चला बर्लीनमध्ये फिरुया ! (पूर्वार्ध)

लिखाळ's picture
लिखाळ in जनातलं, मनातलं
21 Sep 2008 - 5:59 pm

नमस्कार मंडळी !
बर्लीन हे अनेक शतके राजधानीचे शहर आहे. भव्य अश्या बर्लीन शहराला भेट देण्याचा योग या आठवड्यात एका विज्ञान-परिषदेच्या निमित्ताने आला. फावल्या वेळामध्ये बर्लीन मधल्या काही ऐतिहासिक वास्तू पाहता आल्या तसेच प्रसिद्ध अश्या काही वस्तूसंग्रहालयांना भेट देता आली.
चला तर माझ्या सोबत बर्लीनमध्ये फिरायला.

जर्मनीची राजधानी बर्लीन ही अनेक भव्य आणि ऐतिहासिक वास्तूंनी सजलेली आहे.
'बर्लीनर डोम' म्हणजे बर्लीनमधले मुख्य चर्च असेच भव्य आहे.

३७४ फुट लांब, २४० फुट रुंद आणि ३८१ फुट उंच असे हे कॅथेड्रल १८९५ ते १९०५ या काळात बांधले गेले. शहराच्या मध्यभागामध्ये ते दिमाखाने उभे आहे.

'ब्रान्डेनबुर्ग टोर' म्हणजेच ब्रान्डेनबुर्ग गेट हे जर्मनवासियांची जिव्हाळ्याची वास्तू आहे. बर्लीनचे दोन भाग झाले तेव्हा दुर्दैवाने ही वास्तू पूर्व बर्लीनमध्ये म्हणजेच रशियाच्या अंमलाखालच्या भागात गेली.

या दरवाजावर दिसणारी मूर्ती म्हणजे चार घोड्यांच्या रथावर स्वार अशी 'क्वाड्रिगा ऑफ व्हिक्टरी' ही देवता आहे. ही देवता विजयाचे प्रतिक मानली जाते. ही मूर्ती १८०६ मध्ये नेपोलिअनने लुटून नेली होती. १८१४ मध्ये ती परत आणली गेली.

ब्रान्डेनबुर्ग दरवाजा हा जुन्या काळी बर्लीनध्ये प्रवेश करण्यासाठी असे. १७८८ ते १७९१ या काळात प्रुशिया राजवटीच्या सम्राटाच्या इच्छेनुसार हा बांधला गेला. आज युरोपातील अतीप्रसिद्ध अश्या वास्तूंमध्ये याची गणना होते.

चला, आता 'बर्लीनर माउअर' म्हणजेच बर्लीनच्या भिंतीपाशी जाउया.

आपल्याला माहितच आहे की दुसरे महायुद्ध संपल्यावर फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका आणि रशिया या चार देशांनी जर्मनीचा भूभाग आपसांत वाटून घेतला होता. त्यामध्ये पूर्वेकडचा बराचसा जर्मनी रशियाच्या वाट्याला आला होता. बर्लीन ही राजधानी सुद्धा उभे अर्धे भाग करुन दोस्तांनी आणि रशीयाने ते वाटून घेतली. त्यामुळे पश्चिमजर्मनीकडे असलेला बर्लीनचा अर्धाभाग म्हणजे प्रचंड लाल समुद्रात असलेल्या छोट्या बेटा प्रमाणे झाला. पूर्वेतले हुशार, कुशल लोक पश्चिमेकडे स्थलांतर करत आहेत हे लक्षात येताच हा ओघ थांबवण्यासाठी तडकाफडकी एक दिवस पश्चिम बर्लीनला कुंपण घालण्यात आले. एका तर्‍हेने पश्चिम बर्लीन सर्व बाजूने कुंपणात बंद करुन लाल राज्यातुन कुणी व्यक्तिस्वातंत्र्याचा उद् घोष करणार्‍या पश्चिमेकडे जाऊ नये अशी रचना करण्यात आली. तो दिवस होता १३ ऑगस्ट १९६१. २८ वर्षे १ दिवस ही भिंत उभी होती. पुर्वेकडुन पश्चिमेकडे जाण्याच्या प्रयत्नात सरकारी आकड्याप्रमाणे १३६ लोक मारले गेले आहेत.

बर्लीनच्या भिंतीचे काही भाग आता शहरात जतन करुन ठेवले आहेत.

या भिंतीपाशी त्याकाळातल्या घटनांचे मोठे मोठे फोटो लाऊन आणि माहिती लिहुन प्रदर्शन मांडले आहे. त्यातील काही फोटोंचे फोटो पाहा.

चला आता आपण जर्मनीचे संसदभवन पाहुया. १८९० च्या दशकात बांधलेली ही इमारत होली रोमन एंपायर मध्ये राईशटाग या नावाने ओळखली जात असे. आता ती बुन्डेसटाग या नावाने ओळखली जाते. भव्य अश्या या इमारतीचे सायंकाळच्या उन्हातले चित्र. या इमारतीच्या कमानीवर 'जर्मन लोकांसाठी' असे प्रजासत्ताकाचे ब्रीद कोरलेले आहे.

या इमारतीमध्ये सामान्य नागरिकांना आणि प्रवाश्यांना प्रवेश आहे. इमारतीच्या गच्चीवर उद्वाहकाने आपल्याला नेले जाते आणि तेथून वर काचेच्या घुमटामध्ये आपण प्रवेश करु शकतो. आत मध्ये सर्पिल मार्गाने आपण घुमटाच्या अगदी वरच्या भागात जाऊ शकतो आणि सभोवतालचे शहर पाहू शकतो.

मजा म्हणजे घुमटाच्या बरोबर खाली संसदभवनामध्ये चाललेले कामकाज सुद्धा आपल्याला येथून दिसते.

आता पुढच्या भागामध्ये बर्लीनमधल्या संग्रहालयांना भेट देउया.

चित्रे : मी आणि सौ. लिखाळ.
माहिती : फिरताना मिळाली आणि विकिपिडीयावर वाचली.

आपलाच,
--लिखाळ.

बर्लीन भेटीचा उत्तरार्ध येथे वाचावा. http://www.misalpav.com/node/3667

वावरछायाचित्रणप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

21 Sep 2008 - 6:08 pm | अभिज्ञ

लिखाळजी,
बर्लिनची सचित्र माहिती खुपच आवडली.

अभिज्ञ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Sep 2008 - 6:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बर्लीनचे फोटो आणि माहितीही झकास !!!
और भी आने दो.

विकास's picture

21 Sep 2008 - 8:25 pm | विकास

माहीती आणि छायाचित्रे आवडली! असे वेगवेगळ्या ठिकाणांचे येउदेत!

प्रमोद देव's picture

21 Sep 2008 - 8:32 pm | प्रमोद देव

झकास छायाचित्रं. माहीती आवडली.

रेवती's picture

21 Sep 2008 - 8:34 pm | रेवती

लिखाळ,
जर्मन भाषेचा अभ्यास करत असताना हे सर्व वाचनात आले होते (आता विसरले होते) ते आठवले.

अवांतरः लिखाळ टोमॅटो साराची कृती देण्यास विसरले वाटतं!
रेवती

यशोधरा's picture

21 Sep 2008 - 8:36 pm | यशोधरा

अहा! मस्तच फोटो!! बर्लिनर डोम आणि सगळ्यात शेवटचा फोटो तर खूपच आवडले! माहितीही छान.

सर्वसाक्षी's picture

21 Sep 2008 - 11:06 pm | सर्वसाक्षी

झकास झाली. चित्रे व तपशिल दोन्ही असल्याने अर्थपूर्ण वाटली

नंदन's picture

21 Sep 2008 - 11:12 pm | नंदन

आहे. माहिती आणि चित्रे दोन्ही आवडली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मृदुला's picture

22 Sep 2008 - 12:18 am | मृदुला

चित्रमय माहिती आवडली.
परवा प्लास्टीकविषयी वाचताना राईशटाग इमारत प्लास्टिकने गुंडाळलेली आहे/ होती असे काहीसे वाचले. तेव्हा ही काय भानगड म्हणून शोध घेता हाच डोम दिसला होता. पण प्लास्टिकचा मागमूस नाही. :s

लिखाळ's picture

22 Sep 2008 - 3:22 pm | लिखाळ

या इमारतीचे अनावरण करायच्या आधी संपूर्ण इमारत प्लॅस्टिकने अच्छादित होती. आता अनावरण झाले असल्याने प्लॅस्टिकचा मागमुस फक्त जून्या छायाचित्रात आहे :)
--लिखाळ.

विसोबा खेचर's picture

22 Sep 2008 - 1:21 am | विसोबा खेचर

लिखाळगुरुजी,

सर्व चित्रे व माहिती झकास...

आपल्याला व सौ लिखाळकाकूंना धन्यवाद... :)

तात्या.

केशवसुमार's picture

22 Sep 2008 - 3:22 pm | केशवसुमार

सर्व चित्रे व माहिती झकास...
आपल्याला व सौ लिखाळकाकूंना धन्यवाद...
(हेच म्हणतो..)केशवसुमार

स्वाती दिनेश's picture

22 Sep 2008 - 5:03 pm | स्वाती दिनेश

बर्लिनवारी उत्तम झालेली दिसते आहे.चित्रं छान आली आहेत.
स्वगत- ही चित्रं पाहून आता परत एकदा बर्लिनला जावेसे वाटत आहे.
स्वाती

जैनाचं कार्ट's picture

22 Sep 2008 - 5:09 pm | जैनाचं कार्ट (not verified)

मस्तच फोटो!! बर्लिनर डोम आणि सगळ्यात शेवटचा फोटो तर खूपच आवडले! माहितीही छान.

हेच म्हणतो !

माहीती व छायाचित्रे आवडली !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

डॉ.प्रसाद दाढे's picture

23 Sep 2008 - 11:53 am | डॉ.प्रसाद दाढे

फोटू लई आवडले. प्रिन्झ अल्ब्रेख्त स्ट्रास वर गेला होतात का? तिथे गेस्टापोचे मुख्यालय होते. अजूनही काही अवशेष असतीलही. स्पोर्ट पॅलास्ट स्टेडियम अजून आहे का? तिथे हिटलरची भाषणे होत असत. विल्हेम स्ट्रासवर मला वाटते म॑त्रालय असाव॑ (म्हणजे तेव्हा तरी होत॑) जर्मनीत आणखी कुठे फिरला आहात?
(बाबूकाका खर्‍या॑सारखा मी दुसर्‍या महायुद्धाशी स॑बधित सगळ्या शहरात मनाने फिरलो आहे.)

लिखाळ's picture

23 Sep 2008 - 4:10 pm | लिखाळ

>>(बाबूकाका खर्‍या॑सारखा मी दुसर्‍या महायुद्धाशी स॑बधित सगळ्या शहरात मनाने फिरलो आहे.)<<
हा हा .. हे उत्तम. तसेही विकिपेडिआ आणि इतर संकेतस्थळे हाताशी असताना चित्र-सफर तर नक्कीच अशक्य नाही.

बर्लीनमध्ये मुख्य रस्त्यांवरुन फिरलो. तसेच काही संग्रहालये पाहिली. पोट्सडाम पाहिले. पुढच्या भागात त्याचे वर्णन आहेच.
खरेतर शहर इतके मोठे आहे आणि इतकी चांगली संग्रहालये आणि प्रदर्शने आहेत की चार दिवस पूर्ण वेळ शहर-दर्शन केले पाहिजे. इतका वेळ हाताशी नव्हता त्यामुळे शक्य होते ते सर्व पाहिले.
--लिखाळ.