समजेल अशी प्रमाणभाषा आपोआप रूढ होत असते, ती बोलींच्या खांद्यावर उभे राहून. प्रमाणभाषा ह्या बोलींकडूनच भाषिक सामर्थ्य घेऊन प्रवाहित होत असतात. प्रमाणभाषेतील बहुतांश शब्दही बोलींकडून उचललेले असतात. तरीही प्रमाणभाषा बोलणारे लोक बोलीभाषांना ग्राम्य, अशुद्ध व कमी प्रतीची म्हणून हेटाळणी करतात. प्रमाणभाषांचा उगम बोलींमधून होत आला आहे, हे सर्वसामान्य माणसांच्या लक्षात आले तर असे होणार नाही. उदाहरणार्थ, मराठीच्या घटक बोली म्हणून अहिराणी, वैदर्भी, कोकणी, सातारी, मालवणी, नगरी, कोल्हापूरी अशा बोली बोलणार्‍या अडाणी लोकांना प्रमाण मराठी समजते, पण प्रमाण मराठी बोलणार्‍या सुशिक्षित लोकांना या बोली काही प्रमाणात समजत नाहीत. यावरून हा मुद्दा लक्षात येईल.
जी प्रमाणभाषा आपल्या घटक बोलींचे शब्द जास्तीतजास्त प्रमाणात उपयोजित करते, ती भाषा दिवसेंदिवस समृद्ध होत राहते. उलट जी भाषा आपल्या तथाकथित शद्धुत्वाच्या नावाखाल़ी सावळे पाळायला लागते ती लवकर मृत होते. याचे ठळक उदाहरण म्हणजे संस्कृत भाषा. संस्कृत भाषेत प्रचंड प्रमाणात ग्रंथ लिखाण झालेत. दोन जागतिक महाकाव्य - ‘रामायण’ व ‘महाभारत’ संस्कृत भाषेत असूनही या भाषेने, म्हणजे ही भाषा ज्या मूठभर लोकांच्या हाती होती, त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी आपली कवाडे बंद करून घेतली. तत्कालीन विशिष्ट वर्गाने संस्कृत वाचायलाही सामान्य लोकांवर बंदी घातली. यामुळे लवकरच संस्कृत भाषा मृत झाली. हे उदाहरण समोर ठेवून भाषिक अस्मिता आपण तारतम्याने वापरायला हवी. आम्ही बोलतो वा लिहितो तेवढीच भाषा शुद्ध आणि इतर बोलतात वा लिहितात ती ग्राम्य असे होता कामा नये. म्हणून आपण बोलींसह सगळ्याच भाषांचा आदर करूया. मग ती भाषा अहिराणी असेल, गोंडी असेल, पारधी असेल, कोकणा असेल, झाडी असेल, मराठी असेल, हिंदी असेल, गुजराथी असेल. इग्रंज़ी ही परकीय भाषा असली तरी आपण तिचा आदर करूया. आपल्या मायबालीच्या प्रेमाखातर आपण कोणत्याही दुसर्‍या भाषेचा दुस्वास करता कामा नये. भाषा ही माणसं जोडण्यासाठी आहे, तोडण्यासाठी नाही. भाषा-प्रेमाने माणसं तुटत असतील तर आपण आपल्या भाषेवर आंधळं प्रेम करतो, असं म्हणावं लागेल. आपल्या भाषेवर प्रेम करताना दुसर्‍या भाषेचा द्वेष होता कामा नये. दुसर्‍या भाषेलाही अगत्याने समजून घेणे गरजेचे आहे. भाषा आपण अशा जोडत गेलो तर माणसंही आपोआप जोडली जातात.
सारांश, भाषा मरायला नकोत यासाठी आपण जागृत राहिले पाहिजे. कारण भाषेत त्या त्या भौगोलिक परिसरातील लोकसंस्कृती सखोल मुरलेली असते. भाषांच्या माध्यमातून सांस्कृतिक ओळख होत असते. कोणत्याही भाषेत ग्रामीणत्व, अशुद्ध, अश्लीलता असे काहीही नसते. भाषेतील ह्या संकल्पना सापेक्ष असतात. शहरी माणसाच्या दृष्टिकोनातून एखादा शब्द ग्राम्य वा अश्लील ठरत असेल तर ग्रामीण लोकांच्या दृष्टिकोनातून तो दैनंदिन नैसर्गिक व्यवहार ठरू शकतो.
(पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘अहिराणीच्या निमित्ताने: भाषा’ या पुस्तकातून साभार. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

– डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
(दिनांक: 01 – 9 -2017)

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

1 Oct 2017 - 6:37 pm | उगा काहितरीच

लेख आवडला. जवळजवळ सगळेच मुद्दे पटण्यायोग्य आहेत.

सुचिता१'s picture

1 Oct 2017 - 11:11 pm | सुचिता१

+१११

गामा पैलवान's picture

1 Oct 2017 - 11:47 pm | गामा पैलवान

डॉक्टर सुधीर राजाराम देवरे,

लेख ठीकठाक आहे. भाषांचा द्वेषबिष करू नये ते सगळं बरोबरे. मात्र संस्कृतविषयी एक विधान पटलं नाही :

त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी आपली कवाडे बंद करून घेतली. तत्कालीन विशिष्ट वर्गाने संस्कृत वाचायलाही सामान्य लोकांवर बंदी घातली.

विधान पटलं नाही कारण की संस्कृत वाचण्यावर कधीच बंदी नव्हती. संस्कृतच्या विद्वानांनी कुणालाही कसलीही कवाडंबिवाडं बंद केली नाहीत. संस्कृत आजही भारतात अनेक ठिकाणी शिकवली जाते. ती मृतबित अजिबात नाही.

माझ्या नित्यपाठात अनेक संस्कृत श्लोक आहेत. मी ते रोज म्हणतो. यावरून माझ्यापुरती तरी संस्कृत मृत नाही.

आ.न.,
-गा.पै.

आ.न.,
-गा.पै.

धर्मराजमुटके's picture

2 Oct 2017 - 2:25 pm | धर्मराजमुटके

संस्कृत बद्दल सहमती ! आजही बॉलीवुड्, टॉलीवुडचे चित्रपट पहा, खलनायकाला मारताना, हिरोची एन्ट्री होताना, लग्न होताना संस्कृत श्लोकांशिवाय अ‍ॅक्शनमधे मजा येत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Oct 2017 - 6:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उगाचे शिळ्या मेथीच्या भाजीला पाणी मारुन टवटवीत करण्याचे प्रकार चालू असतात.असो.
सर्वांना शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

शब्दबम्बाळ's picture

9 Oct 2017 - 12:05 pm | शब्दबम्बाळ

नाही म्हणजे आम्हालाही शाळेत ३ वर्ष होती शिकायला पण व्यवहारात आजपर्यंत कोणी बोललेली ऐकली नाहीये.
याशिवाय बऱ्याच संस्कृतोद्भव भाषा चांगल्या टिकल्या पण संस्कृतच व्यवहारात टिकली नाही याचे कारण ती फक्त काही लोकांपुरती मर्यादित केली गेली हे नव्हते का?

पण हे सगळं सोडून एक वेगळा मुद्दा तुमची प्रतिक्रिया वाचून डोक्यात आला.

यावरून माझ्यापुरती तरी संस्कृत मृत नाही

भाषा हि शक्यतो "समूहांमध्ये" संवाद करण्यासाठी निर्माण केली गेली आहे. तिचे महत्व दोन किंवा अनेक व्यक्तींशी आपले विचार मांडणे शक्य व्हावे यासाठी आहे असे मानले तर "माझ्यासाठी" अशी कुठली भाषा असू शकते का?

मुळात व्यक्तीला स्वतःसाठी भाषेची आवश्यकता असते का? जर तुम्हाला मनातल्या मनात एखादा विचार करायचा असेल तर तुम्ही कुठल्यातरी एका भाषेतच करत असाल. जर आपल्याला भाषा शिकवलेच गेली नसती तर आपण विचार कशा पद्धतीने केला असता??
हा प्रश्न अवांतर आहे आणि बरेच कंगोरे असलेला आहे त्यासाठी एक धागा काढेन... :)

पैसा's picture

2 Oct 2017 - 10:14 am | पैसा

लेख आवडला. भाषा आणि बोली यात भांडणे व्हायला राजकारणी आणि राजकारण मुख्यतः कारणीभूत असते. अस्मितेच्या नावावर पेटवून देण्यासाठी भाषा हा अगदी सोपा आणि सोयीचा मुद्दा असतो.

ओरायन's picture

2 Oct 2017 - 10:53 am | ओरायन

लेखातील विचार योग्य आहेत. एकंदरीत लेख आवडला.
मात्र संस्कृत भाषेविषयी मांडलेले विचार पटले नाहीत. जरी रामायण व महाभारत व अनेक संस्कृत ग्रंथ विपुल प्रमाणात होते/आहेत तरी त्यावेळी असणाऱ्या प्रचलित गोष्टींमुळे समाजाचा मोठा घटक तिकडे जात नव्हता. त्याना कोणी बंदी केलेली नव्हती. 'आपले ते काम नव्हे ' ह्या समाजरूढीत हा वर्ग अडकलेला होता. आता आज सुद्धा संस्कृत आपण स्वतःहून केवळ मंत्र , पूजा ह्यासाठी सिमित केली आहे. जर्मन/जपानी/संस्कृत असे तीन वेगवेगळे पर्याय ठेवले तर किती जण संस्कृतला हो म्हणतील ? ते म्हणणार नाहीत कारण त्याचा उपयोग काय ? असा 'पारंपरिक' विचार बहुसंख्य करतील. मात्र संस्कृत भाषा मृत नाही. उलट आंतरजालामुळे त्याला 'बढावा ' मिळाला आहे. आज मीपण काही संस्कृत समूहांचा एक सदस्य आहे. शाळेत असतांना जेवढी माहिती मिळत नव्हती तेवढी संस्कृत भाषेविषयी माहिती मिळत आहे. तिचे प्रमाण पण एवढे आहे कि ग्रहणशक्ती कमी पडत आहे. आता बोला ?

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Oct 2017 - 3:36 pm | अमरेंद्र बाहुबली

बोलीबद्द्ल~ मी माझा हिमाचली मित्र आणी एक राजस्थानी मित्र आम्ही गप्पा मारतांना राजस्थानी मित्राने मला ग्लासात दुध घ्यायला लावले. त्यावेळी तो मारवाडीत बोलून गेला " दुध काढ" असं.नंतर तिघांच्या चर्चेतुन निष्कर्ष निघाला की "काढ" हा शब्द मारवाडी, पहाडी ( हिमाचली),आणी मराठी ह्या तिनही भाषेत एकाच अर्थाने वापरला जातो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Oct 2017 - 6:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला डॉक्टर साहेब.

-दिलीप बिरुटे

गामा पैलवान's picture

9 Oct 2017 - 12:44 pm | गामा पैलवान

शब्दबम्बाळ,

भाषा हि शक्यतो "समूहांमध्ये" संवाद करण्यासाठी निर्माण केली गेली आहे.

भाषा केवळ संवादाचे साधन नाही. ते ज्ञानवर्धनाचे साधनसुद्धा आहे. मला संस्कृतमधून ज्ञान व भक्ती प्राप्त होत असल्याने माझ्यापुरती तरी ती मृत नाही.

आ.न.,
-गा.पै.