सिंधुदुर्ग कोस्टल ट्रेक : १ :

जगप्रवासी's picture
जगप्रवासी in भटकंती
29 Apr 2016 - 3:39 pm

"तुमका येउक लागात, तुमचे पैशे भरलय मी"
"माझा काय काम थय, आणि येउन करुचा काय हा???"
"काय करुचा मंजे, आमच्या वांगडान किल्लो फिरा, आम्ही काय बघताव ता बघा. ते आपल्याक माहिती सांगती ती ऐका, मग तुमका पण कळात आम्ही कशाक भटकताव ते"
"माझे घुडगे दुखतत त्यांका काय आग लावू"
"मी पट्टी आणलंय, ती लावा आणि चला"
आणि शेवटी वडील सिंधुदुर्ग कोस्टल ट्रेकला यायला तयार झाले. यावेळच्या ट्रेकची उत्सुकता होती ती वडिलांना देखील गड किल्ले फिरवायची. सगळी तयारी करून एकदाचा ट्रेकचा दिवस मावळला, मावळला कारण आम्हाला रात्रीच्या मंगलोर ट्रेन ने प्रवास करायचा होता.

मराठेशाहीचा कणा असेलेले किल्ले आणि त्यातही शिवरायांचे विशेष प्रेम असलेले सागरी दुर्ग अशी ट्रेक मोहीम यावेळेला होती. मंगलोर एक्स्प्रेसने गुरुवारी रात्री निघालो. बऱ्याच दिवसांनी भेटल्यावर गप्पांना ऊत आला होता त्यातल्या त्यात यावेळचा महत्वाचा विषय होता जंगल बुक चित्रपट. ज्यांनी हा चित्रपट बघितला नाही त्यांना मग चित्रपटाची मीठ मसाला लावून स्टोरी सांगायला सुरुवात झाली. रात्रीचे १.३० वाजले तरी सगळे गप्पा मारत बसले होते हे बघून ट्रेक लीडर अमित दादाने सर्वांना जबरदस्तीने झोपायला पाठवले. सकाळी ६ च्या दरम्यान कणकवली स्टेशन वर उतरलो.

https://lh3.googleusercontent.com/-DETM5FQCfQg/VxSYXAY6E6I/AAAAAAAAHUs/8FklJggEHuQ2kDXdkUCBl9sES4tY5VJ3wCCo/s640/IMG_6610.JPG
कणकवली रेल्वे स्टेशन

https://lh3.googleusercontent.com/-b1QMXLowHoI/VxSYYed6TOI/AAAAAAAAHUs/_cS2dGNqTdwkUwg39mEgdLgh2xinWYrZQCCo/s640/IMG_6612.JPG

https://lh3.googleusercontent.com/-Rb436DLgCwY/VxSYqOOIGEI/AAAAAAAAHWw/ueqWdY5yprAY5VbRqJ8Z6cLavZq7CmJ3ACCo/s512/IMG_6629.JPG

तिथेच फ्रेश होऊन आलेल्या गाडीत बसून विजयदुर्ग जवळ आमची वरात निघाली. जस जस आम्ही किनाऱ्याजवळ जात होतो तस तस सुक्या मच्छीचा वास तीव्र होत होता. विजयदुर्ग किल्ल्याजवळ पोचल्यावर शेजारीच असलेल्या एका हॉटेलात नाश्ता केला. आणि लगेच गडावर जायला निघालो. तिथे आमची वाट बघत आमचे गाईड काका उभे होते. विजयदुर्ग किल्ल्याजवळ राहणाऱ्या गावकऱ्यांपैकी ते एक होते आणि शासनाने मान्यता दिलेले ओळखपत्र त्यांच्या गळ्यात होते.

https://lh3.googleusercontent.com/-vLMb091Tbw0/VxSYtjSdUKI/AAAAAAAAHWw/xHq0xxZD5DsoObxpCwvmpD6e-p6BQOo7ACCo/s640/IMG_6631.JPG

https://lh3.googleusercontent.com/-QgF6kyxveoM/VxSYvQk8diI/AAAAAAAAHWw/4mhQX-oS8x4xQMwlp6SopDpP0UJws-VFQCCo/s640/IMG_6634.JPG
विजयदुर्ग

https://lh3.googleusercontent.com/-Rhwsy-HoOGs/VxSY3vX8wgI/AAAAAAAAHYU/NqYnYoi7hwoUUOP8qAmfxd9wVdbH7zNVACCo/s512/IMG_6641.JPG
आमचे गाईड- गावकर काका

कोकणावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजांनी सागरी किल्ले जिंकून स्वराज्यात आणले तर काही किल्ले नव्याने बांधले. "घेरिया" उर्फ "विजयदुर्ग" किल्ला हा भुईकोट तसेच जलदुर्ग वर्गात गणला जातो. याचे कारण म्हणजे तीन बाजूंनी समुद्राच पाणी आणि एका बाजूला जमिनीने वेढलेला आहे.२ व्या शतकापासून अनेक राजवटी पाहिलेला हा किल्ला १७ व्या शतकात मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र होता.आधी हा किल्ला चारी बाजूंनी पाण्याने वेढलेला होता आणि किल्ल्यावर ये जा करण्याकरता लाकडी पूल होता जो नको असताना एका बाजूने उचलला जाई. पण कालांतराने चिखल आणि माती साठून हा जमिनीला चिकटला गेला असे गाईड ने सांगितले. मराठी चित्रपट किल्ला याची शुटींग या किल्ल्यावर झाली होती.

विजयदुर्गला पोचल्यावर वडिलांनी त्यांच्या आठवणींची पोतडी उघडायला सुरुवात केली. वडील तरुणपणी भाऊच्या धक्क्यावरून बोटीत बसत आणि विजयदुर्ग ला उतरत. तिथून मग परत गावाकडे छोट्या बोटल्याने किंवा बैलगाडीने जात.हे सांगताना देखील त्यांच्या डोळ्यासमोर तोच ४० वर्षापूर्वीचा काळ उभा राहिला असावा कारण एकदम कुठेतरी हरवल्यासारखे ते बघत होते. आणि त्या आठवणींनी गालातल्या गालात हसत होते. मग किल्ल्यावर जाऊन कुठे फिरायचे, किती वेळ बसून असायचे पुढच्या प्रवासासाठी ते सगळ सांगू लागले. आता वयाच्या सत्तरीत त्यांना पंचविशीचा काळ नीट आठवत होता. ते गाईड काका माहिती सांगत होते आणि मध्येच वडील जुन्या आठवणी, यामुळे माझी मजा चालू होती.

किल्ल्याच्या सुरुवातीलाच एक बांधकाम चालू होत, गाईड काकांनी सांगितलं होत पण विसरून गेलो. किल्ल्याची माहिती देणारा शासनाचा फलक दरवाजाला लागून असलेल्या डाव्या बाजूच्या देवडीत लावलेला आहे. जीबीच्या दरवाजातून आत शिरल्यावर किल्ल्याच्या पडकोटाला असलेल्या तीन तटबंद्या पाहायला मिळतात. समुद्रालगत असलेली पहिली तटबंदी ३० फ़ूट उंचीची आहे. त्यानंतर दुसरी तटबंदी १० फ़ूट उंचीची आणि मुख्य किल्ल्याची तिसरी तटबंदी ३० फ़ूट उंच आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या तटबंदीच्या मधे असलेल्या फ़रसबंदी मार्गाने पुढे गेल्यावर गोमुखी रचनेचे भव्य "यशवंत" महाव्दार लागते. तीन दरवाजे, तिहेरी तटबंदी यांच्या सहाय्याने किल्ला अभेद्य केलेला आहे. गडाच्या तटबंदीला थोडासा वळसा घातल्यावर दिसतो तो जीबीचा दरवाजा म्हणजेच मुख्य दरवाजा. पूर्णपणे गोमुखी पद्धतीचा दरवाजा नाही पण थोडासा आतच आहे जेणेकरून शत्रूला लगेच दिसू नये. शत्रूंच्या हत्तीच्या धडके पासून वाचण्यासाठी या दरवाजाला देखील मोठे मोठे खिळे ठोकलेले आहेत. पूर्व दरवाज्याने आत गेल्यावर डाव्या बाजूला खलबत खाण्याची इमारत दिसते जिथे सध्या चुना ठेवलेला आहे. सध्या गडावर तटबंदी पुनश्च बांधायचं काम चालू आहे.

https://lh3.googleusercontent.com/-8hHh2GEenWQ/VxSY1fIqGQI/AAAAAAAAHYU/CYXBBbV9lUIFdXK6S1LTRIHI6BySW10fACCo/s512/IMG_6639.JPG
जीबीचा दरवाजा

https://lh3.googleusercontent.com/-M4eaTc-bs4U/VxSY0DS1deI/AAAAAAAAHYU/ABrfTgzvVa4G5BKgmuxRxqWni4SoSx0TgCCo/s512/IMG_6638.JPG

https://lh3.googleusercontent.com/-Zer18GFGPno/VxSY2l0x7-I/AAAAAAAAHYU/IMLWffvdOfULk4-EIhqJAithMmhSJDCnQCCo/s640/IMG_6640.JPG

https://lh3.googleusercontent.com/-tKEM9ekYkgs/VxSY_D66dEI/AAAAAAAAHYU/id7_lHMi_386SNTGfaDQ08Ki3mIwjQ1iACCo/s640/IMG_6647.JPG
हल्ल्यावेळी किल्ल्याच्या तटबंदीला पडलेली भगदाडे सिमेंटने बुजवली आहेत.

https://lh3.googleusercontent.com/-mxhCZPqOOd0/VxSaLDrU5HI/AAAAAAAAHgw/QvHsh6B02k8n53Vcylfgn0PLbDMsIxxSwCCo/s512/IMG_6730.JPG
किल्ल्यात प्रवेश करतानाच मारुती रायाच दर्शन होत

https://lh3.googleusercontent.com/-EIsrhyVxJew/VxSZBdTZ7HI/AAAAAAAAIEM/kb2ODCasXjcjqPfIL01CoMRDbn9xsMQGwCCo/s640/IMG_6649.JPG
गोमुख पद्धतीचा दरवाजा

https://lh3.googleusercontent.com/-ePOpdmC7EQY/VxSZDgUePvI/AAAAAAAAHYU/JGbpAwnw0AYAATPbzvaVKUsb54OfwLlpACCo/s512/IMG_6651.JPG
पूर्व दरवाजा

https://lh3.googleusercontent.com/-28JZHFa4cPU/VxSZFwgTCAI/AAAAAAAAHYU/h4ob-SUrxHsWcn_2mI9Oebkxmhc5EFhrACCo/s640/IMG_6653.JPG

या खलबत खाण्याच्या भिंती तीन फुट जाडीच्या आहेत जेणेकरून आतमध्ये काय बोलताहेत ते बाहेर ऐकायला येऊ नये. पोलिस चौकीसमोर तोफेचे गोळे एका रांगेत मांडून ठेवलेत. प्रत्येकाची जाडी, जडण घडण वेगळी. तोफांचा वापर करायला लागण्याआधी मावळे तसे दगडातून बनवलेले गोळे हाताने उचलून फेकत आणि एक गोल किमान ५/६ किलोचा असावा. त्या गोळ्यांच्या शेवटी ३ तोफा रांगेत लावून ठेवल्यात.खलबत खाण्याच्या डाव्या बाजूला ध्वज स्तंभ आहे जिथे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा झेंडा फडकवला जातो - इति गाईड काका.

https://lh3.googleusercontent.com/-AdpS0DugfzE/VxSZKN4DvvI/AAAAAAAAHZs/JP5G5ANLJe8_LvLGD_Ob4YP6mOY3y0O6ACCo/s640/IMG_6657.JPG
खलबत खाना - मुख्य दरवाजा जवळ इतकी महत्वाची वास्तू असणे हे पटत नाही, त्यामुळे ही वास्तू खलबत खान नसून दुसरे काहीतरी असावे अस वाटते.

https://lh3.googleusercontent.com/-mic34zUrVs8/VxSZJZA2zPI/AAAAAAAAHZs/hnJr1_vzc84R8j5BAeC0cJONr3A7DSdOgCCo/s640/IMG_6655.JPG
तोफा

https://lh3.googleusercontent.com/-xMK8jdXRHK8/VxSZNEI_ZJI/AAAAAAAAHZs/xHnM8Mz6fYUiv21w0L01nSiEbu7WLtRBACCo/s640/IMG_6660.JPG
तिहेरी तटबंदी

https://lh3.googleusercontent.com/-A8i3RN1m1OE/VxSZTE38BQI/AAAAAAAAIEA/5QhdF8gVbrAncGzO_ER93pWMhuP1QuOzACCo/s640/IMG_6666.JPG
दारू कोठार-जस खलबत खाण्याबद्दल शंका वाटते तसच या दारू कोठाराबद्दल. किल्ल्याच्या तटबंदीला आणि मुख्य दरवाजा जवळ दारू कोठार असणे चुकीचे वाटते. समजा शत्रूने किल्ल्यात प्रवेश केला आणि दारू कोठार उडवून दिले तर किल्ला सहज ताब्यात येईल. मी जास्त माहिती नाही त्याबद्दल मिपावरील जाणकार मंडळी प्रकाश टाकतील.

दारू कोठारावरून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला सदर होती. एका बाजूला लेखणीस यांना बसायला जागा तर दुसऱ्या बाजूला येणाऱ्या पाहुण्यांसाठी बसायला ऐसपैस जागा. तिथे पुढे सभागृह होत. जिथे राजाचं सिंहासन असायचं तिथून हळुवार पुटपुटलेला शब्द देखील समोरच्या भिंतीजवळ उभ्या राहणाऱ्या व्यक्तीला स्पष्ट ऐकू येईल अशी त्या सभागृहाची रचना होती. रायगडासारखाच इथे देखील अदभूत रचनेचा नमुना अनुभवला. भिंतीच्या एका टोकाला आमच्या ट्रेकर्स पैकी एकाला उभे केले आणि त्या गाईड काकांनी तोंडातल्या तोंडात जय भवानी म्हटले लगेच समोरून "जय शिवाजी" असे कडक आवाजात उत्तर आले.

https://lh3.googleusercontent.com/-c4eTuXwxzb4/VxSZUqFaG0I/AAAAAAAAHaQ/3_C1M1CirCQlYPawix0iiZfxMULnCj3kgCCo/s640/IMG_6668.JPG
सदर

https://lh3.googleusercontent.com/-6fLo3d2PyUA/VxSZX8G3w6I/AAAAAAAAHaQ/YZYm4L_-1HoPNfomvJSoZHY809hGTjfOwCCo/s640/IMG_6672.JPG
सभागृह / दरबार

दारू कोठाराजवळ विजयदुर्गाच वैशिट्य असलेल्या खुबलढा बुरुजाकडे जाण्यासाठी मोर्चा वळवला. तिथे जाण्यासाठी एका भूयारीवाजा खंदकातून जावे लागते. त्या भुयारातून बुरुजावर जाताना लागणाऱ्या पायऱ्या या २-२ फुट उंचीच्या आहेत. बाहेर पडताना देखील थोड वाकून बाहेर पडाव लागत नाहीतर वरती छताला डोक आपटेल. शत्रूला धावत येउन वरती चढता येउ नये म्हणून पायऱ्यांची उंची इतकी जास्त आहे तर शत्रू आलाच तरी त्याला लगेच वार करायला भेटू नये म्हणून म्हणून बाहेर पडतानाची उंची कमी आहे. तिथून तटबंदीत असणाऱ्या जंग्यातून किल्ल्याच प्रवेशद्वार स्पष्ट दिसत होते. म्हणजेच शत्रू दरवाजातून आत आला तरी आपण त्याला दिसू नये आणि त्याच्यावर लपून बाणाने हल्ला करता यावा याची काळजी घेतली होती.

https://lh3.googleusercontent.com/-K8BQW4pQVRQ/VxSZbOwBVMI/AAAAAAAAHbs/_lxy0he1W5kUB09zz6A3yhVCScmwIfo1ACCo/s640/IMG_6677.JPG
खुबलढा बुरुजावरून दिसणारा पूर्व दरवाजा

https://lh3.googleusercontent.com/-K5WHcjJYi5Y/VxSZed45VhI/AAAAAAAAHbs/AphhnEoSVcQZTPWyq2ek7aIu8QL0MDHugCCo/s512/IMG_6678.JPG
भुयार

पुढे होती घोड्यांची पागा. लांबलचक अशी बांधलेली ती वास्तू आणि त्या समोरच एक चौकोनी तळे होते. त्या तळ्यात आता माती साचून ते बुजून गेले आहे. तळ्याच्या बाजूलाच एक ४ फुट उंच तुळशी वृंदावन आहे. "त्या काळच्या बायका किती उंच होत्या बघा, इतक्या उंच तुळशी वृंदावनाला त्या पाणी घालत" इति गाईड काका. इथेच तटबंदी जवळ खाली उतरणार्‍या पायर्‍या दिसतात. इथे एक भूयार असून ते गिर्ये गावातील आनंदराव धुळपांच्या वाड्यात उघडते अशी वदंता आहे.

https://lh3.googleusercontent.com/-shFiiQzUS_8/VxSZiu9EZjI/AAAAAAAAHbs/9JwREfVWtRwMpBf8C89F3ep__JhWxqDJQCCo/s640/IMG_6681.JPG
घोडयाची पागा

https://lh3.googleusercontent.com/-lfBBud0rMfI/VxSZj1qePsI/AAAAAAAAID8/0wLMnVCaMGAmL96pdFlehG60t_KQLyMEQCCo/s640/IMG_6683.JPG
विहीर

https://lh3.googleusercontent.com/-M4ygOnbsrLM/VxSZnTWvwcI/AAAAAAAAHcs/MmFWeOU6_uEC6_YMc6AL20XAEIDMm9IlACCo/s512/IMG_6684.JPG
तुळशी वृंदावन

पुढे गेल्यावर दुमजली राणी महाल लागला. तिथेच एका पक्षाची भेट झाली. आमच्या डोक्यावर एक छान पक्षी घिरट्या घालत होता. थोडा जवळ आल्यावर नीट निरखून बघितल्यावर कळल की ती ब्राह्मणी घार होती. मानेखाली असलेली पांढरी शुभ्र पिसे त्या पक्षाच्या सौंदर्यात अजून भर घालत होती. इतका सुंदर पक्षी डोक्यावर उडत असताना देखील आमच्यातले बरेच जण स्वतःचे आणि गडाच्या तटबंदी चे फोटो काढण्यात गुंतले होते आणि माझ्या क्यामेराच्या पगाराबाहेरची गोष्ट होती त्यामुळे तिचा फोटो नाही काढता आला. फक्त डोळे भरून बघत राहिलो, पुढे गेलेल्यांनी हाका मारल्या तेव्हा कुठे त्या जागेवरून हललो.

https://lh3.googleusercontent.com/-bV6fb_sanUc/VxSZp-4hk_I/AAAAAAAAHcs/iAaAlKv6DbgOcaM879nPadEP5bT23eIBgCCo/s640/IMG_6693.JPG
राणी महाल

https://lh3.googleusercontent.com/-FPdr8JuygCo/VxSZupomqZI/AAAAAAAAHcs/JzfxVQodBUQ__cZ8X2PEsTUC8hPy8LVOgCCo/s640/IMG_6697.JPG
सुस्थितीत असलेली तटबंदी

तटबंदी जवळ खाली उतरणार्‍या पायर्‍या दिसतात. इथे एक भूयार असून ते गिर्ये गावातील आनंदराव धुळपांच्या वाड्यात उघडते अशी वदंता आहे.
https://lh3.googleusercontent.com/-mtD4DiRP25E/VxSZxVmic8I/AAAAAAAAHcs/EAEKzT_0ITcXfiGbfZFomEIHfdRsDdUQgCCo/s512/IMG_6698.JPG

पुढे महिषासुर मर्दिनीच मंदिर आहे, त्यातली देवीची कातळात कोरलेली मूर्ती खूप सुंदर आहे. त्याच्या बाजूला असलेल्या दगडाला साहेबाचे ओटे म्हटले जाते. १८ ऑगस्ट १८६८ रोजी झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाच्या दिवशी खगोलशास्त्रज्ञ सर जे नॉर्मन लॉकियार याने सूर्या भोवती असलेल्या हेलिअम वायूचा शोध लावला. नंतर २५ वर्षांनी शास्त्रज्ञ विल्यम रामसे याने यावर संशोधन करून शिक्कामोर्तब केले. या ओट्या जवळ अजून २ सिमेंटचे ओटे आहेत, एकूण तीन जागा निवडण्यात आल्या होत्या त्यापैकी सध्या असलेल्या चौथऱ्या वर शिक्कामोर्तब करून तिथून संशोधन केले.

https://lh3.googleusercontent.com/-qzfoUynkNRs/VxSZyUqHhTI/AAAAAAAAID8/saLJz6hLttUjX7gYP3JgYFKWwufRQqYMgCCo/s512/IMG_6699.JPGhttps://lh3.googleusercontent.com/-FCwcsfx9i6k/VxSZykXO-bI/AAAAAAAAHdI/xDmJ67vhhTQaUIh4Sl3wIAxjNlsrVAdvwCCo/s512/IMG_6700.JPG

या संशोधनानिमित्त दरवर्षी १८ ऑगस्टला खगोलशास्त्रज्ञ, खगोल शाखेचे विद्यार्थी मिळून "हेलिअम डे" साजरा करतात. रात्री आकाशात दिवे सोडले जातात.

https://lh3.googleusercontent.com/--7QFud-rXQE/VxSZ33DkVGI/AAAAAAAAID8/kTktWRqACQgJ1KgHHsY_NsI2kURxv0R0ACCo/s640/IMG_6705.JPG

पुढचा टप्पा होता जखिणीची तोफ. हि कलाल बांगडी या प्रकारातली असून मागेच जखिनीच मंदिर आहे. इतक्या उन्हात देखील ती तोफ एकदम थंड होती. त्यावेळच्या तोफा या पंचधातू पासून बनवल्या जात जेणेकरून त्या जास्त गरम होत नसत.

https://lh3.googleusercontent.com/-ESY1oKQOqKQ/VxSZ9pg5_2I/AAAAAAAAHeI/XSGDhigKZ7wQ8VjJ0eE7VQrPoBjcXm4PwCCo/s640/IMG_6710.JPG

तिथून पुढे असलेले धन्य कोठार बघायला गेलो, चांगली ऐसपैस जागा, हवा खेळती राहण्यासाठी झरोके एकदम थंड वातावरण. नंतर इंग्रजांच्या काळात त्या कोठारावरती एक मजला बांधला गेला ज्याचे आता काही अवशेष शिल्लक आहेत.

https://lh3.googleusercontent.com/-lQExdqKAFmw/VxSZ5cJQEKI/AAAAAAAAID8/NMPqbfnV_aIjeqpqrgIRgecMPaq4KehHwCCo/s640/IMG_6706.JPG

https://lh3.googleusercontent.com/-tiJ_mi3Es5E/VxSZ_AfPlbI/AAAAAAAAHeI/WnF2VJnp9Fsga8pCgktWY0ijk9H3SBH0QCCo/s640/IMG_6711.JPG

बाजूलाच एक मोठी चौकोनी विहीर आहे, त्यात उतरायला पायऱ्या आहेत. मनरंजन बुरुजावरून गोविंद बुरुजाकडे जातांना उजव्या बाजुला असलेल्या किल्ल्याच्या मुख्य तटबंदीत एक चोर दरवाजा पाहायला मिळतो. गोविंद बुरुजावरून पुढे गेल्यावर एक भव्य बुरुज थेट समुद्रात शिरलेला पाहायला मिळतो.

https://lh3.googleusercontent.com/-avzYXir1qGo/VxSaD1B0B2I/AAAAAAAAID4/x1moHGSWLrMMDRIcw6I_3o7pAduBxAdNACCo/s640/IMG_6723.JPG
पायऱ्या असलेली विहीर

https://lh3.googleusercontent.com/-9BnA4cKQ5Sg/VxSaGQIqI6I/AAAAAAAAHfk/tlWwyVV5_cQTBNoNryePsj3OCWypnLIsACCo/s640/IMG_6725.JPG
हल्ल्यात तटबंदीच झालेलं नुकसान

https://lh3.googleusercontent.com/-noM0IfQkYjY/VxSaHbUE1BI/AAAAAAAAHfk/nNywv3BI7VcHtc1HQGnT4DAo-U4qb2bLACCo/s640/IMG_6726.JPG

गड फिरून पूर्ण झाला आणि आता जायचं होत पांडवकालीन विमलेश्वर मंदिर.

प्रतिक्रिया

छान वर्णन आणि फोटो.विजयदुर्ग खरंच जबरदस्त किल्ला आहे.

सुंदर! विजयदुर्गास कितीही वेळा भेट दिली तरी मन भरत नाही हा बलाढ्य किल्ला पाहून!

स्वामिनी's picture

29 Apr 2016 - 4:25 pm | स्वामिनी

मी लहानपणी गेले होते येथे. जागा सुन्दर अहे पण निगा नीट नाही राखली जात या वास्तुची. मी गेले होते तेव्हा INS सिन्धुदुर्ग आली होती विजयदुर्ग बन्दरावर.

प्रचेतस's picture

29 Apr 2016 - 4:34 pm | प्रचेतस

विजयदुर्ग हा किल्ला बहुधा शिलाहार भोज दुसरा ह्याने बांधलाय. संदर्भ तपासायला हवेत.
बराच मोठा इतिहास आहे ह्याचा. कान्होजी, तुळाजी, मानाजी नंतर धुळूप.

अनिरुद्ध प्रभू's picture

30 Apr 2016 - 11:13 am | अनिरुद्ध प्रभू

जवळपास अकराव्या शतकच्या शेवटी सुरुवात आणि बाराव्या शतकाच्या दुसर्‍या शतकापर्यंत बांधकाम चालु होतं असं वाचलयं.

प्राची अश्विनी's picture

30 Apr 2016 - 11:19 am | प्राची अश्विनी

छान लिहिलंय. फोटोही सुरेख. शाळेत असताना सहलीबरोबर इथे आले होते.

सविता००१'s picture

30 Apr 2016 - 2:11 pm | सविता००१

लेख आणि फोटोही जबरी

सुधांशुनूलकर's picture

30 Apr 2016 - 7:17 pm | सुधांशुनूलकर

जगप्रवासींचा हा विजयदुर्गप्रवास सचित्र आवडला.
क्रमशः आहे, असं धरून चालतो. (शीर्षकामध्ये : १ : असं असल्यामुळे.)

खंडहर बता रहे है...
हवेली बुलंद थी!

बोका-ए-आझम's picture

1 May 2016 - 11:57 pm | बोका-ए-आझम

एक शंका - कलाल बांगडी या प्रकारातील तोफ म्हणजे काय? कलाल बांगडी हेच तोफेचं नाव आहे ना?

जगप्रवासी's picture

2 May 2016 - 3:50 pm | जगप्रवासी

कलाल बांगडी हे तोफेचे नाव नाहीये, तो एक तोफेचा प्रकार आहे. बांगड्यांच्या रिंगा असतात त्याप्रमाणे धातूच्या रिंगा असतात त्या एकमेकांना जोडतात ज्यामुळे गोळा डागताना तो गिरकी घेत जातो (बंदुकीतील गोळी ज्याप्रमाणे काम करते तेच ते तत्व) आणि तोफेचा पल्ला देखील लांबचा असतो. कलाल बांगडी प्रकारामुळे तोफ देखील मजबूत होते.

सुधांशूनूलकर : हो क्रमशः लिहायला विसरलो, अजून ४ सागरी दुर्ग आहेत.

विजयदुर्ग किल्ल्याच अजून एक वैशिट्य म्हणजे समुद्रात असलेली भिंत. ज्यावर इंग्रजांची "V" आकाराचा तळ असलेली जहाज आपटून फुटत पण त्याउलट मराठ्यांची जहाज आरामात जात.

https://lh3.googleusercontent.com/-P021kt58oss/VycpYc3iYqI/AAAAAAAAIFI/sREle2DpIkoGGVlAoglGZQZLLlOcZjNOACCo/s640/Vijaydurg.gif
विजयदुर्ग किल्ल्याचा नकाशा - ट्रेक क्षितीज वरून साभार

हकु's picture

10 May 2016 - 5:59 pm | हकु

वा वा! खूप सुंदर लेख! छायाचित्रे अप्रतिम. आता हा किल्ला पहायलाच हवा.