आमला मुर्ग

केडी's picture
केडी in पाककृती
26 Dec 2016 - 11:15 am

Amla Murg-1

साहित्य
७०० ते ८०० ग्रॅम चिकन, तुकडे करून
६ ते ८ मोठे आवळे
१ इंच आलं
१० ते १२ लसूण पाकळ्या
४ ते ६ हिरव्या मिरच्या
२ माध्यम आकाराचे कांदे
१ चमचा गरम मसाला
१ चमचा लाल तिखट
१/२ चमचा हळद
१ चमचा धने पावडर
१/२ चमचा जिरें पावडर
मीठ, चवीनुसार
२ कप पाणी
३ मोठे चमचे तेल
थोडी कोथिंबीर, चिरून

हि पाककृती मला कैरी मुर्ग वरून सुचली. घरात आवळे होते, कैरी ऐवजी ते वापरून बघितले, आणि आंबट तिखट असा चिकन चा रस्सा जिरा राईस बरोबर ओरपला! ह्याची ग्रेव्ही शक्यतो जरा पातळच ठेवायची, म्हणजे भाता बरोबर खाताना लज्जत येते!

कृती
आवळ्याच्या बिया काढून फोडी करून घ्या. निम्म्या फोडी, अर्ध आलं, निम्म्या लसूण पाकळ्या, निम्म्या हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंसं मीठ घालून मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.

चिकनचे तुकडे स्वच्छ धुऊन, कोरडे करून घ्या. ह्या तुकड्यांना वाटलेला मसाला लावून, चिकन किमान एक तास मुरत ठेवा (कच्चे चिकन कायम फ्रिज मध्ये ठेवावे, मुरताना सुद्धा).

कांदे, उरलेलं आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या मिक्सर मधून बारीक वाटून घ्या. पॅन मध्ये तेल घालून, हे मिश्रण परतून घ्या. मिश्रण छान परतून झालं, हि ह्यात मुरलेले चिकनचे तुकडे घालून, मोठ्या गॅस वर ५ ते ६ मिनिटे परतून घ्या. परतताना ह्यात, लाल तिखट, हळद, जिरें आणि धने पावडर घाला. मसाला सगळ्या चिकनच्या तुकड्यांना व्यवस्थित लागला, आणि चिकनचा रंग पांढरट झाला, कि गॅस बारीक करून, पॅन मध्ये २ कप पाणी घाला. पॅन वर झाकण ठेवून, चिकन मंद आचेवर शिजू द्या (साधारण २० ते २५ मिनिटे). अधून मधून हलवत राहा. चिकन शिजत आलं, कि त्यात उरलेले आवळ्याचे तुकडे, गरम मसाला घालून पुन्हा झाकण ठेऊन अजून ५ ते ७ मिनिटे शिजून घ्या. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून, चव बघून लागेल तसं मीठ घाला.

जिरा राईस किंवा पोळी, बरोबर गरम गरम खायला घ्या!!

Amla Murg-2

प्रतिक्रिया

मागल्या आठवड्यात प्रकाशित केलेली, पण server down झाल्यामुळे उडालेली पाकृ परत टाकत आहे. ह्या वेळी फोटो दिसतील अशी अपेक्षा आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jan 2017 - 6:34 pm | अत्रुप्त आत्मा

प्र'कटण सुरू-

क्रिप्या आपून लवकरात लवकर एक हाटेल काडावे, आनी अश्या इविध पा. क्रु. करूण त्या खान्यास थितेच बलवावे. हिते फोटू टाकूण छळू णये. अशी विणम्र विणंती!

प्र'कटण खलास! ढण्यवाड!

देव करो आणि तुमची हि ईच्छा पूर्ण होवो!
:-) :-)

कैवल्यसिंह's picture

2 Jan 2017 - 8:36 pm | कैवल्यसिंह

मस्त पाककृती आहे... यात चिकन ऐवजी मटन व फिश वापर्लेतर चालते का?

मटण चालू शकेल, पण ते आधी शिजवून घ्या किंवा मग प्रेशर कुकर मध्ये ५ ते ६ शिट्ट्या काढून आमला मटण शिजवावे.

नरेश माने's picture

3 Jan 2017 - 12:46 pm | नरेश माने

मस्त पाक़कृती आणि फोटो एकदम तोंपासु.