एक निर्णय (भाग 1)

Primary tabs

ज्योति अलवनि's picture
ज्योति अलवनि in जनातलं, मनातलं
18 Jan 2017 - 9:33 pm

एक निर्णय
भाग १

हॉलच्या दाराच्या एका बाजूला प्रशांत अस्वस्थपणे उभा होता. शाळेच्या वर्गाच गेटटूगेदर करण्याच ठरलं तेव्हा बिझी असूनही प्रशांतने वेळ काढला होता आणि एकूण हे गेटटूगेदर घडवून आणण्यासाठी खूप मेहेनत केली होती. त्याला फक्त एकच कारण होत. जे फक्त त्याच्या मनालाच माहित होत.............................

अचानक सुनिलने; त्याच्या शाळेतल्या खास दोस्ताने टोकल. "आली ती... बघ.. बघ... साल्या हाक तर मार..." आणि प्रशांतची तंद्री तुटली.....

समोरून मीनाक्षी येत होती. जवळ-जवळ 12 वर्षानंतर प्रशांत तिला बघत होता. ती खरच समोरून येते आहे याची त्याला खात्री नव्हती. पण ती तिच होती... तशीच शांत... फक्त डोळ्यांवर चष्मा होता. बाकी काहीच फरक नव्हता. मुद्धाम लवकर येऊन तिची वाट बघणाऱ्या प्रशांतला ती दिसताच मात्र गोंधळल्यासारख झाल होत.

"आली ती... बघ.. बघ... साल्या हाक तर मार..." सुन्याच तेच ते वाक्य....... चोवीस वर्षांपूर्वीच!

आणि त्याच्याही नकळत प्रशांत आठवीच्या वर्गात पोहोचला.....

शाळेचा दुसरा किंवा तिसराच दिवस होता. चेहेरा कोरा ठेवण्याचा प्रयत्न करत प्रशांतने पाठ फिरवली. डोळ्याच्या कोप-यातून लक्ष मात्र शाळेच्या गेटकड़े होत. मीनाक्षी.. नविन विद्यार्थिनी. आठवी अ मधे आली होती. फ़क्त सुनिल... प्रशांत... नाही तर अख्खा वर्ग तिच्या मागावर होता. अगदी मुलिसुद्धा. सगळ्यांची अगदी हमरीतुमरीवर येत पहिला मी पहिली मी म्हणत माहिती काढून झाली होती.

मीनाक्षी नेरूरकर. नाशिकहुन इथे आली होती. तिच्या शाळेतील सर्वात हुशार विद्यार्थिनी. एक लहान भाऊ. आपल्याच शाळेत पाचवी मधे. गोल मोहक चेहेरा. मोठे ब्राऊन डोळे. बॉब कट. मानेला झटका देऊन ते उडवायची सवय.... आणि पराकोटीची शिष्ठ!

शाळेतला सर्वात हुशार विद्यार्थी प्रशांत प्रधान. सर्वसाधारणपणे हुशार विद्यार्थी हेच सर्व गुण संपन्न असतात या सार्वत्रिक शालेय समजाप्रमाणे सर्व स्पर्धांमधुन, शाळेच्या वार्षिक सम्मेलनातून प्रशांतलाच भाग घेण्यास मिळत असे आणि तो त्यात चमकतही असे. त्यामुळे तो सर्व गुण संपन्न आहे हे त्याने सिद्ध देखील केले होते. गोरा गोमटा, स्मार्ट प्रशांत सर्व शिक्षकांचा लाडका होता. तो एक उत्तम वक्ता होता. नाटकं, वाद-विवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कथा कथन आणि वाचन अशा अनेक स्पर्धां मधून त्याने शाळेला कायम रिप्रेजेंट केले होते आणि अनेक ट्रॉफिज देखील मिळवल्या होत्या.

मात्र आता त्याच्या साम्राज्याला मिनाक्षीच्या रूपाने आव्हान उभे राहिले होते. कारण काही दिवसातच मोहक, स्मार्ट आणि हुशार मिनाक्षीने शिक्षकांचे लक्ष वेधुन घेतले होते. प्रशांत मनातून थोडा नाराज आणि थोडा धास्तावलेला होता. नाशिक सारख्या शाहरातून मुंबईमधे येउनही मीनाक्षी कधी गोंधळलेली किंवा बावचळलेली दिसली नाही. हळूहळू तिने प्रशांतला टक्कर द्यायला सुरवात केली; आणि साधारण त्या वयात जे होत तेच सुरु झाल. त्या दोघाना इतर मूल एकमेकांवरुन चिड़वायला लागली.

प्रशांतचा बेस्ट दोस्त सुनिल याने तर प्रशांतला हे पटवूनही दिल की तुम्ही दोघे हुशार... स्मार्ट वगैरे वगैरे आहात ... शिक्षकांचे लडके आहात... स्पर्धांमधुन भाग घेणारे आहात तर मग तुमची जोड़ी मस्त जमेल. त्या वयातली अक्कल तेवढीच् असते; त्याप्रमाणे सुनिलने प्रशांतला चढ़वले. मात्र त्याचा एक फायदा असा झाला की मीनाक्षी आणि प्रशांत एकमेकांचे शत्रु होण्याएवजी मित्र झाले. तिच्या मनात काय चालायचे ते प्रशांतला माहीत नव्हते; पण एकूण त्याला मात्र आवडायचे ते मित्रांचे चिडवणे आणि त्याची मीनाक्षी बरोबर झालेली मैत्री देखिल.

हळू हळू दोघांच्या गप्पा वाढल्या, अभ्यासावरील चर्चा वाढल्या, एकत्र स्पर्धांना जाणे वाढले..... आणि मग या सर्वाचा परिपाक म्हणजे .... इतरांचे त्यांना दोघाना चिड़वणे वाढले.

"अरे कमाल करता. अस काही नाही आमच्यात. काल तिचा निबंध राहिला म्हणून ती विचारत होती; इतकेच." किंवा "त्याला सायन्स जमत नव्हतं ग म्हणून आम्ही मधल्या सुट्टीत बसलो होतो... उगाच नको ते अर्थ काढू नकोस" अस दोघेही आपापल्या परीने मित्र मैत्रिणीना सांगत होते.

आठवी पास होऊन सर्व नववीमधे आले. प्रशांत पहिला आणि मीनाक्षी दूसरी. फ़क्त दीड मार्क्सचा फरक दोघात. शिक्षकांनी दोघांचही कौतुक केल. पण मीनाक्षीचा चेहेरा थोडा खट्टू झाला होता. मीनाक्षी अभ्यासाच्या बाबतीत जिद्दी आहे; हे प्रशांतने ओळखले होते. पण त्याचा स्वतः वर विश्वास होता.

"मिनाक्षी थोड़ हस्ताक्षर सुधार; बघ प्रशांतच्या पुढे जाशिल." शिक्षाकानी मिनाक्षीला सल्ला दिला. तिने तो बहुतेक मनावर घेतला होता. कारण नववी सुरु झाली आणि खरच मिनाक्षीचे हस्ताक्षर सुधारले आहे हे प्रशांतच्या लक्षात आले. त्याचा परिणाम तिच्या मार्क्स वाढण्यावर झाला. मीनाक्षी खुशीत होती.

त्यावर्षीच्या वार्षिक सम्मेलनाला नाटक होते. प्रशांत सिलेक्शनच्या वेळी नव्हता. पण त्याला वाटले नेहमी प्रमाणे तो असणारच. नाटकाच्या प्रैक्टिसच्या वेळी त्याला कळले तो नाही आहे नाटकात. मीनाक्षी आहे महत्वाच्या रोलमधे. का कुणास ठाऊक त्याला ते आवडले नाही. जिद्दिने त्याने एका डान्समधे भाग घेतला. त्या वर्षी पाहिले बक्षीस प्रशांतच्या डान्सला मिळाले. तो खुश झाला. अभ्यासा व्यतिरिक्तच्या गोष्टींमध्ये त्याच्या पुढे कोणी असलेल त्याला फारस आवाडत नसे.

कथा

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

18 Jan 2017 - 10:05 pm | पद्मावति

मस्त. वाचतेय.

किरण कुमार's picture

19 Jan 2017 - 3:33 pm | किरण कुमार

छान लिहिताय , थोडं फास्ट होते आहे असे वाटते , घटना अजून रंगवल्या तर अजून आवडेल

ज्योति अलवनि's picture

19 Jan 2017 - 3:59 pm | ज्योति अलवनि

धन्यवाद. पण खरी कथा ते दोघे मोठे झाल्या नंतर आहे. आणि उगाच रेंगाळत ठेवली तर टी.व्ही. वरच्या धारावाईका सारख कंटाळवाण होईल अस वाटल. म्हणून या गोष्टीला थोडा वेग ठेवला आहे. संपूर्ण गोष्ट वाचल्यानंतर देखील तुमचा प्रतिसाद नक्की द्या. मला तुमच मत समजून घ्यायला आवडेल.

संजय पाटिल's picture

21 Jan 2017 - 12:12 pm | संजय पाटिल

लवकर येउदे पुढचा भाग..

भाग्यश्री कुलकर्णी's picture

20 Jan 2017 - 1:45 pm | भाग्यश्री कुलकर्णी

वाचतेय. छान आहे.

पैसा's picture

20 Jan 2017 - 9:59 pm | पैसा

छान सुरुवात

ग्रेंजर's picture

21 Jan 2017 - 1:19 pm | ग्रेंजर

वाचतेय, आवडली कथा, पुभाप्र.