तो (भाग २)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
18 Jul 2017 - 10:35 am

भाग १: http://www.misalpav.com/node/40321

तो (भाग २)

काकु पडल्या पडल्या विचार करत होत्या,'अशोकच बिचाऱ्याच कस होत असेल. नोकरी सांभाळून आजारी बायकोला देखील जपतो आहे. त्यात हे नवीन आणि थोडं आड बाजुच गाव. या दोघांना तर शहराची सवय. मी म्हंटल देखील त्याला एकदा की इथे अशा आड गावी बदली का घेतलीस? तुम्ही शहरात राहाणारी मुलं इथे कस व्हायचं तुमच? तर म्हणाला संध्याला समुद्र आवडतो. मुंबईला देखील त्याचं घर जुन्या वाडीत पण समुद्राच्या जवळ होत. तो तिला आणि त्यांच्या लेकीला रोज न्यायचा म्हणे समुद्रावर. पण मग ते तसं झाल आणि संध्या पार गप होऊन गेली. तिने म्हणे घरातून बाहेर पडणंच बंद करून टाकलं. अशोकच्या आईशी देखील तिच चांगलं पटायचं. त्यामुळे ही अशी गप्प झालेली त्यांनाच बघवल नाही आणि त्याच म्हणल्या तू बदली मागून घे. जागा बदलली की संध्या जुन्या आठवणी विसरेल. अशोकने जेव्हा बदलीचा विषय काढला तेव्हा संध्याने ते मान्य केल मात्र एकाच अटीवर की तिला समुद्रापासून लांब जायचं नव्हत. तिची अट त्याने मान्य केली आणि म्हणूनच या शांत गावात अशोकने बदली करून घेतली होती. पण दैव तरी कस असतं आपल्या घरातला झोपाळा त्या बिचाऱ्या संध्याच्या परत जुन्या दुखऱ्या आठवणी जागवतो.' विचार करता करता काकूंना झोप लागली.

सगळ काम आवरून काशी 'निघते' म्हणून सांगायला काकूंच्या खोलीत गेली. पण त्यांना झोप लागलेली बघून तशीच हलक्या पावलांनी बाहेर आली. तिने खोलीच दार ओढून घेतलं आणि ती तिच्या घरी जायला निघाली. बाहेर ओट्यावर झोपाळ्याजवळून पुढे जाताना तिच लक्ष सहजच अशोकच्या घराच्या दिशेने गेलं. खिडकीचा पडदा वाऱ्याने फडफडत होता. 'पडद्याच्या मागे कोणीतरी उभ आहे की काय?' काशीच्या मनात विचार आला. पण तिला थांबायला वेळ नव्हता. त्यामुळे मनातला विचार झटकून देऊन ती भराभर पावलं उचलून तिच्या घराकडे निघाली.

अलीकडे अशोक जोशी काका आणि काकूंना टाळायला लागला होता. कधीही भेटलं की ती दोघं संध्याची चौकशी करायची. अशोकच्या होणाऱ्या ओढाताणीबद्दल हळहळ व्यक्त करायची. त्यांच्या हळहळीच्या मागची त्यांची प्रामाणिक काळजी त्याला कळायची. पण तो तरी काय करणार होता? काका-काकूंनी कितीही आग्रह केला तरी अजूनही तो संध्याला त्यांच्या घरी घेऊन गेला नव्हता. ते त्याच्या हातात नव्हत. अर्थात त्याने तस काका काकूंना सांगितलं होत आणि त्या दोघांना पटल देखील होत. पण तरीही त्यांच्या डोळ्यातले ते 'बिच्चारा अशोक' भाव बघायला त्याला आवडत नव्हत.

मात्र एक दिवस अशोकला ऑफिसमधून यायला बराच वेळ झाला. त्यादिवशी अंधार झाला तरी त्याच्या घरातला एकही दिवा लागलेला नव्हता. काकूंनी ही गोष्ट काकांच्या लक्षात आणून दिली. दोघांनाही काळजी वाटायला लागली संध्याची. काकूंच्या डोळ्यात तर पाणी आल. त्या काकांना म्हणल्या,"आपली मनु त्या संध्या एवढीच असेल ना हो? जर मनु अडचणीत असती किंवा तिच्या बाबतीत अस काही झाल असत तर आपण असंच 'आपला काय संबंध;' असा विचार करून स्वस्थ बसलो असतो का?" काकूंच्या बोलण्याने काका देखील अस्वस्थ झाले आणि म्हणाले, "उगाच संध्याकाळच्या वेळी अस अशुभ बोलू नका तुम्ही. आपली मनु छान मजेत आहे तिच्या सासरी." तशी काकांजवळ जात आवाज चढवून काकू म्हणल्या,"उगाच विषयला बगल देऊ नका. एकतर त्या अशोकला फोन करा नाहीतर ही मी चालले त्याच्या घरी. त्या संध्याने दार उघडलं नाही तर कोणाला तरी बोलावून तोडून घेईन... समजल? हे तुमच्यासारख स्वस्थ बसून काय घडत आहे ते पहाण आता मला असह्य होतं आहे." काकूंचा तो अवतार बघून काका जागेवरून उठले आणि म्हणाले,"बर तुम्ही उगाच रागावू नका. मी बघतो जाऊन काय झालं आहे ते."

अस म्हणून काका अशोकच्या घराच्या दिशेने निघाले. काकू देखील त्यांच्या मागून हातात टोर्च घेऊन निघाल्या. काकांनी घराजवळ येऊन गेट जोरात उघडलं. त्याचा मोठा आवाज झाला. त्या आवाजाने काकू दचकल्या. काकांना तसही कमी ऐकायला यायचं. त्यामुळे ते शांत होते. दोघेही क्षण-दोन क्षण गेट जवळ थांबले. घरात काही हालचाल होते आहे का याचा अंदाज घेत. पण घरात काहीच हालचाल जाणवली नाही. म्हणून मग दोघेही आवारात शिरले आणि घराच्या दिशेने गेले. व्हरंड्यातला दिवा चालू होता. पण आत घरात कोणतीही जाग जाणवत नव्हती. काकांनी एकदा काकूंकडे बघितलं आणि दाराची बेल वाजवली. बेल वाजली नाही. पण ते काकांच्या लक्षात आल नाही. काकूंच्या मात्र आल. त्यामुळे त्यांनी काकांना म्हंटल,"अहो! बेल वाजत नाही वाटत. वीज गेली असेल का?" त्यावर काका मोठ्याने हसले आणि म्हणाले,"अग वीज नसती तर हा व्हरंड्यातला दिवा कसा लागला असता? तू म्हणजे ना काहीही बोलतेस. त्या संध्याने दाराची बेल बंद करून ठेवली असेल. कोणी वाजावालीच तर तिला त्रास नको म्हणून." काकुना ते पटल. "मग आता काय करायच?" त्यांनी नकळून काकांना विचारलं. काका म्हणाले."हाक मारून बघू आपण तिला. आजवर तिने आपल्याला टाळल आहे. आपणही कधी तिने भेटावं असा आग्रह नाही धरलेला. पण आज अजून अशोक आलेला नाही आणि तिने दिवा देखील लावलेला नाही. त्यामुळे आपण आता जर तिला हाक मारली तर ती ते समजू शकेल." काकूंना देखील ते पटल आणि त्या संध्याला हाका मारायला लागल्या. मात्र घरातून काही उत्तर येत नव्हत. आता काकूंना काळजी वाटायला लागली. त्या काकांना म्हणल्या,"तुम्ही इथेच उभे राहा. तिने दार उघडल आणि कोणी दिसल नाही तर ती गोंधळेल. मी घराला चक्कर मारून येते." अस म्हणून काकांना काही बोलायचा अवधी न देता हातातली टोर्च लावून त्या व्हरांड्यातून खाली उतरल्या.

काकूंनी घरला फेरी मारायला सुरवात केली आणि त्याच बरोबर संध्याला हाका मारायचा सपाटा लावला. त्या मागच्या दाराकडे आल्या आणि अचानक सोमोरून अशोकला धावत येताना बघून त्या दचकल्या. अशोक त्यांच्या जवळ आला आणि ओठांवर बोट ठेवत म्हणाला,"काकू ओरडू नका... ओरडू नका..." आणि काकूंना काही कळायच्या आत त्यांना जवळ जवळ ओढतच पुढच्या दाराशी घेऊन आला. काका पुढच्या दाराशी पायरीवर बसले होते. काकांना अस बसलेलं बघून काकू पुरत्या गोंधळल्या. त्यांनी प्रश्नार्थक नजरेने अशोककडे बघितले. अशोक अगदी हलक्या आवाजात काकूंना म्हणाला,"काकू त्या घटनेला आजच वर्ष झालं हो. म्हणून तर मी आज जाणारच नव्हतो. पण ऑफिसमधून फोन आला की मी एक खूप महत्वाच काम आहे. म्हणून मी गेलो. लवकर येणार होतो माझ्या संध्या राणीजवळ. पण कामाच्या रगाड्यात किती वाजले त्याच भानच राहिलं नाही." त्याच बोलण एकून काकू चुकचुकल्या आणि म्हणल्या,"वाटलचं मला घरात एकही दिवा लागलेला नाही म्हंटल्यावर. संध्या अस्वस्थ असेल. बर दार उघड बघू. मी येते तुझ्याबरोबर आत. ती बिचारी एकटी बसली आहे अंधारात. तिला आधाराची गरज आहे." अस म्हणून त्या व्हरांड्याच्या पायऱ्या चढायला लागल्या. त्याबरोबर त्यांना अडवत अशोक म्हणाला,"काकू तुम्ही नका येऊ आता. आता मी आलोय. मी सांभाळीन तिला." काकूंना त्याने हे अस अडवलेलं नाही आवडलं. त्याचा हात सारत त्या म्हणल्या,"अशोक माझी लेक अनु देखील साधारण तुझ्या संध्याच्याच वयाची आहे. जर अनुला काही त्रास झाला तर मी तिला अस एकट सोडीन का?" त्यावर निकराने काकूंना अडवत अशोक म्हणाला,"काकू मी तुमची काळजी समजू शकतो. पण तरीही तुम्ही नका येऊ आत्ता. कृपा करून जा तुम्ही दोघे इथून. आत्ता मला आणि माझ्या बायकोला एकट रहायचं आहे."

त्याने स्पष्ट शब्दात जायला सांगितलेलं एकून काकूंना अपमानापेक्षा देखील खूप वाईट वाटलं. त्यांच्या मते संध्या देखील एक स्त्री होती. आणि काकूंना तिच्या मनाची घालमेल कळत होती. त्यांना हे कळत नव्हत की अशोकला कोणत्या शब्दात समजावाव की आत्ता त्या मुलीला एका स्त्रीच्या आधाराची गरज जास्त असेल. त्यांनी परत काहीतरी बोलायला तोंड उघडल पण तेवढ्यात काका उभे राहिले आणि त्यांनी काकूंचा हात धरला. काकूंनी काकांकडे आश्चर्याने बघितल. तशी डोळ्यानेच समजूत घालून काका काकूंना घेऊन सावकाश चालत अशोकच्या घराच्या आवारातून बाहेर पडले.

काकांनी आपल्या घरी येऊन झोपाळ्यावर बसताना काकूंचा हात सोडला. काकू अजूनही अस्वस्थ होत्या. त्यांनी वळून अशोकच्या घराकडे बघितलं. संपूर्ण घरातले दिवे लागलेले होते. हळुवार आवाजात कोणत तरी गाणं देखील लागलं होत. त्यांनी नजर बारीक करून बघितलं तर त्यांच्या घराच्या बाजूच्या खिडकीत कोणीतरी उभं होतं असा त्यांना भास झाला. मात्र काही एक न बोलता त्या त्यांच्या घरात गेल्या.

काकू काहीही बोलत नव्हत्या. त्यांनी देवासमोर दिवा लावला आणि मनोमन त्याच्याकडे हात जोडून संध्याची खुशाली मागितली. मग त्या स्वयंपाकाला लागलेल्या काकांनी बघितले आणि ते शांतपणे झोपाळ्यावर झोके घेत बसले. त्यांनी एकदाही अशोकच्या घराकडे वळून बघितलेले नव्हते. काकू शांत वाटत असल्या तरी त्या मनातून मात्र अस्वस्थ होत्या. अशोक ज्या प्रकारे त्यांना घरात जाण्यासाठी अडवत होता त्यावरून आता त्यांच्या मनात एका शंकेने जागा घेतली होती. 'कदाचित् संध्याला हा अशोकच अडवत असेल आपल्याला भेटण्यापासून. तिला मारत असेल का तो? पण मग तिच्याबद्दल बोलताना किती हळवा होतो तो. नक्की काय प्रकार आहे हा?' काकूंच्या मनातले प्रश्नांचे आवर्त संपतच नव्हते.

काकूंनी स्वयंपाक उरकला आणि जेवायची पानं घेऊन त्या काकांना बोलवायला बाहेर आल्या. काका अजूनही झोपाळ्यावर बसून हलके हलके झोके घेत होते. मात्र त्यांचे डोळे मिटलेले होते. ते ताठ बसले होते आणि त्यांनी हाताची घडी घातली होती. काका काहीतरी खोल विचार करत आहेत हे काकूंच्या लक्षात आले. खरे तर काकांना त्यांच्या तंद्रीतून जागे करायचे काकूंच्या जीवावर आले होते. पण जेवाय्ही वेळ झाली होती. त्यामुळे काकूंनी मऊ आवाजात काकांना साद घातली. "अहो!" काकांनी डोळे उघडून काकूंकडे बघितले. "जेवायची वेळ झाली आहे. येताय ना?" काकूंनी काकांना विचारले. काकांचा चेहेरा गंभीर दिसत होता. त्यांनी होकारार्थी मान हलवली आणि झोके घेण्याचे थांबवून ते उभे राहिले. काकांना उभं राहिलेलं बघून काकू आत जाण्यासाठी वळल्या. तशी काकांनी काकूंना हाक मारली. "होय ग! ऐक." काकूंनी वळून काकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं. "मी जरा जाऊन येतो. अगदी पंधरा मिनिटात आलोच. माझ ताट पालथ घालून ठेव." अस अचानक काका बाहेर जायला निघाल्याचे बघून काकू गोंधळल्या. त्या पुढे आल्या आणि म्हणल्या,"अहो आता कुठे जाता इतक्या अंधाराच? माझ्या मनात देखील काही शंका उभ्या राहिल्या आहेत. बहुतेक हा अशोकच त्या संध्याला बाहेर पडू देत नाही किंवा कोणालाही भेटू देत नाही; अस मला वाटत. पण आत्ता तुम्ही आणि मी काय करणार? आपण दोघेही म्हातारे आहोत. तुम्ही आता त्याच्याकडे जाल आणि तो जर अंगावर धावून आला तर काय कराल? बर, या वेळेला कोणाची मदत मागायला जायचं तर त्यांना सगळं प्रकरण समजावून सांगाव लागेल. त्यात बराच वेळ जाईल आणि अजून रात्र चढेल. तेव्हा जे करायचं ते उद्या सकाळी करू. आजची एक रात्र जाऊ दे."

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

18 Jul 2017 - 1:24 pm | दिपक.कुवेत

दोन्हि भाग वाचले. उत्सुकता शीगेला पोचत चालली आहे. पटापट पुढिल भाग टाका.

एस's picture

18 Jul 2017 - 1:29 pm | एस
पुंबा's picture

18 Jul 2017 - 2:03 pm | पुंबा

मस्त!! पुभाप्र..

सिरुसेरि's picture

18 Jul 2017 - 3:54 pm | सिरुसेरि

थरारक कथा . पुभाप्र . हाउस ऑफ वॅक्सची आठवण झाली .

राजाभाउ's picture

18 Jul 2017 - 4:02 pm | राजाभाउ

पुभाप्र

ज्योति अळवणी's picture

18 Jul 2017 - 8:41 pm | ज्योति अळवणी

उद्याच पुढचा भाग टाकेन.

नक्की टाक. या वेळेस घटना कमी आणि वर्णन जास्त वाटतंय - पण म्हणजे छान च आहे :) फक्त नोटीस केलं.

आनन्दा's picture

18 Jul 2017 - 10:13 pm | आनन्दा

वाट पाहत आहोत.

आनन्दा's picture

18 Jul 2017 - 10:13 pm | आनन्दा

वाट पाहत आहोत.

निशाचर's picture

18 Jul 2017 - 8:44 pm | निशाचर

पुभाप्र

मस्त.. हा भाग वाचून उत्कंठा अजूनच वाढली आहे.