दहा वर्षांच्या मुलीच्या तिरळ्या डोळ्यांच्या उपचारासाठी सल्ला / उपाय / मार्गदर्शन हवे आहे

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in काथ्याकूट
31 Dec 2016 - 1:04 pm
गाभा: 

माझ्या परिचयातील एका मुलीला तिरळे डोळेआळशी डोळे हा त्रास आहे.

फॅक्टस अँड फिगर्स:

  • मुलीचे सध्या वय: दहा वर्षे आहे. तिरळेपणाचे व आळशी डोळ्याचे पहिल्यांदा निदान पाच वर्षांपूर्वी झाले.
  • निदानानंतर, दोन डोळ्यांना वेगवेगळ्या नंबरचा चष्मा आणि तिरळा+आळशी नसलेला, चांगला डोळा झाकण्यासाठी पॅच असा उपचार सुरु केला. औषधे ड्रॉप्स इ दिलेले नव्हते.
  • उजवा डोळा सामान्य आहे आणि त्यात +१.० पॉईंट आहे. डाव्या (तिरळ्या व आळशी) डोळ्यात सध्या + ६.५ पॉईंट आहे, हा नंबर मागच्या पाच वर्षांत कमी-जास्त झाला आहे. उपचार या डोळ्यावर सुरु आहेत.
  • आतापर्यंत पाच सहा वेळा चष्मा बदलला आहे. साधारणतः सहा आठ महिन्यांत एकदा तिच्या डोळ्यांची तपासणी होते. मागच्या एक वर्षात तिच्या डाव्या डोळ्याचा नंबर वाढला आहे. म्हणजेच तो डोळा अधिकाधिक आळशी होत आहे असे वाटते.
  • डोळ्याचा तिरळेपणा स्थिर नाही. म्हणजे फोकस एकाच बाजूला आणि एकाच अंशात नाही.

निदानानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने तीन वर्षे आइ पॅच लावणे सुरु होते, पण त्या मुलीच्या मित्र-मैत्रीचे टोमणे/ सहानुभूती, मोठ्या माणसांची (त्या मुलीसमोरच प्रकट होणारी) खरीखोटी हळहळ, दिवसातून पाच-सहा सतत पॅच लावण्यातून होणारी अडचण, खेळताना, पावसात भिजताना आणि इतर अनेक वेळी होणारी चष्मा सांभाळण्याची अडचण यामुळे पॅच लावणे हळूहळू कमी झाले आणि आता पूर्णपणे थांबले आहे.
चारपाच तास पॅच लावला तर दोन्ही डोळे एकाच फोकसमध्ये येतात. ती शाळेतून आल्यावर काही वेळा डोळे एका फोकस मध्ये असतात.
पॅच लावल्याने किंवा इतर कोणत्या कारणाने, डावा डोळा उजव्या डोळ्याच्या तुलनेत किंचित मोठा दिसतो.
मुलीला तीन नामांकित डॉक्टरांकडे दाखवले, दोन डॉक्टरांनी तिरळेपणासाठी शस्त्रक्रिया करा तर एका डॉक्टरांनी पॅच लावणे सुरु ठेवा असे सांगितले.
अजून काही डॉक्टरांनी डोळ्याचा आळशीपणा कधीच जाणार नाही, नक्की जाईल, तिरळेपणा पॅचमुळेच जाईल, जाणार नाही, शस्त्रक्रिया हाच एकमेव इलाज आहे, शस्त्रक्रिया आताच करता येणार नाही, किमान १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच करावी, अशी वेगवेगळी मते दिली.

इतर निरीक्षणे:
मुलीच्या एका आत्याला किंचित तिरळेपणा आहे.
मुलीच्या वडिलांचे दोन्ही डोळे सामान्य आहेत, तिरळेपण/ आळशीपणा नाही. चाळिशीला आलेत आणि अजून चाळीशी लागलेली नाही. आइटीत काम करतात.
मुलीच्या आईला तिरळेपण नाही. मुलीच्या आईचा एक डोळा (बहुधा लहानपणापासूनच) आळशी आहे. हे त्या मुलीच्या डोळ्यांची तपासणी करताना, ‘आपणही आपल्या डोळ्याचा नंबर तपासावा’ असे वाटून तपासणी केल्यावर कळले. आजवर आईला आळशीपणाचा काहीही त्रास झालेला नाही, खरंतर, डोळा आळशी आहे हेच ३० वर्षांपर्यंत माहित नव्हते.
आईच्या डोळ्याचा आळशीपणा अनुवंशिकतेने मुलीत उतरला आहे असेही एका डॉक्टरांनी सांगितले.
तिरळेपणा दिसण्यापूर्वी मुलगी तापामुळे तीन दिवस आजारी होती, ताप उतरल्यावर एक दोन आठवड्यात तिरळेपणा दिसून आला, आळशीपणा आधीपासूनच होता की नाही हे कळले नाही.
वयाच्या पाच वर्षांपूर्वी, किमान तीन दिवस ताप राहिल्यानंतर तिरळेपणा आलेल्या अजून दोन मुली माझ्या परिचयात आहेत.
मुलगी पाच वर्षांची असताना, सुरुवातीला तिला चष्म्याच्या रंगीबेरंगी फ्रेमा / मऊमऊ पॅचेस याची मौज वाटायची. पण साहजिकपणे तो उत्साह लवकरच संपला. नंतर-नंतर, परिचयातील व्यक्तींची तिला पाहून तिच्यापुढेच व्यक्त होणारी कणव, सहानुभूतीची दृष्टी इ मुळे आपल्यात काहीतरी वेगळे आहे आणि ते समाजात सहजासहजी स्वीकारार्ह नाही / दयपात्र आहे असे बहुधा तिला वाटू लागले.
ती निरोगी आहे, तिचं हास्य सुरुवातीपासून फारच गोड आहे, चेहरा फोटोजेनिक आहे आणि फोटो काढताना कशी पोज द्यावी ह्याची तिला नैसर्गिक जाण आहे. आपला इतरांनी फोटो काढावा याचीही तिला बालसुलभ आवड आहे.
मध्यंतरी तिचा सर्व उत्साह मावळला होता, विशेषतः फोटो काढताना / एखाद्या समारंभासाठी नटून-थटून जायला ती फारशी उत्साही नसायची. आपल्या फोटोंचे अल्बम्स कम्प्युटरवर पाहणारी, इतरांना उत्साहाने दाखवणारी ती जणूकाही कुठेतरी हरवून गेली होती. एक-दोनदा तर तिने तिच्या फोटोतील डोळे “फोटोशॉपने “चांगले” करून दे” असंही म्हणून दाखवलं होतं.
ती सध्या बरीचशी परिपकव् झाली आहे आणि आपल्याला बहुधा आयष्याभर चष्मा राहणार आहे हे तिने स्वीकारले आहे. तिचा उत्साह परत आला आहे.

सदर मुलीच्या डोळ्याचा तिरळेपणा व आळशीपणा यावर उपाय, उपचार, विश्वासाचे आणि अनुभवाचे डॉक्टर्स, दवाखाने, माहिती, अनुभव, निरीक्षणे, मार्गदर्शन इत्यादीसंदर्भात प्रतिसाद द्यावेत ही विनंती.

प्रतिक्रिया

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मताच्या प्रतीक्षेत.

मुलीला आणि तिच्या पालकांना मनापासून शुभेच्छा. डॉक्टरांची माहिती व्यनी करत आहे.

मुलीच्या मनात काय काय चालत असेल, तिला अवतीभवतीच्या लहान मोठ्यांची उत्सुकता, भोचकपणा, कणव, दुष्टपणा, अडाणीपणा ह्या सर्वांचा सामना करावा लागत असेल ह्या विचारानेच छाती दडपली आहे.

शस्त्रक्रिया करून तिरळेपणा गेलेली एक व्यक्ती ओळखीची आहे. फक्त इतक्या लहान वयात करणे योग्य आहे की नाही हे माहीत नाही. मुलीच्या मित्र मैत्रिणी आणि त्यांच्या आईवडिलांना, इतर ज्येष्ठ नातेवाईकांना मुलीच्या अनुपस्थितीत तिच्यावर सुरु असलेल्या उपचारांची माहिती देऊन ठेवा आणि तिला पाहता क्षणी कुणी रिऍक्ट करू नका अशी विनंती करून बघा. छोटूलीला खूप साऱ्या शुभेच्छा :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Dec 2016 - 1:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

संस्थळावरून फक्त डोळ्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या नाव-पत्त्याची माहिती घ्यावी व नंतर त्यातल्या तुमच्या निवडीच्या तज्ज्ञाकडून सल्ला घ्यावा असे सुचवतो.

कपिलमुनी's picture

31 Dec 2016 - 2:57 pm | कपिलमुनी

+१

अभिजीत अवलिया's picture

31 Dec 2016 - 3:52 pm | अभिजीत अवलिया

सहमत.

एक तज्ञ डाॅक्टर —
प्रितम शहा, दसरा चौक, कोल्हापूर.

आनंदी गोपाळ's picture

1 Jan 2017 - 4:03 pm | आनंदी गोपाळ

तिरळेपणासाठी पेडिअ‍ॅट्रिक ऑफ्थॅल्मॉलॉजी नावाची नवी सबस्पेशाल्टी आजकाल उपलब्ध आहे. त्यांचा सल्ला घ्या. अतीप्रसिद्ध वगैरे असलेत तरी जनरल ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट अगदी रेटिना तज्ज्ञ वगैरेही इथे उपयोगी नाहीत.

मुलीला अन-आयसो-मेट्रोपिक अम्ब्लायोपिया, अर्थात, दोन डोळ्यांचा नंबर सारखा नसल्याने आलेला बोथट्/आळशीपणा आहे. याच्या उपचारासाठी पॅचिंग हा एकमेव इलाज आहे. सोबत तिरळ्या डोळ्याच्या कामाची पद्धत, सध्याची नजर कशी व किती आहे, यावर पॅचिंग कसे करतात ते ठरते.

पॅचिंगचा इफेक्ट येण्यासाठी ११ वर्षे पर्यंतचे वय उपयुक्त असते. त्यानंतर पॅचिंगने नजर वाढणे कठीण असते. सुरुवातीस दिलेला उपचार अर्धवट करणे ही मोठी चूक होती. अजून १ वर्ष आहे, तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करून पहा.

ऑपरेशन ने डोळा कॉस्मेटिकली सरळ होईल, पण त्याची नजर १००% नसेल तर कालांतराने (काही/बरेच वर्षांनी) पुन्हा तिरळा होऊ शकतो. त्यामुळेच साधारणतः लग्नाच्या वया-आसपास ऑपरेशन सांगतात, (१८ नंतर). सर्जरी केल्यास नक्की कोणत्या स्नायूवर व काय ऑपरेशन केले त्याचे डीटेल्स जपून ठेवा. (डोळा फिरवणारे एका डोळ्याचे ६ स्नायू असतात, त्यांना आखूड्/लांब्/कमकुवत इ. करून ऑपरेशन करतात.)

आनंदी गोपाळ's picture

1 Jan 2017 - 4:09 pm | आनंदी गोपाळ

ऑपरेशन केले तर दोन्ही डोळ्यांवर करतील. म्हणजेच, तिरळा नसलेला डोळाही कापतील, हे नॉर्मल आहे. दोन डोळ्यांचा बॅलन्स करायचा असतो, ऑपर्शन दोन्हीकडे होईल.

पहिल्या ऑपमधे डोळे पूर्ण सरळ झाले नाहीत तर पुन्हा ऑपरेशन करू असेही सांगतील. काळजी करू नका.

भक्त प्रल्हाद's picture

2 Jan 2017 - 7:35 am | भक्त प्रल्हाद

पुण्यात भापकर पेट्रोल पंपाजवळ डॉक्टर झंवर आहेत.
अतिशय अनुभवी आणि तज्ञ आहेत.
भरपुर फी घेतात, पण उगाचच शस्त्रक्रिया करायला लावत नाहीत.
गरीब व्यक्तींना फी मध्ये सवलत पण देतात (दोन्ही प्रकारचे अनुभव घेतलेत).
माझ्या बायकोला आक्सिडेंट मुळे डोळा अर्धा उघडा राहण्याचा त्रास होता. तिला कोल्हापुर मध्ये खूप घाबरवुन सोडले होते पण यांनी सांगितलं कि शस्त्रक्रिया अजिबात गरजेची नाही.
आता तिरळेपणाचे ऑपरेशन करायचे आहे २ महिन्यात त्यांच्याकडेच.

वामन देशमुख's picture

4 Jan 2017 - 9:18 am | वामन देशमुख

सर्व प्रतिसादांकाचे आभार.

इथे मिळालेली माहिती व डॉक्टरांचे पत्ते संबंधितांपर्यंत पोहोचवले आहेत.

उपेक्षित's picture

4 Jan 2017 - 2:25 pm | उपेक्षित

पुण्यात पाटील प्लाझामध्ये (सारसबागेजवळ) डॉ अमोद गोगटे / दीप्ती गोगटे यांचे क्लिनिक आहे तिथे खास तिरळेपणावर उपचारासाठी डोळ्यांच्या व्यायामाची मशीन्स आहेत ( डॉ दाम्पत्य खूप जुने आहे) तिथे एकदा दाखवून घ्या.

सावत्या's picture

4 Jan 2017 - 6:53 pm | सावत्या

मुंबईत घाटकोपर आणि व्हीले पार्लेला डॉक्टर विराम अग्रवाल यांच व्हिजन योगा क्लिनिक आहे. वेबसाइटवर कॉनटॅक्ट डीटेल्स मिलतील. तुम्हाला अपायंटमेंट घ्यावी लागेल. ते पॅचिंग एक्सर्साइज़ देतात. बरयाच लोकान्ना चांगला अनुभव आलाय.

जॅक डनियल्स's picture

8 Jan 2017 - 7:57 am | जॅक डनियल्स

मला स्वतः ला ३ वर्षाचा असताना ताप येऊन डोळे तिरळे झाले होते. १९८७-९० पर्यंत चष्मा वापरून पहिला, पुण्यातल्या त्यावेळच्या सगळ्या तज्ञांचे सल्ले घेतले होते. चष्मा आणि त्याच्याबरोबर होमेपथी पण चालू केले होती. शेवटी , डॉ. सल्ल्याने ,माझी माझी मोठ्या गटाची (सिनिअर केजी) ची परीक्षा झाल्यावर (वय ६ वर्ष )डॉ. सुधीर काळेनी माझ्या दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया केली. माझा तिरळेपणा गेला पूर्ण. त्या दिवसा पासून मी -३ चा चष्मा लावतो. cylindrical आणि sphrerical असे दोन्ही नंबर आहेत मला. आत्ता त्यांचा मुलगा डॉ. सुनील काळे कार्यरत आहे, कोथरूड मध्ये डहाणूकर कॉलनी मध्ये हॉस्पिटल आहे.
अजून काही माहिती हवी असल्यास व्यनी करावा.

जेडी.

वामन देशमुख's picture

9 Jun 2022 - 11:20 am | वामन देशमुख

या महिन्यात सदर मुलीची तिरळेपणा घालविण्यासाठी शस्त्रक्रिया करायचे ठरले आहे.

अशा शस्त्रक्रियेतून (planned surgery) काही नुकसान झाले तर आर्थिक भरपाई मिळावी असा कोणता विमा भारतात आहे का / असतो का?

योग्य माहिती देणाऱ्यांचे आगाऊ आभार.

श्रीगुरुजी's picture

9 Jun 2022 - 1:41 pm | श्रीगुरुजी

पुण्यात NIO या संस्थेत तज्ज्ञ डॉक्टर योग्य तो सल्ला देतील. डॉ. आदित्य केळकर, डॉ. जाई केळकर व इतर अनेक नेत्रतज्ज्ञ तेथे आहेत.

सिरुसेरि's picture

12 Jun 2022 - 9:03 pm | सिरुसेरि

NIO हेच सुचवणार होतो . +१

कर्नलतपस्वी's picture

9 Jun 2022 - 8:31 pm | कर्नलतपस्वी

नेत्रशल्य चिकित्सा भरपूर प्रगत झाली आहे. NIO,H V DESAI EYE HOSP PUNE दोन्हीत चांगला उपचार होऊ शकतो. शंकर नेत्रालय चेन्नई अंत्यत प्रगत व अत्याधुनिक प्रसिद्ध नेत्र हॉस्पीटल आहे. काळजीपूर्वक उपचार होणे महत्वाचे,हयगय केल्यास आयुष्यभराचे नुकसान होऊ शकते.
असाध्य नाही.

कंजूस's picture

9 Jun 2022 - 10:42 pm | कंजूस

असा काही विवक्षित विमा असतो का याबद्दल विचारत आहेत.

वामन देशमुख's picture

12 Jun 2022 - 10:41 pm | वामन देशमुख

कंकाका,

अशा शस्त्रक्रियेतून (planned surgery) काही नुकसान झाले तर आर्थिक भरपाई मिळावी असा कोणता विमा भारतात आहे का / असतो का?

माझा सध्याचा प्रश्न हाच आहे.

वामन देशमुख's picture

2 Sep 2023 - 1:51 pm | वामन देशमुख

सदर मुलीच्या डोळयाचे तिरळेपण घालविण्याची शस्त्रक्रिया चार महिन्यांपूर्वी यशस्वीरीतीने करण्यात आली. तीन महिने ड्रॉप्स, काही थेराप्युटिक गोळ्या आणि चांगल्या डोळ्यावर पॅच अशी ट्रीटमेंट देण्यात आली.

आता तिला तिरळेपणा नाही. तथापि डाव्या-उजव्या डोळ्यांच्या दृष्टीतील फरक तसाच आहे. तो सुधारण्याची शक्यता अगदी कमी आहे. पण चष्म्याद्वारे ती जवळचे - दूरचे अगदी स्पष्ट पाहू शकते. तिच्याकडे पाहून तिला पूर्वी तिरळेपणा होता असे वाटतही नाही.

---

मिपावरील सल्ल्यांबद्धल तिच्यातर्फे आभार.