'ट्वेल्व्ह अँग्री मेन' आणि ’मॅनेजरियल ग्रिड’ .....

Primary tabs

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in दिवाळी अंक
3 Nov 2015 - 10:43 pm

.
.
'ट्वेल्व्ह अँग्री मेन' हा चित्रपट आजवर इतक्या वेळा बघून झालाय की आता किती वेळा पाहिलाय हेसुद्धा आठवत नाही. त्यानंतर कधीतरी एक-दोन वेळा 'एक रुका हुआ फैसला'सुद्धा पाहून झाला. आवडलासुद्धा.... पण का कोण जाणे, हिंदी आवृत्ती तितकीशी भावली नव्हती. परवा एक सन्मित्र श्री. अतुल ठाकुर यांची फेसबुकवरील या संदर्भातील पोस्ट वाचली. अतुलदा म्हणतात, "हिन्दीतील 'एक रुका हुवा फैसला' पाहून अक्षरशः भारावलो होतो. मात्र त्यानंतर अनेक वर्षांनी 'ट्वेल्व अँग्री मेन' पाहण्यात आला आणि दोन चित्रपटांतला फरक दोन तर्‍हेच्या प्रेक्षकांतील मानसिकता समजून घेण्यासही उपयोगी पडला. हॉलिवूड चित्रपटाची हाताळणी अतिशय संयत, तर हिंदी चित्रपट त्या मानाने भडक. विशेषतः अन्नू कपूरचे काम तर आता फार भडक वाटते. आपल्याकडे भावना भडक स्वरूपात मांडलेल्या प्रेक्षकांना रुचत असाव्यात. मात्र 'ट्वेल्व अँग्री मेन' शांतपणे विजेचे झटके देत पुढे सरकत राहतो." अगदी, अगदी हेच कारण असावे की मलासुद्धा मूळ हॉलीवूडी ( ;) ) आवृत्तीच भावली होती. असो.

चित्रपटाचा परिचय करून देणे किंवा समीक्षण करणे हा या लेखाचा उद्देश नाहीये. या चित्रपटाशी माझा एका वेगळ्याच कारणाने संबंध आला. खरे तर या चित्रपटाने मला एक प्रश्न दिला आणि त्याचे उत्तर शोधण्याच्या नादात हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिला गेला आणि जेव्हा मला माझ्या प्रश्नाचे उत्तर सापडले, तेव्हा हा चित्रपट पाहण्याची सूचना करणार्‍या 'जिम’ला वाकून मुजरा करावासा वाटला. 'जिम' ????

ट्रिंबलला जॉईन झाल्यानंतर काही दिवसातच एका एक्स्टर्नल मॅनेजमेंट ट्रेनिंगला सामोरे जावे लागले होते. "Team Accelrator Workshop" या नावाने ओळखले जाणारे हे प्रशिक्षण देणारी एक नॉर्थ अमेरिकन कंपनी आहे. "3 Circle Partners" या नावाची ही कंपनी. डॉ. मेरीडिथ बेल्बिन या विख्यात व्यवस्थापन तज्ज्ञ आणि संशोधक म्हणून ओळखल्या जाणार्‍या, व्यवसायाने 'व्यवस्थापनशास्त्राचे' प्राध्यापक असलेल्या ब्रिटिश सदगृहस्थाने या सगळ्याला सुरुवात केली. त्यामुळे हा प्रशिक्षण कार्यक्रम ’बेल्बीन’ (Belbin) याच नावाने विख्यात आहे. पाच दिवसाचा ट्रेनिंग कोर्स होता. आमचा इन्स्ट्रक्टर, ट्रेनर आणि बेल्बिनच्या डायरेक्टर्सपैकी एक असलेल्या ’जिम वेदरबी’बरोबर या पाच दिवसात मस्त मैत्री झाली होती. हिंदुस्तानी ’करी’चा चाहता असलेला ’जिम’ त्या चार पाच दिवसात माझा चांगलाच मित्र बनला होता. प्रशिक्षण संपल्यावर निरोप घेताना त्याने एक सल्ला दिला. "या प्रशिक्षणादरम्यान मी तुला जे काही शिकवले, ते जर प्रॅक्टिकली अनुभवायचे असेल, तर 'ट्वेल्व्ह अँग्री मेन' पाहा ....

Watch the movie and try to relate it with our training last few days. All da best!!" आणि मग मी 'ट्वेल्व्ह अँग्री मेन'च्या मागे लागलो. कधीतरी नकळत त्याच्या प्रेमातही पडलो. झोपडपट्टीत राहणार्‍या एका तरुण मुलावर स्वत:च्या वडिलांना चाकूने भोसकून मारल्याचा आरोप येतो. दोन्ही पक्षांचे जाब-जवाब ऐकून घेतल्यावर न्यायमूर्ती त्या तरुणाचे भविष्य बारा ज्युरींच्या हाती सोपावतात. त्या बारा जणांना एका खोलीत बंद केले जाते आणि हेही सांगितले जाते की जर तो तरुण अपराधी आहे असा त्यांचा निर्णय आला, तर त्याला मृत्युदंड दिला जाईल आणि तिथून सुरू होते एक विलक्षण नाट्य....

1
'ट्वेल्व्ह अँग्री मेन'

मी इथे कलावंतांबद्दल, त्यांच्या अभिनयाबद्दल, दिग्दर्शनाबद्दल काहीही लिहिणार नाहीये. तेवढा माझा वकूब नाहीये. जिमने दिलेल्या सल्ल्यानुसार मी त्यात माझ्यासाठी काय आहे ते शोधत होतो आणि चित्रपट ३-४ वेळा पाहिल्यानंतर ते मला हळूहळू लक्षात आले. हा मुद्दा मांडण्याआधी आपल्याला या बारा ज्युरर्सबद्दल थोडे जाणून घ्यावे लागेल....

1

समाजाच्या प्रत्येक स्तरांतून, वेगवेगळ्या क्षेत्रांमधून, निरनिराळ्या वयोगटातून आलेले हे बारा पंच आहेत. प्रत्येकाच्या स्वत:च्या अशा काही समजुती आहेत. काही गृहीतके आहेत. एखाद्या गोष्टीकडे, घटनेकडे पाहण्याची प्रत्येकाची वृत्ती निराळी आहे. प्रत्येकाचा स्वभाव, त्यांची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत.

ज्युरी नं. १ - हा व्यवसायाने कुठल्यातरी आस्थापनेत फोरमन आहे. कार्यबाहुल्याने गांजलेला, स्वत:चे असे कुठलेच मत नसलेला, तरीही किंवा त्यामुळेच सगळ्यांच्या मतांशी जुळवून घेण्याची धडपड करणारा. पण याच्यातही एक वेगळेपणा आहे, ज्याला टीम वर्कर म्हणता येईल असे हे व्यक्तिमत्त्व आहे. इथे तो स्वत:हून वोटिंगची, त्यासाठीच्या चिठ्ठ्या बनवण्याची जबाबदारी घेतो. सुरुवातीला ’गिल्टी’ असे त्याचे मत नंतर बदलत-बदलत ’नॉट गिल्टी’पर्यंत येऊन पोहोचते. तो एका शाळेच्या फुटबॉल टीमचा कोचसुद्धा आहे.

ज्युरी नं.२ - एक सर्वसामान्य, मितभाषी बँक कर्मचारी. जो कायम इतरांच्या दडपणाखाली वावरतो. पण तरीही आपले स्वत:चे मत तो राखून आहे आणि योग्य संधी मिळताच तो आपले मत मांडायला मागेपुढे पाहत नाही.

ज्युरी नं. ३ - एक व्यावसायिक, आत्मकेंद्रित, अतिशय उद्धट, पूर्वग्रहदूषित, संतापी असा माणूस. पण त्याच्या वागण्यालाही एक करुण किनार आहे. काही कारणामुळे तो आपल्या एकुलत्या एक तरुण मुलापासून दुरावलेला आहे. त्यामुळे या केसमधील आरोपीवरसुद्धा त्याचा राग आहे, कारण या मुलावर आपल्या पित्याच्या निर्घृण हत्येचा आरोप आहे.

ज्युरी नं. ४ - हा माणूस व्यवसायाने स्टॉक ब्रोकर आहे. अतिशय संतुलित वृत्ती, कधीही, कसल्याही परिस्थितीत गोंधळून न जाणारा, मोजक्या शब्दात नेमका मुद्दा मांडण्यावर विश्वास असलेला एक रॅशनल माणूस, जो फक्त पुराव्यांवर विश्वास ठेवून त्यानुसारच मत बनवतो.

ज्युरी नं. ५ - झोपडपट्टीत वाढलेला, एका स्थानिक बेसबॉल टीमचा चाहता असलेला. तो तसा Paramedic म्हणूनही काम करतो. नेमकी आज त्याच्याकडे संध्याकाळी असलेल्या एका बेसबॉल मॅचची तिकिटे आहेत. त्याची आवडती टीम खेळणार असल्याने त्याला तो सामना गमवायचा नाहीये.

ज्युरी नं. ६ - एक रंगारी, कर्तव्यकठोर, तत्त्वनिष्ठ आणि ज्याला इतरांबद्दल, त्यांच्या मताबद्दल आदर आहे असा.

ज्युरी नं. ७ - हा माणूस पेशाने सेल्समन आहे, खेळाचे वेड आहे त्याला. पण स्वत:चे ठाम मत नाही, खोलवर विचार करण्याची वृत्ती नाही असा एक उथळ स्वभावाचा माणूस.

ज्युरी नं. ८ - सुरुवातीला न्यायालयाच्या आणि इतर ज्युरींच्या मताला शांतपणे परंतु ठामपणे विरोध करणारा हा एक वास्तुविशारद. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा प्रश्न असताना कसलीही चर्चा न करता त्याला गुन्हेगार ठरवण्यास याचा विरोध आहे. एका अर्थी हाच चित्रपटाचा नायक आहे.

ज्युरी नं. ९ - ज्युरींपैकी सर्वात वृद्ध आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व. प्रत्येक लहान सहान गोष्टीला महत्त्व देणारा, शांत स्वभावाचा ज्ञानी मनुष्य..

ज्युरी नं. १० - एक मोटर गॅरेज मालक, अतिशय धर्मांध, जबरदस्तीने आपलेच ते खरे करणारा, आक्रस्ताळ्या वृत्तीचा माणूस.

ज्युरी नं. ११ - पेशाने घड्याळजी, नम्र पण अतिशय बडबड्या, पाल्हाळिक स्वभावाचा अमेरिकन माणूस.

ज्युरी नं. १२ - हा माणुस एक जाहिरात कंपनीचा हुशार अधिकारी आहे. स्वभाव काहीसा विनोदी, कुठल्याही गोष्टीवर लगेच काहीना काही विनोदी पण बोचरी टिप्पणी करणे ही त्याची खासियत आहे. पण कुठल्याही निर्णयाप्रत येण्याची त्याची क्षमता नाही.

यातल्या बहुतेकांना हे ज्युरीचे काम, त्यासाठी वेळ घालवणे आवडत नाहीये. त्यातून हा तरुण मुलगा गुन्हेगार असल्याची प्रत्येकाची आधीच खात्री पटलेली आहे, किंबहुना प्रत्येकाने ती तशी स्वत:ला पटवलेली आहे. त्यामुळे बहुतेक सगळ्यांच्याच मनात गारशी चर्चा-बिर्चा न करता पटकन एकमताने त्याला दोषी ठरवायचे आणि सुटका करून घ्यायची, आपापल्या कामाला पळायचे असा विचार आहे. पण सुरुवातीला ज्युरर क्रमांक ८ हा सगळ्यांच्या मताविरुद्ध जाऊन कुठलीही चर्चा न करता त्या तरुणाला दोषी ठरवायला नकार देतो आणि मग बाचाबाचीला सुरुवात होते.

हे असे होते बघा, चित्रपटाबद्दल लिहायला बसलो की असे वाहवत जायला होते मला... असो. मूळ मुद्दा बाजूलाच राहिलाय. So let's come to the point ! चित्रपट पाहताना एक गोष्ट लक्षात आली की यातला घड्याळजी, सेल्समन आणि जाहिरात कंपनीचा प्रतिनिधी सोडला तर प्रत्येक जण स्वत:चे मत मांडण्याचा, इतरांना ते पटवण्याचा कसोशीने प्रयत्न करतोय. प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे आहेत, पद्धती वेगळ्या आहेत, स्टाईल वेगळी आहे आणि त्यामुळे त्या प्रत्येकाचा, त्यांच्या प्रयत्नांचा इतरांवर होणारा परिणामही वेगवेगळा आहे. आणि त्याच क्षणी माझ्या लक्षात आले जिमने हा चित्रपट कशासाठी पाहायला सांगितला होता.....

आमच्या प्रशिक्षणादरम्यान जिमने एका मुद्द्यावर खूप म्हणजे खूपच भर दिला होता, तो म्हणजे 'The Impact of Leadership Styles!'

हा मुद्दा लक्षात घेण्यासाठी आपल्याला जरा Leadership Styles म्हणजे पर्यायाने Managerial Grid हा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. रोजच्या आयुष्यात आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत कुणाला तरी ’रिपोर्ट’ करत असतो. खाजगी आयुष्य असो वा कार्यालयीन, everybody has a 'Manager!' यापैकी काही मॅनेजर्ससाठी कुठल्याही परिस्थितीत रिझल्ट्स महत्त्वाचे असतात, तर काहींसाठी ते रिझल्ट्स देणारे सहकारी. या दोन बेसिक लीडरशीप स्टाईल्स सगळीकडे पाहायला मिळतात.

१. Initiating structure behavior (concern for production) : या प्रकारात जो लीडर आहे, नेता (Manager) आहे, तो स्वत:च स्वत;चे आणि हाताखालच्या कर्मचारिवर्गाच्या भूमिका, त्यांच्या कार्यपद्धती ठरवतो. कर्मचारिवर्गाबरोबर संवाद साधण्यासाठी एक औपचारिक पद्धती अवलंबतो आणि ठरवलेली कामे कशी करायची, करून घ्यायची याचे नियम, पद्धती ठरवून देतो. इथे पहिला आणि शेवटचा अधिकार त्याचा स्वत:चाच असतो.

२. Consideration behavior (concern for people): इथे परिस्थिती अगदी वेगळी असते. इथे नेतृत्वाच्या दृष्टीने त्याचे सहकारी, त्यांची मते तितकीच महत्त्वाची असतात. त्याचे आपल्या सहकारीवर्गाबरोबर नेहमी सौहार्दाचे, समजुतीचे संबंध असतात. तो नेहमी आजूबाजूचे वातावरण मोकळे, इतरांच्या मतालाही महत्त्व देणारे ठेवतो. इथे त्याच्याबरोबरच इतरांच्या मतालाही किंमत असते.

आणखी थोडे मागे जाऊ या. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर, या दोन बेसिक लीडरशिप स्टाईल्सवर आणखी सखोल अभ्यास करण्यासाठी ओहियो स्टेट युनिव्हर्सिटी आणि मिशिगन युनिव्हर्सिटी यांनी बरेच प्रयत्न केले होते. सर्वश्री रॉबर्ट ब्लेक आणि जेन मौटन या दोन अभ्यासकांनी या मुद्द्यावर आणखी सखोल अभ्यास करून Managerial Gridची संकल्पना विकसित केली, जी आजही व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमात अतिशय महत्त्वाची मानली जाते, शिकवली जाते. ब्लेक आणि मौटन यांनी विकसित केलेल्या या ग्रिडचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लीडर्सना किंवा मॅनेजर्सना एका मोजपट्टीवर (१ ते ९ या स्केलवर) ठरावीक श्रेणीत गुंफले आहे. ब्लेक आणि मौटन यांच्या लक्षात आले की या दोन्ही बेसिक स्टाईल्स म्हणजे दोन टोके नसून एकमेकांवर अवलंबून असणारी अखंड पण स्वतंत्र चलने आहेत.

ब्लेक आणि मौटन यांचे "Managerial Grid Module"

1

दोन अक्ष, दोन्ही कार्यपद्धतीवर केंद्रित होणारे. ब्लेक आणि मौटन यांनी या ’ग्रिड’वर मॅनेजर्सना १ ते ९ असे गुण देऊन त्यांच्यातील फ़रक आणि वैशिष्ट्ये अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.

1
Managerial Grid Module

1
वरील चित्रातील आलेखानुसार ब्लेक-मौटन जोडगोळीने मॅनेजर्सचे/लीडर्सचे सहा श्रेणीत वर्गीकरण केल्याचे लक्षात येते. आपण एकेक करून सगळ्यांबद्दल जाणून घेऊ या.

1
१. 9-1 Task Oriented Leader (High Results - Low People)
"Results at any cost and as I have decided" हे ब्रीद असणारा हा वर्ग. यांच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत, मी ठरवलेल्याच मार्गाने काम झाले पाहिजे असा हेका असतो, मागणी असते. अशा लोकांच्या लेखी सहकारी वर्गाची, हाताखाली काम करणार्‍या लोकांची किंमत शून्य असते. आपल्याला हवे ते रिझल्ट्स, आपल्याला हव्या तशाच पद्धतीने सर्व सूत्रे स्वत:च्या हातात ठेवून मिळवणे हे या वर्गाचे मुख्य सूत्र असते. शक्यतो इथे हाताखालच्या कर्मचारिवर्गाला अशा व्यक्तीचा स्वभाव माहीत असल्याने त्याने केलेल्या मागण्या या वरवरच्या किंवा केवळ एक बहाणा वाटेल अशा असतात हे माहीत असते. कारण शेवटी हे लोक आपले तेच खरे करणार याची खात्री असते. अशा व्यक्ती अतिशय कडक स्वभावाच्या असल्यामुळे अशा वातावरणात अशा लोकांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी एकतर जुळवून घ्यायला शिकतात किंवा नोकरी सोडून निघून जातात.

इथे आपले खरे करणे आणि तरीही मीच योग्य हे सिद्ध करणे हा प्रकार असतो. समोरच्याला चूक शाबित करणे आणि इतरांना नमवणे ही मग अशा लोकांची काम करण्याची पद्धत बनून जाते.
उदाहरणार्थ आपला ज्युरर क्रमांक ३ या प्रकारात मोडतो. थोड्याफार प्रमाणात क्रमांक १०सुद्धा.

2. 1-9 Country Club Leader (High People - Low Results)
आपल्याकडे एक शब्द खूप वेळा वापरला जातो - He is a 'Nice Guy'! हाताखालच्या लोकांची त्यांच्या उत्पादनक्षमतेपेक्षाही जास्त काळजी वाहणारा हा वर्ग असतो. किंबहुना हा वर्ग स्वत:ला आपल्या हाताखालील लोकांचा त्राता, संरक्षक समजत असतो. सहजपणे जाणवले नाही तरी यांचा एकंदर समज हा आपला कर्मचारिवर्ग हा आपली जबाबदारी आहे असा असतो. आणि अशा वातावरणात वावरणारा कर्मचारी कधीच यंत्रणेचा एक योग्य आणि सक्षम घटक बनू शकत नाही. कारण त्याला माहीत असते की आपण कितीही चुका केल्या, तरी बॉस आपल्याला सांभाळून घेईल.

1

मग सुरुवातीला चुका होणे आणि नंतर हळूहळू त्या करणे, बेफिकीरपणे करत राहणे ही प्रवृत्ती बनून जाते. मुळात सगळ्यांचे मत घेऊन त्यानुसार निर्णय घेणे हा स्वभाव असल्याने निर्णयाची योग्यायोग्यता तपासून पाहणे हा मुद्दा दुय्यम बनून जातो. कुणालाही दुखवायचे नाही, कायम गोड गोड बोलायचे ही वृत्ती असल्याने मग कर्मचारिवर्गाकडून गैरफायदा घेणे सुरू होते. अशी माणसे कितीही चांगली आणि कर्मचार्‍यांमध्ये आवडती असली, तरी आस्थापनेसाठी, आस्थापनेच्या वाढीसाठी घातक असतात. अशी माणसे स्वत;च्या मतावर ठाम राहण्यापेक्षा मॅनेजमेंटच्या कलाने चालणारी किंवा आपल्या सबॉर्डिनेट्सच्या मतावर विश्वास ठेवणारी असतात. त्यामुळे कार्यालयीन वातावरणात एक प्रकारची मरगळ निर्माण होऊन कामाचा वेग संथ होण्याची भीती वाढते.
उदाहरणार्थ आपला ज्युरर क्रमांक ११ किंवा थोड्याफार प्रमाणात १२ या वर्गात मोडतात!

3. 9-9 Team Management (High Results - High People)
हे एक संमिश्र प्रकरण असते. म्हणजे टास्क ओरिएंटेड लीडर आणि कंट्री क्लब लीडर या दोन्ही प्रकारांचे. पण गंमत म्हणजे दोन्ही बाबतीत त्यांचे वर्तन हे अगदी टोकाचे असते. या वर्गातील मॅनेजर्स हे स्वतःला कुटुंबाचा कर्ता मानणार्‍यापैकी असतात. आपल्याला देण्यात आलेले काम पूर्ण करण्याकडे, करून घेण्याकडे यांचा कल असतो, पण ते करताना आपल्या हाताखाली काम करणार्‍यांबद्दल काळजी, आत्मीयता बाळगणारा हा वर्ग असतो. पण यात एक किंतु आहे. ही काळजी प्रत्येक वेळी सहकार्‍यांबद्दल असलेल्या आत्मीयतेतून, प्रेमातून आलेली असेल असे नाही. किंबहुना ती शक्यतो आपले सहकारी कमजोर आहेत, त्यांना संरक्षणाची गरज आहे आणि ते त्यांना 'मी'च देऊ शकतो या आत्मप्रौढीच्या भावनेतून आलेली असते. बरं ही आत्मप्रौढी स्वतःपुरती राहत नाही. तिचे वारंवार प्रदर्शन होत राहते. मी किती चांगला आहे आणि मी तुमची किती काळजी घेतो, मग त्या बदल्यात तुम्ही माझे ऐकायला’च’ हवे ही भावना सतत व्यक्त होत राहते. याला इंग्लिशमध्ये Paternal Leader असे म्हणले जाते. यांची काम करण्याची पद्धत ठरलेली असते. टास्क ओरिएंटेड लीडरप्रमाणे काम कुठल्या पद्धतीने करून घ्यायचे याचा आराखडा त्यांच्या डोक्यात फिक्स असतो. आणि ते त्याच पद्धतीने काम पूर्णत्वास नेतातही. हां.. आता ते आपल्या हाताखालच्या लोकांना आपापसात चर्चा करण्याची पूर्ण संधी देतात, नक्कीच देतात आनि शेवटी कुठल्याही घरातल्या तथाकथित कर्त्या पुरुषाप्रमाणे, "ठीक आहे, छान चर्चा झाली. या बाबतीत 'मी' हा, असा निर्णय घेतला आहे" असे जाहीर करून मोकळे होतात. चर्चा चालू असताना हाताखालच्या लोकांना योग्य तो सल्ला देणे हे आपले कर्तव्य आहे यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. फक्त सल्ल्याची 'योग्यायोग्यता' ते स्वतःच ठरवतात. आपल्या हाताखालच्या लोकांचेदेखील यावर काही वेगळे मत असू शकते, हे त्यांना मान्य नसते. असे मत बाळगणारा कर्मचारी बाहेर फेकला जातो, जाऊ शकतो.

ब्लॅक आणि मौटनच्या मते हा या ग्रिडमधला सर्वात उपयुक्त असा वर्ग आहे. इथे काम पूर्णत्वाला नेण्याची वृत्ती आहे, तसेच ते काम करणार्‍या कर्मचार्‍याचीही योग्य काळजी घेतली जातेय. त्याचे मत विचारले जाते, विचारात घेतले जाते. हा वर्ग उत्पादन वाढीसाठी, प्रगतीसाठी पोषक असा असतो.

अर्थात जसे फायदे तसेच तोटेही आहेत या वर्गाचे. या प्रकारच्या अधिकार्‍यांच्या हाताखाली काम करणारे लोक हळूहळू परावलंबी होत जातात. जोपर्यंत आपल्या बॉसला अमुक एक काम आवडेल यांची खात्री पटत नाही, तोपर्यंत त्या कामाला हात घालण्याची त्यांची तयारी होत नाही. त्यातून बॉसला खूश करण्याची, त्याला कॉपी करण्याची वृत्ती निर्माण व्हायला लागते. हा वर्ग व्यवस्थापनासाठी खूप नुकसानकारक ठरू शकतो.

आपले ज्युरी नंबर १, ५, ९, ७ या वर्गात मोडतात. यात महत्त्वाकांक्षी व्यक्तीही येतात आणि महत्त्वाकांक्षा नसली तरी टीममध्ये काम करण्याची तयारी असलेले लोकही येतात. म्हणूनच हा वर्ग म्हटले तर अतिशय महत्त्वाचा आहे आणि तितकाच धोकादायकही ....

4. 1-1 Impoverished Leader - ( Low Results/Low People किंवा "मला काय त्याचे?")
हा वर्ग समाजात आणि एकंदरीतच सरकारी तसेच खाजगी आस्थापनांतूनही अतिशय कॉमन आहे. "मला काय त्याचे?" ही वृत्ती बाळगणारा हा अधिकारिवर्ग असतो. एकच इंटेन्शन ते म्हणजे येन केन प्रकारेण माझी खुर्ची शाबूत राहिली पाहिजे. हा अधिकारिवर्ग अतिशय निष्क्रिय असतो. कुठल्याही बाबतीत शक्यतो आपण लोकांच्या नजरेत येणार नाही, गळ्यात कुठलीही जबाबदारी पडणार नाही याची ते कसोशीने काळजी घेतात. मग त्यासाठी वरवर महत्त्वाचे वाटणारे पण फारशी कटकट नसणारे एखादे काम हातात घेऊन ते जबाबदारीची कामे इतरांवर ढकलतात आणि स्वत: मिरवायला मोकळे होतात. इथे काम पूर्ण होतेय का नाही याला महत्त्व नसते. फक्त ते झाले, तर शेवटच्या क्षणी त्याचे श्रेय कसे घेता येईल आणि नाही झाले तर जबाबदारी इतरांच्या डोक्यावर कशी टाकता येईल, याचा विचार कायम यांच्या डोक्यात चालू असतो. कुठल्याही आपत्तीपासून, समस्येपासून दूर पळायची वृत्ती असल्याने आपोआपच ’मला काय त्याचे?’ ही वृत्ती निर्माण होते. फक्त आपले शिर सलामत राहिले पाहिजे ही अपेक्षा असल्याने ते कुणाला सल्ला द्यायला जात नाहीत की मागायला जात नाहीत. मेजॉरिटी जिकडे असेल, तिकडे त्या सुरात आपला सूर लावणे व स्वत:ची कातडी वाचवणे हा हेतू. त्यामुळे साहजिकच अशा अधिकार्‍यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारीही तसेच बनत जाण्याचा धोका असतो. तिथे परफेक्शन, जबाबदारी, काम पूर्णत्वास नेणे यापेक्षाही टिकाव धरून राहणे, तग धरून राहणे याला महत्त्व देणारे कातडीबचाऊ धोरण वापरले जाते.
आपला ज्युरी क्रमांक १ हा या वर्गाचा प्रतिनिधी आहे.

5. 5-5 Middle of the road (Medium Results - Medium People)
हे थोडेसे मध्यवर्ती प्रकारात मोडणारे नेतृत्व आहे. हे लोक उत्पादन, कामाचे रिझल्ट्स आणि कर्मचारी दोघांनाही सारखेच महत्त्व देतात. वरवर पाहता ही पद्धत आदर्श वाटते खरी, पण ती तशी धोकादायकही आहे. कारण व्यवस्थापन आणि कर्मचारी या दोन्हींची काळजी, दोहोंचीही सोय बघायची झाली की त्यात तडजोडीचा भाग वाढत जातो. आणि दोन्हीकडे तडजोड करायची झाली की आपोआपच त्या प्रयत्नांची, त्या पद्धतीची परिणामकारकता ही कमी होत जाते. (आपला देश हे अशा प्रकारच्या पद्धतीचे एक उदाहरण म्हणता येईल. आपण कायम विकसनशीलच राहतोय यामुळे. विकसित नाही झालो अजूनही.) कारण इथे उत्पादन आणि कर्मचारी या दोहोंनाही मॉडरेटेड महत्त्व मिळते. या वर्गातले नेतृत्व कायम सरासरी क्षमतेला महत्त्व देतात.

माझ्या मते आपला ज्युरी क्रमांक २ किंवा ५ या प्रकारात मोडतात.

1
मंडळी, थोडा लांबलाच हा लेख. या विषयावर खूप काही विस्तृत स्वरूपात लिहिता येऊ शकेल. प्रत्येक मॅनेजरियल स्टाईलवर एक स्वतंत्र लेख लिहिता येईल. पण तो प्रपंच पुन्हा कधीतरी निवांतपणे सवडीने करू या. सध्या इथेच थांबतो. पण सगळ्यांना विनंती आहे की आपण यापैकी कशात मोडतो याचा विचार नक्की करा. मला खात्री आहे की त्याचा तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यातील यशाच्या दृष्टीने, किमान आपल्या कारकिर्दीचा आराखडा आखण्याच्या दृष्टीने नक्कीच उपयोग होईल. याबद्दल आणखीही काही माहिती हवी असेल (विनामूल्य), तर थेट माझ्याशी संपर्क साधा. जर पूर्ण टेक्निकल माहिती हवी असेल, कोर्स करायची इच्छा असेल तर अनेक ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत. (अर्थात ते चार्जेबल असतात. साधारण ८० ते १२० डॉलर्सप्रमाणे फी असते बहुधा). पण आंतरजालावर याबद्दल भरपूर माहिती उपलब्ध आहे. तीसुद्धा फ़ुकट. सर्च देताना बेल्बिन, मॅनेजरियल ग्रिड असा सर्च देऊन बघा. नाहीच काही सापडले, तर मी आहेच.

बाकी मला जिमने सांगितल्यामुळे मी ’ट्वेल्व्ह अँग्री मेन’शी ही माहिती तुलना करून पाहिली. तुमच्याकडे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येक व्यक्तीत यापैकी कुठल्या ना कुठल्या पद्धतीचा अंश असतोच असतो. बाकी ’ट्वेल्व्ह अँग्री मेन’ बघणार असाल, तर हा लेख समजून घेणे अधिक सोपे जाईल.

लक्ष लक्ष शुभेच्छा!
दिवाळीसाठी आणि पुढील आयुष्यासाठीसुद्धा!!

विशाल विजय कुलकर्णी
९९६७६६४९१९
vkulkarni.omnistar@gmail.com
.

दिवाळी अंक २०१५रसग्रहण

प्रतिक्रिया

जयन्त बा शिम्पि's picture

10 Nov 2015 - 10:03 am | जयन्त बा शिम्पि

मला ही हा चित्रपट इतका आवडला आहे कि माझ्या खाजगी दैनंदिनी मध्ये , संपुर्ण स्क्रिप्ट चे मराठीत भाषांतर लिहावयास सुरवात केली आहे. थोडेसे अपुर्ण आहे कारण वेळ मिळत नाही म्हणुन. जर कोणी रसिक वाचक माझ्याकडे आला, तर मी त्याला वाचावयास देतो. मला त्याच्यासह अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या कथा आंतरजालावर सापडलेल्या आहेत.

विशाल कुलकर्णी's picture

10 Nov 2015 - 12:20 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद

मित्रहो's picture

10 Nov 2015 - 6:16 pm | मित्रहो

छान समजावून सांगितली. त्याचा चित्रपटाशी संबंध छान जोडला.

विशाल कुलकर्णी's picture

11 Nov 2015 - 9:12 am | विशाल कुलकर्णी

धन्यवाद !

पैसा's picture

11 Nov 2015 - 9:21 am | पैसा

एका वेगळ्या चित्रपटाची अभिनव पद्धतीने करून दिलेली ओळख!! अतिशय आवडली!

बोका-ए-आझम's picture

11 Nov 2015 - 9:50 am | बोका-ए-आझम

हा भन्नाट प्रकार आहे. आॅफिसमधल्या कामाला तर तो लागू पडतोच पण आपल्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्येही चपखल बसतो.तसंच ट्वेल्व्ह अँग्री मेन चं. चित्रपटात जे घडतं ते त्या deliberation room मध्ये आणि तेही संवादांमधून. या दोन्ही जबराट गोष्ट एकत्र आणणा-या मॅनेजमेंट गुरूंचे आणि ते वाचकांपर्यंत इतक्या सोप्या आणि अप्रतिम पद्धतीने पोचवल्याबद्दल तुमचे जेवढेा आभार मानावेत तेवढे थोडेच.

सुहास झेले's picture

11 Nov 2015 - 10:14 pm | सुहास झेले

बाब्बो... एकदम मस्तच. १२ रागीट माणसे अगदी तोंडपाठ आहे. त्याचा आणि ग्रिडशी असा संबंध असू शकेल असे वाटले नव्हते. आज पुन्हा १२ अँग्री मॅन बघणे आले :)

पद्मावति's picture

13 Nov 2015 - 12:14 pm | पद्मावति

वाह मस्तं कल्पना.
१२ अँग्री मेन ची कथा आणि मॅनेज्मेंट ग्रिड चा संबंध केवळ अफलातून. असा कधी विचारच मी केला नव्हता. सुपर्ब.

विशाल कुलकर्णी's picture

13 Nov 2015 - 12:33 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद

एकदम मस्त. पात्र विश्लेषण आणि जोडीने मिळालेली माहिती उत्तम !

मुक्त विहारि's picture

13 Nov 2015 - 12:52 pm | मुक्त विहारि

१. एका सुंदर सिनेमाची तशीच सुंदर ओळख.

२. तुमची लेखनशैली पण तितकीच अप्रतिम....

३. आपण मिळवलेले ज्ञान, स्वतःपुतएच सीमीत न ठेवता, आमच्या सारख्या अज्ञानी मिपाकरांसमवेत वाटण्यासाठी.

स्वाती दिनेश's picture

13 Nov 2015 - 1:55 pm | स्वाती दिनेश

१२ अँग्री मेन.. माझा आवडता चित्रपट! अगणित वेळा पारायणे केली असतील. एकदा रुका हुआ.. आणि १२ अँग्री मेन बॅक टू बॅक पाहून बघितले. मग रुका हुआ.. अजून बटबटीत वाटला.
खूप छान लिहिले आहे. मॅनेजेरियल ग्रिड ह्या नव्या अँगलने आता परत एकदा १२ अँग्री मेन पाहते.
स्वाती

विशाल कुलकर्णी's picture

13 Nov 2015 - 1:58 pm | विशाल कुलकर्णी

_/\_

नाखु's picture

26 Nov 2015 - 4:54 pm | नाखु

पण वाचनखूण ही व्यवस्था का नाही म्हणतो मी..

चांगला लेख वा खू मध्ये कसा साठवायचा याची खंत असलेला

चाकरमानी नाखु

१२ अँग्री मेनची कथा आणि मॅनेजमेंट ग्रीडची सांगड आवडली...!!!

विशाल कुलकर्णी's picture

1 Dec 2015 - 12:59 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद श्रीमंत _/\_