अभियंता दिवसाच्या निमित्ताने।।।

क्षमस्व's picture
क्षमस्व in जनातलं, मनातलं
15 Sep 2016 - 6:36 pm

इंजिनीयरींगची चार वर्षे...

तसे सगळेच इंजिनीयर स्वत:ला आम्ही चार वर्षे घासून इंजिनीयरींग पुर्ण केली असं म्हणतात. अगदीच खरंय हे. मि व माझ्या साथीदारांसाठी ती घासाघासीच होती. सुरुवात होते ती अगदी कॉलेजच्या लोकेशनपासून.

कॉलेज तसं अडगळीत, ग्रामिण भागात. आजूबाजूला लोकवस्ती विरळ. ७-८ किलोमिटर वर बाजारपेठ. बाजारपेठेपासून कॉलेजपर्यंत दिवसाला दोनच बसेस. रिक्षासाठी २ किलोमिटर पर्यंत पायपीट करावी लागायची. बाईक्स मोजक्याच. त्याही दिवसभर कुणी ना कुणी ठरवलेल्या असायच्या. कॉलेजला करमणूक म्हणून लेडीज हॉस्टेल, कँटीन, ग्राऊंड नाहीतर वेज प्लॉट.

पहिल्या वर्षी येणाऱ्या मुलांसाठी प्रचंड सहनशक्ती घेऊन लागत असे. सहनशक्ती यासाठी, वरील नमुद केल्याप्रमाणे आपला संबंध जगाशी येत नाही हे लक्षात येते. रॅगिंगचा संबंध नाही पण थोडं फार सिनीअर्सना रिस्पेक्ट द्यावा लागतो. तो ही नंतर विरळ होऊन जातो. नंतर भाऊ लोक्स बनतात सगळे.

मेसला चालणारा धिंगाणा. कैद्यांसारखी ताटे वाजावायची. टिव्ही वर मॅच लागली की ताटांची आदळाआपट ठरलेलीच असायची. पहिल्या दिवशी घरातून एक ताट, वाटी, बादली, ग्लास, मग, टूथपेस्ट, तेल इ. आवश्यक गोष्टी सोबत आणायचो. पण काहीच दिवसांत या सर्व गोष्टी एका रुम साठी झाल्या तर डिग्री संपता संपता एका हॉस्टेलसाठी या वस्तू झाल्या. एका ताटात ७-८ जण जेवायचो. ही अतिशयोक्ती नाहीय. विश्वास नसेल तर अजूनही जाऊन बघू शकता. शेवटी शेवटी एकही ताट, बादली, टूथपेस्ट, तेल उरलं नव्हतं. मग ज्युनिअर कडून बादली, ताट घ्यावी लागायची. टूथपेस्ट साठी हॉस्टेलभर भिक मागायची.

आमच्या वेळी कॉलेजची बिल्डींग म्हणावी तशी अवाढव्य नव्हती पण आम्ही जाता कधी भव्य मोठी झाली ते कळालंच नाही. १५-२० कोटीची बिल्डींग, अॅडवान्स लॅबरोटरीज, वेगवेगळे छोटे प्लांटस्. प्रचंड मोठे ग्राऊंड. सुसज्ज जिम आधी पासूनच होती. आधी काही दिवस जायचो पण नंतर अंग दुखायला लागले. सोडून दिली.

अभ्यासाचा खूप ताण घ्यावा असं सांगणारे नंतर अफवा पसरवणारे वाटतात. पहिल्या सेमिस्टरला केटी लागणारे दु:खात डुबून जातात तर क्लियर झालेले हवेत असतात. माझ्या सारखा माणूस एक केटी काय लागते आणि हे सगळं सोडून जायचा विचार करीत होता. आता हसायला येतं. परिक्षेच्या आधी एक दिवस नोटस् मिळायच्या. रात्रीत अभ्यास. दुसऱ्या दिवशी एकमेकांवर ढकलून पेपरला बसायचो. सरांनी एक सांगितले होते, काही झाले तरी पेपर कोरा ठेवायचा नाही. त्याचीच पुर्तता म्हणून अगदी काही येत नसले तरी पेपर काळा करून येत होतो. पास व्हायचो. आमचे सर सांगायचे, जो इथे राहायला शिकला तो जगातील कुठल्याही कोपऱ्यात राहील. खरंच होतं ते. लायब्रेरीत नावाला जात होतो, खरं तर पोरींना बघण्यासाठी जायचे. ज्यांची त्यांची तो/ती आला की फोन करून सांगायचो.

कॉलेजचे अतिउत्साहाचे दिवस म्हणजे स्पोर्टस् डेज, गॅदरींग, शिवजयंती. अतिधमाल असते या दिवसांत. प्रचंड उत्साह असतो सगळ्यांच्या चेहऱ्यावर.

रात्री बेरात्री कानात हेडफोन टाकून पुर्ण केलेले मॅन्युअल्स्. एकाची झालेली एखादी चुक तिच कॅरी फॉरवर्ड व्हायची. कपडे धुणे खूपदा कंटाळवाणे असायचे. रात्री रस्त्यावर बसून गप्पा. सगळं सगळं विचित्र होतं.

लेडीज हॉस्टेल ला एकच कॉईन बॉक्स होता आधी. नंतर मोबाईल अलाऊड झाले. त्याआधी प्रेमवीरांची रांग लागलेली असायची. सगळेच वेटींगवर असायचे फोन लावायला. अगदीच एक दीड तासाने कुणाचा तरी नंबर लागायचा. फोन अलाऊड झाल्यावर मात्र प्रेमवीर रात्र रात्र जागून प्रेमाचा अविष्कार साजरा करीत.

शेवटच्या वर्षातला प्रोजेक्ट. किती धावपळ. इंटरनेटसाठी बाईक्सने रात्री रात्री बाजारपेठेत जावे लागायचे. शेवटची व्हायवा. शेवटचा निरोप समारंभ. शेवटचे हॉस्टेल सोडताना एकमेकांना मिठी मारून रडणारे झाले होते सगळेच. कुणीच यातून सुटला नाही. एकमेकांच्या संपर्कात राहू असं वचनबद्ध होऊन निघालेलो आम्ही नंतर आप आपल्या व्यापून गेलो. आता नाही ती दोस्ती, नाही तो दंगा, नाही लेडीज हॉस्टेल, नाही ग्राऊंड, नाही कँटीन, नाही लायब्रेरी... काहीच नाही... राडा, मॅटर, साप हे आमच्या कॉलेजच्या डिक्शनरीतले शब्द. तसेच जगतात सगळे. आता सगळे पोटाच्या मागे लागलोत. लागलंच पाहीजे ना? अस्तित्वाची लढाई जी सुरु झाली आहे, तुमची माझी सगळ्यांचीच...!

मिस यू गायज्....

असे घडणाऱ्या सर्व इंजिनीयर्सना" इंजिनीअर्स डे" च्या हार्दिक शुभेच्छा.

-- *सर्व इंजिनियर्स ना समर्पित* *अजेश पवार*
आभार- विजय तारा नामदेव

मुक्तकतंत्र

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

15 Sep 2016 - 6:43 pm | प्रचेतस

इंजीनियर लोकांची एक गंमतच असते. आपणच कसे हॉस्टेलमध्ये, नाइट्स कशा मारल्यात, सबमिशन कसं केलं, एटीकेटी मिळवून कसे शेवटी पास झालो, लफडी कशी केली वगैरे वगैरे.

सुबोध खरे's picture

15 Sep 2016 - 6:45 pm | सुबोध खरे

+ १

संदीप डांगे's picture

15 Sep 2016 - 7:18 pm | संदीप डांगे

अचूक! ;)

फेरफटका's picture

15 Sep 2016 - 7:53 pm | फेरफटका

गंमत खरी. पण ती नंतर सांगताना वाटते. त्यातून जाताना जीवावरचं दुखणं असतं ते. त्यातून काही भलतेच रेग्युलर, सिन्सीअर विद्यार्थी असतात, ते अशा वेळी भयंकर कॉप्लेक्स देण्याचं कार्य चोख बजावतात.

इंजीनियर मुलींना असे अनुभव येत नाहीत बहुतेक!

प्रचेतस's picture

15 Sep 2016 - 9:38 pm | प्रचेतस

अगदी अगदी.

संदीप डांगे's picture

15 Sep 2016 - 10:19 pm | संदीप डांगे

=)) बोकेशा, क ह र!!!

सतिश गावडे's picture

15 Sep 2016 - 11:02 pm | सतिश गावडे

नाही येत. का ते माहीती करुन घेण्यासाठी ईच्छुकांनी "प्यार का पंचनामा" चित्रपट पहावा.

त्या ते भयंकर कॉम्प्लेक्स देण्याचं काम करतात ;)

अनिरुद्ध.वैद्य's picture

16 Sep 2016 - 7:39 am | अनिरुद्ध.वैद्य

बाया इंजिनियरसाठी प्रॅक्टिकल जर्नल अन नोट्स वह्या भरून देतच त नाईट मारतात ;)

सिरुसेरि's picture

15 Sep 2016 - 6:48 pm | सिरुसेरि

ते जीटी मारली राहिलं का ?

अजेश पवार कोण? त्यांचे लेखन आहे का हे?
विजय तारा नामदेव - ह्यांचे आभार का? त्यांनी दिले का तुम्हांला इथे लिहिण्यासाठी?

क्षमस्व's picture

16 Sep 2016 - 5:45 am | क्षमस्व

अजेश पवार यांचे विचार शब्दबद्ध करून विजय तारा नामदेव यांनी लिहिले।
ते लिखाण मिपावर टाकण्यास परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभार।।।

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

15 Sep 2016 - 8:00 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

मीदेखिल इन्जिनियरिंग डिप्लोमा केलेला . १९९२-९६ . तीन वर्षाच्या डिप्लोमा ला चार वर्ष लागली.
पहिल्याच वर्षी दहावीतून डायरेक्ट आड्मिशन. त्यामुळॅ गणित अवघडच गेलं . दोन्ही वर्षी केट्या लागल्य्या ना भौ

पहिल्याच वर्शी बाबरी दन्गल अन बॉम्बस्फोट मुळे ज्याम टेन्शन ,कारण मिया मित्र पण होते बरोबर

दहीहन्डी जोरात धम्माल व्हायची होस्टेल ला . सेकन्ड यिअर ला आम्ही सीनियर म्हणुन मग पक्षीनिरिक्षण आवडता उद्योग. कॉलेज च्या मागच्या बाजुच्या गेट च नावच वासुनाका बनलेलं ना भाउ

मग थर्ड यिअर ला आपला जिगरी फ्रेन्ड सेक्रेटरी झाला. मग काय? सत्यनारायण पूजा ,गॅदरिन्ग , ऑर्क्र्स्ट्रा फूल धम्माल ...

अपना भी कोई था उस जमाने मे ... बहुत मरते थे उसपर ... मगर बता न सके .... हाय

आजही ते दिवस आठवले की नॉस्टेल्जिक होतो....आणि साला मग ब्लेन्डर्स प्राइड चा आधार घ्यावा लागतोच!

आणि सोबतीला किशोर दादा द ग्रेट ची गाणी हवीतच!

सस्नेह's picture

15 Sep 2016 - 8:26 pm | सस्नेह

छान लिहिलय. अगदी अचूक !

जव्हेरगंज's picture

15 Sep 2016 - 9:07 pm | जव्हेरगंज

ग्रेट!

सतिश गावडे's picture

15 Sep 2016 - 10:14 pm | सतिश गावडे

BATU?

एक एकटा एकटाच's picture

15 Sep 2016 - 10:53 pm | एक एकटा एकटाच

जुन्या आठवणींना उजाळा मिळाला

जयन्त बा शिम्पि's picture

16 Sep 2016 - 12:09 am | जयन्त बा शिम्पि

आता काय सांगावं तुम्हाला ? आम्ही जुन्या जमान्यातील विंजेनीर झालेलो,( १९६७ ते १९७० ),त्यामुळे रॅगिंग वगैरे काही म्हणता काही आमच्यावेळी नव्हतं, फार काय त्याकाळी, पोरी सुद्धा आमच्या कॉलेजकडे ,शिक्षणासाठी येत नसत. एकुलती एक पोरगी आली , तीने अ‍ॅडमिशन पण घेतली होती, पण हाय ! ! त्याच वर्षी नेमके आम्ही, दोन विषयात फेल म्हणुन घरी ! ! तिच्याशी बोलायला सारेच उत्सुक, म्हणून तिला फिशपाँड मिळाला होता, " A train stopping at every station."
आमचा कॉलेजचा रस्ता, नेमका आर्ट्स,कॉमर्स व सायन्स कॉलेजवरून जात असे. जाता-येता, रंगी-बेरंगी कपडे घातलेल्या पोरी दिसायच्या आणि आम्ही,एकतर पांढरा शर्ट व खाकी पँट या यूनीफॉर्म मध्ये नाहीतर वर्कशॉप च्या मळक्या, जांभळट् निळ्या कपड्यांमध्ये.
जॉब्/नौकरी मिळण्याची शक्यता भरपूर असली तरीही आम्ही विनोदाने एकमेकांना म्हणायचो, " नाहीच नौकरी मिळाली तर, इलेक्ट्रीकवाले कुठंतरी मीटर रीडर बनतील, मेकॅनिकलवाले कुठंतरी गॅरेजमध्ये गाड्यांना फडके मारतील आणि सिव्हिलवाले गवंडीकामाला निघून जातील. "
घरूनच कॉलेजला , सायकलीने जाणे-येणे केल्याने, हॉस्टेल लाइफ कधीच अनुभवता आले नाही.
त्यावेळची एक मजेशीर घटना चांगलीच लक्षात आहे. १९६९ साली, नील आर्मस्ट्राँगने ,चन्द्रावर पाउल ठेवले. ही बातमी ऐकुन, आम्ही कॉलेजमध्ये गेल्यावर, " We want holiday,We want holiday " चा घोष लावला. आमच्या लेक्चररांनी सर्वांना अगोदर जागेवर बसविले आणि सांगितले,' मी कोणालाही एकच प्रश्न विचारीन, उत्तर बरोबर आले, तर सुट्टी, नाहीतर नेहमीचे सर्व पिरियड अटेंड करावे लागतील." आम्ही उत्साहाने कबूल झालो. प्रश्न साधा होता," चान्द्रयानात बसून गेलेल्या तिघांची नावे फक्त सांगा." आणि सरांनी डोंगरे नावाच्या मुलाला उभे केले. तसा हा डोंगरे हुशार खरा, ( शेवटच्या सेमिस्टरला माझ्याबरोबरच तोही फर्स्ट्क्लास मध्ये पास झालेला ), पण सामान्य ज्ञानात इतका कच्चा असेल असे वाटले नव्हते. वस्तुत: आठ दिवसापासून पेपरमध्ये ह्या बातम्या येत होत्याच. पण आमच्या दुर्देवाने त्याला तिन्ही नावे सांगता आली नाहीत आणि आम्हाला झक मारून सायंकाळी सहा वाजेपर्यंत कॉलेज अटेंड करावे लागले. असो, गेले ते दिवस !

अरिंजय's picture

16 Sep 2016 - 12:11 am | अरिंजय

तुम्ही जुन्या आठवणी जागवल्या. फक्त आमच्या काळी मोबाईल, इंटरनेट नव्हते, फोन सुद्धा शेवटी शेवटी आले. जीट्या, सबमिशन हे सोहळे असायचे. आणि व्हायवा म्हणजे कुणाची किती लागली ते बघायसाठीच असायच्या. रिझल्ट विचारताना 'किती राहिले?' असं विचारायची पद्धत होती.

प्रभास's picture

16 Sep 2016 - 11:05 am | प्रभास

छानच..

संत घोडेकर's picture

16 Sep 2016 - 11:46 am | संत घोडेकर

अभियंता दिनानिमित्ताने अभियांत्रिकी क्षेत्राबद्दल सकारात्मक काहीतरी लिहा की. उगाचच मी किती कष्ट करून अभियंता झालो हे दाखविण्याचा अट्टाहास कशाला.

विदाऊट कष्ट करून अभियंता बनता येते का?

गामा पैलवान's picture

16 Sep 2016 - 5:44 pm | गामा पैलवान

संत घोडेकर,

पाहिलं म्हणजे हा अभियंतादिन आहे. अभियांत्रिकीदिन नव्हे!

दुसरं म्हणजे भारतातले बहुतांश अभियंते केवळ पदवीपुरते अभियंते आहेत. प्रत्यक्षात आयटीबियटी वा व्यवस्थापन इत्यादी अभियांत्रिकीबाहेरच्या क्षेत्रांत काम करतात. (यांत मीही आलो) साहजिकंच चार वर्षे सहन केलेल्या पदवीप्रसूतीवेणा हा यांतला एकमेव सामायिक दुवा आहे.

आ.न.,
-गा.पै.