लदाख सायकल ने : सरचू ते व्हिस्की ओढा (भाग ७)

राजकुमार१२३४५६'s picture
राजकुमार१२३४५६ in भटकंती
5 Feb 2016 - 3:06 pm

अंगावर चादर घेऊन झोपलो. पण झोप काही लागेना बाहेर तोंड काढले कि नाकाला गार हवा लागायची. उंची वरती नाक कोरडे पडते. आणि चादर च्या आत डोके घेतले तर कमी हवे मुळे श्वास कोंडायाचा.
रात्री ११ वाजता एक बस आली. रस्त्यामध्ये ती खराब झाली होती. म्हणून तिला उशीर झाला. हॉटेल वाल्याने डाळ भात द्यायला मनाई केली. मग म्हस्का पाणी लावल्यावर तो तयार झाला. वीस लोकांचे जेवण बनवलं. नंतर काही दुसरी कडे झोपायला गेले. काही इथेच तंबू च्या बाहेर पडले. ज्याला जिथे जागा मिळेल तो तिथे झोपला. त्यांच्यात एक जपानी पण होता. त्याने तिथेच बाहेरच्या बाहेर जागा बनवली आणि चादर घेऊन झोपला. अश्या तऱ्हेने प्रवास मधला अजून एक दिवस संपला.

दिवस आठवा

साडे आठला डोळे उघडले. सचिन माझ्या आधीच उठला होता. आज खूप मोठं अंतर पार करायचं होतं. निदान पांग पर्यंत तरी पोहोचायचं होतं. पांग इथून ७८ किमी दूर आहे. सरचू आणि पांग च्या मध्ये कुठेही खाण्याची आणि रहायची व्यवस्था नाही. त्यातच दोन मोठे घाट पण पार करावे लागतात. जास्तकरून रस्ता हा चढाई चा आहे. समझा जर मी आज ७८ किमी सायकल चालवू शकलो नाही, तर काय करायचं? ह्या प्रश्नानि तर माझं डोकं खाल्लं. मग आजू बाजूला चौकशी केल्यावर कळलं कि, व्हिस्की ओढ्या वरती राहायला भेटू शकत. व्हिस्की ओढा इथून ५२ किमी दूर आहे. मला आज तर व्हिस्की ओढ्या पाशी पोहचण सुद्धा अशक्य वाटू लागलं. त्यामुळे इथंच भरपूर खाऊन घेतलं तसेच सोबत ६ आलू पराठे बांधून घेतले.

दहा वाजता इथून निघालो. काल विचार केला होता कि, आपण सरचू मध्ये खूप आराम करायचा. म्हणून आज उठायला उशीर केला. सरचू हे हिमाचल प्रदेश मध्ये आहे. थोडे पुढे गेल्यावर जम्मू काश्मीर ची हद्द सुरु झाली. बघा आता !जम्मू काश्मीर मध्ये पण लदाख!..
तसं भौगोलिक दृष्टीनं लदाख हे, बारलाचा पार केल्यानंतर सुरु होतं. पण नकाश्यात इथून सुरु होतं. खर म्हणजे सरचू पासून सात ते आठ किमी पुढे एक पूल आहे. ट्विंग ट्विंग पुल !! तीच हिमाचल आणि लदाख ची सीमा आहे. इथे लदाख किवा जम्मू काश्मीरची स्वागत पाटी दिसली नाही. सरचू मनाली पासून २२२ किमी दूर आहे. आणि लेह पासून २५२ किमी. तरी पण सरचू या रस्त्या वरचा मध्य बिंदू आहे. त्यामुळे सरचू ला पोहोचलो कि, आपण अर्धे अंतर पार केलं असं समझायचं.

सरचू ज्या नदीच्या किनारी आहे त्याच्या दुसर्या बाजूला एक गाव वसलेले आहे. बौद्ध लोक राहतात तिथे. गावाचे नाव मला आठवत नाही. खूप अडचणीच्या ठिकाणी वसलेले आहे. त्यांचा मुख्य व्यवसाय मेंढी पालनच आहे. पण त्या गावाच्या आजूबाजूला १००-१०० किमी पर्यंत कोणतेच गाव नाही. त्यामुळे त्यांना कोणी शेजारीच नाही. नदी वर पण पूल पण नाही. मग कसे ते, लोक नदी पार करत असतील. लाईट आणि टेलिफोन चे तर विचारूच नका. ते गाव ट्विंग ट्विंग नदीच्या बरोबर समोर आहे. म्हणून ते हिमाचल मध्ये आहे कि लदाख मध्ये सांगू शकत नाही.

गाटा लूप सरचू पासून २४ किमी पुढे आहे तसेच २०० मीटर खाली. त्यामुळे उतार होता. तरी पण पावणे तीन तास लागले तिथे पोहोचायला. त्याच वेळेस दिल्ली हून लेह ला जाणारी बस पण निघाली होती. रस्त्यांनी इतके सुंदर नजारे पाहायला मिळत होते कि सारखे थांबायला लागायचे, फोटो काढण्यासाठी. तसं पाहायला गेलं तर पांग मध्ये पोहोचायला पाहिजे होतं. पण पोहोचू शकणार नव्हतो. त्यामुळे मध्येच तंबू ठोकायला लागणार हे पक्के होते. पांग मध्ये पोहोचणारच नाही तर घाई कशाला!! म्हणून मजेत रमत गमत निसर्गाने केलेली सौंदर्याची उधळण बघत चाललो होतो.

रस्त्यात दोन ओढे भेटले. दोघान वरती पूल होते. ब्राण्डी ओढा आणि व्हिस्की ओढा !! जेव्हा व्हिस्की पूल आला तेव्हा मनामध्ये प्रश्न येणं स्वाभाविक होतं कारण हा ओढा नकी-ला च्या पुढे आहे. मग इथ कसा काय? पण याच उत्तर कोण देणार. ते तर आपल्यालाच शोधायचं होतं.
पावणे एक वाजता तिथ पोहोचलो जिथ गाटा लूप सुरु होतो. लूप म्हणजे वळणा वळणाचा रस्ता. सचिन पण तिथे होता. त्याने मला बघितल्या बघितल्या कौतुक केलं कि, आज तर तू खूप जोरात आहेस. मी म्हटलं,"भाऊ हा तर उतार होता म्हणून. इथून पुढे बघ किती जोरात जातो ते."
आता गाटा लूप ची चढाई सुरु होणार आहे. जवळ जवळ २१ वळणे आहेत. आणि अंतर १० किमी. पहिल वळण ४२०१ मीटर वर आणि शेवटचे वळण ४६६७ मीटर वर. गाटा लूप ची चढाई नकीला-ला पार करण्यासाठी करणार होतो.
जेव्हा आम्ही गाटा लूप ची चढाई सुरु केली तेव्हा चारी बाजूनी ढग होते. उन अजिबात नव्हते. थंड गार हवा सुटली होती. कधी कधी पावसाचे दोन चार थेंब पण अंगावर पडायचे. वरती पहिले तर नकी-ला जवळ काळ्या ढंगाची गर्दी होती. वाटले वरती नक्कीच बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
पोटामध्ये दबाव वाढला होता. आजूबाजूला कुठेच पाणी नव्हते. विचार केला कि पुढे पाणी भेटल्यावर दबाव सैल करू. पण कसले काय ! पुढे गेल्यावर पोट खूप दुखू लागले. मग बिना पाण्याचेच हलके व्हावे लागले. असल्या प्रवासात शुद्ध व अशुद्ध चा फरक करायचा नसतो.
इथे पण गाड्या वाल्यांनी शौर्त कट मारले होते. अश्याच एका छोट्या रस्त्यातून सुमो उतरताना दिसली. आम्ही पण त्याच रस्त्यांनी जायचे ठरवले. पण नंतर कळले कि नको रे बाबा तो शॉर्ट कट.
गाटा लूप वर चढाई च चढाई आहे. अश्याच एका ठिकाणी आम्ही दगडाला टेकून आराम करत होतो.
तितक्यात एक कार समोर येउन थांबली. कारच्या खिडकीतून एका म्हताराने तोंड बाहेर काढले. आणि डोळ्याला कॅमेरा लावून म्हटला कि, "अरे ओये, जरा सामने आना."
चढाई मुळे डोकं गरम झालं होतं. त्यात ह्याची गुर्मी ची भाषा ऐकून अजून गरम झालं. तरी म्हंटल म्हातार्याची इज्जत करावी. म्हणून मी त्याच्या समोर गेलो.
मोठ्या आवाजात म्हणाला, "तुम्हारा क्या करूंगा मैं? साइकिल लेकर आओ."
त्याची हि भाषा ऐकून इतका राग आला कि, खालचा दगड घेऊन ह्याच्या डोक्यात घालावा. पण तेवढी शक्ती पण अंगात नव्हती. मी आपला परत आहे त्याच जागेवर येउन बसलो.
परत म्हटला, "अरे, तुम्हें सुनता नहीं क्या?"
मी म्हटले, " बाबा, पहिली गाडी बाजूला लावा. खाली उतरून माझ्या जवळ या. हाथ मिळवा. विचारपूस करा. मग फोटो काढायची परवानगी मागा. तुझ्या फोटो मध्ये येण्यासाठी आम्ही कष्ट करत नाहीत."
खाली उतरून माझ्याजवळ यायची त्याची ताकत नव्हती. थंडगार वारा सुटला होता. त्याने तोंडातच बडबड करत काच वर घेतली.

पावणे दोन वाजता बाराव्या वळणावर जेवण करायला थाबलो. उंची होती ४३६८ मीटर . मोकळी जागा होती. बसायची पण व्यवस्था होती. दोघांनी एक एक पराठा खाल्ला. आता उन पडले होते. दोघे जन तिथेच झोपलो. नंतर ढगांचा गडगडाताने जाग आली. वरती पर्वतावरती पाउस पडत होता. पावणे तीन वाजता निघालो.

गाटा लूप ला चार वाजे पर्यंत पार केलं. वळणे जरी संपली असली तरी चढाई अजून बाकी होती. जसा आम्ही नकी-ला च्या दिशेन चाललो होतो तसे ढग पण गडद होऊ लागले. पाउस पडण्याची शक्यता जास्त होती. रस्त्यात एक शेड दिसलं. पण त्याचा काही उपयोग नव्हता. उन पावसापासून संरक्षण देणार नव्हत.
आम्ही आता तंबू लावण्यासाठी जागा शोधू लागलो. समोरून इतकी जोरात हवा येत होती कि सायकल चालवणे पण कठीण झाले होते. आम्हाला अशी जागा पाहिजे होती कि जिथे हवा कमी लागेल आणि पाउस लागणार नाही.
शेवटी अशी जागा मिळाली पण मन तयार होत नव्हते. म्हटलं पुढे जाऊन बघू या रस्ता कसा आहे ते. पुढच्या वळणावर गेल्यावर पाहिले तर अजून चढाईची रस्ता होता. परत आम्ही मागे आलो. मग रस्त्याच्या खाली उतरलो तर तिथे आधीच्या तंबू लावलेल्या खुणा होत्या. विझलेली चूल आणि दारूच्या बाटल्या होत्या.
व्हिस्की पूल संपल्यानंतर आम्हाला पाणी भेटले नव्हते. बाटली मधला शेवटचा घोट पण संपला होता. अश्या वेळेस पाणी मिळवायची कल्पना मला माहिती आहे. एक गाडी थांबवली आणि एक बाटली पाणी घेतले. आता रात्रभर काळजी नव्हती. जसा तंबू लावला सामानासहित आम्ही त्यात घुसलो.
बाहेर पाउस पडू लागला. चार पराठे अजून शिल्लक होते. दोन खाल्ले दोन सकाळी ठेवले. आयुष्यात पहिल्यांदाच एवढ्या उंचीवर झोपत होतो. ४७०० मीटर (१५४१९ फुट) वर. एवढ्या उंचीवर अश्या हवामानात आणि अश्या रात्री भीती तर खूप वाटत होती. सचिन सोबत होता म्हणून काही वाटलं नाही.
"रात्र ती वै-याची होती......
ये- जा करणार्यांची ती वाट
आज जणू ओसाड होती..
नव्हती होत हिम्मत कोणाची
ती रात्र वै-याची होती....."

दिवस नववा

सकाळी आठ ला उठलो. बाहेर कसला तरी आवाज येत होता. दोन मोटारसायकली आणि दोन कार थांबल्या होत्या. आणि पर्यटक आमच्या तंबू पाशी येउन फोटो काढत होते. काल संकटाच्या परिस्थिती मध्ये तंबू इथे लावावा लागला होता. मागे ३४ किलोमीटर सरचू आणि पुढे ११ किलोमीटर व्हिस्की ओढा इथेच लोकांची वस्ती आहे. अश्या सुमसाम जागे मध्ये, आमचा तंबू म्हणजे एक आकर्षण केंद्र होतं. हि लोक रोहतक ची होती.

मी निघायच्या आधी गुगल मैप वरून रस्त्या मधले अंतर आणि उंची लिहून ठेवलं होतं. नकी-ला चे अंतर आणि उंची लिहून ठेवायचे राहून गेले होते. मी लिहून ठेवलं कि, गाटा लूप (४७००) आणि त्या पुढे २ किमी (४७४०) मीटर वर नकी-ला आहे. त्यानंतर पुढे लिहून ठेवलं कि, नकी-ला च्या 19 किलोमीटर च्या पुढे ५०६० मीटर उंचीवर लाचुलुंग-ला आहे. या माहितीच्या आधारे नकी-ला पार केल्या नंतर थोडा उतार आहे का सरळ लाचुलुंग-ला पर्यंत चढाई आहे.
काल जेव्हा आम्ही गाटा लूप पार केल्यानंतर, ३ किमी पुढे आलो तेव्हा आम्हाला नकी-ला दिसलेच नाही. आम्हाला वाटलं कि, नकी-ला मागं गेलं आहे आणि लाचुलुंग-ला ची चढाई सुरु झाली आहे. पण तसं नव्हतं. प्रत्यक्षात नकी-ला अजून आलाच नव्हता. मी चुकीची माहिती लिहून ठेवली होती.

पावणे दहा वाजता आम्ही येथून निघालो. सर्व सामान सायकल वर बाधण्यासाठी आणि सायकल रस्त्यावर चढवण्यासाठी आमचा पार जीव गेला. हा एक उच्च पर्वतीय आजार आहे. थोडा काम केलं तरी दम लागतो. सचिनची पण हीच अवस्था होती.
नेहमी सारखंच सचिन आमच्या पुढे निघून गेला. चढ हा हळू हळू वरच्या बाजूने वाढत चालला होता. मला सायकल चालवायला त्रास होत होता. तरी रस्ता चांगला बनविलेला होता. चढ पण फारसा काही तीव्र नव्हता. तरी पण चार पैन्दल मारले कि, गुड्खे दुखायचे. पाणी पण संपलं होतं. रस्त्या च्या दोन्ही बाजूनी गाड्या चालल्या होत्या पण कुणाला मागायची हिम्मत झाली नाही.

जेव्हा ४८०० मीटर पार केलं. तेव्हा वाटलं होतं कि, नकी-ला मागे गेलं आहे. आणि आता लाचुलुंग-ला (५०६०) पार करायचे आहे. पण माझे सगळे आकडे खोटे ठरले होते. कारण नकी-ला आजून यायचे आहे.
सायकल पुढे चालवता येईना म्हणून खाली उतरून पायाने चालू लागलो. पैन्दल मारण्यापेक्षा सायकल ढकलीत चालण्यातच मजा वाटत होती. काल रात्री पाउस झाला तेव्हा वाटले कि, असं होत असेल कारण हिमालयात दुपारी ३ नंतर हवामान खराब होतं. त्यामुळेच पाउस पडला असेल. पण सकाळी असच हवामान बघितलं,तेव्हा मनात शंखेची पाल चूक चुकली. हि हिमालयाच्या पुढची जमीन आहे. पण का माहित हे एवढे ढग चुकून कसे इकडे आले. आणि आता जायचे तर नावच घेत नाही. ढग नुसते जमून आले होते पण पाउस जास्त पडत नव्हता. पण जोरात थंड वाऱ्याने नाकी नऊ आणले होते. दोन दिवसापूर्वी उन्हाने त्रास दिला होतं. तेव्हा देव जवळ पार्थना केली कि उन जाऊदे. देवाने माझे ऐकले. उन गायब. मला आधीच कळाले असते कि, देवा जवळ उन्हा साठी पर्याय फक्त थंड वारा आहे. तर मी प्रार्थना केलीच नसती. ढग किती पण पाठवून दे पण जोराचा थंड वारा नको.

एक छोटा झरा भेटला. खूप पाणी प्यायलो. नमकीन खाल्लं. अर्धा तास तिथेच थांबलो. बारा वाजता उठून निघालो तर श्वास घ्यायचा त्रास सुरु झाला. आराम केल्यानंतर पायांनीच निघालो. नकी-ला ची उंची ४९३० मीटर आहे. इथून पुढे लांब पर्यंत रस्ता दिसत होता. रस्ता पुढे जाऊन एका ओढ्या पाशी उतरत होता. आणि नंतर वरती चढून एका घाटात गायब झाला होता. मी ओळखून चुकलो कि पुढे लाचुलुंग-ला आहे. मग ओढा पार केल्यानंतर काही तंबू दिसले. हा ओढा म्हणजे व्हिस्की ओढा आहे. काल पण आम्ही हाच व्हिस्की ओढा पार केला होता.
खर म्हणजे लाचुलुंग-ला मधून व्हिस्की ओढा सुरु होतो. आणि पुढे जाऊन सरचू नदी मध्ये मिसळतो. लाचुलुंग-ला पार करून पांग ला जाऊ शकतो त्यासाठी रस्ता व्हिस्की ओढा बरोबरीने वरती गेला पाहिजे होता. पण व्हिस्की ओढा हा खूप खड्या मध्ये आहे. त्याच्या बरोबरीने रस्ता बनवणे अवघड आहे. म्हणून दोन वेळा पूल बनवून त्यांनी सोपी पद्धत वापरली.
जिथे गाटा लूप आहे तिथे डोंगर जास्त सरळ उंच नाही. थोडासा पसरट आहे. त्यामुळे एकावर एक असे २१ लूप (वळण) बनवले आहेत. जेवढे वरती गेलो तेवढं उतार पण कमी होत गेला. गाटा लूप चा चमत्कार असा आहे कि, रस्ता मात्र खूप उंच होत गेला. मात्र व्हिस्की ओढा खड्यातच वाहत राहिला. गाटा लूप नंतर रस्ता उंच होत गेला. व्हिस्की ओढा खालीच राहिला. नकी-ला नंतर रस्ता खाली उतरला आणि चार पांच किलोमीटर नंतर व्हिस्की ओढा आणि रस्ता परत मिळाला.

खर तर नकी-ला हा खरच नकली आहे. आहे तर घाट. पण घाटाची ओळख काय असते तर दोन्ही बाजूला असणारा त्याचा उतार. पण कधी कधी ह्याला अपवाद पण असतात. घाट ओळखायची सोपी खुण अशी आहे कि त्याच्या दोन्ही किनाऱ्या वरून वेग वेगळे ओढे निघतात. हे ओढे पुढे जाऊन कोणत्या तरी, नदीला जाऊन मिळतात किवा स्वतः नदी बनतात. पण नकी-ला पासून कोणताच ओढा निघत नाही. तुम्ही खाली जाऊन वाकून पहिले तर व्हिस्की ओढा हा नकी-ला च्या दोन्ही बाजूनी आहे. फक्त रस्ता वरती गेलाय आणि खाली उतरलाय. जर थोडे डोकं वापरला असता तर खाली उतरायची गरजच पडली नसती. आणि हो..चढाई नंतर जर उतार आला तर अश्या प्रत्येक घाटाला घाट म्हणत नाहीत. नकी-ला घाट हा खरच नकली घाट आहे.

हा रस्ता कधी बनला ते माहित नाही पण भारताला स्वतंत्रता मिळाल्या नंतर बनला आहे हे निश्चित. त्याच्या आधी पासून इथे ये जा असायची. व्यापार पण व्हायचा. तेव्हा पायवाट होती. ती अजूनही इथे दिसते. जेव्हा तुम्ही गाटा लूप वरती असता तेव्हा व्हिस्की ओढ्याच्या दुसर्या बाजूने एक पायवाटे ची रेषा बरोबरीन वरती चढताना दिसते. ती रेषा लाचुलुंग-ला पर्यंत जाताना दिसते. त्यामुळे त्या जमान्यात गाटा लूप चे काही अस्तित्व नव्हते. नाही नकी-ला चे !! रस्ता बनल्या मुळे पायवाटेच आस्तित्व संपलं. पण कमी पावसामुळे पायवाट पुसली नाही. कधी दरड कोसळल्याने किवा कधी माती पडल्याने तिचे आस्तित्व काही ठिकाणी गायब झाले असले तरी अजून सुद्धा, त्या पायवाटेच्या खुणा तिथे आहेत.

नकी-ला नंतर रस्ता खराब होत जातो. वरून पावसाचे थेंब पण पडत होते. अश्या हवामानात साडे चार किलोमीटर खालच्या तंबू पर्यंत सायकल चालवावी लागली. सचिन तिथेच भेटला. तंबू चा मालक लद्दाखी होता. त्याचे नाव सेरिंग सेन्दुप. त्याने एका छोट्या तंबू मध्ये सायकल लावली. त्यामुळे सामान भिजल्या पासून वाचले. मी इथे पावणे एक ला पोहोचलो होतो. अर्ध्या तासानंतर पाउस पडायचा थांबेल असे वाटले होते. सचिन ने तर ठरवलं होत कि हवामान कसे हि असू, इथून दोन वाजता निघणार म्हणजे निघणार. पण मी तयार नव्हतो. याचं कारण इथून पुढे ६ किमी वरती लाचुलुंग-ला आहे. ज्याची उंची ५०६० मीटर उंच आहे. नकी-ला पार करायलाच जीव गेला आणि आता अजून पुढे वरती चढायचे आहे. नको रे बाबा !! आणि दुसरं कारण म्हणजे हवामान. पाउस पडायचा भले हि थांबला असेल पण आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली होती. त्यातच जोराचा थंड वारा वाहत होता. परत कधी पण पाउस पडायची शक्यता होती. आणि ५००० मीटर उंचीवर भिजायचे परिणाम मला चांगले ठाऊक आहेत. मी बरोबर कधी हि औषधे ठेवत नाही. मग मी मुद्दामून असं काम का करू कि, मला औषधे घ्यावी लागतील. म्हणून मी आज इथेच थांबणार!! उद्या पांग ला जाणार. आज फक्त ११ किलोमिटरच सायकल चालवली. पण त्याचे काही मला दुख नव्हते.
सचिन आज पांग ला पोहोचेल. मी जेव्हा उद्या पांग ला पोहोचेल तेव्हा सचिन डेबरिंग ला पोहोचलेला असेल. त्यामुळे एक दिवसांनी तो माझ्या पुढे होईल. आमची भेट आता लेह मधेच होईल. व्हिस्की ओढ्या वरती मी एकटाच यात्रेकरू आहे. सेरिंग नि सांगितलं कि काल पूर्ण तंबू भरला होता. एकटा यात्री असलं कि, खूप मज्जा असते. आपण फक्त आदेश सोडायचे, बाकीच्यांनी त्याचे पालन करायचे. तुम्ही किचन ओट्यावरती पण मांडी खालून बसू शकता. स्वतः तव्यावर्ती रोट्या भाजू शकता. आपल्या हातानी कुकर मधला डाळ भात घेऊ शकता. मुख्य म्हणजे आपल्या शेजारी लद्दाखी बसला आहे, त्याच्याशी घर कुटुंबाची , लाख-दुनियाची गोष्टी करू शकता आणि शेवटी शुभरात्रि म्हणून गाड्यांच्या ढिगा वरती चादर घेऊन झोपू शकता.
काल ३७ आणि आज फक्त ११ च किमी सायकल चालवली.

आठव्या दिवसाची क्षणचित्रे


सरचू वरून निघाल्यावर..


हा ट्विंग ट्विंग ओढा आहे. हिमाचल आणि लढाख ची सीमारेषा


सरचू नदीच्या पडयाल चे गाव


लढाख ची जीवनरेषा !! हजारो ट्रक दिवसभरात ये जा करतात.


ब्राण्डी ओढ्यावरती बांधलेला पूल.


व्हिस्की पुल


असा नजारा तर.. लढाख ची खरी ओळख आहे.


रस्ता तयार करणारे कामगार जेवण करताना.


मातीने बनलेली वेगळी आकृती. हिचा दुसर्या बाजूने घेतलेला फोटो खाली आहे.


हीच आकृती जी वर दाखवली होती.


दिल्लीवरून लेह ला जाणारी बस.


इथून गाटा लूप सुरु होतो.


सरचू नदीचं शेवटच दर्शन. पुढे जाऊन हि जांस्कर नदीला मिळते.


गाटा लूप


ओळखलत का सर मला? - पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.


वातावरण खरब होत चाललय.


गाटा लूप(वळण) च विसाव्व वळण


हवेमुळे डोंगराची झालेली झीज, याचे हे एक उत्तम उदाहरण.


ठोकला इथे तंबू !!


वीराने में लगा अपना आशियाना।

नवव्या दिवसाची क्षणचित्रे


तंबू मध्ये सचिन!!


नकी-ला कडे


नकी-ला ला मी नकलीच म्हणतो.


हा जो रस्ता हा लांबवर दिसतोय, तो रस्ता पुढे व्हिस्की ओढ्या पाशी उतरून पुढे वरती डोंगरावर चढून लाचुलुंग-ला घाटात गायब झालाय.


इथून व्हिस्की ओढा, त्याच्या बरोबरीने तंबू आणि जो रस्ता वरती जात आहे तिकडे लाचुलुंग-ला आहे. ५०६० मीटर वर.


व्हिस्की ओढ्यावर


सचिन आकाश्या कडे बघताना कि, पुढे जाऊ कि नको.

(क्रमशः)

पुढील भागात जाण्यासाठी ......

प्रतिक्रिया

नितीन पाठक's picture

5 Feb 2016 - 3:46 pm | नितीन पाठक

धन्य ते सायकल वीर.
प्रणाम दोघांना .....
अप्रतिम सफर. वाचून आणि पाहूनच दम लागतोय ...............

स्पा's picture

5 Feb 2016 - 4:13 pm | स्पा

धन्यच ..

काही शब्द नाहीत

__/\__

अजया's picture

5 Feb 2016 - 4:31 pm | अजया

ग्रेट ग्रेट ग्रेट

यशोधरा's picture

5 Feb 2016 - 4:56 pm | यशोधरा

महान!

स्वच्छंदी_मनोज's picture

5 Feb 2016 - 5:15 pm | स्वच्छंदी_मनोज

बघुनच आम्हाला दम लागला. अफाट आणी भन्नाट.
प्रणाम स्विकारावा. __/\__

प्रचेतस's picture

5 Feb 2016 - 6:07 pm | प्रचेतस

निव्वळ महान.

पिलीयन रायडर's picture

5 Feb 2016 - 6:29 pm | पिलीयन रायडर

__/\__

बाबा योगिराज's picture

5 Feb 2016 - 11:57 pm | बाबा योगिराज

बाब्बो.
मालक नीरज भौ ला आमचा पण एक सलाम सांगा.

मयुरMK's picture

6 Feb 2016 - 1:09 pm | मयुरMK

शब्द नाहीत ____/\____